आषाढी स्पेशल : कोंबडी वडे (मालवणी वडे)

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
17 Jul 2012 - 1:52 am

आषाढी स्पेशल : कोंबडी वडे (मालवणी वडे)

साहित्यः

गव्हाचे पीठ - २ वाटी
तांदुळाचे पीठ - १ वाटी
ज्वारीचे पीठ - पाऊण वाटी
बेसन - १/२ वाटी
धणे - १ चमचा
बडिशेप - १ चमचा
जीरे - १/२ चमचा
मेथी - १/२ चमचा
हळद - १ चमचा
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कोळसा - १

कृती:

१. कढईमधे धणे, बडिशेप, जीरे व मेथी भाजुन घ्यावी. हे गार झाल्यावर मिक्सर मधे एकदम बारीक पुड करुन घ्यावी.
२. एका भांड्यामधे सर्व पीठे, चवीनुसार मीठ, हळद व बारीक केलेली पुड टाकुन एकत्र करुन घ्यावे. हे पीठ गरम पाण्याने चपातीच्या कणके प्रमाणे मळुन घ्यावे.
३. हे करताना गॅसवर कोळसा गरम करुन घ्यावा व २-३ चमचे तेल गरम करुन घ्यावे.
४. मळलेल्या पीठामधे एक खड्डा करावा. त्यात गरम केलेला कोळसा ठेवावा व त्यावर गरम केलेले तेल ओतावे. लगेच ते पीठाने झाकावे.
५. ही कणीक झाकुन रात्रभर किंवा ७-८ तास उबदार जागी ठेवावी.
६. ७-८ तासांनंतर पीठ चांगले फुगुन येइल. पीठ परत एकदा थोडा तेलाचा हात लावुन मळुन घ्यावे.
७. कढईमधे तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे.
८. मळलेल्या पीठाचे छोट गोळे करुन घ्यावे. एका प्लॅस्टिकच्या पिशवीला तेलाचा हात लावुन त्यावर गोळा हाताने थापुन घ्यावा.
९. वडा एकदम पातळ किंवा एकदम जाड नको. वडा थापुन झाल्यावर त्या मधे एक भोक करुन घ्यावे.
१०. तेल गरम झाले असल्यास त्यात थापलेला वडा अलगद सोडावा. वडा दोन्ही बाजुने golden brown होई पर्यंत तळावा.
११. गरम गरम मालवणी वडे मटणाचा रस्सा किंवा चिकन सोबत serve करावा.

मटण मसाला

साहित्यः

मटण - १/२ किलो
कांदा - २
टोमॅटो - १
आले - १ इंच
लसुण - ४-५ पाकळ्या
सुके खोबरे - १/४ वाटी
आले-लसुण पेस्ट - २ चमचे
हळद - २ चमचे
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
धणे पावडर - ३ चमचे
मिठ - चवीनुसार
तेल - १/२ वाटी

कृती:

१. मटणाचे तुकडे करुन घ्यावेत. त्याला १ चमचा आले-लसुण पेस्ट, १ चमचा हळद, १ चमचा धणे पावडर व चवीनुसार मीठ लावुन घ्यावे.
२. एका पातेल्यात तेल गरम करावे. त्यात १/२ बारीक चिरलेला कांदा टाकुन परतुन घ्यावा. कांद्याचा थोडा रंग बदलल्यावर त्यात मटण टाकुन नीट परतुन घ्यावे व एकदम कमी गॅसवर झाकुन ठेवावे.
३. ५ मिनिटांनी मटणाला पाणी सुटले असेल. त्यात अजुन १ कप पाणी टाकावे व परत झाकुन शिजु द्यावे.
४. असे साधारण २०-२५ मिनिटामधे मटण शिजेल. गॅस बंद करुन मटण झाकुन ठेवावे.
५. गॅस वर १ कांदा, आले, लसुण व खोबरे भाजुन घ्यावे. ह्याची मिक्सर मधे एकदम बारीक पेस्ट करुन घ्यावी.
६. कढईत तेल गरम करावे. त्यात १ बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. त्यात १ चमचा आले-लसुण पेस्ट टाकुन परतावे.
७. कांदा परतल्यावर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर व चवीनुसार मिठ टाकावे.
८. हे १-२ मिनिटे परतल्यावर त्यात वाटलेला मसाला टाकुन निट परतुन घ्यावा.
९. हा मसाला तेल सुटे पर्यंत परतावा. त्या नंतर त्यात चिरलेला टोमॅटो टाकुन १ मिनिट परतावे.
१०. ह्यात आता शिजलेले मटण टाकावे. मसाला खुप घट्ट असल्यास त्यात थोडे थोडे मटणाचे सुप टाकावे.
११. झाकण ठेवुन मटण ४-५ मिनिटे शिजु द्यावे.
१२. गरम मटण फ्राय खाण्यासाठी तयार आहे.

m1

m2

प्रतिक्रिया

कौशी's picture

17 Jul 2012 - 2:02 am | कौशी

स्पेशल रेसिपीचे आणि तुझे आगमन..
रेसिपी खासच..

Mrunalini's picture

17 Jul 2012 - 2:34 am | Mrunalini

धन्यवाद कौशी,

हो, खुप दिवसांनंतर... सध्या जॉबमुळे वेळच मिळत नाही.

तर्री's picture

17 Jul 2012 - 2:16 am | तर्री

काहीही असो. चविष्ठ असणार नक्की.
मी कधी कधी शाकाहारी असतो ! सध्यापास !!

सुनील's picture

17 Jul 2012 - 2:39 am | सुनील

च्यामारी! मला वाटलं आषाढी स्पेशल म्हणजे काहीतरी साबुदाणा, रताळं, बटाटे वगैरेचा पदार्थ असणार!!

बाकी, पाहताच ही थाळी, "कलेजी" खल्लास झाली!, असे म्हणावेसे वाटतय!

अर्धवटराव's picture

17 Jul 2012 - 2:45 am | अर्धवटराव

४. मळलेल्या पीठामधे एक खड्डा करावा. त्यात गरम केलेला कोळसा ठेवावा व त्यावर गरम केलेले तेल ओतावे. लगेच ते पीठाने झाकावे.
-- गरम तेल कश्यावर ओतावे? कोळश्यावर? आणि पिठाने झाकावे म्हणजे काय ?

अर्धवटराव

मोदक's picture

17 Jul 2012 - 7:34 am | मोदक

बरोबर शंका..

स्मोक्ड् फ्लेवर साठी मटण / चिकन शिजल्यानंतर त्यात एक वाटी ठेवून व वाटीत असा कोळसा ठेवून तेल ओतायचे, लगेचच झाकण ठेवायचे. एकदम खंग्री फ्लेवर येतो.

इथले मात्र कळाले नाही.

धन्यवाद :)

आहो, कोळसा ठेवायचा म्हणजे, जे पीठ मळले आहे, त्या पीठात एक खड्डा करायचा. त्या खड्ड्यात गरम केलेला कोळसा ठेवायचा. ह्या कोळश्यावर गरम केलेले तेल ओतायचे. तेल ओतल्यावर लगेच धुर येईल. तो smoke flavour तसाच ठेवण्यासाठी, तो कोळसा लगेच बाजुच्या पीठाने झाकायचा. हे पीठ ७-८ तास उबवण्यासाठी ठेवायचे.

अर्धवटराव's picture

18 Jul 2012 - 1:15 am | अर्धवटराव

अस्सं आहे होय.
हि टेक्नीक माहितच नव्हती.

धन्यवाद मोदक शेठ, मृणालिनी.

अर्धवटराव

वा वा.. श्रावण आदि पाळत नसल्याचा आनंद झाला. मांसाहारी असणं सार्थक करणारी पाककृती..

कृती पेक्षा जे भन्नाट फोटो टाकलेच तेच लक्ष खेचून घेतायत . चहा बरोबर पण हे वडे अफलातून लागतात. वडे करायचा सध्या तरी विचार नाही पण ताव मारायचा मूड मात्र नक्कीच .

सानिकास्वप्निल's picture

18 Jul 2012 - 3:57 am | सानिकास्वप्निल

पाकृ जबरदस्त :)
पण पाकृचे नाव कोंबडी-वडे असे का दिले आहे?? वडे - मटण असले पाहीजे असे वाटते कारण तू चिकन ऐवजी मटणाची पाककृती दिली आहेस ना

गटारी जोरात का?? ;)

चिंतामणी's picture

20 Jul 2012 - 6:48 pm | चिंतामणी

मलासुद्धा हीच शंका आहे.

कृपया जांणकारांनी शंका निरसन करावे.

पुर्वी इथेच एकदा पाकृ वाचली होती. त्यात चिकन होते.

माझ्या कोल्हापुरी मीत्राला विचारले तर तो म्हणाला चिकनच असते.

चल माझ्या पाकृ पेक्षा काहीतरी नविन. नेहमी माझ्या पद्धतिचे खाउन कंटाळा आला होता बघ.
फोटो मस्तच .

स्वैर परी's picture

24 Jul 2012 - 3:32 pm | स्वैर परी

खुप च भारी दिसतेय!
इथे एक टीप अशी, कि कोळसा उपलब्ध नसल्यास करवंटी गॅस वर पेटवुन तिचा निखारा पीठात ठेवला तरी देखील चालते! हे वडे गरम मस्तच लागतात, पण शिल्लक राहिलेले वडे दुसर्या दिवशी नाष्त्याला खायला हि छान लागतात! :)