ही एक अतिशय सोपी व झटपट होणारी (जास्तीत जास्त १० मिनिटे) पाककृती आहे. मी अनेकवेळा मुलांना संध्याकाळी ५-६ वाजता भुकेच्या वेळी असे पोहे चटकन करून दिले आहेत.
साहित्यः- (अंदाजे २ माणसांसाठी)
२-३ मुठी कच्चे कोरडे पोहे, २-३ चमचे गोडेतेल, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, १ चमचा साखर, चवीपुरते मीठ, १ चमचा तिखट, थोडेसे भाजलेले दाणे, थोडी चिरलेली कोथिंबिर, गरज भासल्यास थोडेसे फरसाण
कृती:- पोहे मावतील एवढे एखादे स्टीलचे पातेले पाण्याने विसळून घ्यावे. विसळल्यानंतर ते पुसु नये. त्यामुळे कच्च्या पोह्यांना किंचित ओलसरपणा मिळेल. त्यात कच्चे पोहे टाकावे. टोमॅटो बारीक चिरून लगेच पोह्यांवर पसरावा. चिरल्यानंतर उरलेला टोमॅटोचा रस सुद्धा पोह्यांवर पसरावा. पोहे कच्चे असल्यामुळे त्यात टोमॅटोमुळे थोडासा ओलावा येऊन पोहे थोडे मऊ होण्यास मदत होते. कांदा बारीक चिरून पोह्यांवर टाकावा. नंतर पोह्यांवर अंदाजाने २-३ चमचे तेल वरून टाकावे. चवीपुरते मीठ घालावे. एक चमचा साखर घालावी. नंतर थोडे भाजलेले दाणे टाकून संपूर्ण मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. नंतर आवडीनुसार वरून चिरलेली कोथिंबिर किंवा थोडेसे फरसाण सुद्धा घालता येईल.
पोहे कच्चे असल्याने चावायला जरा वेळ लागतो. त्यामुळे खूप जास्त पोहे घेऊ नयेत. खूप जास्त पोहे घेऊन खाल्ले तर नंतर तोंड दुखण्याची शक्यता आहे. त्यात तेल-तिखट-कांदा असल्याने पोहे काहीसे तामसी स्वरूपाचे/तिखट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे करताना त्यात १ चमचा साखर टाकल्यास तिखट-गोड अशी एकत्रित छान चव लागते. टोमॅटोमुळे थोडासा ओलावा येउन कच्चे पोहे काही प्रमाणात मऊ होतात. भाजके दाणे, कोथिंबिर इ. मुळे चव अजून छान लागते.
जास्तीत जास्त १० मिनिटात २ माणसांसाठी हे पोहे तयार होतात.
प्रतिक्रिया
18 Aug 2013 - 2:04 pm | कवितानागेश
पातळ पोहेच घेतले तर छान लागेल.
18 Aug 2013 - 2:09 pm | श्रीगुरुजी
पातळ पोहे यापूर्वी वापरले नाहीत. वापरून बघता येईल. पण कदाचित पातळ पोह्यांमुळे गिचका होईल असे वाटते.
18 Aug 2013 - 2:16 pm | अभ्या..
पातळ फव्हेच भारी लागतेत. पण दाढाना असे चिकटून राहातेत की.......
18 Aug 2013 - 2:10 pm | पक पक पक
आवड्ल्या गेले आहेत हे पोहे..:)
18 Aug 2013 - 6:29 pm | दिपक.कुवेत
"पोहे मावतील एवढे एखादे स्टीलचे पातेले पाण्याने विसळून घ्यावे. विसळल्यानंतर ते पुसु नये".....पण भांडे आधीच विसळलेले असुन कोरडे असेल तर? असो. मी हि कधी कधी असे पोहे करतो अर्थात फरसाण घालुन. झटकन तर होतातच शीवाय पोटभरीचे. एक छोटि अॅडिशन म्हणजे शेवटि तेल-हळद-मोहरीची फोडणी देतो आणि मग एकजीव करतो. टोमॅटो नसल्यास अर्ध्या लिंबाचा रस पिळावा.
19 Aug 2013 - 12:50 pm | श्रीगुरुजी
ही जरा वेगळीच कृती दिसते. करून बघायला हवी.
19 Aug 2013 - 1:02 pm | वाटूळ
Ekdum bhari
19 Aug 2013 - 1:39 pm | पिलीयन रायडर
मी हेच पोहे असे करते.. त्याला दडपे पोहे म्हणतात.. आणि ते बनवायलाही १० मि. लागतात..
पातळ पोहे घ्या.. त्यावर कांदा, टोमॅटो, थोडी काकडी चिरुन घाला, मीठ, साखर आणि लिंबाचा रस टाका.
छोट्या कढईमध्ये फोडणी करा, त्यात हिरवी मिरची, हळद, शेंगदाणे, कडिपत्ता टाका..
ही फोडणी पोह्यांवर टाकुन घ्या.. आणि ५ मि. पोहे झाकुन ठेवा म्हणजे छान मऊ होतील.
19 Aug 2013 - 2:28 pm | राही
दडपे पोहे आणि त्यात ओले खोबरे नाही? पोहे नारळाच्याच (जरूरीपुरत्या ) पाण्यात भिजवून त्यात भरपूर ओले खोबरे, आल्याचा कीस आणि बाकी इतर पदार्थ घालून दडपून ठेवल्यास अधिक चांगले लागतात. मात्र, ते 'झटपट पोहे' रहात नाहीत. कारण नारळ खवणे आणि पोहे दडपणे यात वेळ जातो.
19 Aug 2013 - 2:53 pm | पिलीयन रायडर
अहो आम्ही देशस्थ ना...असलंच घरात तर घालतो खोबरं.. नसेल तर नाही...!!
मागे तुम्हाला एक्दा विचारलं होतं ना.. तुम्हाला सगळंच कसं हो माहिती असतं.. आवाका फार मोठा आहे तुमच्या लिखाणाचा... इथे सापडला आहातच तर सांगा की.. तुम्ही नक्की करता काय?
19 Aug 2013 - 5:36 pm | राही
अहो दडप्या पोह्यांची कृती कोणीही सांगेल. शिवाय वर भाजलेला पापड कुस्करून घालणे, चिंचेचा कोळ घालणे अशी वेरिएशन्स आणि मिक्स-न्-मॅच पण सांगेल. त्यात काय?
आणि उद्योग विचारताच आहात तर सध्या जालवाचन एवढाच.
19 Aug 2013 - 5:40 pm | पिलीयन रायडर
कशाला ह्यांचा धागा हाय्जॅक करायचा!!
ख.व पहा!
19 Aug 2013 - 8:33 pm | श्रीगुरुजी
दडपे पोहे माझ्या दृष्टीने जरा अवघड प्रकार आहे. ओला नारळ किसणे या प्रकाराला बराच वेळ लागेल (त्यासाठी आधी नारळ बरोबर मध्यभागी फोडावा लागेल. नाहीतर नीट खोवता येणार नाही). नंतर फोडणी वगैरेमुळे अजून जास्त वेळ लागेल. त्यामुळे १० मिनिटांचे उद्दिष्ट्य गाठता येत नाही.
19 Aug 2013 - 9:30 pm | आनंदी गोपाळ
१. नारळाच्या 'सर्व' शेंड्या काढून टाकणे.
२. मोठ्या डोळ्याच्या ठिकाणी भोक पाडून पाणी काढून घेणे.
३. जिथे तो फुटायला हवा त्या विषुववृत्तावर पाण्यात बोट भिजवून एक रेघ आखून घेणे.
४. एका हातात नारळ घेऊन दुसर्यात छोटी मुसळी घेऊन आपटून नारळाची शकले करणे.
५. ९९% वेळा दोन छान अर्धी शकले होतात.
20 Aug 2013 - 3:59 pm | राही
एक नारळ घेऊन त्यावर हातोडीने/कोयत्याने/कशानेही हलके-हलके पटापट अनेक घाव घालावेत. यामुळे खोबरे करवंटीपासून आतल्याआत निखळेल. मग नारळ जोरात आपटून अथवा कश्याही त्याच्या ठिकर्या कराव्यात. करवंटीचे तुकडे बाजूला करून निखळलेल्या खोबर्यातले पाणी राहिलेच असेल तर काढून घेऊन त्याचे सुरीने मध्यम तुकडे करून फूड-प्रोसेसरला लावावेत. सुंदर कीस तयार होतो.
20 Aug 2013 - 11:13 am | पिलीयन रायडर
टाकायचाच नाही ना मग ओला नारळ..आमच्या कडे तर कधीच नसतो.. तरी छान लागतात हे पोहे.. अर्थात ओला नारळ आणि हिरवी मिरची टाकलेले पोहे अप्रतिम लागतात..पण पटकन खायला म्हणुन आपण थोडं व्हेरिएशन करायचं!
19 Aug 2013 - 9:12 pm | मोदक
१) पोहे आणखी थोडे मऊ होण्यासाठी त्यावर नारळाचे पाणी शिंपावे.
२) फोडणीमध्ये भरलेल्या मिरच्या असाव्यात.
३) पोह्यांसोबत तळण.
४) आवडत असल्यास या पोह्यांसोबतच एक मग भरून वाफाळणारी कॉफी.
हे सगळे शनिवार / रविवारच्या आळसावलेल्या सकाळी असावे!
19 Aug 2013 - 1:41 pm | त्रिवेणी
टमाटा आवडत नाही.
सो त्या एवजी काकडी घालून करून बघेन.
19 Aug 2013 - 2:06 pm | दत्ता काळे
ह्यामध्ये कैरीच्या बारीक फोडी घातल्या की अजूनच चटकदार लागतात.
तोंडाच्या जबड्याला व्यायाम होतो ह्या पोह्यांनी पण तेवढं चालतं.
19 Aug 2013 - 2:18 pm | सूड
म्हणजे दडपे पोहेच ना !!
19 Aug 2013 - 2:23 pm | राही
तेल आणि तिखट एकत्र मिसळून पोह्यांना लावायचे का? तिखट वरून भुरभुरवले असणार हे कळले. पण तिखट हे कच्च्या तेलात मिसळून घेतल्याने एक वेगळी चव येते म्हणून विचारले.
19 Aug 2013 - 8:29 pm | श्रीगुरुजी
तिखट कच्च्या तेलात मिसळून नंतर पोह्यात घालण्याचा प्रयोग अजून केला नाही. करून बघीन. पण त्यामुळे तेल्-तिखट एकत्र मिसळून ठेवण्यासाठी अजून एक वेगळे भांडे किंवा पळी वगैरे लागेल. माझ्या पाकक्रियेत कमीत कमी वेळ व कमीत कमी भांडी/डाव्/पळ्या ही मुख्य उद्दिष्ट्ये असतात. पूर्वी एकटा राहत असताना भात, आमटी/वरण व भाजीसाठी तीन वेगळी भांडी वापरली तरी तिन्हीसाठी एकच डाव वापरत होतो (घासायचे कष्ट कमी). %)
19 Aug 2013 - 11:47 pm | स्वाती२
यात १/२ चमचा गोडा मसाला घालायचा आणि तिखटाचे प्रमाण निम्मे करायचे.
20 Aug 2013 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे
महाराष्ट्रात "पोहे" संस्कृती किती प्रगल्भ आहे याचे हा धागा आणि त्यावरचे प्रतिसाद हे अत्यंत सबळ पुरावे आहेत !
--- (पोह्यांची चटक असलेला) खवय्या
20 Aug 2013 - 12:48 pm | अनिरुद्ध प
+१११
20 Aug 2013 - 7:29 pm | सखी
मिपावरचाच हा चांगला लेख पोहे संस्कृतीवरचा!
20 Aug 2013 - 9:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
आत्ताच वाचला. पोह्यांसार्खाच खमंग आहे !