फरपट

जुईचे फूल's picture
जुईचे फूल in जे न देखे रवी...
10 Sep 2013 - 12:41 pm

नशीबाच्या शोधात दूर देशी आलो
अन इथवर येऊन परतीच्या वाटाही विसरून गेलो
हीच झाडं, हेच वारे, हेच ऋतू आपले
पसरलेले हिरवे माळ अन रस्तेही आपले
इथल्या मातीत पाय रोवून उभे राहू लागलो
पाळामूळांसकट आता इथेच गुंतू लागलो
तरीही येतो एक क्षण असाच अडवा तिडवा
हृदयात थेट हात घालून घेतो सारा मागोवा
फरपट्ल्यासारखा घेऊन जातो पुन्हा घरट्याकडे
रक्ताळलेले आपण खोल आत मनामध्ये
जखमा तशाच भरून निघतात पण व्रण मात्र तसेच
प्रत्येक व्रण एक दूत होतो आठवणींचा पूल होतो
आता पाय मातीत रोवूनही त्यात मूळं रुजत नाहीत
त्यांनाही कदाचित वाटत असावं ही माती आपली नाही
पायाखालची जमिन सरकतानाही रुजल्याचा आव आणतो
ही माती ही झाडं हे सारं आपलंच असं मनाला भासवतो
खोल आत कुठेतरी ती जखम ठुसठुसतच असते
तिची जाणीव चेहऱ्यावर कधीही आणायची नसते
पूर्वी झटकलेल्या आठवणींवरही आता पुटं चढू लागतात
आठवांचे आठव ही येईनासे होतात
पुन्हा तसाच एक क्षण फरपटत नेतो
आपणही आता "सवयीने" फरपटत जातो
आता जखमा फार होत नाहीत
आणि झाल्या तरी सलत नाहीत
आता आपणही सरावलेले असतो
मनही सरावलेले असते
आणि पलिकडे आपल्या नसण्याला आता घरटेही सरावलेले असते....

मुक्तक

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 12:59 pm | मुक्त विहारि

मस्त..

नित्य नुतन's picture

10 Sep 2013 - 1:49 pm | नित्य नुतन

अहाहा ... हृदयाला हात घातलात ... कोणे एके काळी आमची सुद्धा अशीच अवस्था होती ... सगळे सोडून परत आले .. पण इथे सुद्धा थोडी फार फरपट आहेच आहे ....

संजय क्षीरसागर's picture

10 Sep 2013 - 2:06 pm | संजय क्षीरसागर

उगीच कशाला फरपट चालवलीये जीवाची?

अत्रुप्त आत्मा's picture

10 Sep 2013 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा

@पुन्हा तसाच एक क्षण फरपटत नेतो
आपणही आता "सवयीने" फरपटत जातो
आता जखमा फार होत नाहीत
आणि झाल्या तरी सलत नाहीत
आता आपणही सरावलेले असतो
मनही सरावलेले असते
आणि पलिकडे आपल्या नसण्याला आता घरटेही सरावलेले असते....>>> __/\__

स्पंदना's picture

12 Sep 2013 - 7:37 am | स्पंदना

सुरेख!
आपण इथले नसतो अन तिथले उरत नाही...

वेल्लाभट's picture

12 Sep 2013 - 12:58 pm | वेल्लाभट

एकीकडे फरफट एकीकडे घुसमट हो!
मग रोजच्या घुसमटीपेक्षा ही अशी अधून मधून होणारी फरफट बरी नाही का!
असं आपलं मला वाटलं.

काव्य उत्तम, आणि अगदी भावविश्वात जायला भाग पाडणारं. छान.

चाणक्य's picture

12 Sep 2013 - 1:05 pm | चाणक्य

झालीये रचना.

arunjoshi123's picture

12 Sep 2013 - 3:27 pm | arunjoshi123

छान कविता. कळली, भावली.

सुधीर's picture

15 Sep 2013 - 4:58 pm | सुधीर

आवडली कविता!