सार्वजनिक उत्सव "मूळ उद्देशापासून" बाजूला पडत आहेत का?

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in काथ्याकूट
10 Jul 2013 - 2:52 pm
गाभा: 

अनेकदा अनेक चर्चांमध्ये सार्वजनिक उत्सव आणि त्यांचे महत्त्व वगैरेवर मतांचा गलबला वाचनात येतो.
नुकतेच मिपावरही वारी या विजुभाऊंच्या धाग्यात ते म्हणतातः

गणपती उत्सव हा देखील त्यापैकीच एक. मूळ उद्देश बाजूस राहील आणि भलतेच रूप घेवून उत्सव खंडणी बहाद्दूर / व्यापारी कंपन्या यांच्यासाठी एक मोठी पर्वणी बनला आहे.जनजागृती हा उत्सवांचा उद्देश कधीच मागे पडला आहे.

प्रतिसादांतही काहींनी सार्वजनिक उत्सव त्यांच्या मूळ उद्देशापासून बाजुला पडत आहेत असे म्हटले आहे.

या निमित्ताने गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक उत्सवांच्या मुळ उद्देशाकडे पुन्हा पाहवे असे वाटल्याने हा धागा काढतो आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास आणि त्यामागे टिळकांचे असलेले उद्देश वगैरेवर आपण अनेकदा एका दृष्टिकोनातून पाहिले आहे. मात्र एका बाबतीत एकमत व्हावे की टिळकांचे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे असलेले उद्देश हे जितके "राजकीय" होते तितके ते सामाजिक नव्हते.

या उत्सवांचा उद्देश प्रामुख्याने राजकीय कसा होता हे स्पष्ट करायला टिळकांच्या या सार्वजनिक उत्सवांच्या आधी भारतात राजकीय परिस्थिती कशी होती याचा (किमान अतिशय धावता) आढावा घेणे अगत्याचे ठरेल. त्यावेळी भारतात दूरवर पोचलेल्या (पॅन इंडीया प्रेझेन्स) भारतीय संघटनांची यादी करायची म्हटली तर काँग्रेस या एका नावापाशी यादी संपेल. त्यावेळी काँग्रेसमध्ये मवाळ पंथीयांचा बोलबाला होता. गोपाळ कृष्ण गोखले आदी मवाळ नेत्यांनी सामाजिक सुधारणेला बळकटी आणि प्राथमिकता देण्याचे धोरण अवलंबिले होते. अर्थातच भारतीय समाज हा विखुरलेला होता व त्यांना एका धाग्याने बांधता यावे असे समान सूत्र मिळणे काँग्रेसला जड जात होते.
अश्या वेळी टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला आणि त्याचे परिणाम दूरगामी आहेत. त्याची मूळ उद्देशे कोणती असावीत असा अंदाज केल्यास पुढिल उद्देश लक्षात येतो:
-- एका राजकीय विचारधारेमागे (जसे इंग्रजांविरूद्ध लढा देण्यासाठी) जनतेला एकत्र जमविणे.
-- विविध प्रश्नांवर जनमत ढवळून काढून असंतोषाला वाचा फोडणे
-- समारंभाला धार्मिक रूप दिल्याने पक्षाचा प्रभाव अधिक खोलवर पोहोचवत संघटनात्मक बळकटी आणणे आणि त्यायोगे राजकीय कार्यकर्ते तयार करणे.
-- त्यायोगे नवे रोजगार निर्मिती होऊन जनमत पक्षाच्या बाजूने वळणे

काही परिणामः (हे परिणाम अपेक्षित होते की नाही सांगता येणार नाही पण टिळकांसारख्या मुत्सद्याने याचा विचार केला नसण्याचे कारण दिसत नाही)
-- बहुसंख्य भारतीयांना जोडणारा धार्मिक (हिंदू) धागा तयार झाला. (व अर्थातच धार्मिक आधारावर राजकीय दुफळीची बीजेही रोवली गेली)
-- समाजमन हे सामान्यतः ठोस कार्यक्रम देणार्‍या अग्रेसीव्ह नेतृत्त्वाकडे झुकते. सार्वजनिक उत्सवांची सुरूवात झाल्यावर मवाळ पंथाचा प्रभाव आणि व्याप्ती दोन्ही घटू लागले.
-- भारतीय राजकारणात टिळक आणि त्यायोगे जहाल पंथीयांचे वर्चस्व निर्माण झाले.
-- अधिक जनमताच्या पाथिंब्यामुळे काँग्रेस हा इंग्रजांना टक्कर देणारा पक्ष म्हणून मान्यता पावत असल्याने अर्थातच पक्षाला मिळणारी अनुदाने, कार्यकर्ते यांच्यात वाढ झाली तसेच काँग्रेसची आर्थिक तब्येतही सुधारली.

अनेक सामाजिक सुधारणांबद्दल टिळकांची कधी तटस्थ तर क्वचित प्रसंगी प्रतिगामी म्हणता येतील अशी मते प्रसिद्ध आहेत. तेव्हा तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता त्यांचा मुख्य उद्देश समाजसुधारणा होता असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र या उत्सवांमुळे झालेले परिणाम बघता तो खचितच 'राजकीय' होता असे म्हणता यावे.

अजूनही बहुतांश गणेशोत्सव मंडळे ही राजकीय पक्षांच्या आशिर्वादाने चालतात. किंबहुना ही मंडळे राजकीय कार्यकर्ते, नेते घडवण्याच्या प्रयोगशाळा / कार्यशाळा समजल्या जातात. या सणांमध्ये आता दहिहंडी आदी सणांचीही भर पडली आहे. आता सध्याचे स्वरूप काय आहे ते बघुया:
-- एका राजकीय विचारधारेमागे जनतेला एकत्र जमवण्याचा प्रयत्न होतो. (आता त्यावेळी इंग्रजांनी गणेशोत्सवात भाग घेऊन, मंडप उभारून, त्यांचे म्हणणे मांडणारे देखावे केले असते, त्यांच्या बाजूने भाषणे देणार्‍यांना पैसे दिले असते तर काय झाले असते? असाही विचार मनात येतो ;) ).
-- विविध सामाजिक प्रश्नांवर जनमत ढवळून काढणे व प्रसंगी असंतोषाला वाचा फोडणे.
-- पक्षाचा प्रभाव अधिक खोलवर पोहोचवत संघटनात्मक बळकटी आणणे आणि त्यायोगे राजकीय कार्यकर्ते तयार करणे.
-- खंडणी उकळणे, व्यापार करणे वगैरे वगैरे.

आता मूळ उद्देशापासून गणेशोत्सव किंवा तत्सम सार्वजनिक उत्सव दूर गेले आहेत का? तर तसे वाटत नाही. सर्व क्षेत्रांप्रमाणे याही क्षेत्रात काही अपप्रवृत्ती जरूर शिरल्या आहेत.

अनेक ठिकाणी या उत्सवाचे स्वरूप काळानुसार आधुनिक झाले असेल मात्र मुळ राजकीय उद्देशांपासून फार बाजूला पडले आहेत का? अजूनही उत्सव "राजकीय"च आहेत असे दिसते की आता हे उत्सव राजकीय राहिले नसून तसा केवळ आभास निर्माण होत आहे?

तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

पिंपातला उंदीर's picture

10 Jul 2013 - 7:15 pm | पिंपातला उंदीर

हो

प्रकाश घाटपांडे's picture

10 Jul 2013 - 7:58 pm | प्रकाश घाटपांडे

उत्सव स्वरुप ही समूहाची गरज आहे. त्यात शिरलेल्या अपप्रवृत्ती दूर करणे हे खरे काम आहे. उत्सवाचे स्वरुप कालानुसार बदलत जातील पण हा लढा कायम रहाणार आहे. सत असत मधील हा संघर्ष चालूच राहील.

प्रत्येक उद्दीष्टाचा एक लाईफ टाईम असतो. एखाद्या विशिष्ट उद्दीष्ट्पूर्तीसाठी एखादी प्रोसेस सुरु केली. कालांतराने ते उद्दीष्ट सफल/असफल झाले तरी जी प्रोसेस मॅच्युअर्ड झाली आहे तिचा उपयोग नवीन उद्दिष्टांसाठी करता येतोच कि. आयटी कंपन्या आपला स्टाफ आणि सेटप नित्यनवीन कस्टमर्स आणि टेक्नॉलॉजी बिझनेससाठी वापरतात ना. टिळकांनी स्वराज्यासाठी जे उत्सव सुरु केलेत ते सुराज्यासाठी वापरता येईलच कि... किंबहुना तसं होण्यातच फायदा आहे. प्रत्येकवेळी रिइन्व्हेंटींग द व्हील करण्यात काय हाशिल.

आज उत्सवांना जे राजकीय स्वरूप आले आहे ते टाळता येणे शक्य नाहि. फक्त उत्सवच कशाला... अगदी भाजी विकत घेण्यापासुन ते कारखाने चालवण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर राजकीय हातपाय पसरून आहेत. "लोकशाही" या व्यवस्थेअंतर्गत आपण ते स्विकारले आहे. आणि माझ्या मते ते योग्यच आहे. ज्या देशात १२० करोड राजे आहेत तिथे सर्वत्र राजकीय सु/दुर्गंध दरवळणारच.

उत्सवांचा जो सामाजीक आरोग्यावर, सरकारी यंत्रणेवर ताण पडतो त्याचं कारण आपली बेशिस्त वागणुक आणि कॉमनसेन्सचा अभाव आहे. आणि या दुर्गुणांमुळे फक्त उत्सवच नाहि तर सार्वजनीक वाहतुक, शिक्षण, पर्यावरण, अर्थकारण, आरोग्य... हे सर्वच बाधित झालेत. पण हे सर्व बंद करणं म्हणजे रोग झाला असता त्यावर इलाज करण्यापेक्षा आत्महत्या करण्यासारखं होईल... नॉट रेकमंडेड.

अर्धवटराव

ऋषिकेश's picture

11 Jul 2013 - 8:51 am | ऋषिकेश

उत्सवांचा जो सामाजीक आरोग्यावर, सरकारी यंत्रणेवर ताण पडतो त्याचं कारण आपली बेशिस्त वागणुक आणि कॉमनसेन्सचा अभाव आहे. आणि या दुर्गुणांमुळे फक्त उत्सवच नाहि तर सार्वजनीक वाहतुक, शिक्षण, पर्यावरण, अर्थकारण, आरोग्य... हे सर्वच बाधित झालेत. पण हे सर्व बंद करणं म्हणजे रोग झाला असता त्यावर इलाज करण्यापेक्षा आत्महत्या करण्यासारखं होईल... नॉट रेकमंडेड.

मार्मिक! सहमत आहेच!

मूकवाचक's picture

11 Jul 2013 - 4:01 pm | मूकवाचक

+१

चित्रगुप्त's picture

11 Jul 2013 - 4:21 pm | चित्रगुप्त

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे स्वरूप (अर्थात मध्यप्रदेशातील इंदूर या शहरातलेच फक्त) मी बघितले आहे, ते केवळ सांस्कृतिक होते. हिंदीभाषिक प्रदेश असूनही गल्लो-गल्ली मराठी नाटके, संगीताचे कार्यक्रम वगैरे होत ( मी त्यावेळी जादूचे खेळ करायचो). कोणत्याही प्रकारचे राजकीय वातावरण त्यात नसायचे. गणपति विसर्जनाची मिरवणूक रात्रभर चालायची. त्याकाळी इंदुरात असलेल्या अनेक कापड-गिरण्यांचे भव्य गणपति, आणि त्यांची नेत्रदीपक सजावट बघायला दूर-दूरच्या गावांमधून लोक यायचे.
परंतु काही वर्षातच गुंडगिरी, नेतागिरी, हुल्लडबाजी वगैरेंनी या उत्सवाचा कबजा घेतला, आणि मराठी नाटके वगैरे बंद पडून नको तो गणेशोत्सव, असे वाटू लागले.

अमोल केळकर's picture

11 Jul 2013 - 4:53 pm | अमोल केळकर

नक्कीच :(

अमोल केळकर

पैसा's picture

11 Jul 2013 - 5:11 pm | पैसा

सार्वजनिक उत्सवांचे मूळ उद्देश कधीच बाजूला पडले. काहींचे तर ३/४ वेळा बदलून गेले. थोडक्यात काही लिहिते.

लो. टिळकांनी गणेशोत्सवाबरोबरच शिवजयंतीचे उत्सव सुरू केले आणि मरगळलेल्या लोकांना शिवरायांची आठवण परत जागी करून दिली. सामाजिक सुधारणांबाबतीत टिळकांची जाहीर मते प्रतिगामी वाटू शकतात पण खाजगी आयुष्यात त्यांनी आपल्या मुलींना शिकवले आणि त्यांची लग्नेही बालपणात करून दिली नाहीत. मुलाला ते काय सांगतात? "तू जोडे शिवलेस तरी चाले, पण त्यात सर्वोत्तम हो."

राजकीय स्वातंत्र्य आले की सामाजिक सुधारणा आपल्याला हव्या तशा करता येतील तेव्हा आधी राजकीय स्वातंत्र्य हवे. त्यासाठी सर्वांना बरोबर घेतले पाहिजे या विचारातून टिळकांची ही जाहीर मते आलेली होती हे लक्षात घेतले पाहिजे.

त्या काळात गणेसोत्सवात मेळे वगैरे असत. त्यातून जनजागृतीचा प्रयत्न होई. मनोरंजनाबरोबर सरकारविरुद्ध लोकांना जागे करण्याचे काम नक्कीच काही प्रमाणात यातून झाले. लोकांना एकत्र आणणारे अतिशय प्रभावी साधन टिळकांनी प्रयोगात आणले. गोव्यात अशाच स्वरूपाचे काम शिगमो मिरवणुका वगैरेतून झाले.

स्वातंत्र्यानंतर हे उत्सव मुख्यतः सांस्कृतिक स्वरूपात अनेक वर्षे राहिले. मी लहान असताना रत्नागिरीत अनेक उदयोन्मुख आणि प्रसिद्ध कलाकारांचे शास्त्रीय गाण्यांचे कार्यक्रम गणेशोत्सवात आणि नवरात्रातही ऐकले आहेत. नाटके पाहिली आहेत.

पण आता हे सगळेच बंद पडले असावे. आता गणेसोत्सवात रत्नागिरीत नाच गाणी सिनेमे असेच बहुतेक ठिकाणी असते. लाउडस्पीकर्स लावून ध्वनीप्रदूषण इतकेच राहिले आहे. गोव्यात अजून काही ठिकाणी नाटके/गाणी होतात. पण तरीही बदल होत आहेत आणि ते सगळेच स्वागत करण्यासारखे नाहीत.

पण एकूण हे सगळे राजकीय राहिले आहे असे वाटत नाही. केवळ पैसे गोळा करणे आणि मौज मजा इतकेच राहिले असावे असे वाटते.

ऋषिकेश's picture

12 Jul 2013 - 10:05 am | ऋषिकेश

आभार. इतकेच स्पष्ट करायचे आहे की टिळकांच्या देशभक्तीबाबत अजिबात शंका नाही व ते एक उत्तम "नेते" होते याबद्दलही दुमत नाही. किंवा त्यांनी हे उत्सव सुरू केले त्यात वैयक्तीक स्वार्थ होता असेही म्हणायचे नाही. असो.

स्वातंत्र्यानंतर हे उत्सव मुख्यतः सांस्कृतिक स्वरूपात अनेक वर्षे राहिले. ..................... गोव्यात अजून काही ठिकाणी नाटके/गाणी होतात. पण तरीही बदल होत आहेत आणि ते सगळेच स्वागत करण्यासारखे नाहीत.

सहमत आहे. लोकांना एकत्र करण्यासाठी वापरले जाणारे कार्यक्रम बदलले हे खरे आहे. मात्र, गणेशोत्सवाचा उद्देश कधी शास्त्रीय संगीत किंवा कलाकारांब्ना पुढे आणणे किंवा सांस्कृतिक चळवळ सुरू करणे असा नव्हता असे वाटते. त्यावेळच्या जनतेला तत्सम गोष्टींनी एकत्र आणता येत असल्याने तत्कालीन राजकीय पक्ष त्याप्रकारच्या मनोरंजनाचे आयोजन करत असत. आता त्यांच्या मतदारांची(एकूण जनतेची हा शब्द टाळतो आहे याची नोंद घ्यावी) रुची पालटल्याने त्यांच्या नक्कीच्या मतदारांना जे आवडेल त्या प्रकारच्या करमणूकीची सोय पक्षांकडून केली जाते.

या मंडळातूनच अनेक पक्षांचे कार्यकर्ते व त्यातूनच स्थानिक नेते घडताना स्वतः बघितले आहे. शेवटी नेत्याला एकट्याला नैतिक उच्चासनावर बसून चालत नाही. मतदारांना जे हवे आहे ते त्याला द्यावे लागतेच.
ज्या मतदारसंघांतील साईजेबल जनता अजूनही ठराविक वयाच्यावर आहे किंवा ठराविक रुची राखून आहे तेथे अजूनही तुम्ही म्हणता त्याप्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सवात होत असतातच.

पण एकूण हे सगळे राजकीय राहिले आहे असे वाटत नाही. केवळ पैसे गोळा करणे आणि मौज मजा इतकेच राहिले असावे असे वाटते.

कोणतीही संस्था चालवायची तर पैसा हवाच. जर गोळा केलेल्या पैशातून फक्त मजाच होते असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. त्याचा काही भाग कार्यकर्त्रे टिकवून ठेवायला त्यांना आवडेल तशी मौज करायला वापरला जातो हे खरेच मात्र यातील बराचसा पैसा ते मंडळ ज्या राजकीय पक्षाशी संलग्न आहे त्या पक्षाच्या तिजोरीत जातो (जो पुढील निवडणूकांत पावरता येतो).

(याला अपवाद आहे मध्यमवर्गीय सोसायट्यांमधून होणारे "सार्वजनिक" उत्सव, पण तो वेगळ्या चर्चेचा विषय होईल ;))

पैसा's picture

12 Jul 2013 - 9:57 pm | पैसा

सार्वजनिक गणोशोत्सव मंडळे इतकी जवळून पाहिली नाहीत त्यामुळे गणेशोत्सवांच्या राजकीय बाजूविषयी माहिती नव्हती. अर्थात जिथे भरपूर पैसे गोळा होतात तिथे राजकीय पुढारी/पक्षांचं लक्ष गेलं नाही तरच नवल!

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2013 - 4:24 pm | प्रभाकर पेठकर

पण एकूण हे सगळे राजकीय राहिले आहे असे वाटत नाही. केवळ पैसे गोळा करणे आणि मौज मजा इतकेच राहिले असावे असे वाटते.

राजकिय पुढार्‍यांना 'सपोर्टर्सची' फार मोठी फौज लागते. अशी फौज कायमस्वरूपी आपल्या दावणीला बांधलेली असावी असे वाटत असेल तर आपल्या तथाकथित 'कार्यकर्त्यांना' पैसा कमविण्याची संधी उत्सवातून मिळवून देता येते. त्यांना अल्पप्रमाणात का होईना सत्तेचे फायदे, नशा अनुभवास देता येते. त्यांची महत्वाकांक्षा (मोठा नेता बनण्याची) वाढीस लागते. ती कुरूवाळत, कार्यकर्यांच्या अनिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष करीत, प्रसंगी त्यांना राजकिय वजन वापरून अभय प्रदान करायचे आणि आपली पोळी भाजायची. ही कार्यकर्यांची टोळी आणि त्यांची दुष्कृत्ये आपल्या नजरेसमोर असतात. हिच माणसे उत्सवांचे पवित्र रुपडे कलंकित करीत असतात.
मूळ उद्देश कधीच नाहिसा झाला आहे. किंवा त्या उद्देशाची आता गरज उरलेली नाही. जे उरले आहे तो राजकिय पुढार्‍यांचा स्वार्थ आहे.

टिळकांचे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागे असलेले उद्देश हे जितके "राजकीय" होते तितके ते सामाजिक नव्हते.
बस्स, हेच मत आधीपासून आहे. बाकी, नेहमीप्रमाणेच जास्त स्पष्ट लिहिता येणे अवघड आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Jul 2013 - 11:58 pm | निनाद मुक्काम प...

सार्वजनिक गणपतींचे पूर्वी राजकीयकरण झाले आता भांडवलशाहीत तो धंदा झाला आहे.
काळाचा महिमा
कोणत्याही गोष्टींचे काळानुसार संदर्भ बदलतात.
ह्याला इलाज नाही , ह्या उत्साहात लहानपणी आनंदाने सहभागी व्हायचो , आता सातासमुद्रापलीकडे असल्याने सहभागी होता येत नाही ,आणि त्याचे दुख्ख वाटत नाही.
किंबहुना स्पष्ट सांगायचे तर परदेशात आपल्या संस्कृतींची जपवणूक करणारे सर्वसामान्यांच्या देणग्यांमधून साकार होणारे सार्वजनिक गणेश उत्सव महाराष्ट्र मंडळातून जगभरात साजरे होतात.
तेव्हा त्यासाठी राबणारे कार्यकर्ते पहिले की बालपणीचा काळ
आठवतो.

मयुरपिंपळे's picture

13 Jul 2013 - 2:12 pm | मयुरपिंपळे

सहमत आहे. कुठ तरी ह्याला वेगळ वळण लागल आहे.