वाटल्या डाळीचे लाडू फार चविष्ट लागतात. हे बनवायचे असल्यास तूमच्याकडे निवांत वेळ हवा कारण डाळ परतायला भरपूर वेळ लागतो व हातांना ही चांगला व्यायाम मिळतो ;)
साहित्यः
४ वाट्या भिजवलेली चणा डाळ (मी छोटी वाटी वापरली आहे)
३-१/२ वाट्या साखर
दीड वाट्या पाणी
१ वाटी साजूक तूप
१/४ वाटी दूध
१ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून केशर
बेदाणे+बदाम्+पिस्त्याचे काप सजावटीसाठी
पाकृ:
भिजवलेली चणाडाळ मिक्सरवर कमीत-कमी पाणी घालून वाटून घ्यावी.
नॉन-स्टीक कढईमध्ये तुपावर वाटलेली डाळ मंद आचेवर परतायला घ्यावी.
डाळ सतत परतत रहावी म्हणजे कढईला तळाला चिकटणार नाही.
आधी डाळ गोळा होऊ लागेल , वाटल्यास आणखीन थोडे तूप घालावे.
हळू-हळू डाळ हलकी सोनेरी होऊ लागेल.
साधारण तासभर परतल्यावर डाळ मोकळी होऊ लागेल.
खमंग भाजल्यावर एका ताटात काढून घ्यावी.
वेगळ्या भांड्यात साखर+पाणी+केशर एकत्र करून दोन तारी पाक तयार करावा.
पाक तयार झाला की त्यात दूध, सुकामेवा व वेलचीपूड घालून एकत्र करावे.
हा पाक डाळीच्या मिश्रणात घालून एकत्र करावा.
२-३ तास पाक चांगला मुरला व मिश्रण लाडू वळण्यास योग्य झाले की लाडू वळवून्/बांधून घ्यावे.
(इथे वातावरण गार असल्यामुळे मिश्रण लगेच तयार झाले)
पाक छान मुरला की लाडू चवीला रुचकर लागतात.
दूधाऐवजी थोडा परतलेला खवा ही घालू शकता.
फ्रिजमध्ये ठेवल्यास ७-८ दिवस चांगले टिकतात.
प्रतिक्रिया
26 May 2013 - 9:41 pm | सस्नेह
उचलून तॉडात टाकावा !
आम्ही याला राघवदास लाडू म्हणतो.
27 May 2013 - 4:33 am | सानिकास्वप्निल
राघवदास लाडूंमध्ये डाळीचा रवा वापरतात नं??
27 May 2013 - 4:41 am | स्पंदना
राघवदास मध्ये बेसन अन रवा दोन्हीच मिक्स्चर असत ना?
27 May 2013 - 10:29 am | सस्नेह
राघवदास लाडू भिजवलेली हरभऱ्याची डाळ वाटून बनवतात. रवा घालत नाहीत.
हे लाडू काहीसे ओलसर असतात. (पाकात घातल्यामुळे) अन भरड वाटले असल्याने दातांना बराच व्यायाम होतो.
27 May 2013 - 11:10 am | कोमल
मी हा आणि ह्याच्या वरचा प्रत्येक प्रतिसाद
असा वाचत होते. म्हटलं कोण बुवा हे राघवदास? नंतर नीट वाचल्यावर कळालं राघवदास मिपाकर नसून लाडू आहेत.. ;) :))
27 May 2013 - 11:05 am | गवि
राघवदास, तंबीट वगैरे लाडू येतच आहेत.. येतच आहेत.
या लाडूंविषयी न बोलायचे ठरवले आहे.
27 May 2013 - 2:55 pm | सानिकास्वप्निल
राघवदास लाडु बनवताना डाळीचा रवा व साधा रवा एकत्र करतात असे वाचले आहे.
26 May 2013 - 10:21 pm | पैसा
काय मस्त झालेत ग हे लाडू! डाएट गेलं खड्ड्यात!!
26 May 2013 - 10:42 pm | प्रभाकर पेठकर
काय मस्त झालेत हे लाडू! मधुमेह गेला खड्ड्यात!!
27 May 2013 - 4:40 am | स्पंदना
अहाहा! काय मस्त लाडु आहेत?
मी स्वतःच गेले खड्ड्यात!
26 May 2013 - 10:49 pm | यशोधरा
अहा! अहा!! भन्नाटम् अतिसुंदरम!
26 May 2013 - 10:56 pm | बॅटमॅन
लाडू चांगले लागत असतीलही, पण वाटल्याडाळीत गोड घालणे समहौ पटले नै. ती कोरडीशी डाळ तशीच मटकावयाची बहुत प्राचीन सवय असल्याने असेल.
असो, प्रूफ ऑफ द लाडू इज़ इन द ईटिंग हे जाणोन हा लाडू कधी मिळाला तर खाईन.
27 May 2013 - 4:38 am | सानिकास्वप्निल
पारंपारिक पदार्थ आहे हा, लाडू चांगलेच लागतात :)
खाऊन बघा एकदा.
>>ती कोरडीशी डाळ तशीच मटकावयाची बहुत प्राचीन सवय असल्याने असेल.
कोरडीशी डाळ नुसतीच कशी खाता येईल?? आय मीन त्यात चवीसाठी काहीच घालत नाही का ??
27 May 2013 - 11:19 am | बॅटमॅन
तसे नाही, चवीसाठी घटक त्यात असतातच, पण लाडवासाठी घातलेले गोड जिन्नस नस्तात. :) बाकी खाऊन बघीनच हेवेसांनल :)
27 May 2013 - 12:48 pm | दिपक.कुवेत
बॅटमॅन म्हणतायेत तो प्रकार पण वाटली डाळ म्हणुनच ओळखला जातो. कोकणात करतात. डाळ अशीच भरडसर वाटुन हिंग, हळद, बारिक चीरलेली हिरवी मिरची आणि मोहरीच्या फोडणीवर टाकायची. छान परतली कि त्यात चवीप्रमाणे मीठ, नावाला साखर आणि ओलं खोबरं/कोथिंबीर घालुन गॅस बंद करायचा. हि अशी कुरकुरीत डाळ तोंडिलावणं म्हणून मस्त लागते. आंब्याची (कच्ची कैरी) वाट्ली ओली डाळ करतोना त्याचाच सुखा प्रकार फक्त कैरी वगळुन. बॅटमॅना....बरोबर ना?
27 May 2013 - 2:34 pm | बॅटमॅन
हांगाश्शी तेच बघा दीपक!!!! मला खाल्लेलं आठवतंय पण रेशिपी हा आपला प्रांत नव्हे. मग मातोश्रींना फोनवले तेव्हा कळ्ळे की अशीच रेशिपी, फक्त डाळ भिजवून मग वाटायची इ.इ. कैरी न घालता लिंबू पिळल्या जातो. ही अगदी कुरकुरीत नसली तरी जरा कोरडीशी लागते. मोर ऑर लेस तुम्ही सांगितल्याप्रमाणेच. मिरज-सांगलीकडे अशी वाटलीडाळ सर्रास खाल्ल्या गेली आहे. :)
27 May 2013 - 2:46 pm | jaypal
आता मुळ धागा आणि धागा कर्ती विषयी....................................................................................................
मी काय बोलणार? आपल तर आवाजच बंद.
27 May 2013 - 2:46 pm | सूड
मित्रा वाटल्या डाळीचं या लाडवाबरोबर केलेलं कम्पॅरिजन म्हणजे पुरणपोळीची कटाच्या आमटीशी तुलना करण्यासारखं आहे. हे लाडू मी खाल्लेले नाहीत पण वाटली डाळ खाल्ली आहे. वाटली डाळ तिच्या जागी बेस्ट आहे. पण हे लाडू करताना डाळ कोरडी होईपर्यंत तूप वैगरे टाकून परतण्याची प्रक्रिया त्याला नक्कीच वेगळी चव देत असणार. तू केलेली तुलना हुकल्यासारखी वाटली म्हणून हा प्रतिसादप्रपंच !! ;)
27 May 2013 - 2:54 pm | बॅटमॅन
हम्म ते आहे म्हणा. डोक्यात एक व्हर्जन फिट्ट असल्याने इनोव्हेशन्स जरा विचित्र वाटतात इतकेच. पण अर्थातच, हा पूर्वग्रह(की लाडूग्रह) लाडू खाईपर्यंतच टिकेल असे वाटतेय ;)
27 May 2013 - 2:57 pm | सानिकास्वप्निल
इनोव्हेशन्स नसून पारंपारिक पदार्थ आहे :)
27 May 2013 - 3:13 pm | बॅटमॅन
बरोबर आहे सानिकातै :) मी पाककलानिरक्षर असल्याने बर्याच डिशेस माहिती नाहीत, तुम्ही सांगितल्यावर कळाले, बहुत धन्यवाद :)
27 May 2013 - 8:34 pm | ५० फक्त
म्हंजे त्या न्युटन सारखं म्हणा की, सफरचंदं आधीही खालीच पडायची, पण ह्यांना वाटलं त्यात विशेष.
बाकी लाडु ह्या प्रकारात आपली गती फार कमी, त्यातल्या त्यात दादर का कुठंशीक मिळणारे बुंदीचे कडक लाडु आणि लांबोटीचे डिंकाचे लाडु या पलीकडं फार काही समजत नाही.
अर्थात फोटो भारीच आलेत, कृतीवरुन मुगडाळीच्या शिराच्या आसपास जाणारा पदार्थ असावा,
अर्थात एक लाडु = १० मिनिटं ट्रेडमिल, त्यामुळं सध्या पास.
28 May 2013 - 3:42 am | मोदक
ओ पण्णास.. बॅटमॅनासमोर सफरचंदाचा विषय काढू नका.
अॅडमने खाल्ले की इव्हने..
सफरचंदाचा किती % पोर्शन कोणी खाल्ला..
सफरचंद खायला सुरूवात कोणी केली..
अॅडम आणि इव्हने सफरचंदाला किती चावे घेतले..
अशी लै लै माहिती मिळेल तुम्हाला.
अरे हो.. त्याला वेळ असेल तर एखादे सौंस्कृत सुभाषितही रचून मिळेल.
कळ्ळे..? :-D
28 May 2013 - 11:52 am | सूड
ज्या सापाने हे सजेस्ट केलं त्याची लांबी रंग विषारी बिनविषारी भाषा याचीही माहिती मिळण्याची शक्यता आहे.
28 May 2013 - 11:53 am | बॅटमॅन
एकदम बरोबर पण्णासराव, पूर्ण सहमत आहे :) बाकी मुगडाळीच्या शिर्यागत वाटतेय खरी रेशिपी!!
आणि दु दु दु मोदोबा, तुला दुसरा अगोबा म्हणून नियुक्त करावे अशी शिफारस बुवांकडे केल्या जाईल ;)
मोदोबा<---------धनुर्धारी वाल्गुदात्मा ;)
28 May 2013 - 11:59 am | सूड
आधी वाटल्या डाळिसारखी वाटली मरे ? आता मूगडाळीचा शिरा ? :))
27 May 2013 - 2:52 pm | सानिकास्वप्निल
लिंबाची अथवा कैरीची वाटली डाळ हा पदार्थ मला माहित आहे, माझा प्रश्न असा होता की कोरडीच डाळ तशीच कशी काय मटकवता येईल?? त्याला काहीच चव नसणार. वाटली डाळ व वाटल्या डाळीचे लाडू ह्यात खूप फरक आहे.
धन्यवाद.
26 May 2013 - 11:30 pm | मोदक
आवडले!!
26 May 2013 - 11:49 pm | सूड
मस्तच लाडू !!
26 May 2013 - 11:54 pm | अत्रुप्त आत्मा
वन बाय वन..स्टेप बाय स्टेप... अँड दी क्रिएशन इज रेडी... :)
अवांतरः- असे(शेवटच्या फोटुतल्या सारखे) लाडू गंपतीबाप्पा समोर ठेवले,तर तो नैवेद्य दाखवायच्या अधीच खाइल ;)
27 May 2013 - 4:43 am | स्पंदना
अच्छा लगेच खाय्चे लाडु आहेत का?
मस्त दिसताहेत.
सनिकाताई तुमच्या आजुबाजुची माणस गोलमटोल असतील नाहो खाउन पिउन?
27 May 2013 - 10:57 am | दिपक.कुवेत
आलेय लाडवांवर. असं वाटतय आत्ताच एक उचलुन तोंडात टाकावा. भन्नाट
27 May 2013 - 12:31 pm | उदय के'सागर
अप्रतिम...अन्नपुर्णे!!! :)
27 May 2013 - 12:46 pm | Mrunalini
खुप्च मस्त दिसतयात लाडु.. फारच वेळखाउ काम आहे. एवढा वेळ नाही सद्ध्या... :P
27 May 2013 - 1:21 pm | धनुअमिता
छान दिसतायेत लाडू. असे वाटते कि लगेच उचलून तोंडात टाकावा.
माझ्या आवडीचे लाडू.
27 May 2013 - 1:31 pm | स्मिता.
काय सुरेख दिसतायेत गं ते लाडू!!!
सिरियस्ली, एक डबा पार्सल पाठवून दे :)
29 May 2013 - 5:52 pm | तिमा
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
इथे जाडं असण्याचे अनेक फायदे आहेत
बारीक रहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत.
असले तोंडाला पाणी सुटणारे कुठलेही पदार्थ आम्ही मनसोक्त हाणू शकतो.
29 May 2013 - 6:19 pm | बॅटमॅन
आम्ही जाड म्हणूनि काय वदसी? आम्ही असू लाडके
देवाचे, दिधले तये उदर ते आम्हांस की खावया
विश्वीं या उदरें बळें भुरकतो चोहीकडे लीलया
प्राणी-घासफुसाचिया पलिकडे जाऊ क्षुधा ती शके||
(वाल्गुदसुत).
27 May 2013 - 2:38 pm | सुहास झेले
खपलो !!!
27 May 2013 - 3:16 pm | मदनबाण
वाटळी डाळ किंवा मोकळं तिखट हा पदार्थ अनेक वेळा खाल्ला आहे,पण हे लाडु प्रकरण पहिल्यांदाच पाहिलं !
(लाडू प्रेमी) :)
27 May 2013 - 6:12 pm | nishant
लाडु मस्तच दिसतायत...
28 May 2013 - 8:00 am | रेवती
सानिके, काय हे? अफाट सुंदर! आमच्या एका नातेवाईकांकडे हे लाडू खाल्ले होते. त्यांनीही बराचवेळ डाळ परतण्याचे काम केले होते म्हणून हे लाडू करण्याचे धाडस झाले नव्हते. आता हाताशी वेळ असला की करून पाहीन.
गवि, माझ्याकडचा नवा मिक्सर म्हणावा तसा ग्रेट नाहीये. आता फार कारणे देत बसत नाही. मला जमले नाही तर आईकडून फोटू मागवीन आणि मिपावर कृती चढवीन.
28 May 2013 - 6:44 pm | नूतन
सुरेख
28 May 2013 - 6:51 pm | राही
लाडू उत्तमच झालेले दिसताहेत. लाडवांना एकही अतिरिक्त कण चिकटलेला दिसत नाहीय. सगळे अगदी गुळगुलीत तुळतुळीत. हे कसब वाखाणण्याजोगेच.
वरती राघवदास म्हणजे भाजलेले रवाबेसन साखरेच्या पाकात टाकून केलेले लाडू असे कोणीकोणी म्हटले आहे. नुसता रवा भाजून खोबर्यासह पाकात टाकला तर बनणार्या लाडवांना काय म्हणतात? तूप आणि पिठीसाखर फेसून त्यात भाजलेला रवा घालून वळलेल्या लाडवांस काय म्हणतात? नारायणदास लाडू लाडवाच्या कोणत्या प्रकारास म्हणावे? लाडूकरण्यास योग्य असा कोणताही पदार्थ (उदा. रवा, बेसन, वाटली डाळ, मूग रवा, नाचणीपीठ इ.) तुपात खमंग भाजून पाकात टाकून लाडू बनवले तर त्यांस राघवदास म्हणता येईल का? हे लिहिण्याचे कारण म्हणजे भाजलेल्या रवा पाकात टाकून केलेल्या लाडवांस नारायणदास म्हणतात की राघवदास यावर एकदा एका आधुनिक नवराबायकोमध्ये जंगी वाद झाला होता आणि लवादासाठी त्यांनी मला फोन केला होता. दोघेही आपापल्या घराण्याची दीर्घ परंपरा कोट करीत होते. त्यातला नवरा हा आमचा लांबचा जावई लागत होता आणि बायको भाची/पुतणी वा तत्सम. तिच्या माहेराला खाली बघायला लावणे जिवावर आले आणि जावयालाही खोटे पाडायचे नव्हते. तेव्हा 'मला खरंच माहीत नाही, कोशात बघून सांगेन' असे म्हणून वेळ मारून नेली. यावर भाची काही अस्पष्ट फुसफुसली, ते मला 'भरवश्याच्या म्हशीला टोणगा' वगैरेसारखे काही असावे असे वाटून गेले. पण लगेचच एव्हढी भारी म्हण इंग्लिशमध्ये शिकलेल्या तिला माहीत असणे शक्य नाही हे लक्षात येऊन थोडे हायसे वाटले. असो.
28 May 2013 - 10:19 pm | प्यारे१
आम्ही लाडू काहीही न वाचता संपवलेले आहेत.
बाकीच्यांना अॅअॅअॅअॅअॅअॅ!
लड्डू खाओ ना. बाकी सब माथाफोड कायको?
28 May 2013 - 10:47 pm | मुक्त विहारि
झक्कास...
29 May 2013 - 6:54 pm | अनन्न्या
मलेरीयाने हैराण केलय गं!
29 May 2013 - 11:06 pm | अर्धवटराव
१००%
काय कातील दिसताहेत बेटे लाडु. जीवाच्या आकांताने मला बोलावताहेत.
अर्धवटराव