युलीप बाबत काय करावे? तुमच्या फायद्यासाठी अवश्य वाचा व प्रतिसाद द्या.

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in काथ्याकूट
13 Dec 2011 - 1:47 pm
गाभा: 

युलीप बाबत काय करावे?

वय वर्षे ३५ पर्यंतचे व्यक्तीने शक्यतो टर्म इंशुरन्स माध्यमातून जिवन विमा घ्यावा व गुंतवणूक आपल्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार करावी, जर शेअर बाजाराची जोखीम स्विकारण्याची तयारी असेल तर म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेत गुंतवणूक करावी जर कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर म्युच्युअल फंडाच्या डेब्ट योजनेत गुंतवणूक करावी व जर अजिबात जोखीम स्विकारावयाची नसेल तर बँक/पोष्टाच्या ठेवी, पीपीएफ आदी सुरक्षीत गुंतवणूक पर्यायांमध्ये करावी. ज्यावेळी आपल्या गुंतवणूकीचे मुल्य अपेक्षीत रकमे एवढे होईल, म्हणजेच आपल्या पश्चात वारसाचे सर्व प्रकारच्या आर्थीक गरजा भागण्याएवढे होईल तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी, उगाच नंतर हप्ते भरण्याचा मुर्खपणा का करावा? (मात्र नियमीत दर महा अथवा वार्षीक स्वरुपात गुंतवणूक करणे चालूच ठेवावे). टर्म इंशुरन्स घेतानासुध्दा तो ऑनलाईन घ्यावा कारण हप्ता जवळपास ३०% कमी पडतो. विमा कंपनी निवडताना सर्वात कमी हप्ता ज्या कंपनीचा असेल तिची निवड करावी. विमा तुम्ही तुमच्यासाठी घेता मग एजंटची गरजच काय?

युलीपचे फायदे:
१) मर्यादीत ५ वर्षे हप्ते भरुन नंतर हप्ते न भरताही वयाची ७५ वर्षे पुर्ण होईपर्यंत विमा संरक्षण चालू ठेवण्याची सुविधा.
२) आयकर कलम ८०-सी नुसार कर बचत.

युलीपचे तोटे:
१) पहिल्या वर्षी अँलोकेशन चार्जेस असतात त्यामुळे संपुर्ण रक्कम गुंतवणूकीला जात नाही.
२) २ –या, ३ –या वर्षी तसेच आपण हप्ते भरत असेपर्यंत चार्जेस कापले जातात (याला काही योजना अपवाद असल्याचा दावा केला जातो, तो फसवाच असतो).
३) सर्व प्रकारचे विमा संरक्षणापोटी कापले जाणारे मॉर्ट्यालीटी चार्जेस, फंड मँनेजमेंट चार्जेस, अँडमिनीस्ट्रेशन चार्जेस हे दर महिना आपली त्याप्रमाणात युनीटस् कापून आकारले जातात, ज्यामुळे भविष्यात युनीटची एनएव्ही वाढली तरी त्याचा पुर्ण लाभ विमा धारकाला मिळत नाही, कारण तुमची युनीटस् कमी झालेली असतात.
४) मार्केट वरती जात असताना एनएव्ही मधील बदल म्युच्युअल फंडाचे तुलनेत कमी असतो. मात्र मार्केट कोसळत असताना एनएव्ही म्युच्युअल फंडाप्रमाणेच कोसळते.
५) हल्ली बाजारात हायेस्ट एनएव्हीची युलीप प्रॉडक्टस उपलब्ध आहेत ती म्हणजे गुंतवणूक दाराची चक्क फसवणूकच आहे (याबाबत स्वतंत्र लेखच लिहावा लागेल).

युलीपचे तुलनेत गुंतवणूक म्हणून म्युच्युअल फंड योजनाच का स्विकारावी?

१) संपुर्ण रक्कम गुतवली जाते (एजंटकडून गुंतवा अथवा डायरेक्ट गुंतवा यात फरक पडत नाही कारण एजंटला दिले जाणारे कमीशन हे एक्झीट लोड/एक्सपेन्स रेशोतून दिले जाते, हे खर्च सर्वानाच समान असतात). सर्वसाधारणपणे योजनेच्या प्रकारानुसार ०.२५% त १% पर्यंत एक्झीट लोड पैसे सात दिवस ते एक वर्षाचे आत काढल्यास असतो व वार्षीक एक्सपेन्स रेशो हा १% ते २.५०% या दरम्याने असतो मात्र तो कधीही २.५०% पेक्षा जास्त नसतो. युलीप बाबत हा दर सरासरी १०% एवढा असतो. पारंपारीक विमा योजनेत तर हा बहुतांशी जाहीरच केला जात नाही, मात्र याचे प्रमाण १०% पेक्षा जास्तच असते.
२) कोणतेही चार्जेस युनीटस कमी करुन आकारले जात नाहीत तर ते चार्जेस वजा केल्यानंतरच एनएव्ही जाहीर केली जाते, यनीटस कधीच कमी होत नाहीत.
३) मार्केट नुसार एनएव्ही मधील बदल असतो, बहुतांशी चांगल्या योजना या इंडेक्सपेक्षा जास्त परतावा देतात.
४) म्युच्युअल फंडाचे इएलएसएस योजनेत केलेल्या गुंतवणूकीवरही आयकर कलम ८०-सी नुसार कर सवलत मिळते (मार्च २०१२ डिटिसीच्या अंमलानंतर काय ते अजून माहित नाही).
५) पैसे भरणे व काढणे आपल्या सोइनुसार ठरवता येते.
६) म्युच्युअल फंड व युलीप दोन्हीकडे बाजाराचे चढ उताराची जोखिम असते अशावेळी म्युच्युअल फंडातील परतावा हा युलीप पेक्षा नेहमीच अधीक असतो व जर युलीपमध्ये व म्युच्युअल फंडातही बाजाराची जोखीम आहे तर युलीपमध्ये गुंतवणूकीचा निर्णय घेणे म्हणजे मुर्खपणाच नाही काय?

परंतु जर वय ३५ पेक्षा जास्त असेल व जिवन विमा घेणे गरजेचे असेल तर एखाचे चांगले युलीप योजनेद्वारे विमा उतरावा, मात्र तो उतरवताना उदिष्ट हे प्रथम विमा व नंतर परतावा असेच असावे.
त्यासाठी खालीलप्रमाणे धोरण अवलंबल्यास फायदेशीर होते
:
१) युलीप योजना स्विकारताना बाजारात उपलब्ध असणा-या सर्व योजनांचा तौलनीकदृष्ट्या अभ्यास करुन ज्या योजनेत कमीत कमी अँलोकेशन चार्जेस असतील व ज्या योजनेत आपले स्वत:चे वय ७५ वर्षे पुर्ण होईपर्यत विमासंरक्षण मिळू शकत असेल तसेच ज्या योजनेत अपघाती मृत्यु, कायमस्वरुपी अपंगत्व, मेडिकल संरक्षण इ. मिळत असेल अशी सर्वसमावेशक योजना निवडावी. एक लक्षात ठेवा बहुतांशी एजंट सर्वसाधारणपणे तुमचा विचार न करता त्याचे कमिशनचाच जास्त विचार करत असतो.
२) आपले जीवन विमा संरक्षण वय वर्षे ७५ पर्यंतचे घ्यावे.
३) विमा संरक्षण योजनेतून जितके जास्तीत जास्त मिळेल तेवढे घ्यावे.
४) सर्वसाधारणपणे युलीपमध्ये विमा हि वार्षीक हप्ता गुणीले मुदत भागीले दोन द्यावेच लागते, परंतु जर सदर योजनेतून जादा जिवन संरक्षण मिळत असेल तर ते संपूर्ण घ्यावे.
५) जेवढे रायडर उपलब्ध असतील तेवढे घ्यावेत.
६)पॉलिसी सुरु झाल्यापासून पुढे ५ वर्षे नियमीत विमा हप्ता भरावा.
७) ५ वर्षानंतर, हप्ता बंद करुनही विमा संरक्षण वय वर्षे ७५ पर्यंत चालू ठेवण्याच्या पर्यायाचा अर्ज द्यावा.
८) ५ वर्षानंतर विमा हप्ते भरणे बंद करावे पण पैसे काढू नयेत.
९) ५ वर्षानंतर जेवढा विमा हप्ता आपण दर वर्षी भरत होतो पैकी त्यावेळी असणारे आयकर कायद्याप्रामाणे जेवढी सुट कलम ८०-सी प्रमाणे मिळत असेल तेवढी रक्कम म्युच्युअल फंडाच्या टँक्स प्लँन मध्ये गुतवावी व उर्वरीत रक्कम इक्वीटी अथवा डेब्ट म्युच्युअल फंड योजनेत आपल्या जोखिम स्विकाणेच्या तयारीनुसार गुंतवावी.
१०) आपल्या गुंतवणूक मुल्यातूनच विमा आकार कापला जाऊन विमा संरक्षण मुदतपुर्तीपर्यंत चालू राहील.
११) मुदतपुर्ती पुर्वी मृत्यु आल्यास विमा संरक्षणा इतकी रक्कम वारसाला प्राप्त होईल.
१२) मुदतपुर्तीचे वेळी आपण हयात असल्यास जे काय गुंतवणूक मुल्य असेल ते आपणास परत मिळेल.
१३) युलीपद्वारे जीवन विमा संरक्षण घेताना गुंतवणूक म्हणून नव्हे तर सोईचा विमा पर्याय म्हणूनच पहावे.
१४) युलीप हा खरे पहाता गुंतवणूक पर्याय म्हणून पहावयाचाच नसल्यामुळे उगाच गुंतवणूक मुल्य वगैरे पहाण्याच्या फंदातही पडू नये.
१५) शेअस बाजाराचे मँजीकल परतव्यामुळे आपले विमा संरक्षणाचे चार्जेस ५ वर्षे नियमीत हप्ते भरले असता, मुदतीअखेरपर्यंत चालू रहाण्याची सर्वाधीक शक्यता असते.

ह्याप्रमाणे युलीपद्वारे जिवन विमा संरक्षण घेणे कोणत्याही वयाचे व्यक्तीला फायदेशीर होते कारण फक्त ५ वर्षे इतक्या मर्यादित काळासाठी हप्ते भरुन नंतर वर वर्षे ७५ पर्यंत विमा संरक्षण चालू रहाण्याची सुविधा मिळते व ७५ वर्षानंतर शिल्लक मुल्यही परत मिळते. आपल्याला जेवढे विमा संरक्षण हवे आहे त्याच प्रमाणात युलीपचा हप्ता ठरवावा व उर्वरीत रक्कम शक्यतो सिस्टीमँटीक इन्व्हेस्टमेंट योजनेचे माध्यमातून एखादे चांगले म्युच्युअल फंड योजनेत गुंतवावेत.

अशा प्रकारे युलीप बाबत निर्णय घेतल्यास पस्तावण्याची वेळ येत नाही.

आपली एकूण बचत हि आपल्या निव्वळ (सर्व कर्जाचे हप्ते वगैरे वजा जाता) उत्पन्नाचे ३५% एवढी असावी, जेणे करुन भविष्याची चांगली तरतुद होऊ शकेल. आपली गुंतवणूक हि निरनिराळ्या गुंतवणूक माध्यमात, उदा. बँक, पोस्ट, पी.पी.एफ., इक्वीटी म्युच्युअल फंड, डेट फंड, बँलन्स फंड व शेअर्स मध्ये करावी जेणे करुन जोखिमीचे संतुलन होईल.
युलीप किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जवळचे एजंट मार्फत गुंतवणूक करण्याऐवजी तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला (त्याची फि देऊनही) घेऊन मगच निर्णय घेणे गुंतवणूकदाराचे हिताचे असते.

एक महत्वाची गोष्ट जरी तुम्ही टर्म इंशुरन्सव्दारे विमा संरक्षण घेतलेत व बाकीची रक्कम जरी पोष्टाच्या आरडीमध्ये गुंतवलीत तरी मिळणारी रक्कम हि विमा कंपनीकडून मुदतीअखेत मिळणा-या एकूण रकमेपेक्षा जास्त होते (हि गोष्ट जास्तकरुन पारंपारीक विमा योजनेच्या बाबत लागू पडते, ज्यामध्ये एजंटला सर्वात जास्त म्हणजे ४०% पर्यंत कमिशन मिळत असते). टर्म इंशुरन्स हा तुमच्या मुख्यत्वेकरुन अवलंबून असणा-या व्यक्तींचे आर्थीक संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय आहे बाकी सा-या विमा योजना या फक्त एजंटसाठीच फायद्याच्या असतात व तुमच्या अज्ञानाचा (मुर्खपणाचा) फायदा ते घेत असतात.

प्रतिक्रिया

चांगली माहिती
सविस्तर प्रतिसादाकरता जागा राखून ठेवत आहे

कपिलमुनी's picture

13 Dec 2011 - 6:48 pm | कपिलमुनी

प्रतिक्रियेच्या प्रतिसादासाठी सविस्तर जागा राखुन ठेवत आहे ;)

३५ ह्या वयोमर्यादेनंतर युलिप लाईफ कव्हरेजसाठी घेण्याची आयडिय भारी आहे.
पण एकंदरीतच युलिप हा प्रकार डोक्यात गेला असल्यामुळे (एजण्ट आणि विमा कंपनीच्या फसवेगीरीमुळे) त्याचे काही फयदे असू शकतात ह्यावर पॉजिटीव्ह्ली विचारच करवत नाही.

पण विमा आणि गुंतवणूक ह्या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी एकत्र कराव्याच का म्हणातो मी?

- (टर्मली इन्सुअर्ड) सोकाजी

ताकः सदानंदजी ऑनलाइन इन्शुरन्सची आयडिया सांगायला फार उशीर केलात आपण :(

सदानंद ठाकूर's picture

14 Dec 2011 - 1:16 pm | सदानंद ठाकूर

युलीपद्वारे जीवन विमा संरक्षण घेताना गुंतवणूक म्हणून नव्हे तर सोईचा विमा पर्याय म्हणूनच पहावे.
युलीप हा खरे पहाता गुंतवणूक पर्याय म्हणून पहावयाचाच नसल्यामुळे उगाच गुंतवणूक मुल्य वगैरे पहाण्याच्या फंदातही पडू नये.
मात्र गुंतवणूकीसाठी म्हणून कधीही युलीपचा विचारही करु नका.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

13 Dec 2011 - 7:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रोचक माहीती मिळाली. अभ्यासपूर्ण लेख.
परंतू सोकाजींचे म्हणणे देखिल पटते आहे.
विमा आणि गुंतवणूक जितक्या स्वतंत्र तितका फायदा आधिक आहे, असे माझे मत झाले आहे.

अभिरत भिरभि-या's picture

13 Dec 2011 - 8:42 pm | अभिरत भिरभि-या

खूप उपयोगी माहिती मिळाली ..धन्यवाद ..
काही प्रश्न
* टर्म विमा २५ वर्षांसारख्या दीर्घ कालावधी साठी मिळू शकतो. या काळात या खासगी कंपन्याचेच जर काही बरे वाईट झाले तर आय.आर.डी.ए काय करेल? या कंपन्या किती सेफ आहेत ?

*डिसेबब्लिटी /क्रिटिकेल इलनेस वगैरे रायडर हेल्थ पॉलिसी सोबत घेणे चांगले की टर्म सोबत ? हे रायडर घेतले असता रायडर साठीचा क्लेम उद्भवल्यास केवळ रायडरमधिल रक्कम मिळते की रायडर + Sum Assured मिळते ?

सदानंद ठाकूर's picture

14 Dec 2011 - 1:08 pm | सदानंद ठाकूर

टर्म विमा २५ वर्षांसारख्या दीर्घ कालावधी साठी मिळू शकतो. या काळात या खासगी कंपन्याचेच जर काही बरे वाईट झाले तर आय.आर.डी.ए काय करेल? या कंपन्या किती सेफ आहेत ?

प्रत्येक विमा कंपनीला सॉल्वन्सी रेशो मेंटेंन करावा लागतो, तसेच फार मोठ्या रकमेचा विमा असल्यास रि इंशुअर केला जातो त्यामुळे हि शक्यता जवळपास नाही.

डिसेबब्लिटी /क्रिटिकेल इलनेस वगैरे रायडर हेल्थ पॉलिसी सोबत घेणे चांगले की टर्म सोबत ? हे रायडर घेतले असता रायडर साठीचा क्लेम उद्भवल्यास केवळ रायडरमधिल रक्कम मिळते की रायडर + Sum Assured मिळते ?

टर्म इंशुरन्सबरोबर रायडर मिळत असतील तर घ्यावेत, फारच कमी कंपन्या हि सुविधा देतात. हेल्थ प्रॉडक्ट आवश्यकच आहेत. सर्वात स्वस्त असणारा प्लान घ्यावा. पॉलीसीबाजार.कॉम वर तुलना करता येते. जेवढे विमा संरक्षण आहे तेवढी रक्कम मिळेल, मात्र पॉलीसी हातात आल्यावर सर्व टर्म कंडिशन वाचून पहाव्यात तुम्हाला काही गोष्टी क्लिश्ट वाटल्यास सल्ला घ्या, तुमच्या हिताचे नाही असे वाटल्यास 20 दिवसांचे आत पॉलीसी परत करा, भरलेले पैसे परत मिळतील, अडचण आल्यास आयआरडीए कडे तक्रार करा.

दादा कोंडके's picture

13 Dec 2011 - 9:58 pm | दादा कोंडके

धन्यवाद ठाकूर साहेब!

१००००००% सहमत टर्म इंशुरन्स हा तुमच्या मुख्यत्वेकरुन अवलंबून असणा-या व्यक्तींचे आर्थीक संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय आहे बाकी सा-या विमा योजना या फक्त एजंटसाठीच फायद्याच्या असतात व तुमच्या अज्ञानाचा (मुर्खपणाचा) फायदा ते घेत असतात.' या स्टेटमेंटला.

देवदत्त's picture

14 Dec 2011 - 4:48 pm | देवदत्त

चांगली माहिती.
काही प्रश्नः
तेव्हा टर्म इंशुरन्सचा हप्ता भरणे बंद करुन सर्व रक्कम गुंतवणूक पर्यायात करावी, उगाच नंतर हप्ते भरण्याचा मुर्खपणा का करावा?
ह्यानंतर पॉलिसी बंद( लॅप्स) होत नाही का?

टर्म इंशुरन्स घेतानासुध्दा तो ऑनलाईन घ्यावा
ह्यात एक पाहिले की आपण घेतलेल्या इतर जीवन विम्यांची माहिती विचारतात. हे किती गरजेचे आहे? आणि हे देण्याचे फायदे व तोटे काय आहेत?

सदानंद ठाकूर's picture

14 Dec 2011 - 6:06 pm | सदानंद ठाकूर

1) जर का आपण टर्म प्लान सोबत गुंतवणूकही करत असाल, समजा तुम्ही ३० वर्ष मुदतीचा रु.१०० लाखाचा विमा घेतला आहे व २० वर्षानंतर तुम्ही सोबतच गुंतवणूक करत असलेल्या गुंतवणूकीचे मुल्य जर रु.एक कोटी झालेले असेल तर तुमच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तीची आर्थिक सोय झालेली असते अशा वेळी विमा हप्ता भरणे बंद केले तरी फरक पडणार नाही, अर्थात पॉलीसी लँप्स होईल. जर या वेळी तुमची प्रकृती चांगली नसेल तर मात्र हप्ते भरत रहाण्यास हरकत नाही, हे ज्याने त्याने परिस्थीतीनुसार ठरवावे.
2) टर्म विमा घेताना हि माहिती विचारली जाते कारण तुम्हाला मिळणारा जीवन विमा हा तुमच्या उत्पनाशी निगडीत असतो, सर्वसाधारणपणे वार्षीक उत्पन्नाच्या १० ते १५ पट विमा जास्तीत जास्त दिला जातो, या साठी हे प्रश्न विचारले जातात. ऑनलाईन (एजंटमार्फतसुध्दा) विमा घेताना सर्व माहीती देणे तुमच्याच फायद्याचे असते अन्यथा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो.

मन१'s picture

14 Dec 2011 - 5:25 pm | मन१

सुरेख लेख. स्पष्ट विचार आवडले.
विशेषतः
१४) युलीप हा खरे पहाता गुंतवणूक पर्याय म्हणून पहावयाचाच नसल्यामुळे उगाच गुंतवणूक मुल्य वगैरे पहाण्याच्या फंदातही पडू नये.

आणि

टर्म इंशुरन्स हा तुमच्या मुख्यत्वेकरुन अवलंबून असणा-या व्यक्तींचे आर्थीक संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय आहे बाकी सा-या विमा योजना या फक्त एजंटसाठीच फायद्याच्या असतात व तुमच्या अज्ञानाचा (मुर्खपणाचा) फायदा ते घेत असतात.

हे थेट रोखठोक सांगणे आवडले.
टर्म इन्शुरन्स सध्या घ्यावा म्हणतोय. कुठला बरा आहे म्हणे?
सध्या एक LIC वाला एक SBI च्या कुठल्यातरी subsidiries पैकी असणारा व एक IDBI fEDERAL वाला असा बरा वाटतोय.
ह्यापैकी प्रत्येक GOI चे काहीना काही stakes असल्याने सुरक्षितही वाटताहेत. ह्याशिवायही एखादा आहे काय चांगला?
पण कुठला नक्की फायनल घेतलेला बरा राहिल हे समजत नाही. सांगाल काय?

सदानंद ठाकूर's picture

14 Dec 2011 - 6:10 pm | सदानंद ठाकूर

www.policybazar.com या संकेतस्थळावर जाऊन पहा, जो स्वस्त असेल तो घ्या, एलआयसीचा फारच महाग आहे, कोटकचा स्वस्त व चांगलाही आहे.