खान्देशी पदार्थः पुडाच्या पाटोड्या! (फोटो अ‍ॅड केलेत)

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in पाककृती
24 May 2011 - 4:55 pm

Img00033[1]

लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
पुडाच्या पाटोड्या हा एक अस्सल खान्देशी पदार्थ. आखाजी (अक्षय्य तृतीयेला) माहेरी आलेल्या मुलींना घेण्यासाठी आलेले आमरस पुरणपोळीसारखं गोड पदार्थ खाउन कंटाळलेले जावईबापुंनी घरात ऑर्डर द्यावी व सासुबाईला म्हणावे, "मामी, आज तुमच्या हातच्या पुडाच्या पाटोड्या होऊन जाउ द्या!" आणि सासुबाईनी सकाळपासुन खपुन बनवलेला पदार्थ आग्रह करकरुन जावयाला वाढावं, तर यावर जावयाने "तुमच्या हाताची सर कधी आमच्या 'हिच्या' हाताला येतच नाही"!असं बोटं चाटत खात म्हणावं, असा हा पदार्थ आहे. सासुबाईं जावयासाठी पदार्थ बनवतांना जरा सढळ हातानेच सामग्री वापरतात.

तसं या पदार्थाला 'सात पुडी पाटोड्या/ पाटवड्या', 'बाफेल वडी' अशीही नावं आहेत. तसच याला तसा कुटाणा ही फार आहे. पण नंतर एकामागोमाग एक तोंडात टाकताच विरघळणारी मसालेदार पाटोडी खाण्यापुढे हा कुटाणा 'चलता है"!
सामग्री:
पाटोड्यांसाठी:बेसनः ५ मध्यम आकाराच्या वाट्या भरुन
गव्हाचं पीठः एक मूठभर
आत लावायच्या मसाला:कांदा
लसुण
सुकं खोबरं
आले
चटणी
हळद
गरम मसाला
तेजपान
दालचिनी
दगडफुल
बाजा/चक्रफुल
लवंग
मिरी
हे सगळं एकत्र वाटुन घ्यावे. आणि थोड्या तेलावर परतावे अगदी मसाल्याला तेल सुटेपर्यंत. आणि नंतर त्यात मीठ कालवुन कटो-यात काढावे.

कांद्याची करपी:अर्धा किलो कांदा बारीक चिरुन
लसुणः एक मध्यम आकाराची वाटी लसुण सोलुन
कढईत तेल टाकुन त्यात हा कांदा निट नरम होईस्तोवर परतावा. त्यात हळद आणि चवीपुरते मीठ घालावे.
हीच कृती लसणाच्या करपीसाठी करावी.
आता ही कांदा-लसणाची करपी एकत्र करुन एका कटो-यात काढुन ठेवावी.

सुके खोबरे: एक खोब-याची वाटी सुके खोबरे किसुन आणि अगदी थोडे तेल तव्यावर टाकुन त्यात हे नावाला भाजुन घ्यावे.
कोथिंबिरः बारीक चिरुन एक वाटी
खसखस : वरुन पेरण्यासाठी
क्रमवार पाककृती:
पाटोड्यांची कृती:सुरवातीला पाण्याला फोडणी देणे म्हणजे थोड्या तेलात हळद टाकुन लगेच ३-४ कप पाणी ओतणे, पाण्यात हिंग, ओवा, चवीपुरते मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटली की बेसन+ गव्हाचे पीठ हे मिश्रण हळुहळु त्यात ओतत जावे, पीठाची गुठळी होऊ न देता ते लाटण्याने घेरत जावे. व्यवस्थित घेरले/हाटले गेले की थोडे शिजायला ठेवावे. नंतर त्या पीठाच्या गोळ्यावर ओला कपडा झाकुन ठेवावे.
आता एक स्टीलचे ताट पालथे करुन (पोळपाट लहान पडतं) त्यावर प्लॅस्टीकची बॅग एका बाजुने कापुन घ्यावी त्यात हा गोळा घालुन हाताने मळावे आणि गाठी (असतील तर) व्यवस्थीत हाताने मळुन एकजीव करुन घ्यावे. (प्लॅस्टीकची बॅग- हाताला चिटकु नये आणि पीठ गरम असल्याने) आणि तसेच त्यावरुन लाटणे फिरवुन मोठ्या पोळीसारखे लाटुन घ्यावे. आता वरचा प्लॅस्टीकचा कागद काढुन घ्यावा.
या आख्ख्या पोळीवर सुरवातीला जो वाटलेला मसाला आहे त्याचा एक लेयर द्यावा. नंतर त्यावरुन कांदा लसुण च्या करपीचा एक थर द्यावा. त्यावरुन बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा एक थर. त्यावर सुके लांबलांब किसलेल्या खोब-याचा एक थर, आणि सर्वात शेवटी खसखस पेरावी.
आता दोन्ही बाजुने या पोळीची एकेक पट्टी वाळावी पुन्हा त्यावर वरीलप्रमाणेच एकेक थर द्यावे. अशा रितीने पोळीच्या पट्ट्या वळवुन प्रत्येक फोल्डवर असे थर येतात. बेसनाची पोळी मोठी असेल तर एकावर एक असे ७ थर येतात. सर्वात शेवटी तिरप्या आकारात चाकुने छेद द्यावे.

Img00020

आणि तशीच प्लेटमधे वाढावी. या पाटोड्यांबरोबर मसाल्याची आमटी आणि चपाती करतात.

वाढणी/प्रमाण:
५-६ लोकांसाठी
अधिक टिपा:
एवढा कुटाणा करुन केलेल्या पाटोड्या टिकत नाहीत हेच ते काय ते एक दुखणं!
त्या संध्याकाळपर्यंत सुद्धा रहात नाही. फ्रीजमधे ठेवल्या तर मसाल्याचा सगळा वास, चव निघुन जाते.

माहितीचा स्रोत:
आई

प्रतिक्रिया

महेश काळे's picture

24 May 2011 - 6:07 pm | महेश काळे

एकदम डीटेल...
करुन पहायला पाहीजे..

पण फोटु का नाय डकवले राव..??

सखी's picture

24 May 2011 - 7:08 pm | सखी

पा़कॄ वाचुनच दम लागला, करताना काय होत असेल... पण मस्तच लागत असतील. फोटु दिले असते तर अजुन अंदाज आला असता करताना आणि झाल्यावर कश्या दिसतात त्याचा.

शेवटचे जे वाक्य आहे - एवढा कुटाणा करुन केलेल्या पाटोड्या टिकत नाहीत हेच ते काय ते एक दुखणं!
त्या संध्याकाळपर्यंत सुद्धा रहात नाही.

ते पाटोड्या अगदी हटके असल्याने पटकन खाल्ल्या/संपवल्या जातात म्हणून की लवकर खराब होतात म्हणून? (फ्रिजचा उल्लेख म्हणून ही शंका)

निवेदिता-ताई's picture

24 May 2011 - 8:51 pm | निवेदिता-ताई

नुसते ऎकले होते ...आज कॄती वाचली...फ़ोटो पहायला मिळाला असता तर ????

निवेदिता-ताई's picture

24 May 2011 - 8:52 pm | निवेदिता-ताई

नुसते ऎकले होते ...आज कॄती वाचली...फ़ोटो पहायला मिळाला असता तर ????

प्रास's picture

24 May 2011 - 9:04 pm | प्रास

काही नीटसं समजलं नाही. कदाचित पाकृबरोबर फोटू नसल्याचा परिणाम असावा :-(

अन्या दातार's picture

24 May 2011 - 9:51 pm | अन्या दातार

गणपा, मृणालिनी तै, सानिकातै यांच्या पाकृंचा परिणाम आहे.
(यातून पियुशाला वगळल्या गेले आहे याची नोंद घ्यावी ;) )

पक्या's picture

24 May 2011 - 10:59 pm | पक्या

वा झकास !
अशा प्रकारच्या पाटोड्या नाही पण थापट्या वड्या, उंबरं, पुडाच्या वड्या खाल्या आहेत त्यामुळे अंदाज आहेच कशा लागतील.

>>>आता दोन्ही बाजुने या पोळीची एकेक पट्टी वाळावी पुन्हा त्यावर वरीलप्रमाणेच एकेक थर द्यावे. अशा रितीने पोळीच्या पट्ट्या वळवुन प्रत्येक फोल्डवर असे थर येतात. बेसनाची पोळी मोठी असेल तर एकावर एक असे ७ थर येतात. सर्वात शेवटी तिरप्या आकारात चाकुने छेद द्यावे.

हा भाग नीट समजला नाही. अजून थोडे स्पष्टीकरण दिलेत तर घरि करून बघता येतील.

धन्यवाद.

आर्या१२३'s picture

25 May 2011 - 10:09 am | आर्या१२३

धन्यवाद सर्वांना!
फोटो आहेत.. पण मिपावर मी नविनच आहे अजुन काहीच प्रकाशित केलं नव्हतं त्यामुळे फोटो कसे टाकावे कळत नाहिये.
:(

महेश काळे's picture

25 May 2011 - 2:28 pm | महेश काळे

इथे पहा..

http://www.misalpav.com/node/13573

आर्या१२३'s picture

25 May 2011 - 3:53 pm | आर्या१२३

धन्स महेशजी! तिथे लिहिलेल्या खालील प्रतिक्रियेसारखीच माझी गत झाली.

<<सकाळी हीच कृती तुम्ही सांगायच्या आधी करून पाहिली. जो फोटो डकवायचा होता तो आधीपासूनच एका फोटो ठेवण्याच्या साइटवर आहे. तिथून मी त्याची लिंक (यु आर एल) कॉपी - पेस्ट केली आणि इतर डीटेल्स भरले आणि प्रकाशित करा वर क्लिक केले. एक फुली आली फक्त.<<

खरोखरच एक फुली आली फक्त.

मासवड्या लई भारी.
फोटोशिवाय मजा नाही.

खान्देशी's picture

26 May 2011 - 2:46 pm | खान्देशी

एक नम्बर!!!!

गोगोल's picture

28 May 2011 - 6:27 am | गोगोल

पाणी सुटल

चटोरी वैशू's picture

21 Jun 2011 - 3:12 am | चटोरी वैशू

खरच...पाणी सुटले... बर्‍याच दिवसा पासुन शोधात होते हिच्या... आई मस्त बनवायची... धन्यवाद...