उन्हाळ्यात करंदी भरपुर आणि चांगली येते. त्यामुळे करंदी आणि आंब्याची कढी हे कोम्बीनेशन चांगले जमते. करंदी म्हणजे छोटि कोलंबीच. पहिला कोलिम मग जवळा मग करंदी असा ह्यांचा क्रम
करंदीचे कालवणही करतात. त्यातही कांदा घालतात.
आळुवडीतही करंदी घालतात.
करंदी पुलावही चांगला होतो.
ही आहे करंदी. खर तर कोळणीकडून साफ केलेले वाटेच घेतले पण करंदीचा पुर्ण फोटो हवा म्हणुन तिच्याकडून थोडी न सोललेली करंदी घेतली.
करंदी साफ करुन म्हणजे तिला पुर्ण सोलुन घ्या.
१ ते २ कांदे चिरुन
लसुण पाकळ्या ७-८ ठेचुन
हिंग
हळद, मसाला
मिठ,
थोडी कोथिंबिर बारीक चिरुन
टोमॅटो किंवा कोकम किंवा कैरी
तेल
क्रमवार पाककृती:
भांड्यात तेल गरम करा मग ठेचलेल्या लसुणपाकळ्यांची मस्त फोडणी द्या. आता त्यावर चिरलेला कांदा घालुन बदामी रंग येईपर्यंत तळा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला आणि घालुन ठवळून त्यावर करंदी घाला व वाफेवर ती शिजवा. शिजताना ती थोडी अळते. म्हणुन शिजल्यावर मिठ घाला म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही. मिठाबरोबर कोकम किंवा कैरी आणि कोथिंबीरही घाला. परत एक वाफ आणुन गॅस बंद करा.
ही बघा तयार झालेली सुकी करंदी.
प्रतिक्रिया
14 Jun 2011 - 12:52 pm | इरसाल
जागूताई सुकी कोलिम काय, कोलंबी काय, करंदी काय, अंबाडी सुकट काय, जवळा काय किंवा सुकट आणि बरोबर तांदळाची भाकरी असा काय बेत होतो कि राहवलेच जात नाही.
एकदम खतरनाक.......................हा हा करत आणि नाकातून पाणी येताना सुर्र्र्रर्र्र्र करत खाण्यात जो काय आनंद आहे न तो काय वर्णावा
14 Jun 2011 - 2:09 pm | गवि
आहा..
तोंपासु.
बादवे. आंब्याची कढी म्हणजे काय ? भलतेच इंटरेस्टिंग नाव वाटतेय.
14 Jun 2011 - 8:47 pm | जागु
इरसाल धन्यवाद.
गगनविहारी आंव्याची कढी खालील प्रमाणे:
कैरी उकडून त्याच पाण्यात कुस्करुन घ्यायची. मग एका भांड्यात तेलावर राइ, जिर, लसुण, कढीपत्ता, मिरची, मेथी, हिंग, हळद अशी फोडणी द्यायची. त्यावर कुस्करलेले कैरीचे पाणी टाकायचे. त्यात चविपुरते मिठ, गुळ किंवा साखर टाकायची. उकळली की वरुन कोथिंबीर टाकुन गॅस बंद करायचा.
15 Jun 2011 - 6:06 am | गवि
जागु , धन्यवाद... must do recipe..
15 Jun 2011 - 12:50 pm | गवि
माझी आजी कोकणात असताना "कोयाडं" म्हणून एक कैरी उकडून प्रकार करायची. हा तोच तर नव्हे अशी शंका आली.
त्या कैर्या बहुधा अर्ध्या पिकलेल्या असत आणि पदार्थ कढी म्हणण्याइतका पातळ नसे. काहीसा घट्ट आणि आंबटगोड.
14 Jun 2011 - 10:12 pm | प्राजु
मी आमच्या इथल्या अक्वेरियम मध्ये सुद्ध जितके मासे पाहिले नसतील तितके जागु ने मिपाकरांना (व्हर्च्युअली) खायला घातले आहेत...
जागु जिंदाबाद!!
14 Jun 2011 - 11:27 pm | सानिकास्वप्निल
कांदा-सुकट, कांदा-करंदी-भाकरी अहा...
तों पा सु
15 Jun 2011 - 12:47 pm | ५० फक्त
मासे काय नाय जमत आपल्याला पण आंब्याची कढी करुन पाहतो आणि सांगतो जरुर.
16 Jun 2011 - 11:20 am | पप्पु अंकल
जागूताई करंदी आवडली,
आता पावसाळ्यात चिवनी भरपुर मिळतायत.
16 Jun 2011 - 1:52 pm | जागु
प्राजु धन्स ग.
सानिका खरच ग सुकट भाकरी एकदम तोपासु.
५० फक्त करुनच बघा आंब्याची कढी.
पप्पु अंकल चिवनी आली आहेत आता भरपुत अगदी गाबोळीची.
16 Jun 2011 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार
शाकाहारी असुनही केवळ जागुतै 'करंदीकर' हिच्यासाठी धागा उघडल्या गेला.