चाळीची चिंता

भरत कुलकर्णी's picture
भरत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Dec 2012 - 7:00 am

अमुकराव: रामराम हो तमुकराव रामराम.

तमुकराव: हं. रामराम.

अमुकराव: काय हो, काय लई चिंतेत हाय काय? रामरामबी करूना वाटं व्हय?

तमुकराव: काय नाय हो. आपलं नेहमीचंच चाललंय.

अमुकराव: काही म्हणा तुमी तमुकराव, तुमचा चेहेराच सांगू र्‍हायलाय की कायतरी घडलंय म्हनून. कायतरी हाय तुमच्या मनात. काय आसंल तर सांगून टाका. मन मोकळं करा बघा.

तमुकराव: काय सांगायचं तुमाला अमुकराव. माझं दुख तुमाला सांगून कमी व्हनार हाय काय?

अमुकराव: आसं कसं? आवं जरी तुमी मला सांगीतलं तर म्या काय तुमचं दुख वाटून घेनार नाय पन त्या दुखातून बाहेर पडायचा कायतरी उपायतरी सापडल का नाय? सांगा सांगा. मनात काय ठिवू नका.

तमुकराव: अमुकराव, तुमाला माहीत हायेच की माझी पाटीलगल्लीमधी एक चाळ हाये अन त्यातल्या खोल्या भाड्यानं दिल्यात म्हनून.

अमुकराव: हां व्हय की. मलाच काय पन सार्‍या गावाला त्ये माहीत आहे की. आवं तमुकराव, जशे आमी या गावचे तशेच तुमी बी या गावचे. हाय का नाय? आख्या गावात पाटील गल्ली महत्वाची. आन त्याच गल्लीत ऐन मोक्याच्या ठिकानी, गल्लीच्या सुरवातीलाच तुमची चाळ हाय नव्ह. खाली सा आन वर सा आशी बारा बिर्‍हाडं र्‍हात्यात तिथं. नोकरी करनारं मास्तर, बँकेतलं सायब, झालंच तर एखांदा आटवडा र्‍हानारा तो सोन्याचा व्यापारी कनकभाय आसली संम्दी बिर्‍हाडं तिथं र्‍हात्यात हे ठाव हाय मला. का काय भांडन-बिंडन झालं का काय त्येंच्यात?

तमुकराव: नाय हो अमुकराव. भांडन-बिंडन काय नाय झालं.

अमुकराव: मंग काय नळाचं पानी येईना झालं तिथं का एखांद्या कंट्रक्शनवाल्यानं मोठी आफर दिली तुमाला?

तमुकराव: नाय हो तसंही काय नाय.

अमुकराव: मंग च्या मारी, हाये तरी काय भानगड म्हनायची?

तमुकराव: अमुकराव, कोनाला सांगू नका म्या काय सांगतो त्ये. त्याचं आसं हाय की, मागल्या वर्षी त्या चाळीमधली वरची कोपर्‍यातली खोली शेजारच्या गावच्या सरपंचाच्या पोराला भाड्यानं दिली व्हती. तेंच्या गावामधी कालेज नाही आन पोरगं एश्टीनं येवूनजावून थकतं व्हत आसं सांगत व्हता सरपंच तवा.

अमुकराव: हां हे खरं हाय. आख्ख्या पंचक्रोशीत आपल्या गावचं कालेज लई झ्याक हाय. अन शेजारपाजारच्या गावांची लई पोरं पोरी इथं शिकायला येत्यात हे पन खरं हाय. तमुकराव, काय पोरा पोरींची तर भानगड न्हाय ना चाळीत?

तमुकराव: ऐका तर खरं अमुकराव. तर ती खोली त्या सरपंचानं भाड्यानं घेतली. म्या चांगला अकरा म्हयन्याच्या करार करून घेतला. त्याच्यात लिवेलबी व्हतं की अकरा म्हयन्यानंतर त्यो गपगुमान खोली खाली करून दिल, भाडं येळच्यायेळी दिल म्हनून. मगच तिथं त्याचा पोरगा राहायला लागला. चांगलं चालू व्हतं.

अमुकराव: मग आता त्यो सरपंच खोलीचं भाडं देत नाही की काय? तसं आसंल तर डिपाजीट मधून काढून घ्या की आन द्या हाकलून त्याच्या पोराला.

तमुकराव: नाय हो तसं नाय. खरी भानगड पुढंच हाय. निट ऐका. झालं काय की त्यो भाडं बिडं येवस्थित टायमानं देत व्हता. पोरगं खोली बी झाडून पुसून झ्याक ठेवायचं. दोन म्हयन्यापुर्वी त्यानं तर खोलीच्या दरवाज्याची बिघडलेली कडीबी सवताच दुरूस्त करून घेतली आन माझ्याकडून पैसं बी घेतलं नाही.

अमुकराव: आरं वा. लईच चांगला भाडेकरू हाय की मग.

तमुकराव: गोम तर तिथंच हाय अमुकराव. गोष्ट ही की ती मोक्याची खोली त्या सरपंचाच्या नजरंत भरली बघा. आवं आता करार संपून मह्यना झाला. अकरा म्हयन्याचे बारा म्हयनं झालं तरीबी त्यो पोरगा खोली काय सोडत नाही बघा.

अमुकराव: आरं तिच्या मारी! आशी भानगड हाय काय. पन म्या काय म्हनतो तमुकराव, त्या पोराला कालेज संपल्यावर काय कोर्सबिर्स करायचा आसलं त्यामुळं त्यो जात नसंल खोली सोडून, काय? त्याच्या बाचं काय म्हनंन हाय? तुमी सपश्ट बोल्ला का त्या सरपंचाशी?

तमुकराव: बोल्लो, बोल्लो त्या सरपंचाशीबी बोल्लो का खोली रिकामी करुन टाका म्हनून. पन त्ये बेनं लय आगळं दिसतंया. लय रुबाबात बोलतंय. कालचं म्या चाळीवर चक्कर टाकली तवा त्याच्या खोलीच्या दरवाज्याला दोन दोन कुलपं लावलेली दिसली मला. एकदम हवेशीर खोली हाय ती कोपर्‍यातली. आख्खं गाव तिथंनं दिसतं. मला तर त्या सरपंचाचा डाव ध्यानात येवू र्‍हायलाय. त्याला ती खोली बळकवायची हाय आसं दिसतंय.

अमुकराव: आरारारा, हे तर लईच वंगाळ हाय बघा तमुकराव. म्हंजी खोली तुमची आन त्यो बसलाय तिथं आयत्या बिळावरल्या नागूबावानी.

तमुकराव: नाय तर काय अमुकराव. ती खोली कशी खाली करायची ह्या विचारानं तर माझं डोकं फुटायची पाळी आलीया. त्याचं त्ये वागनं पाहून बाकीच्या भाडेकरूंनीबी आसलंच काय केलं तर आख्खी चाळ माझ्या हातातून जाईल ना? उद्या समजा कोनबी उठंलं आन कुनाच्या भाड्याच्या घरात दोन दिस र्‍हायलं म्हंजे ते घर, ती जागा त्याची व्हती व्ह्यय?

अमुकराव: नाय नाय. तसं होवून उपेगाचं नाय. आवं ती चाळ म्हंजी तुमची रोजीच हाय की एकपरकारची. चाळ हातातून गेल्याली कसं चाललं? म्या काय म्हंतो, एखादा वकील गाठा आन द्या त्या सरपंचाला नोटीस पाठवून का तू खोली खाली कर म्हनून. नायतर आसं करा, डायरेक फौजदारी दाखल करा की त्यानं खोली खाली कराया नकार देत मारहाण केली म्हनून.

तमुकराव: आता आली का ती कोरटबाजी आन बारा भानगडी? चांगलं चाल्ल व्हतं तर ह्या सरपंचानं चालत्या गाडीत खुट्टा घातला बघा.

अमुकराव: नाय तर काय? बरं काय समजूतीचं बोल्ला का तो सरपंच?

तमुकराव: काय नाय हो. खोली उद्या खाली करतो, परवा खाली करतो, आज काय आमुशा हाय, उद्याला काय चांगला मुहूर्त नाय आसलं कायबाय कारणं सांगून टंगळमंगळ चालवली हाय बघा त्यानं. मागच्या आठवड्यात तर त्याच्या पोरानं मित्र म्हनून चार पाच पैलवान गडीबी आनले हाय तिथं राहायला. म्हंजी आता आली का तोडाफोडी?

अमुकराव: म्या काय म्हंतो तमुकराव, तुमीच काय आता ते समजूतीचं बोलनं करा अन काढून टाका त्याला त्या खोलीबाहेर. झालंच तर डिपाजीट बरूबर काय समजूतीची रक्कमबिक्कम देवून टाका त्या सरपंचाला. काय?

तमुकराव: हा. आता त्योच एक मार्ग दिसतो बघा. पन एक हाये अमुकराव, चांगल्याची दुनीया नाही ही. म्या रहायला जागा दिली अन आख्खी खोलीच बळकवायला निघाला बघा तो सरपंच.

अमुकराव: हा ह्ये बाकी खरं बोलला तुमी तमुकराव. ही दुनीया चांगल्याची न्हायी हे तितकंच खरं हाय. चला लई येळ झाला. शेतावर जायचं हाय. आजकाला थंडी लय पडू र्‍हायलीया. द्राक्षबागंत रसायन फवारायला जायचं हाय. निघतो आता. तुमी काय धिर सोडू नका म्हंजे झालं. येतो आता. रामराम.

तमुकराव: हां. म्या बी निघतो आता. मलाच कायतरी कराया पाह्यजे. रामराम.

राहणी

प्रतिक्रिया

पैसा's picture

17 Dec 2012 - 8:29 pm | पैसा

भरतराव, त्यास्नी खोली आवाडली की देऊन टाकावी लागतीय गपगुमान. खोलीवर भागलं तं नशीब समजायचं वो!