बदामपोळी

मितान's picture
मितान in पाककृती
27 Oct 2011 - 10:41 pm

आज एका काकुंकडे जेवायला गेले होते. तिथे हा बेत होता. काकूंचं घराणं वेदशास्त्रसंपन्न प्रवचनकारांचं. आजच्या म्हणजे दिवाळीपाडव्याच्या दिवशी हा नैवेद्य परंपरेने चालत आलेला आहे असे काकू म्हणाल्या.
तुपात भिजलेली ती एक पोळी खाऊन दुपारी घरी येऊन जी झोपले ती तीन तासांनी आईने हलवून उठवल्यावरच उठले !!! खूप जड पण खूप चवदार असा हा राजस पदार्थ माझ्या सर्व खवैय्या मित्रमैत्रिणिंना दिवाळीच्या शुभेच्छांसह :)
लागणारी सामग्री -

बदाम - १ वाटी
खवा - १ वाटी
हरबरा डाळ - १ वाटी
साखर - ३ वाट्या
जायफळ
वेलचीपूड - आवडीनुसार
केशर- चिमूटभर
कृती --

बदाम रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी सालं काढून मिक्सरवर बारीक पेस्ट करून घ्या.
नेहमीच्या पुरणासाठी शिजवतो तशी हरभरा डाळ शिजवून मऊ वाटून घ्या.
आता एका पातेल्यात डाळ आणि साखर एकत्र गरम करा. चटचट आवाज यायला लागला की बदामाची पेस्ट त्यात मिसळा. हे दोन्ही चांगले मिळून आले की त्यात खवा ( न भाजता ) मिसळा. मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवित रहा. त्यात जायफळ-वेलची-केशर घाला. पुरणासारखे हे मिश्रण आवडीनुसार थोडे ओलसर किंवा कोरडे केले तरी चालते.
पुरणपोळीसाठी मळतो तशी कणिक मळून त्यात सारण भरून पोळी लाटा. तव्यावर तेल तूप न घालता भाजून घ्या.
एका परातीत भरपूर तूप घ्या. ( हो ! परातीत !! :) ) तव्यावर भाजलेली पोळी थेट त्या तुपात बुडवा. उलटीपालटी करून चांगली भिजवा. बदाम पोळी तयार आहे. दिसायला ही नेहमीच्या पुरणपोळीसारखीच दिसते म्हणून फोटो नाही टाकत. चव मात्र.. अहाहा...! एकदा खाऊन बघाच !
वाढणी/प्रमाण: या प्रमाणात मध्यम आकाराच्या १२ ते १५ पोळ्या होतील.

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

27 Oct 2011 - 10:53 pm | इंटरनेटस्नेही

खल्लास पाकृ!

जागु's picture

27 Oct 2011 - 11:57 pm | जागु

वा मस्तच.

रेवती's picture

28 Oct 2011 - 12:18 am | रेवती

वेगळाच पदार्थ.

चित्रा's picture

28 Oct 2011 - 2:18 am | चित्रा

छानच आहे.

सुहास झेले's picture

28 Oct 2011 - 2:25 am | सुहास झेले

एकदम हटके :) :)

मेघवेडा's picture

28 Oct 2011 - 3:10 am | मेघवेडा

अगदी हटके! आणि मस्तच! कधीतरी दिवसभर उपास करून मग करून बघायला हवी! :)

नगरीनिरंजन's picture

28 Oct 2011 - 8:27 am | नगरीनिरंजन

वाचूनच झोप आली. :)
खतरनाक पाकृ आहे. एकदातरी खाल्लीच पाहिजे.
बाकी तुपात भिजलेल्या पुरणपोळ्या हादडून संध्याकाळपर्यंत ताणून देणे हा एक अत्युच्च आनंदसोहळा असायचा (आजकाल त्यात अपराधीपणाच्या भावनेची भेसळ झाली आहे).

अर्धवट's picture

28 Oct 2011 - 9:16 am | अर्धवट

आईग्ग्ग्ग्ग्ग.. हलकट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट

कच्ची कैरी's picture

28 Oct 2011 - 12:34 pm | कच्ची कैरी

नविन आणि छान!!

स्मिता.'s picture

28 Oct 2011 - 1:41 pm | स्मिता.

पाकृ अगदी १ नंबर जबराट वाटतेय.

पण ही अशी बदाम, खवा, तूप युक्त पुरणपोळी खाताना किती क्यालर्‍या पोटात जात आहेत या भावनेने तिचा निर्भेळ आनंद घेता येईल की नाही शंकाच आहे.

गणपा's picture

28 Oct 2011 - 2:30 pm | गणपा

मितान तै पुनरागमनाच्या शुभेच्छा... :)
गोडाचा भक्त नसलो तरी एकंदर वर्णन वाचुन एकदा तरी अशी बदाम पोळी चापुन झक्कास ताणुन द्यावेसे वाटतय.

दिसायला ही नेहमीच्या पुरणपोळीसारखीच दिसते म्हणून फोटो नाही टाकत.

इ ना चॉल्बे.
फटु हवाच. :)

मितान's picture

28 Oct 2011 - 4:12 pm | मितान

नगरीनिरंजन, स्मिता ,

कॅलर्‍यांची फार चिंता नको. एका पोळीत एका चीज बर्गर किंवा बटरचिकन पेक्षा नक्कीच कमी कॅलरीज् आहेत. :)

मेव्या, कधी येऊ मग मदतीला ?

गणपाभौ, मी स्वतः केली ही पोळी की नक्की काढणार फोटो.. :)

अर्ध्या, विएतनामी लोकांना करता येत असेल ही पोळी ;)

अजून पोळ्या केल्या नाहीत वाटत मितान ताईनी? ताई या दिवाळीत करा आणि फोटो टाका :)

पैसा's picture

28 Oct 2011 - 4:57 pm | पैसा

या पोळ्या करून फोटो टाका रे!

प्रभो's picture

28 Oct 2011 - 8:21 pm | प्रभो

ह्म्म्म... खायला मिळाल्याशिवाय प्रतिसाद मिळणार नाही..

ह्यात खसखस घातली तर बदामपोळी खाऊन नक्कीच बारा तास तरी झोप येईल. म्हणून मी तरी ही पोळी नक्की खाणार आणि बारा तास डुलक्या देणार.. :D

- पिंगू

भारीभक्कम पाकृ आहे ही... मस्त!

परिकथेतील राजकुमार's picture

14 Nov 2011 - 4:56 pm | परिकथेतील राजकुमार

कोणी ही पाकृ खायला बोलावणार आहे काय ?

रेवती आज्जी ने तिच्या हिंदुस्थान भेटीत मला बदाम दिले होते ते आठवले... :)
फोटु पाहिजे...

धर्मराजमुटके's picture

21 Oct 2013 - 11:58 pm | धर्मराजमुटके

फोटो फारच छान आले आहेत !

काजू बदाम गोड पदार्थांत का टाकतात ?ते खारेच छान लागतात .शिवाय इथे चणाडाळीशी त्याचे नाते कसे जमवले आहे .:(बिचारे बदाम .:(