पोटॅटो स्ट्यू अँड रोटी जाला

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
28 Apr 2013 - 2:07 pm

ही पाककृती मास्टरशेफ इंडिया किचन के सूपरस्टार्स मध्ये पाहीली आणी बनवून बघीतल्याशिवाय राहवले नाही :)
सिंगापूर , मलेशियाची खास पाककृती आहे.

स्ट्यूमध्ये फरसबी, मटार मी घातले आहे मूळ पाककृतीत बटाटा, गाजर होते (त्यात शेफने सांगितले होते इतर भाज्या घालू शकता म्हणून :) )
पोटॅटो स्ट्यूची पाककृती खादाडा अमिताने दिलेल्या व्हेजिटेबल स्ट्यूसारखीच आहे, किरकोळ बदल आहेत तरीही देत आहे कृती.

साहित्य पोटॅटो स्ट्यू :

७-८ छोटे बटाटे सालं काढून घेणे
एका गाजराचे तुकडे
१/४ वाटी बारीक चिरलेली फरसबी
१/४ वाटी मटार
२ कांदे पातळ, उभे चिरलेले
२ हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरलेल्या
२ लाल सुक्या मिरच्या तोडून घेणे
१ टेस्पून बारीक चिरलेले लसूण
१ टेस्पून बारीक चिरलेले आले
५-६ कढीपत्ता
१ वाटी नारळाचे दूध
१/२ लिंबाचा रस (चिंचेचा कोळ ही वापरु शकता)
१ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार
तेल

.

पाकृ:

पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्यांची फोडणी करून घ्यावी.
त्यात बारीक चिरलेले आले +लसूण घालून परतून घ्यावे.
आले +लसूण चांगले परतले की त्यात हळद व चिरलेला कांदा घालून तो हलक्या गुलाबी रंगावर परतावा.
आता त्यात बारीक चिरलेली फरसबी, मटार, बटाटे व मीठ, मसाले घालून एकत्र करावे.

.

थोडे पाणी व २ टेस्पून नारळाचे दूध घालून , झाकून पाच मिनिटे शिजवावे.
आता त्यात उरलेले नारळाचे दूध घालावे, लागलेच तर थोडे मीठ घालावे.
पुन्हा झाकून बटाटे मऊ होईपर्यंत शिजवावे.
बटाटे शिजले की त्यात तुकडे केलेले गाजर घालून एक - दोन वाफा काढाव्यात.
शेवटी थोडा लिंबाचा रस घालून, एकत्र करुन गॅस बंद करावा.

.

साहित्य रोटी जाला:

प्रमाण दोन माणसाच्या हिशोबाने दिले आहे.

१ अंडे
१ वाटी नारळाचे दूध (साधे दूध वापरले तरी चालेल)
२-३ चमचे मैदा
१/४ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार

.

पाकृ:

एका भांड्यात अंडे फेटून घ्यावे. त्यात नारळचे दूध,हळद व मीठ घालून पुन्हा फेटावे.
थोडा-थोडा करून मैदा घालून फेटावे.
मिश्रण पॅनकेकच्या मिश्रणाइतपत पातळ हवे.
नॉन-स्टीक तवा मध्यम आचेवर तापवायला ठेवावा.
त्यावर थोडे तेल पसरवून घ्यावे.
खरे तर रोटी जाला बनवण्यासाठी खास साचा मिळतो पण तो माझ्याकडे नाही, त्यामुळे मी टीन कॅनलाच चार भोकं पाडून घेतली. (पर्फेक्ट जमले नाही पण कसे-बसे जमवले :) )
टीन कॅनमध्ये हे मिश्रण ओतावे व लगेच गरम तव्यावर गोलाकार फिरवावे.
कडेने रोटी सुटू लागली की उलटवून दुसरी बाजू शेकावी.

.

गरमा-गरम पोटॅटो स्ट्यू रोटी जालाबरोबर सर्व्ह करा.

.

.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

28 Apr 2013 - 2:21 pm | स्पंदना

मस्त!
अगदी तोंडाला पाणी सुटले. सिंगापुरमध्ये रोटी जाला खाल्ली आहे. पण असा स्ट्यु घरी करता येइल हे कधी सुचलच नाही. आता करते. घरी सगळे खुष होतील.

jaypal's picture

28 Apr 2013 - 2:31 pm | jaypal

शेवट्चा फोटो तर........................(फोतोग्राफर को मान गये ऊस्ताद)

परिकथेतील राजकुमार's picture

28 Apr 2013 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार

ती पाहताच जाला.. कलीजा खलास झाला...
छातीत स्ट्यू-भाला की आरपार गेला..

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2013 - 4:05 pm | दिपक.कुवेत

खायच्या पदार्था व्यतिरीक्त दुसरे चॅनल्स नाहियेत का? असो. साधी, सोपी पाकॄ (ते रोटि जाला बनवायच प्रकरण सोडलं तर) आणि फोटो छान.

अभ्या..'s picture

28 Apr 2013 - 4:16 pm | अभ्या..

परत एकदा सानिकाला बेस्ट फोटोग्राफीचे अन प्रेझेंटेशनाचे अ‍ॅवार्ड. :)
नॅपकीनचा लीफ ग्रीन कलर रंगाचे सुध्दा परफेक्ट व्हिज्युअलायझेशन दाखवतोय. :)
लै नामी कलाकार हैस.

प्यारे१'s picture

29 Apr 2013 - 11:49 pm | प्यारे१

तिला अ‍ॅवार्ड देणं बंद करा आता. बजेट कोलमडलंय.

ओ काकू, कधीतरी सुधारणेसाठी वाव द्या.
आमच्या गणपा शेफनं एकदा दिला होता ब्वा. दुधी हलवा बनवून. अर्थात लोकांना काही जमतं का ते बघायचं होतं त्याला.

मस्त, प्रसन्न सादरीकरण! जाला रोटी आधी महित नसल्याने फोटो पाहताना व कृतीवाचताना एकदम मज्जा वाटली. ग्रेट!

प्रतिज्ञा's picture

28 Apr 2013 - 9:10 pm | प्रतिज्ञा

सुन्दर :)

चाणक्य's picture

28 Apr 2013 - 9:31 pm | चाणक्य

सादरीकरण. करुन बघणार...आपलं खाणार

सुहास झेले's picture

28 Apr 2013 - 9:44 pm | सुहास झेले

प्रचंड भारी.... :) :)

बंडा मामा's picture

28 Apr 2013 - 10:03 pm | बंडा मामा

अशक्य प्रेजेंटेशन आणि पाककृती!! शब्द संपले....

वामन देशमुख's picture

29 Apr 2013 - 12:17 pm | वामन देशमुख

पाकृ आणि मांडणी नेहमीप्रमाणे अप्रतीम आहे. जाला रोटी अण्ड्याशिवाय करता येईल का?

धनुअमिता's picture

29 Apr 2013 - 1:34 pm | धनुअमिता

+ ११११११११११११

मस्तच गं... माझा २ आठवड्या पासुनच मास्टर शेफ बघायचा राहिल आहे.. पण पाकृ मस्त आहे.. ती जाला रोटी म्हणजे साधारण क्रेप सारखाच प्रकार वाटत आहे.. फक्त घालायची पद्धत वेगळी वाटतीये.

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2013 - 2:13 pm | सानिकास्वप्निल

फक्त ह्यात हळद व नारळाच्या दुधाचा वापर करतात , आंजावर बर्‍याच पाककृतीत नारळाचे दूध वापरले आहे.
साधे दूध वापरून ही बनवता येईल (मास्टरशेफ प्रमाणे)

धन्यवाद :)

सस्नेह's picture

29 Apr 2013 - 3:13 pm | सस्नेह

बटाटे आवडत नसल्याने स्ट्यूला फाटा.

चिंतामणी's picture

2 May 2013 - 12:49 am | चिंतामणी

बटाटे आवडत नसल्याने स्ट्यूला फाटा.

चिकन घालुन बनवा.

विसोबा खेचर's picture

29 Apr 2013 - 3:26 pm | विसोबा खेचर

जबरा...!

ढालगज भवानी's picture

29 Apr 2013 - 6:39 pm | ढालगज भवानी

रोटी जाला पाहून मला एकच शब्द सुचतोय - "सेक्सी" ;)

अर्धवटराव's picture

30 Apr 2013 - 9:06 am | अर्धवटराव

हे सगळं तुला नेमकं कसं "दिसतं" आणि "सुचतं" ?
आजकाल या पाकृ आमचा आनंदठेवा होता... आता तो संशोधन विषय बनु पाहतोय...
अफाट काम आहे.

अर्धवटराव

अर्धवटराव's picture

30 Apr 2013 - 9:08 am | अर्धवटराव

"आजकाल" ऐवजी "आजवर" वाचावे.

ओ मालक, ते स्वसंपादन सुरु करा हो लवकर :(

अर्धवटराव

मोदक's picture

30 Apr 2013 - 10:08 am | मोदक

भारी!!!!

पैसा's picture

1 May 2013 - 6:51 pm | पैसा

पण माझ्या पोराला असल्या किती रोट्या करून द्याव्या लागतील या विचाराने हैराण आहे!

अगदी अगदी! तरण्या मुलांचे स्वयंपाक करून आया आधीच हैराण झालेल्या असतात. तुला एक सुचवते. पिठाची जाला रोटी न करता 'रिकाम्या जागा भरा' पद्धतीने धिरडी करून दे.

चिंतामणी's picture

2 May 2013 - 12:47 am | चिंतामणी

ह्याच्याबरोबर राईससुद्धा खातात. त्यासाठी वेगळे काही करावे लागते का?

सानिकास्वप्निल's picture

2 May 2013 - 12:56 am | सानिकास्वप्निल

राईसचे माहित नाही ओ काका
मी टिव्हीत पाहीली पाकृ आणी बनवली.

मस्त दिसतेय हे स्ट्यू. खूप वेळा खाल्ली आहे, पण रोटी झाला अशी बनते हे माहीत नव्हते, अंडे असतेच का यात?
बाकी टीन कॅनची आयडीया मस्त आहे, आणि प्रेझेंटेशन नेहमीप्रमाणेच अप्रतिम! :-)

कच्ची कैरी's picture

6 May 2013 - 1:24 pm | कच्ची कैरी

मी सिंगापोरला रहात असुनही ही डीश का ट्राय नाही केली याचा आता खेद होतोय :(
बाकी फोटो आणि सादरीकरण झक्कास हं सानिका :)