हालसातवाहनाची गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in विशेष
24 Sep 2012 - 7:42 am
श्रीगणेश लेखमाला २०१२

हालसातवाहनाची गाथासप्तशती - महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य.

१९७१ साली एका महाविद्यालयात मित्राला भेटायला गेलो होतो. नुकताच मॅट्रीक होऊन कॉलेजला प्रवेश घेतला होता. अभ्यासाच्या नावाने बोंब असल्यामुळे अवांतर वाचनाच्या सगळ्या सीमा पार केल्या होत्या. फ्रॅंझ काफ्का, मार्क्स, हेमिंग्वे, स्टाईनबेक, विल्यम शिरर, जे. कृष्णमूर्ती, आणि असे अनेक लेखक ज्यांच्या लेखनावर चर्चा करत ही वर्षे गेली. त्या वर्षांचे आभार कसे मानावेत हे मला कळत नाही..... असो. मी या महाविद्यालयाबद्दल बोलत होतो. या माझ्या मित्राला त्यांच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा भयंकर अभिमान होता. ते मी बघावे अशी त्याची त्या काळात फार इच्छा होती. ताजमहाल बघायला जाणार्‍याच्या मनात काय उत्कंठा असावी त्यापेक्षाही जास्त उत्कंठतेने मी त्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पाऊल टाकले आणि माझी छाती दडपून गेली. जे माझ्या स्वप्नातही बघणे शक्य नव्हते अशी ती ग्रंथसंपदा बघून माझे मन तृप्त झाले.
“हे तर काहीच नाही. आपल्याला अजून सगळ्यात वरच्या मजल्यावर जायचे आहे” मित्र म्हणाला. आता अजून काय बघायला मिळणार या उत्सुकतेने मी त्याच्या मागोमाग जिना चढायला लागलो. जिना अर्थातच लाकडी, कुरकुरणारा. जसे जसे आम्ही वर जाऊ लागलो तसे धुळीचे साम्राज्य दिसू लागले. शेवटी पोहोचल्यावर तर धुळीशिवाय काही दिसेना. नीट बघितल्यावर त्याच्या खाली लपलेली असंख्य पुस्तके मला दिसली.

“चायला, हे रे काय ? ही अवस्था?” मी म्हटले.

“तुला हस्तलिखिते बघायची होती ना ? चल जरा त्या टोकाला जावे लागेल” मित्र म्हणाला.

त्याने पुढे पाउल टाकले आणि माझ्या लक्षात आले की तो पुस्तकांवरून चालतोय. पण दुसरा मार्गच नव्हता. त्या मजल्यावर या टोकापासून ते त्या टोकापर्यंत पुस्तकेच पुस्तके जमिनीवर पसरून पडली होती. ज्या पुस्तकावर त्याचा पाय पडला होता ते मी झटकून उचलले आणि बघितले तर ते होते “हालसातवाहनाची गाथा सप्तशती” लेखक होते श्री. जोगळेकर. या गाथेबद्दल पूर्वी कोणाकडूनतरी एकले होते. या जाडजूड पुस्तकातून चांगली माहिती मिळेल या आशेने ते उचलले आणि मित्राच्या नावावर ते नोंदवून पुण्याला घेऊन आलो. दुर्दैवाने त्याने या जगातून दोन महिन्यानेच एक्झीट घेतली आणि ते पुस्तक माझ्याकडे तसेच राहिले. नंतर जवळ जवळ सात आठ वर्षाने मी ते वाचायला काढले तेव्हा अर्थातच मनात मित्राच्या आठवणी दाटल्या होत्या पण त्याहूनही आपण काहीतरी वेगळेच वाचतोय हीही भावना मनात येत होती. पुस्तक वाचून झाल्यावर सातवाहनांवर बरेच वाचून काढले पण त्या बद्दल परत केव्हातरी. आज आपण या गाथेबद्दल वाचणार आहोत.

सत्त सताइं कईवच्छलेण कोडिअ मज्झाअरैम्मि ।
हालेण विरईआइं सालंकाराणँ गाहाणम् ॥

जमलेल्या एक कोटी गाथांमधून सर्वोत्कृष्ट, अलंकाराने नटलेल्या सातशे गाथा निवडून हालाने हा ग्रंथ रचला असा अर्थ या वरील गाथेचा किंवा ओवीचा होतो. या कोटी गाथा त्याने का जमविल्या व कशा जमवल्या असतील हे त्यालाच ठावूक. पण त्याबद्दल एक दंतकथा नंतर लिहिलेल्या अनेक टीकांमधून सापडते. हालाला विद्वत्तेचे भयंकर आकर्षण होते. त्याची एक चंद्रलेखा नावाची पट्टराणी होती. तिच्या समवेत तो एकदा जलक्रिडा करत असताना त्याने राणीच्या अंगावर पाणी उडवले. ते बघून राणीने त्याला संस्कृतमधे पाणी न उडविण्याची विनंती केली त्यात तिने मोदकै: हा समास वापरला होता. त्याचा अर्थ न कळून हालाने तिच्या समोर मोदक आणून हजर केले. ते बघून राणीने इतर राण्यांच्या समोर हालाचा उपहास केला. रागावून हालाने सरस्वतीची आराधना केली व ती प्रसन्न झाल्यावर तिच्याकडे जो वर मागितला तो भन्नाट होता. त्यात त्याने स्वत:च्या उपहासाचा बदला तर घेतलाच पण अशी परिस्थिती परत कोणावर ओढवू नये याचीही काळजी घेतली. त्याने वर मागितला “ माझे सर्व प्रजाजन हे कवी व सुशिक्षित होऊ देत” देवीचाच वर असल्यामुळे एक कोटी का दहा कोटी कवी त्याच्या राज्यात निर्माण झाले. त्यांच्यासाठी हालाने राज्यात दवंडी पेटवून त्यांना कविता लिहायचे आव्हान केले व त्यासाठी मानधनही जाहीर केले. त्यामुळे या एक कोटी गाथा जमा झाल्या. त्या वाचून हालाने त्यातील उत्कृष्ट अशा सातशे निवडल्या. अर्थात सगळ्यांनाच काहीना काहीतरी बक्षिस देण्यात आले. ही दंतकथा सोडल्यास हालाने त्याला संस्कृत व्याकरण शिकवण्यासाठी दोन थोर शिक्षकांची शिकवणी लावली होती व त्याने राज्यात दवंडी पेटवून काव्य सादर करण्याचे आवाहन केले होते हे सत्य आहे. त्या शिक्षकांची नावे आपल्याला माहीत असतील. एक होता गुणाढ्य तर दुसरा होता शर्ववर्मा. शर्ववर्म्याने हे काम सहा महिन्यात संपविल्यामुळे त्याला कच्छची सुभेदारी बक्षिस देण्यात आली असा उल्लेख कथासरित्सागरात आला आहे. जर तुम्ही या सर्व गाथा वाचल्यात तर तुम्हाला अजून एका काव्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ते म्हणजे जगप्रसिद्ध “मेघदूत”. या गाथांमधील अनेक कल्पनांचा उल्लेख आपल्याला मेघदूतात आढळेल. याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा हे मी वाचकांवर सोडतो.

इतिहासात अनेक देश विदेशात राजांनी, सम्राटांनी आपल्या पदरी भाट बाळगले होते. राजकवी, राजगायक, राज जोतीष, राज नर्तिका इत्यादी पदे निर्माणकरून कलांना राजाश्रय देण्यात येई. पण सर्वसामांन्यांच्या कलेला किंवा प्रतिभेला उत्तेजन देण्यासाठी हालाने जी युक्ती वापरली त्याचे हे उदाहरण एकमेवच असेल. सातव्या शतकाच्या पहिल्या भागात होऊन गेलेला महाकवि बाणभट्ट आपल्याला माहितीच आहे. त्याच्या हर्षचरित्रात या गाथांचा उल्लेख केलेला आहे तो मोठ्या कौतूकाने...

अविनाशिनमग्राम्यमकरोत्सातवाहन: ।
विशुद्धजातिभि: कोशं रत्नेरिव सुभाषितै:

याचा स्वैर अर्थ होतो –ज्या प्रमाणे एखादा राजा आपल्या प्रजेकडून न संपणारा निधी गोळा करतो त्याप्रमाणे सातवाहन राजाने अत्यंत विशूद्ध जातिछंदात रचलेली ही सुभाषिते गोळा केली व त्यांचा एक कोश रचला. किती खरे आहे... एकवेळ राजाचा खजिना संपेल, त्याच्या खजिन्यातील रत्ने संपतील पण या सुभाषितांच्या रत्नांचा खजिना या जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. हे आपल्या येथे (भारतात) अनेक ग्रंथांच्या बाबतीत सिद्धही झाले आहे.

सर्वसामान्यांकडून जमा झालेल्या या गाथांची भाषाही त्यामुळे सर्वसामान्यांचीच आहे. त्या काळात महाराष्ट्रात महाराष्ट्री प्राकृत ही भाषा बोलली जात असे. संस्कृत व आत्ताची मराठी यामधे कुठेतरी ही भाषा आहे असे मानायला जागा आहे. पण एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे प्राकृत ही अत्यंत गोड व मधाळ भाषा आहे. उदाहराणार्थ वर दिलेली किंवा कुठलीही गाथा आपण जर वाचून बघितली तर आपल्याला आढळेल की आपल्या वाणीतील कठोर शब्द, हेल नाहीसे झाले आहेत. उत्तरेतील हिंदी व ब्रज भाषा यामधेही हाच फरक आहे. दुर्दैवाने/सुदैवाने मराठीने संस्कृतची कास धरली म्हणून तीही तिच्या सारखी आघातप्रिय, कठोर भाषा झाली. जर मराठीने प्राकृताची कास धरुन आपला प्रवास केला असता तर मराठी आज आहे त्याहूनही गोड झाली असती. अर्थात त्यात एक तोटा झाला असता तो म्हणजे मराठी शिव्यांचा दरारा लोप पावला असता. :-)
.
ख्रि.पू. दुसर्‍या शतकात पतंजलिच्या प्रेरणेने पुष्यमित्र शुंग व पहिला सातकर्णी यांनी बौद्ध पण परकीय मिनॅंडरचा पराभव केला. ख्रि.पू. पहिल्या शतकात दुसर्‍या सातकर्णीने माळव्यात प्रस्थापित झालेल्या शकांचा नाश केला. याच काळात प्रबळ झालेल्या सातवाहनांनी प्राकृत भाषेचा पुरस्कार केला व महाराष्ट्री प्राकृत उदयास आली असे म्हणायला हरकत नाही. या भाषेला महाराष्ट्री प्राकृत म्हणायचे मुख्य कारण म्हणजे यात बरेच देशी शब्द आहेत जे इतर ठिकाणी बोलण्यात येणार्‍या प्राकृतात सापडत नाहीत.

श्री जोगळेकरांच्या मते प्राकृतात प्रचलित असलेल्या शब्दांचे तीन गट पडतात. एक म्हणजे संस्कृतातून तसेच्या तसे उचलले शब्द, दुसरा म्हणजे काही सुधारणा होऊन आलेले शब्द. या सुधारणा म्हणजे बहुतेककरून जोडाक्षरे काढून शब्दोच्चारात सुलभता आणणे या होत्या. तिसरा गट आहे देशी शब्दांचा. याचा संस्कृतशी काहीही संबंध नाही. अर्थात काळाच्या ओघात दोन्हीही भाषांचा एकामेकांवर प्रभाव पडत गेला त्यांच्यात दुसर्‍या भाषेचे शब्द विपूलतेने आढळू लागले. हॉलमधे आपण आपल्या बायकोला हाका मारतो व शयनगृहात हाका मारतो यात जो फरक आहे तो संस्कृत व प्राकृतात आहे. एक व्यवहार, परक्यांशी संवाद साधण्यासाठी वापरली जायची तेव्हा ती रोखठोकच असायची. दुसरी आपल्या लोकात प्रेमाने संवाद साधाण्यासाठी त्यामुळे ती मृदू, कमी त्रास देणारी इ... अशीच असणार. प्राकृत भाषेबद्दल वाक्पतिराजाने काय म्हटले आहे ते बघुया –

णमवत्थ-दंसणं संनिवेस-सिसिराओ बंध-रिद्धैओ ।
अविरलमिणमो आभुवन-बंध्मिह णवर पययम्मी ॥

सयलाओ इमं वाया विसन्ती एत्तो य णेन्ति वायाओ ।
एन्ति समुद्दंचिय णेन्ति सायराओच्चिय जलाइं ॥

हरिस विसेसो वियसवओ य मऊलावओ य अच्छीण ।
इह बहि-हुजो अन्तो-मुहो य हिययस्स विप्फुरई॥

“अभिनव आशय, समृद्ध रचना आणि मृदु शब्दमाधुर्य या बाबतीत प्राकृत सर्व भाषेत श्रेष्ठ आहे. जल हे सागरापासून निर्माण होते व ते सागरालाच जाऊन मिळते त्या प्रमाणे सर्व भाषा प्राकृतातूनच निर्माण झाल्या आहेत व प्राकृतातच विलीन होतात. प्राकृतातून मनाला अनिर्वचनीय आनंद होतो, आनंदाने नेत्र विकसित होतात (विस्फारले जातात) व तृप्तीने मुकुलित ही होतात (मिटतात).”

या गाथा सम्राट हाल याच्या राज्याच्या अनेक विभागातून आल्या असल्यामुळे यात त्या राज्यांच्या विवीध भागातील लोकजीवनाचे प्रतिबंब पडते. त्या भागात कसली झाडे आहेत, कुठल्या नद्या आहेत, घरे कशी आहेत, कुठले पर्वत आहेत, तेथे रहाणार्‍या जनतेची वस्त्रे, तेथे मिळणारी विविध प्रकारची मद्ये, त्याचा परिणाम, एवढेच काय काही कॉकटेल्सचीही माहिती मिळते. त्यातील जी माहिती संकलीत करण्यात यश मिळाले आहे त्याबद्दल आपण वाचणार आहोतच..या गाथा हालाने संकलित केल्या इ.स. २१ ते ४५ साली. म्हणजे जवळ जवळ दोन हजार वर्षापूर्वी महाराष्ट्रात सामान्य जनतेचे आयुष्य कसे होते, कपडे कसे होते, त्यांची करमणूकीची साधने कुठली होती, त्या काळी कुठले पक्षी प्राणी होते अशा अनेक गोष्टींबद्दल माहिती देणारा हा एकमेव ग्रंथ आहे. एखाद्या राज्यातील सगळ्या प्रदेशातील माहिती गोळा करण्याची ही युक्ती हालाने वापरली त्यामुळे आपल्याला त्या काळात वावरता येते...............

गाथेची सुरवात शंकराला नमन करून केली आहे..

पसुवईणो रोसारूणपडिमासंकन्तगोरिमुहन्दम ।
गहिअग्धापङ्ग्कअं विअ संझासलिलंजलिं णमह ॥

मावळत्या सूर्याला अर्ध्य देण्यासाठी पशूपतीने ओंजळीत पाणी घेतले आहे. आकाशातील तांबड्या रंगाच्या उधळणीमुळे त्याच्या हातातील हे पाणी लाल दिसत आहे अशा पशूपतीला नमन असो.

देवाला नमन करून झाल्यावर लगेचच दुसर्‍या गाथेमधे ज्या भाषेत या गाथा तयार झाल्या आहेत त्या प्राकृत भाषेचे उपकार स्मरून तिची थोरवी गायली आहे. सामान्य माणसांनी या गाथा रचल्या आहेत याचे अजून एक उदाहरण. खेडेगावातील सामान्य माणूस सभ्यतेचे अवडंबर न माजवता स्वत:च्या गोष्टींची थोरवी सांगताना दुसर्‍याचा कमीपणा दाखविल्याशिवाय रहात नाही. तसेच येथेही दिसून येते –

अमिअं पाउअकव्वं पढिउं सोउं अजे ण आणन्ति।
कामस्य तत्त्तन्तिं कुणन्ति ते कहॅंण लज्जन्ति ?॥

अमृतासारखे प्राकृत काव्य वाचणे किंवा त्याचे श्रवण करणे ज्यांना माहीत नाही
ते कामशास्त्रातील तत्वांची मात्र जोरजोरात चर्चा करत असतात. असे करताना त्यांना लाज कशी वाटत नाही ? थोडक्यात काव्यशास्त्राचा आनंद घेण्यासाठी प्राकृत साहित्याचा उपभोग घ्यायचा सोडून हे पंडीत कामशास्त्राकडे वळतात याची त्यांना लाज का वाटत नाही ? (हे कामशास्त्रांवरचे ग्रंथ रचणार्‍यांना उद्देशून असावे) कामक्रिडे इतकाच आनंद प्राकृत साहित्य देते हे यांना ठावूक नाही का ?

त्या काळी म्हणजे दोन हजार वर्षापूर्वी समाजाचे सामाजिक नियम शृंगार व नितीमत्तेच्या बाबतीत बरेच सैल असावेत. आपल्याला याची उदाहरणे बर्‍याच नंतरच्या काळातील देवळातील कामशिल्पे देतातच. याही गाथेत त्या सैल असलेल्या बंधनांचे प्रतिबिंब आपल्याला पडलेले दिसेल. उदाहरणार्थ स्त्रियांनी पुरषांची त्याच्या बायकोवरून केलेली चेष्टा इ.इ. किंवा विवाहीत स्त्रीने लग्नानंतर आवडत्या पुरूषाबरोबर संबंध ठेवणे...मैत्री ठेवणे या सगळ्या गोष्टींना मर्यादेपर्यंत मान्यता होती असे दिसते. (१९६९ साली मी इगतपूरी ते जून्नर असा दहा दिवसाचा एक ट्रेक केला होता, त्या वेळी एका आदिवासी पाड्यात आमचा मुक्काम पडला होता. सकाळी पाणवठ्यावर आम्हीही पाणी भरायला गेलो असताना तेथे एका नवीन लग्न झालेल्या मुलाची तेथील मूलींनी जी चेष्टा मस्करी चालवली होती ती अश्लिल तर होतीच पण मला जाणवले की ते सगळे त्याचा मोकळेपणाने आनंद घेत होते. ) मद्यपान तर सर्वचजण करत असत. स्त्रियांना गोड मद्य आवडत असे तर पुरषांना कडक.. अशा अनेक गोष्टींवर या सामान्य जनतेने लिहिलेल्या गाथा प्रकाश टाकतात. आता आपण गाथेतून काय माहीती मिळते ते बघू... जेथे अत्यंत चांगल्या गाथा किंवा मजेदार गाथांचा उल्लेख असेल त्या गाथाही अर्थासहित येथे द्यायचा प्रयत्न करेन.

या प्रकारच्या गाथा जेव्हा नंतरच्या काळात टिकाकारांच्या हातात पडल्या तेव्हा हालाच्या या कल्पनेची टिंगल टवाळी झाली. काही ज्ञानी मंडळी या गाथांना अश्लील, साहित्यिक दर्जा नसलेली कलाकृती मानायला लागली. अर्थात ते तसे नाही हे आपल्या पूढे वाचल्यावर लक्षात येईलच..............

श्री. जोगळेकरांनी त्यांच्या पुस्तकात सर्व गाथांचा अभ्यास करून प्रत्येक गाथेमधील वेगवेगळ्या गोष्टींच्या उल्लेखांचे वर्गीकरण करून त्यावेळच्या परिस्थिवर प्रकाश टाकून एक अवाढव्य काम केले आहे असेच म्हणावे लागेल. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात ते काही खोटे नाही. “गाथांनी मला झपाटून टाकले. गाथेशिवाय त्या काळात माझ्या मनात दुसरा कुठलाही विचार येत नसे ना मला तहान भूकेची जाणीव होत होती”...खरेच त्यांनी असे काम केले म्हणून आपल्याला हा खजिना मोकळा झाला नाहीतर त्या गाथांवर काळाची धूळ जमा झाली असती व वर्तमान काळात आपल्या सारख्यांना ती झटकणे अशक्य झाले असते.

त्या काळात कुठल्या नद्या होत्या किंवा वहात होत्या ते अगोदर बघूया. नद्या या कुठल्याही संस्कृतीच्या जीवनदायी असतात त्यामुळे त्यांचा उल्लेख महत्वाचा ठरतो.
गिरिनदी : या नदीचा उल्लेख गिरिणई म्हणून आला आहे.
गोदावरी या नदीचा उल्लेख गोआअरी, गोदा, गोला, गोलाई इत्यादी नावाने झालेला दिसतो. सातवाहनांना या नदीचे महत्व वाटत होते यात काही आश्चर्य नाही कारण त्यांची राजधानीच या नदीच्या किनारी वसलेली होती. या नदीकिनारी नाशीकच्या डोंगराळ भागात सिंहाची वस्ती आहे असेही उल्लेख सापडतात. तापी व नर्मदा नदीचाही उल्लेख काही गाथांमधे सापडतो. एका गाथेमधे मुरला नावाच्या नदीचा उल्लेख सापडतो पण ती कुठे होती याचा पत्ता लागत नाही. यमुनेचाही ओझरता उल्लेख सापडतो.
नदी म्हटली की नदी किनार्‍यावर फिरायला जाणारे प्रियकर प्रेयसी आपल्याला बर्‍याच कथा कादंबर्‍यात आढळतात. येथेही ते दोघे गोदावरी काठी फिरायला गेले आहेत व तेथे जे झाले त्याचा त्यांना कधीही विसर पडणार नाही...काय झाले असावे बरे....

गोलाविसमोआरच्छलेण अप्पा उरम्मि से मुक्को ।
अणुअम्पाणिद्दोसं तेण वि सा आढमुवऊढा ॥

गोदावरीचे पात्र ओलांडताना बिचारीची त्रेधातिरपीट उडाली. उतारावर घसरताना सावरण्याच्या निमित्ताने तिने त्याच्या छातीवर भार टाकला. तिची ती त्रेधातिरपीट उडालेली बघून केवळ अनुकंपेने त्याने तिला हात दिला पण पुढे नाईलाजाने त्याने तिला तेथेच अलिंगन दिले. पण तो खरोखरच निर्दोष आहे.

गाथासप्तशतीमधे नद्यांप्रमाणे पर्वतांचेही उल्लेख सापडतात त्यात मंदर पर्वत (ज्याच्यावर कुबेराचे घर आहे), मलय पर्वत म्हणजे सह्याद्रीचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग, विंध्य पर्वताचा उल्लेख तर अनेक गाथांमधे आला आहे. एखाद्या पर्वताचा उल्लेख बघू. खालील गाथेत विंध्य पर्वताचा उल्लेख सापडतो-

सव्वत्थ दिसामुहपसॉरिएहिं अण्णोण्ण्कडअलग्गेहिं ।
छल्लिं व्व मुअइ विञ्झो मेहेहिं विसंघ्हडन्तेहिं ॥

या गाथेत पावसाळ्याअगोदर जे घनदाट ढग आकाशात गर्दी करतात त्याला या कवीने विंध्य पर्वताच्या वल्कलांची उपमा दिली आहे. नाणे घाटात पावसाळ्याच्या अगोदर दोन तीन दिवस जर तुम्ही बसलात तर खालून वर येणारे ढग त्या काळ्या कातळावर आपटून त्याचे तुकडे होताना आपल्याला दिसतील तसेच विंध्य पर्वतावर व एकामेकांवर आपटून त्या काळ्या मेघाचे तुकडे होत आहेत जणू विंध्य पर्वताने आपली वल्कले सोडून ठेवली आहेत. ( आणि तो नवीन वल्कले परिधान करायची तयारी करत आहे, नवीन हिरवळ, पालवी इत्यादी.....)

गाथासप्तशतीमधे वृक्षांचा उल्लेख बर्‍याच गाथेत आहे ते नैसर्गिकच म्हटले पाहिजे कारण तेथे रहाणार्‍या गिरिजनांनीही या उपक्रमला काव्ये पाठविली असणारच. अशोक, आंबा, एरंड, कदम्ब, कमळ, करंज, कवठ, काश (गवताचा एक प्रकार), कुटज, कुंद, कुरबक, कुसुम्ब, केतकी, कोसम्ब, खाजरी, गुंज, चंदन, जांभूळ, ताल-ताड, देवदार हा वृक्ष हिमालयात आढळतो. याचा उल्लेख बहुतेक सांकेतीक असावा. याशिवाय मोगरा, कडूनिंब,पळस, पाटल (हा आता आढळत नाही.) फलिणी, बकूळ, बेल, बोर, मधूक म्हणजे मोह, मरवा, मालती, वड, विषकंदली, वेळू म्हणजे बांबू, शिरीष, शेफालिका, हरिद्रा, हलाहल-म्हणजे विषारी वृक्ष अशा वृक्षांचा गाथासप्तशतीमधे उल्लेख सापडतात. याचा अर्थ दोन हजार वर्षापूर्वी ही झाडे येथे अस्तित्वात होती आणि ती अस्सल भारतीय म्हणून त्याला मान्यता द्यायला तज्ञांची हरकत नसावी. सध्याच्या मोनोकल्चरच्या जमान्यात खरे म्हणजे एखादे जंगल तयार करायचे असल्यास कोणती झाडे लावावीत याची ही यादीच हालाने आपल्याला दिली आहे. त्याचा उपयोग करणे आपल्या हातात आहे.
कदम्ब वृक्षाचा उल्लेख एका गाथेत कसा आला आहे ते बघुया –

तालूरममाउल्खुडिअकेसरो गिरिणईए पूरेण ।
दरबड्डउबुड्डणिबुड्डमहुअरो हीरइ कलम्बो ॥

याचा गर्भितार्थ श्री जोगळेकरांनी ओढून ताणून एका प्रेयसीने प्रियकराला भेटायच्या स्थळाबद्दल संकेत दिला आहे असा लावला आहे. पण मला तर याच्यात एका खेडेगावातील माणसाला नदीत कदम्बाची फांदी वाहताना दिसल्यावर सुचलेले एक भन्नाट काव्य दिसते. याचा अर्थ असा आहे – डोंगरातून वाहत आलेल्या नदीला पूर आला आहे. त्या पूरात अनेक फांद्या, झाडे वाहत आहेत पण एक फांदी कदम्बाची आहे ती लक्षात येण्याचे कारण म्हणजे त्याच्यावरील फुलांचे पराग तुटून गेले आहेत. त्या फुलांवर बसलेला भूंगा त्या फांदीबरोबर पाण्यात थोडा बुडतो व परत वरती येतो. (गटांगळ्या खातोय). याच्यातून इतर काय माहिती काढता येते ते बघूया – एक म्हणजे या प्रदेशातील नद्या डोंगरात वाहतात. त्यांना ज्या काळात कदम्बाच्या फुलांना पराग येतात त्या काळात पूर येतो. म्हणजे त्याच्या अगोदर काही दिवस पावसाळा चालू होतो. अजून एका वृक्षाचा, आंब्याचा उल्लेख बघू –

दिट्ठा चुआ, अग्घाइआ सुरा, दक्खिणाणिलो सहिओ ।
कज्जाइं व्विअ गरूआई मामि ! को वल्लहो कस्स ? ॥

घरातील जेष्ठ स्त्रीला एक गृहस्वामीनी म्हणते “ मामी ! ते लवकर परत यावेत म्हणून मी आम्रांकूराचे दर्शनही घेतले (पूजा असणार) व थोडेसे मद्यही घेतले. दक्षिणेकडून येणार्‍या वार्‍याची झुळूक अंगावर घेत मी येथे उभी आहे (दरवाज्यात वाट बघत) माझ्यापेक्षा त्यांना कामाचे महत्व जास्त वाटते.....कोण कोणाचा नाही....प्रियकर तर नाहीच नाही.....

गाथासप्तशतीतील पशूंपक्षांचा उल्लेखही या पशूंचा महाराष्ट्रातील वावर सिद्ध करतो. काही तज्ञांचे म्हणणे असे आहे की गाथासप्तशती ही उत्तरेकडे रचण्यात आली पण त्याकडे विशेष गांभिर्याने लक्ष द्यायची गरज नाही कारण एकतर ही हालाने संपादित केली व यातील नव्वद उल्लेख टक्के महाराष्ट्रातील आहेत. जे काही उल्लेख उत्तरेकडचे आहेत ते सांकेतीक आहेत म्हणजे उदाहरणार्थ “हिमालयाएवढा उंच”.
अच्छभल्लाची म्हणजे अस्वलाची त्याकाळात त्याच्या चरबीसाठी शिकार करत असावेत अशा प्रकारचा एक उल्लेख सापडतो. कमठ म्हणजे कासव, कण्हसार म्हणजे काळवीट, गवा, गाढव, गाय, बैल, चितळ, चित्ता, पाठीण नावाचा मोठा तळ्यातील मासा, माकड, मांजर, मुंगूस, हरिण, मेस-मेंढा (मेष), रण्णुंदर म्हणजे घूस, रानडुक्कर, रेडा, म्हैस, वाघ, शरभ या काल्पनिक प्राण्याचाही गाथेमधे उल्लेख आहे. याचे शरिर सिंहाचे तर तोंड हत्तीसारखे असते. याच्या प्रतिमा आपल्याला अनेक मंदिरावर सापडतील. या प्राण्यांबरोबर सिंह, हत्ती ( हे अर्थात कर्नाटक भागात असावेत). गायीच्या उल्लेखाचे एक उदाहरण घेऊ-

कहॅं सा णिव्वण्णिज्जइ जीअ जहा लोइअम्मि अंङ्गम्मि ।
दिट्ठी दुव्वलगाई व्व पङ्कपडिआ ण उत्तरइ ? ॥
अर्थ : चिखलात रुतलेल्या दुर्बल गाईला ज्या प्रमाणे चिखलात रुतलेल्या गाईला आपला पाय काढता येत नाही त्या प्रमाणे माझी अवस्था झाली आहे. तुझ्या एकेक अवयवांकडे माझी दृष्टी तेथेच अडकून पडते. मी त्यातच घायाळ होतो. मी तुझ्या संपूर्ण सौंदर्याचा आनंद कसा घेणार या काळजीने मला ग्रासले आहे.
या अर्थातून काय अनुमान काढता येते ते बघा – तेथे गावात गाई फसण्याएवढा चिखल होता. जनावरे सहसा चिखलात फसत नाहीत मग गाय फसली याचा अर्थ तिच्या मळलेल्या वाटेवर हा चिखल नव्याने आलेला दिसतोय. म्हणजेच त्या काळात तेथे रस्त्यांची बोंब दिसते. पण इतर गाथेत शहरातील रस्ते चांगले आहेत असा उल्लेख आढळतो याचा अर्थ हे खेडेगाव असावे. स्त्रिच्या सौंदर्याबद्दल काय अनुमान काढावे मला वाटते हे सांगायची आवश्यकता नाही.

आता त्या काळात कुठकुठले पक्षी होते ते बघूया. बरेचसे आत्ताही आहेतच. कावळ्याला बिचार्‍याला त्याही काळात आजच्यासारखाच माणसांचा दुस्वास सहन करावा लागत होता. एका गाथेत बाहेर अंगणात ठेवलेल्या अन्नावर झडप घालताना शेजारीच पडलेली फुटकी बांगडी बघून कावळा दचकतो असा उल्लेख आहे. तर ही खालची गाथा बघा -

परिहूएण बि दिअहं घरघरभमिरेण अण्णकज्जम्मि ।
चिरजीविएण इमिणा खविअह्मो दङ्ढकाएण ॥
याच्यावरून संस्कृत ओळी कशा तयार करता येतात त्यासाठी हे संस्कृतमधेही खाली देत आहे -
परिभूतनापि दिवसं गृहगृहभ्रमणशीलेनान्यकार्ये ।
चिरजीवितेनानेन क्षपिता: स्मो दग्धकायेन ॥

अर्थ: लोकांनी तिरस्कार केला व पुन्हां: पुन्हां: हाकलून लावले तरीही कावळा अन्नासाठी लोंचटासारखा पुन्हां: पुन्हां: घरोघर जातो व जळके जीवन चिरकाल जगतो. याच प्रमाणे (म्हातारी झालेली वेश्या म्हणते) वारंवार अपमान झाला तरी तो सोसून मला पोटासाठी दारोदार फिरावे लागते

पोपटाच्या रंगामुळे त्यांना पाचुची उपमा देताना हा अजून एक ग्रामकवी म्हणतो -

उअ पोम्मराअम्रगअसंवलिआ णहअलाओ ओअरइ ।
णहसिरिकण्ठब्भट्ठ व्व कण्ठिआ कीररिञ्छोली ॥
पहा पोपटांचा थवा आकाशातून झाडावर उतरत आहे. जणू आकाशाचा कंठा तुटून त्यातील पाचू व माणके ओघळत आहेत.... सुंदर...

इतर पक्षात पारवा, कोंबडा, जलरड्‌कुण-पाणकोंबडी, बलाआ म्हणजे बगळा, भ्रमराचा उल्लेख असलेली गाथाही अशीच श्रुंगारिक आहे -

भरिमो से गहिआहरधुअसीसपहोलिरालआउलिअम ।
वअणं परिमलतरलिअभमरालिपइण्णकमलं व।
अर्थ: मी तिचा ओठ माझ्या दातात धरल्यावर तो सोडविण्याच्या धडपडीत तिचे केस सैल झाले व ते तिच्या मुखावर ओघळले/पसरले. ते केस बघून वासाने धुंद झालेले भुंगे कमळाभोवती जमतात त्या दृष्याची मला आठवण आली. अजून मोर, सारिका-मैना यांचेही उल्लेख सापडतात.

पक्षांबरोबर किडे, व सरपटणारे प्राण्यांबद्दलही उल्लेख सापडतात. कोळी, झिल्ली म्हणजे रातकिडा, णिम्बईड म्हणजे कडू लिंबावरचा एक किडा, विच्छुअ, साप, सालूरी –बेडूक व हरिआल म्हनजे आत्ता दिसतो पक्षी नसून एक मुंग्या खाणारा छोटा प्राणी आहे. आपण झिल्लीच्या उल्लेखाची एक गाथा बघूया. त्या अगोदर माझा एक अनुभव सांगतो. एकदा दांडेलीहून कारवारला जात असताना मे मधे (मुलांना सुटी असल्यामुळे) दूपारी दोन वाजता त्या आरण्यात उंचच उंच सरळसोट झाडांमधे अत्यंत कर्कश्य असा रातकिड्यासारखा आवाज येत होता. एखादा क्षण मधेच थांबायचा व परत चालू व्हायचा. कर्कर्श म्हणजे अती कर्कर्श. आम्ही चहा प्यायला एका टपरीवर थांबलो तेव्हा तेथे बसलेल्या अदिवासी म्हातार्‍याला, “हा कुठल्या किड्यांचा आवाज आहे असे विचारल्यावर त्याने उत्तर दिलेले माझ्या अजून लक्षात आहे “झिली”. (त्याने हेही सांगितले की हे किडे पहिला पाऊस झाला कि मरून खाली पडतात). दोन हजार वर्षात या नावातील फक्त एक “ल” कमी झाला..कमाल आहे. या गाथेत उल्लेख झालेला आवाज असल्याच किड्यांचा असणार याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही...यात म्हटल्याप्रमाणे मोसमही तोच होता.

रोवन्ति व्व अरण्णे दूसहरइकिरणफंससंतत्ता ।
अइतारझिल्लिविरूएहिं पाअवा गिम्हमज्झन्हे ॥

अर्थ: उन्हाळा आहे. उन मी म्हणते आहे. त्या उन्हात तापलेले वृक्ष त्यांच्या वरील किटकांच्या कर्कश्य आवाजाच्या रुपाने जणू आक्रोश करत आहेत.
माझ्या अनुभवाने सांगतो मला त्या दुपारी शपथ असेच वाटले होते. मलाच काय कोणलाही असेच वाटेल असा तो आवाज आहे. रातकिड्यांच्या आवाजाला एक प्रकारचा ताल व किणकीण असते. हा आवाज म्हणजे नुसता कोरडा आक्रोश बस्स ! हाच शब्द त्याला योग्य आहे.

गाथासप्तशतीतील लोकजीवन आजच्या मावळातील कुठल्याही खेड्यातील लोकजीवनाप्रमाणे होते. सिप्पर म्हणजे छप्पर ही त्या काळी गवताने शाकारलेली असत. बांबूची बेटे विपूल होती. छोटी गावे होती तशी शहरेही होती असा उल्लेख आहे. कदम्बाची झाडे फुललेली असून ती विपूल आहेत. गावातून ओढे वाहत आहेत व देवळांचा सुकाळ आहे. घराची बांधणी आपण आत्ता बघतो तशीच आहे. खोल्या आहेत व त्याच्या भिंती कुडाच्या आहेत. घराच्या भिंती चित्रांनी सजवलेल्या आहेत. एका गाथेत तर गृहस्वामिनीने पति गावाला गेल्यावर दिवस मोजण्यासाठी खूणा केलेल्या आहेत.

ओहिदिअहागमासंकिरिहिं सहिआहि कुडुलिहिआओ ।
दोतिण्णि तहिं विअ चोरिआए रेहा पुसिज्जन्ति ॥

पतिने किती दिवसाने परत येणार याचे वचन दिलेले आहे. त्या वचनाप्रमाणे तेवढ्या रेघा भिंतीवर मारलेल्या आहेत. तेवढे दिवस उलटून जाणार हे लक्षात येताच तिच्या मैत्रिणींनी त्या रेषा तिच्या नकळत वाढविल्या. पण इकडे रेषा कमी केल्यामुळे आपला पति लवकर परत येईल या आशेने तिनेही त्यातील काही पुसून टाकल्या.

घरांना उंबरे आहेत. बर्‍याच घरांना ओसरी आहे ज्याला त्यावेळी अलिन्दक म्हणत. गोठ्याचे अनेक उल्लेख गाथामधे आलेले आहेत त्यावरून गोधनाचे महत्व लक्षात यावे. शेतातील घराला ओवालअ म्हणत. शयनगृह जे आतील भागात असे, त्याला अन्तेउर असे संबोधले आहे. पावसाळ्यात घरे गळत होती व ती दुरूस्त करायची कामे पुरुष करायचे. त्या काळी सामान साठवायचा लोभ नसावा कारण घरातील वस्तूंचा फारसा उल्लेख कुठल्याही कविंनी केलेला नाही. बसण्यासाठी गवतावर हरणाचे किंवा वाघाचे कातडे वापरत. शहरात मात्र पल्लंक (पलंग) वापरत. एका गाथेत पलंगाभोवती डासापासून संरक्षणासाठी गब्भहरण लावलेली आहे. मुसळे व सुपे प्रत्येक घरात आहेतच. पाणी साठविण्यासाठी मातीचे कुंभ वापरत असावेत तर शकूनासाठी धातूचे मंगलकलश अस्तित्वात होते. सिंदूर भरायची व कुंकू लावायची रीत त्याही काळी होती असे दिसते कारण हे ठेवण्याच्या डब्यांची वर्णने गाथेत आली आहेत. मद्य ठेवण्यासाठी स्फटिकपात्र व पिण्यासाठी चषक वापरत. घरात पुरूष स्त्रियांना मद्याचा आग्रह करत व चटूक नावाच्या लाकडी भांड्याचाही उल्लेख आहे. ते भिक्षा देण्यासाठी वापरत. रात्री प्रकाशासाठी तेलांच्या दिव्याचा वापर होई. यांना काचा नसत असे म्हणायचे कारण म्हणजे एका गाथेत दिव्याची ज्योत विरहिणीच्या अश्रूंनी विझते असा उल्लेख आहे. दिव्याची ज्योत हाताने विझवायची प्रथा होती क्वचितच फुंकरेने ती विझवत असत. काही काही दिवे तर तेल संपले तरीही पेटते रहात उदा...

द्ठ्ठूण तरूणसुरअं विविहविलासेहि करणसोहिल्लम ।
दीओ वि तग्गामणो गअं पि तेल्लं ण लक्खेइ ॥

तरूण युगुलांच्या विलासी रतिक्रिडा बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचेही भान राहिले नाही.

गाथासप्तशतीतील नातीगोती काय होती त्यावर एक नजर टाकूयात कारण माणसांमधील नाती ही बर्‍याच वेळा माणसांपेक्षाही महत्वाची होतात.... घराचा कुटुंब प्रमूख गृहपती... गाथांमधे गृहपती शक्यतो बावळट दिसतो म्हणजे त्याची गृहस्वामिनीतरी त्याला बावळट समजते असे दिसते पण तो घरादाराचे संरक्षणाचे काम चोख बजावताना दिसतो. शेतीवाडीची कामेही मोठ्या तडफेने करतो पण बहुदा आजच्याप्रमाणे त्याचेही आपल्या बायकोपुढे काही चालत नाही असे दिसते. त्याच्याकडे तलवार असते व तो त्याचा वापर करायला मागेपुढे पहात नाही. एका गाथेत अशाच एका श्रीमंत गृहपतीच्या उनाड मुलाच्या वागणूकीबद्दल लिहिले आहे...हेही आजच्या सारखेच. ससूर-सासरा, देवर-दीर, सासू यांचा उल्लेख बरेच आहेत. गाथांमधील सासू प्रेमळ आहे. सुनेच्या दु:खाने ती अश्रू ढाळताना दिसते. सुनेच्या छळाचा कुठेही उल्लेख नाही. अत्ता-आत्या, पिउच्छा, माऊच्छा व मामि ही नाती म्हणजे घरातील जेष्ठ स्त्रिया असाव्यात. माआ, माइआ, माउआ म्हणजे आई. गाथांमधे सवतींचा उल्लेख अनेक वेळा आढळतो. दोन तीन लग्ने करायची पद्धत सर्रास असावी असे वाटते. सधन घरात तर होतीच होती.
सवतीमत्सराच्या हकीकती गाथांमधे आहेत. उदा. –

जो तीए अहरराओ रत्तिं उव्वासिओ पिअअमेण ।
सो व्विअ दीसइ गोसे सवत्तिणाणेसु संकन्तो ॥

तिच्या ओठांचा लाल रंग तिच्या पतिने रात्री स्वत:च्या ओठांनी पुसून घेतला. पण सकाळ झाल्यावर तिच्या सवतीच्या नजरेस हे पडल्यावर तो रंग तिच्या डोळ्यात प्रकट झाला. (तिचे डोळे रागाने आरक्त झाले.)

गाथासप्तशतीतील स्त्री कशी आहे तिची दिनचर्या कशी होती याबद्दल श्री जोगळेकरांनी गाथा धुंडाळून संशोधन केले आहे ते तसेच्या तसे येथे देण्याचा मोह मला आवरत नाही. गाथा वाचून त्यातून काय काय माहिती काढता येते त्याचा हा उत्तम नमुनाच आहे. –
“लग्नाच्यावेळी तिचे वय जाणते असे. तो काळ उलटल्यावर त्या विवाहासाठी अतूर होत. त्या सुशिक्षित आहेत व पतीला पत्रही लिहितात व त्याची वाचतात. लग्नानंतर तिच्या वागणूकीत गांभीर्य येते. रात्री जागरण झालेले असले तरीही कुलवधू पहाटे उठून कामाला लागते. उजाडण्यापूर्वी न उठणारी स्त्री नवर्‍याची पट्टराणी असली तरी सगळ्यांच्या निंदेस पात्र ठरते. झाडलोट झाल्यावर ती स्नान करते व स्वयंपाकाला लागते. पण माहेरी गेल्यावर मात्र ती उशीरा आंघोळ करते. ती स्वयंपाककलेत निपूण आहे व आल्यागेल्याला भिक्षा वाढते. स्वयंपाक झाल्यावर काकबली देते. शेतावर घरधन्याला व त्याच्या कामगारांना न्याहारी घेऊन जाते. ती सणाला नांगराची पूजा करते व जरूरी पडल्यास शेतात कामेही करते. दळण, कांडणही तिलाच बघावे लागते. दिवसभर कामे करून दुपारी जरा आडवे झाले की तिला टिकेला सामोरे जावे लागतेच. पति गावाला गेला असला की ती वेळ मिळाला की पतीची वाट बघत दारात उभी रहाते व तो आल्यावर त्याचे स्वागत करते. ती पतीच्या यशाने आनंदीत होते व त्याचा संसार आनंदाने करते. पतीचे चित्त बाहेर कुठे गुंतले असले तरीही ती क्रोध मनात ठेवताना दिसते. स्वत:च्या शिलाचे संरक्षण करण्यासाठी ती काहीही करू शकते. ती शेजारणीलाही सर्व प्रकारची मदत करताना दिसते. आपल्या कुटूंबाची विपन्नावस्था ती प्रकट होऊ देत नाही. गरीबीत आपले डोहाळेही मनातल्या मनात पूरवते. कुटुंबापुढे आपल्या सर्व हौसांवर ती पाणी सोडते. कुटूंब एकत्र ठेवण्यात तिचा मोठा सहभाग असतो. माहेरची ओढ असली तरी ती सासरचा अभिमान धरते. पती गावाला गेला असेल तर ती वेणी फेणी करत नाही, डोळ्यात काजळ घालत नाही किंवा तिला ते सुचत नाही. स्त्रियांना पुरेसे स्वातंत्र्य असे. एका गाथेत असे म्हटले आहे की ज्या घरात स्त्रिया मोकळ्या मनाने बोलतात, अकृत्रिमपणे वागतात, मोकळेपणाने हसू शकतात, निष्पापपणे वावरतात ती कुटुंबे धन्य होत !”

ही आहे दोन हजार वर्षापूर्वीची महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील स्त्री. तिच्याकडून केल्या जाणार्‍या व आत्ताच्या स्त्रिकडून केल्या जाणार्‍या अपेक्षांमधे फारसा फरक दिसत नाही. फक्त एकच फरक दुर्दैवाने पडलेला दिसतो तो म्हणजे त्या काळात बायकोला दारू पिऊन मारहाण केल्याचा उल्लेख सापडत नाही आणि सध्या ते आपल्याला सर्रास दिसते.

त्या काळात देवळांना अज्जाघर म्हणत व अज्जघराचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. ही देवळे छोटी असून त्याची पटांगणे मात्र मोठी असत. उतारूंची रहायची सोय या देवळात हमखास असे. आजही आपण ट्रेकला गेलो की हमखास देवळात झोपतो... मूर्ती गणपातीच्या, अज्जाच्या आहेत. काही गाथांमधे सतीच्या प्रथेचे उल्लेख आहेत. सती जाणे ही फार चांगली प्रथा आहे असे मानले जात नसावे. कारण चिता विझावी अशी इच्छा मनात धरणारी एक गाथा आहे –

विज्जाविज्जइ जलणो गहवइधूआइ वित्थअसिहो वि ।
अणुमरणघणालिङ्गणपिअअमसुहसिइज्जिरङ्गीए ॥

घरधन्याची मुलगी सती जाण्यासाठी चितेवर चढली. मरायच्या अगोदर तिने पतीच्या प्रेताला अलिंगन दिले. त्यातही झालेल्या सुखाने तिला घाम आला व ती चिता त्यात विझून गेली..... आता काय म्हणावे या गाथेला ? कोणी लिहिली असावी ही गाथा ?

गाथेतून त्याकाळी काय काय समजूती होत्या तेही कळून येते. बर्यारचशा समजूती आजही तशाच आहेत. शकून अपशकूनावर गाढ विश्वास आहे, देवाची प्रार्थना काहीतरी मिळविण्यासाठी केली जाते. स्वर्ग व नरक या कल्पना अस्तित्वात होत्या. चांगले वाईट व धर्म याबद्दलही काही गाथात लिहिलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे दैव या कल्पनेवर (?) एका गाथेत दैवावर थोडाफार पण सुंदर प्रकाश टाकलेला दिसतो -

ज जं आलिहइ मणो आसावट्टीहि हिआफलअम्मि ।
तं तं बालो व्व विही णिहुअं हसिऊण पम्हुसइ ॥
अर्थ : माझ्या ह्र्दयाच्या पाटीवर मी आशेच्या कुंचल्यांनी मी स्वप्ने विविध रंगांनी रंगवली पण हाय ! दैवाने एका खट्याळ मुलाप्रमाणे खदाखदा हसत ती चित्रे निष्ठूरपणे एका क्षणात पुसून टाकली.
काय सुंदर कल्पना आहे बघा !

घरातील कोणी प्रवासाला निघाल्यास दरवाजात प्रस्थानकलश ठेवण्यात येई. त्यात पाणी, आंब्याची पाने व कमळ खोचण्यात येई. मोरांच्या पिसांनी एखद्याला संमोहित करता येते अशी श्रद्धा होती. नागाच्या फण्यावर रत्न असते अशी आज असणारी समजूत त्याही काळी होतीच... भूत संमंधावर व पूनर्जन्मावर विश्वास ठेवला जाई.

सातवाहनांच्या काळात किंवा गाथासप्तशतीच्या काळात वैदिक धर्माचे आचरण होत असे. नाणे घाटात असलेल्या शिलालेखात अनेक यज्ञांचा उल्लेख दिसतो तो त्यामुळेच. सातवाहन वैदिक धर्म पाळत पण ते भागवत धर्माचे अनुयायी होते. त्या काळात अग्नि, इंद्र, प्रजापति, रुद्र, वामन सूर्य व कृष्ण या देवांची पूजा होत असे. हे सर्व वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले आहेत.

गाथासप्तशतीच्या काळात लोक काय खात असावेत ? ते त्यावेळी त्याबाबत आलेल्या उल्लेखावरून उमगते. ही यादी बघा-
अण्ण-अन्न, इच्छू-उंस, कञ्जी-कांजि, कलम-साळी, गुड-गुळ, घिअ-तूप, चणस म्हणजे चणे, जव-जवस, तण्डूल-तांदूळ, तिल-तीळ, तुवरी-तूर, दुद्ध-दूध, पाऊ म्हणजे न्याहारी, पिट्ठ-पीठ, मिट्ठ म्हणजे मिष्टान्न, राइआ-मोहरी, लड्डूअ, लोण म्हणजे लवण, सिन्धव म्हणजे सैन्धव या एवढ्या खाद्यपदार्थांचा उल्लेख गाथामधे आला आहे.

गाथेमधे मद्याचाही उल्लेख अकरा गाथांमधे आलेला आहे. त्यात मदिरा, मधुरस, सरक, सुरा व सीधू या प्रकारच्या मद्यांचा उल्लेख आला आहे. या काळात महाराष्ट्रात चौल बंदरातून ग्रीक व्यापारी द्राक्षाची मद्ये व अरब व्यापारी खजुराची मद्ये आणत. या मद्यांचे कुंभ बर्‍याच ठिकाणी सापडले आहेत. मधुरस ही मोहाच्या फुलांची दारू तर याच्याही अगोदरपासून प्रचिलीत होतीच. कदम्बाच्या फुलापासूनही मद्य तयार होत असे. तांदूळ व उसाच्या रसा पासूनही मद्य तयार होत असे.
एका गाथेत तर सुरा जूनी झाली की त्याची प्रत वाढते असा उल्लेख आहे -

पउरजुवाणो गामो महुमासो जोअणं पई ठेरो ।
जुण्णसुरा साहीणा असई मा होउ, किं मरउ ?

ती तरूण आहे, स्वतंत्र आहे. तिचा पती वृद्ध आहे. गावात बरेच तरूण आहेत. या वसंत ऋतूत तिच्याकडे बरेच जूने मद्य शिल्लक आहे...तर तिने तरी काय करावे ? (का मरावे?)

मद्य मिळण्याच्या ठिकाणाला पानकुटी म्हणत.

त्या काळात सामान्य ग्रामजन वेळ कसा घालवित असतील हा प्रश्न बर्‍याच जणांना पडला असेल किंवा पडेल. त्या काळात करमणूकीची साधने अत्यंत कमी असल्यामुळे आपल्या कुटुंबियांशी गप्पा मारत वेळ व्यतीत करणे हे एक महत्वाचे साधन होते. पती पत्नी अर्थातच कामक्रिडेमधे चांगला वेळ घालवत. एका गाथेत पुरूष ढोल वाजवतोय व पत्नी नृत्य करते असाही उल्लेख आहे. पती जर गावाला गेला असेल तर स्त्रियांचा त्याची वाट बघण्यात वेळ चांगला जात असे. शिवाय गावभर भटकण्यातही त्यांचा चांगला वेळ जाई. नटून थटून बाजारात फेरफटका मारणे हेही त्याकाळात स्त्रियांचे वेळ घालविण्याचे चांगले साधन होते. भिंतीवर चित्रे काढणे, किंवा प्रेयसीच्या अंगावरही चित्रे काढली जात.
याबाबतीत एक गंमतशीर गाथा एका माणसाने लिहिली आहे –

मह पइसणा थणजुअले पत्तं लिहिअं ति गव्विआ कीस ? ।
आलिहइस महं पि पिओ जइत से कंपो च्चिअ ण हो‍इ ॥

तुझ्या उरोजांवर तुझ्या पतीने लिहिले आहे म्हणून भाव खाऊ नकोस. माझ्यावरील प्रेमाने त्यावेळी माझ्या पतीचा हात थथरत होता म्हणून नाहीतर त्याने माझ्या स्तनांवर चित्रेच काढली असती......

पुरूषांच्या बाबतीत बोलायचे झाले तर बहुतेकांना एका पेक्षा जास्त बायका असल्यामुळे त्यांना वेळ घालवायचा काही प्रश्न नसावा असे वाटते. याच बरोबर सणवार, नाचणे, गाणे, कथाकथन हे प्रकार होतेच. सवतींच्या भांडणांमुळेही बराच वेळ जात असावा. पुरूषांना गृहस्वामिनी सोडून दुसर्‍या स्त्रियांकडे जायची सोय असल्यामुळे ते त्यातही काळ व्यतीत करत. अशाच एका सवतीचे हे उदगार आपल्याला व्यथित करून जातील –

गोत्तक्खलणं सोऊण पिअ‍अमेा अज्ज तीअ खणदिअहे ।
वज्झमहिसस्स माल व्व मण्डणं उअह ! पहिहाइ ॥

स्वैरार्थ : सणाच्या दिवशी ती नटून थटून त्याच्या बरोबर बसली असताना त्याने चुकून दुसरीचेच नाव घेतले. ते ऐकताच तिच्यावर आभाळच कोसळले. बळी देण्यासाठी रेड्याला जसे सजवतात तसे तिला वाटले........

खालील गाथेत या बिचार्‍या पुरूषाला वेगळ्या कारणासाठी वेळ घालवायचा आहे....
णिक्क्म्माहिं वि छेत्ताहि पामरो णेअ वच्चए वसइसम‍ ।
मुअपिअजाआसुण्णइिअगेहदु:क्खं परिहरन्तो॥

या पामराला पत्नीचे निधन झाल्यामुळे, शुन्यवत झालेल्या घरात जावेसे वाटत नाही म्हणू तो काम नसले तरीही शेतात वेळ काढत आहे..........

त्या काळी मनोरंजनासाठी खेळही खेळले जात. बायका फुगडी व सगळेच सोंगट्या खेळत. त्याला त्या काळात पाशक-शारी म्हणत.( माझ्या वयाचे जे असतील त्यांना सोंगट्या हा खेळ माहीत असेल. पटावर हत्ती, घोडे, शेळी, उंट अशा नावाच्या चार सोंगट्या घेऊन खेळायचा हा खेळ. दान पाडायला कवड्या किंवा फासे असत. एका वेळी चार, सहा, आठ जण खेळू शकत.) कुस्तीही खेळली जाई. नदीवर पोहायला जाणे हाही स्त्री पुरूषांचा आवडता खेळ असे.

सणही साजरे होत त्यांचे उल्लेख छण म्हणजे सण, फग्गुच्छण म्हणजे फाल्गुनोत्सव (होळी), मअ ण म्हण्जे मदनोत्सव ( हा अर्थात वैयक्तिक पातळीवर साजरा व्हायचा पण त्यालाही उत्सव म्हटले आहे), वसंतोत्सव इत्यादि नावाने आले आहेत.

दइ्अकरग्घलुलिओ धम्मिल्लो सीहगन्धिअं वअवणम ।
मअ्णम्मि एत्तिअं चिअ पसाहणं हरइअ तरूणीणम्‍ ॥
प्रियकरामुळे विस्कटलेले केस आणि मद्यामुळे धुंद झालेले मुख, या उत्सवात (मदोनत्सव) एवढाही श्रुंगार तरूणींना बास होतो....

आता या ठिकाणी थांबतो. अजून बरेच लिहायचे आहे पण हे लिखाण व माहिती आपल्याला आवडली तर पुढच्या काही भागात गाथासप्तशती ज्या काळात रचली गेली त्या काळातील अजून बर्‍याच गोष्टींचा उहापोह करण्यात येईल.... विशेषत: स्त्रिसौंदर्य, श्रुंगार इत्यादी ज्यांच्यामुळे गाथासप्ताशती बदनाम झाली त्या गाथांबद्दल अजून लिहायचे आहे. तो पर्यंत आपला निरोप घेतो....पण जाता जाता एक नमूना -

जइथ वि हु दिल्लिंदिलिआ तह वि हु मा पुत्ति ! णग्गिआ भमसु ।
छेआ णअदर्जुआणो माअं धुआ‍इ लक्खंति ॥

ए पोरी तू लहान आहेस, मान्य आहे पण अशी उघडी बागडी फिरू नकोस.
गावातील चावट तरूण, मुलीवरून तिची आई कशी असेल याची कल्पना करतात...

जयंत कुलकर्णी.
आभार : श्री. जोगळेकर व श्री. वेबर यांनी या विषयावर केलेले लेखन आणि अर्थातच संपादक सम्राट हाल सातवाहन !

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

24 Sep 2012 - 8:10 am | कपिलमुनी

"बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचेही भान राहिले नाही................."
उफ्फ....मार डाला !!!

लेख सुंदर आणि नाविन्य पूर्ण आहे..पुस्तकाबरोबर तत्कालीन समाजजीवनाचे दर्शन छान घडवलेत..

मन१'s picture

24 Sep 2012 - 8:29 am | मन१

थोर संकलन.
सध्या अर्धाच भाग वाचून दम्लोय. सविस्तर नंतर.
या गाथांमधील अनेक कल्पनांचा उल्लेख आपल्याला मेघदूतात आढळेल. याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा हे मी वाचकांवर सोडतो.
हा बॉल हुशारीनं वाअचकांच्या कोर्टात टाकून लागलिच मूळ विषयाकडं परतलात हे छानच.

प्रचेतस's picture

24 Sep 2012 - 10:00 am | प्रचेतस

_/\_
अप्रतिम.
इतक्यातच थांबू नये.
गाहासत्तसईवर अजून लिखाण येऊ द्यात.

उत्तरओ हिमवन्तो दख्खिनओ सालवाहणो राञो |
समभारभरक्लान्ता तेण पल्हल्थए पुहवी ||

उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला सातवाहन राज्य असे दोन भार ही पृथ्वी पेलत आहे अशा प्रबळ सातवाहन साम्राज्यात गाथासप्तशतीसारखे अलौकिक लोकसाहित्य निर्माण व्हावे यात आश्चर्य ते काय.

स्पा's picture

24 Sep 2012 - 10:31 am | स्पा

असेच म्हणतोय.. तुफान लिहिताय
भरपूर माहिती मिळाली , त्या काळात जाऊन आल्यागत वाटलं

मस्त हो मस्त. या विषयावर लेख यायलाच हवा होता. जोगळेकरांचे विवेचन खूप सुंदर आहे. राधागोविंद बसाक यांच्या इंग्रजी भाषांतरात प्रत्येक गाथेचा कर्तादेखील दिलेला आहे. भाषाशास्त्रदृष्ट्या संस्कृतोद्भव भाषांपैकी फक्त मराठीतच आढळणारे कित्येक शब्द, उदा. तूप, पोट हे गाथासप्तशतीत आढळतात.

मन१'s picture

24 Sep 2012 - 10:23 am | मन१

तूप आणि पोट हे संस्कृतोद्भव?
घृत्- - -घी आणि उदर - उदर हे संस्कृतातून आल्यचे(किंवा संस्कृतात गेल्याचे) मानू शकतोइ.
पोट आणि तूप ह्यांचे संस्कृत व्हर्जन काय आहे?

तूप अन पोट संस्कृतोद्भव आहेत असे मी कुठेच म्हटले नाही. तुपाला तूप असे मराठी व कन्नडमध्ये म्हणतात. अन्य द्रविडी भाषांमध्ये 'नेयी" असा शब्द आहे. पोटाला तेलुगूत पोट्ट, कन्न्डमध्ये होट्टे, तर हिंदी, बंगाली, इ. मध्ये पेट म्हणतात. त्यामुळे पोट हा शब्द द्रविडोद्भव असण्याची शक्यता कमी आहे. तुपाबद्दल पाहिले पाहिजे. मराठी व्युत्पत्ति कोश पाहून सांगतो त्यात काय दिले आहे ते.

अन्या दातार's picture

24 Sep 2012 - 10:12 am | अन्या दातार

सुंदर विवेचन. प्राक्रुत भाषा उच्चारात उडिया भाषेसारखी वाटतेय.

"गाथांमधील सासू प्रेमळ आहे. सुनेच्या दु:खाने ती अश्रू ढाळताना दिसते. "
ही कमाल आहे. नात हांच्या भारुडात मग कशाला "भवानी आई तोडगा वाहिन तुला" म्हणत सून म्हातारी चचायची वाट पाहते? मला वाटलं ह्या दोन बाजू पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. एक शक्यता ही की सासू बहुदा मामीच असल्याने घरच्यासारखा लोभ लहानपणापासूनच असावा. त्यामुळे भांडणाचे चान्स कमी.
.
"स्वयंपाक झाल्यावर काकबली देते" काकबली काय भानगड ?
.
बादवे, एकूण लिहिलेल्या गाथांमध्ये लेखिका म्हणून स्त्रियांचा सहभाग जाणवतो काय?
समजातील सर्वचसहभागीकमी अधिक फरकाने सहभागी झालेले दिसतात का? (म्हणजे कष्टकर्‍यांपासून ते बुद्धीजीवी, कारकुनी काम करणारे आणि लढणारेसुद्धा.).
लिहिण्याच्या शैलीवरून त्याचा काही अंदाज लावता येइल का?
.

"आता या ठिकाणी थांबतो. अजून बरेच लिहायचे आहे पण हे लिखाण व माहिती आपल्याला आवडली तर "
अवश्य लिहा. वाट पहातोय.
.
जाता जाता:-
आजची गाथा सपतशती आधीच उपलब्ध आहे.कदाचित आज त्याचे मूल्य जाणवणार नाही. पण कहई दशकांनी किंवा काही शतकांनंतर हे खूपच उपयुक्त ठरेल. कुठली ही आजची गाथा सप्तशती?
तुम्ही आम्ही वापरत असलेले मराठी आंतरजाल!
.
लिहित, मुद्रित पुस्तकात लेखक काहीएक सांगायचे आहे, "स्टेटमेंट" करायचे आहे म्हणून लिहितो. एखादी कथाही लिहितो. शिवाय (एकूण लोकसंख्येच्या तुलनेत) काही मोजकीच, ठराविक नावेच दिसतात.
जालावर मात्र कुणीही काहीही लिहितो. माझा "दहावी क" हा वर्ग कसा होता, ह्सालेय जीवन कसं होतं; खायला काय आवडायचं इथपासून ते नवर्‍यानं दिलेला "धोबीपछाड". अगदि काहीही. कशाचीच मर्यादा नाही.
सामान्यांच्या जीवनप्रतिबिंबाचा हा समुद्र आहे. हवं तेवढं शोधा म्हणावं पुढच्या पिढ्यांना. कशाचीच ददात नाय.

इरसाल's picture

25 Sep 2012 - 12:18 pm | इरसाल

भवानी आई रोडगा वाहीन तुला असे आहे ते.
काकबली म्हणजे जेवणापुर्वी एक घास देवदैवत्,भुतपिशाच्च, जीवजंतुसाठी काढलेला.

५० फक्त's picture

24 Sep 2012 - 11:00 am | ५० फक्त

उत्तम लेख धन्यवाद.

sagarpdy's picture

24 Sep 2012 - 11:12 am | sagarpdy

मस्त!

विसुनाना's picture

24 Sep 2012 - 11:37 am | विसुनाना

"अजून बरेच लिहायचे आहे पण हे लिखाण व माहिती आपल्याला आवडली तर पुढच्या काही भागात गाथासप्तशती ज्या काळात रचली गेली त्या काळातील अजून बर्‍याच गोष्टींचा उहापोह करण्यात येईल"

- हा लेख तर आवडलाच पण यावर लेखमाला झाली तर उत्तम. आभारी आहे.

पैसा's picture

24 Sep 2012 - 12:09 pm | पैसा

परत परत वाचला तरी समाधान होत नाही असा अप्रतिम लेख. २००० वर्षापूर्वीचं जानपदाचं वर्णन अतिशय समर्थपणे गाथेमधे आलं आहे. एकेक गाथा त्यातल्या प्रसंगाचं चित्र साक्षात उभं करते. त्याचं फार सुरेख रसग्रहण करून आमच्यापुढे आणल्याबद्दल धन्यवाद! आणखीही असे लेख येऊ देत. "आवडले तर लिहितो" वगैरेचा प्रश्नच येत नाही!

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Sep 2012 - 1:11 pm | बिपिन कार्यकर्ते

वा! अप्रतिम! उत्सुक आहे.

***

ती मोदकै: कथा हर्षवर्धनाच्या बाबतीतही ऐकली होती.

गणपा's picture

24 Sep 2012 - 1:25 pm | गणपा

सिंप्ली ग्रेट
जास्त बोलुन या सुंदर लेखाला माझी ठिगळं जोडत नाही.

वाचते आहे. पुढचा भागही जरुर लिहा.

जयंत कुलकर्णी's picture

24 Sep 2012 - 2:45 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

Kavita Mahajan's picture

24 Sep 2012 - 3:32 pm | Kavita Mahajan

सुरेख. अरुंधती देवस्थळी या चित्रकार बाईंनी गाथेवर अभ्यास करून फार सुंदर चित्रं काढली आहेत. हे अधिक माहितीस्तव.

यकु's picture

24 Sep 2012 - 3:37 pm | यकु

खूपच आवडले.
पुढच्या लेखाची वाट पहातो.

हरिप्रिया_'s picture

24 Sep 2012 - 4:02 pm | हरिप्रिया_

अप्रतिम लेख..
आवडेश!!

गवि's picture

24 Sep 2012 - 4:21 pm | गवि

अभ्यासपूर्ण लेख. धन्यवाद....

जयंत कुलकर्णी's picture

24 Sep 2012 - 5:33 pm | जयंत कुलकर्णी

समरी आणि मुख्य लेखात काहीतरी घोळ झालेला दिसतोय. त्यामुळे वरील लेखात काही भाग आपोआप मी काही केलेले नसताना उडालेला दिसतोय. संपादक या कडे लक्ष देतील का ?

प्रचेतस's picture

24 Sep 2012 - 5:47 pm | प्रचेतस

धागा दुरुस्त केलाय.

जयंत कुलकर्णी's picture

24 Sep 2012 - 5:49 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद संपादक साहेब ! :-)

चित्रा's picture

24 Sep 2012 - 6:16 pm | चित्रा

लेख फार आवडला. एवढा मोठा लेख कसा वाचणार असे म्हणत म्हणत कधी संपला ते कळलेही नाही.
अधिक लिहावे असा आग्रह करते.

धनंजय's picture

24 Sep 2012 - 8:46 pm | धनंजय

मस्तच लिहिलेले आहे. पुन्हा-पुन्हा वाचावेसे.

कवितानागेश's picture

24 Sep 2012 - 11:11 pm | कवितानागेश

मस्तच लिहिलय.
इतका अभ्यास कधी करता काका तुम्ही? :)

असो...

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

प्रास's picture

25 Sep 2012 - 12:11 am | प्रास

सकाळी अर्धाच वाचून झाल्यामुळे प्रतिक्रिया लिहिली नाही. आत्ता अख्खा लेख पुन्हा वाचून काढला आणि तुमच्या व्यासंगाला आणि तो आमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या इच्छेपुढे साष्टांग नमन करून तुमचे आभार मानतो. असं अभ्यासपूर्ण आणि माहितीने परिपूर्ण लिखाण वाचलं की मिपावर सदस्य असल्याचं सार्थक होतं.
प्राकृताचा आणि त्यातही महाराष्ट्री प्राकृताचा अभ्यास करायचं सारखं ठरवतोय. आज ना उद्या नक्की व्हावा हीच इच्छा!
तुम्ही संकल्प केल्याप्रमाणे हालाच्या गाथांवर अधिक स्पष्टीकरणात्मक लिहावं ही विनंती.
(जयंतरावांचा फुल्लस्पीड पंखा) प्रास

अभ्या..'s picture

25 Sep 2012 - 1:13 am | अभ्या..

अतिशय सुंदर आणि अभ्यासू लेखन.
वाचकांना घेऊन जाता त्या काळात.
खूपच आवडले

किसन शिंदे's picture

25 Sep 2012 - 6:17 am | किसन शिंदे

_/\_

अप्रतिम आणि अभ्यासपुर्ण लेखन.

वल्लीसोबत सातवाहनकालावर तुमचीही एखादी लेखमालिका आली तर काय बहार येईल. :)

आवडले .. आणि हो .. पुढचा भाग ही येऊ द्यात.वाट पहात आहे.
तुमचा अभ्यास , त्याचा विषय आणि तुमचे लेखन .. कौतुकास पात्र !
रच्याकने , ज्ञानेश्वरीची भाषा शौरसेनी आहे ना ? शौरसेनी हा प्राकृतचाच भाग आहे का?
माऊलींची भाषा देखील आजच्या खणखणाटी मराठी पेक्षा अधिक मधाळ आहे.. की ती संतांची भाषा म्हणून तशी आहे?
मध्यभारतातील हिंदीची मिठ्ठास " मराठी असे आमुची मायबोली " मध्ये नाही. या तुमच्या मताशी अनेकदा सहमत !
अशी सहमत व्हायला लावणारी अनेक वाक्ये आप्ल्या लेखात आहेत.

मेघदूत आणि गाथा सप्तशतीचे कनेक्शन ही एकमेव गोष्ट त्याचे महत्व अधोरेखीत करण्यासाठी पुरेशी आहे.

आण़खी वाचायला खूप आवडेल.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2012 - 2:55 pm | प्रभाकर पेठकर

जवळ जवळ २ हजार वर्षापूर्वीचा काळ, समाज, चालीरिती, सण्-उत्सव, भिन्न स्वभाव विशेष इ.इ.ची रसभरीत वर्णने वाचनिय आहेत. फक्त हा भाग बराच मोठा झाला. ह्याचे दोन भाग केले असते. तर एक भाग एका बैठकीत वाचणे, त्यावर चिंतन मनन करणे, पुन्हा पुन्हा बारकाईने वाचून त्यातील छुप्या सौंदर्याचा आस्वाद घेणे आदी शक्य होईल. एकदावाचून विसरुन जाणे वेगळे आणि पुन्हा पुन्हा वाजून, तपशीलवार समजून घेऊन महत्त्वाच्या मुद्यांना कायमस्वरूपी लक्षात ठेवणे वेगळे.
कृपया ह्यावर विचार व्हावा.

जयंत कुलकर्णी's picture

25 Sep 2012 - 3:27 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !
निलकांतने एक पण मोठ्ठा लेख मागितला होता त्यामुळे मोठ्ठा लिहिला....पण चायला मला मोठ्ठे लेख लिहायची भारी हौस हेच खरे... जरा छोटे करायला पाहिजेत......

"...बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचेही भान राहिले नाही."
काय बोलावं या कल्पनेबद्दल! खतरनाक !
वाचनखूण साठवत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2012 - 8:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सुंदर लेखन. आभार.

अजून बरेच लिहायचे आहे पण हे लिखाण व माहिती आपल्याला आवडली तर पुढच्या काही भागात गाथासप्तशती ज्या काळात रचली गेली त्या काळातील अजून बर्‍याच गोष्टींचा उहापोह करण्यात येईल.... विशेषत: स्त्रिसौंदर्य, श्रुंगार इत्यादी ज्यांच्यामुळे गाथासप्ताशती बदनाम झाली त्या गाथांबद्दल अजून लिहायचे आहे.

अहो, लिहा की साहेब. थांबायचं कशाला. :)

-दिलीप बिरुटे

जोशी 'ले''s picture

25 Sep 2012 - 10:17 pm | जोशी 'ले'

खुपच सुंदर लेख, अगदी संपुच नये असं वाटत होतं

सुकामेवा's picture

26 Sep 2012 - 12:05 pm | सुकामेवा

उत्तम लेख धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Sep 2012 - 9:30 am | ज्ञानोबाचे पैजार

हा माणुस कधी एवढे सगळे वाचतो, त्याचा अभ्यास करतो आणि एवढाले मोठे लेख आपल्याला न कंटाळता वाचायला भाग पाडतो त्याचे मला भयंकर कौतुक वाटते. वाचुन झाले की पुढच्या लेखाची प्रतिक्षा या शिवाय दुसरे काय करु शकतो?
जयंतराव तुम्ही असेच लिहीत रहा आम्ही वाचत राहु,

जयंत कुलकर्णी's picture

27 Sep 2012 - 5:34 pm | जयंत कुलकर्णी

सगळ्यांना परत एकदा धन्यवाद !

सागर's picture

28 Sep 2012 - 12:16 pm | सागर

अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. आणि समयोचितही.
मराठी भाषेची समृद्धी आजची मराठी बोलणार्‍यांना यामुळे नक्कीच कळते.

स.आ.जोगळेकर यांनी संपादित केलेली हाल सातवाहनाची गाथासप्तशती सुदैवाने अलिकडेच पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.
हा तो दुवा

बुकगंगा.कॉम ने हा अनमोल ग्रंथ २५ % सवलतीत घरपोच देण्याची व्यवस्था केलेली आहे.
जिज्ञासूंनी हा अमूल्य ग्रंथ आपल्या संग्रही अवश्य ठेवावा.

शैलेन्द्र's picture

29 Sep 2012 - 2:08 pm | शैलेन्द्र

सुंदर लेखन.. अजुन येवुद्या

बापू मामा's picture

29 Sep 2012 - 5:52 pm | बापू मामा

महाराष्ट्र त्या काळी एवढा सुसंस्कॄत होता, तो सांस्कॄतिक दृष्ट्या मागास कसा काय झाला?

श्रावण मोडक's picture

29 Sep 2012 - 6:03 pm | श्रावण मोडक

रोचक लेखन आहे. एकदम मोठा आवाका आहे या विषयाचा हे कळले.

राहूल्रराव's picture

2 Oct 2012 - 6:10 pm | राहूल्रराव

जुना काळ कसा होता हे वाचुन खुप छान वाट्ल, .. सध्या कलयुग चालु आहे याचि खात्रि पट्ते.

आनंदी गोपाळ's picture

4 Oct 2012 - 11:59 am | आनंदी गोपाळ

पुढील भाग येउ द्यात.

>>द्ठ्ठूण तरूणसुरअं विविहविलासेहि करणसोहिल्लम ।
दीओ वि तग्गामणो गअं पि तेल्लं ण लक्खेइ ॥
तरूण युगुलांच्या विलासी रतिक्रिडा बघताना दिवा इतका तल्लीन झाला आहे की तेल संपले तरीही त्याला विझण्याचेही भान राहिले नाही.
>>

क्या बात!

मूकवाचक's picture

4 Oct 2012 - 1:48 pm | मूकवाचक

_/\_