खुबे हे खाडीच्या दलदलीत (चिखलात) सापडतात. खुबे पकडण्यासाठी खुबे पकडणारी माणस लाकडी फळी घेउन चिखलात उतरतात. फळीवर गुडगे ठेउन फळीचा आधार घेउन हे खुबे गोळा केले जातात. ह्या खुब्यांची शिंपली सारखी पांढरी शिंपली आपल्याला समुद्र किनारी सापडतात. कदाचीत ते समुद्रातील खुबे असतील. त्याच्या बाहुल्या, तोरणे बाजारात मिळतात. दलदलीच्या ह्या टाकलेल्या शिंपल्यांना आम्ही लहानपणी भातुकलीच्या खेळात चुल करण्यासाठी घ्यायचो. तसेच भांड म्हणूनही खेळ करायचो. तिन शिंपल्या तिन टोकांना एकत्र लावुन ह्याची चुल करायची व वरती एक शिंपलि भांड म्हणून ठेवायची.
लागणारे साहित्य:
खुबे
२ कांदे चिरुन
लसुण सात-आठ पाकळ्या ठेचुन
हिंग, हळद
मसाला १ ते दोन चमचे
अर्धा चमचा गरम मसाला
१ टोमॅटो चिरुन
थोडी कोथिंबीर
मिठ
तेल
पाककृती:
चिखलात सापडल्यामुळे ह्याच्या कडांमध्ये थोडी माती असते म्हणून खुबे ६-७ पाण्यांतुन स्वच्छ धुवुन घ्यावेत . वरुन दिसायला काळे, चिखल भरलेले असले तरी आतील गोळा स्वच्छ व चविष्ट असतो.
खुब्यांच्या लेवलच्या थोड कमीच पाणी घेउन ते उकडून घ्यावेत. नातीतर महापुर येईल ओट्यावर.
पाणी एवढ्यासाठी कमी टाकतात की उकळल्यावर भाताप्रमाणे ह्याचा फेस वरती येतो व पाणी जास्त झाले तर भांड्यातुन खाली जातो. आणि आपल्याला ओटा पुसण्याचे अजुन कष्ट ताबोडतोब करावे लागतात.
खुबे उकडले की काही खुब्यांची तोंडे आपोआप उघडतात. हा गर असाचही खाता येतो. (लहानपणीचे स्वानुभव, अजुनही मी लहानच आहे. बर्याचदा उकडलेले तोंडात टाकते)
आता उकडलेल्या खुब्यांमधिल पाणि काढुन टाकायचे व थोड्या वेळाने खुब्याचा गर काढुन घ्यायचा. (ह्यांच्या जागी मोती असते तर ?)
जे मिटलेले असतात त्यांना दोन बोटांनी बाजुला सारुन त्यातील गर काढता येतो. थोडे कडकच असतात शिंपले. पण जे जोर लावुनही निघत नसतील असे खुबे खोलण्याचा प्रयत्न सोडून द्यायचा (नाहीतर उगाच वरवंट्याने फोडाल)कारण त्यात माती भरलेली असते. जर खुबे मोठे असतील तर ते विळीवर चिरुन घ्यावेत. कधी कधी ह्या खुब्यांमध्ये चिंबोर्याच पिल्लुही असत त्याच्या सोबतीला ते असेल तर काढुन टाकायच.
आता भांड्यात तेलावर लसुण फोडणीला घालायचा व त्यावर कांदा घालुन चांगला बदामी रंग येउ द्यायचा. मग त्यावर हिंग, हळद, मसाला घातुन थोड परतवुन टोमॅटो घालायचा. टोमॅटो परतवुन खेब्यांचे गर, गरम मसाला, मिठ, कोथिंबीर घालुन परतायचे.
झाकण ठेउन टोमॅटो थोडा शिजु द्यायचा (खुबे आधी उकडतो तेंव्हाच शिजलेले असतात). मग परत एकदा परतुन गॅस बंद करायचा. अजुन तिखट हवे असल्यास टोमॅटो घालताना मिरची मोडून घालायची. वासही चांगला येतो. लहान मुलांना तर हे खुपच आवडतात.
अधिक टिपा:
खुब्यांमध्ये कॅल्शियम भरपुर असते. तसेच हे पचायलाही थोडे जडच असतात. खुब्यांचे कालवणही करतात. त्यात आलकोलही घालतात. पण सुकेच जास्त चांगले लागतात.
प्रतिक्रिया
11 Jan 2011 - 1:17 pm | गवि
चविष्ट दिसतोय पदार्थ.. तिसर्या आणि यात काही फरक आहे का?
ट्राय केलेच पाहिजे. विशेषतः उकडून झाल्यावर शिंपलारुपी कवच आधीच काढून फक्त आतला भाग वापरल्याने ते घासाघासाला शिंपले खरवडून बाजूला टाकणे हा प्रकार यात दिसत नाही.
एरव्ही सुके / कालवण यामधेही ते शिंपले तसेच ठेवलेले दिसतात.
मस्त पाकृ.
शेवटी दिलेल्या माहितीनुसार यातही मद्य घालतात हे ऐकून थक्क झालो.
11 Jan 2011 - 1:20 pm | सहज
जागुतै प्रयोग म्हणुन यात थोड्या भाज्या (गाजर, घेवडा, सेलरी) वेगळ्या शिजवून घेतलेल्या नूडल्स, भाजी करताना अंडे फोडून परतून, असे काही केले तर वन डिश मिल होउन जाईल!
11 Jan 2011 - 1:23 pm | गवि
+१
एकदम सही.
पण घेवडा नको वाटतो बुवा... बाकी काही चालेल.
पास्ताही होईलसे वाटते.
11 Jan 2011 - 1:32 pm | विजुभाऊ
जागु तै तुमच्या कडे क्लास लावायला हवा. अस्सल मत्स्यगोत्री आहात.
आमच्या सारख्या "शाह" आडनावाच्या माणसाना हा पदार्थ कुठे खायला मिळेल? बहुतेक कुण्या मित्राकडे शेफ म्हणून जाउन करावा लागेल
" स्वतःच्या घरात केला तर कायमचे घर सोडावे लागेल "
11 Jan 2011 - 1:39 pm | नंदन
ओली मिरची घालून तिसर्यांच्या एकशिपीसारखी पाकृ माहीत होती, पण हीदेखील मस्तच.
अवांतर - तिसर्या आकाराने अधिक लहान, पण जास्त चविष्ट (हे वैयक्तिक मत :)). खुबे म्हणजे बहुतेक क्लॅम्स असावेत.
11 Jan 2011 - 1:53 pm | गणपा
नंदनच्या आवांतराशी सहमत.
एकुणच हा प्रकार फार चवदार असतो आणि तसा तो दिसतोय ही. :)
कांद्यात टाकुन याची भजीपण मस्त लागते.... पण सध्या कांदा डोळ्यातुन पाणी काढतोय त्यामुळे या बद्दल न बोललेलच बर.
11 Jan 2011 - 1:58 pm | विंजिनेर
ह्याची पूर्वेकडे एक फर्मास व्हरायटी करतातः
खुबे + भात + थोडी कांद्याची पात + किंचित लसूण (ओला असेल तर छान) असा स्ट्यु बनवतात.
थंडीच्या दिवसात - बाहेर बर्फ पडत असाताना वाफाळता स्ट्यु भुरकणे म्हणजे एकदम परब्रम्ह
शिवाय खुब्यांची अस्सल चव उतरते ते वेगळेच(मसाल्यांची गरज नाही :) ).
11 Jan 2011 - 2:04 pm | टारझन
पाकक्रुती एकदम फर्मास... ह्या प्रकाराला खुबे म्हणतात हे माहित नव्हत. नविन आणि अनोखी पाककृती बद्दल धन्यवाद जागु ... बाकी गमनबिहारींसारखे जाणकार यावर अधिक प्रकाश टाकतीलंच .
- छानफिशकरी
11 Jan 2011 - 2:10 pm | जागु
गगनविहारी तिसर्यांच्या शिंपल्या पुर्ण गुळगुळीत असतात. शिवाय त्यांचे गोळे पांढरे व असतात. खुबे मध्ये काळे आणि बाजुला ऑरेंज असतात.
सहज सिमला मिरची, बटाटा चांगला लागतो खुब्यांमध्ये.
विजुभाऊ मला साईडबिझनेस चांगला आहे. आणि तुम्ही एकदा तुमच्या घरातल्यांना खाउ घाला म्हणजे चव लागली की ते तुम्हाला खाऊ घालतील.
नंदन ही एकशिंपी नाही घेता येत कारण शिंपलीच्या बाहेरचा भाग मळकट असतो.
गणपा वरच्या रेसिपीत कांदा आहेच. डोळ्यातल पाणी पुसत पुसत टाकला.
11 Jan 2011 - 5:37 pm | गवि
एक मात्र नक्की की याची काहीजणांना जबरदस्त अॅलर्जी असू / येऊ शकते.
तेव्हा ते ध्यानात ठेवून ट्राय करावे.
11 Jan 2011 - 8:49 pm | स्पंदना
पाहिलय पण खाल्ल नाही कधी.
जागुताई की जय. नेक्स्ट टाइम देखेगा तो आपकी खातिर जरुर चखेगा.
11 Jan 2011 - 9:34 pm | स्वाती२
झकास ग जागू! इथे कधी दिसले नाहित त्यामुळे नुसत्या फोटोवरच समाधान!
12 Jan 2011 - 11:44 am | जागु
गगन विहारी म्हणून मी लेखात ती टिप दिली आहे.
अपर्णा स्वाती धन्स.
13 Jan 2011 - 5:21 pm | Shubhangi Pingale
एकदम झकास
14 Jan 2011 - 7:51 am | प्राजु
धन्य आहेस जागु!!
हे सगळे प्रकार मी दूर दूर पर्यंत सुद्धा चाखलेले नाहीयेत. केवळ पाप्लेट आणि सुरमई इतपतच उडी आहे माझी मत्स्याहाराच्या बाबतीत.
जागु.. बोलाव गं कधीतरी मला. :)
14 Jan 2011 - 10:14 am | नगरीनिरंजन
एकदम झकास! नक्की करून पाहणार.
बाकी (ह्यांच्या जागी मोती असते तर ?)
उपास घडला असता. मोती काय चाटायचेत?
14 Jan 2011 - 10:45 am | गवि
नाही.. मोत्यांचीही रेसिपी नक्कीच काढली असती जागुतैंनी आपल्या पोतडीतून.
मोत्यांची उसळ : अगदी लिंबू पिळल्याने मोती मऊ पडतील इथपासून ते यात लसूण बारीक चिरून घालावा लागतो वगैरे टिप्स सह. ;)
मला वाटते राजहंसाचे जे खाणे, मोत्याचा चारा, ते असेच असावे. :)
15 Jan 2011 - 2:40 pm | जागु
शुभांगी , नगरीनिरंजन धन्यवाद.
गगनविहारी मोती व्हेज मध्ये मोडेल की फिश मध्ये ?
प्राजु कधी येतेस ?
15 Jan 2011 - 3:34 pm | गवि
मुळात मोती मोडेल का अशीच शंका येते आहे.. किती भिजवणार अन किती शिजवणार..?
15 Jan 2011 - 4:29 pm | जागु
गगनविहारी मोत्याचा सोनाराकडून रवा किंवा पिठ करुन आणून मग त्याच्या रेसिपीज कराव्या लागतील.
15 Jan 2011 - 6:14 pm | परिकथेतील राजकुमार
जागुतै आता बास की प्राणीहत्या ;) काहितरी शाकाहारी चमचमीत येउ दे.
तुझे काय मत आहे ?
16 Jan 2011 - 1:43 am | कुक
खुप छान
मला हे खुबे नुसते उकडुनही आवडतात