झोळीचा खांब

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
24 Aug 2010 - 6:06 pm

टिंग टिंग

बेल मारुन बस निघाली. बसच्या आवाजात आणि धुराळ्यात परत डोळे मिटुन घेतले. पुढला स्टॉप बुरुडगाव. तिथे उतरुन परत पुढे सहा सात किलोमीटर जायचे. मी विचार करत असतो. गाडी चालत असते. तेवढ्यात वेग हळु हळु कमी होतो. गावात गाडी शिरल्याची जाणीव होते. डोळे उघडतो. बाहेर पहातो. गाडी स्टँडला लागते. पानी बोटल, समोसे, शेंगा गरम आवाज यायला लागतात. सॅक उचलतो. खाली उतरतो. जवळपास दहा वर्षांपुर्वी आलो होतो. फारसा काही बदल नाही. तीच गर्दी तोच गोंगाट. माणसं अजुन वाढलेली. स्टँड तेवढाच. कॅन्टीनकडे गेलो. चहा डोनट पोटात टाकला, बाहेर येउन पानपट्टीवरुन सिगारेट पाकीट घेतलं. धुर सोडत पुढे काय करायचं विचार करु लागलो.

चौकशीच्या खिडकीत डोकावुन आलो. भैरोबाच्या वाडीची बस सकाळी सात आणि दुपारी पाच. सकाळची बस कधीच गेलेली. सहा सात तास वाट पहाण्यापेक्षा दुसरं काही साधन पहावं म्हणुन बाहेर आलो. रिक्षा लागलेल्या होत्या. दहा रुपये सीट. एकंदर अवतार पाहिला. एका रिक्षात तीन नाहीतर जास्तीत जास्त चार माणसं. माझं शहरी गणित मार खात होतं. तीन चार वेळेला मोजुनही आतली माणसे किती हे समजेना. मोजण्याचा नाद सोडला. केव्हा निघणार? तुम्ही आणि अजुन दोन झाले की निघु हे उत्तर ऐकुन रिक्षा नको असे म्हणुन पुढे गेलो. काळीपिवळी उभी होती. बंद झाली तर परत चालु होणार नाही की काय म्हणुन चालुच ठेवली होती. गणित परत मार खाणार हे कळलं. येवढ्या गर्दीत हात पाय शाबुत राहतील की नाही असा विचार करुन सहा सात किलोमीटर काही फार अंतर नाही असा विचार करुन चालु लागलो.

लहानपणी आईबरोबर येत असे. दर मे महिन्यात. भैरोबाची वाडी मामाचं गाव. महीनाभर आई आधी मामाला कळवायची. मामा ठरलेल्या दिवशी सकाळी मोटारसायकल घेवुन यायचा. तेव्हा सुद्धा सकाळी आणि संध्याकाळीच बस असायची. पत्र मिळाले नाही किंवा मामा विसरला तर सहा सात तास वाट पहायची. तेव्हा गावात रिक्षा नव्हत्या. एक दोन टांगे होते. असले तर अवाच्या सवा पैसे मागायचे. आई कधी वाट पहायची कधी टांगा करायची. बहुधा जवळ किती पैसे आहेत यावर ते ठरायचे. आई सांगायची लहानपणी तिला पायी यावे लागायचे. पावसाळ्यात फार त्रास व्हायचा. मातीचा रस्ता. चिखल तुडवत जायचे. तेव्हा कळत नसायचे. आज जाणवत आहे किती वेगळे आणि खडतर आयुष्य असेल.

मुख्य रस्त्यावरुन वाडीच्या रस्त्यावर आलो. आजुबाजुला हिरवीगार शेती पसरली होती. पावसाळा चालु असल्याने पायी चालायला काही वाटत नव्ह्ते. रस्त्यावर मधे मधे पाण्याचे थारोळे होते. कधी काळी डांबरी करण केलेला रस्ता मात्र त्याचे अवशेष आता भग्न पुराणवास्तुप्रमाणे आ करुन आभाळाकडे डोळे लावुन पडले होते. मधुनच वर आलेला दगड पायाने लाथाडत मी चालत होतो. कधी मान खाली घालुन कधी इकडे तिकडे पहात रमत गमत चुकुन कुणी मोटार सायकलवाला आला तर जावु त्याच्या मागे बसुन असा विचार करत होतो. एखाद दुसरा समोरुन येत होता. मी पुढे चाललो होतो.

आजुबाजुला पाहीले. दहा वर्षांत काही फारसा बदल झाला नव्हता. दोन चार नवी घरे दिसत होती. काही दिसेनाशी झाली होती. दोन चार नव्याने रंगवली होती. दोनचार रंगाची वाट पहात होती. बघता बघता तास दीड तास कसा गेला कळालं नाही. एक दोन ठिकाणी थांबुन अखेर वाडीला येउन पोहोचलो. मामाच्या घरी गेल्यावर बहुधा भुत पाहिल्याप्रमाणेच त्यांना वाटलं असावं. कित्येक वर्षांपासुन ये ये म्हणत असतांना गेलो नाही आणि अचानक असा समोर आल्यावर ते तरी काय बोलणार. पण त्यांच्या डोळ्यातुन बहुधा बरं वाटलं असावं असंच वाटत होतं. माणुस कितीही निगरगट्ट असला तरी रक्ताची नाती तुटता तुटत नाहीत हेच खरं. जेवण करुन लवंडलो. चालुन चालुन थकलो होतो. पटकन झोप लागली.

जागा झालो तेव्हा दुपार ढळली होती. चहा पिउन मामाशी जरावेळ बोलत बसलो. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. थोड्या वेळाने चल मी जुन्या वाड्यावर चक्कर मारुन येतो म्हणालो. मामा म्हणाला काही नाही आता तिथे. दोन वर्षांपुर्वी पडुन गेलं होतं नव्हतं ते. कशाला जातोस उगाच. पावसाचे दिवस. हम्म म्हटले पण बाहेर निघालो. मामाचं नवं घर जरा गावाबाहेर होतं. लातुरच्या भुकंपाच्यावेळी काही भाग पडला. डागडुजी करुन करुन इतके वर्ष सांभाळला होता. किती दिवस अजुन तग धरेल म्हणुन नवे घर बांधले. काही दिवस जुनं घर गोडाउन म्हणुन वापरले आता ते पण नाही. गावची कुत्री आणि डुकरांचे हक्काचे घर झालं आहे. मामेभावाचा लहान पोरगा चालता चालता सांगत होता. मी हे विचार ते विचार करत चालत होतो.

बघता बघता जुन्या ओळखीच्या खुणा काही स्पष्ट काही अस्पष्ट दिसु लागल्या. कुठल्याही गावात असतंच तसं हनुमानाचं मंदीर. त्याच्या बाहेर बसलेल्या म्हाता-याकोता-यांच्या मैफिली. पलीकडे ग्रामपंचायतीचं कार्यालय. आता नवे बांधले होते पण नेहमीप्रमाणे बंदच होते. दोन चार फुटकळ दुकानं. चहाची टपरी. बाजुलाच विडी सिगारेट फुंकत, तंबाखु मळत शेती, राजकारण आणि तमाशा यावर चाललेला अविरत काथ्याकुट. माणसं बदलतात पण काही विषयांना मरण नसतं खरं. पुढे सरकत होतो. ह्याच मारुतीच्या मंदीराच्या भोवती खेळण्यात लहान पणी मजा यायची. किती वेळा पडलो. रडलो.

पलीकडे भैरोबाचं मंदीर. त्याच्या समोरचा मोठ्ठा नगारा. सकाळी संध्याकाळी वाजायचा. वर्षातुन एकदा होणारी जत्रा. बघता बघता मनाच्या कोप-यात लपुन बसलेले ते मंतरलेले दिवस झर्रकन समोर आले. काका का रे हसलास? पुतण्याने विचारले तेव्हा त्याच्या पाठीवर हलकेच थाप मारुन काही नाही असेच असे म्हणालो आणि पुढे चाललो. पलीकडेच मैदान होतं. चार पाच पोरं क्रिकेट खेळत होती. दोन चार गोट्या. त्यांच्यात माझ्या मलाच पहायचा व्यर्थ प्रयत्न करत होतो.

जुनं घर समोर आलं. किती वर्षांनी पहात होतो. दहा. हो मोजुन दहा वर्षं झाली. हलकेच निश्वास टाकत पुढे गेलो. घराचा दरवाजा उघडाच पडला होता. आजु बाजुच्या भिंतीनीच असहकार पुकारल्यावर त्याला तरी कशाला त्रास ! दरवाजाच्या बाहेर कधीतरी लिहिलेले शुभ लाभ अस्पष्ट झाले होते. दारावरचा दगडी गणपती लावलेला शेंदुर उडुन गेल्याने काळपट झाला होता. मनातल्या मनात त्याला नमस्कार करुन आत गेलो. कित्येक खोल्यांच्या खुणा नष्ट होवुन तिथे केवळ मातीचा ढिगारा उरला होता. ओसरीचा भाग अजुन नीट होता. पलीकडे देवघर. बाजुला स्वयंपाक घर. त्याच्या मागे मागचे अंगण. अंगणात आड. हळुच आडापाशी येवुन पोहोचलो. डोकावले. काळपट पाण्यात कोणीतरी पहात आहे असं दिसलं. मागे झालो. तिथल्याच एका दगडापाशी बसलो.

विचारात डोळे आपसुक मिटले गेले. घंटीचा आवाज आला. सकाळी सकाळी काका उठुन देवपूजा करायचे. काका आईचे वडील. सगळे जण काका म्हणायचे. आम्ही नातवंड पण काकाच म्हणायचो. त्यांचा घोग-या आवाजातला स्तोत्र म्हटल्याचा आवाज आला की हळु हळु आम्ही नातवंड अंथरुण सोडायला लागायचो. तिकडे स्वयंपाकघरात माई कामात असायची. माईला आज्जी म्हणुन कधीच हाक मारली नाही. माई हे हवं माई ते हवं असं करत तिला जाम त्रास द्यायचो. तेव्हा काही वाटलं नाही. आज असं वाटतं जरा जास्तच त्रास दिला की काय म्हणुन लवकर गेली. तव्यावर कधी भाकरी कधी पोळ्या, पलीकडे कालवण उकळत असलेलं. खाली चुल ढणाणा. बाजुला माई बसुन सगळं नीट करत असलेली. मनाच्या कोप-यात हे चित्र अजुन जपुन ठेवलेलं आहे. धुराचा वास सगळीकडे पसरलेला. त्यातच मस्त कालवणाचा वास. सकाळी उठल्यावर अशा संमिश्र वासात दिवस सुरु झाल्यावर मग काय विचारता!

आडाजवळ यायचे. तोंड धुउन बसायचे. चहा पिउन लोटा घेउन शेतात पळायचे. तेव्हा संडास घरात असणं हे श्रीमंतीचं लक्षण होतं आणि गावात कुणीही श्रीमंत नव्हता ! शेतात गेल्यावर तिथल्याच विहिरीवर कधी आंघोळ करुन अंगावरचे कपडे वाळले की रमत गमत घरी यायचे. तोपर्यंत घरातली मोठी माणसं शेतावर किंवा तालुक्याला निघुन गेलेली असायची. आल्या आल्या माई भुक करुन ओरडायचे आणि ताटात वाढलेलं भरा भरा खाउन परत खेळायला फरार व्हायचं.

घराबाहेर एक मोठा पिंपळ होता. होताच कारण बारा पंधरा वर्षांपुर्वी एक दिवस मोडुन पडला. किती वर्षांपासुन होता हे कूणालाच माहित नव्हतं. प्रत्येकाने आपल्या लहानपणापासुन त्याला पाहिलेलं होतं. पिंपळाच्या एका बाजुला मुंजा होता. छोटंसं मंदीर. त्याला बारिक घंटा. कधी कधी तिथे दिवा लागलेला असायचा. कधी पत्रावळीवर भात त्यावर कुंकु गुलाल पिठाचा दिवा असं काहीसं असायचं. ते ओलांडायचं नाही अशी सक्त ताकिद आम्हाला दिलेली होती. त्याकाळी मोठ्यांच ऐकायच नाही अशी प्रथा नसल्याने आम्ही असं काही दिसलं की दुर रहायचो. पिपळाचं कोवळ पान घेवुन त्याची शिट्टी बनवायची हा आमचा आवडता खेळ होता. गोल गुंडाळी करायची. एका बाजुला तोडुन कपाळावर ठेवुन थोडी दाबायची. हे करतांना उगाचच ओम एम काली वगैरे मंत्र म्हणायचे आणि तोंडात ठेवुन हवा फुंकुन आवाज काढायचा. किती वेळ जायचा पण खेळ काही थांबायचा नाही.

उन वाढत गेले की माई बाहेर येउन आवाज द्यायची. जरा वेळ आत खेळा नाही तर झोपा. ओसरीवर बसुन पत्ते किंवा भेंड्या सुरु व्हायच्या. मधुनच एकेक बसल्या जागी पेंगत गळुन जायचा. थोडावेळा करता घर अगदी शांत व्हायचे पुन्हा संध्याकाळी गजबजायला. दुपार ढळायला लागली की आजुबाजूच्या बायका यायच्या. माई मामी आणि बायका कधी निवडणाचे किंवा कधी कसले काम करत बसायच्या. आम्ही पोरं तिथेच खेळत असायचो. आलेल्या बायकांमधे काही लेकुरवाळ्या असायच्या. तान्ही अंगावरची पोरं घेउन यायच्या. काम करतांना त्यांना पोरांना निजवण्यासाठी झोळी बांधलेली असायची. त्यात टाकुन एका हाताने झोका देत एका हाताने काम करायच्या.

कधी कधी आम्ही पोरं झोका द्यायचे काम करायचो. जेव्हा पासुन पाहिले तेव्हापासुन झोळी बांधलेलीच असायची. कधी गडी माणसांच्या बाया धान्य घ्यायला यायच्या. धान्य पाखडुन घेउन जात्यावरुन दळून घ्यायच्या. माईचा कारभार सगळ्यांसाठी खुला होता. त्या बायांची पोरं सुद्धा त्याच झोळीत झोपायची ज्या झोळीत कधीकाळी माईची नातवंड झोपायची.

बघता बघता संध्याकाळ झाली. चल रे काका जाउ आता पुतण्या मागे लागला. अंगणातुन उठुन परत आत आलो. कोप-यातल्या चुलीच्या खुणा अवशेष रुपाने होत्या. माईच्या शेवटच्या दिवसांत गावात गॅस मिळायला लागला होता त्यामुळे धुराचा त्रास कमी झाला होता. पण माईला चुलच बरी वाटायची. सवयीचा परिणाम असावा. देवघरात गेलो. छत पडले होते. पुर्वी देवघरात छान पितळी देव होते. शेंदराने माखलेला गणपती होता. प्रतिमा होत्या. सतत तेवणारी समई होती. आणि आता मात्र काही नव्हते. लहानपणी देवासमोर बसुन म्हटलेली स्तोत्रं आठवली. समोर मुर्ती नाही, देव नाही असे वाटलेच नाही. शांतपणे हात जोडले. पुतण्या पहात होता. नक्कीच मी वेडा असणार त्याच्या दृष्टीने. मी जे पाहीलं होतं ते त्याने कधी पाहिलेच नाही, त्याचा तरी काय दोष!

बाहेर ओसरीवर आलो. कोप-यातल्या खांबाकडे लक्ष गेले. तिथेच माईचे जुने पातळ बांधुन झोळी बांधलेली असायची. तिथे आज एक खांब मोडायला आला होता. दुसरा म्हणायला उभा होता. झोळीचे पातळ बहुदा फाटल्याने काढुन टाकले असावे किंवा घर बदलतांना सामान बांधायला वापरलं असावं. एक निश्वास टाकुन बाहेर आलो. समोरच नजर गेली. भलामोठा पिंपळ पहायची सवय असलेलं मन अजुन सरावलं नव्हतंच. आभाळाला जणु भोक पडल्यासारखंच वाटलं. पिंपळाकडे चालु लागलो. जुनाट खोडाचे काही तुकडे दिसत होते. दोन चार ठिकाणी पालवी येवुन झाड वाढलं होतं. पण ते झाड आणि हे झाड यात फरक होताच. पलीकडे मुंजाचं मंदीर मोठं आणि नवं दिसत होतं.

आजु बाजुला पाहिलं. काही घरं बदलली होती. काही माणसं बदलली होती. बदललो नव्हतो तो मीच. अजुनही तेच आणि तसेच असेल असं वाटुन पुन्हा पुन्हा तेच शोधण्याचा प्रयत्न करत होतो. जड पावलाने घरी आलो. जेवतांना मामाला सांगितलं सकाळच्या गाडीने परत जाईन. मामाने विचारले परत कधी येशील. येत जा अधुन मधुन. हम्म येईन असे मोघम बोलुन जेवण संपवले. मामेभावाबरोबर गप्पा मारत केव्हातरी झोपुन गेलो.

टिंग टिंग बेल वाजली. गाडी सुटली. मामा स्वतः गाडीपर्यंत आला त्याला हात करुन गाडीत बसलो. गाडीच्या वेगात डोळ्यावर झोप येत असतांना डोळ्यासमोर सतत तरळत होता ओसरीवरचा खांब आणि जिच्यामुळे कधी तरी लहानपणी मला शांत झोप दिली होती ती त्याला बांधलेली झोळी !!

कथा

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

24 Aug 2010 - 6:09 pm | इंटरनेटस्नेही

छान!

मदनबाण's picture

24 Aug 2010 - 6:11 pm | मदनबाण

मस्त... लयं आवडलं. :)

थोडीशी वास्तुपुरुष ची झाक जाणवली.. बाकी नानाच लिखाण म्हणजे उत्तमच.

छोटा डॉन's picture

24 Aug 2010 - 6:16 pm | छोटा डॉन

नान्या, एकदम क-ड-क लेख.

ह्यावर अजुन जास्ती काही लिहु वाटत नाही, वाचताना एकदम हरवुन गेलो होतो.
एकदम ताकदवान मांडणी आहे लेखाची.
साला आम्हाला मिरासदारांचा एक जुना लेख आठवुन गेला.

- छोटा डॉन

मेघवेडा's picture

24 Aug 2010 - 7:03 pm | मेघवेडा

>> एकदम ताकदवान मांडणी आहे लेखाची
हेच म्हणतो. पदोपदी आपण याक्षणी तिथे त्या जागी आहोत असा भास होत होता! मस्तच रे नाना!

अर्धवटराव's picture

25 Aug 2010 - 2:13 am | अर्धवटराव

मला पण असच वाटत होतं...

(जुन्या आठवणीत रमणारा) अर्धवटराव

स्वाती२'s picture

24 Aug 2010 - 6:23 pm | स्वाती२

खूप आवडले.

दाद's picture

24 Aug 2010 - 6:45 pm | दाद

उत्तम

निखिल देशपांडे's picture

24 Aug 2010 - 6:57 pm | निखिल देशपांडे

नाना जबरदस्त लिखाण
अगदी वाचताना हरवुन गेलो.

यशोधरा's picture

24 Aug 2010 - 6:58 pm | यशोधरा

लेख आवडला.

चतुरंग's picture

24 Aug 2010 - 7:00 pm | चतुरंग

गतकालाच्या पाऊलखुणा शोधायचा प्रयत्न आवडला.

चतुरंग

अनिल हटेला's picture

24 Aug 2010 - 7:37 pm | अनिल हटेला

लेख आवडला !!

:)

पैसा's picture

24 Aug 2010 - 7:40 pm | पैसा

वाचताना "रहिले दूर घर माझे" चा प्रत्यय येत होता. प्रत्यक्ष त्या घरात राहून आल्यासारखे वाटले.

छान लेखन!
नानांनी यावेळेस त्यांच्या फॅन्सना फार दिवस वाट पहायला लावली.
संपूर्ण कथेत वाचकाला आपण स्वत: असल्याचा भास होत रहावा असे लिहिले आहे..

असुर's picture

24 Aug 2010 - 7:47 pm | असुर

केवळ अप्रतिम!

-असुर

मुक्तसुनीत's picture

24 Aug 2010 - 8:16 pm | मुक्तसुनीत

स्मरणरंजनात्मक लिखाण आवडले. असेच आणखी यावे अशी आशा आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Aug 2010 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा...!

अरुण मनोहर's picture

24 Aug 2010 - 8:35 pm | अरुण मनोहर

उगाच नाही ''आठवणींचा खजीना'' असे म्हणत!

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 9:50 pm | धमाल मुलगा

हा नान्या साला कधीतरी काहीतरी असलं लिहितो आणि आम्हाला हरवुन जायला होतं.
बर्‍या ह्याला जुन्या जखमांच्या खपल्या चांगल्या काढता येतात. :(

-(देशमुख गढीच्या पडक्या पसार्‍यात विषण्ण फिरणारा) ध.

असुर's picture

24 Aug 2010 - 9:56 pm | असुर

>>>बर्‍या ह्याला जुन्या जखमांच्या खपल्या चांगल्या काढता येतात.

-(देशमुख गढीच्या पडक्या पसार्‍यात विषण्ण फिरणारा) ध.<<<

+१

-- (धरणाच्या फुगवट्यात विसर्जन झालेली हवेली शोधणारा) अ.

धमाल मुलगा's picture

24 Aug 2010 - 10:04 pm | धमाल मुलगा

:(

स्पंदना's picture

24 Aug 2010 - 9:57 pm | स्पंदना

मस्त लिहिलय हं अवलियाजी!!

सुनील's picture

24 Aug 2010 - 9:58 pm | सुनील

मस्त! छान चित्रदर्शी लेख!

पारुबाई's picture

24 Aug 2010 - 11:40 pm | पारुबाई

फार म्हणजे फार सुरेख लेख.

आज शब्द तोकडे पडले आहेत.

समंजस's picture

25 Aug 2010 - 11:54 am | समंजस

छान!
बालपणातील काळ आणि बालपणातील आठवणी या असतातच अश्या :(
मनुष्य कितीही मोठा झाला वयानी तरीही बालपणातील आठवणी ह्या कायम दगडावर कोरलेल्या शिलालेखा प्रमाणे मनात कोरलेल्या असतात. एकवेळ तरूणपणातील सर्व काही आठवणार नाही, स्वतः च्या लग्नातील सर्वच प्रसंग आठवणार नाहीत [बायकोला मात्र सगळच आठवत असतं ;) ]स्वतःच्या मुलांच्या बालपणातील सर्वच प्रसंग आठवणार नाहीत परंतु स्वतःच्या बालपणातील सर्वच प्रसंग मात्र हमखास आठवतात ते सुद्धा कसलाही अल्बम/विडीओ नसताना.

दिपक's picture

25 Aug 2010 - 12:52 pm | दिपक

नाना काय बोलू? :-(

गावची आठवणी आली. झटकन गुगल मॅप्स मध्ये गावचे घर पाहिले. बराच वेळ बघत होतो.

नितिन थत्ते's picture

25 Aug 2010 - 12:59 pm | नितिन थत्ते

आवडलं.

घाटावरचे भट's picture

25 Aug 2010 - 1:20 pm | घाटावरचे भट

छान लेखन...

हर्षद आनंदी's picture

27 Aug 2010 - 3:49 am | हर्षद आनंदी

वाचता वाचता जागेला भेट देऊन आलो!

शिल्पा ब's picture

27 Aug 2010 - 8:33 am | शिल्पा ब

छान लेख..

सहज's picture

27 Aug 2010 - 8:58 am | सहज

टाळ्या वाजतायत खर्‍या! पण नानाची जालकंटक ही सरकार दफ्तरी असलेली नोंद गेली की नाही कोणास ठावूक?

क्रांतीसिंह नानाजींचा विजय असो!

नाना.
एक नंबर लिखाण...
तुझ्या ऐवजी मीच वावरत आहे असा भास झाला

--टुकुल

अमोल केळकर's picture

28 Aug 2010 - 3:33 pm | अमोल केळकर

सहमत . मस्त लेख

अमोल

ऋषिकेश's picture

28 Aug 2010 - 4:07 pm | ऋषिकेश

सुरेख लेखन! आवडले.

अवांतरः गावात चहा डोनट हे थोडे खटकले

सहज's picture

28 Aug 2010 - 4:40 pm | सहज

अवांतरः गावात चहा डोनट हे थोडे खटकले

मी ते चहा - ब्रुन किंवा चहा - क्रिमरोल असे समजुन घेतले... कदाचित डोनट नावाचा वेगळाच प्रकारही आला असेल. शेवटी ते २०१० मधे भारतातले गाव आहे/असु शकते त्यामुळे अजुनही गावात डोनट नसायला / खटाकायला आपला पुर्वग्रह तर नाही ना?

मृत्युन्जय's picture

28 Aug 2010 - 9:15 pm | मृत्युन्जय

सुरुवातीस खटकला खरा थोडा. पण नंतर जाणवले की डोनट आता सगळीकडे मिळतो.

चिन्मना's picture

28 Aug 2010 - 4:57 pm | चिन्मना

ताकदवान चित्रदर्शी लेखन. मनाला फारच भावून गेले. डोळ्यासमोर ते दिवस, तो वाडा उभा राहिला. जियो नाना! असे लेख मिसळपावला समृद्ध करत असतात.

मितभाषी's picture

28 Aug 2010 - 5:25 pm | मितभाषी

शाब्बास नान्या जियो!!!

लेख वाचुन अंमळ हळवा झालो.

भावश्या.

श्रावण मोडक's picture

28 Aug 2010 - 10:52 pm | श्रावण मोडक

छान लेखन.

सविता's picture

3 Nov 2010 - 3:47 pm | सविता

मस्त........