नारळी भात (नारळी पोर्णिमेचा खास मेनु)

Pearl's picture
Pearl in पाककृती
4 Aug 2012 - 2:11 am

आपल्याकडे इतके छान छान सण आहेत आणि प्रत्येक सणाचा काही खास मेनू अगदी ठरलेला असतो. नुकतीच नारळी पोर्णिमा येऊन गेली. नारळी भात केला होता. एकदम मस्त झाला होता.
तशी सोपी आहे रेसिपी. नक्की करून पहा.

साहित्यः १ वाटी तांदूळ, २ वाट्या चिरलेला गूळ, १ वाटी किसलेले ओले खोबरे, ५-६ काजूचे तुकडे, १५-२० बेदाणे, केशराच्या काड्या (ऑप्शनल), ३ वाट्या पाणी, ५-६ चमचे तूप, ४ लवंगा

कृती:
१) तांदूळ धुवून ५-१० मिनिटे निथळत ठेवा. एका गॅसवर ३ वाट्या पाणी गरम करत ठेवा.
२) एका पॅनमध्ये तूप घेऊन गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात लवंगा घाला. लवंगा चांगल्या तळल्या गेल्या काजू, बेदाणे, केशराच्या चुरलेल्या काड्या घाला. थोडे परता आणि लगेचच त्यात हा धुतलेला तांदूळ घालून ३-४ मिनिटे तूपावर चांगला भाजून घ्या.
३) मग त्यात ३ वाट्या गरम पाणी घालून पॅनला झाकण लावून मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.
४) अधेमधे लक्ष ठेवत रहा. पाणी संपत आले की अंदाजाने १ वाटी गरम पाणी घालून, झाकण ठेवून भात शिजत राहू द्या. भात करपू देऊ नका.
५) भात जवळजवळ पूर्ण शिजत आला की (साधारण ९५% शिजला की) मग त्यात चिरलेला गूळ घालून भात एकदा परतून घ्या.
६) मग ओलं खोबरं घालून परत एकदा भात परतून घ्या, सारखा करून घ्या. आणि एकदम मंद आचेवर भात चांगला शिजू द्या. (गरज पडेल तेव्हा थोडे थोडे गरम पाणी घालून भात चांगला शिजू द्या.) भात पूर्ण शिजला की गॅसवरून खाली उतरवा. आणि आवडत असेल तर वरून चमचाभर तूप घालून खा.

टीपः ज्यांना जास्त गोड भात आवडत नाही त्यांनी दोन ऐवजी दिड वाटी गूळ घालावा.

प्रतिक्रिया

कौशी's picture

4 Aug 2012 - 5:56 am | कौशी

सोपी आणि छान रेसिपी आवडली.

निवेदिता-ताई's picture

4 Aug 2012 - 9:09 am | निवेदिता-ताई

सुंदर..फ़ोटु झकास आहे

झकास आणि माझा आवडता पदार्थ... :)

कॉमन मॅन's picture

4 Aug 2012 - 11:12 am | कॉमन मॅन

फारच छान..

पैसा's picture

4 Aug 2012 - 6:15 pm | पैसा

सोपी रेसिपी आहे आणि फोटो पण सुंदर आलाय. मस्त!

अशोक पतिल's picture

4 Aug 2012 - 6:58 pm | अशोक पतिल

लहानपनची आठवन जागी झाली .

ऐकसयुरी's picture

4 Aug 2012 - 8:42 pm | ऐकसयुरी

छान रेसिपी............

जाई.'s picture

4 Aug 2012 - 8:59 pm | जाई.

मस्त

पियुशा's picture

5 Aug 2012 - 3:53 pm | पियुशा

छान छान :)

अमृत's picture

6 Aug 2012 - 10:51 am | अमृत

पहिल्यांदाच केल्यामूळे काजु जरा जास्तच कुर्कूरीत झालेत(जळले :-( ) मी केलेला भात फोटोतल्या भाताचा आफ्रिकन भाऊ शोभत होता पण चव छान झाली होती. पाकृ साठी वेगळे धन्यवाद देणार नाही कारण करून पाहीला हीच पावती :-)

अमृत

धन्यवाद अमृत.

>>पहिल्यांदाच केल्यामूळे काजु जरा जास्तच कुर्कूरीत झालेत(जळले Sad ) >>
माय मिस्टेक :-/
लिहायचा कंटाळा करत १ स्टेप गाळली.
खरं तर स्टेप नं.२ अशी हवी-
२) एका पॅनमध्ये तूप घेऊन गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात लवंगा घाला. लवंगा चांगल्या तळल्या गेल्या की पॅन गॅसवरून उतरवा. तूप किंचित गार झाले की त्यात काजू, बेदाणे, केशराच्या चुरलेल्या काड्या घाला.(म्हणजे काजू करपणार नाहीत.) थोडे परता. आता पॅन गॅसवर ठेवा आणि लगेचच त्यात हा धुतलेला तांदूळ घालून ३-४ मिनिटे तूपावर चांगला भाजून घ्या.

कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेला/तूपात तळायचे असतील मंद गॅसवर तळायचे असतात किंवा तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून उतवरून तेल थोडे गार होऊ द्यायचे आणि मग त्यात काजू टाकायचे म्हणजे मग करपणार नाहीत. हे बर्‍याच वेळा अनुभवाने कळते. त्यामुळे काजू तळण्याची स्टेप सगळे गॅस मंद करून करतील असं गृहित धरलं मी :-)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Aug 2012 - 7:57 pm | अत्रुप्त आत्मा

चान चान.... :-)

Pearl's picture

9 Aug 2012 - 1:41 am | Pearl

सर्वांचे खूप आभार :-)