निरामय शांतता

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in भटकंती
15 Apr 2013 - 11:25 am

डोळा उघडला तेंव्हा त्या दगडी भिंतींच्या खोलीत मिट्ट काळोख होता. बरोबरचे तीन मित्र, आणि ट्रेकिंगला आलेले इतर ग्रूप्स ढाराढूर होते. उंच बॅगवर डोकं ठेवून माझी मान आखडलेली वाटत होती. मोबाईलमधे वेळ बघितली; पहाटेचे ४ वाजले होते. जास्त आवाज न करता मी उठलो, आणि बॅटरीचा सावध प्रकाश टाकत व्हरांड्यात आलो. व्हरांड्याच्या एका टोकाला गडावर स्थायिक असलेला कुत्रा दोन भिंतींच्या कोनाचा आडोसा करून झोपलेला. दुस-या टोकाला काही दगड, काही भांडी, काही लाकडं होती. समोरच आदल्या रात्रीच्या शेकोट्यांची राख धग धरून होती.

इतक्यात वर लक्ष गेलं. काळं कुट्ट आकाश, आणि त्यात अब्जावधी ता-यांचं मंडळ. एखादं आठवणारं नक्षत्र शोधायला जायचो आणि त्या ता-यांच्या गर्दीत हरवायचो. नजर पोचेल तिथपर्यंत पसरलेल्या त्या लखलखाटाला काय म्हणावं कळेना. तो नज़ारा अंगावर यायला लागला. मग माझं लक्ष लांब डोंगराखालच्या गावातून येणा-या आवाजाकडे वळलं. ४००० फूट खाली गावातल्या देवळात कसलासा उत्सव किंवा सप्ताह चालू असावा त्यामुळे लाउडस्पीकरवर भजनं गात होती मंडळी. ते देऊळ, तिथली रोषणाई, तो मांडव, सगळं नीट ओळखू येत होतं. दिवसाच्या त्या विशाल खो-यावर अंधाराचा पडदा पडल्यामुळे ते छोटंसं देऊळ खूप उठून दिसत होतं. मी व्हरांड्याच्या भिंतीला टेकून खाली बसलो. एकटाच; डोळे मिटून.

’रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा’ भजनाच्या या ओळी कानावर यायला लागल्या. मला माझ्या १५ दिवसांच्या त्या लोकल ट्रेन मधल्या प्रवासाची आठवण झाली जेंव्हा आम्ही भजनी मंडळाच्या डब्यातून प्रवास केला, त्यांच्या सुरात सूर मिळवला, ताल धरला, आणि आनंद मिळवला. त्या एकंदरीत प्रकाराने मला शहारल्यासारखं झालं. मनात चलबिचल होती. एकदा वाटायचं आत्ताच्या आत्ता खाली त्या देवळात जावं, आणि तल्लीन व्हाव भजन ऐकण्यात, गाण्यात. तेंव्हाच वाटायचं की त्यापेक्षा हा इथे असलेला भाव, ही शांतता, ही वेळ जमेल तितकी मनात साठवून घ्यावी. नवीन नवीन कल्पना विजेच्या ठिणग्यांसारख्या मनात येत होत्या, नव्या वाटा दिसत होत्या, आलेल्या वाटांवरच्या अडथळ्यांची उकल होत होती, सगळं एकाच वेळी. काही काळ असाच गेला. हळू हळू मन शांत व्हायला लागलं.

लोकलमधल्या भजनांच्या सुरात जसा आम्हाला माणसांच्या गर्दीचा विसर पडायचा, तसाच मला आता विचारांच्या गर्दीचा विसर पडत होता. बाकी तो आवाज वगळता निरव शांतता पसरली होती. पण भजनाचा तो सूर या शांततेला भंग न करता तिचं सौंदर्य वाढवत होता. ’PEACE... this is peace as I like it' मी माझ्याशीच म्हटलं; पण जणू कुणाला सांगतोय असं.

हा माझ्या राजगड ट्रेक मधला परमोच्च आनंदाचा आणि उपलब्धीचा बिंदू होता. पहिल्या दिवशी तीन तास दमछाक करून वर आल्यावर जी विजयाची भावना अनुभवली ती काही वेगळीच होती. विहंगम दृश्य आणि त्यांना कॅमेरात साठवण्याची लगबग याशिवाय ट्रेकला काय मजा. सूर्यास्त गाठायचा म्हणून एका गावक-याने आम्हाला सांगितलेली सुवेळा ते संजीवनी माची जाणारी वेगळी वाट आम्हाला एका वेगळ्याच बुरूजावर घेऊन गेली. पण तिथून सूर्यास्त इतका सुरेख दिसला की त्याशिवाय ट्रेक अपूर्ण राहिला असता. रात्री शेकोटीजवळ बसून मारलेल्या गप्पा, सर्चलाईट ने केलेला टाईमपास, खाल्लेली बिस्किटं, ब्रेडबटर आणि प्यायलेला चहा ही तर ओव्हरनाईट ट्रेकची खरी मजा होती. ज्या वाटेवरून चढतानाच इतकं साहस झालं त्याच वाटेवरून उतरतानाचा रोमांच आणि मग पुन्हा पायथ्याशी आल्यावरची यशाच्या संपूर्णतेची भावना; सगळंच अविस्मरणीय. पण या सगळ्याचं सार ’माझ्यासाठी’ त्या पहाटेच्या शांततेत होतं.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

15 Apr 2013 - 11:45 am | यशोधरा

अहा! मस्त लिहिलं आहे.

वासोटा ट्रेकच्यावेळी पहाटे २ वाजता कासचं पठार ओलांडून बामणोलीला पोहोचलो होतो. तिथे एका त पथार्‍या पसरल्या आणि पाहतो तो माथ्यावर नक्षत्रं नुसती फुलली होती! आमच्यापैकी काही कुंभकर्ण झोपी गेले आणि काही जण नुसतेच शांत बसून देवाघरची दौलत पहात बसलो... अतिशय मनस्वी अनुभव होता. पहाटवेळेची शांतता अनुभवली.

हळूहळू उजाडलं आणि कोण्या माऊलीने पाणी तापवायला बाहेरची चूल पेटवली..

अजूनही लिहा असंच.

मी_आहे_ना's picture

15 Apr 2013 - 11:50 am | मी_आहे_ना

मस्त वर्णन...खरंच अश्या काही क्षणांसाठीच हा अट्टाहास करायचा असतो.

सुजित पवार's picture

11 May 2013 - 6:54 pm | सुजित पवार

+१

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 1:23 pm | वेल्लाभट

आभार!

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 May 2013 - 10:37 am | डॉ सुहास म्हात्रे

+११११११

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 1:24 pm | वेल्लाभट

आभार +११११११

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2013 - 12:01 pm | प्रसाद गोडबोले

मस्त लिहिलय !!

मनराव's picture

15 Apr 2013 - 2:41 pm | मनराव

महिन्या दोन महिन्यातुन एकदा तरी या शांततेचा अनुभव घ्यायला हवा......

प्रचेतस's picture

15 Apr 2013 - 3:36 pm | प्रचेतस

खूप छान लिहिलंय.
रात्रीची किर्र शांतता, रातव्यांचे आवाज, कधी माथ्यावरच्या चांदण्या, कित्येकदा भर दुपारी एकट्यानेच लोहगडाच्या विंचूकाट्यावर जाऊन तिथली खोल दरी तासनतास बसून निरखणे.
सुखं असतं हे.

मालोजीराव's picture

15 Apr 2013 - 3:47 pm | मालोजीराव

मस्त लिहिलत…जुन्या आठवणी ताज्या झाल्या !
राजगड,तिकोना,कमळगड या ट्रेक्स च्या वेळी हा अनुभव घेतलाय…केवळ अवर्णनीय…सध्या गावोगावी सप्ताह चालू आहेत, सध्याला ट्रेक केल्यास टायमिंग जमू शकेल

पैसा's picture

15 Apr 2013 - 4:17 pm | पैसा

असे क्षण शोधू म्हणून सापडत नाहीत अन प्रयत्नाने हातात येत नाहीत. एखाद्या क्षणी सारेच जमून येते आणि आयुष्यभराची दौलत मिळते. फार छान लिहिलंत. येऊ द्या असेच निवांत क्षण!

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 4:23 pm | प्यारे१

छानच!

प्रभाकर पेठकर's picture

15 Apr 2013 - 4:40 pm | प्रभाकर पेठकर

रात्रीच्या १ वाजता, अत्यंत निरव शांततेत, खंडाळ्याच्या घाटात, थोडी 'मारुन' भटकताना असेच भजनाचे सुर्, प्रत्यक्षात उच्चस्वरातील पण दूरवरून आमच्यापर्यंत पोहोचे पर्यंत मृदू झालेले, साथीला टाळ आणि मृदूंग. बस्स! मजा आली. खंडाळ्याच्या थंडीत 'पिण्याच्या' परमोच्च आनंदालाही मागे सारून त्या सुरांनी पोटातल्या सुरेवर मात केली. गवतावर पडल्या पडल्या, तास दिडतास केंव्हा उलटून गेला कळलेच नाही.

फार सुन्दर लिहिलय मला खुप आवडल आपण शहरात राहणारी माणस हे मिस करतो.
हिच शन्तता दररोज आपल्याला मिळालेली अस्ते पण आपण ती झोपेत घालवतो.
खुप मजा अली लिहीत रहा
खुप खुप शुभेच्छा!!!

तिमा's picture

17 Apr 2013 - 5:02 pm | तिमा

छान लिहिलंय. भजन गाणारे तेच पण लोकलमधे त्यांच्या आवाजात हैवानांचा सूर ऐकू येतो. तर शांत वेळी असा दुरून भजनाचा आवाज येतो तेंव्हा त्यातील देवाचा सूर ऐकू येतो.

सुरेख अनुभव वेल्लाभट! अतिशय सुरेख.

झंडुबाम's picture

17 Apr 2013 - 9:49 pm | झंडुबाम

आमच्यापैकी काही कुंभकर्ण झोपी गेले आणि काही जण नुसतेच शांत बसून देवाघरची दौलत पहात बसलो...

खूप छान लिहिलंय....

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Apr 2013 - 1:54 am | विश्वनाथ मेहेंदळे

बाकी सगळे ठीक आहे. पण निरामय शांतता म्हणजे नक्की काय ?????? ;-)

सुमीत भातखंडे's picture

18 Apr 2013 - 3:40 pm | सुमीत भातखंडे

सुरेख...वाचताना सुद्धा छान वाटलं, प्रत्यक्ष अनुभवायला मिळणं म्हणजे...आहाहा!

तर्री's picture

18 Apr 2013 - 3:44 pm | तर्री

लेखन आवडले.

वा वा!!! फारच वेधक लिखाण.

लाल टोपी's picture

19 Apr 2013 - 2:15 am | लाल टोपी

ट्रेकिंगच्या आठवणी जागवल्या राजमाची, वासोटा, राजगड.. आम्ही बरीच वर्षे शिवजयंतीला राजगड ट्रेक करीत असू..

विसोबा खेचर's picture

12 May 2013 - 9:44 am | विसोबा खेचर

केवळ सुरेख, चित्रदर्शी लिहिलंय साहेब. खूप बरं वाटलं वाचून..

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 1:22 pm | वेल्लाभट

धन्यवाद साहेब