आमच्या त्सेंटाआजीची मैत्रिण ख्रिस्टिन.. तिच्याकडे गेलेलो असताना तिने हा केक खिलवला.. केकचे नाव आणि रेसिपी विचारल्यावर ती हसायलाच लागली. ह्या केकचे नाव फाउलं वायबर कुकन म्हणजे आळशी बायकांचा केक!
तिची रेसिपी घेऊन घरी आलो आणि अज्जिबात आळशीपणा न करता मी आणि आजीने हा केक करायचा घाट घातला.
आणि माझ्या अमृतमहोत्सवी पाकृ साठी ही केकृ निवडली-
साहित्य-१)बेससाठी:
२०० ग्राम मैदा,७५ ग्राम साखर,७५ ग्राम बटर,१ अंडे,१ टीस्पून बेकिंग पावडर
२)सरफेससाठी:
५०० ग्राम मागरक्वार्क/ लो फॅट चक्का, २अंडी, १५० ग्राम साखर, १ पाकिट वॅनिला पुडिंग पावडर, १०० ग्राम साउअर क्रिम/ष्मांड, १/२ कप सनफ्लॉवर तेल, १ ते १.५ कप दूध, चिमूटभर मीठ, १ चमचा आयसिंग शुगर/सानंष्टाइफ
३)टॉपिंग साठी:
साधारण १ वाटी भरुन टिन्ड अॅप्रिकॉट/प्लम/संत्री (ह्यापैकी जे आवडेल/उपलब्ध असेल ते)
कृती-
बेससाठीचे साहित्य म्हणजे मैदा+बेकिंग पावडर,साखर,बटर,अंडे एकत्र करणे व चांगले मळणे.कणकेप्रमाणे गोळा तयार होईल.
मळताना पाणी/दूध याची गरज नाही. अंडे आणि बटरमधील स्निग्धतेने मळले जाते.
हा गोळा फ्रिजमध्ये ४५-५० मिनिटे ठेवणे.
टिनमधील फळे चाळणीवर घालून ठेवणे म्हणजे पाक निथळून जाईल.
अवन १८० अंश से.वर प्रिहिट करणे.
क्वार्क,अंडी,साखर एकत्र करणे व चांगले फेटणे व ते ५ मिनिटे तसेच ठेवणे व नंतर त्यात वॅनिला पुडिंग पावडर, तेल, दूध,साउअर क्रिम असे एक एक घालून बिट करत राहणे.चिमूटभर मीठ घालणे.
मिश्रण पातळ आहे असे वाटेल परंतु बेक केल्यावर ते घट्ट होते.
फिजमधील गोळा बाहेर काढून तो केकमोल्डवर पसरणे,फक्त तळाशी न पसरता कडांपर्यंत नेणे म्हणजे केकमोल्डच्या आत मैद्याचा जणू एक मोल्डच तयार होईल.
ह्यावर आयसिंगशुगर भुरभुरणे म्हणजे घालायच्या मिश्रणातील रस बाहेर येत नाही.
मघाचचे क्वार्क,वॅनिला पुडिंगपावडर इ.चे मिश्रण आता यावर ओतणे.
त्यावर चाळणीवर घातलेली फळे लावणे.(आम्ही अॅप्रिकॉट वापरले आहेत,पण मी वर म्हटल्याप्रमाणे संत्री,प्लम्स असे इतर जे फळ उपलब्ध असेल ते आपण वापरु शकतो)
१८० अंश से वर प्रिहिटेड अवन मध्ये ५०-५५ मिनिटे बेक करणे.
आणि.. एवढ्या खटाटोपाच्या केकृला आळशी बायांचा केक का म्हणतात? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळते का ते केक तयार होईपर्यंत शोधायचा प्रयत्न करणे.
प्रतिक्रिया
6 Oct 2012 - 7:01 pm | सस्नेह
आळशाचे काम नक्कीच नोहे...!
6 Oct 2012 - 7:13 pm | खादाड
आळशी बायकांचा ??? पण नाव मजेदार आहे :)
6 Oct 2012 - 7:43 pm | सहज
सुंदर फोटो!
6 Oct 2012 - 8:13 pm | रामदास
जीवघेणा केक आणि कातील फोटो
Mörder Kuchen tödlichen foto tropft Speichel
(बादलीभर लाळ याचे भाषांतर काय असावे ?)
6 Oct 2012 - 8:32 pm | सुनील
गूगल ट्रान्सलेटर म्हणतोय - Deadly killer cake photo dripping saliva ;)
केक झकासच!
बाकी हे असलं नाव देणर्याच्या विनोदबुद्धीची कमाल आहे!
6 Oct 2012 - 8:19 pm | रेवती
अमृतमहोत्सवी पाकृ अगदी साजेशीच आहे. अभिनंदन!
फोटू इतका मस्त रंगीबेरंगी आलाय आणि कृती तशी थोडा वेळ घेणारी आहे असे वाटले.
याला आळशी बायकांच्या केकाची उपमा का द्यावी?
थोडा चीजकेकची आठवण करून देणारा आहे असे वाटते.
7 Oct 2012 - 12:10 am | प्रभाकर पेठकर
कारण उत्साही बायका लगेच आपल्या आवडत्या सुपरमार्केटला (कितीही लांब असलं तरीही) जातात आणि आवडीचा केक आणतात. आळशी बायकांना ते, कपडे बदला, चपला घाला, गाडी काढा, नसेल तर सरकारी प्रवासी वाहतूक व्यवस्थेची वाट पाहा, सुपरमार्केटला जा, अनेक केक्स मधून आवडीचा (आणि स्वस्त) केक निवडा, कॅशियर समोरच्या रांगेत उभे राहून बिल भरा आणि पुन्हा पारतण्याचा सर्व सोपस्कार करा ह्या सर्वाचा अत्यंत 'आळस' असतो. म्हणून त्या कुठेही न जाता घरच्या घरीच असेल ते सामान वापरून (अॅप्रिकॉट, ऑरेंज इ.इ.) घरच्या घरीच केक बनवितात.
म्हणून 'आळशी' बायकांचा केक.
7 Oct 2012 - 2:12 am | रेवती
हे मात्र पटले. आता हा केक करायलाच हवा. ;)
8 Oct 2012 - 1:01 am | साती
पटलं.
6 Oct 2012 - 9:05 pm | जाई.
झकास!!!!!!!!!
6 Oct 2012 - 10:19 pm | अभ्या..
अगागागा
फोटो वरच फिदा.
6 Oct 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा
बाप...रे....! हा आळशी...मग कार्यरत कुठला?????????
क्येक भारी हाय हां पण...! :-)
6 Oct 2012 - 11:27 pm | गणपा
हे केक आयते कधी चापायला मिळणार?

7 Oct 2012 - 12:43 pm | लॉरी टांगटूंगकर
नीट बोलता न येणाऱ्या लहान बाळाच्या तोंडातून आलेले शब्द वाटत आहेत फाउलं वायबलं कुकन.
6 Oct 2012 - 11:50 pm | मालोजीराव
हा आगळावेगळा केक आवडण्यात आला आहे, या पाक्रु मुळे बायकान्चा आळस झटकला जाइल याची खात्रि वाटते.
7 Oct 2012 - 12:27 pm | प्रभो
मस्तच!!
7 Oct 2012 - 5:40 pm | चतुरंग
माझ्या जिभेने आणि तोंडाने आळस लग्गेच झटकला!! ;)
(स्वातीतैच्या केकावलीचा चाहता)केकरंग
7 Oct 2012 - 6:25 pm | अत्रुप्त आत्मा
@ केकावली >>> --^--^--^--
15 Oct 2012 - 2:24 pm | बॅटमॅन
+१. असेच म्हणतो.
(उत्तम वाङ्मय आणि उत्तम खाद्याचा मनापासोनचा चाहता) बॅटमॅन.
7 Oct 2012 - 10:53 pm | सानिकास्वप्निल
भन्नाट पाकृ आणी केक :)
8 Oct 2012 - 6:39 am | स्पंदना
आई ग तेव्हढा कट केलेला भाग कोणी खाल्ला?
स्वतः तू असशील तर ठिकाय, पण दुसर्या कुणी खाल्ला असेल तर....पोटात दुखो त्यांच्या.
8 Oct 2012 - 8:34 pm | यशोधरा
अगदी, अगदी!
8 Oct 2012 - 8:48 am | नंदन
पाकृ आणि नाव, दोन्ही मस्त. इतकी साग्रसंगीत कृती असणार्या केकचं असलं फाऊल नाव म्हणजे Antiwitz चा प्रकार दिसतोय :)
8 Oct 2012 - 11:04 am | ५० फक्त
माझ्या १३च्या नैवेद्याच्या यादीत अजुन एक भर..
8 Oct 2012 - 2:05 pm | मृत्युन्जय
मी केक पाहिला नाही मी प्रतिक्रिया देणार नाही. :)
अवांतरः जीव गेला हो स्वाती तै फटु बघुन :)
8 Oct 2012 - 2:18 pm | मेघवेडा
फाऊल फाऊल! याला आबांचा केक म्हणणं हा फाऊल आहे! :)
8 Oct 2012 - 6:09 pm | कवितानागेश
काय खतरनाक फोटो दिसतोय...
नवर्याला दाखवते. कदाचित त्याच्या मदतीनी थोडा आळशीपणा करता येइल! ;)
-(अतिउत्साही) माउ
8 Oct 2012 - 7:48 pm | पैसा
फोटो बघूनच मेले. जिवात जीव आला की पाकृ वाचेन म्हणते!
8 Oct 2012 - 8:31 pm | मदनबाण
वा ! :)
केकची महापर्वणी = स्वातीताई ! :)
8 Oct 2012 - 8:35 pm | यशोधरा
स्वातीतै, तुला केकसम्राज्ञी ही पदवी बहाल करण्यात येत आहे!
8 Oct 2012 - 10:19 pm | बिपिन कार्यकर्ते
नको देवराया.... इ.इ.
8 Oct 2012 - 10:19 pm | स्मिता.
माझा आधीचा प्रतिसाद कुठे गेला? असो.
केक पुन्हा पुन्हा बघूनच पोट भरून घेते. माझ्या सारख्या आळशी व्यक्तीला असा केक करणंही होणार नाही, असा आयता समोर हवा ;)
9 Oct 2012 - 4:04 am | धनंजय
फावल्या वायफळ कुककुक चिडवणार्या क्यालरी...
पण दिसायला भारी. चाखायलाही छानच असणार.
10 Oct 2012 - 4:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
असले फोटो म्हणजे मी पण स्वयंपाकघरात पाऊल टाकायचं? केवढं पाप घडतंय स्वातीताई तुझ्या हातून!
10 Oct 2012 - 5:41 pm | ऋषिकेश
आज जळून जाण्याचा / जीव जाण्याचाही (तुमचा घेण्याचा) अमृत महोत्सव म्हणायचा! ;)
10 Oct 2012 - 7:13 pm | Pearl
मस्तच... तों.पा.सू.
अंडे न घालता करता येईल का हा केक.
11 Oct 2012 - 7:35 am | पाषाणभेद
आलाच आलाच अंड्याचा उल्लेख आलाच.
13 Oct 2012 - 11:47 am | सुहास..
जबराट !!
14 Oct 2012 - 9:36 pm | इन्दुसुता
चला.. आता येथे कुणीतरी आळशी शोधणे आले ( मी बाई आहे, पण आळशी नाही .. आळशी पुरुषाने केलेला चालत असावा असे गृहीत धरले आहे).
बाकी पाकॄ आवडली, रेवतीने म्हटल्याप्रमाणे चीजकेकची आठवण झाली.
14 Oct 2012 - 9:39 pm | इन्दुसुता
एक राहीलच की हो... अमृतमहोत्सवाच्या अनेक शुभेच्छा.