अळूवडी ( क्रिस्पी)
साहित्य :
१) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम )
२) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते )
३) हिरव्या मिरच्या ७-८.
४) लसूण पाकळ्या ७-८.
५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा .
६) गुळ १ छोटा चमचा (किसून)
७) चिंचेचा कोळ १ चमचा .
८) मीठ चवीनुसार .
९ )तळण्यासाठी तेल .
१० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल).
कृती :-
अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या .
अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ कापून घ्या .
आता हिरव्या मिरच्या अन लसूण याच वाटण करून घ्या .
एका बाउलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या ,मिश्रण जास्ती पातळ नको जास्ती घट्ट नको ,मध्यम ठेवा
आता एक पान घ्या ज्या बाजूला शिरा असतात त्या बाजूला वरील मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या
आता त्यावर पुन्हा एक पण ठेवा ,परत सेम कृती करा ,असे कमीतकमी ३-४ पानाच्या थराला व्यवस्थित मिश्रण लावून घ्या
नंतर ह्या पानाचा अलगद गुंडाळी करा
एका चाळणीत हे रोल वाफवायला ठेवा
चाळण फिट्ट बसेल अशा आकाराचे एक पातेले घ्या
त्यात पाणी गरम करून घ्या त्यावर चाळणी ठेवून वरून एक घट्ट झाकण ठेवा
साधारण १०-१५ मिनिट वड्या उकडून घ्या
सुरी खुपसून पहा जर सुरीला बेसन लागले नाही तर वडी शिजली समजावी
आता ह्या उकडलेल्या वड्या थोड्या थंड होऊ द्या.
आता वड्याचे काप करा ,जर तुम्हाला वड्या क्रिस्पी अन कुरकुरीत हव्या असतील तर काप पातळ करा
अन जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर जाडसर ठेवल्या तरी चालतील
आता एका कढईत तेल गरम करून सर्व वड्या छान खरपूस तळून घ्या थोड्याश्या लालसर होईपर्यंत !! क्रिस्पी अळूवड्या तयार आहेत .
आमच्याकडे सर्वाना कुरकुरीत वड्या आवडतात .म्हणुन मी शक्यतो कुरकुरीत होइस्तोवर तळते ,तुम्हाला जर ओलसर ह्व्या असतील तर तुम्ही वड्या लालसर होइपर्यंत तळ्ण्याची गरज नाही :)
( * अळूची पाने मोठी असतील तर त्यामुळे हमखास घसा खवखवतो म्हणूनच पाने छोटी अन कोवळी वापरावीत.
अन नाहीच मिळाली तरी चिंचेचा कोळ अन गुळ घातल्यामुळे घसा खवखवत नाही )
( अन हो .....मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ) ;) धन्यवाद :)
प्रतिक्रिया
15 May 2012 - 10:53 am | मुक्त विहारि
सुंदर.
15 May 2012 - 10:54 am | प्यारे१
पिवडे,
मस्त, यम्मी, टेम्प्टींग, छानच..!
आता खरं खरं सांगायचं... अळूवड्या कुणी केल्यात?
15 May 2012 - 11:11 am | परिकथेतील राजकुमार
सुगरण आहे हो पोरगी.
पुढच्यावेळी कोंथीबीरीच्या वड्या येऊ द्या.
बाकी ह्या वड्या चकण्याला फारच अप्रतिम.
15 May 2012 - 11:25 pm | चिंतामणी
पुन्हा चालू केलेस की काय. ;)
बाकी "सुगरण आहे हो पोरगी" या वाक्याबद्दल प्रत्यक्ष भेटीत बोलण्यात येइल.
16 May 2012 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार
असे काय नाय. आठवड्यातून एखादी हजेरी होते असे गणीत आहे सध्या.
अप्रत्यक्ष भेटीत बोलले तरी हरकत नाही. पियुशा सुगरण आहे हा आमचा 'अनुभव' आहे. फटू बघून दिलेले मत नाही. ;)
16 May 2012 - 1:35 pm | चिंतामणी
पियुशा सुगरण आहे हा आमचा 'अनुभव' आहे.
हे ऐकुन बरेच काही समजले. :D
उरलेले भेटीअंती समजावुन घेइन.
15 May 2012 - 11:14 am | बिपिन कार्यकर्ते
आह!!!! कधी येऊ?
15 May 2012 - 11:20 am | प्रीत-मोहर
मस्त ग पिवडे!!!
आता सोहम ला जावे लागेल.
15 May 2012 - 2:09 pm | वपाडाव
उतारा म्हणुन कालच सोहमला जाउन आलो आहे.
अळुवडी अन कोथिंबीरवडी दोन्हीचा यथेच्छ स्वाद घेण्यात आला आहे.
15 May 2012 - 3:48 pm | ५० फक्त
व्हेर इज सोहम द इन पुणे द. ?
15 May 2012 - 3:55 pm | प्रचेतस
हेच विचारणार होतो.
15 May 2012 - 4:10 pm | वपाडाव
काकासाहेब गाडगीळ पुलावरुन उतरुन गाडी न वळवता सरळ जंगली महाराज रस्त्यावर ज्या दुकानात शिराल ते सोहम...
स्प्राइट वे (सिधी बात, नो बकवास) : डेक्कन साइडने झेड ब्रिज उतरुन डायरेक्ट ज्या घरात जाल ते सोहम...
15 May 2012 - 6:14 pm | ५० फक्त
म्हणजे गाडी पार्किंग पण दुकानातच आहे काय, वा काय सोय आहे. धन्यवाद माहितीसाठी.
सोहम, दुकान आहे की घर ?
काकासाहेब गाङगीळ पुल म्हणजे कुठला ?
कोणी व कुठुन पराभुत होउन परत येण्यासाठी हा पुल बांधला होता?
16 May 2012 - 9:01 am | चिंतामणी
आश्चर्य आहे.
16 May 2012 - 10:01 am | ५० फक्त
नाही हो, म्या पामराकडुन हा अपराध घडला खरा, आता त्याचे प्रायश्चित घ्यावे हेच बरे. कधी जावे बरे या तीर्थक्षेत्री, आपण सुद्धा याल सोबत तर उत्तम होईल.
16 May 2012 - 10:17 am | चिंतामणी
पण ते खाद्य क्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र शेजारी आहे. ;)
तुला नक्कीच आवडेल.
15 May 2012 - 5:20 pm | चिंतामणी
कशाला???????
लाडक्या मैत्रीणीने इतकी साधी आणि सचीत्र कृती दिली आहे. स्वतः कर. :D
15 May 2012 - 5:27 pm | वपाडाव
कुणाला सांगताय हे, चिंतामणी काका?
आधीच ग्यास पेटवायचा कसा हे म्हैत नै, अन त्यात हे दिव्य...
उगाच ह्या वयात मजाक शोभतो का?
15 May 2012 - 5:39 pm | प्रीत-मोहर
ह्म्म. काकांनी नसल तरी काकुंनी झालच तर धम्या, बिका इ. नी आमच्या पाकृ चे फटु पाह्यलेत . त्यामुळे वरील खोचक प्रतिसाद बाद
15 May 2012 - 5:50 pm | वपाडाव
एक साक्षीची म्हण आठौली आहे पण प्रतिसादाला पंख लागण्याच्या भयाखातर देत नाही...
तरीही समझदार को इशारा वेग्रे वेग्रे आहेच...
16 May 2012 - 9:58 am | पियुशा
@ व.प्या.
चिंतामणी काका प्रिमोला सांगताहेत ,गैरसमज नसावा :)
15 May 2012 - 5:27 pm | प्रीत-मोहर
गपा हो. कित्ती काम असतात ना मला? हापिसात मर मर काम करा, घरीसुद्धा येउन राबा. कुणी सांगितलय ते? त्यापेक्षा सोहम/ मथुरा महाराष्ट्रियन/ गिरीजा / बापट ब्येश्ट
15 May 2012 - 5:30 pm | प्यारे१
गोव्याच्या पोरीला एवढं पुणं कसं बरं ठाऊक???
-निरागस प्रश्न बाय प्यारे१
15 May 2012 - 5:31 pm | गवि
बापट म्हणजे बाजीराव रोडनजीकचेच का?
आहा काय ठिकाण आहे.. सर्वत्र सूचना , इशारे आणि सुविचार .. आणि फक्कड चव आहे सर्व पदार्थांची. खाणे संपूच नये असं वाटतं तिथे..
मेथीचे पराठे / आलू पराठे एकदम घरी असतात तसे तव्यावरचे गरम आणि लोण्यासहित.
शिवाय खिचडी मिसळी आणि अन्य पदार्थांविषयीही काय बोलावे... एकदम परफेक्ट..
15 May 2012 - 5:52 pm | वपाडाव
अॅड्रेस डिटेलमध्ये सांगा बरं....
15 May 2012 - 5:56 pm | गवि
पुण्यातले अॅड्रेस डीटेलमधे सांगणं आमच्या शक्तीबाहेरचं आहे. कारण आम्ही दोनेक वर्षेच पुणेकर होतो..
बाजीराव रोडवरुन जवळ आहे इतकं माहीत आहे. वाहन घेऊन किंवा चालत जातो नेहमी. नेमका रस्ता सांगण्याबाबत मी एकूणच एकदम अधू आहे. तिथे आलो तर घेऊन जाऊ शकेन. जवळ कोणतेसे संग्रहालय आहे चूभूदेघे.
16 May 2012 - 5:48 pm | निश
केळकर संग्रहालय आहे त्या बाजुला.
अतिशय सुंदर आहे ते वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत तिथे इतिहास कालीन .
तिथेच जवळ्च आहे बापट .
15 May 2012 - 5:57 pm | चिंतामणी
हॉटेल खैबरचे शेजारी. काकासाहेब गाडगीळ (उर्फ प्रेमळ जोडप्यांचा (वाय) झेड) पूलाचे समोर. स्टेट बँकेशेजारी.
15 May 2012 - 5:58 pm | गवि
"बापट" हे जंम रस्त्यावर आहे? आँ? नाही मग मी वर्णन केलेलं सुविचारस्थळ वेगळं.. ते निश्चित बाजीराव रोडनजीक आहे.
15 May 2012 - 6:01 pm | प्रीत-मोहर
बापट बाजीराव रोड ला.
गिरीजा टिळक रोड ला./ कर्वे रोड ला.
सोहम मथुरा महाराष्ट्रीयन जं. म रोड ला
16 May 2012 - 9:13 am | चिंतामणी
वरती बापटांचा पत्ता आला होताच. सोहमची चर्चा चालू होती. त्यामुळे मला असे वाटले की तुम्हाला सुध्दा सोहमचा पत्ता पाहीजे आहे.
15 May 2012 - 6:10 pm | वपाडाव
मागची २ वर्षे अविरत जंम रस्त्यावर फिरतो आहे. हे "बापट" तेथे असणे नाही...
आपली ज्याम गफलत झाली असावी... खैबरच्या बाजुला सोहम आहे...
16 May 2012 - 9:18 am | प्यारे१
>>>मागची २ वर्षे अविरत जंम रस्त्यावर फिरतो आहे.
या पूर्ण वाक्याचीच नोंद घेण्यात आलेली आहे..... !
16 May 2012 - 3:17 pm | मनराव
बाजीराव रोडवर जा आणि केळकरांच संग्रहालय विचार.....शेंबड पोर सुद्धा सांगेल, मग २-३ तास तो संग्रह बघ आणि मग शेजारीच बापट आहे, भुक लागली असेल तर......
16 May 2012 - 3:42 pm | ५० फक्त
बाजीराव रोडवर शेंबड पोर न मिळाल्यास काय करावं ते पण सांगा.
बाकी संग्रहायलातले अडकित्ते तेवढे लक्षात आहेत, पण हल्ली ते काढुन ठेवले आहेत असं समजलं झिग्रेडी सारे.
17 May 2012 - 12:09 am | कुंदन
>>बाजीराव रोडवर शेंबड पोर न मिळाल्यास काय करावं ते पण सांगा.
एकुणच पुण्यात काही कमी नसावी , म्हटले आहे ना "पुणे तिथे......" ;-)
15 May 2012 - 5:48 pm | चिंतामणी
मला म्हणत असशील तर तुला उत्तर देतो.
अग हलकट मुली, ती तुझी लाडकी मैत्रीण पियूषासुध्दा काम करते ना. त्यानंतरच तीने हे बनवले आहे. अर्थात आय.टी. म्हणल्यावर.................................
बादवे. राग कशाचा आला नक्की??????? कर म्हणल्याचा की .............:D
15 May 2012 - 11:25 am | गवि
जियो..
एकच शंका : तळाव्यात असे लिहून फटू मात्र तव्यावर भाजतानाचा दाखवला आहे.
शॅलो फ्राय करायचे असल्यास जाडसर ठेवाव्या असे म्हणून संभ्रम आणखी वाढला आहे. शॅलो फ्राय म्हणजे माझ्या मते तव्यावर अथवा पॅनमधे थोड्या तेलावर परतणे. अशा वेळी जाडसर ठेवणे योग्य ठरणार नाही. डीप फ्राय म्हणजे तळणे या बाबतीत जाडसर ठेवलेल्या चालाव्यात असं वाटतं.
शिवाय या तळायच्या की तव्यावर परतायच्या हे स्पष्ट होत नाहीये? की दोन्हीपैकी काहीही चालेल?
इकडे पात्रा या नावाने दुकानात तयार मिळणार्या अळूवड्या नुसत्याच उकडलेल्या असतात की काय अशी शंका येते. बेचव नुसत्या.
15 May 2012 - 11:37 am | प्रास
अगदी असंच माझ्याही मनात आलेलं.
आणि
अशा ठिकाणी काही संपादन करता यावं असं वाटतं.
बाकी
अळूच्या वडीच्या ओलेपणाचा लालसरपणाशी असलेला संबंध काही कळला नै ब्वॉ..... ;-)
पियु बैंची पाककृती छानच आहे. (दिसायला तरी) आवडली. :-)
चला आता ते हिरा बेसन इथे शोधणे आले..... ;-)
15 May 2012 - 11:41 am | पियुशा
@ गवि ,अन प्रास
एकच शंका : तळाव्यात असे लिहून फटू मात्र तव्यावर भाजतानाचा दाखवला आहे.
गवि तो तवा नाहिये ,पोळपाट आहे तो काळा कडप्प्याचा :) त्यावर कापल्यात वड्या मी .
शॅलो फ्राय करायचे असल्यास जाडसर ठेवाव्या असे म्हणून संभ्रम आणखी वाढला आहे. शॅलो फ्राय म्हणजे माझ्या मते तव्यावर अथवा पॅनमधे थोड्या तेलावर परतणे. अशा वेळी जाडसर ठेवणे योग्य ठरणार नाही.
मी बर्याच जणांकडे अशा जाडसर वड्या नुसत्या तेलात शॅलो फ्राय करुन वरुन खोबर किसुन घालतात हे पाहिल आहे .अन वड्या खाल्ल्ल्याही आहेत ,पण आमच्याकडे शॅलो फ्राय करत नाहित बहुधा उकडीचा ओलसरपणा रहावा म्हणुन थोड्या जाड काप शॅलो फ्राय करत असतील असा माझा अंदाज आहे :)
डीप फ्राय म्हणजे तळणे या बाबतीत जाडसर ठेवलेल्या चालाव्यात असं वाटतं.
जाडसर ठेवलेल्या वड्या लवकर कुरकुरीत होत नाही ,एकतर त्या आतुन कच्च्या राहत्तात नाही तर क्रिस्पि होण्याकरीता खुप तळाव्या लागतात . त्यापेक्षा काप पातळ असतील तर क्रिस्पि होतील अन वेळ्ही वाचेल.
शिवाय या तळायच्या की तव्यावर परतायच्या हे स्पष्ट होत नाहीये? की दोन्हीपैकी काहीही चालेल?
दोन्हीही प्रकार चालतील .युवर चॉइस :)
15 May 2012 - 11:54 am | गवि
खुलाश्याबद्दल धन्यवाद.. :)
15 May 2012 - 9:02 pm | प्रास
.... आमचाही धन्यवाद! :-)
15 May 2012 - 11:28 am | sneharani
मस्त ग, जमल्या की तुला! आता ढोकळ्याचा नंबर !!
:)
15 May 2012 - 11:40 am | इस्पिक राजा
जमल्यात जमल्यात. माझा सर्वात आवडता खाद्यपदार्थ केला आहेस बघ तु, आता इकडे अळु शोधणे आले.
15 May 2012 - 11:43 am | जागु
मस्तच.
15 May 2012 - 12:02 pm | पिंगू
अळुवड्या म्हणजे आपला वीक पाँईट.. च्यायला आणि तेच दाखवल्यावर जीभ चाळवणारच ना..
- (अळुवड्याप्रेमी) पिंगू
15 May 2012 - 12:20 pm | चिंतामणी
दोन शंका दूर कर.
पाने छोटी असतील तर खाजरी नसतील कशावरून? खाजरी आहेत की नाहीत हे घेताना कसे कळते?
फोटो छान आहेत. पण ती क्रिस्पी -कुरकुरी झाली की नाही खाल्ल्याशीवय कसे कळणार?
तेंव्हा एक गोष्ट लक्षात ठेव. नगरला येण्या अगोदर फोन करतो. वड्या खाउन मग क्रिस्पी आहेत की नाही हे लिहीतो. ;)
15 May 2012 - 12:28 pm | jaypal
धो धो पावसात ही अशी गरमा गरम आळुवडी किंवा खेकडा कांदा भजी + तळलेल्या मीरच्या मीठ टाकुन आणि सोबत आवडीच पेय (गवती/ आले चहा, फेसाळणारी कॉफी पासुन स्कॉच ते रम पर्यंत काहीही...... जे मिळेल ते) व नसंपणा-या गप्पांची मैफल .............म्हणुनच या जगण्यावर शतदा प्रेम करावे .
एका सुग्रणी कडी अशीच अविट चविची आळुवडी हादडली होती. तीच्या म्हणण्यानुसार थोडी तांदळाची पीठी कोणत्याही तळणातील बॅटर मधे वापरल्यास पदार्थ अजुन कुरकुरीत होतात. काही जण वाफवलेल्या वड्यावंर ढोकळ्या प्रमाणे वरुन फोडणी पण देतात. ह्या वड्यांसोबत चिंच,खजुर्,गुळाची आंबट गोडचट्णी मस्तच लागते
15 May 2012 - 12:32 pm | ५० फक्त
, उगा सॉस मध्येच कुठून? - ठिक आहे हा प्रश्न विचारत नाही, पण मग अळुवड्यांच्या ट्रे मध्ये ती कोथिंबिरीची काडी का ठेवली / पड्ली / टाकली आहे, असा प्रश्न चालेल काय ?
आणि ते पोळपाटाचं सांगितलंत बरं झालं, उगा घोळ नसता.
बाकी, अजुन काय म्हणताय, हे उन्हाळ्यात गप वाटी दोन वाटी रस पिउन झोपायचं सोडुन हे असलं बरं सुचतं ओ तुम्हाला.
15 May 2012 - 12:44 pm | गणपा
लै भारी ग पिवशे...
अश्या कुरकुरीत अळुवड्या संध्याकाळच्या आले आणि गवती चहा घातलेल्या चहा सोबत पुढ्यात आल्या तर क्या केहने.
पण जेवणात असताना मात्र मला नारळाच्या दाट दुधात आटवुन केलेल्या अळुवड्याच जास्त आवडतात. :)
चला लवकरच अळुवड्या करणे आले.
15 May 2012 - 12:57 pm | jaypal
हे मी प्रथमच ऐकतो आहे. गंपा दादा लवकर शिकवा आम्हाला. खुप दिवसात तुम्ही मुदपाकखान्यात पाउल ठेवलेले नाही.
15 May 2012 - 2:02 pm | मी-सौरभ
लै वेळा सहमत....
15 May 2012 - 7:26 pm | रेवती
नारळाच्या दुधातल्या वड्यांची पाकृ द्यावी ही विनंती.
आजकाल फार विनंत्या वै. कराव्या लागतात हां गणपा.
बिनसलय काहीतरी या बुवाचं.
15 May 2012 - 8:45 pm | गणपा
हल्ली आयत ताट हातात मिळतय तर का जावं म्हणतो किचन मध्ये? ;)
इथे सध्या अळुवडीची पानं मिळत नहियेत.
पण परवाच दुकानात अळुवडीचा टिन मिळाला. लवकरच नारळाच्या दुधातल्या अळुवड्यांचा फटु इथेच अपडेट करण्यात येतील असे आश्वासन देतो. :)
16 May 2012 - 12:26 am | रेवती
अरे वा!! समजलं समजलं.
एंजॉय!
16 May 2012 - 10:13 am | चिंतामणी
राजकारणी लोकांसारखे फक्त आश्वासन नको देउस.
कृती म्हणजे पाक कृती कर आणि येथे सगळ्यांसमोर ठेव.
15 May 2012 - 12:51 pm | कवितानागेश
चला, आता पियुशा शोधणे आले! ;)
15 May 2012 - 7:23 pm | रेवती
अगदी हेच म्हणते.
15 May 2012 - 7:40 pm | Pearl
असेच म्हणते :)
15 May 2012 - 12:55 pm | अत्रुप्त आत्मा
चला अळूवड्यांसारखे पारंपारिक पदार्थ यायला लागले...
15 May 2012 - 1:15 pm | स्मिता.
पिवशी अगदी सुगरण झाली हो :)
माझ्या आवडीच्या अळूवड्यांची पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद! वड्या अगदी टॅम्टिंग दिसत आहे. मलाही डिप फ्राय केलेल्या क्रिस्पी वड्याच आवडतात.
आता इकडे अळूची कोवळी पाने शोधणे आले ;)
15 May 2012 - 1:27 pm | प्रभाकर पेठकर
वड्या कमीत कमी तेलावर लालसर रंगावर परताव्यात. छान कुरकुरीत होतात. नंतर त्यावर मोहरीची फोडणी देऊन किसलेला ओला नारळ आणि कोथिंबीर घालून सजवावे. अशा वड्या घट्ट दह्या बरोबर झकास लागतात असा अनुभव आहे.
अवांतरः कडप्पाच्या काळ्या पोळपाटा शेजारी ती २-३ चॉकलेटं पडली आहेत का?
15 May 2012 - 3:48 pm | ५० फक्त
ती चाकेल्टं तर सिक्रेट इन ग्रे डि यंट आहेत,
15 May 2012 - 1:33 pm | स्पा
सहीच ग.. आता हुरडा पार्टीला भेटू तेंव्हा.. अळूवड्या पण कर सोबत
काय ५०? ;)
15 May 2012 - 1:39 pm | मेघवेडा
झकास! खमंग पाकृ! :)
15 May 2012 - 2:08 pm | मृगनयनी
मस्त गं पिवशे!.... फोटो आणि पा.कृ. दोन्ही मस्त आहेत!!!!!! :)
.मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ) Wink धन्यवाद
हे वाक्य आवडल्या गेले आहे!! :)
15 May 2012 - 2:14 pm | वपाडाव
हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे असावे अशी शंका येतेय.
सॉसबरोबर वडी खायला आवडते .......... ह्यापेक्षा .......... वडीबरोबर सॉस खायला आवडतो..........
हे वाक्य जास्त शोभुन दिसले असते नै का?
15 May 2012 - 2:32 pm | गणपा
अरे पण तिला सॉस जास्त आवडत नसेल कश्यावरुन. अळुवडी तोंडी लावायला असेल. ;)
15 May 2012 - 5:44 pm | प्रभाकर पेठकर
पेठकरकाका जरा नजर फिरवा बघु.
कशाला उगीच भरीस पाडता आहात? मिपावर आमचा व्याकरणाचा सुंभ कधीच जळला आहे आता पिळ जायची वाट पाहतो आहे.
तुम्ही म्हणता म्हणून होSS. मला तरी वाक्य योग्य वाटते आहे. वड्या खाणे मुख्य आहे, सॉस बरोबर की दह्या बरोबर हे दुय्यम आहे. सॉस कशा बरोबर खायला आवडतो हा मुद्दा नसून वड्या कशाबरोबर खायला आवडतात हा मुद्दा आहे. असो.
15 May 2012 - 5:49 pm | गवि
मला अळुवड्या पियुषाबरोबर खायला आवडतात. ही वाक्यरचना कशी वाटते?
15 May 2012 - 6:21 pm | मी-सौरभ
वाक्यरचना म्हणुन ठीक असावी पण अपेक्षा असेल तर लायनीला लागा. लै लै लोक पियुषाबैला भेटायची वाट बघायलेत.
कुणाला हुरडा खायचाय, कुणाला जिलबी तर कुणाला तोफ बघून पळायचय ;)
काय मंडळि मी बोलतो ती गोष्ट सच्ची की नाय?
15 May 2012 - 9:08 pm | प्रास
वाक्यरचना कशी का असेना, मला अळूवड्या अशाही खायला आवडतात ;-)
15 May 2012 - 2:23 pm | प्रचेतस
मस्त पाकृ.
बाकी अळूवडी आवडत नसल्याने आपला पास.
15 May 2012 - 3:14 pm | सविता००१
पिवशे, वरती माऊ म्हणाली तसंच म्हणते- आता इथे पियुला शोधणे आले.
मस्त वड्या. छान फोटो. :)
15 May 2012 - 6:02 pm | सूड
अळूवडीची रेशिपी छानच.
पण पिवशे, रंग आणि नाजूकपणावरुन ती पानं भाजीच्या अळवाची दिसतायेत. वडीच्या अळवाची पानं रंगाला थोडी गडद आणि थोडी जाड असतात. इतकी जाड की त्यांच्या शिरा काढल्या तरी नीट वळकटी करता यावी म्हणून आमच्याकडे त्यावर एखादा लाटण्याचा हात फिरवतात. हे भाजीचं अळू रैवारी सिंहगडावरुन उतरताना पाह्यलं आणि फदफदं खावंसं वाटू लागलं. आता ते इथे पुण्यात कुठे मिळेल ?
15 May 2012 - 6:17 pm | ५० फक्त
अरे समोरचा काम्पुटर घेतला म्हणुन सांगतोय अन तु त्याला प्रोसेसर कॅपॅसिटी, ड्युअल कोर का क्वाड्रा कोर, रॅम डिडिआर का डिडिएम, नॉर्थ ब्रिज , साउथ ब्रिज, कुलिंग फॅन स्पिड, जिपियु स्पिड, साउंड कार्ड हे सगळं सांगतोय, आधी काम्पुटर बंद करायला स्टार्ट करावा लागतोय इथं पर्यंत तरी तयारी होउ दे की.
15 May 2012 - 7:35 pm | Pearl
खतरनाक फोटो. अप्रतिम... मस्त झालेल्या दिसताहेत.
तो.पा.सू. खूप खूप :-) सही.... इथे अळू मिळत नसल्याने अळूवडी पार्सल पाठवून दे :-)
मागची तुझी जिलेबी ची रेसिपी पाहून जिलबी केली आणि वाईट फसली माझी जिलबी :-/
जिल्बुषे तुझ्या जिलब्या खूप सुंदर दिसत होत्या. असो.
मी दही घालून ट्राय केल्या होत्या. पुढच्या वेळेस यीस्ट वापरून पाहिन.
15 May 2012 - 7:47 pm | पैसा
तळून असो की भाजून असो, अळूवड्या छान झालेल्या दिसतायत! मी बेसनाऐवजी तांदुळाचा रवा घालून केलेल्या अळूवड्या मंगलोरी लोकांकडे खाल्ल्या आहेत, त्या पण अप्रतिम लागतात.
15 May 2012 - 7:54 pm | नेहरिन
पिवशे ... रागवु नकोस .अशि हाक मारली म्हणुन....... वड्या मस्तच ........ फक्त पुढच्यावेळी त्यात तांदुळाचे पीठ घाल थोडेसे . म्हणजे वड्या अजुन कुरकुरीत होतील.
15 May 2012 - 8:11 pm | सानिकास्वप्निल
अगदी खुमासदार, रुचकर, चविष्ट, भन्नाट दिसत आहेत अळुवड्या.
खूप आवडतात :) अळुवड्या करून त्याची भाजी करण्याची पद्धत आहे माझ्या सासरी...ती पण कसली जबरी लागते म्हणून सांगू अहाहा तोंपासू :)
15 May 2012 - 11:11 pm | चिंतामणी
>>>अळुवड्या करून त्याची भाजी करण्याची पद्धत आहे माझ्या सासरी...ती पण कसली जबरी लागते म्हणून सांगू अहाहा तोंपासू
नुसते सांगत का आहेस? तुझ्या कडुन एव्हढेच अपेक्षीत नाही.
येउन जाउ द्या पाकृ.
16 May 2012 - 12:12 pm | सानिकास्वप्निल
हो नक्की चिंतामणी काका :)
देईन की पाकृ फक्त अळुची पाने मिळाली की लगेच देईन :)
धन्यवाद
16 May 2012 - 10:00 am | पियुशा
:) सर्व वाचकांचे ,प्रतिसाद देणार्याचे न देण्यार्याचे मनापासुन धन्यवाद :)
16 May 2012 - 11:09 am | इरसाल
सगळे लोक पियुशा का शोधत आहेत बरे ?
अळुवड्यांमधे कोणताही घटक "पियुशा" नावाचा नाही :O :~
बाकी अळुवड्या छान हं !
चिं.काकांबरोबर सहमत ह्याची पातळ भाजी पण जाम भारी लागते .
16 May 2012 - 1:39 pm | किलमाऊस्की
यात थोडे तीळ टाकलेस तरी चालतील. त्यायोगे तेलबिया खाल्ल्या जातात.
16 May 2012 - 6:15 pm | निवेदिता-ताई
आम्च्याकडे खूपच आवडतात सगळ्यांना....उद्याच आणते आळूची गड्डी
16 May 2012 - 10:47 pm | चिंतामणी
पुण्यात येताना घेउन ये. :D