ड्रॅगनच्या देशात १६ - यांगत्से क्रूझ : सेंचुरी स्काय बोट आणि शिबाओझाई पॅगोडा

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
12 Jan 2013 - 11:40 pm

===================================================================

ड्रॅगनच्यादेशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

सेंचुरी स्काय हे १२६.८ मी. लांबीचे ६ मजली ८,०४० टनी क्रूझ शिप आहे. त्याच्यावरच्या १५३ केबीन्समध्ये ३०६ प्रवाशांची व्यवस्था आहे. नदीच्या क्रूझसाठी हे बर्‍या पैकी मोठे जहाज आहे.

(अवांतर नदीवरच्या क्रूझ जहाजांच्या मानाने समुद्रातली क्रूझ जहाजे खूपच मोठी असतात... उदा. ओयासिस वर्गाचे समुद्री क्रूझ जहाज २,२५,०००+ टनी, ३६०+ मी. लांब, पाण्यावर ७२+ मी. उंच, १६+ मजली असून एका वेळेस ६,०००+ प्रवाशांची राहण्याची व्यवस्था करू शकते.)

सेंचुरी स्कायच्या यांगत्से नदीवरील "चोंगचिंग ते यिचांग" सफरीचा नकाशा.

बाहेरून रात्रीच्या अंधारात जहाज काही छाप पडावी असे आकर्षक वाटले नाही. पण जहाजात पाय ठेवला आणि हळूहळू मत बदलू लागले. सेंचुरी स्कायने त्याच्या जाहिरातीतील सर्व गोष्टींची पूर्तता केली होती. बर्‍यापैकी प्रशस्त लॉबी, तत्पर सेवा...

सुसज्ज खोल्या आणि मला विशेष आवडलेली सोय म्हणजे दर खोलीला असलेली खाजगी बाल्कनी... तिच्यात एका खुर्चीवर बसून दुसरीवर तंगड्या ठेवून नदीची आणि बाजूने पळणार्‍या किनार्‍यावरची मजा पाहायला !

आणि हे आमच्या टूर कंपनीचे खास स्वागत. त्या फळांत डाव्या बाजूला जे लाल रंगाचे फळ आहे त्याचे नाव आहे ड्रॅगनफ्रूट. दिसायला आकर्षक असते पण चवीला इतके खास नाही, थोडे मीठ टाकून बरे लागते. हे फळ सर्व दूरपूर्व व दक्षिणपूर्व देशांत भरपूर प्रमाणात मिळते आणि फार आवडीने खाल्ले जाते.

सामान खोलीत टाकल्यावर प्रथम सगळ्या बोटीवर एक फेरी मारली तेव्हाच जरा बरे वाटले +D !

लॉबी (दुसरा मजला) तून दिसणार्‍या तिसर्‍या व चवथ्या मजल्याच्या गॅलर्‍या

प्रशस्त जेवणाचा हॉल

दर मजल्यावर आरामात बसून गप्पा मारायची व्यवस्था असलेल्या अनेक जागा (लाउंजेस)

जिमखाना

डान्स फ्लोअर

सगळ्यात वरचे सन डेक् वगैरे भाग रात्र असल्याने अंधारात होते, ते उद्या बघू असे म्हणून खोलीवर परत आलो. साडेदहा वाजत आले होते. थोडा वेळ बाल्कनीत बसून मागे जाण्यार्‍या किनार्‍यावरच्या प्रकाशित इमारतींचे आकार आणि मधूनच भोंगा वाजवत पुढेमागे जाणार्‍या जहाजांची गंमत एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने बघत राहिलो. मग मात्र दिवसभराच्या भागदौडीच्या थकव्याने जांभया यायला सुरुवात झाली. नाइलाजाने खोलीत आलो आणि केव्हा झोप लागली ते कळले सुद्धा नाही.

===================================================================

सकाळी जाग आली आणि पावले आपोआप बाल्कनीकडे गेली. भल्या मोठ्या यांगत्से मध्ये आम्हाला इतर बर्‍याच क्रूझ बोटींची सोबत होती.

दूरवर पसरलेल्या सकाळच्या धुक्यातून एक शहर दिसत होते.

जवळच किनार्‍यावरच्या डोंगरावरची हिरवीगार झाडी आणि त्यातून डोकावणारी चिनी शैलीतली टुमदार घरे खुणावत होती.

टूर कंपनीच्या इटिनेररीप्रमाणे आज शिबाओझाई पॅगोडा पाहण्यासाठी एकच ३ तासाची किनारपट्टीवरची फेरी होती. त्याच्या आधारे मी असा अंदाज केला होता की खूप दिवसांच्या धावपळीनंतर आज मस्तपैकी बराच वेळ लोळून आणि बाल्कनीत आरामात बसून घालवता येईल. पण क्रूझ कंपनीचा बेत वेगळाच होता ! त्यांनी त्यांची दर दिवसाची अनेक कार्यक्रमांची भर घातलेली वेगळी इटीनेररी खोलीत ठेवली होती. नवीनं कार्यक्रमांतला एक किनार्‍यावरच्या पर्यटनाचा पर्याय सोडला तर बाकी सर्व बोटीवरच आणि विनामूल्य होते. झाले आमच्या आराम करायच्या बेताची पुरी वाट लागली... पण अर्थात त्याचे दु:ख होण्यापेक्षा सुखच वाटले. आता आलोच आहोत चीन बघायला तर सगळे टिक् मार्क्स पुरे होऊ दे असे म्हणून नंतर तो एकुलता एक पर्यायसुद्धा पैसे भरून बुक करून टाकला !

पटापट सर्व आटपून न्याहारीसाठी गेलो. जेवणाच्या हॉलच्या दरवाज्यात स्वागतिका प्रत्येक प्रवाशाच्या नावाने टेबलावरच्या राखून ठेवलेल्या जागेची माहिती व खास ओळखपत्र देत होती. ते ओळखपत्र फक्त बोटीवरून किनार्‍यावरच्या पर्यटनाला जाता येताना वापरण्यासाठी होते. बोटीच्या आत सर्व कार्यक्रमांसाठी आणि सार्वजनिक उपयोगाच्या जागा वापरायला सर्व परवशांना पूर्ण मोकळीक होती.

न्याहारीसाठी जहाजाच्या स्टाफने जरा कल्पकता वापरून इंग्लिश येणार्‍या परदेशी प्रवाशांची जवळ जवळच दोन टेबलांवर व्यवस्था केली होती. शिवाय आमच्या या गटाला किनार्‍यावरच्या पर्यटनाला दर वेळेला इंग्लिश बोलणारे गाईड दिले. त्यामुळे पुढचे काही दिवस भाषेची अजिबात अडचण तर आली नाहीच पण बर्‍याच दिवसांनी मोकळेपणाने गप्पा मारायला साथीदारही मिळाले. अमेरिकेत शिकायला गेलेली आणि तेथेच प्रेमात पडून लग्न केलेली चिनी मुलगी आपल्या आईवडीलांच्या आग्रहाखातर चिनी पद्धतीने परत लग्न करायला नवरा आणि त्याच्या चार नातेवाइकांसकट चीनमध्ये आली होती. ते सर्व आता परतण्यापूर्वी जिवाचे चीन करीत फिरत होते. दोन वयस्क ब्रिटिश जोडपी होती. त्यांत एक फारच वरच्या नाकाचे होते. पण दुसरे, कर्मधर्मसंयोगाने माझ्या टेबलावरचे जोडपे, दिलखुलास होते. शिवाय एक सहा जणांचा गट डोमिनीकन रिपब्लिक (वेस्ट इंडीज मधले एक बेट) मधून आलेला होता. आमचा मस्त ग्रुप जमला होता. त्यामुळे क्रूझचे दिवस खेळीमेळीत आणि जरा जास्तच मजेत गेले.

न्याहारीनंतर जहाजाच्या डॉक्टरने चिनी औषधपद्धतीवर एक भाषण दिले आणि ताई ची, अक्युपंक्चर व अक्युप्रेशरचे प्रात्यक्षिक दाखवले.


.

नंतर जहाजात हिंडायला आणि खरेदीसाठी अर्धा तास मोकळा होता. त्यानंतर एका जलसुंदरीने स्कार्फ कसे वापरावे याचे वेगवेगळे पंचवीसच्या आसपास प्रकार दाखवले. ती इतक्या सफाईने पटापट स्कार्फच्या घड्या करून अथवा गाठी मारून आकर्षक आकार बनवत होती की सगळे बघतच राहिले !

नंतर कळले की चिनी कॉलेजमधून बॅचलर स्तराची टूरिझमची खास पदवी मिळते. त्यांत हे आणि नंतरच्या दिवसांत बघितलेले बरेच काही शिकवले जाते. चीन पर्यटनव्यवसाय किती गंभीरतापूर्वक विकसीत करीत आहे त्याचे हे द्योतक आहे. सध्यातरी चीनमधील प्रवाशांत फक्त ५% परदेशी प्रवासी असतात. ती संख्या वाढविण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतू चीनच्या १३०+ कोटी लोकसंख्येपैकी२०% टक्के लोक जरी त्यांच्या देशातल्या देशात हिंडूफिरू लागले तरी दरसाल प्रवाशांची सख्या २६ कोटीवर जाईल! अर्थातच सध्याच्या जागतिक मंदीच्या काळात पर्यटनव्यवसाय चीनचे GDP वाढवायला आणि रोजगार निर्मितीसाठी फार मोठे योगदान देऊ शकेल. चिनी सरकार याबाबतीत जागरूक असल्याचे दर पर्यटनस्थळावर प्रकर्षाने जाणवत होते.

मध्ये थोडा मोकळा वेळ होता त्यांत सगळ्यात वरच्या मजल्यावरचे सन डेक पाहून आलो. अर्थात नैसर्गिक टॅन असल्याने या सोईचा मला तसा उपयोग नव्हता... पण ती बघण्याचा टिक् मार्क करणे जरूर होते +D !


.

नंतर दुपारचे जेवण झाले आणि आम्ही शिबाओझाई पॅगोडा बघायला बाहेर पडलो. बोटीपासून साधारण वीस मिनिटे चालल्यावर पॅगोडाच्या क्षेत्राचे पहिले द्वार लागले.

मग दुसरे...

आणि शेवटी तिसरे... एका झुलत्या पुलाच्या सुरुवातीचे...

हा पूल आपल्याला आता एका बेटासारख्या जागेत असलेल्या पॅगोडामध्ये घेऊन जातो. यांगत्से नदीवरचे थ्री गोर्जेस डॅम हे महाकाय धरण बांधण्या अगोदर ह्या २०० मीटर उंच सुळक्यावर बांधलेल्या पॅगोडाचा पायथा नदीकिनारी होता आणि पायी चालत जाऊन लोकांना सुळक्यावर चढून गेल्यावर पॅगोड्यात प्रवेश करता येत होता. पण धरणामुळे पाण्याची पातळी वाढल्याने आता या पॅगोड्याच्या पायासभोवती एक संरक्षक धरण बांधून त्याचे पायापासून वरपर्यंतच्या सर्व भागाचे संरक्षण केले आहे. हा झुलता पूल आता परवशांना त्या धरणाच्या भिंतीवर नेतो आणि भिंतीवरचा रस्ता तडक पॅगोड्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जातो. धरणाच्या पाण्यात बुडण्यापासून वाचवून एक प्राचीन वास्तू जशीच्या तशी, आहे त्याच जागेवर जतन करून ठेवण्याच्या या कल्पक धडपडीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. शिवाय ही वास्तू जपल्यामुळे येथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे हाही एक मोठा फायदा झाला आहे. थ्री गॉर्जेस धरणामुळे धोक्यात आलेल्या अशा अनेक पुरातन जागा कल्पकतेने जतन करून पर्यटनाकरिता विकसित केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे सर्व ठिकाणी गाईडचे काम कटाक्षाने स्थानिक लोकांतील प्रशिक्षण देऊन तयार केलेल्या तरुण-तरुणींनाच दिलेले आहे. आणखी एक विशेष गोष्ट अशी की लिजियांग-शांग्रीला सारखेच ह्या सर्व स्थानिक जमातींच्या (minorities) गाईडांचे इंग्लिश शहरी गाईडांपेक्षा खूपच चांगले आणि चिनी लकबींविना (without Chinese accent) होते !

शिबाओझाई म्हणजे Stone Treasure Fortress. हा पॅगोडा चिंग राजघराण्याच्या काळात इ. १७५० मध्ये बांधला गेला. एका ९० अंशात उभ्या कड्याच्या टोकावर बांधलेली हि ५६ मी. उंचीची आणि १२ मजल्याची इमारत पूर्णपणे लाकडी आहे. कुठल्याही प्रकारचा धातूचा उपयोग (अगदी एक खिळासुद्धा) या पूर्ण इमारतीच्या बांधकामात केलेला नाही. यातले १० मजले थ्री किंगडम्स काळातील (इ. २२०-२६५) १० लोकप्रिय जनरल्सच्या नावे आहेत, तर एक स्थानिक प्राचीन कवी आणि एक प्रसिद्ध विद्वानाच्या नावे आहे. त्या त्या प्रसिद्ध लोकांशी निगडित वस्तू व मूर्ती प्रत्येक मजल्यावर जतन करून ठेवलेल्या आहेत.

उभा कडा, त्यावरचा पॅगोडा, त्याभोवतीचे धरण आणि झुलता पूल यांचा दुरून घेतलेला फोटो.

पूल ओलांडून गेल्यावर धरण व कड्याचा पायथा दिसतो.

आणि त्याबरोबरच ज्या कड्याला टेकून पॅगोडा बांधला आहे तोही दिसतो.

अजून ५०-७५ मीटर चालून गेले की पूर्ण पॅगोडा दृष्टिपथात येतो.

नंतर पॅगोड्याचा दर्शनी भाग दिसायला लागतो.

पुढून ध्यानात येत नाही पण पॅगोड्याच्या आत फिरताना कळते की या पॅगोड्याची आतली भिंत कड्याने बनलेली आहे आणि पॅगोड्याचा भार जमीन उचलत नाही तर कड्याच्या कपार्‍यांत घुसवलेली लाकडे ते काम करीत आहेत !


.

पॅगोड्याच्या मागे अजून काही मंदिरे आहेत त्यांत अजून काही जनरल्सच्या आणि चिनी देवांच्या मूर्ती आहेत.


.


.

पॅगोड्यावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते...

हा आहे झुलता पूल ज्याच्यावरून चालत आम्ही पॅगोड्यावर आलो.

आणि ही आहे सेंचुरी स्काय बोट

परत आल्यावर चिनी चहापानाचे (Chinese tea ceremony) चे प्रात्यक्षिक झाले आणि चक्क अन्नाच्या हॉटेलमध्ये जशी 'मद्रास कोफी' उलट्या कप / पेल्यात देतात तसा चिनी चहा मिळाला. "अन्ना"चा प्रभाव केवळ आखाती राष्ट्रांवरच नाही तर प्राचीन चीनवरही होता याचा सज्जड पुरावा मिळाला. चिनी भाषा येत नव्हती आणि बायजींगमध्ये आपला वशिला नाही, नाहीतर "तुमच्या त्या उत्खननांत जरा नीट शोधा. आमच्या अन्नाचे एखादे 'मॅड्रास कोफी शॉप' जरूर मिळेल" असा फुकटचा सल्ला दिला असता !

परत येऊन जरासा आराम करतोय तेवढ्यातच बोटीच्या कप्तानाने आपल्या करिता स्वागत समारंभ योजला (Captains’ welcome party) आहे त्याला यावे अशी घोषणा झाली. बोटीच्या कप्तानाने सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत मंचावर येऊन सर्व प्रवाशांचे स्वागत केले. बोटीबद्दल थोडी माहिती दिली आणि संध्याकाळच्या या पार्टीची मजा घ्या म्हणून ते सर्व प्रवाशांत सामील झाले.


.

त्यानंतर वेलकम बॉल डान्स झाला.

रात्रीचे जेवण झाल्यावर बोटीच्या सर्व कर्मचार्‍यांनी मिळून एक विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम (staff cabaret) सादर केला. त्याची काही क्षणचित्रे...

 .....................
.


.


.


.


.

टाळ्या वाजवून प्रवाशांचे हात दुखू नयेत म्हणून खास क्लॅपर्स आणि विशेष पसंती दाखवायला फ़्लोरोसंट ट्यूब्ज दिल्या होत्या +D!

नंतर प्रवाशांनाही रंगमंचावर नाचायला बोलवून धमाल उडवून दिली.

दिवसभर अशी सुखद धावपळ करायला लागल्यावर निद्रादेवीने खेचूनच खोलीत नेले. उद्या वेळेत जाग आली नाही तर खुशाल दरवाजा तोडून मला उठवा असा निरोप बोटीच्या रिसेप्शनमध्ये ठेवून गुडुप झालो.

(क्रमशः)

===================================================================

ड्रॅगनच्यादेशात: ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५...
१६... १७... १८... १९... २०... २१ (समाप्त)...

===================================================================

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

12 Jan 2013 - 11:47 pm | आनन्दिता

नेहमीप्रमाणेच इंट्रेस्टिंग लेख. फटू पण झक्कास.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jan 2013 - 7:51 am | श्रीरंग_जोशी

चीनमधील प्रवासवर्णनाबद्दल आंतरजालावर मी वाचलेली आजवरची सर्वोत्तम लेखमालिका.

चीनप्रमाणेच जगातील इतर स्थळे ज्याबद्दल (मराठी) आंतरजालावर फार माहिती नसेल तेथे आपण जावे (उदा रशियाचा आशियातला भाग, दक्षिण अमेरिकेतील काही देश) व त्याचीही प्रवासवर्णने प्रकाशित करून आम्हांस उपकृत करावे हि प्रार्थना...

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2013 - 5:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही म्हणता तसा बेत मनात आहे. बघुया कसे जमते ते.

पण अगोदर न मळलेल्या पायवाटेवरच्या काही सफरी अगोदरच पोतडीत आहेत; उदा. व्हिएतनाम, कंबोडीया, बाली, जॉर्डन आणि माझ्या पद्धतीने बघीतलेला स्वित्झरलंड, इ. आपल्यासारख्या वाचकांना आवडले तर त्याबद्दलही पुढे जसे जमेल तसे लिहीन.

रेवती's picture

13 Jan 2013 - 8:48 am | रेवती

ग्रेट! मस्त लेखन आणि छायाचित्रे.वरून बाराव्या फोटोत एका चिनी मनुष्याचा चेहरा बराच लांबून दिसतोय त्याबद्दल माहिती देण्यात आली होती काय? ड्रॅगनफ्रूट हे दुकानात विकायला आलेले बरेचदा पाहिले होते आणि चवीला कसे असावे याची कल्पना नव्हती. आणले नाही ते बरेच झाले.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2013 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

लेख आवडल्याबद्दल धन्यवाद.

तुअमचा प्रश्न नीट कळला नाही. वरून बाराव्या फोटोत बोटीचे चिनी डॉक्टर महोदय "ताई ची" चे प्रात्यक्षिक दाखवीत आहेत.

यांगत्से नदी, त्यातल्या बोटी, दिसणारे शहर त्यानंतर चिनी शैलीतील टुमदार घरे असलेल्या फोटूत एक बांधकातून केलेला चेहरा दिसतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2013 - 6:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

वेगळी दिसणारी इमारत आणि तिही निसर्गसुंदर प्रदेशात म्हणून टीपली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2013 - 6:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

परत नीट बघीतले तर पाण्याची टाकी वाटते... पण नक्की माहिती नाही.

कौशी's picture

13 Jan 2013 - 9:38 am | कौशी

अप्रतिम फोटो मस्तच चाललीय सफर..

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Jan 2013 - 11:08 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार.

शेवटपर्यंत अशीच साथ द्या म्हणजे ह्या लेखनसफरीत मलाही अधिकच मजा येईल.

चेतन's picture

13 Jan 2013 - 12:42 pm | चेतन

हा भाग एव्हढा आवडला नाही कदाचित ठीकाणाबद्दल माहीती कमी टाकल्यामुळे असेल
पण सफर मस्तच चाललेयं मागचे सगळेच भाग आवड्लेत

शेवटच्या भागात किती खर्च आला आणि एकुण किती दिवस लागलेत ते लिहलत तर उपयोगी पडेल.

चेतन

अजया's picture

13 Jan 2013 - 8:33 pm | अजया

तुमच्या लेखमालिकेमुळे चिनची सफर करावीच लागणार एक्कासाहेब!

स्वराजित's picture

16 Jan 2013 - 3:13 pm | स्वराजित

लेखमालिका खुप आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Jan 2013 - 5:54 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद.

अनिल तापकीर's picture

16 Jan 2013 - 6:03 pm | अनिल तापकीर

खुप सुंदर

झकास!!! पॅगोड्याचे शेवटचे दार पाहून कुंगफू पांडा पार्ट १ मध्ये तायलाँग बरोबर पहिली चकमक होते ती जागा वाटतेय एकदम. बाकी फोटो तर काय सांगावेत म्हणा, बहुत काय लिहिणे आपण सूज्ञ असा.