आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि थोडा पाऊस पण पडला. छान वाटले.
ऑफिस मधून जरा लवकर पळायचा विचार होता पण शक्य झाले नाही.
मी घरी आल्यावर थोड्याच वेळात ही पिल्लूला घेवून 'कन्या बसायला' शेजारी घेवून गेली. कारण सध्या इथे नवरात्री चालू आहेत न.
म्हटलं चला आज सौ.ला स्वयंपाकापासून आराम देवूया. काय बनवावे बरे......सोयाबीन वड्या दिसल्या. चला बुवा लोकांचे मटण………………….. बेत फिक्स .......
बाजूला भ्रमण ध्वनीवर 'गंध फुलांचा गेला सांगून' गाणं ऐकत होतो. मूड बनत गेला आणि त्याच बरोबर स्वयंपाकही.
जे काही बनवल्याचे चीज झाल्याचे मागाहून कळले. त्याची शिक्षा म्हणून बाहेर ५ फेऱ्या मारायला लागल्या का तर म्हणे आज जास्त जेवले गेले.
तर आता जास्तीचे पाल्हाळ आवरतो.
साहित्य: सुके खोबरे किसून आणि भाजून, जिरे, हळद, हिंग, मसाला, गरम मसाला, लसून, मिरच्या (तिखट खाणारे असल्यास अन्यथा फाटा देवू शकता), कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, मीठ आणि मोहरी (मी मोहरीचे तेल वापरतो १ टे. स्पू.).
महत्वाचे म्हणजे भिजवलेल्या सोयाबीन वड्या.
कृती : वरील सर्व साहित्य कांदा सोडून मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.थोडे थोडे पाणी टाकत वाटा.
कढईत दोन पळ्या तेल आणि १ टे. स्पू. मोहरीचे तेल टाका.थोडे तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा छानसार गुलाबी होईपर्यंत तळून घ्या.
आता ह्यात ठेचलेला लसून घाला.लसून तळल्याचा मंद सुवास यायला लागला कि मिक्सर मध्ये वाटलेले वाटण ह्यात घाला. मंद आचेवर वाटणाला तेल सुटेपर्यंत हळुवार तळून घ्या.
सुक्या खोबऱ्यामुळे आणि वाढीव तेलामुळे वाटण व्यवस्थित तळले जाते. एक मनमोहक सुगंध दरवळू लागेल.
आता ह्या वाटणात भिजवलेल्या सोयाबीन वड्या घाला.सुरवातीला पाणी न घालता त्यांना मस्तपैकी वाटणातच, त्यांच्यात वाटण भिनेपर्यंत ढवळा.
आता हळू हळू त्यात आवश्यक तितके पाणी टाका, स्वादानुसार मीठ टाकून एकवार ढवळून झाकण ठेवून एक वाफ काढा.
३/४ मिनिटातच भाजी तयार होईल कारण वड्या अगोदरच भिजवलेल्या आहेत. वरून आवडत असल्यास कोथिंबीर घाला.
तयार झालेला पदार्थ पोळी किंवा भाताबरोबर वाढा.
भात बनवून पुन्हा त्याचा जीराराइस बनवायचा कंटाळा येत असेल तर भात शिजवताना त्यात १/२ टे. स्पू. साजूक तूप आणि १ टे. स्पू. जिरे टाका, आणि नेहमीप्रमाणे भातासारखा शिजवा. तुम्हाला जीराराइस तयार मिळेल.
असो अश्या जीराराइसबरोबर खायलाही मजा येते.
तर चला मंडळी या जेवायला.
आवडला तर कळवा नाही आवडला तरीही कळवा.
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 1:35 am | शुचि
मस्त आली आहेत छायाचित्रे. वळवचा पाऊस आला सुरू झाला तर ...
12 Apr 2011 - 2:46 am | प्राजु
काचेच्या भांड्यातली भाजी आणि नंतरची भातावर घातलेली भाजी यांच्या रंगात तफावत दिसते आहे. असे का?
काचेच्या भांडयातल्या भाजीचा फोटोला फोटोशॉप मध्ये रंगरंगोटी केलेली आहे का?
असो.. रेसिपी छान. आवडली.
12 Apr 2011 - 3:03 am | गणपा
बहुतेक फ्लॅश ची करामत असावी ती. दुसर्या भाता बरोबरच्या फोटोत फ्लॅश वापरला नसावा.
12 Apr 2011 - 3:23 am | सानिकास्वप्निल
करून बघते :)
12 Apr 2011 - 5:14 am | पंगा
सोयाबीन वड्या म्हणजे बुवा लोकांचे मटण कसे काय बुवा?
बुवा लोक सोयाबीन वड्यांचे बनलेले असतात काय?
12 Apr 2011 - 9:00 am | प्यारे१
तुम्हाला नाही कळायचे ते....
-तथाकथित पांडित्याचा अभिमान मिरवणार । नको तिथे नको ते प्रश्न विचारणार।
नसलेल्या अकलेचे तारे तोडणार। 'नंतर' ब्रह्मराक्षस होणार निश्चित॥
12 Apr 2011 - 9:13 am | ज्ञानोबाचे पैजार
बुवा लोकांचे मटण, म्हणुन घाबरत घाबरत धागा उघडला, म्हटले आता काय पाहावे लागते आत कोणास ठाउक,
पण हा तर शाकाहार निघाला,
पाकॄ सोपी आणि झकास आहे करायलाच पाहीजे
पैजारबुवा,
12 Apr 2011 - 9:17 am | यशोधरा
मस्त दिसतोय सोयाबीन रस्सा.
12 Apr 2011 - 2:47 pm | मराठमोळा
सोयाबीनच्या वड्या आवडत नाहीत.
पण पाकृ आणि फोटु पाहुन खाण्याची ईच्छा नक्कीच झाली. :)
12 Apr 2011 - 2:57 pm | llपुण्याचे पेशवेll
मला सोयाबीन वड्या भयंकर आवडतात. हा पदार्थ तर जीव की प्राण. मस्तं लागतो फार.
12 Apr 2011 - 3:06 pm | मुलूखावेगळी
पुपे, तु नानव्हेज वाला आहेस का?
मला तर हे रबर शिजवल्यासारखे वाटते
12 Apr 2011 - 3:03 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा उत्तम.
मला मात्र सोयाबीन, पनिर, मश्रुम ह्या पदार्थांची तिडीक आहे :(
12 Apr 2011 - 3:09 pm | विजुभाऊ
माताय कोंबड्याचे , बकर्याचे मटण ऐकून होतो.
बुवाचे लोकांचे मटण हा नवाच पदार्थ निघाला
इरसाल भाय त्या दिवशी मी तुझ्या कडे खाल्ले त्याची रेशीपी टाक ना एकदा.
एकदम भन्नाट झाले होते
12 Apr 2011 - 3:49 pm | बिपिन कार्यकर्ते
अप्रतिम! आणि मुख्य म्हणजे खाऊ शकतो! ;)
12 Apr 2011 - 5:22 pm | रेवती
चांगली पाकृ.
फोटूही छान आलेत.
सोया वड्या भिजवल्यानंतर पिळून भाजीत घालायच्या का?
12 Apr 2011 - 6:37 pm | ५० फक्त
+१ टु मुवे अगदि योग्य वर्णन केलं आहेस. रबर शिजवल्यासारखे. मी पण कधीच खाउ शकणार नाही हा प्रकार.
हेच मटण सोयाबिन न घालता शाकाहारींसाठी करता येईल काय ?
12 Apr 2011 - 6:45 pm | इरसाल
सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
@ परा.... साहेब एकदा खावून तर बघा मग सांगा. हीच भाजी पाणी न घालता कोरडी केलीना तर चखणा म्हणून पण टकाटक.
@विजुभाऊ .. तुम्हाला ठाणे कट्ट्यावर पाहून दचकलोच मी, म्हटलं दिल्लीत होते ठाण्याला कसे ? वेळ काढून नक्कीच ती पाक्रु टाकेन नक्की. घरी पुन्हा कधी येताय.
@रेवती ..बरोबर, ते लिहायचे विसरलो कि वड्या पिळून टाकायच्या नाहीतर रस्सा अंदाजापेक्षा पातळ होतो व चव जाते कधी कधी.
@मुलखावेगळी ... हे शिजवलेले रबरपण चविष्ट लागते हो. जमल्यास खोबर्या ऐवजी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून कोरडी किंवा ओली करून पहा.
शुची, प्राजू, पंगा, सस्व, पुपे. बिका, यशो, ममो, ज्ञापै, प्यारे सगळ्यांना धन्यवाद. अरे गुरुवर्य राहिलेच होते क्षमा क्षमा गुरुदेव.
13 Apr 2011 - 1:48 am | गणपा
+१
इरसालाशी सहमत.
15 Jun 2014 - 4:43 pm | चाणक्य
इरसाल, मागच्या विकांताला गणपाशेठच्या या पदार्थाबरोबरच तुमचा हा पदार्थही करून पाहिला. चांगला झाला होता, आवडला घरी सगळ्यांना. धन्यवाद
15 Jun 2014 - 7:49 pm | मुक्त विहारि
आवडली.