रुबाबदार हरिश्चंद्रगड…

सुहास झेले's picture
सुहास झेले in भटकंती
17 Jul 2012 - 12:48 pm

१७ जुलै हा दिवस माझ्यासाठी एकदम खास. आज विविध मराठी संस्थळावर लिहिणारा, मुक्त वावरणारा मी मुळात एक ब्लॉगर होतो, आहे आणि राहीन. ब्लॉग सुरु केल्यावर साधारण ८ महिन्यांनी पहिला मराठी ब्लॉगर मेळावा दादर, मुंबई येथे पार पडला. विविध ब्लॉगच्या नावा मागे दडलेले चेहरे सर्वप्रथम एकमेकांसमोर आले आणि आयुष्यात असंख्य जिवाभावाची माणसे जोडल्याचे समाधान मनोमन मिळाले. ह्याच वेळी मराठी ब्लॉगर्स आणि ट्रेकर्स असलेले, आम्ही काही तरुण मंडळी एकत्र आलो. सेनापतींच्या ("माबो"कर आणि "मीम"कर) सुपीक डोक्यातून आलेल्या कल्पनेने मराठी ब्लॉगर्स ट्रेकचे आयोजन केले, आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून, ऐनवेळी बहुतेक जणांची गळती झाल्याने आम्ही मोजके ६ जण विसापूरला गेलो. तरीसुद्धा एक अविस्मरणीय अनुभव होता माझ्यासाठी. त्याचवेळी आम्ही ठरवले होते, की किमान हा ट्रेक तरी दरवर्षी करायचा. पुढल्यावर्षी त्याच तारखेची आठवण ठेवत, एक आठवणीतला ट्रेक नाणेघाट मारला. अत्यंत मुसळधार पावसात केलेला तो ट्रेक, कधीच विसरू शकत नाही. तसंही प्रत्येक ट्रेक, भटकंती आपल्याला काहीनाकाही नवीन शिकवून जातेच. सह्याद्री सारखा शिक्षक आपल्याला मिळणे हे मोठे भाग्याचं.

१. विसापूर (१७ जुलै, २०१०)

२. नाणेघाट (१७ जुलै, २०११)

ह्यावर्षी १७ जुलै एकदम आठवड्याच्या मध्ये आल्याने, काय करावे असा संभ्रम होता. मग दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार-रविवारी काही जमतंय का असं बघु लागलो. मेलामेली सुरु झाली. पण राहून राहून एकच नाव समोर येत होते, कोकणकड्याचा रुबाब बाळगणारा हरिश्चंद्रगड. ह्या किल्ल्याने जवळपास चारवेळा चकवा दिला होता. आता हा करायचा म्हणून ठरले आणि ईमेल्स पाठवले. सुरुवातीला एकदम १४-१५ जण तयार झाले, आणि नेहमीप्रमाणे आदल्या दिवसापर्यंत मोजून ६ जण उरले. ह्यावेळी काही झालं तरी मी जाणार होतोच, एक हट्ट होता म्हणा हवं तर. मंडळी कमी झाल्याने खर्चाचा बोजा वाढू नये म्हणून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (आयला लई भारी वाटतंय वाचताना :D) वापरण्याचे ठरवले. आम्ही दादरहून इगतपुरी, मग तिथून राजूर आणि मग तिथून पाचनई हा मार्ग निवडला होता. पाचनईची वाट त्यामानाने सोपी आहे. परत येताना तोलार खिंडीतून येण्याचे ठरले.

ट्रेकला निघायच्या आधी दुपारी ट्रेनमध्ये जागा मिळतेय का, म्हणून आयआरसीटीसीला साकडे घातले आणि सायटीने नेहमीप्रमाणे असंबंध एरर देऊन माझा पाणउतारा केला. दीपकला फोन केला, तर त्याच्याकडे साईट ब्लॉक. मग शेवटी आनंदला फोन केला आणि सांगितले, की बघ तिकीट मिळतंय का ते. आमच्या सुदैवाने पाच जागा मिळाल्या आणि रात्री निदान तीन तास तरी पाठ टेकायला मिळेल म्हणून खुश झालो. वाराणसीला जाणारी, महानगरी एक्सप्रेसमध्ये जागा मिळाली. पावसाचे अजिबात लक्षण नव्हते. आम्ही घामाने पार बेजार झालो होतो. ट्रेनमध्ये चढताच, टिपिकल मुंबईकरांना पडणारे यक्षप्रश्न आणि त्यावर उत्तरे शोधली. सर्वप्रथम पायातले बूट बोगीतल्या पंख्यावर विराजमान झाले. आपापले बर्थ पकडून सगळे आडवे झालो आणि डोळे मिटले.

३. महानगरी एक्सप्रेस...

इतक्यात ठाणे का कल्याण आलं आणि "ए बबूआ....ए तनिक इधर आ....सठीया गये क्या, इलाह्बाद को बहोत टाईम हैं !!!" वगैरे चर्चा कानी पडल्या किंवा फेकल्या म्हणूया आणि माझी १० मिनिटाची सुखद झोप पार तुटली, ती अगदी शेवटपर्यंत. मग मी धैर्य एकवटून खाली उतरलो आणी एका खिडकीशेजारी जाऊन अवघडून बसलो. समोर असलेल्या भैय्याचे प्रश्न बाऊन्सर जात असल्याने दोनदा हो, एकदा नाही आणि मध्येमध्ये हसून वेळ मारायचे ठरवले. बाकी मंडळी निवांत झोपली होती, आणि मला ३ वाजता सगळ्यांना उठवायची जबाबदारी दिली होती, त्याचं टेन्शन ते वेगळंच. झोप येत होती, पण येऊ दिली नाही. बाहेर प्रचंड पाऊस पडत होता. मुंबईत अजिबात पाऊस नाही, ह्या विषयवार एक चर्चासत्र त्या भैयाबरोबर पार पडल्यावर एक स्टेशन आले. बघतो तर इगतपुरी.... सगळ्यांना चट-चट चापट्या मारून उठवले आणि बॅगा घेऊन खाली उतरलो. निवांत झोपेत मिठाचा खडा टाकल्याने, नेहमीच्या पठडीतल्या पाच-सहा-दहा शिव्या पडल्या हे वेगळे सांगणे न लगे :D

तिथून गेलो जवळचं असलेल्या एसटीडेपोमध्ये, तिथे थोडा नाश्ता करून पहिल्या बसची वाट बघत बसलो.बघता बघता तिथे मुलांची गर्दी वाढली. २०-३० मिनिटात जवळपास १००-११० मुले तिथे आली. म्हटलं झालं कल्याण... काळजीपोटी सगळ्यांशी गप्पा मारत, ही लोकं कुठे जात आहेत त्याचा कानोसा घेतला. बहुतेक सगळे रतनगड (गटारीसाठी.. सोबत जेवणाचे टोप) आणि काही ५-६ जण कळसूबाईला निघाले होते. पाच वाजता पहिली एसटी आली आणि सगळेच त्यात घुसले. राजूर तिथून ४० किलोमीटर अंतरावर होते. आजवर केलेला सगळ्यात सुंदर एसटी प्रवास असं मी म्हणेन. रस्त्याच्या दुतर्फा शेती आणि मध्ये वळणावळणाचा चकचकीत डांबरी रस्ता. राजूरला पोचल्यावर तिथली मिसळ खाऊन अगदी तृप्त झालो आणि पाचनई बस उशिरा असल्याने ५०० रुपये देऊन एक गाडी केली. राजूरपासून पाचनई ३० किलोमीटर अंतर आहे. पाचनई गावातूनच समोर डोंगरांच्या कड्यांवरून कोसळणारे धबधबे आमचे स्वागत करायला तयार होते. गावात वाट विचारून सरळ गडाकडे निघालो आणि प्रचंड पाऊस सुरु झाला. गडाची वाट एकदम सोपी आहे, दीड-दोन तासात आपण गडावर पोचतो.

४. पाचनईच्या पायथ्याशी...

५. गडाकडे वाटचाल...

आता थोडं ह्या किल्ल्याविषयी, हरिश्चंद्र म्हटलं की आठवतो महाकाय कोकणकडा. हा किल्ला पुणे, नगर आणि ठाणे हे तिन्ही जिल्हे जिथे एकत्र मिळतात, त्यातल्या सर्वात उंचावर असलेल्या डोंगरावर वसलेला आहे. किल्ल्याचे बांधकाम साधारण पाचव्या-सहाव्या शतकातील आहे. गडावर पोचाताक्षणी हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसते. नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे, मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. साधारण १६ मीटर उंची असलेले हे मंदिर, काळ्या कातळात असलेले ही मंदिर आपला श्रमपरिहार करते. गडावर अनेक भग्नावशेष पडून आहेत, त्यावरून जाणवते की तिथे खूप सारी मंदिरे आणि छोटेखानी महाल वगैरे होते. गावकऱ्यांच्यानुसार गडावर ५००-५५० शंकराच्या पिंड्या होत्या, त्या लोकांनी चोरून नेल्या आणि आता गडावर मोजून ३०-४० पिंड्या आहेत. लहान लहान मंदिरावर केलेली कलाकुसर निव्वळ अप्रतिम आहे. गणेश आणि महादेव ह्या दोन्ही देवांच्या अनेक लहान मोठ्या प्रतिकृती आपल्याला बघायला मिळतात. दानवरूपी असलेली काही शिल्पं ही गडावर आहेत. शंकराची खूप लहान-मोठी मंदिरे गडावर आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोर १४ कोनाडे असलेली, विष्णूतीर्थ नमक पुष्करणी आहे. मंदिराच्या बाजूला ओढ्याच्या रुपाने वाहणारी मंगळगंगा नदी आहे. तिच्या प्रवाहाला लागून उजव्या बाजूला केदारेश्वराचे लेणं लागतं. साधारण ५ फुट थंडगार पाण्यात असेलेले ते शिवलिंग बघू आपसूक हर हर महादेव अशी आरोळी निघाली.

६.

७.

८.

९.

१०.

११. हरिश्चंद्रेश्वर मंदिर..

१२.

१३.

१४.

१५.

१६.

१७.

१८.

१९.

२०.

21.

22.

23. विष्णूतीर्थ नमक पुष्करणी ...

24.

25. केदारेश्वर...

पावसाचा जोर प्रचंड होता, त्यामुळे जास्त मज्जा घेता आली नाही. ज्या कोकणकड्यासाठी आम्ही आलो होतो, तो पार धुक्यात हरवून गेला होता. तरी तो सू...सू... हवा वर फेकत होता. काही यझ मंडळी दगड, नाणी खाली फेकून ते कसे वरती येतात ते बघा होते. त्यांची कीव आल्याखेरीज, मी अजून काही करू शकलो नाही. सांगून काही फायदा नव्हता. वाळीबा भारमल (याचे कुटुंब गडावर खाण्याची व्यवस्था बघतात), म्हणाला पावसात इथे किल्ला बघायला येऊ नये. काही दिसत नाही. ह्या पोरामुळेचं आम्हाला मुक्कामाला थांबायला गुहा मिळाली. गावाच्या पायथ्यावर हा मुलगा देवासारखा भेटला होता, त्याने सांगितलं तुमच्यासाठी एक गुहा ठेवतो आणि त्याने ते वचन पूर्ण केलं. बाकी अजून गड फिरायची इच्छा नव्हती. हा किल्ला प्रचंड मोठा आहे. गणेश गुहेपासून तारामती शिखर गाठायला तीन तास लागतात. गुहेपासून कोकणकडा अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पावसाळा संपल्यावर, हा किल्ला विकांत सोडून कुठल्याही इतर दिवशी करायचा आहे.

आता खादाडी... ;-)

२६. गडावर पोचल्यावर गरमागरम पिठलं-भाकरी..

२७. रात्री भात-वरण आणि बटाट्याची भाजी ...

२८. दुसऱ्या दिवशी सकाळी कांदे पोहे :) :)

आता तुम्ही पावसात इथे जायचं म्हणत असाल तर जाऊ नका... पावसाळा संपल्यावर एक महिना जो असतो तेव्हा जा. तेव्हा तुम्हाला किल्ल्याशी बोलता/बघता येईल, तिथला इतिहास अनुभवता येईल, त्या तटबंदी तुमच्या मायेच्या स्पर्शाने सुखावून जातील, अजस्त्र कडे-कपारी तुम्हाला खंबीरपणाने कसे उभे राहायचे ते शिकवतील, त्या कोकणकड्याच्या मोठेपणाची जाणीव होईल, आपण निसर्गापुढे किती खुजे आहोत ते पटेल.... तेव्हा भेटूच परत....

(ह्या किल्ल्याचे वर्णन सांगणाऱ्या तत्वसार ग्रंथातील ह्या चार ओळी, किल्ल्याचे अपार महत्त्व सांगून जातात...)

हरिश्चंद्रनाम पर्वतु | तेथ महादेओ भक्तु
सुरसिद्धागणी विख्यातु | सेविजे जो ||
हरिश्चंद्र देवता | मंगळगंगा सरीता
सर्वतीर्थ पुरविते |सप्त स्थान ||

(प्रचि क्रमांक ८, २३, २५ आनंद काळेकडून साभार... )

सुझे !! :) :)

प्रतिक्रिया

स्पा's picture

17 Jul 2012 - 12:55 pm | स्पा

वृतांत वाचून दणकून इनो घेतल्या गेले आहे

अस्मी's picture

17 Jul 2012 - 1:15 pm | अस्मी

अप्रतिम...निव्वळ अप्रतिम.
खरंच शब्द नाहीत...सुंदर!!

९ नंबरच्या फोटोतील महादेवाची पिंड पाहून आपसूक हात जोडले गेले..आणि हरिश्चंद्रेश्वर मंदिराचा फोटो पण सुंदर.
शेवटच्या फोटोतील कांदेपोहे एकदम tempting दिसतायत. :)

प्यारे१'s picture

17 Jul 2012 - 3:08 pm | प्यारे१

दणकून पोहे आवडले. इनो घेतल्या गेले आहे.

अक्षया's picture

17 Jul 2012 - 1:24 pm | अक्षया

अतिशय सुंदर फोटो आणि लेख..:)

दिपक's picture

17 Jul 2012 - 1:29 pm | दिपक

सुझे फोटो, वर्णन आणि खादाडी पाहुन खपल्या गेलो आहे.

उदय के'सागर's picture

17 Jul 2012 - 2:01 pm | उदय के'सागर

१३ नंबरच्या फोटो मधील गणपती पाहून खूप प्रसन्न वाटले... किती स्वच्छ, किती नितळ... एवढा सुंदर गणपती (मूर्ती) याआधी कधीच पाहिला नव्हता :)

पाऊस अजून पडत नसला तरी हे फोटो पाहून जरा गार वाटलं :)

sneharani's picture

17 Jul 2012 - 2:09 pm | sneharani

मस्त. १२ नंबर चा फोटो मस्तच.

निव्वळ अप्रतिम.

पाचनई गाव आणि तिथून दिसणारा निसर्ग फारच सुरेख.

पियुशा's picture

17 Jul 2012 - 3:14 pm | पियुशा

सुपर्ब !!!!!

स्वप्निल घायाळ's picture

17 Jul 2012 - 3:39 pm | स्वप्निल घायाळ

हरिश्चंद्र गड म्हणजे एक प्रकारचा नशा आहे !!!
लई भारी गड आहे... मी एक ५ वेळा गेलो आहे...
हा गड रात्री चढायला अजून मजा येते .... पण जरा जपून...
फोटो मस्त आले आहेत..

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jul 2012 - 4:48 pm | अत्रुप्त आत्मा

एकच शब्द..... खल्लास...! आणी फोटूंना तर --^--

मी कस्तुरी's picture

17 Jul 2012 - 5:30 pm | मी कस्तुरी

मस्तच...फोटो आणि वर्णन दोन्ही.

स्मिता.'s picture

17 Jul 2012 - 5:54 pm | स्मिता.

गडाचे फोटो एक नंबर आहेत!

स्वाती दिनेश's picture

17 Jul 2012 - 6:00 pm | स्वाती दिनेश

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले,
स्वाती

पैसा's picture

17 Jul 2012 - 6:36 pm | पैसा

दणक्यात ट्रेक केलात की! वर्णन आणि फोटो क्लास! जेवण तुम्ही बनवलंत की काय?

सुहास झेले's picture

17 Jul 2012 - 7:08 pm | सुहास झेले

अगं नाही, गडावर भारमल कुटुंबाने केली होती व्यवस्था. आम्ही आयते खाणारे. जेवण अगदी सुलभ दरात उपलब्ध होते. :)

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Jul 2012 - 8:01 pm | ब्रिटिश टिंग्या

क्या बात है झेले अण्णा!

अर्धवटराव's picture

17 Jul 2012 - 11:13 pm | अर्धवटराव

गडाचा, निसर्गाचा रुबाब अगदी सही सही टिपलाय.
__/\__

अर्धवटराव

५० फक्त's picture

18 Jul 2012 - 8:24 am | ५० फक्त

मस्त रे, पुढच्या वेळी सांग मला, पावसाळ्यानंतर जरुर येईन.

किसन शिंदे's picture

18 Jul 2012 - 8:30 am | किसन शिंदे

जबरदस्त!!

मी_आहे_ना's picture

18 Jul 2012 - 9:51 am | मी_आहे_ना

सुहास, अप्रतिम वर्णन आणि फोटो सुद्धा एकदम मस्त. मी इथे प्र.के.घाणेकरसर (त्यांची हरिश्चंद्राची २४वी वेळ) आणि पांडुरंग पाटणकर (ह्यांची ह्या गडावर जायची ७वी वेळ) ह्या दिग्गजांबरोबर गेलेलो २ वर्षांपूर्वी, ते आठवले. (तुम्ही म्हणल्याप्रमाणे) नोव्हें.मधे गडाची शान एकदम मस्त बघितलेली. आणि तो कोकणकडा तर अप्रतिम. कोणितरी श्री. बर्वे ह्यांनी कोकणकड्यावरून परत जाऊच नये असे वाटल्याने तिथेच उडी मारलेली (१५+ वर्षांपूर्वी), त्यांच्या स्मरणार्थ एका फरशीवर माहिती लिहिलिये कड्यावर.

सविता००१'s picture

18 Jul 2012 - 10:19 am | सविता००१

जबरदस्त फोटो

अमोल केळकर's picture

18 Jul 2012 - 10:43 am | अमोल केळकर

खुप छान :)

अमोल

जागु's picture

18 Jul 2012 - 11:03 am | जागु

सुंदर.

जबरदस्त वर्णन आणि अप्रतिम फोटो!
सुझे, लई मजा केलीत ब्वॉ....! :-)

जातीवंत भटका's picture

19 Jul 2012 - 12:14 pm | जातीवंत भटका

पावसाळ्यात हरिश्चंद्र नेहमीच आनंद देऊन जातो ...

जातीवंत भटका's picture

19 Jul 2012 - 12:14 pm | जातीवंत भटका

पावसाळ्यात हरिश्चंद्र नेहमीच आनंद देऊन जातो ...

गणेशा's picture

19 Jul 2012 - 5:59 pm | गणेशा

अप्रतिम ..

ऑफिस मधुन फोटो दिसले नसल्याने, काल जेंव्हा नेट वर बसलो तेंव्हा धागा पाहिला.
निव्वळ अप्रतिम भाऊ

ज्ञानराम's picture

13 Aug 2012 - 4:07 pm | ज्ञानराम

पाहण्या सारखा गड आहे.. विशाल आणी सुंदर... फोटो अप्रतीम आहेत..
तारामतीचा कडया वर गेलेलात की नाही?.. कोकण कड्यावरुन वाकून पाहीलत की नाही..? गडावरुन दरीत पाण्याची धार पड्ते तेव्हा अस वाटत की मोती टपकतायत... आणी शंकराची ती १०-१२ (अंदाजे) फूट उंचीची पिंड पाहीलीत ना? चांगदेवानी तपश्चर्या केली तो हाच गड.

मदनबाण's picture

15 Aug 2012 - 1:31 pm | मदनबाण

वा... सुहासराव लयं मस्त भटकंती करुन आलात. :)
तो पहिल्या फोटुत भामु आहे ना ?

सुहास झेले's picture

19 Aug 2012 - 10:39 am | सुहास झेले

व्हय बाणा... भामुं आहे त्यो :) :)

सोबत सेनापती रोहन चौधरीदेखील आहेत ;-)