मेथी मलई मुर्ग

अनुप कुलकर्णी's picture
अनुप कुलकर्णी in पाककृती
23 Dec 2012 - 9:42 am

नमस्कार मंडळी !!

गेली अमुक अमुक वर्षं मी मिपा वाचतो आहे. अमुक अमुक अशासाठी म्हणलं कारण मी सदस्य तरी नुकताच झालो आहे पण पाहुणा म्हणून वाचनमात्र गेली अनेक वर्षं होतो. तर सांगायचं असं आहे की मिपा वरचं इतर साहित्य तर वाचनीय आहेच पण मी सगळ्यात जास्त इंटरेस्टनी वाचतो ते 'खाद्य' साहित्य !! मिपा वरच्या कित्येक पाककृती रेफर करून आता पदार्थ करणं आणि त्यांच्यावर प्रयोग करणं हा माझा आवडीचा छंद झाला आहे. त्यामुळं माझ्यासाठी मिपा वरचं पहिलं लेखन काय करावं असा प्रश्नच पडला नाही.
खूप दिवस तोच तो कोल्हापुरी तांबडा-पांढरा, गावरान चिकन किंवा आमच्या बेंगलोरात मिळणारे (आंध्रा स्टाईल :P) चेत्तीनाडू आणि नेल्लोर चिकन खाउन(आणि करून) लई बोर झालं होतं. म्हणून काहीतरी नवीन करायची इच्छा होती. खूप तेलकट , चमचमीत, मसालेदार, तिखट असं काही करायचं नव्हतं. ओल्या खोबर्याचे वाटण आणि काजू ग्रेव्ही देखील टाळायचे होते. या सगळ्यात लहानपणी भाज्या खायला लावण्यासाठी आईने केलेल्या आयडिया आठवल्या. आणि थोडे फेरफार करून (आंतरजालावर बघून) जे काही तयार झालं ते......

मेथी मलई मुर्ग

साहित्य
चिकन १/२ kg
मेथी १ मोठी पेंडी (कडू नाहीय ना याची भाजीवाल्या/ली कडंच खात्री करा)
कांदे २ साधारण मोठे
१ इंच आले (बारीक काप )
१ इंच आल्याची पेस्ट
४-५ लसुण पाकळ्या बारीक कापून
१/२ चमचा लसुण पेस्ट
फ्रेश क्रीम १/२ वाटी
४-५ हिरव्या मिरच्या (जास्त तिखट करण्याची इच्छा नव्हती तरी इच्छा असेल तर याचे प्रमाण वाढवता येईल)
फोडणीसाठी बटर (तेल सुद्धा चालेल)

मॅरीनेशन साठी
दही १ वाटी
मीठ १ चमचा
हळद १/२ चमचा
तमालपत्र २ पाने
दालचिनी १ इंच
मसाल्याचे वेलदोडे २/३
मिरी ४-५
१ चमचा साजूक तूप

कृती
पहिल्यांदा मॅरीनेशनचे साहित्य एका भांड्यात एकत्र करून त्यात चिकन घालुन नीट मिक्स करा. आता बाकीच्या साहित्याची जमवाजमव होईपर्यंत त्याच्याकडे बघू नका . (जर सामानाची जमवाजमव आधीच झाली असेल तर किमान १/२ तास त्या कोंबडीला तिच्या मसाल्या सोबत एकांतात सोडा)

मेथी निवडून घ्या. त्यातली ३/४ मेथी बारीक चिरून घ्या. उरलेली १/४ पाने तशीच असू दे.
कांदा साधारण चिरून घ्या (चिरलेला कांदा मिक्सर मधून काढायचा आहे तेंव्हा बारीक चिरण्याच्या फंदात पडू नका ).
चिरलेला कांदा आणि मिरच्या मिक्सर मधून वाटून घ्या.

कढईत चमचा भर तेल आणि तब्येतीनुसार बटर घाला (आधी तेल घातल्यामुळे बटर जळून घरभर धूर होत नाही). बटर वितळल्यावर त्यात लसूण सोनेरी (कांदा/लसुण परतताना हा सोनेरी रंग प्रत्यक्षात मला कधीच दिसला नाही... मी आपला चॉकलेटीलाच सोनेरी म्हणून टाकतो) रंग येईपर्यंत परता. त्यात आले-लसुण पेस्ट घाला व कच्चा वास जाईपर्यंत साधारण मिनिटभर परता. त्यात वाटलेली कांदा मिरची पेस्ट घाला. आता ही पेस्ट असल्याने नेहमीप्रमाणे 'सोनेरी' वगैरे रंग येणार नाही. तुम्ही आपले कच्चा वास जाईपर्यंत / तेल सुटे पर्यंत नाहीतर कंटाळा येईपर्यंत परता. हे झालं की मग ती चिरलेली ३/४ मेथी आणि १/४ मेथीची पाने कढईत घाला आणि मेथीच्या अंगचे पाणी सुटून आटे पर्यंत शिजवा.

हे एवढं होईपर्यंत चिकन छान मुरलं असेल. ते त्याच्या सोबतच्या मसाल्यासकट आपल्या मेथीच्या भाजीत घाला. दह्यामुळे त्याला थोडंफार पाणी सुटलेलं असेलच. त्यामुळं जेमतेम पेलाभर पाणी घालून कढई वर झाकण ठेवा. आता ५ एक मिनिटं तरी तुम्ही ईकडं तिकडं फिरून येऊ शकता किंवा त्याला जोडीला काही रोटी / नान / चपाती बनवायचं असल्यास तिकडं लक्ष देऊ शकता.

५ मिनिटांनी झाकण उघडून बघा. जर बोनलेस चिकन किंवा छोटे तुकडे असतील तर आत्तापर्यंत बऱ्यापैकी शिजत आले असतील. चमच्यांनी थोडंस टोचून बघा. आणि जरुरीपुरत पाणी घालून आणखी २-३ मिनिटं वाफ द्या. मी लेग पीस वापरले होते. त्यामुळं मला शिजवायला जरा वेळ लागला. तुम्ही पण जर लेग पीस घेतले असतील तर अजून एक भांडंभर पाणी घाला आणि दहा मिनिटं परत शिजू द्या. १० मिनिटांनी लेग पीस पण साधारण शिजत आले असतील.

चिकन बऱ्यापैकी शिजल्यावर त्यात अर्धी वाटी फ्रेश क्रीम घाला आणि छान मिसळून घ्या. आता थोडीशी चव घेऊन पाहायला हरकत नाही. आपण मॅरीनेशन करताना मीठ घातलं होतं. त्यामुळं आता चवीनुसार थोडंसं मीठ घाला. अजून २-३ मिनिटं शिजवा आणि मग सुरु करा खायला.
मी ह्याच्यासोबत चीज गार्लिक पराठा केला होता. (प्रेरणा: डॉमिनोज चा चीज बर्स्ट पिझ्झा). हे कॉम्बीनेशन माझ्या अपेक्षेपेक्षा भलतंच झकास लागलं.

गवताळ लोकं यात मुश्रूम, मटार, पनीर इ घालू शकतात. किंवा मेथीच्या भाजीचा नवीन प्रकार म्हणून नुसती ग्रेव्ही देखील झक्कास लागते.

photo

प्रतिक्रिया

समयांत's picture

23 Dec 2012 - 9:52 am | समयांत

मेममु भारी दिसतंय.
आमचं बेंगलोर ;)

आंध्र स्टाईल: (

पैसा's picture

23 Dec 2012 - 10:01 am | पैसा

यक्दम वरिजिनल पाकृ आणि लिहिण्याची स्टायल आवडली. फोटो पण झक्कास. हातासरसे चीज गार्लिक प्राठा कसा केलात त्याची कृती दिली असतीत तर आणखीच छान झालं असतं.

आणि हो, मिपावर स्वागत! असेच छान छान लिहीत रहा!

पिंपातला उंदीर's picture

23 Dec 2012 - 10:23 am | पिंपातला उंदीर

लिटर भर पाणी जमा झाले तोंडात

पियुशा's picture

23 Dec 2012 - 10:43 am | पियुशा

वॉव !!!!! ह्याला मेथीचिकन लॉलीपॉप म्हणावे दिसतय तसच काय भारिये हा प्रकार :)
समजा सगळ सेम साहित्य वापरुन हा पदार्थ शिजवन्या ऐवजी ह्याला डिप फ्राय केले तर ?

हं! एकांतातली कोंबडी अन अंगभर पाण्याची मेथी (ऑ? काय काय राजकपूरच पिक्चर चाललय का काय?)

फिर भी करके देखेंगे। बचे तो और करेंगे।

सस्नेह's picture

23 Dec 2012 - 12:25 pm | सस्नेह

गवताळ असल्यामुळे पर्यायी मार्ग निवडून केले जाईल.
एक शंका : पेलाभर पाणी+मेथीचे पाणी+मुर्गीचे (अंगचे) पाणी इतके पाणी पाच मिनिटात पूर्ण आटेल ?
नाही, तंगडी अगदीच कुरकुरीत दिसतेय हो !

अनुप कुलकर्णी's picture

23 Dec 2012 - 12:53 pm | अनुप कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद :)

@पियुशा ताई : डीप फ्राय करायची आयडिया पण चांगली आहे .. थोडेफार बदल करून कधीतरी करून पाहता येईल.. स्टार्टर म्हणून खायला.. पण आम्हाला तरी मेथीची ग्रेव्हीच जास्त आवडली (इतकी की पुढच्या वेळी नुसतीच मेथीची भाजी अशी करून बघण्याचा प्लान आहे)

@स्नेहांकिता ताई: मेथीचं पाणी आटल्यानंतर चिकन घातलं.. आणि आम्हाला कधी एकदा होतं आणि खातो याची घाई असल्यानं सगळं मोठ्या फ्लेम वरंच केलं :) त्यामुळं आटलं पाणी पट्कन.. शिवाय तंगडी पूर्ण शिजू द्यायसाठी वरून आणखी पाणी घातलं ना ..

गणपा's picture

23 Dec 2012 - 1:26 pm | गणपा

मस्तंच दिसतेय की.
मला माझा मेथी चिकनच प्रयोग आठवला.

दिपक.कुवेत's picture

23 Dec 2012 - 1:52 pm | दिपक.कुवेत

छान दिसतेय डिश...लेखनशैली पण चटकदार...पुलेशु.

कवितानागेश's picture

23 Dec 2012 - 4:14 pm | कवितानागेश

मस्त लिहिलय.
चिकनाऐवजी काय वापरायचे बघते... :(

काय जबरा दिसतय.... तोंपासु

नक्की प्रयत्न करेन

कौशी's picture

23 Dec 2012 - 10:27 pm | कौशी

नक्की करून बघेन.

मेथीत काहीही म्हणजे सुक्या बोंबलाचे तुकडे,मटण्/चिकन खिमा,अंडयाची भुर्जी, किंवा नुसतीच पालेभाजीही चपात्या किंवा भाकरी बरोबर अगदी मनपसंत! तुमची पाकृ आणि लेखन पध्दत फारच आवडली. पुढील पाकृंसाठी शुभेच्छा.

गणपा's picture

24 Dec 2012 - 12:30 am | गणपा

मेथीत काहीही म्हणजे सुक्या बोंबलाचे तुकडे,मटण्/चिकन खिमा,अंडयाची भुर्जी, किंवा नुसतीच पालेभाजीही चपात्या किंवा भाकरी बरोबर अगदी मनपसंत!

बाडिस.

कपिलमुनी's picture

24 Dec 2012 - 7:20 pm | कपिलमुनी

याची पा़कॄ येउ द्या

सानिकास्वप्निल's picture

24 Dec 2012 - 8:37 pm | सानिकास्वप्निल

छान दिसतय मेथी मलई मूर्ग :)

अत्रन्गि पाउस's picture

24 Dec 2012 - 9:44 pm | अत्रन्गि पाउस

हि कृती वाचली आणि पुन्हा भूक लागली आहे.....अप्रतिम...लवकरात लवकर...करून बघितलाच पाहिजे ...

combination मस्त दिसतंय !! चिकन उचलून खाविशी वाटतेय !!

अनुप कुलकर्णी's picture

31 Dec 2012 - 1:18 pm | अनुप कुलकर्णी

परोठ्याची पाकृ इथे(http://www.misalpav.com/node/23555) दिलेली आहे!

तब्येतीनुसार बटर घाला ....

अस म्हणून आमच्या इच्छा आकांक्षांचा हिरेमोड करू नका..