थंडीने तिचा गुलाबी रंग दाखवायला सुरुवात केली नाही तर इथे आम्हा खवय्यांची season special list तयार होऊ लागली. अहो काय काय यादी करावी तितकी कमीच. त्यात आवडत्या अळीवाच्या लाडवांचा क्रमांक प्रथम. करायला सोप्पा खायला त्याहून सोप्पा आणि एकदम healthy अशा या लाडवाने यादीची सुरुवात करूया.
साहित्य:
१ वाटी खवलेला नारळ
३/४ वाटी चिरलेला गूळ
१/४ वाटी अळिव
२ छोटे चमचे वेलची पूड
कृती:
१. अळीव नारळाच्या पाण्यात अथवा साध्या पाण्यात ४-५ तास भिजवावेत. साधारण अळीव भिजतील इतके पाणी घालावे व झाकून ठेवावे.
२. भिजवलेले अळीव, गूळ आणि नारळ एकत्र करावे व मंद आचेवर शिजण्यास ठेवावे. अधे मधे ढवळावे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही.
३. सर्व मिश्रण छान एकजीव झाले कि गॅस बंद करावा.
४. गार झालेल्या मिश्रणामध्ये वेलची पूड घालावी व त्याचे लाडू वळावेत.
काही महत्वाचे:
गुळाच्या गोडीनुसार त्याचे प्रमाण कमी जास्त करावे.
प्रतिक्रिया
25 Nov 2013 - 8:41 am | किसन शिंदे
गुळ असल्यामुळे या लाडवांची चव वेगळी असणार यात शंकाच नाही. बाकी हे अळिव म्हणजे काय? याआधी कधी पाह्यले नाही.
26 Nov 2013 - 5:33 am | स्पंदना
अळिव म्हणजे हळिव किसनद्येव!
आता राधाराणीला कामाला लावा.
हळिवाची खिरपण करतात. फक्त हे हळिव व्यवस्थीत भिजावे लागतात. पाण्यात घातले की गुळगुळीत होतात. अगदी सब्जा बियांसारखे.
27 Nov 2013 - 3:41 pm | विजय मुठेकर
अरे, हे तर दिवाळीच्या किल्ल्यावर जंगल येण्यासाठी जे वापरतो तेच आहे......!!!
27 Nov 2013 - 6:09 pm | प्यारे१
=))
ते 'अरे' च्या ऐवजी 'अरेच्चा' टाका नि मग पहा काय बहार येते!
टक्कू ना अ/हळीव लाडवामुळे झालेल्या जळजळीसाठी धन्यवाद.
हे चावावे लागत नाहीत पण अळीव/हळीव दाढेत अडकतात. छळ होतो.
27 Nov 2013 - 7:29 pm | वेल्लाभट
आम्ही मोहोरी आणि धने टाकायचो...
25 Nov 2013 - 9:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च्यायला, गुढघे दुखायला लागल्यावर या अळिवाचा लेप लावतात आम्ही 'हाळव' म्हणतो. चिकट असते तेच ना ?
आता घरच्यांना आपले लाडू दाखवण्यात आले आहेत. सर्वांना आवडले. आता कधी होतात त्याची वाट पाहणे आले.
-दिलीप बिरुटे
26 Nov 2013 - 10:57 am | दिपक.कुवेत
प्रा. म्हणजे तुम्हि या वयात(हि) लाडु देणार तर! (कॄ. ह. घ्या)
25 Nov 2013 - 9:07 am | प्रचेतस
मस्त पाकृ.
25 Nov 2013 - 9:54 am | यशोधरा
मस्त दिसत आहेत लाडू!
26 Nov 2013 - 10:18 am | पैसा
मस्तच आहेत लाडू! पाकृ, फोटो सगळेच छान!
26 Nov 2013 - 9:46 pm | पिंगू
आई नेहमी साखर घालून करते. आता गूळ घालून करायला सांगतो.
26 Nov 2013 - 10:36 pm | निवेदिता-ताई
मस्तच.....उद्याच बनवते
26 Nov 2013 - 11:05 pm | सूड
आमच्याकडे हे मेथीच्या लाडवात घालतात.
27 Nov 2013 - 2:51 pm | सुहास..
लय भारी ओ टक्कुशेठ ब्लॉगस्पॉटवाले !!
आम्ही मराठवाडा झिंदाबाद उहाच म्हणत नाही !!
या अळवाची खीर पण टाक रे भावा !! लय दिस झाले बघ खावुन :)
27 Nov 2013 - 5:51 pm | पैसा
ते टक्कूशेठ नाहीत! टक्कूवहिनी आहेत!
27 Nov 2013 - 3:30 pm | अत्रुप्त आत्मा
लाडुत लाडु हळिवाचे लाडू!
मला सगळ्यात जास्त अवडणारे!
27 Nov 2013 - 3:37 pm | सुहास झेले
पाककृती मस्तच आणि फोटो तर अल्टीमेट :)
27 Nov 2013 - 4:41 pm | अनन्न्या
अळीवाचे लाडू गुळाचेच चांगले लागतात.
27 Nov 2013 - 6:33 pm | टक्कू
पाककृती आवडल्याबद्दल धन्यवाद! हे लाडू गुळाचेच खाल्ले आहेत. नारळ आणि गूळ हे मिश्रण भन्नाट लागते. :)