अविस्मरणीय - ५ व ६ ऑगस्ट २०१०
समीक्षा (माझी पत्नी) आमच्या ११ दिवसांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन ४ ऑगस्ट रोजी २ महिने आराम करण्यासाठी माहेरी पुण्याला गेली. नागपूरला डॉ.मंगला केतकर यांच्या दवाखान्यात २४ जुलै २०१० ला तिने बाळाला जन्म दिला. तिला व मुलाला ४ तारखेला ला संध्याकाळी नागपूरला रेल्वे स्टेशनवर सोडले. सोबत तिची आई होती.
५ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरहून परत घरी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे जाण्यास निघालो. नागपूर ते हेमलकसा जवळपास ३५० किलोमीटर अंतर आहे. वाटेत बाबा आमटेंची मुख्य कर्मभूमी आनंदवन लागत. ते नागपूरहून १०० किलोमीटर आहे. १२ वाजता तिथे पोहोचलो. आजीची (साधनाताई आमटे) भेट घेतली. काका-काकूंना भेटलो आणि सुमारे १ वाजता पुढील प्रवासासाठी निघालो. टाटा सुमो गाडी होती. मी आणि चालक दोघच. सोबतीला दवाखान्याची औषधे आणि शाळेतील मुलांच्या सामानाची खरेदी (प्रकल्पात लागणाऱ्या सर्व सामानाची खरेदी नागपुरातून केल्या जाते). गाडी खचाखच भरली होती. दोन समोरच्या सीट्स फक्त मोकळ्या होत्या चालक आणि माझ्यासाठी. २ वाजता चंद्रपुरात पोहोचलो. नुकतीच पावसाला सुरवात झाली होती. हळूहळू गाडीचा आणि पावसाचा वेग वाढू लागला. सुमारे ४ वाजताच्या सुमारास आम्ही आमच्या लोक बिरादरी नागेपल्ली या प्रकल्पात पोहोचलो. अजून पुढे ६० किलोमीटर हेमलकसा होते.
नागेपल्ली प्रकल्प हा शेती प्रकल्प आहे. तिथे जगन मचकले नावाचे आमचे कार्यकर्ते राहतात. २५ एकर जमीन आहे. तिथे येणारे थोडेफार भाजीपाल्याचे उत्पन्न हेमलकसा च्या शाळेसाठी वापरले जाते. हेमलकसा प्रकल्पाच्या सुरवातीच्या काळात आनंदवन ते हेमलकसा एका दिवसात पोहोचणे केवळ अशक्य होते, कारण नागेपल्ली नंतर रस्ताच नव्हता. हे ६० किलोमीटर अंतर जाण्यासाठी प्रचंड घनदाट जंगल, नद्या, अनेक ओढे तुडवत चालत किंवा सायकलने जावे लागायचे. २ दिवस त्यात जायचे. म्हणून आनंदवन येथून येणारा माणूस किंवा बाबा-आजी पहिल्यांदा नागेपल्ली ला मुक्काम करायचे. आनंदवन ते नागेपल्ली छोटा रस्ता होता. त्यामुळे तिथ पर्यंत गाडी येऊ शकत होती. सुमारे १२ वर्ष हा त्रास झाला. सुरवातीचे १२ वर्ष पावसाळ्यानंतरचे ६ महिने जगाशी कसलाही संपर्क नसायचा. जगन मचकले त्या काळात आनंदवनातील निरोप घेऊन चालत किंवा सायकलने हेमलकसाला यायचा. तसेच इकडचा निरोप तिकडे पोहोचवायचा. खूप पाऊस असलाकी ते पण शक्य होत नसे. असो.
नागेपल्ली प्रकल्पात चहा कॉफी घेऊन आम्ही पुढील प्रवासासाठी निघालो. पावसाचा वेग प्रचंड वाढला होता. गाडीचे वायपर सुरु होते पण त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. त्यामुळे चालकाला गाडी अगदी हळू चालवावी लागत होती. तसाही रस्ता अतिशय फुटला असल्याने गाडी काही ५० च्यावर नेता येत नाहीच. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची कृपा भारतात अनेक ठिकाणी आढळून येईल. नागेपल्लीहून सुमारे ४० किलोमीटर दूर एक कुडकेली नावाचे गाव आहे. त्या गावाच्या शेजारून एक ओढा वाहतो. त्याला कुडकेली चा नाला म्हणतात. तिथ पर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. ४० किलोमीटरचे अंतर आम्ही ९० मिनटात कापले. ओढ्यावर अगदीच लहान पूल होता. इकडे आम्ही त्याला रपटा म्हणतो. नागेपल्ली प्रकल्पातून निघतांना मनात धाक-धुक होतीच. इतका पाऊस पडतो आहे तर कदाचित आपण १० रपटे असलेल्या या रस्त्यावर कुठेतरी अडकू. आणि झालेही तसेच. कुडकेलीचा नाला प्रचंड वेगात रपटयाच्या सुमारे ३ फूट वरून वाहत होता. आमच्या आधी २ सरकारी बसेस तिथे येऊन थांबल्या होत्या. संध्याकाळचे ६ वाजले होते. पावसाचा जोर कमी झाला होता. सुमारे ६.३० वाजता पुलावरील पाणी १ फुटाने खाली गेले. मग एका बस चालकाने त्या २ फूट पाण्यातून बस काढली. माझ्या सोबत असलेला चालक थोडा घाबरत होता गाडी काढायला. आमची गाडी तशी छोटी होती. त्याला भीती वाटणे स्वाभाविक होते. मग मी त्याला बाजूला बसविले आणि गाडी चालू केली. पाणी जरी कमी झाले होते तरी जोर खूप होता प्रवाहाचा. गाडी बंद पडणे धोकादायक ठरू शकते हे माहित होते. लहानपणी अश्या अनेक प्रसंगातून बाबाने (प्रकाश आमटे) रस्ता, पूल नसतांनाही गाडी काढलेली आम्ही पहिले होते. जर अजून आपण इथे जास्त वेळ घालवला तर पुढील सर्वच ओढे आपल्याला अडवतील आणि इथेच अडकून पडावे लागेल. आधी २ वेळा चालत जाऊन मी तो पूल व्यवस्थित आहे का? की वाहून गेलाय याची नीट खात्री करून घेतली. मग संपूर्ण विचार करून मी गाडी पुढे न्यायला सुरवात केली. गाडीचा वेग वाढविला. माझी गाडी २ फूट उंच पाण्याची धार कापत दुसऱ्या तीरावर सुखरूप पोहोचली. ७०-८० फुटाचे ते अंतर होते. मध्ये एके ठिकाणी प्रवाहामुळे गाडी थोडी जास्त हलल्याचे जाणविले एवढेच. गाडी जोरात नेल्याने ओढ्याचे पाणी जोरात समोरील काचेवर आपटत होते. गाडी सुखरूप निघाल्याचा आम्हा दोघानाही आनंद झाला. पण धाक-धुक होतीच. पलीकडच्या तीरावर पोहोचल्या बरोब्बर पावसाने परत कोसळण्यास सुरवात केली. तसेच आम्ही पुढे निघालो. पुढे १० किलोमीटर वर ताडगाव नावाचे छोटे खेडे लागते. तिथून २ किलोमीटर अंतरावर पुन्हा एक छोटा ओढ वाहतो. त्या ओढ्याचे नाव ताडगाव नाला. ताडगाव पार करून आम्ही हेमलकसाच्या दिशेने पुढे निघालो. तेव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. आता १० किलोमीटर दूर होते घर. २० मिनिटांचा वेळ लागणार होता. दोघानाही चांगलीच भूक लागली होती. कधी घरी पोहोचतोय असे झाले होते. पण ताडगाव नाल्याजवळ येताच गाडी थांबवावी लागली. हा ओढाही फुगला होता. अंधार पडला होता म्हणून नेमके त्या पुलावरून किती फुट पाणी वाहतंय याचा अंदाज घेता येत नव्हता. पावसाचा वेग काही केल्या कमी होईना. तो वाढतच होता. अंधारात गाडी पुलावरून पाणी असतांना नेणे धोकादायक होते. म्हणून आम्ही दोघे गाडीत बसून पाऊस कमी होण्याची वाट पाहायला लागलो. पाऊस पडत असल्याने पुलावरील पाण्याची पातळी चांगलीच वाढल्याचे आम्हाला गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात दिसले. आणि आज घरी काहीही केले तरी पोहोचता येणार नाही याची खात्री झाली. रात्रीचे ८ वाजले होते. पोटात कावळे बोंबलत होते. मग विचार केला की ताडगाव गावात जाऊन एखादे दुकान किंवा छोटे हॉटेल सुरु असेल तर काहीतरी खाऊन यावे. म्हणून गाडी वळवली. ताडगाव ची हद्द जिथे संपते तिथलाही ओढा आता प्रचंड वेगाने पुलाच्या वरून वाहायला लागला होता. त्यामुळे गावात जाणे पण अशक्य झाले होते. २ किलोमीटरच्या अंतरा मध्ये आणि २ ओढ्यांच्या मध्ये आम्ही अडकलो होतो. परत गाडी वळवली आणि ताडगाव नाल्या जवळ येऊन थांबलो. अतिशय शांत जंगलात, निर्मनुष्य जागी आणि प्रचंड काळोखात माझी गाडी उभी होती. फक्त आवाज होता तो पावसाचा. गाडीच्या पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांचा. त्या घनदाट जंगलात मी आणि चालक नामदेव असे दोघच होतो अडकलेलो. सरकारी बस चालकाने बस आधीच ताडगाव मध्ये उभी केली होती. त्यात ७-८ प्रवासी होते. ते गावात अडकल्याने सुखी होते. आता आम्हाला गाडीतच बसल्या सीटवर झोपावे लागणार होते. ते ही उपाशी. तेवढ्यात मला आठवलेकी नागेपल्ली प्रकल्पातून मुक्ताकाकू (जगन मचकले यांची पत्नी) ने मला आवडतो म्हणून चिवडा दिला होता. मग त्या चिवड्यावर आम्ही ताव मारला आणि तो फस्त केला. त्याने काही पोट भरले नाही. पण पोटाला आधार मिळाला. आता अजून गाडीत काहीही खायला नव्हते. आणि तसेच झोपावे लागणार होते. मग आम्ही दोघेही झोपायचा प्रयत्न करू लागलो. प्रवासाचा थकवा असल्याने अधे-मध्ये झोप लागत होती. कशी बशी रात्र ओसरली. सकाळी ६ वाजता सुद्धा पाऊस सुरु होता. पण रात्रीपेक्षा थोडा जोर कमी झाला होता. ६ ऑगस्ट हा माझा वाढ दिवस असतो. अर्थात मी कधीही तो साजरा करत नाही. पण अनेकांचे फोन, ईमेल आणि मोबाईल वर संदेश येत असतात. संवाद साधण्याचे हे एक निमित्त मिळते एवढेच. आधीच पावसामुळे इकडील फोन आणि वीज गेले ७-८ दिवसांपासून बंदच होती. नागेपल्ली प्रकल्पा पर्यंत फोन आणि वीज नीट सुरु होती. मी परत आलो नाही म्हणजे मी कुठेही अडकलो नाही असे नागेपल्ली मध्ये राहणाऱ्या लोकांना वाटले आणि इकडे आई-बाबांना वाटले की मी नागेपल्ली येथे पाऊस असल्याने थांबलो असेन. दोन्ही कडील लोक असा विचार करून सुखी होती. फोन बंद होता हे बरेच झाले. नाहीतर नागेपल्ली येथून हेमलकसाला मी कुठे आहे हे कळले असते आणि इकडे आई-बाबा आणि इतरांना काळजी लागून राहिली असती. उठल्या बरोब्बर मी नाला चालत पार करून पाहून आलो. दरवर्षी प्रमाणे या वर्षीपण या ओढ्यावरील निकृष्ट दर्जाचा सिमेंट कॉन्क्रेट चा स्लाब वाहून गेला होता. पुलावर ८ फूट रुंद आणि सुमारे दीड फूट खोल असा मोठा खड्डा पडला होता. असे काही होईल याची खात्री होती म्हणूनच रात्री गाडी काढायचा मी प्रयत्न केला नाही. अजूनही त्या पुलावर ३ फूट पाणी होते. ते पाणी पूर्ण पणे उतरे पर्यंत गाडी काढणे शक्य नव्हते. सकाळी ६ ला कमी झालेल्या पावसाने ८ वाजता परत जोर धरण्यास सुरवात केली. म्हणून आम्ही लगेच गाडी वळवली आणि ताडगाव ला जावून काहीतरी खायला मिळतंय का ते पाहू असे ठरविले. ताडगाव जवळील नाला ओसरला होता. परत भरण्या आधी ताडगाव ला जाणे गरजेचे होते. गावात पोहोचलो. पण सर्व हॉटेल्स बंद होती. विचारले असता पावसात आम्ही काहीही करत नाही असे उत्तर मिळाले. तेवढ्यात माझा लोक बिरादरी शाळेतील जुना माडिया मित्र जुरू मला भेटला. तो सध्या शाळेत शिक्षक आहे. त्याने आम्हाला घरी जेवायला घातले. २४ तासाच्या उपासानंतर आम्हाला जेवायला मिळाले होते. मी त्याचे आभार मानले. मला माहिती होते की जुरू इथे राहतो. पण उगाच कोणालाही आपल्यामुळे त्रास नको म्हणून मी त्याच्या घरी गेलो नाही. त्याने मला गाडीत बसलेला पाहिले. आणि घरी जेवायला येण्याचा खूप आग्रह केला. मला आणि मुख्य म्हणजे चालकाला जास्त भूक लागली होती. म्हणून का-कु न करता सरळ त्याच्या कडे आम्ही जेवायला गेलो. अतिशय साधी झोपडी होती त्याची. बायको २ मुलं असा परिवार. मी त्यांच्या कडे जेवतोय यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांना खूपच आनंद झाला आहे हे स्पष्टपणे त्यांच्या चेहेऱ्यावर दिसत होत. दुपारी सुमारे १२ वाजता आम्ही त्याच्या कडे जेवलो. पाऊस कमी होण्याचे नाव घेत नव्हता. आज अडकलात तर इकडे आमच्या कडेच रात्री जेवायला आणि झोपायला या असा जुरू सतत आग्रह करीत होता. आम्ही १ वाजता परत गाडीत जाऊन बसलो आणि ताडगाव नाल्याजवळ येऊन थांबलो. ओढ्यावर पाणी तेवढेच होते. पाणी ओसरल्यावर पुलावरील खड्डा भरावा लागणार होता. तेव्हाच कुठे आमची गाडी निघणार होती. पाऊस थांबायची वाट आणि नाल्यावरील पाणी ओसरायची वाट पाहण्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो. ६ तारखेची रात्र पण इथेच घालवावी लागणार हे जवळ जवळ निश्चित झाले होते. जुरुने आग्रह केल्याने आम्ही रात्रीचे जेवण त्याच्या कडेच केले. भात आणि आता थोडे वरण असे साधे त्यांचे जेवण असते. त्यात कधी कधी मासोळी किंवा चिकन चे तुकडे असतात. मी खात नाही म्हणून त्याने साधे जेवण केले. कोंबडी कापुका म्हणून त्याने विचारले होतेच. रात्रीचे जेवल्यावर आम्ही गाडीतच झोपलो. त्याचे घर लहान. जागा कमी. म्हणून आम्ही गाडीतच झोपणे पसंत केले. ६ ची रात्र पण तशीच गाडीत झोपून काढली.
६ ला रात्री १२ नंतर पावसाने विश्रांती घेतली. सकाळी ६ वाजता नाल्याचे पाणी पुलाच्या खाली गेले होते. आता तो पुलावरील खड्डा स्पष्ट दिसत होता. लगेच आम्ही दोघं दगड गोळा करून तो खड्डा बुजवायला लागलो. ४५ मिनिटात गाडी जाईल एवढा खड्डा आम्ही बुजविला. आणि लगेच गाडी काढली. कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. हेमलकसाच्या आधी ४ किलोमीटर वर कुमार्गुड्याचा नाला आहे. त्या नाल्यावरचा पुलाच्या स्लाब चा एक भाग वाहून गेला होता. पण एका बाजूने आम्हाला गाडी काढता आली. हा पूल रपटा एक वर्षा पूर्वीच नवीन बांधला होता. असो.
शेवटी ७ तारखेला ७.१५ मिनिटांनी आम्ही हेमलकसात पोहोचलो. घरी आल्यावर ही कथा सर्वांना सांगितली. २ दिवसांची आंघोळ घरी आल्याबरोब्बर आटोपली. चालकाने पहिले जेवणे पसंत केले. ५-६ ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये २५ सेंटी मीटर पाऊस झाला या भागात. हेमलकासाचे स्वरूप ४ दिवस बेटा सारखे झाले होते. हेमलकसा पासुन ३ किलो मीटर असलेल्या ३ नद्यांना प्रचंड पूर आला होता. त्याचे पाणी हेमलकसाच्या कुंपणा पर्यंत आले होते. सर्व बाजूने लोक बिरादरी प्रकल्पाला पाण्याने वेढा दिला होता. ५-७ वर्षांनी एवढा पूर या भागात अनुभवायला मिळाला.
हे लिहायचे कारण: असा अविस्मरणीय अनुभव मला पहिल्यांदाच आला. तो तुमच्या बरोबर शेअर करावा असे वाटले.
अनिकेत प्रकाश आमटे
संचालक, लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा
मो. ९४२३२०८८०२
www.lbphemalkasa.org.in
www.lokbiradariprakalp.org
Email: aniketamte@gmail.com
प्रतिक्रिया
23 Aug 2010 - 9:16 pm | चतुरंग
असल्या जीवघेण्या अनुभवातून सातत्यानं जात तुम्ही लोक वर्षानुवर्षे कामं करत राहता ह्याचंसुद्धा आता आश्चर्य वाटेनासं झालंय! तुमच्या कामाला आमचा सलाम.
कधीतरी प्रकल्पाला भेट द्यायची मनोमन इच्छा आहे. कधी योग येईल हे माहीत नाही. तोवर तुम्ही लिहिलेल्या अनुभवातून तिथे मनाने जात राहू! असेच अस्सल अनुभव अजून लिहा.
चतुरंग
24 Aug 2010 - 5:30 am | मनिष
असेच/हेच म्हणतो!
24 Aug 2010 - 6:29 am | नंदन
असेच म्हणतो.
24 Aug 2010 - 7:43 pm | संदीप चित्रे
असेच म्हणतो !
25 Aug 2010 - 9:10 am | अप्पा जोगळेकर
+१०. असेच म्हणतो.
23 Aug 2010 - 9:35 pm | अर्धवट
अनिकेतजी,
काय बोलणार, लेख वाचताना कितीवेळा अंगावर सर्र्कन् काटा आला हे सांगताच येत नाही.
आमची इवलीइवलीशी आयुष्य आठवली म्हणजे असलं आभाळभर आयुष्य जगणार्यांचे अनुभव आश्वासकही ठरतात, मार्गदर्शकही..
लेख वाचल्यानंतर खुप वेळ आमच्या आयुष्याची वैय्यर्थताच उफाळुन येत होती वारंवार..
तुमच्या आयुष्याचा एकतरी प्रकाशकण आमचे अंधाराचे दरवाजे ओलांडुन आमच्या कोत्या जगण्यात झिरपू दे हीच प्रार्थना..
1 Aug 2012 - 10:41 am | चैतन्य दीक्षित
अर्धवटाशी सहमत आहे.
असेच अनुभव लिहा म्हणजे आम्ही आमच्या 'प्रोटेक्टेड्/कम्फर्ट' झोनमधून बाहेर पडण्याचा किमान विचार तरी करू शकू.
23 Aug 2010 - 9:50 pm | अनाम
शाळेत असताना (ईयत्ता ८-९) आनंदवनाला भेट देण्याचा योग आला होता. तिथे २ दिवस राहीलो होतो. श्रमदान केल होतं. तो शांत परिसर आणि तिथेल ते प्रसन्न वातावरण..... काही गोष्टी अश्या विस्मरणात गेलेल्या असतात तुमच्या या लेखा मुळे रे सार सार आठवल. :)
धन्यवाद.
23 Aug 2010 - 9:56 pm | श्रावण मोडक
दुर्गम भागातील, कठीण अशा कामात होणारे कष्ट काय असू शकतात याची ही एक झलक आहे!
अनिकेत, मला यापलीकडचे अनुभवही वाचायचे आहेत. प्रामुख्याने सामाजिक देवाणघेवाण, त्यात येणारा संघर्ष, त्यावर मात करताना योजावे लागलेले उपाय, त्यासाठी द्यावे लागणारी किंमत वगैरे. ते कळणं अशासाठी गरजेचं आहे की, अशा कामांचं खरं मूल्य ती किंमत कळल्यानंतरच आमच्यासारख्यांना कळू शकेल.
24 Aug 2010 - 5:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अनिकेत, तुम्ही लिहीत रहा. तुमच्यासारख्या सेवाव्रतींचं लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, आणि आमच्यासारख्या किडामुंग्यांपर्यंतही.
25 Aug 2010 - 12:24 am | स्वप्निल..
असेच म्हणतो!! जसं जमेल तसं लिहित रहा.
23 Aug 2010 - 9:57 pm | रेवती
बापरे!
तुमचे रोजचे आयुष्य असेच खडतर असते का?
मागल्या वर्षी प्रकाशवाटा वाचले आणि सुन्न झाले होते.
तिकडे पाऊस जर असा प्रचंड प्रमाणात होत असेल तर चांगल्या प्रतीचे पूल बनवूनही टिकतील का?
23 Aug 2010 - 10:06 pm | धनंजय
आणि अशा खडतर प्रसंगांत कार्य!
24 Aug 2010 - 6:36 pm | चित्रा
असेच म्हणते.
मिपावर स्वागत आहे. (बहुदा वल्ली यांचेही आमटे यांना मिपावर आणण्यासाठी आभार मानले पाहिजेत)..
24 Aug 2010 - 9:11 pm | शाहरुख
थ्रिल जाणवले !
25 Aug 2010 - 8:44 am | सहज
एकंदर सर्व प्रतिक्रियांशी सहमत.
23 Aug 2010 - 10:07 pm | मिसळभोक्ता
आमटे कुटुंबातील समाजकार्यातील तिसर्या पीढीचा अनुभव वाचायला आवडला. आणखी येऊ दे.
२५ वर्षांपूर्वी मोठा पाऊस झाला, की वरोड्यातून बाहेर पडणारे सर्वच रस्ते १०-१५ किमींवर दुथड्या भरलेल्या नाल्यांमुळे बंद असायचे.
दुर्गम भागांत अद्यापही तशीच परिस्थिती असावी.
23 Aug 2010 - 10:19 pm | विलासराव
अनिकेतराव.......वाढदिवसाच्या शुभेच्छा( उशिराने का होईना....तुम्ही साजरा करत नसले तरीही).
मला आनंदवन, सोमनाथ्,नागपल्ली आणी हेमलकसा येथे भेट देण्याची खुप ईच्छा आहे. तिथे बरीच शिबिरे भरतात.त्याची माहीती मिळाली तर बरे होईल.शिबीरच पाहीजे असेही काही नाही. कधी येता येईल त्याबद्दल काही मार्गदर्शन करावे ही विनंती.
आणखीही मिपाकारांना याचा उपयोग होईल अशी आशा आहे.
23 Aug 2010 - 10:32 pm | सुनील
जीवघेणा प्रसंग खराच.
आताच हा लेख वाचण्यापूर्वी मटातील कुमार कदमांचा कोकणातील घाटरस्त्यावरील लेख वाचत होतो. पावसाळ्यात नेहेमीच धोकादायक ठरणार्या ठिकाणी काही कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही? त्या त्या ठिकाण॑चे लोकप्र॑तिनिधी आवाज का उठवत नाहीत?
23 Aug 2010 - 11:43 pm | भडकमकर मास्तर
मिपवर आपले स्वागत आहे//
लेखन आवडले.
कामामधून वेळ काढून लिहित राहा, अशी विनंती करतो...
आपले लेखन वाचण्यास उत्सुक आहे...
23 Aug 2010 - 11:55 pm | मुक्तसुनीत
हेच म्हणतो !
24 Aug 2010 - 1:23 am | अर्धवटराव
असेच म्हणतो !!
-अर्धवटराव
24 Aug 2010 - 12:16 am | स्वाती२
प्रतिक्रिया द्यायला शब्द नाहीत!
24 Aug 2010 - 12:41 am | आनंदयात्री
निशब्द. युद्धस्य कथा रम्य म्हणतात तसे काहीसे.
तुमच्या पुढल्या लिखाणाची वाट पहातोय.
24 Aug 2010 - 1:31 am | निखिल देशपांडे
रोजच्या आयुष्यासाठी तुमचे झगडणे आणि तरीही कार्य कारत राहणे... याबद्दल काय बोलणार
एकुणच तुमचे तिथे रोजचे य्रेणारे अनुभव सुद्धा वाचण्यास उत्सुक आहोत... वेळात वेळ कढुन लिहीत रहा ही विनंती.
हेमलकसाला जायची ईच्छा प्रकाशवाटा वाचल्यापासुन मनात आहेच.
24 Aug 2010 - 4:59 am | गांधीवादी
स ला म
24 Aug 2010 - 10:39 am | तिमा
चि. अनिकेत,
वेळात वेळ काढून एक जिवंत अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे अनुभव जरुर लिहित जा, त्यातूनच अनेकांना तुमच्यासारखे काम करण्याची प्रेरणा मिळेल.
24 Aug 2010 - 11:21 am | स्वाती दिनेश
वरील सर्वांसारखेच म्हणते,
वेळ काढून लिहित रहा. आपले अनुभव वाचायला अर्थातच आवडतील.
स्वाती
24 Aug 2010 - 11:22 am | मृत्युन्जय
आमटे कुटुंबियांचे खरोखर कौतुक वाटते. बाबा आमाट्यांनी घेतलेला वसा आज तिसर्या पिढीतही मोडला गेलेला नाही हे विशेषच. लिखाण तर उत्तम जमलेच आहे. पण त्याहुनही तुमच्या कार्याचे खुप कौतुक करावेसे वाटते.
24 Aug 2010 - 12:31 pm | बबलु
श्री अनिकेत,
हा अनुभव अफाट आहे.
खूप ओघवतं लिहिलंय.
रोजच्या आयुष्यासाठी तुमचे झगडणे आणि तरीही कार्य कारत राहणे..... तुम्हा सर्वांना मनापासून सलाम.
वेळात वेळ कढुन लिहीत रहा ही विनंती.
तुमचा लेख पाहून खूप आनंद झाला.
24 Aug 2010 - 2:11 pm | चिगो
बाबा आमटेंनी सुरु केलेल्या समाजकार्याचा वसा त्यांची तिसरी पिढीही तितक्याच ताकदीने वाहतेय हे वाचुन आनंदही झाला आणि अभिमानही वाटला.. बाबांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर
"श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..
दु:ख उधळण्यास आता, आसवांना वेळ नाही..."
अभिनंदन आणि सलाम..!!
25 Aug 2010 - 1:14 am | मिसळभोक्ता
श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..
दु:ख उधळण्यास आता, आसवांना वेळ नाही..."
मी स्वतः ही कविता मुक्तांगणात डॉ. रूपा कुलकर्णींच्या आवाजात ऐकलेली आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद !
("उधळण्यास" नाही, "उधळायास".)
24 Aug 2010 - 5:28 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तंच लिहीले आहे.
25 Aug 2010 - 12:31 am | शेखर काळे
एव्हढा जिवावरचा प्रसंग तुम्ही किती सहज शब्दांत सांगितलात !
25 Aug 2010 - 9:17 am | चिंतामणी
प्रतिक्रीया द्यायला शब्दच सापडत नाहीत.
लिहीत रहा.
25 Aug 2010 - 9:21 am | दिपक
अनिकेतराव छान लिहिले आहे. असेच तुमचे अनुभव वेळात वेळ काढुन इथे लिहित रहा. तुमच्या थोर कार्यास शुभेच्छा आणि सलाम.
25 Aug 2010 - 10:58 am | समंजस
छान अनिकेतराव!! तुमचा हा अनुभव अर्थातच खुप रोमांचकारी आहे. अश्या प्रकारचे अनुभव येउन सुद्धा तुम्ही किंवा तुमच्या सोबतचे कार्यकर्ते आपल कार्य सतत चालूच ठेवतात हे मनाला जास्त भिडतं. तुमच्या आणि इतर कार्यकर्त्यांमुळे समाजकार्य हा शब्द अजूनही थोडं फार महत्त्व आणि सन्मान ठेउन आहे नाही तर या शब्दाला अपमानीत करून त्याचं अस्तित्व संपवण्याचं कार्य करण्यात तथाकथित लोकप्रतिनीधींनी काही कसुर ठेवला नाही.
तुम्हाला मिपावर बघून आनंद झाला. आतापर्यंत आमटे परिवारानी केलेल्या आणि करत असलेल्या कार्याची माहिती इतरांच्या लिखाणातूनच(प्रत्यक्ष ते कार्य करत नसलेल्या) व्हायची. आता ती माहिती प्रत्यक्ष हे कार्य करत असलेल्या आणि विशेष म्हणजे त्याच परिवारातील सदस्याच्या लिखाणातून मिळतेय ही एक पर्वणीच आहे :)
इतर मिपाकरांप्रमाणेच माझी सुद्धा विनंती आहे की, तुम्ही मिपावर लिखाण चालूच ठेवा आणि लोकबिरादरी या प्रकल्पाशी संबंधीत तसेच इतर कार्यांची, तुमच्या इतरही अनुभवांची माहिती देत रहा.
26 Aug 2010 - 9:25 pm | इन्द्र्राज पवार
श्री.अनिकेत....
लाज वाटते स्वतःची खरोखरी, ज्यावेळी असे अस्सल अनुभवाचे लिखाण समोर आल्यानंतर. आणखीन अशासाठी की, भाजीत थोडेसे मीठ कमी पडले म्हणून मेसवाल्याच्या नावाने ठणाणा करण्याचे दिवस आठवतात, अन् इथे तुम्ही (आणि त्या ड्रायव्हरदादालाही सलाम, जरूर कळवा आमचा रामराम!) जवळपास मृत्युच्या खेळात ४८ तास अडकून पडलात, तरीही ना निसर्गाबद्दल तक्रार, ना नशीबाबद्दल ! व्वा. विशेषतः जुरूला आणि त्याच्या घरातील लोकांना तुम्ही (तिथे दोन घास खावून) जो अवर्णनीय आनंद दिला त्यापुढे तुम्हाला झालेल्या त्रासाची पत्रास वाटली नसेल.
श्री.विकास आमटे यांचे एक मित्र जळगांवचे श्री.जयंत पाटील (जे काही वर्षे हेमलकसा येथे बाबांच्यासमवेत कार्यरत होते ~ चित्रकारही आहेत) हे कोल्हापुरला कधी आमच्याकडे आले की येथील मित्रपरिवारात "आनंदवन, हेमलकसा" हे विषय प्रकर्षाने असतातच, त्यामुळे तेथील कार्याचा, वातावरणाचे उल्लेख त्यांच्याकडून ऐकणे फार उत्साहवर्धक वाटते. त्यांना थोड्याशा दृष्टीदोषामुळे संगणकावरील मजकूर वाचता येत नाही. पण पुढील खेपेस ते इकडे आले की, मी जरूर तुमचा हा लेख त्यांच्याशी चर्चेसाठी घेईन.
या मंचावर आपले स्वागत आणि खूप आवडेल आपले लिखाण इथे सर्वांना !
15 Sep 2010 - 5:17 pm | चिंतामणराव
"एक जिवंत अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे अनुभव जरुर लिहित जा, त्यातूनच अनेकांना तुमच्यासारखे काम करण्याची प्रेरणा मिळेल."
+१ असेच म्हणतो.
७ / ८ वर्षांपुर्वी आलो होतो.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत मित्रमंडळींबरोबर पुन्हा येणार आहोत.
भेटु.
15 Sep 2010 - 11:47 pm | जिप्सी
येथे कर माझे जुळती !!!
2 May 2011 - 7:38 pm | सखी
हे वाचायचं राहुन गेलं होतं. खरचं शब्दच नाहीत काय काय अडचणीतुन तुम्ही लोक जात आहात, आणि तरीही हे कार्य वर्षानुवर्षे चालु आहे. तुमच्या सवडीतुन अजुन अनुभव लिहावेत, यातुनच खरोखर आमच्यासारख्या सामान्यांना प्रेरणा मिळेल. सलाम आहे तुम्हाला, आमटे परिवाराला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना!
अर्धवट: तुमचीही आभारी आहे, या लेखाचा दुवा दुस-या लेखात दिल्यामुळे या लेखाबद्दल कळले.
11 May 2012 - 11:44 am | प्यारे१
असेच म्ह णतो.
वर कुणी म्हटल्याप्रमाणे वल्लीला देखील धन्स, श्री. अनिकेत आमटेंना मिपावर आणून लेख लिहवला त्याबद्दल.
1 Aug 2012 - 9:57 am | अनिकेत प्रकाश आमटे
सप्रेम नमस्कार.....प्रतिक्रिया देणाऱ्या - न देणाऱ्या सर्व वाचक मित्रांचे आभार....
30 Jan 2014 - 1:03 am | आनन्दिता
धागा वर आणतेय!..
30 Jan 2014 - 2:39 am | मधुरा देशपांडे
उत्तम आणि वाचायलाच हवा असा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. त्यानिमित्ताने अनिकेत आमटेंचे इतरही लेखन वाचता आले. वाचन खूण साठवली आहे.
30 Jan 2014 - 12:39 pm | psajid
तुम्ही अक्षरशः बाबांच्या "श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही..."
या शब्दामध्ये जगता आहात. अडचणींवर मात करून समाजासाठी विधायक कार्य करण्याचं व्रत बाबांच्या तिसऱ्या पिढीनंही अखंडितपणे जपलं आहे याचं नवल वाटत नाही कारण समाजकारणाचे बाळकडू आपणास आपल्या कुटुंबातूनच मिळाले आहे. तुमचे आणखीही अनुभव मीपावर वाचायचे आहेत. मला आपल्या पकल्पांना भेट देण्याची खुप ईच्छा आहे. कधी येता येईल त्याबद्दल काही मार्गदर्शन करावे ही विनंती.
30 Jan 2014 - 2:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
येथे कर माझे जुळती !!!
अनिकेत साहेब, केवळ तुमच्यासारख्या "खर्या" समाजसेवकांमुळे माणूसकीवरचा आणि भारताच्या भविष्याबद्दलचा आशावाद कायम आहे !
@ आनन्दिता : धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !