मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in काथ्याकूट
9 Mar 2012 - 1:59 am
गाभा: 

जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा.

महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात.

कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा.

मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्‍या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच.

मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का?

८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते.

इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.)

विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते.

विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात.

"एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते.

निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2012 - 1:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

विकेण्डचा चर्चा करण्याशी संबंध नाही. ज्यांना चर्चा आवडत नाही त्यांच्यावर ती आंजावर लादली जात नाही. क्लिक न करण्याचा किंवा सहभागी न होण्याचा पर्याय इथे खुला असतो.

त्यासाठी प्लॅटफॉर्म कोणता वापरावा हे ज्याचे त्याने ठरवावे, निदान तेवढे स्वातंत्र्य तरी दिले जावे. व्यक्त होण्यासाठी मराठी आंजा हा काही एकमेव पर्याय नाही हेही काही प्रतिसादांमधून दिसून येते.

असा दावा मी कुठेही केलेला नाही.
मी फक्त आंजाबद्दल का बोलते आहे याबद्दल पुरेसा उहापोह लेखात केलेला आहे. थोडक्यात, आंजासंदर्भातला विदा रिप्रेझेंटेटीव्ह सांपल म्हणून वापरला आहे. यात काही तार्किक चूक आहे का?
आपापली मतं मांडण्यासाठी, स्त्रियांनी आंजा न वापरण्यामागे आणि पुरूषांना मात्र आंजा आवडण्यामागे काही इतर खास कारणं असतील तर ती सांगावीत. (मतं मांडण्याबद्दल पुरूषप्रधान संस्कृतीचा काच स्त्रियांना अधिक कसा जाणवतो याचा उत्तम आढावा याच धाग्यात राजेश घासकडवी यांनी घेतला आहे.)
मराठी आंजा हा काही एकमेव पर्याय नाहीच, पण अशा निवडींमागचा लिंगभेद (जेंडर बायस) इथल्या प्रतिसादात कोणी सांगितला असेल आणि माझ्या दृष्टीपथात आला नसेल तर दुवा देण्याचे हे अजून एक आवाहन.

अन्या दातार's picture

12 Mar 2012 - 8:01 pm | अन्या दातार

आंजासंदर्भातला विदा रिप्रेझेंटेटीव्ह सांपल म्हणून वापरला आहे. यात काही तार्किक चूक आहे का?

यात तार्किक चूक आहे असं मी कुठेही म्हणलेलं नाही. तसे असल्यास निदर्शनास आणून द्यावे.

आपापली मतं मांडण्यासाठी, स्त्रियांनी आंजा न वापरण्यामागे आणि पुरूषांना मात्र आंजा आवडण्यामागे काही इतर खास कारणं असतील तर ती सांगावीत. (मतं मांडण्याबद्दल पुरूषप्रधान संस्कृतीचा काच स्त्रियांना अधिक कसा जाणवतो याचा उत्तम आढावा याच धाग्यात राजेश घासकडवी यांनी घेतला आहे.)

घासकडवी यांचेच मुद्दे धरुन बोलायचे झाल्यास काही गोष्टींचे खंडन करु इच्छितो.

बायकांना संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळतो. (चूल आणि मूल हेच जीवन)

पुरुषांनी मदत करुन जर काँप्युटर वापरला तर त्याला कुणी आक्षेप घ्यायचे कारण नाही. मदत काय आणि किती करावी हाही बराचसा वैयक्तिक भाग झाला. पण पुरुषाची मदत होत असेल तर चूल आणि मूल हेच जीवन या मुद्द्याला फारसा अर्थ रहात नाही.

बऱ्याच घरी कॉंप्युटर नसतो, पण पुरुषांना मात्र नोकरीच्या ठिकाणी कॉंप्युटर वापरता येतो. (असमानता, नोकऱ्या पुरुषांनाच अधिक असतात)

जर एलिट क्लासबद्दल चर्चा चालू असेल तर हा मुद्दा पूर्णतः निकालात लागतो. कारण या एलिट क्लासमधील जास्तीत जास्त स्त्रिया नोकरी करतात व आता अशी एकही जागा नाही जिथे काँप्युटर नसतो (बँका, आयटी इंडस्ट्री, पोस्ट, इलेक्ट्रिसिटी ऑफिसेस इ.)
याचाच अर्थ त्यांना निदान काँप्युटर तरी वापरायला मिळतो. फक्त पुरुषांनाच नोकरीच्या ठिकाणी काँप्युटर वापरायला मिळतो हे म्हणणेच अत्यंत बायस्ड आहे.

स्त्रिया वाद घालायला कचरतात (दबलेपणाची भावना)

स्वभावाला औषध नसते. दबलेपणाची भावना स्वभावतःच असेल तर त्याला कोण काय करु शकणार आहे? अर्थात स्वभावही व्यक्तिगणिक बदलत असल्याने सर्वच स्त्रियांचा तसा नसतो हेही तितकेच खरं आहे.

स्त्रियांना तंत्रज्ञानाची भीती वाटते (लहानपणापासून धोका पत्करण्याचं, नवीन वस्तु हाताळण्याचं स्वातंत्र्य वा शिक्षण न दिल्यामुळे ही भीती येत असावी)

ही भिती दूर करण्यासाठी कुणी पुढाकार घ्यावा? ज्यांना एखादी गोष्ट साध्य करायची आहे ते आपोआपच पुढाकार घेतात. जर कुढत बसायचेच ठरवले तर कितीही स्वातंत्र्य असूदे, कितीही रिसोर्सेस उपलब्ध असूदेत, त्याचा काहीही उपयोग नसतो. थोडक्यात "आढात नाही तर पोहर्‍यात कुठुन येणार??"
वरील मते व लीमाउजेट यांचा हा प्रतिसाद वाचल्यास स्त्रियांनी आंजा न वापरण्याची कारणे स्पष्ट होतात. तो प्रतिसाद व माझी मते यात फारसा फरक वाटत नाही. पण तुम्ही हे मान्यच करायला तयार नाही(हे माझे निरीक्षण) की मानसशास्त्रीय जडणघडण याला कारणीभूत आहे म्हणून ही थोडी उकल.

दबलेपणाची भावना स्वभावतःच असेल
बाकी मुद्दे ठीकेत पण वरचे वाक्य काही पटले नाही. स्वभावात दबलेपणाची भावना नसते तर बरेचदा पुरुषांकडून समोरच्या (महिलेला) गप्प बसवण्यासाठी शारिरीक टिप्पण्णी केली जाते. याच धाग्यावर दादा कोंडके या सदस्यांनी आपणहोवूनच उदाहरण दिले आहे. संवाद बंद होतो तो याचमुळे. भारतातील स्त्रियांनी वॅक्सिंग करावे, वजन कंट्रोलमध्ये ठेवावे अश्यासारख्या वक्तव्यांना माझ्याकडून एकच उत्तर असेल ते म्हणजे कानाखाली जाळ काढणे. त्यांच्या ऑफीसमधील महिला स्त्रीमुक्ती किंवा ज्या कोणत्याही विषयावर बोलत होती त्यात वॅक्सींग आणि इतर गोष्टींचा संबंध नसला तर विषय कशाला सुरु करायचा? अश्या गोष्टी कदाचित काही पुरुषांच्या लक्षात येत नसतील पण मिपावरची निदान शंभर उदाहरणे तरी देऊ शकीन की सहज बोलताना स्त्रीदेहाबद्दल सरळ सरळ बोलले जाते आणि तिथे संवाद बंद होतो. निदान माझ्याकडून तरी.

कवितानागेश's picture

13 Mar 2012 - 12:49 am | कवितानागेश

रेवतीताईचे म्हणणे पटतंय.
शिवाय मी फक्त 'कारणे' लिहिली आहेत.
याचा अर्थ त्या गोष्टी 'नैसर्गिक' आहेत आणि मला मान्य आहेत असा नाही.
शिवाय मुली अ‍ॅग्रसिव्ह नसतात याचा अर्थ मुली दबलेल्या असतात असा होत नाही.
स्त्रियांचा स्वभाव निसर्गतःच लवचिक व परिस्थितीशी जुळवून घेउ शकणारा असतो, पण म्हणजे मूळातच निसर्गतः आत्मविश्वासाचा अभाव असतो, दबलेपणा असतो असा टोकाचा अर्थ काढायची गरज नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 4:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद पाशवी रेवतीताई आणि पाशवी लीमाउजेट.

-- पा. अदिती

स्त्रियांचा स्वभाव निसर्गतःच लवचिक व परिस्थितीशी जुळवून घेउ शकणारा असतो

याबद्दल मी साशंक आहे. म्हणजे यातही लिंगभेद दिसतोच असं नव्हे. पण परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही तर कोणीही जगणार नाहीत आणि पारंपरिक पद्धतीत स्त्रियांना अधिक जुळवून घ्यावं लागतं एवढंच.

विमेंनी त्यांच्या प्रतिसादात जे म्हटलं आहे, "कोणी मसीहा येऊन माझा/आमचा उद्धार करेल या आशेवर राहू नये" हे मात्र मला १००% मान्य आहे. पण सामान्य भारतीय मानसिकता जेव्हा कलियुगात परमेश्वराच्या दहाव्या अवताराची वाट बघण्याची असते तेव्हा अचानक (भारतीय) स्त्रियांकडूनही फार वेगळ्या अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. पण परिस्थिती बदलण्यासाठी फक्त स्त्रियांनीच काय तो बदल करावा आणि आम्ही (पुरूष) असेच रहाणार यामुळे काहीही साध्य होणार नाही. मागासलेपणाचा शिक्का मात्र पुन:पुन्हा आपल्या समाजावर बसेल.

मी पुरूषप्रधान संस्कृतीला दोष देत आहे, पुरूषांना, किंवा कुणा ठराविक स्त्री-पुरूषांना नाही. कृपया ते स्वतःवर ओढवून घेणं थांबवा. (ओढवून घ्यायचंच असेल तर ना नाही, फक्त अशी वाक्य माझ्या तोंडात घातल्यास "बैल दूध देईल".)

शिल्पा ब's picture

13 Mar 2012 - 10:07 am | शिल्पा ब

१००% +

अशा लोकांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो...आपला वेळ अन शक्ती वाया जाते अन मनस्ताप होतो तो वेगळाच. शक्य तिथे मी स्वत: त्यांना त्यांची जागा दाखवतेच पण प्रत्येकवेळी मीच बोललं पाहीजे असंही नाही. आता असोच अन काय!!

कवितानागेश's picture

10 Mar 2012 - 10:54 am | कवितानागेश

अजून २ मुद्दे राहिले,
एक म्हणजे 'बाहेर' काय चाललय हे समजून घेण्यासाठी टीव्ही असतोच. शिवाय भाजी निवडता निवडता किंवा जेवता जेवता टीव्ही बघता येतो. टाईप करता येत नाही. नाहीतर कीबोर्ड चिकट होतो. :)
शिवाय बर्‍याच बायका संस्थळांवर लिहिण्यापेक्षा, मासिकांमध्ये (त्या अमकीचे भावजी तमक्या मासिकाचे संपादक आहेत की, अशा पद्धतीनी) स्वतःला व्यक्त करतात. तेवढ्यातच त्यांची हौस भागते. :(

पुन्हा एकदा नेट बंद.

आम्च्या परतिनिधीनं सुद्धा नेटवर पुरूशांची आवस्था बिकट का आसा (अवघड जागेच्या दुखण्याचा) शोध घेत्ला. आन् त्याला पुढची भयानक आकडेवारी मिळाली. त्याचा ह्यो रिपोरट!
(समद्या बाप्यांनी आपापल्या काळजावर दगुड ठिऊन बघा ;) )

शिल्पा ब's picture

12 Mar 2012 - 11:04 am | शिल्पा ब

केवळ आंजावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या म्हणजे स्त्रीमुक्ती झाली का? प्रत्यक्ष जीवनात आपले मत मांडता येणं आवश्यक आहे त्याचा अन ह्याचा फारसा संबंध नाही. शिवाय खुप स्त्रीया त्यांच्या ब्लॉगवर लिहितात ते वेगळंच.

बाकी चर्चा रटाळ त्यामुळे आता आम्ही पास.

प्रभाकर पेठकर's picture

12 Mar 2012 - 11:11 pm | प्रभाकर पेठकर

प्रत्यक्ष जीवनात आपले मत मांडता येणं आवश्यक आहे

प्रत्यक्ष जीवनात आपले मत मांडता येणे म्हणजे तरी स्त्रीमुक्ती झाली असे म्हणता येईल का?

मुळ विषय मराठी संस्थळांवर स्त्रियांचा वावर हा आहे.
स्त्रियाच काय कित्येक पुरुषांना मराठी संस्थळावर मराठी भाषेत टंकायला जमत नाही, (आणि कदाचित म्हणून) आवडत नाही.
आंतरजालावर मराठीत लिहीणे, आपल्या प्रतिक्रिया नोंदविणे वगैरेची आवड असणारेच लिहीत असतात. व्यक्त होण्याचे, आपले मत मांडण्याचे, अनेक पर्याय उपलब्ध असतात. मराठी संस्थळे हा त्यातील एक आहे. पण इथे एक वेगळीच (थोडीशी निगरगट्ट) मनोवृत्ती आवश्यक भासते. कित्येकदा अशा संस्थळांवर जी अद्वातद्वा भाषा वाचण्यात येते त्याने संवेदनशील व्यक्ती (त्यात स्त्रियांचा भरणा जास्त असावा) लिहायला कचरतात. काही वैचारिक भूक भागविण्याच्या उद्देशाने आलेलेही निराश होतात आणि लिहीणे बंद करतात, वाचनमात्र राहतात. दोन घेणे आणि दोन ठेवून देणे प्रत्येकालाच आवडते, जमते असे नाही. स्त्रियांच्या आवडीनिवडी, प्राथमिकता पुरूषांपेक्षा भिन्न राहिल्याने कदाचित त्यांचा वावर कमी असावा.
ही समस्या फेसबुकावर येत नसावी. (नक्की सांगता येणार नाही. मी फेसबुकाचा अभ्यासक नाही). त्यामुळे तिथे स्त्रियांचा वावर इतर संस्थळांच्या मानाने अधिक दिसून येतो.
पण स्त्रीमुक्तीचा विचार केल्यास ह्या प्रमाणावरून कुठल्याही समाजातल्या स्त्रिया अधिक मुक्त आहेत असे मत मांडता येणार नाही. संस्थळावर मुक्तपणे (तसेच, टोपण नांवाने) मते मांडणार्‍या स्त्रिया/पुरूष प्रत्यक्ष आयुष्यात त्या मतांचा पाठपुरावा करतात का? तर मला वाटते तसे होतेच असे नाही. ती मते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू असतो प्रत्यक्षात ते तशी कृती करतातच किंवा करू धजतातच असे नाही. आणि करू धजत नसतील तर ती 'मुक्ती' म्हणता येणार नाही. 'गुलामी' ही फक्त पुरुषांचीच नाही तर ती परंपरांची, पुर्वापार चालत आलेल्या संकल्पनांची, रुढींची, आपल्या एकलकोंड्या विचारांचीही असू शकते. स्त्रियांच्या स्त्रिवादी विचारांचीही असू शकते. एवढ्या सगळ्या (किंबहुना ह्याहुन कितीतरी) विचारांपासून विधायक फारकत घेणे, स्त्री-पुरूष ह्यांच्यातील निसर्गदत्त फरकाला स्विकारून त्यचा बाऊ नकरता त्यावर कशी मात करता येईल ह्यावर विचार आणि कृती करणे अशा काही गोष्टी स्त्रियांना कराव्या लागतील.
पुरूष तरी १००% मुक्त/स्वतंत्र असतो का? त्याच्या मनावरही लहानपणापासूनच्या संस्कारांचा, सामाजिक परंपरांचा, रुढींचा पगडा/प्रभाव असतोच. तो झुगारून स्त्रियांना बरोबरीच्या नात्याने वागवणे/स्विकारणे, स्वतःच्या वैचारिक बैठकीत, व्यक्तीमत्वात विधायक बदल घडविणे हेही वर्षोंवर्षीच्या, परंपरागत रुढींच्या 'गुलामी'तून स्वतःची मुक्तता करण्यासारखेच आहे. पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही 'मुक्ततेची' गरज आहे. मग तुम्ही मराठी संस्थळावर लिहीणारे असा किंवा नसा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 1:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरूषही रूढी-परंपरांचा गुलाम आहे हे मलाही मान्य आहे. फक्त या रूढी पुरूषांनी बनवलेल्या होत्या, त्यांचा फायदा त्यातून अधिक होत होता आणि स्त्रियांची पिळवणूक होत होती. हे लक्षात यायला लागलं ते स्वातंत्र्याच्या कल्पना प्रत्यक्षात यायला लागल्यावरच. रूढी-परंपरांचा ऑब्जेक्टीव्ह विचार केल्यास पुरूषांचाही फायदाच होईल हे मलाही मान्य आहे.

---

'मुलगी शिकली प्रगती झाली', 'एक मुलगी शिकली की सर्व कुटुंब शिकतं' ही वाक्य ओळखीची वाटतात का?
याच धाग्यावर "बरं मग", "काय फरक पडणार आहे अधिक स्त्रिया आंजावर येऊन" असे प्रतिसाद आहेत. ते ही पुरूष आयडींकडून आलेले आहेत. या सर्वाचा त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा ही विनंती.

प्रभाकर पेठकर's picture

13 Mar 2012 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर

फक्त या रूढी पुरूषांनी बनवलेल्या होत्या, त्यांचा फायदा त्यातून अधिक होत होता आणि स्त्रियांची पिळवणूक होत होती.

पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत प्रत्येक बरी /वाईट रुढी पुरुषांनीच बनविलेली आहे.
स्त्री शिक्षण, समाज प्रबोधन, देश भक्ती जागविणे, विवाहपूर्व आणि विवाहबाह्य शरीर संबंधांना मान्यता न देणे, स्त्री दाक्षिण्य, रक्षाबंधन, भाऊबिज, मात्रूदेवो भवः, आईचा सन्मान, एक पत्नीव्रत अशा अनेक संकल्पना ज्यात स्त्रिवर अत्याचार आणि पुरुषांचा फायदा ह्या पलीकडे जाऊन काही चांगला विचार/आचार पुरुषांनीच पाडलेल्या रुढींमध्ये दिसून येतो.

पुरूषांकडून स्त्रियांवर अत्याचार झालाच नाही, होतच नाही असे मला म्हणायचे नाही. पण अशा काही अत्याचारी पुरुषांमुळे सर्व पुरुषजातीलाच लांछन लावणे अन्याय्य वाटते.
पुर्वीच्याकाळी समाजात शिक्षणाचा प्रसार झाला नव्हता तेंव्हा कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाला मान्यता होती (पुरूषसत्ताक समाज व्यवस्थेमुळे). ह्यातुन पुरुषांच्या मनात नैसर्गिकरित्या उच्चत्त्वाची भावना निर्माण झाली. आणि जेंव्हा जेंव्हा स्त्रिशिक्षणामुळे, स्वतंत्र मतांमुळे ह्या उच्चत्वाला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष आव्हान निर्माण झाले तेंव्हा तेंव्हा काही पुरुषांनी दडपशाहीचा अवलंब करून स्त्रियांची स्वातंत्र्याची उर्मी दाबून टाकली किंवा टाकण्याचा प्रयत्न केला. कारण पुरुषांमध्येही शिक्षणाचा म्हणावा तितका प्रसार झाला नव्हता.
पुढे शिक्षणाचा प्रसार झाला आणि अनेक संत महतांनी समाज प्रबोधन केले ज्याचे फलीत म्हणून स्त्रिशिक्षण आणि स्त्रिमुक्तीविचारांनी मुळ धरले. हि समाजाची प्रगतीच म्हणावी लागेल. ती अजून पुर्ण झालेली नाही. समाज स्थित्यंतर अवस्थेतच आहे. त्यामुळे काही चांगली आणि काही मागासलेल्या मनोवृतीची माणसे (पुरुष) दिसून येतात.
स्त्रिमुक्ती हा सर्वस्वी वेगळा विषय आहे. तिथे स्त्रियांच्या मनोवृत्तीचेही विश्लेषण करावे लागेल. पण तो आपला विषय नाही. मराठी संस्थळावरील स्त्रियांचा वावर हा विषय आहे. त्यामुळे स्त्रिमुक्ती विषय आवरता घेतो.

'मुलगी शिकली प्रगती झाली', 'एक मुलगी शिकली की सर्व कुटुंब शिकतं' ही वाक्य ओळखीची वाटतात का?

हो वाटतात नं! त्यात वाईट काय आहे? पुर्वीच्या काळी मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जायचे नाही. अजूनही कित्येक घरातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात हे जाणवते. मुलांना शिकवायचे आणि मुलींना शिकवायचे नाही हे चुकीचे आहे हा विचार समाजात रुजवण्यासाठीच वरील घोषवाक्यांचा सरकार कडून प्रचार केला गेला. स्त्रियांच्या शिक्षणासाठी एखादा विचार समाज मनात रुजवीणे ह्यात गैर काय? त्याचा स्त्रियांच्या स्वतंत्र विचारांना, मतांना चालनाच मिळणार असते. ते एक स्त्रिमुक्तीच्या मार्गावरील, गुलामगिरी झुगारून देण्याच्या विचारांना प्रवृत करणारे विधायक पाऊलच म्हणावे लागेल. नाही का?

याच धाग्यावर "बरं मग", "काय फरक पडणार आहे अधिक स्त्रिया आंजावर येऊन" असे प्रतिसाद आहेत. ते ही पुरूष आयडींकडून आलेले आहेत.

ही संपूर्ण पुरुषजातीची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत असे आपल्याला म्हणायचे आहे का? मला तरी तसे वाटत नाही. समोरच्याला चिथावणे/भडकविणे आणि चर्चा मुळ मुद्यापासून भरकटविणे अशा उद्देशाने अशी वाक्ये नेहमीच अनेक चर्चांमधून येत असतात. तिथे दुर्लक्ष्य करणे हेच शहाणपणाचे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 8:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पेठकरकाका, मुळात आपली असहमती नाहीच.

किंबहुना तुमचंच उदाहरण पहायचं तर तुम्ही मिपावर अतिशय सुरेख पाकृ टाकायचात अशीच माझी सुरूवातीची आठवण आहे. पण घराबाहेरच्या जगाबद्दल तुमची काही मतं आहेत आणि ती तुम्ही वेळोवेळी (अतिशय सभ्यपणे) मांडता. पाकृ टाकता म्हणून तुम्ही (आणि गणपाही) लाडके असता, पण तुमच्या अभिव्यक्तीमुळे तुमच्याबद्दल आदरही आहे. स्त्रिया इथेच मागे पडतात असं सामान्यतः दिसतं.

काही तुच्छतावादी लोकांमुळे सर्व पुरूषजमातच टाकाऊ आहे असा माझा समज अजिबातच नाही. याच धाग्यावर इतरत्र मीच "वडील, भाऊ, मित्र या नात्यांमधूनही मनुष्य माया करतो" असंही लिहीलेलं आहे. किंबहुना सरसकटीकरणाला माझा विरोधच आहे. या संदर्भात (माझा मित्र) मुक्तसुनीत याने लिहीलेले एक स्फुट आठवले.

प्रभाकर पेठकर's picture

13 Mar 2012 - 10:16 pm | प्रभाकर पेठकर

अदिती,

स्त्रिया इथेच मागे पडतात असं सामान्यतः दिसतं.

स्त्रिया 'व्यक्त' होण्यात मागे पडतात ह्याचे अजुनही एक कारण (जे मला नंतर जाणवले) ते म्हणजे असुरक्षितता हे असू शकेल.
असुरक्षिततेची भावना (ह्याला कारण स्त्रियांकडे पाहण्याचा समाजाचा {स्त्री-पुरुष दोघेही ह्यात आले}दृष्टीकोन) आजही अनेक सुशिक्षित आणि उच्चशिक्षित स्त्रियांमध्ये दिसून येते. तशी पुरुषांमध्ये दिसत नाही. (ह्याचे मुळही समाजाच्या पुरुषांच्या वर्चस्वात असू शकेल). ह्या असुरक्षिततेच्या भिती पोटीच सार्वजनिक ठिकाणी, संस्थळावर स्त्रिया प्रामाणिकपणे व्यक्त होऊ शकत नसाव्यात. आक्रमक भाषेचे वावडे नसावे पण अर्वाच्य भाषेने पुरुषही बिचकतात, तिथे स्त्रियांची काय कथा? त्याही नको तो वाद अशा निष्कर्षाप्रत येतात. (अर्थात, अर्वाच्य भाषा वापरणार्‍याचा उद्देशही तोच असतो. ) वातावरण तापले, वाद भरकटू लागले की स्त्रिया सुरक्षित माघार घेतात. अप्रत्यक्षपणे, त्यांच्या व्यक्त होण्याच्या इच्छेचा गळा घोटला जातो. त्या मुळे त्या एकतर वाचनमात्र राहतात किंवा सुरक्षित चर्चांमध्ये भाग घेतात. पण हे कमी प्रमाण हे स्त्रियांच्या 'मागासलेपणाचे' लक्षण आहे असे मानता येणार नाही. व्यक्त होण्यासाठी पोषक वातावरण असेल तर हे प्रमाण नक्कीच वाढेल.
आय डी डुप्लीकेट घेतले तरी त्या मागील स्त्री 'ओरिजिनल' असल्याकारणाने ती तिच्या मुळ स्वभावधर्मानुसारच संस्थळावर वावरत असते.
मागच्या, सध्याच्या पिढ्यांना बदलविणे शक्य नाही पण घरातल्या आपल्या लहान मुलींना 'व्यक्त' होण्यास वाव आणि प्रोत्साहन दिले तर येत्या काही वर्षात बर्‍यापैकी फरक पडेल. पुर्वीच्या काळच्या स्त्रिया आणि आज कालच्या स्त्रिया ह्यांच्यात जो गुणात्मक फरक दिसुन येतो तोच पुढे वाढवत नेला तर मुक्त आणि व्यक्त स्त्रियांचे प्रमाण वाढलेले दिसेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2012 - 9:20 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विश्वासु नसलेला अलेक्सा.कॉमचा विदा आणि अमुक अमुक संकेतस्थळावरील प्रतिसाद पाहा अशी संकेतस्थळाची जाहिरात सोडली तर चर्चा उत्तम चालली आहे [असे वाटते]

मिसळपाव या संकेतस्थळावर इतर काही संकेतस्थळाच्या तुलनेत स्त्रिया बर्‍याच धीटपणे लिहित असतात असं माझं व्यक्तिगत मत आहे. आता या लिहिण्याचा काही विदा नाही पण, काहींचं केवळ कवितेपुरतं लिहिणं आहे. काहींचं काही स्फूट लेखन आणि पाककृती पर्यंत असं मर्यादित लिहिणं आहे. काही खरडीपुरतं लिहितात. काही अधुन-मधुन चर्चेत सहभागी होतात आणि काही उत्तम असं लेखन-प्रतिसादही लिहित असतात या मिसळपावच्या इतर मराठी संकेतस्थळाच्या तुलनेत मला जमेच्या बाजू वाटतात.

स्त्रियांचं संस्थळावर लेखनाचं प्रमाण कमी का ? याचं उत्तर अजूनही मला 'भीती' असेच वाटते. ही भीती कोण काय म्हणेल, कोणाला काय वाटेल, मान-अपमान, मराठी लिहिण्यातल्या चुका आणि पुरुषांच्या लेखनातील धुसमुसळेपणा या काही गोष्टी स्त्रीयांच्या संकेतस्थळावरील वावरण्याच्या बाबतीतला मुख्य अडथळा मला तरी वाटतो.

संस्थळावर वावरतांना जो बिंधास्तपणा लागतो त्याचा खूप अभाव मराठी स्त्रियांच्या व्यक्त होण्याबाबत आहे. केवळ दोन चार स्त्रिया अतिशय बिंधास्तपणे लिहितात याचा अर्थ आधुनिक आणि मुक्त विचारांच्या सर्वच स्त्रिया तशा आहेत असं काही नाही नसतं. बरं या अशा काही स्त्रिया 'अतिशहाण्या' या वर्गात मोडल्या जातात की काय असे वाटल्यामुळे नको त्यांच्यासारखं बरं आहे आपण आपल्या पायरीनं लिहावं वावरावं अशी एक मनाची समजूत घालणारा स्त्रियांचा वर्ग असावा असेही वाटते.

संगणक साक्षरतेचं पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच प्रमाण आणि सार्वजनिक संकेतस्थळावरी स्त्रियांच्या वावरण्याचं प्रमाण याचा विदा कोणाकडे असेल आणि ते अगदी सारखा वाटत असला तरीही भारतीय 'पुरुषप्रधान दुष्टीकोण' इथेही आडवा येत असावा असे मला वाटते.

मिसळपाववर स्त्रियांचं लिहिण्याचं प्रमाण अगदी उत्तम आहे. व्यक्त होण्याच्या बाबतीतला बुजरेपणा जाऊन अभिव्यक्त होण्याचे प्रमाण वाढावे. स्त्रियांची मराठी संकेतस्थळावरील संख्याही वाढावी. केवळ वाचक म्हणून असलेल्या स्त्रीयांच्या मनातला (असेल काही ) न्युनगंड जावा. आणि खर्‍या अर्थाने लिहिण्या-बोलण्याची समानता वाढावी, नांदावी, इतकेच मला या चर्चेच्या निमित्ताने वाटते.

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2012 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खर्‍या अर्थाने लिहिण्या-बोलण्याची समानता वाढावी, नांदावी

अय्या, खरं का काय?

अति असेल पण तरीही शहाणपण उरतंच. :-)