हि एक पारंपारिक पाककृती आहे.
साहित्यः-१) तीन वाट्या तांदुळ.
२) एक वाटी उडीदडाळ.
३) अर्धी वाटी चणाडाळ.
४)पाव वाटी मेथीदाणे.
५) पाव चमचा हळद.
६)मिठ.
कृती :-प्रथम तांदुळ,सर्व डाळी व मेथीदाणे ६-७ तास भिजत घालावे.
नंतर बारीक वाटुन घ्यावे. व ८-९ तास झाकुन
ठेवावे. चांगले फुगून येईल्.
मग त्यात मिठ व हळद घालून एकाच दिशेने हलवावे.
तव्याला तेल लावून छोट्य-छोट्या खापरोळ्या काढव्या.
नारळाचा रस काढ्ण्याची कृती.
खवलेला नारळ घेऊन त्यात पाणी घालून वाटून घ्यावा.प्रथम जाड रस येईल तो बाजूला काढून ठेवावा.
परत पाणी घालून रस काढावा असे दोनदा करावे. हा रस दुसर्या भांड्यात घ्यावा. ह्या रसात थोडे मिठ
घालावे.व गोडीला लागेल तेव्हडा गुळ घालावा.चांगले मिक्स झाले की त्यात जाड रस घालावा. व वेलची
पूड घालावी.
खापरोळी देतांना डीशमध्ये खापरोळी घालून वर रस घालून द्यावी. किंवा रस वाटीत घालून दिला
तरी चालतो. पण खापरोळी रसात मुरली कि छान लागते.
प्रतिक्रिया
25 Jul 2011 - 1:58 am | नंदन
आवडता नाश्ता! नारळाचा गोड रस, बिड्यावरून काढलेल्या कुरकुरीत खापरोळ्या आणि अधूनमधून चव जाणवून देणारे मेथीदाणे हे कॉम्बो छान लागतं.
25 Jul 2011 - 2:08 am | गणपा
मस्तच.
आमच्याकडे याला आंबोळ्या म्हणतात. आणि गोड आवडत नसल्याने आई माझ्यासाठी थोडा नारळाचा रस वेगळा काढुन ठेवत असे.
25 Jul 2011 - 7:33 am | ५० फक्त
करुन बघायला हवे, वेगळा प्रकार आहे, मेथी दाणे घालण्यामागचं काही प्रयोजन आहे का, हे कुणी सांगेल का ?
हा प्रकार पुर्वी खापरावर करायचे म्हणुन खापरोळी म्हणतात का ओ याला.
25 Jul 2011 - 8:03 am | चित्रा
पारंपारिक पदार्थ.
25 Jul 2011 - 8:16 am | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर...............:)
आहा.....काय दिसतेय जाळीदार.................मस्त......तोंपासु....:p
फोटो मस्त.
25 Jul 2011 - 12:34 pm | गवि
जबरदस्त..
कोकणात खाल्ल्याचे आठवते. पण खापरोळी अशा नावाने नव्हे. कायसे वेगळेच नाव असावे.
कोकणात पानग्या, पातोळे, घावणे वगैरे धिरड्यासारखे इतके चविष्ट आणि वेगळे प्रकार आहेत की आपण तर तेवढ्यासाठी कोकणात कायम रहायला तयार आहो.
वेगळी, सर्वत्र नेहमी केली न जाणारी न्याहारीची पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद..
हीच खापरोळी /आंबोळी मिल्कमेड कंडेन्स्ड मिल्कसोबत खावी. ट्राय करुन पहा केली नसल्यास.
25 Jul 2011 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार
गवि लिखाणाचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्स.
जबरदस्त..
कोकणात खाल्ल्याचे आठवते, ठिकाण गणपतीपुळे.
25 Jul 2011 - 6:08 pm | सानिकास्वप्निल
खापरोळी आम्ही गव्हाचे पीठ, मीठ, गुळ, वेलचीपूड घालून बनवतो
गावी वडयाच्या (भाजाणीचे नव्हे, काळ्या वटाण्याच्या आमटीबरोबर बनवतात)पीठात गुळ, खोबरे ही घालतात त्याला कायलोळी असे म्हण्तात, नाश्त्याला खाल्ली जातात :)
लवकरच पाकृ देण्यात येईल :)
25 Jul 2011 - 6:04 pm | ज्योति प्रकाश
आपले सावंतवाडीत सदैव स्वागत्.आता काही दिवसातच श्रावण सुरू होणार तेव्हा नागपंचमीला पातोळ्या करणार
नैवेद्याला. हळदीची पाने अजुन मिळाली नसल्यास हेच आमंत्रण श्रावण ते गणपतीपर्यंत सर्वांना समजावे.त्यानिमित्त
तरि कोकणात याल.
25 Jul 2011 - 5:37 pm | सानिकास्वप्निल
खापरोळी आम्ही गव्हाचे पीठ, मीठ, गुळ, वेलचीपूड घालून बनवतो :)
25 Jul 2011 - 6:07 pm | ज्योति प्रकाश
हि खास खापरोळी बनवण्याची कोकणी पध्द्त आहे.
25 Jul 2011 - 6:11 pm | सानिकास्वप्निल
कोकणात आम्ही वरील सांगितलेल्या पध्द्तीने बनवतो :)
तुम्ही सांगितलेल्याप्रमाणे बनवून बघते एकदा :)
25 Jul 2011 - 8:15 pm | कच्ची कैरी
व्वा !! नविनच पाकृ.आहे ,नक्की ट्राय करुन बघेल
26 Jul 2011 - 4:13 pm | जयंत कुलकर्णी
ज्योती,
मी कोकणात माझ्या एका नातेवाईकांकडे दरवर्षी जातो. तेथे हा पदार्थ केला जातो. त्यांनी दिलेल्या पाककृतीने येथे घरी आल्यावर केला की हमखास बिघडतो. का ते तुझी पाककृती कळाल्यानंतर कळाले. त्या बाईंनी उडिदाच्या डाळीला आम्हाला दिलेल्या पाककृतीत सुट्टी दिली होती. तु लिहील्याप्रमाणे केल्यावर येथेच कोकणात गेल्याचा आनंद मिळाला. अर्थात मी मटणाबरोबर खाल्यामुळे अजुनच मजा आली. ( मटण मी केले होते - पारशी पद्धतीचे). प्रकार एकंदरीत फारच भारी लागत होता.
:-)
असो तुझ्यामुळे खरी पाककृती कळाली आणि माझी बायको त्यामुळे खूष झाली म्हणून तुला खास धन्यवाद ! आणि आमंत्रण कधी पुण्याला आलीस तर !
26 Jul 2011 - 11:37 pm | ज्योति प्रकाश
आमंत्रण मिळाले पण पत्ता काय?
27 Jul 2011 - 9:11 am | जयंत कुलकर्णी
संदेश पाठवला आहे.
कृपया बघणे.
26 Jul 2011 - 4:12 pm | गणपा
कालच बनवुन खाल्या गेले आहे . :)
26 Jul 2011 - 11:36 pm | ज्योति प्रकाश
धन्यवाद.