किल्ले भोरगिरी - परसबाग उपक्रमाची पहिली पायरी

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in भटकंती
4 Jul 2012 - 11:04 pm

आधी परसबाग उपक्रमाविषयी थोडं सांगतो. गेल्या १६ वर्षांतील माझ्या भटकंतीत अगणित वेळा किल्ल्यांच्या गावांत, घाटमाथ्यावरच्या, तळकोकणातल्या वाड्यां-वस्त्यांवर, धनगरपाड्यावर तर कधी कोण्या ठाकरवाडीत मुक्काम ठोकले आहेत. त्यांच्या घरी अनेकदा त्यांच्या मांडीला मांडी लावून यथेच्छ जेवलो आहे. या सगळ्यात माझ्या एक गोष्ट ध्यानी आली, ती म्हणजे यांच्या जेवणात मुख्यत्वे भात, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी आणि भाकरीबरोबर खायला फक्त ठेचा किंवा खरडा आणि डाळ किंवा पिठलं. आहारात हिरव्या भाज्यांचा लक्षणीय अभाव ! मग या अभावाची प्रमुख कारणं शोधली. बाजारपेठ लांब असल्यामुळे ताज्या भाज्या फक्त आठवड्याच्या बाजारालाच मिळंत. त्या विकत घेण्यासाठी लागणारे पैसे बर्‍याचदा अनेक कुटुंबांकडे नसतात, आणि भाजी विकत आणली जरी तरी ती आठ दिवस टिकत नाही. यावर काहीतरी उपाय-योजना करावी अशी खूप दिवसापासून इच्छा होती. परसबागेविषयी कुठेतरी वाचण्यात आलं होतं. स्वता:च भाज्या पिकवाव्यात आणि आपल्या आहारात त्यांचा वापर करावा ही संकल्पना, माझ्या समस्येवर थोडीतरी प्रभावी ठरेल असे वाटले आणि विचारांची चक्र या परसबाग उपक्रमापाशी येऊन थांबली. भटकंतीनिमित्त मी अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांवर फिरत असतोच तर मग त्याच वेळी तिथे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या बिया वाटायच्या, लोकांना परसबागेचे महत्व आणि माहिती पुरवायची हे नक्की केलं. पावसाळ्यात या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवायची ठरवलं. माझे काका श्री. श्रीकांत सातारकर हे शासनाच्या कृषी खात्याच्या बी-बियाणे विभागात अधिकारी आहेत. त्यांच्याशी संपर्क करून काही मदत मिळू शकेल का ? याबद्दल बोलणी केली. त्यांना या उपक्रमाबद्दल सविस्तर माहीती दिली. त्यांनीही संपूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शविली. जूनच्या तिसर्‍या आठवड्यात काकांनी माझ्या हाती भेंडी, गवार आणि मुळा या भाज्यांच्या बिया ठेवल्या देखिल ! उपक्रमाला आकार येऊ लागला होता आणि त्याची सुरूवात भोरगिरीच्या वाडीवरून करायची असे ठरविले. झालं ३० जून आणि १ जुलैला भोरगिरी ट्रेक ठरला !

भोरगिरी गावातून दिसणारा किल्ला

भोरगिरी राजगुरूनगर तालुक्यातलं शेवटचं गाव. गाव म्हणण्यापेक्षा वस्ती म्हणूयात. १५-२० घरांच्या दोन वाड्या आहेत. शनिवारी दुपारी आम्हा नऊ भटक्यांची टोळी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर भोरगिरीच्या दिशेने निघाली. पुणे-नाशिक हायवेवरून राजगुरूनगर साधारण ४५-५० किलोमीटर आहे. इथून एक रस्ता डावीकडे भोरगिरी कडे जातो. भोरगिरी इथून ५६ किलोमीटर आहे. फाट्याहून आत शिरलो तेव्हा दोन वाजले होते. उन्ह-सावलीचा खेळ चालू होता. डाव्या बाजूला चासकमान धरणाचा सुकलेला जलाशय सोबत करीत होता. आमच्यासारखा तोही पावसाच्या भेटीस तहानलेला दिसंत होता. कमान, चास, वाडा ही गावं सोडली आणि फराळासाठी गाड्या एका मोठ्या झाडाखाली लावल्या. बाजूच्याच शेतात बसून बरोबर आणलेला फराळावर ताव मारला. आनंद उर्फ पिंट्या एकादशी आणि दुप्प्ट खाशी .. असलं काहीतरी बरळत होता. त्याच्याकडे सोईस्कर कानाडोळा करत सगळ्यांनी खिचडी, बटाट्याचा चिवडा, राजगिरा रोलचा फन्ना उडवला. भोरगिरी गावात पोहोचलो तेव्हा चार वाजले होते. गावाबाहेरच्या कोटेश्वराच्या मंदिरापाशी गाड्या लावल्या.

मंदीराशेजारील घाट

भीमा नदीचे डोह

भीमा नदीचे डोह

भीमा नदीच्या काठावरचं हे शंभूमहादेवाचं मंदिर आणि घाट साधारण नवव्या शतकातले असल्याचे उल्लेख सापडतात. गडावरच्या गुहा आणि बांधकाम देखिल याच काळातलं. मंदीराच्या प्रांगणात मोठ्ठा पार आहे आणि आसपास बरीच भग्न शिल्प विखुरली आहेत. भोरगिरी किल्ल्याचं एक नाव भंवरगिरी असंही आहे. किल्याच्या नावावरूनच गावाचं नाव भोरगिरी असे पडले.

मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे

मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे

मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे

मंदीराच्या प्रांगणातील शिल्पे

नदीला चांगलं चार-पाच फुट पाणी होतं. पाणी बघताच शितल श्रीकांतला एकदम चेव आला. आत्ताच पाण्यात जायचं म्हणून शितल हटून बसली. गडावरून आल्यावर निदान एक तास तरी डुंबायचं या आश्वासनावर तिने आपला हट्ट मागे घेतला आणि आम्ही गडाची वाट धरली. भोरगिरी समुद्रसपाटीपासून साधारण ८५० मीटर उठावला आहे. पण गावातून त्याची उंची १५० मीटरच्या आसपास असेल. गावातून ३० मिनिटात गडमाथा गाठता येतो. गावातून सावित्राबाई नावाच्या मावशीही आमच्यासोबत गडावर यायला निघाल्या. या सावित्राबाई गेली कित्येक वर्षे न चुकता गडावरील महादेवाची आणि महालक्ष्मीची सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती आणि पूजा करत आहेत. वाटेतल्या ओढ्यावर फेब्रुवारी महिन्यात शासनाने बांधलेला बंधारा आडवा आला.

वार्‍यावर तरारणारी भाताची रोपं

वाटेवर लागणारा छोटेखानी धबधबा

तो पार करून गडाच्या वाटेला लागलो थोडं वर जाताच एक वाट सरळ गडावरल्या गुहेकडे जाते आणि एक वाट उजवीकडून गडाला वळसा घालून माथ्यावर जाते. हिलाच पुढे जाऊन गुहेकडून येणारी वाट येऊन मिळते. गुहेकडे जाण्यार्‍या वाटेवर सोप्या श्रेणीतील प्रस्तरारोहण करून १५ मिनिटात गुहेत पावते झालो. इथे ४०-५० लोकांची झोपण्याची सोय होऊ शकते. आतल्या गाभार्‍यात एक पुरातन शिवलिंग आहे त्यावर लहान लहान १२ पिंडी आहेत. ही बारा पिंड बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिक आहेत अशी माहीती सावित्राबाईंकडून मिळाली. गुहेपासून उजव्या हाताला गेल्यावर महालक्ष्मीची बारामाही पाण्यात असणारी गुहा आहे.

गडावरून दिसणारं भोरगिरी गाव

गुहेतला नंदी अन् गाभारा

बारा पिंडी असलेलं शिवलिंग

क्षणभर विश्रांती

बारामाही पाण्यात असलेली महालक्ष्मी गुहा

शेजारीच पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत. त्यातील थंडगार आणि मधुर पाणी वर्षभर आपल्या सारख्या भटक्यांची तहान भागवते. गुहेवरून वाट थोडी खाली जाऊन गडमाथ्याकडे जाण्यार्‍या मुख्य वाटेला येऊन मिळते. गडाचे दरावाजे होते यावर विश्वास बसणार नाही इतकी पडझड झाली आहे. नावालाच शोभाव्या अशा तटबंदीच्या काही खुणा आढळतात. वर पोहोचल्यावर समोरच गुहासदृश कोठ्या आहेत.

भिमाशंकर अभयारण्य

कोठ्या

गडमाथ्याकडे जाणारी वाट

कोठ्यांकडून उजव्या हाताला गेल्यावर झाडीमधे एक-दोन शंकराच्या पिंडी आणि काही दगडी अवशेष आहेत. इथून माथ्याकडे गेल्यावर काही पडकी जोती दिसतात. गडफेरी करताना दगडात खोदलेली ४-५ खांब टाकी नजरेस पडतात. इतक्या छोटेखानी गडावर इतक्या जास्त प्रमाणात टाकी का असावीत असा प्रश्न पडला, पण त्या टाक्यांची जागा लक्षात घेता तटबंदी बांधण्याकरता लागणारा दगड या टाक्यांतूनच काढला असणार हे ध्यानात आलं. थोडेफार फोटो काढून गड सोडला.




डावीकडून आदर्श, श्रीकांत, शितल, शुभम, आनंद उर्फ पिंट्या, पल्लवी, अनिकेत आणि नितीन

चला विसावू या कड्यावर

पाण्याची टाकी


नागफणी

गो ग्रीन !

वाटेत येताना जनता करवंदांच्या जाळ्यात अडकली आणि मग चिकट हात आणि रंगलेली तोंड घेऊन सगळी मंदीरात परतलो. सगळ्यात आधी मी पाण्यात सटकलो. एकटाच होतो. त्या शांत मळभ भरल्या आसमंताखाली भीमेच्या डोहातल्या नितळ पाण्यावर तरंगताना जे काही अनुभवलं, जे काही मनी दाटलं ते शब्दांत मांडणं कठीण ! तंद्रीच लागली होती माझी. थोड्याच वेळात शितल, श्रीकांत, पल्लवी, अनिकेत, नितीन आणि आदर्श पाण्यात शिरले आणि दंगा सुरू झाला. तासभर यथेच्छ डुंबून झाल्यावर बाहेर निघालो. उपवास असल्याने वरईच्या तांदळाच्या खिचडीचा बेत आखला होता. तयारीला लागलो. कोणी वरई धुवून आणली, कोणी बटाटे चिरले, कोण कोथिंबीर निवडत होतं. मी स्टोव्ह पेटवून फोडणी दिली आणि वरई शिजू लागली. पिंट्याच्या पोटातल्या कावळ्यांची आता गिधाडं होऊ लागली होती त्यामुळे त्याच्या पोटलीतून बर्‍याच प्रकारचे वेफर्स आणि तत्सम जिन्नस बाहेर पडले. खिचडी मस्त झाली होती हे, ती खाताना सगळ्यांनी पाळलेल्या सामूहिक मौनावरूनच कळत होते. मी मनातल्या मनात स्वता:ची पाठ थोपटून घेतली. रात्री उनो खेळणे, मोठ्या आवाजात गाणी म्हणणे, कोणालातरी यथेच्छ चिडवणे असले प्रकार करत झोपायला दोन वाजले.

निरागस

निरागस

सावित्राबाई आणि त्यांचं गोंडस पिल्लू

सकाळी लवकर उठून सगळे तयार झाले. कारणही तसेच होते. विकीमॅपियावर पाहिलेला एक धबधबा शोधायला आम्ही भिमाशंकरच्या अभयारण्यात शिरणार होतो. सावित्राबाईंकडुन जुजबी माहीती मिळाली. त्या दिशेने आमचा मोर्चा वळवला. वाटेत बरेच लहान मोठे धबधबे आडवे आले. एकदोन ठिकाणी सोप्या श्रेणीचे कातळारोहण करून जंगलात अजून आत शिरलो.

धबधबा

धबधबा

धबधबा

धबधबा

जंगली श्वापदांच्या अधिवासात आपण आलो आहोत हे दर्शविणार्‍या अनेक खूणा नजरेस येत होत्या. कधी एखाद्या वन्य प्राण्यांची विष्ठा, कधी रानडुकरांनी उकरलेली जमीन एक ना दोन. एकदम मी थबकलो, एका झाडाच्या बुंध्यावर नख्यांनी ओरखडल्याच्या खुणा होत्या. त्यातल्या काही जमीनीपासून तीन फुटांवर तर काही पाच फुटांवर होत्या. त्यातल्या एक तर नक्कीच बिबट्याच्या होत्या. दुसर्‍यांचा अंदाज नाही आला. थोड्या अस्पष्ट होत्या. क्षणात एक थंडगार लहर अंगभर पसरली. पण आम्ही ९ जणं होतो त्यामुळे फारसा धोका नव्हता. तसेच पुढे निघालो.

नखांनी ओरखडलेल्या खुणा

धबधबा

थोड्याच वेळात आम्ही ज्याच्या शोधात होतो, तो दिड-दोनशे फुटावरून टप्याटप्प्यांत कोसणारा धबधबा सामोरा आला. एक समाधानात्मक विजयी मुद्रा चेहर्‍यावर पसरली आणि आम्ही सगळेच देहभान विसरून त्या धबधब्यामुळे तयार झालेल्या डोहात उतरलो.

धबधबा

श्रीकांत आणि पिंट्या

मस्ती.कॉम

धबधबा

धबधबा

चांगले दोन-तीन तास त्या थंडगार पाण्यात मस्ती करून परतीच्या मार्गावर निघालो. येताना आलेल्या वाटेला पर्यायी वाट शोधायला मी थोडा पुढे गेलो. तिथूनच एक ढोरवाट पकडून गावात पोहोचते झालो.

सावित्राबाईंना वाडीतल्या सगळ्या कुटुंबातल्या महिलांना एकत्र करण्यास सांगून मी बीयाणं आणायला गाडीकडे गेलो. आधी तर लोकांना वाटले की भाज्यांच्या बिया विकणारेच लोक आले आहेत. म्हणून त्यांनी या सभेला नापसंती दर्शविली. मग सावित्रांबाईंनी त्यांना सांगितले की हे लोक उपक्रमवाले आहेत. ते कोणत्याही प्रकारचे पैसे घेणार नसून आपल्याला भाजीपाल्यासाठी बियाणं वाटायला आले आहेत. तेव्हा कुठे ताया-माया जरा पुढे सरायला लागल्या. मग मी सगळ्यांना परसबाग उपक्रमासंबंधीत माहीती दिली. सोबत आणलेल्या बियांणांची आणि त्या कशा लावयच्या याची माहीती दिली. वाडीतल्या १५ कुटुंबांना बियाणं देऊन त्यांची नावं आणि असतील तेव्हढे दूरध्वनी क्रमांक यांची डायरीत नोंद केली. एक महिन्यानंतर परत भोरगिरीला जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घ्यायचं ठरवलं. मधल्या काळात सावित्राबाई मला जमेल तेव्हढी माहिती फोनवरून कळवणार होत्या. त्या सगळ्या गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर आम्हाविषयी कौतुकाचे भाव दिसत होते. यातच सगळं आलं होतं. उपक्रमाचं पहिलं पाऊल तर सुरळीत पडलं होतं. अजून बरीच मोठी वाटचाल होणे आहे !

येताना वाड्यातल्या हाटीलात मिसळ हाणताना सगळ्यांच एकच म्हणणं पडलं ! यंदाच्या पावसाळ्यात भोरगिरीला किमान अजून दोनदा तरी यायचंच !!

--

अमोल नाईक (जातीवंत भटका)

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

4 Jul 2012 - 11:14 pm | श्रावण मोडक

उपक्रमाला शुभेच्छा. आनंद झाला.
प्रकाशचित्रे पुन्हा-पुन्हा पहावीत अशीच.

मान गये! तुमचा उपक्रम अन ते फोटू दोन्हीलाही!!

मोदक's picture

5 Jul 2012 - 2:23 am | मोदक

हाक मारत जा रे...

_/\_

ग्रेट आहात तुम्ही

वाचून हेच मनात आलं

चित्रगुप्त's picture

4 Jul 2012 - 11:43 pm | चित्रगुप्त

अप्रतिम फोटो आणि माहिती.
उपक्रमास शुभेच्छा.

मुक्त विहारि's picture

5 Jul 2012 - 2:03 am | मुक्त विहारि

एक स्तुत्य उपक्रम करत आहात.

पुन्हा जाल तेंव्हा एक धागा तरी काढा, पाउस आणि पाणि हे माझे मोठे विक् पॉइंट आहेत.

चांगला उपक्रम. फोटू आणि वर्णन एकदम भारी!
गो ग्रीन भलताच आवडला.

अर्धवटराव's picture

5 Jul 2012 - 8:08 am | अर्धवटराव

मस्त वाटला उपक्रम.
शुभेच्छा :)

अर्धवटराव

प्रचेतस's picture

5 Jul 2012 - 8:41 am | प्रचेतस

फार सुंदर आहे हे सर्व.

चौकटराजा's picture

5 Jul 2012 - 8:57 am | चौकटराजा

आरोग्याची, निसर्गाची , वारशाची, जाणीव "अमोल " आहे. हा " जातिवंत नायक" आपल्याला ही जाणीव करून देत आहे. आभार !
चित्रण शब्दातील व शब्दापलिकडचे दोन्ही बहारदार , मधाळ धबधबे, शिवारे,शिल्पे अन माणसे सारेच भावले.

भोरगिरी ते भीमाशंकर ट्रेक बद्दल ऐकले होते. सुंदर!

नाखु's picture

5 Jul 2012 - 9:54 am | नाखु

काम.... (मी या उपक्रमात सहभागी होऊ शकतो का?)

jaypal's picture

5 Jul 2012 - 10:10 am | jaypal

परसबाग उपक्रम तिनही गोष्टी प्रचंड आवडल्या. आयडीयाची कल्पना लै भारी.

अवांतर = संदर्भ फोटो क्र.१०. जर भात, नाचनी व डाळ पिकते/पिकवतात तर मग भाज्या का नाहीत ? का करे कन्फुज हुं !!

जातीवंत भटका's picture

5 Jul 2012 - 10:39 am | जातीवंत भटका

डाळ पिकत नाही, बर्‍याचदा आहारात मुलभूत गरज म्हणून आणली जाते बाजारातून. आणि बाकी काही पिकवत नाहीत कारण त्यांना घरासाठी वर्षंभर धान्य(तांदूळ) आणि थोडं विकायला (जेणेकरून वर्षांचं तेल-तिखट भरता येईल) हे करतानाच पावसाळा सरून जातो. पावसाळा सोडला पाण्याची बहुतांशी वानवा असते. त्यामुळे बाकी पिकं घेणं शक्य होत नाही. हिवाळ्याच्या सुरवातीला फार फार तर नाचणी होते. बियाणंही महाग आहेत भाज्यांची, जी घेणं सर्वसामान्यांना परवडत नाही आणि ती मिळण्याची ठिकाणंही बरीच कमी आहेत. तरी काही काही समंजस घरातून शेतांच्या बांधांवर बर्‍याचदा पालेभाज्यांची, शेंगांची लागवड होते. पण हे प्रमाण ५-१०% पेक्षा जास्त नसावं.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2012 - 10:08 am | बिपिन कार्यकर्ते

_/\_
<3

उदय के&#039;सागर's picture

5 Jul 2012 - 11:04 am | उदय के'सागर

खुपच स्तुत्य उपक्रम आहे तुमचा आणि तुमचे 'फोटोग्राफी' कौशल्य तर 'क्या कहने' :)

बाकि तुमच्या ह्या (रमणिय) उपक्रमामधे सहभागी व्हायला जरुर अवडेल :)

तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

मी_आहे_ना's picture

5 Jul 2012 - 2:08 pm | मी_आहे_ना

अतिशय स्तुत्य उपक्रम आणि अफलातून फोटो! मानलं तुम्हाला. तुमच्या ह्या उपक्रमाला भरपूर शुभेच्छा आणि आम्हालाही त्यात सहभागी होण्याचा योग यावा अशी देवापाशी प्रर्थना.

तुमच्या स्तुत्य उपक्रमात सहभागी व्ह्यायला नक्कीच आवडेल..

दीप्स's picture

5 Jul 2012 - 2:17 pm | दीप्स

नमस्कार !!
जबरदस्त आहेत फोटो आणि वर्णन!!
किल्ले भोरगिरी - परसबागेचा उपक्रम तर खरच सेलूट करण्यासारखाच आहे.

पियुशा's picture

5 Jul 2012 - 2:23 pm | पियुशा

सॉल्लीड!!!!! शब्दच नाहीत स्तुती करायला :)
तुझ्या फोटुग्राफिला सलाम !!!!!

सहज's picture

5 Jul 2012 - 2:34 pm | सहज

त्या वाडीतली निरागस निरागस गोंडस पिल्ले आता भयानक वैतागणार तुम्हा ट्रेकस्टारांवर!! :-)

परसबाग उपक्रम आवडला हे वे सां न ल

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jul 2012 - 2:40 pm | परिकथेतील राजकुमार

तुझ्या ह्या उपक्रमाला सलाम आणि शुभेच्छा.

फोटो, वर्णन आणि उपक्रम सगळेच लाजवाब.

हवांतर :- शंकराची पिंड नाही रे, पिंडी असते.

जातीवंत भटका's picture

5 Jul 2012 - 3:29 pm | जातीवंत भटका

सुधारणा केल्या आहेत आहेत.

राही's picture

6 Jul 2012 - 4:07 pm | राही

पिंडी या शब्दाचे पिंड हे लघुरूप बोलीभाषेत, विशेषतः बायकांच्या बोलीत सररास रूढ आहे. कावळ्यासाठीचा पिंड, स्वभावाचा पिंड या संदर्भात पिंड पुंलिंगी तर पिंडीचे लघुरूप पिंड स्त्रीलिंगी.
अशी अनेक रूपे मराठीत आहेत. जसे भाकरी-भाकर, कातरी-कातर, आरती-आरत, पाणंदी(पांदी)-पाणंद, पांढरी(जमीन)-पांढर, कुसरी(सुकवलेली भाजी)-कुसर, (कुसरी मेथी किंवा मेथीची कुसर), धाबळी- धाबळ वगैरे वगैरे. सुवासिनीचे सवाष्ण हेही तंतोतंत नसले तरी थोडेफार त्याच प्रकारातले.

स्मिता.'s picture

5 Jul 2012 - 2:57 pm | स्मिता.

उपक्रम खूपच प्रशंसनीय आहे, खूप आवडला. मागेही केव्हातरी प्राथमिक उपचारांच्या साधनांचा उपक्रन केल्याचं वाचनात आलं होतं. या सगळ्या उपक्रमांना हार्दिक शुभेच्छा!

बाकी वर्णन आणि फोटो नेहमीप्रमाणेच क्लास आहेत.

उत्तम उपक्रम, भटकंती आणि फटु. :)

नेहमीप्रमाणे अप्रतिम भाऊ

गोंधळी's picture

5 Jul 2012 - 3:54 pm | गोंधळी

तुमचे फोटो, वर्णन आणि उपक्रम
एकदम झक्कास.

अमोल केळकर's picture

5 Jul 2012 - 4:30 pm | अमोल केळकर

अभिनंदन आणि शुभेच्छा :)

अमोल

पैसा's picture

5 Jul 2012 - 5:52 pm | पैसा

सगळे फोटो आणि वर्णन नेहमीप्रमाणे अप्रतिम आहेच, पण परसबागेतील भाज्यांचा हा उपक्रम आवडलाच.

उपटसुंभ's picture

5 Jul 2012 - 6:13 pm | उपटसुंभ

उपक्रम स्तुत्य, वर्णन छान, प्रकाशचित्रे अप्रतिम..!
पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा..! :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Jul 2012 - 2:09 am | निनाद मुक्काम प...

फोटो , लेखन , उपक्रम
आणि आमचा भटक्या
निव्वळ कौतुकास्पद

बघताय काय ,सामील व्हा ह्या घोषणेची आठवण झाली.

जेव्हा कधी भारतवारी करू तेव्हा एक ट्रेक भटक्यासोबत ,व एकतरी कट्टा मिपाकारांसोबत नक्की.

बर्‍याच दिवसांनी काही वेगळा ( जिलबी विरहित )धागा दिसला भटकंती मधे, त्यामुळे इकडे वळलो... सर्वच फोटो अप्रतिम.. आणि आपला उपक्रम सुद्धा प्रशंसनीय आहे.

कॅमेर्‍याबद्दल माहिती देऊ शकाल का?

झकासराव's picture

6 Jul 2012 - 12:07 pm | झकासराव

फोटो, वर्णन आणि उपक्रम सगळच बेष्ट :)

स्वाती दिनेश's picture

6 Jul 2012 - 1:01 pm | स्वाती दिनेश

फोटो सगळेच मस्त आणि उपक्रम उत्तमच. भटकंती करत नुसताच आनंद घेण्यापेक्षा त्यामागचा विचार भावला. मग तो गडांवरचा दीपोत्सव असो किवा बी बियाणांची सोय करणे..
तुमच्या उपक्रमाला खूप शुभेच्छा!
स्वाती

अजून एक निरीक्षणः सुरुवातीचे काही फोटोज हे ब्रेव्हहार्ट पिक्चरमधील सुरुवातिच्या काही सीन्समधील स्कॉटलंडच्या भूदृश्याशी अतिशय जवळचे वाटताहेत..अनकॅनी रिसेम्ब्लन्स..

कवितानागेश's picture

6 Jul 2012 - 1:30 pm | कवितानागेश

फोटो आणि वर्णन अप्रतिमच आहेत.
उपक्रमही चांगला आहे.
ए क शंका: आत्ता आलेल्या भाज्यांपासून पुढच्या वर्षीसाठी बियाणे कशी काढायची?
हे त्यांना माहित असते का? की तुम्ही शिकवता?

जातीवंत भटका's picture

6 Jul 2012 - 3:03 pm | जातीवंत भटका

ठराविक भाज्यांचे बियाणे भाज्यांपासूनच काढता येते. पण बर्‍याचदा ते जमत नाही. बियाणे काढण्याच्या वेळा चुकतात. पण आमचा बेत हा संकल्प कायमस्वरुपी राबवण्याचा आहे. त्याकरता त्यांना आम्ही वेळोवेळी संपर्क करणार आहोत, तसेच त्यांच्याकडेही आमचे दुरध्वनी क्रमांक देऊन आलो आहोत.

उत्तम उपक्रम. सुरेख फोटो.
मी येणार आहे पुढल्या खेपेस.

सुमीत भातखंडे's picture

6 Jul 2012 - 11:08 pm | सुमीत भातखंडे

_/\_

दशानन's picture

6 Jul 2012 - 11:34 pm | दशानन

दोन शब्दात सांगायचे तर निव्वळ अप्रतिम गड्या !!!

किसन शिंदे's picture

8 Jul 2012 - 1:25 pm | किसन शिंदे

जबराट रे सगळंच. :)

सोत्रि's picture

8 Jul 2012 - 1:52 pm | सोत्रि

स्तुत्य उपक्रम _/\_

फोटोही मस्तच!

- (भटका) सोकाजी