पारिजातक

मंदार दिलीप जोशी's picture
मंदार दिलीप जोशी in जे न देखे रवी...
10 Jul 2012 - 12:06 pm

आठवतं तुला?
दोन वेगळ्या वाटांवर चालता चालता
एका वळणावर आपण अवचित भेटलो होतो
तेव्हा तू हातात हात गुंफुन
थरथरत्या ओठांनी मला म्हणालीस
एकत्र चालायचं का रे?

"अगं पण......"
पण काय? अरे वेड्या...
एक भयानक वादळ आलंय
धुंद लाटांवर जीवापोटी धडपडताना
आपलं जगणंच एक वादळ झालंय
म्हणूनच साद घालते आहे तुला
निव्वळ माझ्यासाठी नव्हे रे
तुझीही तगमग बघवत नाहीये मला

सारे "पण" विसरुन तुझा हात हातात घेतला
ती जागा आणि तो क्षण अविस्मरणीयच
पण वादळ गेलं आणि लाटा पुन्हा शांत झाल्या
आपल्या वाटा पुन्हा फिरुन वेगळ्या झाल्या
आणि....
तो क्षण निसटलाच तेव्हा
हातातून वाळूचे कण अलगद निसटावेत तसा

आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच वळणावर
ती जागा तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या रोपट्याचा आता पारिजातक झालाय
तू मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत नाही, नियतीकडे तक्रारही नाही
कारण तिथे अक्षय दरवळणारा तो गंध
तुझाच तर आहे!!

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मुक्तक

प्रतिक्रिया

स्पा's picture

10 Jul 2012 - 12:11 pm | स्पा

मस्त रे मंदार ..
मिपावर स्वागत :)

झंम्प्या's picture

10 Jul 2012 - 1:25 pm | झंम्प्या

आवडली आपली कविता... छान लिहीता...

गोंधळी's picture

10 Jul 2012 - 3:36 pm | गोंधळी

आवडली.

मराठमोळा's picture

10 Jul 2012 - 3:59 pm | मराठमोळा

मुक्तक जमले आहे असे वाटते ( रच्याकने, मला यातलं काही कळत नाही ) ;)

हे मला सुचलेले विडंबनः

आठवतं तुला?
दोन वेगळ्या धाग्यांवर प्रतिसाद देता देता
एका धाग्यावर आपल्या दोघांचे प्रतिसाद उडाले होते
तेव्हा तू माझे कान फुंकुन
थरथरत्या शब्दांनी मला म्हणालीस
एक नविन संस्थळ काढायचं का रे?

"अगं पण......"
पण काय? अरे वेड्या...
नव्या प्रशासनाचं वादळ आलंय
तिरकस प्रतिसाद देता येईना
म्हणून आपलं मन एक वादळ झालंय
म्हणूनच वेड्यात काढते आहे तुला
निव्वळ माझ्या स्वार्थासाठी नव्हे रे
तुझाही बावळटपणा बघवत नाहीये मला

सारे "भेद" विसरुन तुझा प्रस्ताव हातात घेतला
ते संस्थळ आणि तो व्यनी अविस्मरणीयच
वादळ गेलं पण लाटा शांत झाल्या नाहीत
आपल्या वाटा पुन्हा फिरुन वेगळ्या झाल्या नाहीत
आणि....
ती संधी निसटलीच तेव्हा
हातातून वाळूचे कण अलगद निसटावेत तशी

आजही मी पुन्हा पुन्हा जातो तिथेच, त्याच संस्थळावर
ती माया तशीच आहे
आपण तिथे लावलेल्या आगीचा आता ढिम्म कोळसा झालाय
मनःशांती मात्र भेटत नाहीस आताशा
हरकत आहे, नियतीकडे तक्रारही आहे
कारण तिथल्यासारखी अक्षय दरवळणारी ट्यार्पी
मला इथेही हवी आहे!!

महत्वाची सूचना: विडंबन हलकेच घ्यावे आणि समजूनही घ्यावे. न समजल्यास माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नये. :)

नाना चेंगट's picture

13 Jul 2012 - 11:16 am | नाना चेंगट

अतिशय हलकट पण अगदी योग्य विडंबन आहे.

बॅटमॅन's picture

13 Jul 2012 - 7:09 pm | बॅटमॅन

लै भारी विडंबन!

जाई.'s picture

10 Jul 2012 - 6:37 pm | जाई.

कविता आवडली

प्रभाकर पेठकर's picture

13 Jul 2012 - 8:28 am | प्रभाकर पेठकर

फुले बहरली प्राजक्तांची, ओंजळ भरली प्राजक्तांनी,
प्राजक्तांची प्रसन्नता मज, प्राजक्तांनी अर्पण केली.

माझ्याच, कधी एका वेड्या क्षणी स्फुरलेल्या, कवितेतील ओळी आठवल्या.

मुळ कविता आणि मराठमोळा ह्यांचे विडंबन दोन्ही आवडले.

अभिनंदन.