नॉस्टॅल्जिया

क्राईममास्तर गोगो's picture
क्राईममास्तर गोगो in काथ्याकूट
3 Oct 2011 - 2:40 pm
गाभा: 

हा लेख लोकसत्तात आलेला... अगदी मनोरंजक वाटला म्हणून मिपाकरांसमोर मांडतोय ...

गेल्या आठवडय़ात पाऊस सुरू झाला तेव्हा मी प्रवासात होतो. संध्याकाळची वेळ. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटात पावसाची पहिली सर बरसू लागली. एक परिचित गंध आसमंतात दरवळला. मृद्गंध! वेडावून टाकणारा मातीचा हा वास शहरातल्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात राहताना मी पार विसरून गेलो होतो. क्षणार्धात माझं मन पन्नास वर्षे मागं गेलं. लहान असताना केलेलं पहिल्या पावसाचं स्वागत आठवलं. ते ‘येरे येरे पावसा’ म्हणत पावसाच्या धारांत भिजणं, कागदाच्या होडय़ा करून पाण्यात सोडणं, साठलेल्या पाण्यात धप्कन उडय़ा मारणं, अनवाणी पावलांनी चिखलात फतक फतक चालणं, सगळं आठवलं. एक सुखद आणि तरीही हुरहुर लावणारी संवेदना काळजात कळ उठवून गेली. नोस्टाल्जियाची भावना!

नोस्टाल्जियाचा मूळ अर्थ परदेशात स्थायिक झालेल्या माणसाची आपल्या मूळ भूमीबद्दलची ओढ. ग्रीकमधे नोस्टॉस म्हणजे घरी परतायची इच्छा आणि अल्गॉस म्हणजे वेदना. नोस्टाल्जिया म्हणजे घराच्या आठवणीनं व्याकूळ होणं. थोडक्यात होमसिकनेस. अलीकडे मात्र भूतकाळात रमणं, ‘गेले ते दिवस’ असं म्हणून उसासे टाकणं, या अर्थानं हा शब्द जास्त करून वापरला जातो. मराठीत त्याला स्मरणरंजन असा छान प्रतिशब्द आहे.

स्मरणरंजनाची सवय माणसाची सहज प्रेरणा आहे. वय वाढतं तशी ती वाढत जाते. सगळ्या समाजात, सगळ्या संस्कृतीत ती दिसते. पण तिचं कार्य काय? मेंदू हा अवयव कुठलीही गोष्ट विनाकारण करत नाही. ज्याचा उपयोग नाही अशा गोष्टीत वेळेचा आणि ऊर्जेचा अपव्यय करणं त्याला परवडत नाही. त्यामुळे नोस्टाल्जियाच्या भावनेचा जगण्यासाठी काहीतरी उपयोग होत असणारच. पण तो नेमका काय ते अजून समजलेलं नाही. राग, भीती, घृणा यांसारख्या भावनांचा माणसाला उपयोग असतो. अगदी मत्सरासारखी वाईट भावना घेतली तरी तीही काही परिस्थितीत फायदेशीर ठरते. मत्सरामुळे माणूस धडपड करायला, कष्ट उपसायला सिद्ध होतो. पण सकृतदर्शनी तरी स्मरणरंजनाचा तगून राहायला विशेष काही उपयोग होताना दिसत नाही. या विषयाचा अभ्यास अजून फारसा झालेला नाही.

साऊथॅम्फ्टन युनिव्हर्सिटीत थोडंफार संशोधन झालं आहे. तिथल्या मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे स्मरणरंजन हे एक नसíगक अ‍ॅन्टीडिप्रेसंट म्हणजे नराश्य कमी करणारं औषध आहे. आपल्या रूक्ष जीवनात गतकाळच्या सुखद आठवणींमुळे, खोटी खोटी का होईना, पण जरा रंगत येते. एकंदरीतच छान वाटायला लागतं. हे खरं आहे यात शंका नाही; पण ते सांगायला कुणा संशोधकाची गरज नाही. नोस्टाल्जिक भावनेमुळे सामाजिक बंध दृढ होतात, समवयस्कांत आपलेपणाची भावना निर्माण होते, हे तर आपण पाहतोच. कुठल्याही कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात डोकवा. सगळा वेळ बहुतेकजण आपल्या वेळी कोणकोण प्राध्यापक होते, हॉस्टेलवर आपण कशी धमाल केली, वर्गाला बुट्टी मारून कोणते सिनेमे पाहिले, आणि हो, तेव्हा कॉलेजक्वीन कोण होती (किंवा तो हॅन्डसम जी.एस. कोण होता) या विषयांवर गप्पा रंगताना दिसतील.

मेंदूत आठवणी साठवून ठेवायची पद्धत गुंतागुंतीची असते. आपल्याला वाटतं तसे मेंदूत आठवणींचे संगतवार कप्पे नसतात. ग्रंथालयात विषयानुसार वर्गीकरण करून शेल्फमधे पुस्तकं व्यवस्थित रचून ठेवलेली असतात, तशा प्रकारे मेंदूत आठवणी साठवलेल्या नसतात. सरमिसळ असते. एकाच आठवणीचे धागेदोरे अनेक गोष्टींशी निगडित असतात. त्यामुळे कशामुळे काय आठवेल ते सांगता येत नाही. स्पर्श आणि वास या दोन गोष्टी माणसाला भूतकाळात खेचून न्यायला समर्थ असतात. रेशमी वस्त्राला अचानक हात लागला किंवा चाफ्याच्या फुलाचा धुंदावणारा सुगंध आला की मेंदूतली कुठली तरी कळ दाबली जाते अन् मन भूतकाळात विहरायला लागतं. संगीत हीसुद्धा अशीच एक कळ. लहानपणी ऐकलेली, तरुणपणी ओठावर घोळवलेली, जुनी गाणी ऐकताना व्याकूळ न होणारा माणूस विरळा. माणूस एकांतात असताना (जोडीदारासंगे नव्हे, खरोखर एकटा!) स्मरणरंजनात जास्त रमतो. त्याच्या एकटेपणावर मेंदूनं काढलेला हा उपाय असतो.

मेंदूपेशींची जोडणी होऊन आठवणी तयार होतात. मेंदूच्या पेशींचे दोन भाग असतात. म्हणजे दोन प्रकारचे फाटे तिला फुटलेले असतात. एक असतो दुसऱ्या पेशीकडे संदेश पाठवणारा भाग आणि दुसरा शेजारच्या पेशींकडून येणारे संदेश स्वीकारणारा भाग. एका पेशीचा संदेश देणारा भाग जेव्हा दुसऱ्या पेशीतल्या संदेश ग्रहण करणाऱ्या भागात गुंततो तेव्हा जोड जुळून स्मृती तयार होते. हा जोड जितका भक्कम, तितकी ती आठवण पक्की. एखादी गोष्ट पुन: पुन्हा आठवली की जोड अधिकाधिक भक्कम होत जातो. गवतात त्याच वाटेवरून पुन: पुन्हा चाललं की ती वाट मळते, तिची पाऊलवाट बनते, तसं होतं. आठवणींची उजळणी करताना क्लेशकारक भाग बहुधा गाळला जातो. वाटेतलं काटेरी झुडूप टाळून किंवा खडकाला वळसा घालून पायवाट जावी, तसं. शिवाय ज्या स्मृती भावभावनांशी निगडित असतात, त्या मनात खोल रुजलेल्या असतात. म्हणजेच त्यांची जुळणी घट्ट झालेली असते. अशा दोन्ही प्रकारे पक्क्या झालेल्या आठवणी स्मरणरंजनाच्या मुळाशी असतात.

जेव्हा आपण एखादी गोष्ट स्मरतो, तेव्हा प्रत्येक वेळी मनात साठवलेली मूळ आठवण सूक्ष्म प्रमाणात बदलते. ती स्मरत असताना त्या अनुषंगानं मनात आलेले विचार, जाग्या झालेल्या भावना, यासुद्धा त्या आठवणीत कळत नकळत मिसळत असतात. नंतर भरलेले हे रंग मूळ आठवणींत बेमालूम मिसळून जातात. कधीकधी तर तपशीलही बदलतात. एखादा माणूस जर चुकीचे तपशील सांगत असला तर प्रत्येक वेळी तो अप्रामाणिकच असतो असं नाही. त्याच्या मेंदूतच ते तसं साठवलेलं असतं. त्यामुळे खऱ्या किंवा प्रामाणिक आठवणी हा शब्द एकापरीनं निर्थक आहे. आपण जेव्हा आठवणी मनात घोळवतो, तेव्हा त्यातले त्रासदायक भाग अशा प्रकारे पुष्कळदा पुसले जातात. उरलेला गोडगोड भाग स्मरणरंजनाचा खजिना बनतो. सामान्यत: स्मरणरंजन हे आनंददायक आठवणींशीच निगडित का असतं, याचं उत्तर हे आहे.

स्मरणरंजन नक्की कशासाठी ते शास्त्रज्ञांना अजून कळलं नसलं तरी जाहिरातदारांना मात्र ते बरोबर कळलंय. माणसाला मोहात पाडून एखादी वस्तू विकत घ्यायला लावायच्या ज्या काही क्लृप्त्या आहेत त्यात ही क्लृप्ती बऱ्याच वरच्या क्रमांकावर आहे. म्हणून तर बऱ्याच जाहिरातींमधे माणसांच्या भूतकाळात रमायच्या वृत्तीला आवाहन करणारे शब्द घातलेले असतात. आता तर लोकांना जुन्या काळच्या वस्तूंची आठवण होईल असे सुगंध मुद्दाम तयार केले जात आहेत. ते लवकरच बाजारात येऊ घातले आहेत. तेव्हा पुढच्या खेपेला सुपरमार्केटमधे जाल तेव्हा जरा सांभाळून राहा. नाहीतर दगडी पाटी किंवा धान्य दळायचं जातं घेऊन याल!

सुबोध जावडेकर , रविवार , १९ जून २०११

मूळ लेख

प्रतिक्रिया

लेख रोचक आहे. सुगंध आणि स्मरणरंजनाबाबत खूप अनुभव आहेत.

अशोक पतिल's picture

3 Oct 2011 - 7:15 pm | अशोक पतिल

लेख खुप छान आहे. एखादे जुने गाने ऐकताना त्या काळातील जुन्या आठवनी ताज्या होतात. खरेच खुप विचारणीय लेख !

रेवती's picture

3 Oct 2011 - 7:16 pm | रेवती

मनोरंजक लेखन!

विनीत संखे's picture

4 Oct 2011 - 9:34 pm | विनीत संखे

खूपच छान गोगोभाऊ.

क्राईममास्तर गोगो's picture

5 Oct 2011 - 11:42 am | क्राईममास्तर गोगो

धन्यु.

वपाडाव's picture

5 Oct 2011 - 11:58 am | वपाडाव

साहेब, ज्याम भारी लिव्हलंय.....

नॉस्टॅल्जियाच्या अर्थापासुन ते मेंदुच्या पेशी जोडणीपर्यंत......
सगळंच वुत्तम.....
जियो मेरे गोगो.....

आत्मशून्य's picture

8 Oct 2011 - 6:54 pm | आत्मशून्य

केमीकल लोच्या..........