धुक्यात हरवलेला तैलबैला

जातीवंत भटका's picture
जातीवंत भटका in कलादालन
7 Mar 2011 - 3:55 pm

धुक्यात हरवलेला तैलबैला

पावसाळ्यातला एकही विकएन्ड घरी बसायचे नाही असा विडाच उचलला असल्याने येत्या शनिवार-रविवार तैलबैल-घनगड असा बेत आखला होता. कमी जास्त होत होत अखेरीस ९ शिलेदार तयार झाले. आमच्या कुठल्या ट्रेकमधे व्यत्यय आला नाही, असे झाले तर शपथ !! ५ जुलैच्या भारत बंदचा वचपा आमच्या कंपनीने शनिवारी "वर्कींग" ठेऊन काढला होता. माझ्या मॅनेजरशी आधीच बोलून मी अर्धी रजा मिळवली. लाल डब्याच्या वेळापत्रकात आम्ही बसू शकणार नव्हतो म्हणून स्वता:च्या कारने जायचे असे मी आणि लकीने ठरवून टाकले. लकी आणि रिंपल आपापल्या कार आणणार होते.
सगळ्यांनी दुपारी २.३० ला चांदणी चौकात भेटायचे नक्की केले. मी आणि अश्विनी दुपारी १.३० ला माझ्या ऑफीसवरून निघालो खरं पण कदाचित मुहूर्त वाईट असावा, आमची बाईक आपटे रस्त्यावरच पंक्चर झाली. रिंपल आणि तिची बहीण विशाखा आमची वाट पहात म्हात्रे पुलाजवळ थांबल्या होत्या. त्यांना परिस्थितीचा अंदाज आला आणि त्यांनी फावल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी हॉटेल निसर्ग कडे मोर्चा वळवला. तिकडे श्री. व सौ. लकी बाकीच्या तिघा नगांना (प्रशांत, निलम आणि प्रियांका) घेऊन केव्हाच चांदणी चौकात पोहोचले होते. त्याचे सारखे फोन येत होते.
अखेरीस बर्‍याचश्या शिव्या खाऊन मी, अश्विनी आमची सारथी रिंपल आणि विशाखा ३ वाजता चांदणी चौकात पोहोचलो. मघाचच्या राहीलेल्या काही फुल्या फुल्या गुमान पदरात घेत आम्ही लोणावळ्याकडे कूच केले. रिंपलच्या काही (तिच्या मते नॉर्मल) ओव्हरटेकींगमूळे मला जवळपास घेरी आली होती, पण मी दर मिनीटाने "सावकाश" म्हणण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. आमच्या कार मधल्या प्रत्येक जण तिला जमेल तसे ड्रायव्हींगचे धडे देत होता. पुण्याहून निघाल्यापासून हुलकावणी देणार्‍या पावसाला अखेरीस आम्ही कामशेत जवळ गाठलं. रिंपल आता बर्‍यापैकी सरावली होती.

लोणावळ्यात थोडे ट्रॅफिक जाम होते. तिथे अडकलो असताना काही लोकांचा (?) गाडीतून उतरून चिक्की घेण्याचा हेतू मी हाणून पाडला आणि भूशी डॅमकडे वळालो. आय.एन्.एस. शिवाजीचा डॅम दिसताक्षणी दोन्ही गाड्यांना मी न सांगता ब्रेक लागले आणि खाली उतरण्या आधीच "मला भुट्टा... मला चहा..." अश्या आरोळ्या येऊ लागल्या. महीला मंडळाने तर चक्कं तिथे असलेल्या "टोराटोरा" मधे बसण्याचाच हट्ट धरला (लकीसुध्दा त्यांना सामील झाला होता), पण तिकिट "इतकं महाग का ??" याविषयी थोडा वाद घालून मंडळी भुट्टयाच्या गाडीजवळ स्थिरावली. खानपान झाल्यावर गाड्या लायन्स पॉईंट्च्या दिशेने हाकल्या. घाट चढून थोडं वर येताच आम्हाला धुक्याने चांगलंच घेरलं, इतकं की समोरचं १० फुटांपलीकडलं काहीच दिसत नव्हतं. या वेळेस मात्र अगदी मुंगीनेही रिंपलला ओव्हरटेक केलं असतं. मी दर दोन मिनीटांनी गाडीची काच आतून, बाहेर हात काढून पुसत होतो.
घुसळखांब सोडल्यावर धुकं थोडं कमी झालं. मी फोटोसाठी गाडी थांबवताच बरीचशी मंडळी आपापल्या लघूशंका दूर करण्यासाठी झाडीत पळाली. धुक्याने भरलेल्या त्या पोकळीस दुभंगत जाणारी ती डांबरी सडक फारच मोहक दिसत होती. कोरिगड आणि अ‍ॅम्बी व्हॅली डाव्या हाताला ठेऊन आम्ही साळतर कडे निघालो. ज्या रस्त्याला मघाशी नावाजत होतो त्यालाच शिव्या घालण्या इतका तो खराब होता, पण आजूबाजूचा निसर्ग अजूनच खुलत चालला होता. पण माझं लक्ष तिकडे नव्हतंच. ७.३० झाले होते आणि अंधार पडायच्या आत साळतर खिंड पार करुन तैलबैल ला पोहचायचे होते.

तैलबैलला पोहोचलो तेव्हा अंधार झालाच होता. गावतल्या मारूतीच्या मंदिरासमोर गाडया लावल्या आणि पाऊस सुरु झाला. मंदिराच्या चाव्या आणण्यासाठी बाजूच्याच घरात शिरलो. तिथल्या मावशींनी चाव्यांसोबत हंडाभर प्यायचे पाणीसुध्दा दिले. मंदिर अगदी स्वच्छ आणि ऐसपैस होते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था स्नेहा आणि लकीने घेतली होती. त्यांनी पुलाव करण्यासाठी स्टोव्ह पेटवला आणि इकडे आमचा गाण्यांचा कार्यक्रम सुरु झाला. थोड्या वेळाने पुलावाच्या सुगंधाने मंदिर भरून गेलं आणि आम्ही सगळे न सांगता आपापल्या ताटल्या काढण्यासाठी सॅककडे पळालो. मग काय !! सगळीकडे एकदम शांतता !! प्रत्येकजण त्या पुलावात गुंतला होता. थोड्या वेळाने मग "व्वा", "छान", "झक्कास जमला आहे हां पुलाव" वैगरे शब्द फुटू लागले. एकदाची क्षुधाशांती झाल्यावर सगळे अंथरूणावर पडल्या पडल्या मागील ट्रेकमधल्या गमतीजमती आठवून हसत होते. पुन्हा एक गाण्यांचा राऊंड मारून निद्रादेवीच्या आधीन झालो.
पहाटे सहाच्या आसपास मंदिराच्या पुजा-याने घंटा वाजवून आम्हाला जागे केले. डोळे किलकिले करुन बाहेर पाहिलं तर सगळीकडे धुकं पसरलं होतं. आळोखे पिळोखे देऊन थोडं अंग मोकळं केलं आणि बाहेर येऊन त्या धुक्याच्या दुलईत शिरलो. हवेत बराच गारवा होता. चालत चालत गावाबाहेर ओढ्यावर पोहोचलो आणि सहज मागे वळून पाहीले तर तैलबैल्याची ती कातळभिंतसुध्दा आमच्याकडे डोकं वर करून पहात होती, आम्हाला खुणावत होती. ट्रेकमधल्या त्याच्या पहिल्याच दर्शनाने आम्ही सुखावून गेलो. प्रातर्विधी उरकून मी आणि प्रशांत चहाच्या तयारीला लागलो.

कधी नव्हे ते महिला मंडळाने तोपर्यंत सगळं मंदिर स्वच्छ करुन ठेवलं होतं. चहा आणि न्याहारी उरकून बाहेर आलो तोच मंदिराच्या अंगणातच गावातल्या बच्चेकंपनींची फ़ुटबॉलची मॅच सुरू होती. झालं~~ !! मग काय आम्हा पुणेकरांची एक टिम आणि गावातल्या मुलांची एक टिम. तास दोन तास आम्ही सगळे जसे जमेल तसे त्या फ़ुटबॉलवर पाय साफ़ करत होतो. ठराविक अंतराने कोण ना कोण घसरून पडत होता. विशाखाने तर ऎन्ट्री मारल्या मारल्या जणू काही आपण स्केटीग खेळत असल्याच्या आविर्भावात त्या बॉलला अशी काही किक हाणली की तिचे दोन्ही पाय हवेत गेले आणि धापकन जमिनीवर आपटली.त्या बालचमूंसोबत आम्हीही आमचे हसू दाबून खेळ सुरू ठेवला. दुसरीकडे अश्विनी कुठल्यातरी दाक्षिणात्य गाण्याला शोभेल असा काहीसा नाच करित त्या फ़ुटबॉल मागे धावत होती. ही सगळी मजा पहायला हळूहळू गर्दी वाढू लागली तसे आम्ही जरा आवरते घेतले.
त्या फ़ुटबॉलच्या नादात बराच वेळ गेल्याने मी आणि लकीने घनगड पुढच्यावेळी करू म्हणून राखून ठेवला. आता आम्हाला अगदी निवांत वेळ होता. सगळं सामान गाड्यांमधे भरुन पाण्याच्या बाटल्या, थोडा खाऊ आणि प्रथमोपचाराची पेटी एका बॅगेत टाकून आम्ही तैलबैल्याच्या त्या मोहक कातळभिंतीकडे कूच केले. सोबत तैलबैल फ़ुटबॉल टिमचा कॅप्टन अविनाश हा सुध्दा आम्हाला येऊन मिळाला. तो आम्हाला वाट दाखवणार होता.

कातळभिंतीचा आणि धुक्याचा लपाछपीचा खेळ सुरूच होता, मधे एकदा दोनदा थोडं धुकं हटलं आणि मला सुरेख फोटो(?) मिळाले. भिंतीच्या थोडंअलिकडे एक अगदी छोटा असा उंचवटा आहे. अविनाशच्या मते त्याचं नाव "ब्राम्हण" आहे. (त्याने सांगितलेलं कारण न सांगणे मला जास्त योग्य वाटते !! ) मग त्या ब्राम्हणावर चढून मी आणि अविनाशने एक झक्कास फ़ोटो काढून घेतला आणि भिंत उजव्या हाताला ठेऊन खिंडीकडे मोर्चा वळविला.

खिंडीत पोहोचताच जोरदार पावसाला सुरूवात झाली. वाराही बेफ़ाम होऊन मनोसक्त पावसाच्या सरी उधळत होता. मला माझ्याच कवितेतलं एक कडवं आठवलं.
"भन्नाट पाऊस
भन्नाट वारा ...
भन्नाट जगण्याला
त्यांचा भन्नाटच सहारा ..."
त्याक्षणी या ओळी ख-या अर्थाने आम्ही जगत होतो.

थोडे फ़ोटो काढून झाल्यावर तिथल्याच मोकळ्या जागेत चक्क कब्बडीचा डाव सुरू झाला. मी तर अगदी जोशात आलो होतो, इतका की प्रशांतला पकडीत घेताना त्याच्या टी-शर्टची एक बाही पार फ़ाडून टाकली. सामना अतिशय रंगात आला असताना प्रियांकाने केलेल्या चिटींगमुळे त्यांचा संघ बाद झाला आणि आम्हाला निर्विवाद विजय मिळाला.
(विजयी संघ : अमोल, रिंपल, नीलम अश्विनी) वि.वि. (पराभूत संघ : प्रशांत, स्नेहा, विशाखा, प्रियांका).

परत येताना वाटेत पुण्याचाच एक ग्रुप भेटला मग "तुम्ही कुठून आलात ?? तुमचा ग्रुप कोणता ?? ..." सारख्या ठरलेल्या प्रश्नांची देवाण-घेवाण उरकून आम्ही गावात परतलो.
तिथला हिरवागार निसर्ग, मोहवणारं धुकं आणि मनाला भुरळ पाडणारी ती अफ़लातून भिंत या सगळ्यांना मागे सोडून परत यायला मन तयारच होत नव्हतं. शेवटी मुळशी मार्गे पुण्याला जायच्या आमिषावर तयार होऊन आम्ही तैलबैला सोडलं ते याच पावसाळ्यात परत यायच्या बोलीवर !!!

प्रवास

प्रतिक्रिया

जातीवंत भटका's picture

7 Mar 2011 - 3:59 pm | जातीवंत भटका

नमस्कार मंडळी !!

मी अमोल नाईक ( जातीवंत भटका ) मिपाचा नवा सदस्य आहे. तसा मिपाचा खुप आधीपासून वाचक होतो, सदस्यत्व आत्ताच मिळाले.
मिपावर हा माझा पहिला लेख आहे.
आपल्याला कसा वाटला जरुर कळवा,

आपला विश्वासू
जातीवंत भटका.

च्याय्ला, हे खांणं बनविणारी माणसं नि बाया आधी जळवत होती, मग त्यात जिप्सी आणि वल्ली आले, हे फिरवा फिरवी करुन ज़ळवाय्ला
आणि त्यात आता तुझी भर.

आता काय म्हणु, तुला रे फोटो आणि लिखाण दोन्ही आवडलं.

अमोल केळकर's picture

7 Mar 2011 - 4:19 pm | अमोल केळकर

स्वागत !!
अशीच भटकंती बघायला मिळू दे !!

अमोल

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2011 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या नाईकशेठ.

फोटू आवडले एकदम.

एकूण एक फोटू... जबर्या

साहेब, फोटो अजून मोठे टाकले असतेत तर अजून मजा आली असती
असो, एकदम झकास

धमाल मुलगा's picture

7 Mar 2011 - 5:22 pm | धमाल मुलगा

एकतर तैलबैलासारखा कडक ट्रेक, त्यात डामचाडाव पाऊस, वर सणसणीत धुकं...आयला! आणखी काय पाहिजे राव...जंदगी जंदगी म्हणतात ती हीच रे बाप्पा!

लढ बाप्पू...एक नंबर. फोटो तर फोटो, वर्णनही भारी. :)

चला, मिपाकरांमधल्या भटकवेताळांत आणखी एकाची भर पडली. ब्येस काम झालं. :)

येलकम रे मित्रा! :)

प्रास's picture

7 Mar 2011 - 7:39 pm | प्रास

जातीवंत भटक्याचे मिपावर स्वागत!

नाईक साहेब, फोटू नि वर्णनं भन्नाट!!

आवडलं.....

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Mar 2011 - 8:21 pm | बिपिन कार्यकर्ते

नमस्कार हो बापूसाहेब!
मिपावर स्वागत. :)

फोटो आणि लेखन एकदम झक्कास. अप्रतिम दिसतोय तैलबैला. अजून येऊ द्या हो असेच काहीकाही. मजा येईल.

अवांतर: हाच तो ऐतिहासिक ट्रेक का? :)

विकास's picture

7 Mar 2011 - 9:33 pm | विकास

मिपावर स्वागत!

फोटो एकदम जबरा आणि लेखनही मस्त!

मला माझ्याच कवितेतलं एक कडवं आठवलं.

इथं ती कविता टाका की! :-)

प्रचेतस's picture

7 Mar 2011 - 9:52 pm | प्रचेतस

तैलबैला एकदम जबरीच आहे. फोटू आणि वर्णन झकास.
त्या साळतर खिंडीत कुठल्याही ॠतूत जा, ती गच्च हिरवाईने नटलेलीच असते कायम.

मुळशीवरून पिंपरी-भांबर्डे मार्गे पण साळतर खिंडीत यायला एक अफलातून रस्ता आहे. एकदम व्हर्जिन, नितांतसुंदर, सह्याद्रीच्या कडेकडेने जाणारा.

धमाल मुलगा's picture

7 Mar 2011 - 9:58 pm | धमाल मुलगा

तू बोलत रहा रे.

मी इथं बसलोय वेंट्र्या करत. नंतर आपण गेलो नाय तर मग सांगतो तुला.

-(चित्रगुप्ताचा अशिस्टन) धमालगुप्त.

प्रचेतस's picture

7 Mar 2011 - 10:03 pm | प्रचेतस

आपणच जाउ या, बाईकांवर टांग टाकायची आणि सुटायचं ताम्हिणी घाटाकडे मुळशीत आणि तिथून लोणावळा गाठायचा. हाय काय अन नाय काय...!

जातीवंत भटका's picture

8 Mar 2011 - 11:59 am | जातीवंत भटका

मला पण सांगा गड्याहो.... मी पण येईन परत :)

प्रचेतस's picture

8 Mar 2011 - 12:01 pm | प्रचेतस

अगदी अगदी

म्या बी... वल्ली...
वगळुन नाय जमायचं.. धमु बघ रे....

जातीवंत भटका's picture

8 Mar 2011 - 11:13 am | जातीवंत भटका

एकदम झक्कास आहे तो रस्ता.. त्याच रस्त्यावर छायाचित्रकारांचा स्वर्ग असलेला सिक्रेट लेक आहे. आणि अंधारबन घाटाचे प्रवेशद्वार सुध्दा... तो सगळा परिसर मंत्रमुग्ध करुन टाकणारा आहे.

बेसनलाडू's picture

7 Mar 2011 - 11:25 pm | बेसनलाडू

फोटो, वर्णन दोन्ही मस्त! एकदा तेथे नक्की जाऊन येणार!
(भटका)बेसनलाडू

Manish Mohile's picture

7 Mar 2011 - 11:27 pm | Manish Mohile

सुरेख फोटो. पावसाळ्यातील हिरवीगार वनश्रीचं सौंदर्य काही वेगळचं असतं.

असेच भटकत रहा आणि आमच्या सारख्या सह्याद्री पासून दूर गेलेल्या मंडळींना सह्याद्रीचं देखणे दर्शन घडवा.

फोटो दिसत नाहियेत राव .. काय तरी करुन फोटो नविन परत द्या राव ...

प्राजु's picture

7 Mar 2011 - 11:58 pm | प्राजु

लेख आणि फोटो ... एकदम मस्त!! धुक्यात हरवलेला कडा तर.. खूप छान.

अप्पा जोगळेकर's picture

8 Mar 2011 - 12:04 am | अप्पा जोगळेकर

मस्त ट्रेक आहे. लागलिच सवाष्णे घाटाने उतरला असतात तर आनखी मजा झाली असती. पण त्यासाथि रापम पाहिजे. गाडि घाटावर असताना घाट उतरणार कसा नाहीतर?

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 2:51 am | विनायक बेलापुरे

मस्त ट्रेक आहे . उभी भिंत पाहीली की हरवून जातो.
छान लिहीलाय अनुभव आणि फोटो सुद्धा. :)

चित्रा's picture

8 Mar 2011 - 5:07 am | चित्रा

भयंकर हेवा.. आणि हे असले फोटो पाहिले की हमखास नॉस्टॅल्जिक व्हायला होते. माळशेज घाटातही असेच धुक्याने वेढलेले डोंगर दिसतात.

लई भारी. करा, मजा करा. पदार्पणातच सुंदर लेख लिहील्याबद्दल अभिनंदन.
स्वागत आहे. अजून अशाच अनेक भ्रमंत्या करा आणि लेख लिहा.

माळशेज घाटातही असेच धुक्याने वेढलेले डोंगर दिसतात.

बरोब्बर...
हरिश्चंद्रगडावर मॉर्निंग मॉर्निंग जायचं...

सखी's picture

8 Mar 2011 - 10:42 pm | सखी

चित्रासारखेच म्हणते. पण तुमच्या फोटो, लेखातुन आम्हालाही सह्याद्रीचे दर्शन घडवा ही विनंती.

जातीवंत भटका's picture

9 Mar 2011 - 12:39 pm | जातीवंत भटका

लवकरच घेऊन येतो आहे... कोसळत्या सरींचा राजमाची ...

कोसळत्या सरींचा राजमाची ...

वा क्या बात है!! जरुर लिहा, आम्ही वाचायला उत्सुक आहोतच :)

रेवती's picture

11 Mar 2011 - 5:37 am | रेवती

जाहिरातबाजी.;)

सहज's picture

8 Mar 2011 - 6:28 am | सहज

नाईकसाहेब मिपावर स्वागत व पहील्या लेखाबद्दल अभिनंदन!

सगळेच फोटो छान. फोटो क्रमांक ७ फार मस्त आहे!

पु.ले.शु.

जाताजाता : मिपाचे जेष्ठ व तज्ञ गिर्यारोहक विमुक्तसाहेब बरेच दिवसात दिसले नाहीत. त्यांनी लवकर दर्शन द्यावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2011 - 8:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाईकसेठ, मिपावर स्वागत आहे. फोटो आणि वर्णन लै भारी.....!

-दिलीप बिरुटे

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2011 - 9:13 am | नगरीनिरंजन

फोटो आणि वर्णन दोन्ही खूपच छान!
अवांतरः भुट्टा म्हणजे कणिस का?

वपाडाव's picture

8 Mar 2011 - 10:33 am | वपाडाव

मी हे नाव पहिल्यांदीच ऐकले.
पण वर्णन लै भारी.. फटु चान..

मनराव's picture

8 Mar 2011 - 12:12 pm | मनराव

अप्रतिम.........

अमोल, सर्वात पहिले मिपावर स्वागत !!

फोटो आवडले आणि वर्णनही !!

इन्द्र्राज पवार's picture

8 Mar 2011 - 10:27 pm | इन्द्र्राज पवार

अमोल....

पदार्पणातच तुम्ही इथे शतक झळकवणार अशीच (सु) चिन्हे दिसत आहे. अप्रतिम फोटो हे तर सांगण्याचीही आवश्यकता नाही, तरीही अशासाठी लिहित आहे की त्या दृष्यांतील हिरवाईचा ताजेपणा मन मोहवून टाकतो.....क्रमांक तीनचा फोटो तर कॉम्प्युटरसाठी "वॉलपेपर" म्हणून घ्यावा इतका मोह होतोय इतका तो सुंदर आहे. एका कड्यावरचा जोडीचा तर चक्क 'आर.के.फिल्म्स बॅनर' च वाटते....रीअली !

सहलीचे वर्णन तर जातिवंत लेखकाने केल्यासारखे उतरले आहे.

वेलकम...!

इन्द्रा

किल्लेदार's picture

10 Mar 2011 - 12:05 am | किल्लेदार

हाच तैलबैला कोरडाठण् असताना बघा कसा दिसतो.

IMG_0074

IMG_0122

IMG_0141

IMG_0155

वर्णन छानच. फोटू तर जीवघेणे आहेत.
पावसाळ्यातला निसर्गाचा हिरवेपणा टवटवीत दिसतो.
फार म्हणजे फारच छान.
आम्हालाही लोणावळ्याच्या घाटातून जाताना असेच कुठले कुठले गड किल्ले दिसत असतात.
पण माझी धाव तेवढे बघण्यापुरतीच!;)

फोटो छानच पण वर्णन त्याहूनही खूपच अप्रतिम..
बरा मेळ बसतो तुमचा फिरण्यासाठी....
आमच्याकडे कुणी असल्या फंदात पडत नाही...
खूपच छान