मुक्तछंद म्हणजे नक्की काय?

चित्रा's picture
चित्रा in काथ्याकूट
21 Dec 2011 - 9:58 pm
गाभा: 

मुक्तछंद म्हणजे नक्की काय? या एवढ्या ओळीवर माझी ही चर्चा खरे तर संपायला हवी. पण एकोळी धाग्यांविषयी कल्पना असल्याने थोड्या अधिक ओळी लिहीते :)

कविता म्हणजे थोडेसे लय असलेले गद्यही असू शकते, असा माझा एक समज होता. उदा. कुणी घर देता का घर? नटसम्राटमधील हे नक्की काय आहे? कविता का गद्य? का मधलेच काही तरी?

अलिकडे काही लेखनांवर आलेले काही प्रतिसाद वाचून असे वाटते की मुक्तछंद म्हणजे आपल्याला जे वाटते ते नाही. म्हणून अधिक शोध घेतला. तर दिसले की खाली दिलेल्या दुव्यावरील हिंदी ब्लॉगवर छंदमुक्त आणि मुक्तछंद या प्रकारांमधला फरक सांगितलेला आहे. मुक्तछंद म्हणजे माहिती असलेल्या काव्यातील छंदांपासून फारकत घेऊन नवीनच छंद तयार करण्याची मुक्ती असणे असा काही हा अर्थ आहे. तो बरोबर आहे का?

http://navgeetkipathshala.blogspot.com/2009/08/blog-post_06.html

तसे असल्यास मुक्तक म्हणजे काय? यानिमित्ताने मराठी काव्यामधील मुक्तछंदविषयक विचार, आवडणार्‍या मुक्तछंदाला पिंडाने जवळच्या मराठी कविता या निमित्ताने ऐकायला आवडतील.

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Dec 2011 - 12:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सर्वप्रथम हे ध्यानात घ्यायला हवे कि, छंदमय असो छंदमुक्त वा मुक्तछंद, व्यक्त होण्याचे हे प्रकार आहेत.

तुम्ही दिलेल्या दुव्यावर मांडलेले अर्थ बरोबरच आहेत. छंदमुक्त लिखाणात कुठल्याही प्रकारचे बंधन मानले जात नाही. बंधन म्हणजे वृत्ता-मात्रांचे बंधन. वृत्ता-मात्रांनी कवितेला सजवता येते, नटवता येते, रचनेत गेयता आणता येते, परंतू हि समजूत साफ चुकीची आहे की त्याशिवाय, म्हणजे वृत्ता-मात्रांशिवाय गेयता निर्माण करता येत नाही. उदाहरणार्थ संदिप खरे यांची हि कविता पहा:

मला बोलायची कसलीच घाई नाही
कारण माझा शब्द यथावकाश
पोहचणारच आहे तुमच्या पर्यंत
या ना त्या वळणापाशी...!

अतीव आनंदाच्या, अतीव दु:खाच्या
अतीव निराशेच्या, अतीव रागाच्या
अतीव करुणेच्या, अतीव प्रेमाच्या...
.... किंबहुना कुठल्याही आत्यंतिक
भावनेच्या चाळणीतून खालपर्यंत
उतरलेला तुमचा शब्द...
...खरं तर माझाच असेल!!

आता या वरील रचनेत एक अंगभूत गेयता आहे. पण कुठल्याही छंदाचे अस्तित्व शोधूनही सापडणार नाही. हेच कशाला, आपल्या पूर्वीच्या संगीत नाटकांमध्ये कोणतेही पद सुरु होण्यापूर्वी जे संवाद असायचे ते अगदी छंदमुक्ताच्या ओळींप्रमाणे असायचे. आणि याला आपल्या मराठी साहित्यामध्ये खुप मोठी परंपरा आहे. उदाहरणच द्यायचे तर खाडीलकरांचे स्वयंवर या नाटकात "सकुलतारक सुता" या पदाच्या आधी असलेल्या संवादाकडे पाहिले तर लक्षात येते की ते नुसतं पद्य नाही त्याला एक गेयता आहे, लय आहे. ते संवाद खाली देत आहे.

जी चांगली बहीण नाही, ती चांगली बायकोही होणार नाही
जी चांगली कन्या असतं नाही, ती चांगली बायकोही होणार नाही
त्यांना जर समजलं कि, बाबांच मन मी दुखावलं
त्यांना जर समजलं कि, मी आईच्या दोळ्यातून अश्रुधारा काढल्या
त्यांना जर समजलं कि, कुंडीनपूरच्या वंशविच्छेदाला मी कारणीभूत झाले
तर माझा स्वीकार ते कसा करतील....
सकुलतारक सुता....

"सकुलतारक सुता" ची लय आहे तीच लय वरच्या संवादात सापडते.

तर असे आहे छंदमुक्ताचे.
नटसम्राटमधील 'कुणी घर देता का घर' याचे जे उदाहरण तुम्ही दिले आहे ते देखिल छंदमुक्तच आहे.

मुक्तछंदात छंदाचा वापर असतो, पण कुठल्या ओळीत कुठले छंद वापरायचे हे कवीचं ठरवत असतो.
त्याचा फायदा असा कि, शब्द हे कुठल्याही एका छंदात अडकून न राहता, अर्थाला धरुन नटवता येतात.

सौ. अनघा नितिन दिघे या कवियत्रीची एक कविता पहा.

ओळख एकच जातकुळी
चिंतनी भजनी वनमाळी
जगते जीवन त्याचे
त्याच्या सांज-सकाळी
जे त्याचे ते माझे
असो मथुरेच्या तळीजळी
वृंदावनी वा गोकुळी
लोभावली त्यापाठी मीरा
सावळ्याच्या जे जे जवळी

आता यात छंद स्पष्ट जाणवतायत, पण एकच छंद नाही हे ही लगेच ध्यानात येते.
"जगते जीवन त्याचे", "जे त्याचे ते माझे" आणि "लोभावली त्यापाठी मीरा" अश्या ओळीत वरच्या ओळींतील छंदाशी फारकत झाली आहे. पण तरीही त्या कवितेच्या अर्थाच्या दृष्टीने ते तिथे तसेच हवे आहे. तर हि फारकत त्या कवितेला अर्थाची जोड देऊनही त्या रचनेची गेयता आणि लय कायम ठेवते आहे.

असो. यावर लिहीत बसलो तर या विषयाला अंतच नाही. किती तरी उदाहरणे डोळ्यापुढे नाचतायेत. पुन्हा कधीतरी. :)

आपण हा विषय मांडून फार बरे केलेत. कधीतरी यावर लिहीणारचं होत.

पैसा's picture

22 Dec 2011 - 3:19 pm | पैसा

मिकाचा प्रतिसाद उत्तम! इतर कवि काय म्हणतात पाहू या!

गवि's picture

22 Dec 2011 - 3:28 pm | गवि

"गद्यामधे एंटर पेरुन" असं कोणी म्हणायच्या आत मी म्हणून घेतो..

जोक्स अपार्ट.. मिका.. प्रतिसाद मस्त आहे.. कविता ही अशी असते की जी मस्त जमवून आणावी लागते... सावधपणे..

मूळ समजुतीप्रमाणे ती उत्स्फूर्त असते म्हणे.. असेलही. पण पटत नाही...

शिवाय कवितेला लय नसेल तर तिला कविता म्हणू नये असं माझं मत आहे.

यमकाचा / पॅटर्नचा उपयोग एखादी गोष्ट मनात ठसायला होऊ शकतो... जनकल्याणार्थ असलेल्या घोषणा, सूचना वगैरेमधे यमकयुक्त कवितांचा उत्तम उपयोग करता येतो..

पाणी गाळल्याने नारु होत नाही. असं म्हणण्याऐवजी,

पाणी गाळा,
नारु टाळा..

हे जास्त इफेक्टिव्ह होतं...

मुक्तच्छंदाचा गद्याच्या वर जाणारा असा कोणताच खास युनिकनेस मला दिसत नाही. असल्यास सांगावा..

सुहास..'s picture

22 Dec 2011 - 4:58 pm | सुहास..

मस्त सुचले
या वळणावर,
जाणार आहे
एकदा सरणावर,
बघ जरा स्वताकडे
उद्याच्या आशेवर,
मस्त सुचले
या वळणावर,
येवु दे एक जाग,
पहाटे सुर्यकिरणांवर,
प्रेम व्यक्त करेन,
सागर किनार्‍यावर ,
मस्त सुचले
या वळ्णावर...

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Dec 2011 - 5:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

हि कविता तुमची आहे कां?

सुहास..'s picture

22 Dec 2011 - 6:08 pm | सुहास..

हि कविता तुमची आहे कां? >>

होय ! मीच तो ( भंगार, डबडा, पंचर आणि बरच काही) कवि ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Dec 2011 - 7:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिकानं प्रतिसादात बरंच काही सांगितलंय. तरी आमचेही दोन पैसे.

प्रा.माधव पटवर्धनांनी आपल्या 'छ्न्दोरचना' ग्रंथातून असा आशय व्यक्त केला आहे की छन्दशास्त्र हे पद्यरचनेचे व्याकरण आहे. लयबद्ध शब्दरचना, लघु-गुरु अक्षरांचे चरण, वाक्य आणि त्याचे घटक याचा विचार छन्द करते.

गद्याचे अर्थपूर्तीच्या दृष्टीने जे काही काही तुकडे पडलेले असतात तेव्हा त्यांना आपण वाक्य म्हणतो.
वाक्याची लांबी किती असावी, अक्षरसंख्या, लघु गुरु क्रम, विरामचिन्हे, याबद्दल काही नियम नसतात तेव्हा ते गद्यच असते.

स्वैर पद्य, मुक्त पद्य, सहज काव्य, अशी चर्चा मराठी काव्यप्रांतात पटवर्धनांनी छंन्दोरचना ग्रंथात केली आहे. प्रतिभेला मूक्त विलास करता येत नाही यातून मुक्तछंदाचा जन्म झाला. पण, अशी रचना 'गद्यच' असली तरी अशा रचनेला पुढे मुक्तछंद म्हटल्या गेल्याने तोही काव्यप्रकाराचा एक रुढ छंदच झाला.

जाणकार अधिक भर घालतीलच.

-दिलीप बिरुटे

गणेशा's picture

22 Dec 2011 - 8:28 pm | गणेशा

हा धागा पाहिला नव्हता, त्यामुळे मिकाचे आभार...

मिकाने येव्हडे छान सांगितले आहे त्यामुळे बाकी अजुन काय बोलणार, तरीही पहिल्यांदा मलाही असेच वाटायचे त्यामुळे लिहितो... (ब्लॉग काही येथे ओपन होत नाही माझ्याकडे)
-----------------------

कविता वाचताना मला गझल्स खुप आवडायच्या,
पण छंदबद्ध लिहिने थोडे अवघड आहेच पण छंदासाठी कवी जेंव्हा आपल्या सुचलेल्या शब्दांना मोडीत काढतो तेंव्हा त्याला ही कसेतरी वाटत असते( प्रतिभावंत सोडुन, त्यांना गझल्स पण कवितेसारख्या लिहिता येतात.. भराभर)
गझलेला.. छंदा ला स्वताची गेयता असते..
पण कवीला छंद ही नको आणि गेयता ही हवी अशी कविता पाहिजे असेल तर ती "मुक्तछंद" कविता..

उदाहरणा साठी
कडव्यातील पहिल्या २ ओळीत ६ अक्षरे आणि शेवटच्या ओळीत ७ अक्षरे..
आणि सेम फॉरमॅट सर्व कडव्यात वापरुन त्या ठेक्याने गाणे तयार करणे...
ह्या संपुर्ण स्वरुपाला मुक्तछंद म्हणतात..
संदिप खरेंच्या बर्याच कविता सुद्धा अश्याच फॉरमॅट मध्ये आहेत..

मुक्तछंद कवितेचे एक सुंदर उदा. आठवते आहे,संदिप खरेचीच आहे.. देतो.. (प्रत्येक ओळीत १४ अक्षरे आहेत, पण छंद नाहि.. )

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरुन
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिराणी येतो,
बालपण गेले तुजे गुज निसटून
उरे काही तुझा माझा ओन्झळी मधून ,
जरी येते ओठी तूज्या माज्यासाठी हसे
नजरेत तुज्या काही अनोळखी दिसे ,
तुज्या जगातून बाबा हरवेल का ग ?
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता जाता उंबरठ्या मधे
बाबसाठी येईल का पाणी डोळ्यामधे ?
सांगायचे आहे माज्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची कहानी तुला.

"छंदमुक्त "म्हणजे कुठलीही लय नाही , कवीचा कुठलाही गेयतेचा, यमकांचा आग्रह नाही ..
फक्त सुंदर वाक्य .. जे ऐकल्यावर मनात लाटा उभाराव्यात अशी वाक्य ... एकामागुन एक फक्त झेलतच राहावेत अशे शब्द ...

छंदमुक्त कवितेंना बर्याचदा गद्य/निबंध असे चिडवले जाते... पण नाही त्याची ही एक वेगळीच मजा असते ...
प्रत्येक वाक्यातुन निर्माण होणार्या भावनांना मन कधी जोडले जाते ते कळतच नाही.. त्ये लिहिण्याची कसब मात्र कवीला नक्की असावी लागते..

माझ्या मते तरी गद्य सभोवतालच्या परिस्थीतीचे अचुक चित्र आपल्या समोर उभे करते आणि छंदमुक्त कविता त्या चित्रातल्या भावना आपल्या मनात रुजवत असतात...

छंदमुक्त कवितेचे एक सुंदर उदा (सौमित्र)

संध्याकाळी सैरभैर व्हायचं तळं मनाचं…
पण आता
साधे तरंगही उठत नाहीत त्यावर.
ऋतू बदलताना उदास हलायचं माझ्यातलं झाड आता
झाडावरल्या पक्ष्यांनाही कळत नाही झाडाचं हलणं
रात्री-बेरात्री ऊर उगाच भरून यायचा
आता
नीरव शांतता पांघरून
डोळ्यांच्या बाहुल्या टक्क जाग्या असतात,
अंधार पुसत राहतात.
इकडून तिकडे
तिकडून इकडे.

चित्रा's picture

23 Dec 2011 - 2:31 am | चित्रा

धन्यवाद. सुरुवातीला शून्य प्रतिसाद आले असे पाहून डोक्याला हात लावायची वेळ आली होती. पण मिसळलेला काव्यप्रेमी, गणेशा यांच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल आणि इतरही सर्व प्रतिसादकांच्याही प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

संदीप खरेंच्या कवितांना एक लय आहे हे खरे. तसेच सिलसिला मधील अमिताभच्या ड्वायलॉकचे. मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं.. http://www.youtube.com/watch?v=IQ1IlwYCJdw

या चर्चेला कारण झाली ती गद्यात एंटर करणे म्हणजे मुक्तछंद ही थोडीशी टीका. म्हणून अधिक शोध घेतल्यावर असे वाटले की मुक्तछंदचा अर्थ छंदाच्या पारंपारिक कल्पनांपासून मुक्तता असा असावा. तसेच "छंदमुक्त" हा शब्द मराठीत वापरतात का हे मला माहिती नाही. पण जर असा शब्द किंवा कल्पना असला/ली, तर तो/ती काव्यात्मकतेविषयीच असणार, नाही का? कारण गद्याला छंदच नसतो असा माझा समज आहे. तेव्हा गद्य छंदमुक्त आहे असे कसे म्हणावे? म्हणजेच काव्यातून व्यक्त करण्यासारखे विचार जर छंदांमध्ये बसवता येत नसतील तर ते काव्य छंदमुक्त करण्याची सोय करून ठेवलेली आहे. असे काव्य सर्वांना प्रथम दर्जाचे वाटावे का नाही याबद्दल कल्पना नाही, पण मुद्दाम छंदबद्ध करून आणि मात्रा, वृत्ते यासाठी धडपड करून ओढून ताणून शब्द पेरावे लागले असतील तर अशा काव्यापेक्षा लयबद्ध गद्य (छंदमुक्त गद्य) मला जास्त आवडेल असे वाटते.

ही चर्चा इथे सुरू केल्यानंतर शोध घेतला तेव्हा येथे कविता म्हणजे काय या विषयावर भरपूर चर्चा झालेली दिसली, भरपूर उलटीसुलटी मतेही दिसली. पण शब्द, मांडणी, आशय या सर्वाला पद्याप्रमाणे गद्यातही स्थान आहे आणि ते चांगले दमदार असले तर असे लेखन लोकांना आवडते, या गंगाधर मुटे यांच्या मताशी मी सहमत आहे असे म्हणते.

पैसा's picture

23 Dec 2011 - 8:31 pm | पैसा

'छन्दोबद्ध' हा शब्द आहे त्याच्या विरुद्ध अर्थाचा 'छन्दमुक्त' असणार! जे छन्दात बांधलेलं नाही ते छन्दमुक्त. तर मुक्तछंद हा शब्द 'मुक्त असा छंद' असा अर्थ ध्वनित करतो. म्हणजे कोणत्याही मात्रांच्या नियमापासून मुक्त असा छंद.

संस्कृत अथर्वशीर्ष किंवा रामरक्षा यासारख्या अतिपरिचित रचना पाहिल्या तर त्यातही संपूर्ण रचनेसाठी एकच छंद वापरलाय असं दिसत नाही. म्हणजे पुरातन काळापासून मुक्तछंद या ना स्वरूपात वापरात आहे.

गद्यकाव्य असाही प्रकार दिसतो, मुक्तक म्हणजे 'अनिबद्ध काव्य' असाही एक प्रकार दिसतो. काही लेखकांच्या गद्य लेखनाला एक अंगभूत लय असते, त्या प्रकाराला गद्यकाव्य म्हणाव की मुक्तक म्हणावं, की छन्दमुक्त काव्य म्हणावं हे मला माहिती नाही. तसंच केवळ ट ला ट जोडून पाडलेल्या कवितेला काव्य म्हणावं का हाही वादाचा मुद्दा आहे. यातही मेख अशी की लेखनात नेमकं काय चांगलं हे व्यक्तिसापेक्ष असतं त्यामुळे सर्वच ठिकाणी आपण एक नियम लावू शकणार नाही. 'प्रवाही, लय असलेलं लेखन म्हणजे काव्य' एवढी एक ढोबळ व्याख्या नक्की सांगता येईल!

अन्या दातार's picture

23 Dec 2011 - 9:24 pm | अन्या दातार

रामरक्षा ही एक छंदोबद्ध रचनाच आहे.

अनुष्टुभ छंद आहे. :)

पैसा's picture

23 Dec 2011 - 10:20 pm | पैसा

मी याचीच वाट बघत होते. अनुष्टुभ छंद म्हटलंय, पण त्यातल्या प्रत्येक श्लोकातील शब्दांची, मात्रांची रचना एकसारखी नाही. म्हणजे छंदोबद्ध आहे, पण एकाच छंदात नाही. असं का?

कदाचित त्यालाच अनुष्टुभ छंद म्हणत असावेत. :)

चित्रा's picture

24 Dec 2011 - 12:47 am | चित्रा

काहीही काय?!

http://www.misalpav.com/node/4555

येथे अनुष्टुभ छंदाची लक्षणे दिली आहेत. येथील माहितीप्रमाणे अतिशय बांधीव असा छंद आहे. असो.

अहो गंमत म्हणून लिहिले होते ते. बाकी काव्यछंदांविषयी मला कसलीही माहिती नाही. :)

चित्रा's picture

24 Dec 2011 - 12:49 am | चित्रा

>>त्या प्रकाराला गद्यकाव्य म्हणाव की मुक्तक म्हणावं, की छन्दमुक्त काव्य म्हणावं हे मला माहिती नाही.

अगदी हाच प्रश्न पडला आहे. कोणी भर घालू शकले तर बरे होईल.

नंदन's picture

24 Dec 2011 - 2:29 am | नंदन

चर्चाप्रस्ताव आवडला. लयबद्ध गद्य आणि मात्रा/यती/वृत्त ह्यांची बंधने काहीशी शिथिल करूनही काव्यातली नैसर्गिक लय राखणारा मुक्तछंद ह्यातली सीमारेषा धूसर आहे, असं वाटतं. दोहोंच्या मधला हा 'ग्रे एरिया' किती आहे, ते व्यक्तिसापेक्ष असावं. मात्र मेघवेडा म्हणतो तसं, गद्यात एंटर पाडून लिहिलेल्या कवितांना मुक्तछंद म्हणवत नाही. (स्वातंत्र्याऐवजी तो स्वैराचार झाला :)) पारंपरिक वृत्तांच्या नियमांत न अडकताही कवितेतली लय मुक्तछंदात राखता येऊ शकते. उदा. बैरागी ह्यांची ही कविता. [चित्रकलेच्या शैलींशी यातलं साधर्म्य शोधायचं झालं तर इम्प्रेशनिझम शैलीचे उदाहरण देता येईल, आणि कदाचित छंदमुक्त म्हणजे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट?:)]

किंचित अवांतर - लगेच लक्षात आलं नाही तरी गद्यातही एक लय असतेच. या विषयावरच्या एका रोचक अभ्यासाबद्दल रेडिओ लॅबच्या ह्या भागात ऐकता येईल. (ओळख: साधारण पहिली तीन मिनिटे)

धनंजय's picture

24 Dec 2011 - 6:36 am | धनंजय

चर्चा आवडली.
कवितेत शदार्थाला जोडून आणि पूरक अशी कुठलीतरी लय असली पाहिजे. श्राव्यकविता (म्हणजे जवळजवळ सगळ्याच) यांच्यात लय श्राव्य असते. दृश्यकवितात लय दृश्य असते. वगैरे.
गद्यात लय असते, हे नव्हे)हे. पण लयीचा आशयाशी (म्हणजे एकूण अनुभवाशी - फक्त शब्दार्थाशीच असे नव्हे) सांधा खिळखिळीत असतो.

"कोणी घर देता का घर" किंवा मिसळलेला काव्यप्रेमी यांनी दिलेली संदीप खरे यांची कविता घ्या. यांच्यात रूढार्थाने शोधून वृत्त किंवा छंद (लघुगुरू मात्रांचा तोच तो क्रम किंवा अक्षरांची समान संख्या) सापडणार नाही. हेसुद्धा खरे. परंतु माझ्या मते त्या प्रकारे वृत्त किंवा चंद शोधणे ठीक नाही. मराठी भाषेची नैसर्गिक लय आघातानुसारी आहे, मात्रानुसारी नव्हे. म्हणूनच मात्रावृत्तांत लिहिलेली कविता वाचली तर त्यातील आघात नेहमीच्या बोलण्यातल्यासारखे येत नाहीत. मात्र "कोणी घर देता का" किंवा "मला बोलायची कसलीच घाई नाही" यांच्यातल्या नैसर्गिक (मराठमोळ्या) आघातांची लय नियमित आहे.

नैसर्गिक मराठी आघातांच्या लयीत रचलेल्या कवितांचे छंदशास्त्र मुळापासूनच पुन्हा अभ्यासून रचायला हवे.

या बाबतीत इंग्रजी छंदशास्त्राचे ऐतिहासिक उदाहरण देणे वावगे नाही. इंग्रजी ही काही शतकांपूर्वी एका विचित्र परिस्थितीमध्ये होती. इंग्रजीभाषक समाजाची भरभराट तर होत होती, पण "साहित्यिक" बाषा म्हणून तिचा अभ्यास आणि मान नवीन होता. तामुळे इंग्रजी छंदशास्त्रात ग्रीक छंदशास्त्रातले नियम लागू करण्याचा प्रयत्न झाला - लघू आणि गुरू सिलॅबले मोजली जात. लवकरच असे लक्षात आले, की इंग्रजीची लय आघातांची आहे. हे लक्षात आल्यावर इंग्रजीतले छंदशास्त्र वेगळ्या प्रकारचे आहे. जरी आयँब, डॅक्टिल, स्पॉन्डी वगैरे गणांची नावे ग्रीक किंवा लॅटिन छंदशास्त्रातली आहेत, तरी त्यांचे अर्थ वेगळेच आहेत. म्हणजे काहीतरी समांतर आहे, पण खूप नाही. "आयँब" म्हणजे 'लगा' असा गण होता. इंग्रजीत 'निराघात-साघात' अशा गणाला आयँब म्हणतात. पण आयँब मध्ये लिहिलेल्या कवितेत एखाद्या गणात दोन पेक्षा कमी (१) किंवा अधिक (३) सिलॅबले क्वचित-क्वचित असू शकतात. मात्र एक आघात हा लागतोच. वगैरे वगैरे.

तस्मात मराठी आघातानुसारी छंदोरचनेचे मराठमोळे विश्लेषण नव्याने होणे गरजेचे आहे.

प्रा. दिलिप बिरुटे यांनी माधव ज्यूलियन यांच्या पुस्तकाचा संदर्भ दिलाच आहे. मुक्तछंदात लय असते, ही बाब त्यांनीसुद्धा पटवून सांगितलेली आहे.

नंदन's picture

24 Dec 2011 - 9:47 am | नंदन

धनंजय ह्यांचा माहितीपूर्ण प्रतिसाद (द्विरुक्ती :)) अतिशय आवडला.

या बाबतीत इंग्रजी छंदशास्त्राचे ऐतिहासिक उदाहरण देणे वावगे नाही. इंग्रजी ही काही शतकांपूर्वी एका विचित्र परिस्थितीमध्ये होती. इंग्रजीभाषक समाजाची भरभराट तर होत होती, पण "साहित्यिक" बाषा म्हणून तिचा अभ्यास आणि मान नवीन होता. तामुळे इंग्रजी छंदशास्त्रात ग्रीक छंदशास्त्रातले नियम लागू करण्याचा प्रयत्न झाला.

ह्याबद्दल अधिक विस्ताराने (ह्या धाग्यावर किंवा विषयांतर होत असल्यास नवीन धाग्यावर) लिहिलेत तर वाचायला आवडेल. प्लेगमुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरामुळे चौदाव्या आणि पंधराव्या शतकात घडून आलेली ग्रेट व्हॉवल् शिफ्ट आणि त्यानंतर शेक्सपिअरच्या काळात किंग जेम्स बायबल प्रकाशित होईतो असणारे स्पेलिंगचे व व्याकरणाचे लवचीक नियम ह्या संदर्भांत वर उल्लेखलेल्या बदलांच्या कालखंडाबद्दल उत्सुकता आहे.

चित्रा's picture

24 Dec 2011 - 11:31 am | चित्रा

नंदन, धनंजय, बिरुटेसर, चर्चेत महत्त्वपूर्ण भर घातल्याबद्दल.

> मुक्तछंदात लय असते, ही बाब त्यांनीसुद्धा पटवून सांगितलेली आहे.
हे मान्य आहेच.

धनंजय यांच्याकडून आघातांनुसार मराठीतून छंदांचा विचार कसा करावा याबद्दल काही ऐकायला आवडेलच.

@वल्ली: मला तरी छंदातले कुठे काय कळते आहे?! म्हणून तर चर्चा सुरू केली. पण मुक्तछंद किंवा छंद नसलेले काव्य म्हणजे काहीतरी कमी प्रतीचे अशी एक समजूत आहे. ती मात्र योग्य नाही असे मला वाटते. अर्थात काव्याला काही एक लय असावी असे वाटते.

आमच्या मुलीने गेल्या वर्षी (२०१०) लिहीलेली एक इंग्रजी (जरा "डार्क"च) कविता देते (त्यांना शाळेत "धुके" हा विषय दिला होता). याला कविता म्हणावे का नाही, याबद्दल आता मला शंका आहे. पण त्याला काही एक लय आहे असे वाटते.

Hold on Billy,
The fog slowly creeps on..

It will block you, and stop you,
and thoroughly surround you
Until you are in the river,
right in the middle: Blinded
with no help.

Beware!

अशाच पद्धतीच्या मराठी रचनाही असतील, त्यांना कविता का म्हणायचे नाही? किंवा त्यात कमी-अधिक प्रत कशी ठरवायची असा माझा प्रश्न आहे.

धनंजय's picture

24 Dec 2011 - 6:50 pm | धनंजय

येथे मंगेश पाडगांवकरांच्या एका बोलगाण्याचे आघातानुसारी विश्लेषण केलेले आहे (दुवा). एक प्रस्ताव म्हणून आहे - अधिक ध्वनिमुद्रणे ऐकून नीट विश्लेषण व्हायला हवा.

चित्रा's picture

24 Dec 2011 - 7:50 pm | चित्रा

प्रस्ताव विचार करण्यासारखा आहे. दुव्यावरील इतरही प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

छंदांच्या पीडीएफ फायलीचा दुवा मात्र मिळाला नाही :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Dec 2011 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय यांचा नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण असा प्रतिसाद. धन्स.

मला एक विचारायचं होतं की, हे मुक्तपद्य किंवा मुक्तछंद इंग्रजी काव्यरचनेवरुन मराठीत आलंय का ?
छन्दोरचना उचकायचं आता जीवावर आलंय पण इंग्रजी वरुन कानडीत का कोणत्या कवितेच्या रचनेवरुन (चुभुदेघे) मराठीत हे मुक्तछंद मराठीत आलं असं वाचण्यात आलं होतं तुमचं काय मत आहे ?

-दिलीप बिरुटे

विनायक प्रभू's picture

24 Dec 2011 - 11:43 am | विनायक प्रभू

मुक्तछंद केंव्हाही बेस्टेष्ट

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2012 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर, कुठंय तुम्ही ? आणि कशावरुन तुम्हाला मुक्तछंद बेष्ट वाटतं ? काही उदाहरणं ?

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

24 Dec 2011 - 7:00 pm | प्रकाश घाटपांडे

मुक्त छंद म्हजी छंदिष्ट मान्सांनी काही बी मोकाट लिवत सुटायच हाय काय नाय काय?

हे जरा प्रश्नाला दुसर्‍या प्रश्नाने उत्तर दिल्यासारखे वाटेल, पण वरच्या प्रतिक्रियांमधून मुक्तछंदातील कविता म्हणजे काय ते बर्‍यापैकी कळाले.
म्हणजे एखादा कवी मनात आलेले विचार सुंदर व गेयता असलेल्या वाक्यांमधून मुक्तछंदात मांडतो. पण एखादा कवी तेच विचार अत्यंत चपखल शब्दरचना यमकात बसवून मांडतो (हिन्दीत साहिर व मराठी गदिमांची गाणी मला नेहमी तशी वाटतात) तेव्हा त्यात जास्त प्रतिभा आहे किंवा जास्त मेहनत घेतलेली आहे असे मला कधी कधी वाटते. हा मुद्दा बरोबर वाटतो का?

चौकटराजा's picture

10 Dec 2012 - 9:52 am | चौकटराजा

कवितेच्या रचनेचे नियम व व्याकरणाचे नियम वेगळे आहेत. वृत्त, मात्रा हे कवितेचे नियम आहेत व्याकरण नाही. व्याकरण हे भाषेला असते साहित्य प्रकाराला नाही. सबब काव्य नाट्क, गद्य यांची व्याकरणातून सुटका नाही. कारण साहित्य प्रकार हा भाषेचा उपसंच आहे. मुक्तछंद हा काव्य व नाट्य यांच्या संकरातून झालेला प्रकार असावा. त्याला काव्याचे नियम लागू नाहीत पण लय काही प्रमाणात तरी असणे हे आवश्यकच आहे. व्याकरणातून म्हणजे कर्ता कर्म क्रियापद ,वचन विभक्ति , वाक्यार्थ यातून त्याचीही सुटका नाही .

बिगरी ते मॅट्रीक ची आठवण झाली .. 'जे गद्य नाही ते पद्य आणि जे पद्य नाही ते गद्य अशी शाळाखात्याने दोन भागात विभागणी केली होती' ;)

व्यक्त व्हायला 'गद्य/पद्या'च्या बंधनात अडकले नाही की अश्या वर्गीकरणात अडकायची गरज भासू नये. भाषेच्या अभ्यासकांना अश्या वर्गीकरणांची गरजे असते / पडते.. आस्वादकांना पडू नये

बाळ सप्रे's picture

10 Dec 2012 - 11:53 am | बाळ सप्रे

मुक्तछंद म्हणजे कुठल्याही वृत्त, अलंकार यात न बसणारी काव्यरचना. म्हणजे सगळेच गद्य मुक्तछंद होत नाही. वृत्त, अलंकार यामुळे आपसुकच गेयता येते. पण एखादाच कवी वृत्त अलंकार याशिवाय 'काव्य' करु शकतो.
बालगंधर्व जसे एखादा वर्ज्य सूर येउनही गाणे अधिक सुंदर करु शकत.. सेह्वागची पदलालित्याशिवाय केलेली फटकेबाजी .. तसेच काहीसे.. म्हणून एखाद्या नवोदिताने मुक्तछंदात कविता करण्याचा प्रयत्न केला तर रावसाहेबांच्या भाषेत "जमत नाही तर कशाला उगाच उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचं मुका घेतो..." असे होण्याची शक्यता जास्त असते..