Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 01:59
जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा. महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात. कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा. मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्‍या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच. मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का? ८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते. इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.) विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते. विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात. "एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते. निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.
  • Log in or register to post comments
  • 78867 views

प्रतिक्रिया

Submitted by रेवती on Fri, 03/09/2012 - 02:03

Permalink

आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ

आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ गं आला आला आला आला. पाशवी धागा आला.;) वाचते गं. आत्ता फक्त धागा आल्याचा आनंद व्यक्त केलाय.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 03/09/2012 - 21:48

In reply to आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ by रेवती

Permalink

धन्यवाद

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 03/12/2012 - 09:41

In reply to धन्यवाद by सुहास..

Permalink

तू पण घेतलीस एजन्सी? का

तू पण घेतलीस एजन्सी? का डिस्ट्रिब्युशन फक्त रे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 03/10/2012 - 12:03

In reply to आला गं बाई आला गं बाई आलाऽऽ by रेवती

Permalink

छान चर्चा विषय.

श्री. चतुरंग, श्री. विकास (बिन काड्यावाले), श्री. निखिल देशपांडे, श्री. घासुगुर्जी, श्री. लिखाळ इ. मान्यवरांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक. बाकी स्त्रियांचे हे प्रमाण वाढवण्यासाठी, काही पुरुष हे स्त्री आयडी घेऊन आपापल्या परीने हातभार लावत असतात म्हणे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sat, 03/10/2012 - 17:22

In reply to छान चर्चा विषय. by परिकथेतील राजकुमार

Permalink

वाचत होतो...

चर्चा कशी आणि कुठे चालली आहे ते वाचत होतो. अलेक्साकडचा विदा माझ्या सर्वसाधारण निरीक्षणांशी जुळतो. मराठी आंतरजालावर स्त्रियांचं प्रमाण कमी आहे यात वादच नाही. यावर थोडक्यात अनेकांनी म्हटलेलं आहे, 'त्यात विशेष काय, सगळीकडेच ते कमी आहे, म्हणून मराठी आंतरजालावर कमी आहे.' धनंजयनेदेखील विदा देऊन दाखवलं आहे की की भारतातल्या स्त्रियांच्या बाबतीत, एकंदरीतच आंतरजालावर वावर कमी आहे, त्यात मराठी आंतरजाल काही वेगळं नाही. इथे बहुतेकांना उत्तर सापडल्यासारखं वाटतं. पण खरा तर प्रश्न इथे सुरू होतो. धनंजयच्या तिथल्याच पुढच्या प्रतिसादात तो म्हणतो की
"मराठी संकेतस्थळ" यापासून बदलून मी विचारलेला प्रश्न एकूण भारतातच "जागतिक सरासरीपेक्षा" इंटरनेटचे स्त्री-वापरकर्ते कमी का? हा स्त्रियांच्या रोजीरोटी आणि सबलीकरणाशी संबंधित होतो. मला तरी हा व्यापक प्रश्न मुळीच भंपक वाटत नाही.
मला हाच कळीचा मुद्दा वाटतो. आंतरजालावर कमी दिसणारा स्त्रियांचा वावर हा प्रश्न नसून तो एका व्यापक प्रश्नाचा दृश्य परिणाम आहे. स्त्रियांचं सबलीकरण अजूनही झालेलं नाही हा मुद्दा रहातोच. अनेकांनी मांडलेली कारणं हेच अधोरेखित करतात. - घरी एकच कॉंप्युटर असतो - तो नवऱ्यालाच मिळतो. (असमानता, पुरुषांना प्रथमस्थान) - बायकांना संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा असतो, त्यामुळे त्यांना वेळ मिळतो. (चूल आणि मूल हेच जीवन) - बऱ्याच घरी कॉंप्युटर नसतो, पण पुरुषांना मात्र नोकरीच्या ठिकाणी कॉंप्युटर वापरता येतो. (असमानता, नोकऱ्या पुरुषांनाच अधिक असतात) - स्त्रिया वाद घालायला कचरतात (दबलेपणाची भावना) - स्त्रियांना जालीय वावराची भीती वाटते (असुरक्षितता) - स्त्रियांना तंत्रज्ञानाची भीती वाटते (लहानपणापासून धोका पत्करण्याचं, नवीन वस्तु हाताळण्याचं स्वातंत्र्य वा शिक्षण न दिल्यामुळे ही भीती येत असावी) म्हणजे समाजात एकंदरीतच स्त्रियांमध्ये - अगदी वरच्या वर्गातल्या स्त्रियांतही (अदिती ज्यांना एलिट म्हणते) - हे वेगवेगळ्या पातळीवर दडपलेपण आहे. या चर्चेतून हा मुद्दा पुढे येतो हे या चर्चेचं यश आहे. यात विशेष काय, हे इतर ठिकाणी दिसतंच वगैरे म्हणणं म्हणजे आहे ती परिस्थिती वाईट आहे हे नाकारणं.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Wed, 03/14/2012 - 22:39

In reply to छान चर्चा विषय. by परिकथेतील राजकुमार

Permalink

बाकी स्त्रियांचे हे प्रमाण

बाकी स्त्रियांचे हे प्रमाण वाढवण्यासाठी, काही पुरुष हे स्त्री आयडी घेऊन आपापल्या परीने हातभार लावत असतात म्हणे. पण त्याने काय साध्य होणार? फारतर स्टॅटिस्टीक्स साठी डेटा जास्त होईल पण प्रॉडक्टीव्ह आउट्पुट काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Fri, 03/09/2012 - 02:24

Permalink

'जागतिक महिला दिन व

'जागतिक महिला दिन व शिमगा.' अतिशय पर्फेक्ट उदाहरण आणि त्यावर पर्ल ने मान्डलेल मत . अश्या लेखांमुळे कदाचित स्त्रियांच येण कमी होत असाव. माझ मत .
  • Log in or register to post comments

Submitted by निवेदिता-ताई on Fri, 03/09/2012 - 14:29

In reply to 'जागतिक महिला दिन व by जेनी...

Permalink

असेच म्हणते.........

असेच म्हणते.........:)
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 03/09/2012 - 23:01

In reply to 'जागतिक महिला दिन व by जेनी...

Permalink

मला तरी त्या धाग्यात काही

मला तरी त्या धाग्यात काही वावगे दिसले नाही. आता प्रत्येकाची जाण , समज, विनोदबुद्धी वगैरे वगैरे .... :)
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Mon, 03/12/2012 - 19:15

In reply to मला तरी त्या धाग्यात काही by शुचि

Permalink

>>मला तरी त्या धाग्यात काही

>>मला तरी त्या धाग्यात काही वावगे दिसले नाही. आता प्रत्येकाची जाण , समज, विनोदबुद्धी वगैरे वगैरे .... Smile >> आता प्रत्येकाला वेगवेगळ्या तर्‍हेचे विनोद अपील होत असतात. उदाहरणार्थ काही जणांना दादा कोंडके (मराठी नटाबद्दल बोलत आहे. मिपावरील आय डी बद्दल नाहे ;-)) यांचे विनोद आवडतात, काही जणांना नाही. पण आता हे समजून घ्यायची प्रत्येकाची जाण , समज, बुद्धी वगैरे वगैरे :-)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/09/2012 - 02:38

Permalink

चांगला चर्चा

चांगला चर्चा विषय. स्टॅटिस्टीक्स दिसत नाहिये (मलाच की सगळ्यांना?). मिसळपावशिवाय इतर ठिकाणी वावर फारसा नसल्याने त्यांची माहिती नवीन आहे. मिपावर स्त्रीसदस्य कमी आहेत हे जाणवते. त्यातही फक्त सदस्यत्व घेऊन फारसे न फिरकलेल्या जणी जास्त असतील हे म्हणण्याचे धाडस करावेसे वाटते. स्त्री नावाने सदस्यत्व घेतलेले पुरुष यात धरले तर स्त्रीयांची संख्या आणखी कमी असण्याची शक्यता आहे.;) इंटरनेट वापर हा लेखात म्हटल्याप्रमाणे भारताचा शहरी भाग आणि परदेशस्थित (येथे मराठी)लोकांकडून जास्त होतो पण शहरात किंवा परदेशात मूव्ह होताना मुख्यत्वे नवर्‍याची नोकरी हे कारण असते. (बायकोची नोकरी असल्याने मूव्ह झालेलेही आहेत पण प्रमाण त्यामानाने कमी.). नवीन ठिकाणी रुजताना घरी लगेच सगळ्या सोयी नसणे (नवर्‍याला मात्र ऑफीसमधून इंटरनेट अ‍ॅक्सेस असणे). मुले लहान असणे व त्यामुळे वेळ देऊ न शकणे. नवीन देशात स्थिरस्थावर झाल्यावर बायका (म्हणजे मुली) नोकरी/व्यवसाय/उच्च शिक्षण करण्यामुळे वेळ देऊ न शकणे. ही मह्त्वाची कारणे म्हणावी लागतील असा अंदाज आहे. आता बायकांनाच स्वयंपाक करावा लागतो, घराची साफसफाई करणे, ग्रोसरी वगैरे यादी वाढवता येईल पण माझ्या घरी याबाबत काय होते तेच मला माहीत असेल. दुसर्‍या घरी पुरुषाची कितपत मदत होते आणि तो वेळ इंटरनेटसाठी वापरता येतो का ते वेगवेगळे असेल. वर नमूद केलेल्या वेबसाईट्स या मनोरंजन (त्यातून संवाद वगैरे पुढच्या गोष्टी आहेत. त्यातून सदस्यांना अर्थार्जन होत नाही या अर्थी घ्यावे.) या कारणापुरत्या वापरल्या जातात. जाहिराती, ऑनलाईन खरेदी विक्री भयानक मोठी उलाढाल करणारी असल्यास माहीत नाही. ही झाली थोडी व्यावहारीक आणि दरदिवशी जगतानाची बाजू. (नक्की काय ते सांगता आले नाहिये.;) ) पण मानसिकरित्या कोणत्याही स्त्रीला समोरच्या पुरुष सदस्याविषयी असलेली भीड (भिती या अर्थी नाही). स्त्री शहरातली खेड्यातली असा भेदभाव नाही (तो आणखी वेगळा विषय, फक्त स्त्री असणे या अर्थी). माझा अपमान होणार नाही ना? झालाच तर त्यात कोणत्याप्रकारचे शब्द वापरले जातील? त्यापेक्षा नकोच! मी वाचकच राहीन. शिवाय शैक्षणिक पातळीवर आलेल्या अडचणी. मी कमी (किंवा जास्त) शिकलेली आहे म्हणून काही प्रश्न उद्भवतील काय इ. वैद्यकीय दृष्टीकोनातून सुरु केलेले विषय नंतर कुठल्याकुठे गेले तर लाज वाटणे अशी नैसर्गीक कारणेही असू शकतात. अश्लील व्य. नि. किंवा बाकीही गोष्टी आसतातच. यावर उपाय कोणते तोही वेगळा विषय होऊ शकेल. (आत्ता खरा महिला दिन साजरा झाला बुवा!;))
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 03/09/2012 - 02:56

In reply to चांगला चर्चा by रेवती

Permalink

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Image removed.आपला एवढा दीर्ध प्रतिसाद पहिल्यांदा पहात आहे. (( ते माझे राखीव कुरण आहे) आणी त्याच्याशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Fri, 03/09/2012 - 04:03

In reply to जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा by निनाद मुक्काम …

Permalink

हा हा हा. हो, वरचा प्रतिसाद

हा हा हा. हो, वरचा प्रतिसाद फारच लांबला. तरी बाकी प्रश्नांची उत्तरं लिहिली नाहियेत;) अजून बरच अ‍ॅड करावसं वाटत होतं पण ते जास्तच होईल म्हणून थांबले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Fri, 03/09/2012 - 04:22

In reply to हा हा हा. हो, वरचा प्रतिसाद by रेवती

Permalink

रेवतीताई, प्रतिसाद लांबला तरी चालेल :-)

रेवतीताई, प्रतिसाद लांबला तरी चालेल :-) << अजून बरच अ‍ॅड करावसं वाटत होतं पण ते जास्तच होईल म्हणून थांबले<< कृपया अ‍ॅड करा. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 03/09/2012 - 10:31

In reply to रेवतीताई, प्रतिसाद लांबला तरी चालेल :-) by Pearl

Permalink

+

असेच म्हणतो. प्रतिसादात अ‍ॅडिशन कराच.
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Fri, 03/09/2012 - 03:43

Permalink

चांगला विषय..

चांगला विषय.. धन्स आदिती. वेळ मिळाला की माझं मत सविस्तर लिहिन. सध्या चर्चा वाचत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 05:36

In reply to चांगला विषय.. by Pearl

Permalink

जरूर लिहा.

ही चर्चा मायबोली, मनोगत, उपक्रम, मीमराठी आणि ऐसीअक्षरेवरही टाकलेली आहे. सर्व संस्थळांवर वेगवेगळे लोकं येतात त्यांची काय मतं आहेत, हे मला का जाणून घ्यायचं आहे यासंदर्भातही मला लिहायचं आहे. सवडीने मोठा प्रतिसाद लिहीते आहे. तोपर्यंत लोकांची मतं वाचण्यास उत्सुक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रा on Fri, 03/09/2012 - 05:32

Permalink

स्त्रियांचा

स्त्रियांचा वावर कमी हे कसे कळते?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 05:41

In reply to स्त्रियांचा by चित्रा

Permalink

अलेक्सावर डेमॉग्राफीचा विदा

अलेक्सावर डेमॉग्राफीचा विदा कसं गोळा करतात याबद्दल इथे किंचित माहिती मिळाली. नाईलच्या मताप्रमाणे:
अनेक वेबसाईट्स स्टॅटीस्टीकल मॉडेल्स वापरुन तुम्ही स्त्री आहात का पुरुष हे शोधतात. (गुगल प्रोफाईलवर मी माझे 'लिंग' दिले नव्हते. पण आता गुगल स्वतःचाच मला पुरुष असे दाखवतो) अलेक्साने अर्थातच मराठी संस्थळावरून तुम्ही पुरुष आहात का स्त्री हे ओळखलेले नाही. तुमच्या इतर इंटरनेट वापरावरून (इतर सर्च क्लायंट्सकडून?) ही माहीती मिळलेली आहे.
मला हे पटतं. हा मुद्दा फार गौण नसला तरी चर्चा त्याबद्दल रेंगाळू नये अशी अपेक्षा आहे. त्यातून मायबोलीबद्दल जो डेटा आहे तो मला थोडा मजेशीर वाटला. पण मिपा, मीम, उपक्रमावर मी जे पहाते त्यात प्रचंड male-bias जाणवतो. ऐसीअक्षरेवरही (विदा गोळा केलेला नाही) मी पहाते तेव्हा स्त्री-आयडींचे प्रमाण बर्‍यापैकी दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 03/09/2012 - 06:06

Permalink

लेखातील सुरुवातीच्या दोन

लेखातील सुरुवातीच्या दोन परीच्छेदात म्हंटल्याप्रमाणे स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्रियांना समान हक्क याचा मराठी ईंटरनेट वर महिलांची संख्या कमी याचा काही संबंध वाटत नाही. कारण भारतात/महाराष्ट्रात तरी ईंटरनेटवर स्त्री सदस्यांना कुणीही बंदी/अत्याचार केल्याचे दिसुन आलेले नाही, किंबहुना महिलांची संख्या कमी असल्याने काही तोटे आहेत किंवा वाढल्याने फायदे होतील हा मुद्दा वादातीत आहे. आता मूळ मुद्द्याकडे वळूया. ईंटरनेट वापरणे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. कदाचित बहुतांश स्त्रियांना यात रस नसेल किंवा बर्‍याचशा फक्त वाचनमात्र राहण्याला पसंती देत असाव्यात. करत असलेल्या नोकरीचे स्वरुपही कारणीभूत असु शकते. हे पुरुषांना देखील लागू होते. मिपाचेच उदाहरण घेतले तर बर्‍याच पुरुष मंडळींच्या पत्नींचे इथे आयडी नाहीत आणि स्त्री आयडींच्या पतीचे इथे किंवा कुठल्याही मराठी संस्थळावर आयडी नाहीत. असो, संख्या कमी का हा संशोधनाचा विषय म्हणूनच या चर्चेकडे पहातोय आणि ही चर्चा तिथेच सीमीत रहावी, स्त्रीमुक्ती, समान हक्क हे विषय या विषयाशी जोडले जाऊ नये अशी अपेक्षा. महिला दिनाच्या आणि शिमग्याच्या सर्वांना शिळ्या शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Mon, 03/12/2012 - 23:20

In reply to लेखातील सुरुवातीच्या दोन by मराठमोळा

Permalink

>> भारतात/महाराष्ट्रात तरी

>> भारतात/महाराष्ट्रात तरी ईंटरनेटवर स्त्री सदस्यांना कुणीही बंदी/अत्याचार केल्याचे दिसुन आलेले नाही >> अशी कोणतीही बंदी नाहीये हे मान्य. पण इंटरनेटचं राहू द्या. मी आता केस स्टडी म्हणून आपल्या मिपाचं उदाहरण घेत आहे (कारण मराठी संस्थळात मी फक्त मिपावरचं वावरली आहे.) स्त्री सदस्यांना बंदी नाहीये मान्य. पण वावर करताना मोकळेपणा जाणवला पाहिजे ना स्त्रियांना. कम्फर्ट वाटला पाहिजे. तो जाणवत नाही बरेच वेळा असं वाटतं. याची कारणं कदाचित अशी असावीतं, (१) बर्‍याचदा ज्या गोष्टींवर बोलणे/बोललेलं ऐकणे स्त्रियांना अनकंफर्टेबल वाटतं त्या गोष्टींवर उघडपणे चाललेली निरर्थक चर्चा. आणि त्यावर येणार्‍या काही वाचकांच्या प्रतिक्रिया, वाचक त्याचा घेत असलेला आनंद. आपल्याला ज्यांचा एरवी आदर वाटतो अशा आयडींच्याही अशा धाग्यावरच्या काही प्रतिक्रिया यामुळे तर अजूनच अनकंफर्टेबल वाटतं असावं. एरवी ज्या विषयांबद्दल गुप्तता पाळली जाते त्यावर कधी चर्चाच होऊ नये असं काही नाही, त्यावरही चर्चा व्हावीच ना. त्या विषयांवरील चर्चा निशिद्ध अस मुळीचं माझं म्हणणं नाही. पण ती चर्चा बर्‍याच अंशी ऑन सेरियस नोटच व्हावी. अशा विषयांवरील थोड्या हलक्या-फुलक्या विनोदांना कोणाचीही ना नसते. पण लेखविषय राहिला बाजूला आणि त्यावर अवांतर वायफळ आणि ऐकवत नाही अशी बडबड सुरू झाली की नको वाटते. (२) कोणाही पुरूष आयडीने आपापल्या विचारक्षमतेनुसार कोणत्याही विषयावर काहीही मते मांडली तरी चालते. कोणाची त्याला काही हरकत नसते. बरेचदा ते लाइटली घेतले जाते. पण तेच एका स्त्रीने काही लेखन/प्रतिक्रिया लिहिली की ती मात्र लगेच वेगवेगळ्या मापदंडांवर तोलून-मापून पाहिली जाते, हे करताना (एरवी कितीही मतभेद असतील तरी) सर्व पुरूषवर्ग एक होतो. सगळेचं पुरूष आयडी असं करतात असं नाही. पण ती एक मॉब-मेंटॅलिटी झाली आहे. (३) बोलताना / चर्चा करताना / इथे वावरताना काही पारंपारीकपणे (रोजच्या जीवनात/समाजात) ज्या चुकीच्या संकल्पना चालतं आल्या आहेत त्यांचा त्रास होतो, त्या क्लेशदायक वाटतात. आणि बहुसंख्य सदस्य तेचं बरोबर असं मानून चालत असतात, याचाही त्रास होतो. अजून थोडं विस्कटून सांगायचं झालं तर काही संकल्पना चुकीच्या आहेत आणि बहुसंख्य लोकं त्याबाबत रिजिड आहेत आणि तेच बरोबर मानून चालतात. १) मुली / स्त्रिया या सुंदरचं असल्या पाहिजेत, दिसल्या पाहिजेत. उदा. एका सदस्याचं वॅक्सिंगबद्दलची कमेंट. अतिशय हीन कमेंट. अरे आम्ही कसं रहायचं तुम्ही कोण सांगणार. यू आर नॉट सपोज्ड टू कमेंट ऑन दॅट. अ‍ॅट लिस्ट नॉट ऑन ओपन फोरम जिथे स्त्री/पुरूष दोघही वाचक आहेत. तुम्ही केस/दाढी/मिशा वाढवणार किंवा नाही वाढवणारं, केसांचा भांग पाडणार किंवा नाही पाडणार, वाटेल तसे पूर्ण/अर्धे/पाव कपडे घालणारं तसंच वावरणार, तोंडावरून हात फिरवून बाहेर पडणार किंवा न फिरवून बाहेर पडणारं हवं तसं, स्वत:च कसंही काळं/गोरं, ढेरपोटं, उंच/बुटकं असंणं हे सगळं नॉर्मल. पुरूष जे काही वागालं ते नॅचरल/नॉर्मल. आणि स्त्रीचं वागणं/बोलणं/दिसणं या कशावरही आले लगेच मापदंड घेऊन. [आता हे असं बोलणही आम्हाला (मला आणि कदाचित बर्‍याच जणींना) प्रशस्त वाटतं नाही. पण आता कशाचा त्रास होतो हे तर सांगायलाचं हवं ना.] २) नोकरी करणार्‍या स्त्रियांनी सुपरवुमन होऊन नोकरी/घरकाम/मुलं सांभाळणं आवश्यक. हे खरतरं चुकीच आहे. घर दोघांचं असतं, मुलं दोघांनी जन्माला घातली असतात, त्यामुळं बायको नोकरी करत असेल तर घरकाम (उदा. स्वयंपाक, किचन आवरणं, क्लिनिंग, बिलं भरणं, इतर कामं) /मुलांच करणं हे नवरा-बायको दोघांनीही मिळून सामंजस्यानं करणं अत्यावश्यक (इर्रिस्पे़क्टिव ऑफ कोणाला किती पगार मिळतो), तेही बायकोला मदत म्हणून नव्हे तर ती स्वत:ची जबाबदारी आहे हे जाणून. आणि हे करताना जर दोघांना लोड येत असेल तर कामाला, स्वयंपाकाला बाई लावणे असे पर्याय अवलंबून इतर कामं दोघं मिळून करणे. सो दॅट दोघांपैकी कोणीही जास्त एक्झॉस्ट होणार नाही. जेव्हा बायको नोकरी करत नसते तेव्हाही (ऑफिसमधून आल्यावर थोडी विश्रांती झाल्यावर) घरकामात/मुलांचं करण्यात सहभाग आवश्यक. अर्थात हे करताना कोणं किती दमतं आहे हे पहाणं आवश्यकं(आता सकाळी निघून ऑफिसमधून यायलाच जर ९/१० वाजत असतील तर तेव्हा कोणीही तेव्हा घरात काम करण्याची अपेक्षा ठेवणार नाही हे उघडचं आहे). कोणावरही जास्तीचा लोड पडला नाही पाहिजे ना बायकोवर ना नवर्‍यावर. ३)असे अजून बरेच मुद्दे आहेत त्यावर नंतर कधीतरी किंवा वेळ मिळेल तेव्हा सविस्तर चर्चा करू. मुद्दा क्र. २ या प्रकारचे मुद्दे याबाबत कुणी विरोध/विरोधी मत दर्शवलं की इतर सर्व एक होऊन मॉब बनून त्यावर हल्ला करतात. वरकरणी पहाता हा संपूर्ण मुद्दा क्रमांक(३) वाचकांना अवांतर वाटेल. पण या गोष्टी चूकीच्या रूढी/संकल्पना ज्यांच्या मनात पूर्ण रूजल्या आहेत अशांशी केलेल्या काही विषयांवरच्या चर्चा निरर्थक ठरतात. असो. (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी आजपर्यंत मिपाच्या कट्ट्यांचे अनेक व्रुत्तांत वाचले आहेत. त्यासंबंधीही मला असे प्रश्न पडतात, १) मिपाच्या बर्‍याचशा कट्ट्यांवर दारू मस्ट असते का? २) ९९% मिपा कट्ट्यांवर मुली/स्त्रिया का नसतात? तर अशा (१), (२), (३), (४) प्रकारच्या कारणांमुळे संस्थळांवर स्त्रियांना मोकळेपणा वाटतं नसावा हे माझं मत.
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Mon, 03/12/2012 - 23:43

In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl

Permalink

ज्जे ब्बात!!!

ज्जे ब्बात!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 03/13/2012 - 01:05

In reply to ज्जे ब्बात!!! by मस्त कलंदर

Permalink

अगदी अगदी

पर्ल, तुमची सगळी मतं पटली नाहीत तरीही तुम्ही अनेक मुद्दे लिहीणं मी टाळत होते ते लिहीलेत याचा आनंद झाला. उदा ती वॅक्सिंगवरची प्रतिक्रिया वाचून तळपायाची आग मस्तकाला गेली होती. पण कोणीतरी त्या गोष्टीचा जाहीर निषेध केला याचा मनापासून आनंद झला.
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 03/13/2012 - 01:11

In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ते तुमचे गुरुजी तिथे कानी

ते तुमचे गुरुजी तिथे कानी कपाळी ओरडून ट्रोल बद्दल जगाला सांगतात आणि तुम्हाला माहित नाही अजून ?? दिव्या खाली अंधार म्हणतात ते उगीच नाही. आता एक काम करा, एव्हाना गुरुदक्षिणा दिली असेल तर परत मागून घ्या, बरेच शिक्षण व्हायचे बाकी आहे तुमचे :-) (ह घेशील याची खात्री आहे ;-))
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Tue, 03/13/2012 - 01:25

In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

चर्चा करू

आदिती, जी मतं पटली नाहीत त्यावर चर्चा करायला आवडेल, त्यामुळे कदाचित मला एखादा नवीन व्ह्यू कळेल.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 03/13/2012 - 03:44

In reply to चर्चा करू by Pearl

Permalink

तर्री यांच्या धाग्यासंदर्भात

तर्री यांच्या धाग्यासंदर्भात आपला मतभेद आहे. त्या संदर्भात तुम्ही आणि शुचित आधीच सुसंवादी विरोधप्रकटन झाल्यामुळे अधिक बोलण्याची गरज नाही. We can agree to disagree. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्नू on Tue, 03/13/2012 - 02:35

In reply to अगदी अगदी by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

वॅक्सिंगवरची प्रतिक्रिया

वॅक्सिंगवरची प्रतिक्रिया वाचून तळपायाची आग मस्तकाला गेली होती.
तुमच्या या बोलण्यातून मला एक किस्सा आठवला. फेसबुकवर माझी अहमदाबादची एक फ्रेंड आहे. ती अशीच स्वतंत्र विचाराची आहे. तिने फेसबुकवर डकवलेले बहुतांशी फोटो हे अगदीच शॉर्ट क्लोथस् मधले आहेत किंबहुना ती आजही असेच फोटो डकवत असते. यावर एका महारथीने ऑब्जेक्शन घेत आणि आपली हिरोगिरी दाखवत तिला असे फोटो येथे डकवू नकोस म्हणून स्पष्ट सांगितले. यावर तिने जो त्याला झापायला सुरवात केली. तो म्हणे तु असे फोटो काढू नको आणि ती म्हणे नालायका तू माझ्यावर बंधन आणणारा आहेस तरी कोण? जवळजवळ अर्धा तास या कमेंट वर कमेंट चालू होत्या. आणि आंम्ही मात्र यावर हसून-हसून बेहाल झालो होतो! ( अर्थात हे हसणे त्या मुलावर आणि त्याच्यावरच्या गाढवपणाच्या शिव्यांवर होते तिच्यावर नव्हे!) शेवटी शेवटी तर तिने त्याला इतक्या शिव्या हाणायला सुरवात केल्या की तो नंतर "मी तुला बहीण मानतोय आणि प्लिज तू असे कपडे घालू नकोस." असा काकूळतीला येऊन बोलू लागला. आणि त्यानंतरसुद्धा शिव्यांची तिव्रता वाढतच गेल्याने त्याची मग बोलतीच बंद झाली! आजसुद्धा ती किंचीतही बदललेली नाही. कोणाच्याही बंधनाला किंवा प्रतिक्रियेला न जुमानता ती आजसुद्धा तिला जे पटतेय जे योग्य वाटतेय तेच करते. तिच्या निडरपणाच्या परखड बोलण्याला खरंच माझा सलाम! :) जग काहीही म्हणेल हो, पण त्याला काहीच किंमत नाही, कारण जगाला तर बोलायची सवयच असते. पण तुम्ही काय विचार करता हे मात्र खरे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Mon, 03/12/2012 - 23:54

In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl

Permalink

हाण्ण!

याला म्हणतात सौ सोनार की एक सोनारन की! :D
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 03/13/2012 - 01:02

In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl

Permalink

(४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी

(४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी आजपर्यंत मिपाच्या कट्ट्यांचे अनेक व्रुत्तांत वाचले आहेत. त्यासंबंधीही मला असे प्रश्न पडतात, १) मिपाच्या बर्‍याचशा कट्ट्यांवर दारू मस्ट असते का? २) ९९% मिपा कट्ट्यांवर मुली/स्त्रिया का नसतात?
गेल्या एका वर्षातील मुंबई कट्ट्यान्चा अभ्यास वाढवा. मदत पाहिजे असेल तर सांगा, मटेरियल पुरवण्याची व्यवस्था स्पा/सूड/किसन करतील.... टेस्टीमोनियल हवे असतील तर मस्त कलंदर किंवा माऊ ताईंना विचारा. बाय द वे, तुम्ही कुठल्या शहरात राहता? मुंबई किंवा पुण्यात असाल तर आता पावेतो रग्गड विनादारू कट्टे झाले आहेत. तुम्हाला इच्छा असेल तर पुढील वेळेस जरूर उपस्थिती लावावी. आता मुख्य मुद्दा... इथल्या बऱ्याच प्रतिक्रियांचा अंडरकरंट मला खटकतो आहे. म्हणे स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात, घाबरतात. व्यक्त होण्यास जाल हे माझ्या मते सर्वात सेफ माध्यम आहे. कोण येऊन गळा धरणार आहे का ?? त्यातून अगदीच भीती वाटत असेल तर टोपण नावाने काढावा आयडी आणि घालावा धुडगूस. कुणी अडवले आहे ?? मुळात सर्व जण मिळून आपली सर्व बाजूने कुचंबणा करत आहे, ही भावना स्त्रियांनी सोडली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला हक्क मागून घ्या. हे इतर कुणी करणार नाही, तुमचे तुम्हीच केले पाहिजे. शाळेत एक धडा होता आम्हाला. आंबेडकरांनी लिहिलेला अग्रलेख होता. त्यात त्यांनी दलितांना उद्देशून लिहिले होते की "कुणी महात्मा येईल आणि आपला उद्धार करेल या अपेक्षेत राहू नका" इथेही तोच सल्ला लागू आहे. तुम्ही पुरेशा शिकलेल्या आहात. Exposure का काय म्हणतात ते उत्तम आहे तुम्हाला. सात समुद्रापार जाणार्या पण अनेक आहेत इथे. कित्येक पुरुषांपेक्षा कर्तृत्त्ववान पण आहेतच की बऱ्याच जणी. आणि काय पाहिजे ?? इतर कुणाची मदत कशाला पाहिजे ?? केवळ उदाहरण म्हणून कट्ट्याचा मुद्दा घेतो. दारूचे कारण ढाल म्हणून वापरणे आता बंद करावे. दारू असणार नाही असे जाहीर करून त्यावर शतकी भांडणे होऊनही झालेल्या कट्ट्यात केवळ तीन स्त्रिया आल्या होत्या. त्यात पण नवीन फक्त एकच. किती जणींनी इथे ठासून सांगितले आहे की कट्ट्याला दारू नसेल तर आणि तरच येऊ (आणि वाचनाला जागून आल्या आहेत?). इतकेच कशाला, तुम्हाला एकदम अनोळखी ग्रुप मध्ये जायचे नसेल तर महिला कट्टा करा ना. पुरुष दारू चे कट्टे करतात म्हणून आम्हाला जाता येत नाही असे गळे न काढता या पुढे आणि महिला स्पेशल कट्टा अरेंज करा. करताय??? पुढील एका महिन्यात करून दाखवा असा कट्टा, चालेंज आहे आपले. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन च्या बाहेर यायचे नाही तर इतर कुणी खेचून बाहेर काढेल अशी अपेक्षा करू नका. मला आजवर असे दिसून आले आहे की अनेकदा दिलेली कारणे ही निव्वळ धूळफेक असते. निव्वळ पलायनवाद आहे. कारणे देणे बंद करा आणि केवळ सावित्रीबाई फुल्यांचा वारसा न सांगता त्यांच्या एक दशांश हिम्मत दाखवा. कुठे शिव्या, दगड, शेण झेलून पण मुलींना शिकवणाऱ्या त्या आणि कुठे जालावर व्यक्त व्हायला घाबरणारी आजची स्त्री ? शंभर वर्षात बरीच प्रगती आहे. असो, एखादा शब्द अधिक उणा गेला असेल तर माफ करा !!! नाजूक, कोमल भावनांना दुखावण्याचे पातक नको माझ्या माथी.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 03/13/2012 - 01:08

In reply to (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

दारू वगळता अगदी १००% सहमत

दारू वगळता अगदी १००% सहमत आहे. (मला रक्तवारूणी आवडते. रोजच्या रोज मी बाटली उघडून बसत नाही, आणि त्याची सक्तीही नाही पण मुद्दाम ठरवून ती का वगळा? स्त्रिया ( किंवा भारतीय स्त्रिया ) दारू पीत नाहीत हा आणखी एक स्टीरीओटाईप बनू नये.)
म्हणे स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात, घाबरतात.
निश्चितच त्या कचरतात. विमे, तुमचा मुद्दा मान्य असला तरीही थोडं त्यांच्या कलाने घेऊनही बराच पल्ला गाठता येईल असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Tue, 03/13/2012 - 01:34

In reply to दारू वगळता अगदी १००% सहमत by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>स्त्रिया ( किंवा भारतीय

>>स्त्रिया ( किंवा भारतीय स्त्रिया ) दारू पीत नाहीत हा आणखी एक स्टीरीओटाईप बनू नये >> मान्य. असं काही मला म्हणायचं नव्हतं की भारतीय स्त्रिया दारू पीत नाहीत, किंवा त्यांनी दारू पिऊ नये. किंवा असंही म्हणायचं नाहिये पुरूषांनी दारू पिऊ नये. हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण मी वाचलेल्या बर्‍याचशा कट्टा वृत्तांत्तात दारू हा अविभाज्य घटक वाटला. दारू जर शीतपेयासारखी घेतली आणि त्यानंतर शीतपेय प्यायल्यासारखेच वागले ;-) तर दारूला विरोध नाही. आणि दारूला विरोध नाही हे झालं माझं मत. पण या बाबतीत बाकी स्त्रियांचे काय मत आहे ते मला माहिती नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 03/13/2012 - 01:46

In reply to >>स्त्रिया ( किंवा भारतीय by Pearl

Permalink

मग तर काय प्रश्नच नाही. आपली

मग तर काय प्रश्नच नाही. आपली सहमतीच झाली की! साधारण अशाच संदर्भात ऐसी अक्षरेवर धनंजयने मार्मिक प्रतिसाद लिहीला आहे: जे लोक नियमित दारू पितात, त्यांच्यापैकी पुष्कळ लोकांना (१) किती प्याल्यावर थांबायचे ते कळते, अथवा (२) चिकार पिऊनसुद्धा दारू तितकी चढत नाही. मला कधीमधी चढण्यासाठी पाणीही पुरतं! ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Tue, 03/13/2012 - 01:40

In reply to (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

>>गेल्या एका वर्षातील मुंबई

>>गेल्या एका वर्षातील मुंबई कट्ट्यान्चा अभ्यास वाढवा. मदत पाहिजे असेल तर सांगा, मटेरियल पुरवण्याची व्यवस्था स्पा/सूड/किसन करतील.... टेस्टीमोनियल हवे असतील तर मस्त कलंदर किंवा माऊ ताईंना विचारा.>> असं होत असेल तर मस्तचं. मग मी माझे शब्द मागे घेते. असे कट्टे होतात हे वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 03/13/2012 - 02:36

In reply to (४) अजून एक. मिपाचे कट्टे. मी by विश्वनाथ मेहेंदळे

Permalink

विमे झकास लिहिले आहेस

महिला स्पेशल कट्टा व टोपण नावाने आयडी ह्या विमेंच्या दोन्ही सूचना अफलातून आहेत. माझ्या मते आभसी जगतात मुशाफिरी सुरु केल्यावर कोणत्याही सदस्याला आभसी जगत व वास्तविक जगतात गल्लत होण्याची शक्यता असते. माझ्या मते महिलांना आधीच सुपर वुमन ही आभासी संकल्पना ज्यात तिने ह्या चंगळवादी संस्कृतीत कर्तबगार महिला व आदर्श गृहिणी असे मिश्रण असलेली आधुनिक मदर इंडिया होणे अपेक्षित असते. वास्तविक जीवनात तारेवरची कसरत करत असतांना एखादी महिला जर वाचनमात्र सदस्य असेल तर कुठल्याही संस्थळावर होणारे रणकंदन किंवा क्वचित आढळणारी कंपूबाजी ह्यामुळे आहे तो त्रास कमी आहे का, तर आभासी जगतात अजून तो निर्माण करायचा ह्या विचाराने त्या बहुदा सक्रीय सहभाग घेत नाही. उलट माझ्या मते येथे अभिव्यक्त झाल्यास तुमच्या डोक्यातील ताणाचा निचरा होतो. व आभसी जगतातील फुकट शिकवणीत डिप्लोमसी व लॉबिंग आणी स्वताच्या लेखनाचे ( प्रोडक्ट) चे मार्केटिंग व त्याचे फंडे सतत प्रकाश झोतात राहण्याची कला ह्याच बरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक आत्मविश्वास मिळतो. तेव्हा महिलांनी महिलांना उत्तेजन देऊन लिखाणास प्रवृत्त केले पाहिजे.माझ्या पाहणीत अनेक दिवाळी अंकात, किंवा वृत्त पत्रात वयाने जेष्ठ महिला लेखिकांचा सहभाग जास्त असतो.व त्यांचा महिला वाचकवर्ग देखील असतो. पण संगणकावर लिहितांना त्यांची गोची होते. म्हणून त्या नव्या युगातील आभासी जगतापासून लांब राहतात. येथे लेखन विनामुल्य जरी प्रकाशित होत असले तरी ते प्रकशित होण्यासाठी खात्री असते. व हवे तेवढे लिखाण हव्या त्या विषयावर त्या येथे करू शकतात हा मुद्दा त्यांना समजावून सांगितल्यास आभसी जगतात महिला टक्का वाढेल. त्यांना संगणकावर मराठीत कसे लिहीवे ह्याबाबत मार्गदर्शन करणारी पुस्तिका किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन केले तर त्यांना नवीन वाचकवर्ग तर वाचकांना दर्जेदार लेखन वाचायला मिळेल. जाता जाता मराठी संस्थळावर वावरल्याने वास्तविक जीवनात घडलेले परिवर्तन किंवा फायदे ,तोटे त्यांचे आपल्या आयुष्यातील महत्व किंवा स्थान ह्यावर साधक बाधक चर्चा ,महाचर्चा करण्यातही एखादा लेख किंवा काथ्याकुट करण्यासाठी शतकी प्रतिक्रिया मिळवणारा जालीम विषय आहे. ह्यावर जाणकार व तज्ञ व्यक्तींनी लक्ष द्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Tue, 03/13/2012 - 01:20

In reply to >> भारतात/महाराष्ट्रात तरी by Pearl

Permalink

सोल्लिड प्रतिसाद!! मस्त!!

सोल्लिड प्रतिसाद!! मस्त!!
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 06:15

Permalink

८ मार्चला थोडी का होईना चर्चा

८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते. इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.) विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते. विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात. "एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते. निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप. मराठमोळा: स्त्रीमुक्ती, समान हक्क हे विषय या विषयापासून वेगळे निघूच शकत नाहीत. मायबोलीवर आलेला आणि मला अतिशय आवडलेला एक प्रतिसाद आणि त्यावर माझी प्रतिक्रिया इथे डकवते आहे: मृदुला म्हणतातः
मराठी इंटरनेट साइटची मनोवृत्ती अमूक असे म्हणता येणार नाही. त्यावर लिहिणार्‍या लोकांविषयी काही संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढता येऊ शकेल. माझ्या अनुभवात असे आले आहे की तात्रिक, राजकीय, क्रीडाविषयक अश्या (पूर्वी पुरुषप्रधान) चर्चांत हल्ली स्त्रियांचा जवळपास सारखाच सहभाग दिसून येतो. पण स्वयंपाक, सुशोभन, संगोपन, प्रसाधन अश्या (स्त्रीप्रधान) चर्चांत पुरुषांचे प्रमाण कमी दिसते.
माझं उत्तरः
मृदुलाच्या प्रतिसादामधे मला जी शंका होती तीच पुन्हा खरी आहे का काय असं वाटतंय. पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे. आपल्या घराबाहेरही जग आहे त्याची जाणीव स्त्रियांना झाली आहे, होते आहे; ही गोष्ट मला पॉझिटीव्ह वाटते. पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.
या चर्चेत विचार करत असलेल्या सर्वच संस्थळांवर ही चर्चा सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रतिसाद चोप्य-पस्ते करण्याचा मोह आवरत नाही; त्यातून तेच तेच पुन्हा टाईप करण्याचे कष्टही वाचवते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/09/2012 - 08:20

In reply to ८ मार्चला थोडी का होईना चर्चा by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे

पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे आता स्त्रियांनाही रस निर्माण झालेला आहे.
सरसकट विधान वाटते आहे.
पण घर, मुलं यात आपलीही समान जबाबदारी आहे याबद्दल पुरूषांमधे कितपत जागृती आहे याबाबत शंका आहे.
समान जबाबदारी म्हणजे प्रत्येक काम दोघांनी अर्धे अर्धे करायचे की वेगवेगळ्या कामांची वाटणी करायची हे स्पष्ट केल्यास त्याप्रमाणे विचारांना दिशा मिळेल. बाकी उद्बोधक चर्चा वाचत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 08:28

In reply to पूर्वीच्या पुरूषी चर्चांमधे by नगरीनिरंजन

Permalink

दुर्दैवाने एकेकाळी सरसकट

दुर्दैवाने एकेकाळी सरसकट विधानं करता येण्याजोगी परिस्थिती होती (किंवा सुदैवाने आता सरसकटीकरण कठीण आहे). आजही महिलांसाठी म्हणून चालवली जाणारी असंख्य प्रकाशनं तद्दन भंपकच असतात ना?
समान जबाबदारी म्हणजे प्रत्येक काम दोघांनी अर्धे अर्धे करायचे की वेगवेगळ्या कामांची वाटणी करायची हे स्पष्ट केल्यास त्याप्रमाणे विचारांना दिशा मिळेल.
हा खासगी आयुष्यात अदितीचा हस्तक्षेप ठरेल. ;-) माझं व्यक्तिगत मत चाक पुन्हा पुन्हा शोधू नये, असं आहे. वरच्या प्रतिसादात 'माझं उत्तर' च्या आधीचा परिच्छेदही मृदुला यांच्या प्रतिसादामधलाच आहे. लेख संपादित करून दिल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/09/2012 - 08:42

In reply to दुर्दैवाने एकेकाळी सरसकट by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

हा खासगी आयुष्यात अदितीचा

हा खासगी आयुष्यात अदितीचा हस्तक्षेप ठरेल.
खासगी बाबतीत सल्ला विचारला नव्हता हे नम्रपणे ध्यानात आणून देऊ इच्छितो. :) नोकरी करणे म्हणजेच स्वातंत्र्य अशा विचारांनी पछाडलेल्या काही 'केसेस' पाहण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे असा प्रश्न पडतो. माझं व्यक्तिगत मत दुसर्‍याच्या अनुकरणाला स्वातंत्र्य म्हणू नये असे आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 09:01

In reply to हा खासगी आयुष्यात अदितीचा by नगरीनिरंजन

Permalink

सदर संदर्भात स्वातंत्र्य

सदर संदर्भात स्वातंत्र्य व्यक्तीच्या मनोधारणेवर ठरतं असं माझं मत आहे. एरवी बिकीनी घालून बिनधास्त मिरवणारी स्त्री बुरसटलेल्या विचारांची असू शकते आणि नऊवारी साडी नेसणारी पुरोगामी, स्वतंत्र मनोवृत्तीची असू शकते. (मेट्रोसेक्शुअल पुरूषही बुरसटलेल्या विचारांचा असू शकेल आणि मुलांची मुंज करणारा पुरोगामी) मला निदान आत्ता पडलेला प्रश्न स्वातंत्र्याबद्दल फारसा नसून व्यक्त होण्याच्या उदासीनतेमधे असणार्‍या जेंडर बायसबद्दल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/09/2012 - 09:16

In reply to सदर संदर्भात स्वातंत्र्य by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पडलेला प्रश्न

पडलेला प्रश्न स्वातंत्र्याबद्दल फारसा नसून व्यक्त होण्याच्या उदासीनतेमधे असणार्‍या जेंडर बायसबद्दल आहे
मलाही असंच वाटत होतं, पण (सरसकट) पुरुषांच्या जबाबदारीच्या समजेबद्दलच्या शंका व्यक्त केलेले प्रतिसाद अंतर्भूत झाल्यामुळे काही प्रश्न पडले ते विचारले एवढेच. असो. अवांतर थांबवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 10:37

In reply to पडलेला प्रश्न by नगरीनिरंजन

Permalink

पुरुषांच्या जबाबदारीच्या

पुरुषांच्या जबाबदारीच्या समजेबद्दलच्या शंका व्यक्त केलेले प्रतिसाद अंतर्भूत झाल्यामुळे काही प्रश्न पडले ते विचारले एवढेच.
मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन अशा प्रकारचे अनेक धागे असतात, इतर कोणत्याही संस्थळापेक्षा जास्त असं मला दिसतं. त्यावर मृदुला यांच्या निरीक्षणाच्या विरुद्ध काही डेटा, निरीक्षण आहे का? अतिशय निगुतीने वेगवेगळे पदार्थ बनवणारे गणपा आणि पांथस्थ हा संस्थळांवर अपवादच दिसतो. पाकृ विभागात वैविध्यपूर्ण लिखाण करणार्‍या स्त्री आयडींची संख्या जास्त दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/09/2012 - 11:23

In reply to पुरुषांच्या जबाबदारीच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन

मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन अशा प्रकारचे अनेक धागे असतात, इतर कोणत्याही संस्थळापेक्षा जास्त असं मला दिसतं. त्यावर मृदुला यांच्या निरीक्षणाच्या विरुद्ध काही डेटा, निरीक्षण आहे का?
नाही.
अतिशय निगुतीने वेगवेगळे पदार्थ बनवणारे गणपा आणि पांथस्थ हा संस्थळांवर अपवादच दिसतो. पाकृ विभागात वैविध्यपूर्ण लिखाण करणार्‍या स्त्री आयडींची संख्या जास्त दिसते.
बरोबर. पण म्हणून घर आणि मुले यात आपली समान जबाबदारी आहे याची इतरांमध्ये जागृती नाही असा निष्कर्ष निघत नाही. शिवाय पदार्थ बनवण्याची आवड असणारे पण त्यावर लिहीण्याची आवड नसलेलेही पुरुष असतीलच की. मुळात अशा विषयांमध्ये रुची असणाराच पुरुष जबाबदार असतो याला काही आधार आहे का? हा सगळा व्यक्तिगत आवडी-निवडींचा मामला आहे त्यावरून लिंगभेदाच्या अभिव्यक्तीवरील परिणामांबद्दलच फक्त निष्कर्ष काढणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sat, 03/10/2012 - 08:15

In reply to मायबोलीवर बालसंगोपन, सुशोभन by नगरीनिरंजन

Permalink

आवड असणार्‍या विषयांवर

आवड असणार्‍या विषयांवर प्रतिसाद दिला जातो आणि नावडीचे विषय टाळले जातात. यातही लिंगभेद असेल का? आवडीच्या विषयावर प्रतिसाद न देण्यासाठी काही कारणं असतील, लिखाण न आवडणं किंवा लेखकाशी वाकडं असणं. पण सातत्य सांख्यिकीत महत्त्वाचं ठरतं. फार रस नसलेल्या विषयात इतर कारणांमुळे प्रतिसाद दिला जातो. गणपाच्या अनेक पाकृंना (ज्या मी बनवण्याची अजिबात शक्यताही नाही) फोटो, सांगायची पद्धत आवडली म्हणून मी अनेकदा प्रतिसाद दिलेले आहेत. अवांतरः झक्कास रेसिप्या टाकणार्‍या गणपाला इतरही काही मतं आहेत हे माहित आहे. पाकृ विभागातल्या इतर किती लोकांना काही मतं आहेत हे माहित आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 03/12/2012 - 09:23

In reply to आवड असणार्‍या विषयांवर by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आवड असणार्‍या विषयांवर

आवड असणार्‍या विषयांवर प्रतिसाद दिला जातो आणि नावडीचे विषय टाळले जातात. यातही लिंगभेद असेल का?
कदाचित असेल. पण फक्त लिंगभेदच असेल असे नाही. माझ्या बहुतेक आवडीच्या विषयांवर मी "वा वा छान छान" व्यतिरिक्त प्रतिसाद देत नाही कारण त्यावर लिहीण्यापेक्षा ती गोष्ट करणे मला महत्त्वाचे वाटते. पण त्याचवेळी न आवडलेल्या विषयांवर (किंवा विषयांविरुद्ध) मी बर्‍याचवेळा व्यर्थपणे माझी मते लिहीत बसण्यास उद्युक्त होतो. सगळ्या पुरुषांचे असे होत असेल असे नाही. शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.
पण सातत्य सांख्यिकीत महत्त्वाचं ठरतं.
हे खरं असलं तरी सगळ्या गोष्टी सांख्यिकीने पूर्णत: सिद्ध होणार नाहीत. नुसत्या स्त्रियांचा मराठी आंजावरील कमी सहभाग आणि स्त्रियांची एकूण प्रगती यांच्यातला परस्परसंबंध (Correlation) ठरवणे तर खूपच विदाखनन (Data Mining) केल्यासारखे होईल. एकूणच आंतरजाल सुविधा असणे याचा एकवेळ स्त्रियांच्या प्रगतीशी परस्परसंबंध असू शकतो. पण आंतरजालावर वावर असणार्‍या स्त्रिया मराठी आंजावर वावरत नसल्या तर त्याची भाषिक, वैयक्तिक कारणे असतील. त्यावरून लिंगभेदाधारित निष्कर्ष काढला तरी त्याची विश्वासार्हता किती असेल ही शंकाच आहे. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत झाले.
पाकृ विभागातल्या इतर किती लोकांना काही मतं आहेत हे माहित आहे?
त्यांना पाकृ टाकण्यातच रस असेल आणि इतर चर्चांमध्ये रस नसेल तर त्यावरून काही लिंगभेदाधारित निष्कर्ष निघाला तरी आवडी-निवडींव्यतिरिक्त स्त्रियांच्या स्थितीसंबंधी निष्कर्ष निघत नाही. काही स्त्रियांना पुरुषी चर्चांमध्ये रस उत्पन्न झाला म्हणून सगळ्यांनाच तो रस उत्पन्न झाला आहे असे नाही. त्याचवेळी घरी उत्तम स्वयंपाक करू शकणारे किती पुरुष इथे पाकृ टाकत नाहीत हे माहित आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/09/2012 - 08:00

Permalink

उत्तम चर्चा

ही फक्त लेख पाहिल्याची पोच. सविस्तर प्रतिसाद हापिसातून आल्यावर देईन.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 03/09/2012 - 09:31

Permalink

वावर सगळीकडेच कमी ?

आंतरजालावर स्त्रियांचा वावर कमी आहे ? पुरूषांपेक्षा नक्क्क्क्क्क्क्क्कीच कमी. गेल्या ५० वर्षात स्त्री जात मोडीत जात असून स्त्रैण शरीर रचना असलेली मानव असे तिचे रूपांतर होत आहे. अजूनही ती सणवार, व्रत वैकल्य स्वयंपाक झाडलोट, दागिने, साड्या, सौंदर्यप्रसाधने, भजनी मंडळ, स्त्री अकाचे वाचन, रविवारचा नवा पदार्थ, नवरा सोडून प्रत्येकात " पर" म्हणजे मनानेही लांव ठेवण्याच्या लायकीचा पुरूष पहात राहाणे .ई मधून तिची सुटका करून घेउ शकत नाही. मुले नको मातृत्व नको असे म्हणणे म्हणजे स्त्री चे माणसात रूपांतर होणे नव्हे . तर वरील गोष्टी आपल्यासाठीचे आहेत म्हणून परंपरेने त्याना जवळ करीत रहाणे म्हणजे स्वीकृत दास्य ! सार्वजनिक वर्तमानपत्रे ठेवली असतील तिथे किती स्त्रिया पेपर वाचायला बिन्दिक्कतपणे येतात?. पेपर वाचायची आवड स्त्री मधे कमी म्हणून की तिथे अधिक संख्येने पुरुष हजर असतात म्हणून ? दोन्ही ला स्त्री वर्गाचे उत्तर हो असेल तर दास्याचा दोष कुणाचा ?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 03/09/2012 - 10:16

In reply to वावर सगळीकडेच कमी ? by चौकटराजा

Permalink

गेल्या ५० वर्षात स्त्री जात

गेल्या ५० वर्षात स्त्री जात मोडीत जात असून स्त्रैण शरीर रचना असलेली मानव असे तिचे रूपांतर होत आहे.
Sorry! What? कदाचित तुमचे शब्द जे सुचवत आहेत ते तुम्हाला म्हणायचं नाही. "शरीररचना वगळता स्त्री-पुरूषांत काही फरक नाही" असं काही म्हणण्यासाठी ही वाक्यरचना आवडली नाही.
मुले नको मातृत्व नको असे म्हणणे म्हणजे स्त्री चे माणसात रूपांतर होणे नव्हे
मुले असणे म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता असते, वात्सल्य ही स्त्रीची अत्यावश्यक गरज आहे असं काही लिखाण आजही आजूबाजूला दिसतं. मुलं वाढवणं हा एक आनंदाचा भाग असतो, आवडता पदार्थ खाण्यासारखंच आणि काही व्यक्तींना मुलं वाढवण्यात फारसा आनंद असतो असं वाटत नाही हा विचार खूप अलिकडचा वाटतो, पुरूषांच्याही बाबतीत. समज येण्याच्या आतच लग्न झालं आणि लग्न झालं तर मुलं झालीच अशीच बहुसंख्या दिसण्याचं काळ फार जुना नाही, नाही का?
दास्याचा दोष कुणाचा ?
पुरूषप्रधान व्यवस्थेचा आणि व्यवस्थेला बिनडोकपणे शरण जाणार्‍या सर्व स्त्री-पुरूषांचा. हा बिनडोकपणा आजही इंटरनेट सुशिक्षित, एलिट गटातही दिसतो असा भीतीदायक विचार आल्यामुळे लोकांचे विचार काय आहेत असा प्रश्न पडला.
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Fri, 03/09/2012 - 11:12

In reply to गेल्या ५० वर्षात स्त्री जात by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

>>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट

>>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट सुशिक्षित, एलिट गटातही दिसतो असा भीतीदायक विचार आल्यामुळे लोकांचे विचार काय आहेत असा प्रश्न पडला. कृपया "बिनडोक" सारखे शब्द जपून वापरा. आपण आपल्या स्वकीयांचा किंवा कुणाचा अपमान तर करत नाही आहोत याची काळजी घ्यावी. माझ्या स्वतःच्या माहितीत उच्चशिक्षित, उच्च्पदस्थ स्त्रिया आहेत ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे नुकसान परंपरा जपल्याने किंवा पुरुषांनी स्वयंपाक न केल्याने झाले असे त्यांना वाटत नाहीत. जर कुणी सुखी समाधानी असेल तर कोणत्या संस्कृतीला शरण जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. वर ननि यांनी म्हंटल्याप्रमाणे कामे जर वाटून घेतली तर समानता येतेच. पुरुषांनी त्यासाठी स्वयंपाकच केला पाहिजे असे काही नाही. उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात. जसे सुशोभीकरण, रंगसंगतीची समज यात मुळातच नैसर्गिकरित्या स्त्रियांना मिळणार्‍या वरदानात्मक गोष्टी आहेत. (आता पर्यंत तरी) बदल होत आहेत, पण ते एकदम होणार नाहीत, पिढ्या अन पिढ्या जातात समाजात बदल होताना.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Fri, 03/09/2012 - 11:30

In reply to >>हा बिनडोकपणा आजही इंटरनेट by मराठमोळा

Permalink

परफेक्ट !

कामे जर वाटून घेतली तर समानता येतेच. पुरुषांनी त्यासाठी स्वयंपाकच केला पाहिजे असे काही नाही. उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात.
परफेक्ट ! - (कामे वाटून घेणारा*) सोकाजी * ह्यावर माझ्या बायकोचे मत सर्वस्वी भिन्न असू शकेल :D
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com