‘तिनशे वर्ष.....’ वाला फेमस डायलॉग माहितीच असेल अनेकांना. अगदी तसंच... ‘तीन महिने’ असं म्हणावंसं झालेलं आम्हाला. पावसाळ्याच्या अखेरीस केलेला रतनगड पचला होता, जिरला होता. आता पुन्हा जायलाच हवं असा निर्धार झाला. दोन दिवसांचा अट्टाहास न करता २०१३ संपायच्या आत एक दिवसाचा ट्रेक तरी मारायचाच म्हणून आम्ही ठिकाणं शोधायला लागलो. घनगड, प्रबळगड, तुंग-तिकोना, असे पर्याय समोर आले. हडसर हा ही एक पर्याय होता. चावंड केला तेंव्हाच हडसर बद्दल वाचलं होतं. कुतुहल तेंव्हापासून होतंच. मग सगळ्यांना तो पर्याय पटला, आवडला. मिशन ठरलं.
ठाण्यापासून १३६ किमी अंतरावर जुन्नर हे गाव आहे, आणि तिथून अंदाजे १३ किमी वर हडसर किल्ला आहे. काठिण्य पातळी मध्यम श्रेणीची, चढायला लागणारा वेळ अंदाजे दीड तास. येऊ शकणारे, न शकणारे सगळेच जण उत्साहित होते. चढवय्येंचा आठ जणांचा विक्रम जेमतेम गाठत अखेर ७ जण जमलो. प्रसन्न, पुशअप मॅन दिलीप, लोहपुरुष, रॉकपॅचचा राजा स्वानंद, दीपक, मी आणि मोहित असे वीर मोहिमेत सामील झाले आणि पहाटे साडेपाचला शहाड वरून आमच्या गाड्या म्हाळशेज च्या दिशेने सुटल्या. यावेळी वेगळी बाब अशी होती की पुण्यावरून आमचे चार नवे सवंगडीही आम्हाला जुन्नर ला भेटणार होते.
थंडीचा मोसम असल्याने किर्र अंधार होता. त्यात म्हाळशेज चा रस्ता मुळातच अंधारा असल्याने क्षितिजाची व्याख्या; ‘गाडीचे दिवे पोहोचतात तिथपर्यंत’ अशी होती. सहा वाजता चहाची हुक्की आल्याने मंडळातले काही सदस्य चुळबुळत होते. मग आम्ही सरळगावच्या बिगबझार (इति लोहपुरुष) मधे थांबलो. एका टपरीत वसलेल्या या मॉल मधे आगपेटीपासून औषधापर्यंत सगळं मिळत होतं. तिथल्या मस्तशा चहाने आमचे डोळे जरा टकटकीत झाले. आत सूर्योदय स्पॉट ला थांबायचं असं ठरवून आम्ही पुन्हा सुटलो. वळणदार आणि स्मूथ असा म्हाळशेज चा रस्ता कापत आम्ही शेवटी आकाशाच्या रंगछटेवरून ‘आता सूर्योदय होणार’ असं ताडलं, आणि एका ठिकाणी थांबलो. क्लिकाक्लिकीचा श्रीगणेशा केला आणि पुढे...
असं करत जुन्नर यायला ३ तास लागले. ८:३० ला जुन्नरच्या एसटी स्टॅंड समोरच्या ठरलेल्या चहाच्या गाडीवर मावशींकडे चहाची मागणी केली. किल्ल्याचा बेत सांगितल्यावर आमच्यातल्या दोघांचं पहिलं वाक्य होतं, ‘ए जुन्नर ला चहा फिक्स!’ शिवनेरी, चावंड, नाणेघाट, तीनही ट्रेक्स मधे हे एक साम्य होतं. ते या चौथ्या ट्रेकलाही अनुभवलं. आता फुल्ल तरतरीत झालो होतो. पुण्याची मंडळी अजून वाटेवर होती. मग त्या तीन पैकी दोन ट्रेक्स मधे जे आणखी एक साम्य होतं, तेही या चौथ्या ट्रेकला अनुभवावं म्हणून हॉटेल आशियाना मधे थडकलो. तिथली मिसळ...वा वा वा ! बात है उस मे. मिसळ, वडा हेच ट्रेकर्सचं खरं फ्युएल आहे. ऑर्डर द्यायला विशेष वेळ लागला नाही; या खेपेस शेव वडा ‘सॅंपल’ सिंगल असा एक नवीन आयटम ट्राय केला. जबर होता तो पण. सॅंपल म्हणजे रस्सा ही नवीन माहिती कळली. ती मिसळ खाऊन स्वानंद प्रगल्भ मराठी बोलायला लागला. आमच्या सगळ्यांचे चेहरे तो फ्रेंच बोलतोय असे झाले होते. तरीही आपलं माना डोलवत आम्ही वेळ निभावून नेत होतो.
तोवर पुणे कंपू आला; अनुराग, निशाद, प्रभास आणि अमित अशी चौकडी. ओळखी झाल्या. हे सगळेच मुरलेले ट्रेकर्स असल्याने त्यांच्याबरोबर भटकंती करायला आम्ही लई एक्सायटेड होतो ब्वा. मग खादाडी संपन्न झाली; आता ते सगळं जिरवायचं होतं. आम्ही रस्ता शोधत हडसर गाव पार करून ‘राजूर नं. १’ या पाटीपाशी गाड्या लावल्या. इथूनच किल्ल्याची वाट सुरू होते. किंचितसा चढ चढला की एक विस्तीर्ण पठार लागतं आणि समोर तुम्हाला बसलेल्या हत्तीसारखा हडसर किल्ला दिसत रहातो. इथपासूनच निशाद आणि स्वानंद जोडीने लीड घेतला. ते पठार चालून गेलं की त्या किल्ल्याची जी एक घळ दिसते तिच्या डावीकडून चढत वर गेलं की पाउण तासात तुम्ही त्या हत्तीच्या डोक्यावर जाऊन पोहोचता. इथे आम्ही सगळ्यांनी बराच क्लिकक्लिकाट केला. तसं ऊन फार डोक्यावर असल्याने फोटो काढायला पूरक उजेड नव्हता. पण दीपक आणि दिलीप नेहमी प्रमाणेच पोज देण्यास फुल्ली एक्सायटेड होते. सगळ्यांनी हवेत उड्या बिड्या मारून डीपी मटेरियल वाले फोटो काढण्याची हौस भागवून घेतली. पुणेकर आणि त्यांच्या फोटोग्राफी कौशल्याचे अनेक आभार :)
मग घळीतून पुढे चालत गेलं की खोदीव पाय-या आहेत ज्या अत्तिशय सुरेख आहेत. आणि त्या चढून गेलं, की मग हडसर चं वैशिष्ट असणारे अप्रतिम दरवाजे तुमचं स्वागत करतात. हा मुख्य मार्ग आहे जो किल्ल्याला सबंध वळसा घालून जातो. या शिवाय एक खुंटीची वाट आहे जी गावक-यांनी तयार केलेली आहे. त्या वाटेच्या वाटेला आम्ही गेलो नाही.
खोदीव पाय-यांच्या इथे आम्हाला एक गावकरी मामा भेटले. ‘खाली गाड्या लागलेल्या दिसल्या, माला वाटलं साएब आलेत
की काय म्हनून लगबग वर आलो. त्याचं काय, माज्याकडे हितले ४-५ किल्ले आहेत; माज्या अख्त्यारित. साएब येतायत अधून मधून. मला वाटलं आले की काय आज’, मामा सांगत होते. बाहेरचे लोक किल्ल्यांवर कशी घाण करतात, कसे अपघात होतात, कशा आगी लागतात.... मामांना बरंच बोलायचं होतं. जरा वेळ भडाभडा त्यांनी काही घडलेल्या गोष्टी, त्यांचे अनुभव सांगितले आणि मग त्यांनाच काय वाटलं कोण जाणे, म्हणाले ‘बरंय मग... आता जातो मी खाली’ आणि निघून गेले.
आज रॉकपॅचचा राजा काय खाउन/पिऊन आला होता कोण जाणे. कुछ कर दिखाना है स्टाईल मधे लीड करत होता. इथे आम्ही मामांशी बोलत होतो तेंव्हा वरून लांबून आम्हाला हात दाखवत, ‘या या’ असं म्हणत होता. हळू हळू एक एक करत आम्ही सगळे किल्ल्यावरच्या शंकराच्या देवळाबाहेर काही देवळाच्या आत विसावलो. थोडावेळ निवांत बसून मग परत फिरलो. पुणे कंपूला जरा आणखी फोटुग्राफी करायची असल्याने ते मागून सावकाश येत होते. घळीपर्यंत नीट आलो आणि मग आम्ही कुठेतरी रस्ता चुकलो. ट्रेक म्हटलं की हे झालंच पाहिजे.... नियम आहे तो.
...क्रिकेटचे सामने बघणारी तीन मुलं...
एका पायवाटेवरून पुढे बराच वेळ गेलो; मग तो डेड एन्ड निघाला... आमची आगगाडी उलट्या दिशेने सुरू झाली. आता इंजिन होतं लोहपुरुष. मग काय विचारता; जिथे सामान्याला रस्ता दिसेच ना, तिथे ‘हा काय रस्ता’ असं तो म्हणे. पण मग खरोखरच जो बरोबर रस्ता होता तो त्याने शोधला. ग्रूप ला ‘रस्त्यावर’ आणण्याचं श्रेय परेशचं आहे असं स्वानंद ने जाहीर केलं. मग पठारावरून चालत, तिथल्या इंटर-गाव क्रिकेट स्पर्धेची जबरा कॉमेंट्री ऐकत आम्ही चालत होतो. त्यात मिलिंद आउट! असं ऐकायला आल्यानंतर, दुस-याच चेंडूवर मिलिंदनेच चौकार लगावला हे दिलीपच्या ऑडिटर कानांतून सुटलं नाही. चेंडू हवेत मारल्यावर तिथला कॉमेंटेटरच ‘कॅच....’ असं ओरडे... आणि सोडला की ‘आणि सोडलेला आहे’ हेही सांगे. असं ऐकीव मनोरंजन करून घेत आम्ही आमच्या गाड्यांजवळ येऊन पोहोचलो.
...डावीकडूनः लोहपुरुष परेश, पुशअप बॉय दिलीप, मोहित, दीपक, रॉकपॅचचा राजा स्वानंद, अहम्, व अँग्रीमॅन प्रसन्न...
एव्हाना पुणेकरही कढिपत्ता इत्यादी गोळा करून गाडीजवळ येऊन पोहोचत होते. त्यांचा नाणेघाट चा बेत होता, पण आम्हाला परत जायचं असल्याने आम्ही पुढच्या ट्रेक साठी थंब्स अप करत मुंबईकडे निघालो. परतीच्या प्रवासात प्रथेप्रमाणे बहुढंगी, अतरंगी गाणी, विशेषत: बॉस चित्रपटाचं शीर्षकगीत रिपीट रिपीट ऐकत वेळ सार्थकी लावला.
बरेच दिवसांनंतरचा हडसर ट्रेक भारी झाला, सुफळ संपूर्ण झाला. २०१३ ट्रेकिंग दृष्ट्या समाप्त झालं होतं. पण गडकिल्ल्यांची यादी अमाप मोठी आहे. तेंव्हा पुढच्या ट्रेकला भेटूच.... एवढं एकच आम्ही एकमेकांना सांगितलं.
प्रतिक्रिया
1 Jan 2014 - 12:23 pm | मुक्त विहारि
आवडला
1 Jan 2014 - 12:47 pm | यशोधरा
छान.
1 Jan 2014 - 1:14 pm | कंजूस
आसरा आहे का ?
1 Jan 2014 - 1:33 pm | अनिरुद्ध प
लेख आवडला.
1 Jan 2014 - 1:37 pm | सौंदाळा
मस्त.
पुण्याहुन तर एकदम झटपट होणारा आणि बायका-पोरांना घेऊन जाण्यासारखा किल्ला.
नोव्हें २०१० मध्ये अचानक ठरवुन हडसरला गेलो होतो त्या आठवणी ताज्या झाल्या.
हाच माझा शेवटचा ट्रेक, नंतर लग्न झाले आणि ट्रेक संपले. (बर्याच हिरवीणींचे लग्न झाल्यावर त्यांची अभिनय कारकिर्द संपते तसे)
अनुभवी लोकांनी यावर जालीम तोडगे सुचवले तर खुप मदत होईल ;)
1 Jan 2014 - 2:21 pm | बॅटमॅन
ठ्ठो =))
2 Jan 2014 - 11:00 am | मदनबाण
हॅहॅहॅ... {हास्य सौजन्य :- प्रघा उर्फ पकाका } ;)
फोटु झकासच ! :)
1 Jan 2014 - 2:20 pm | कंजूस
सौँदळा ,तोडगा आहे .
सकाळी तडक गडाचा पायथा गाठायचा .उदा: खिरेश्वर गाव .
गावातला एखादा माणूस घ्यायचा आणि हरिश्चंद्रवर एक रात्र काढायची दुसरे दिवशी परत .
आपल्याला सोबत आणि गाववाल्यास थोडी कष्टाची कमाई मिळते .
गाईड घेतल्याने घरचेपण काळजी करत नाहित .
माझा अनुभव .
करून पाहा .
आल्यावर लेख ठोका .
1 Jan 2014 - 2:44 pm | एकनाथ जाधव
छान लेख आणि फोतो
1 Jan 2014 - 3:14 pm | आनंदराव
आम्हाला न सांगता गेल्याबद्दल जाहिर निषेध !
फोटो आणि लेख , जाम भारी.
1 Jan 2014 - 3:33 pm | सुहास..
मस्त
1 Jan 2014 - 9:59 pm | अत्रुप्त आत्मा
छान ट्रेक. :)
1 Jan 2014 - 11:11 pm | arunjoshi123
फटू मस्तच
2 Jan 2014 - 5:11 am | हतोळकरांचा प्रसाद
मस्त लेख!!! आवडला!!! छायचित्रेहि एक नम्बर!!!
2 Jan 2014 - 9:28 am | प्रचेतस
छान ट्रेक.
हडसर अतिशय सुंदर किल्ला आहे.
आमच्या हडसर वारीची आठवण झाली.
2 Jan 2014 - 10:44 am | जेपी
लेख आवडला.
2 Jan 2014 - 10:54 am | प्रमोद देर्देकर
वेल्ला साल्या जाताना तुझी गाडी कळव्यावरुन का णाही घेतली बे. मी पण आलो असतो ना.
2 Jan 2014 - 11:23 am | सुज्ञ माणुस
मस्त फोटू आणि वर्णन.
बाकी त्या कातळात झाकलेल्या पायऱ्या ( Rock covered steps) पाहील्या कि हडसर पाहिल्याचे समाधान लाभते. :)
2 Jan 2014 - 11:47 am | वेल्लाभट
आभार
@कंजूसः महादेवाचं देऊळ आहे...
@आनंदयात्रि आणि प्रमोदः- मिपावाले आपण मिळून जाऊयात २०१४ मधे... एक धागा सुरू करूया त्याबद्दल वेल इन अॅडव्हान्स. काय वाटतं? फेब्रुवारी ची तारीख ठरवू... म्हणजे पुरेसा वेळ मिळेल ठरवायला.
बाकी सगळ्यांचे आभारस्..........
19 Jan 2014 - 1:07 pm | आनंदराव
हो हो. जाऊयात. माझा पाठिंबा आहे.
कार्यबाहुल्यामुळे सवड झाली नाही. माफी !
2 Jan 2014 - 11:56 am | ग्रेटथिन्कर
आजकाल अशा डोंगरांवर पवनचक्क्यांची टोळधाड येत आहे,त्यामुळे निसर्गाशी तादाम्य पावल्याचे फिलिंग तिथे येत नाही. कुठे तरी पवनचक्क्यांची रांग दिसतेच, एकही डोंगर या लोकांनी सोडलेला नाही .त्यामुळे ट्रेकिंग करायचे तर घाटमाथ्यावर वासोटा चांदोली इथे जावेसे वाटते.
2 Jan 2014 - 11:57 am | ग्रेटथिन्कर
बादवे ,हा हडसर घाटमाथ्यावर आहे काय?
2 Jan 2014 - 12:13 pm | प्रचेतस
घाटमाथ्यापासून जेमतेम ७/८ किमीवर.
2 Jan 2014 - 12:26 pm | प्रमोद देर्देकर
ओके वेल्ला पण मला सर्व प्रथम हरिश्चंद्रगड पहायचा आहे त्यातुन कोकणकडा मस्ट.
कधी ठरवतोय्स बोल. माझ्या भावाने बहुतेक सगळे गड पाहीले आहेत आणि मी मोजुन ४. त्यातही तुझ्या मदतीने झालेला शेवटचा शिवनेरी किल्ला श्री. आप्पा परब यांच्या बरोबरीचा.
2 Jan 2014 - 12:36 pm | वेल्लाभट
मी १०... आता बोला.
आकडा जाऊदे. पण माझ्या मते, वल्ली, आणि इतर जे अधिक अनुभवी ट्रेकर्स लोक्स आहेत इथं, त्यांचं यावरचं मत येऊदे, मग आपण ठरवूयात.
19 Jan 2014 - 1:09 pm | आनंदराव
अवघड आहे म्हणतात हा किल्ला !
2 Jan 2014 - 3:00 pm | सूड
मस्त !!
2 Jan 2014 - 5:02 pm | प्यारे१
भारी ट्रेक नि फटु!
4 Jan 2014 - 10:39 am | वेल्लाभट
आभार्स
@प्यारे, सूड...
5 Jan 2014 - 9:03 pm | पैसा
छान लिखाण आणि फोटो तर मस्तच!
5 Jan 2014 - 9:47 pm | किसन शिंदे
वृत्तांत आणि फोटो दोन्ही जबरदस्त रे. :)