स्वतंत्र

विकास's picture
विकास in काथ्याकूट
13 Aug 2010 - 2:47 pm
गाभा: 

येत्या रविवारी भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे होतील. मिसळपावचे बहुतांशी सदस्य हे विविध पिढ्यातील असले तरी स्वातंत्र्योत्तर काळातील आहेत असे वाटते.

स्वातंत्र्योत्तर प्रत्येक दशकाचा विचार केल्यास त्या दशकात काही नक्की घटना घडल्या ज्यात, "आता या देशाचे खरे नाही" असे वाटले:

  • ४७-५० फाळणी, हिंसाचार ,आणि गांधी हत्या;
  • ५०-६० भाषावार प्रांतरचना (त्यातही द्रविड चळवळ);
  • ६०-७० चीनचा हल्ला;
  • ७०-८० आणिबाणी;
  • ८०-९० इंदीरा हत्या, शहाबानो आणि मंडल (बरोबर चूक हा वाद येथे नाही पण त्यामुळे भडका उडाला इतकेच);
  • ९०-२००० ९१ सालातली देशाची आर्थिक स्थिती, काश्मिरी दहशतवादातवाढ, निर्वासीत पंडीतांचा लोंढा, रामजन्मभूमी, मुंबई स्फोट;
  • २०००-२०१० अनेक दहशतवादी घटना, नक्षलवादी चळवळ

मात्र याच काळात काही अपवाद सोडल्यास यातील प्रश्नांवर मात करून आपण देश म्हणून जास्त प्रौढ होत गेलो. विशेष करून ९१ साली आर्थिक अवस्थेत भारताचे काय होणार असे वाटले असताना नंतर काय झाले ते आपण पहातच आहोत. तेच पोखरण २ नंतर. आता प्रगत राष्ट्रांच्या बहीष्कारामुळे आपले अवघड होणार असे वाटत असताना "आउटसोअर्सिंग" ह्या शब्दाने (सगळे यात चांगले नसले तरी) मध्यमवर्गाची आणि पर्यायाने देशाची स्थितीच बदलली. अर्थात २०००-२०१० च्या दशकातील दहशतवादाचा प्रश्न हा जागतिक असल्याने तो केवळ भारतापुरता सुटण्याची अपेक्षा बाळगता येणार नाही - त्याला आपल्यापुरते तोंड कसे देयचे ह्यावर चर्चा होते पण तो येथे मुद्दा नाही.

प्रश्न इतकाच पडतो की, आपण नक्की कशातून स्वतंत्र होत गेलो म्हणून विविध प्रश्नांना तोंड देऊ शकलो? मग त्यात देशाची सुरवातीस घडी बसवणे असेल, आणिबाणीचा विरोध असेल, नंतरची अर्थव्यवस्था असेल वगैरे. यातील कुठलीही एक गोष्ट केवळ राजकीय नेतृत्व, विचारांमुळे यशस्वी झाली असे म्हणता येणार नाही तर त्यात जनसामान्य देखील होते...

थोडक्यात भारतात काय कमी आहे याच्याबद्दल आपण कायमच बोलतो. त्यात देखील काही चूक नाही कारण ते तात्कालीक अनुभवांवर आधारीत असते. बहुतेकदा स्वानुभव. त्यामुळे तो विषय थोडासा बाजूला ठेवू. हजारो वर्षांचा "ग्रेटनेस" पण तुर्तास बाजूला ठेवूया आणि तशीच बाजूला राहूंदेत राजकीय/सामाजीक विचारांची मतभिन्नता....

तर ह्या संदर्भात खालील प्रश्नाचे तुम्हाला, वाटत असलेले वाचन, अनुभव, निरीक्षण आणि काही अंशीच भावना यावर आधारीत उत्तर वाचायला आवडेल:

आपण गेल्या सहा दशकात देश आणि समाज म्हणून कशा कशापासून स्वतंत्र झालो?

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

13 Aug 2010 - 3:14 pm | नगरीनिरंजन

समाजवादाच्या बुरख्याआडच्या परवाना राजमधून स्वतंत्र झालो ही एक नंबर गोष्ट झालेली आहे. स्कूटर साठी ५-५ वर्ष थांबणे आणि घरी फोन आला म्हणून पेढे वाटणे हे प्रकार पुन्हा होणार नाहीत. ही एक प्रकारची क्रांतीच म्हटली पाहिजे कारण आता सर्वसामान्य माणूसही कोणताही व्यवसाय उभारु शकतो आणि स्वतः बरोबरच इतरांचीही उन्नती करु शकतो.
प्रत्येक गोष्टीला हजारो पर्याय निर्माण झाले आहेत आणि माणसं हळूहळू स्वतःचा विचार करु लागली आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली आहेत.

नितिन थत्ते's picture

13 Aug 2010 - 3:38 pm | नितिन थत्ते

८०-९० च्या दशकात "आपण साधी राहणी उच्च विचारसरणी" या विचारधारेतून मुक्त झालो. त्याला कदाचित राजीव गांधी आणि त्यांचे डूनस्कूल मित्र यांची फ्लॅमबॉयंट स्टाइल जवाबदार असावी.

८०-९० च्या दशकात विकास हे एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख विसरले आहेत. तो म्हणजे आक्रमक हिंदुत्ववादाचा जन्म. त्यांनी रामजन्मभूमी चा उल्लेख ९० च्या दशकात केला आहे तो ८०च्या दशकात हवा. बजरंग दलाची स्थापना १९८४ मधली अडवानींची रथयात्रा ९० मध्ये संपली होती.

सहज's picture

13 Aug 2010 - 3:41 pm | सहज

१९६७ ते १९७८ - हरीत क्रांती मोठा टप्पा (इतर देशांवर अन्नासाठी अवलंबून असण्यातुन मुक्तता)

१९९२ ते २०१० - आय टी तसेच मिडीया बूम
तसेच गेल्या २० वर्षात बॉलीवूडची व क्रिकेटच्या धंद्याची भरभराट

वर •२०००-२०१० अनेक दहशतवादी घटना, नक्षलवादी चळवळ यात केकता कपूर व तिच्या जातभाईंचे इमोसनल अत्याचार?

मनमोहन सिंग यांनी आणलेल्या खुल्या आर्थिक धोरणामुळे मध्यमवर्गीय लोकांकडेही बर्‍यापैकी सुबत्ता आली. मोनोपॉली जी होती, एक कार येण्यासाठी नंबर लावावे लागत असत, वर्षानुवर्ष वाट पहात ताटकळत बसावं लागत असे त्या पासून मुक्ती मिळाली.

एवढ्या सगळ्या समस्या असताना देखील भारताने (का इंडिया ?) केलेली प्रगती नक्कीच आश्चर्यकारक आहे !
म्हणूनच बहुतेक भारत बद्दल सगळ्या जगाला एक गुढ आकर्षण आहे
एवढ्या हजारो-लाखो छोट्या मोठ्या समस्या असताना भारताचा हा गाडा पुढे कसा चालला आहे .. ?
कोणी हि मोठा/प्रभावकारी नेता नाही ,जनते मध्ये म्हणावे तेवढे देशप्रेम स्वयाशिस्त नाही .. विचार करू न हि ह्या प्रगती चे गमक सापडत नाही ...

भारताला हत्तीची उपमा सगळ्यात योग्य आहे ..असे वाटते कोणी निंदा किंवा वंदा शान्तपणे पुढे जातो आहे
आणि आपण मात्र ७ आंधळ्या सारखे ह्याचे खरे स्वरूप पाहू शकत नाही

मेरा भारत महान !!!

धनंजय's picture

13 Aug 2010 - 7:43 pm | धनंजय

चांगला आढावा.
प्रत्येक पिढीसाठी नवीन-नवीन समस्या उभ्या राहातील.
त्या अनुषंगाने प्रौढत्व येते आहे, या विचार योग्य वाटतो.

१. "सर्व काही पूर्वीपेक्षा आणि अंततोगत्वा सुस्थितीत आहे."
२. "सर्व काही पूर्वीपेक्षा आणि अंततोगत्वा दु:स्थितीत आहे."
३. "सर्व काही चांगले-वाइटाचे मिश्रण आहे, त्यामुळे ठेविले तैसेचि राहावे."
हे तीन्ही मतप्रवाह योग्य नव्हेत.

"पूर्वीच्या काही समस्या सुटल्या आहेत, पण आजही समस्या आहेत, नवीन समस्याही उद्या उद्भवतील. पूर्वीच्या काही समस्या सुटण्याच्या यशातून आजच्या समस्येबाबत दुर्लक्ष होता कामा नये. मात्र पूर्वीच्या काही समस्या सुटल्याच्या अनुभवामुळे ही स्फूर्ती घ्यावी, की आज-उद्याच्या काही समस्या प्रयत्नांती सुटू शकतील."
अशी काही मनोभावना असावी.

राजेश घासकडवी's picture

14 Aug 2010 - 8:03 am | राजेश घासकडवी

शेवटचं, अवतरणांतलं विधान हे इतकं सर्वसाधारण आहे की त्याला जवळपास फारसा अर्थ राहात नाही. माझ्या मते

"सर्व काही पूर्वीपेक्षा आणि अंततोगत्वा सुस्थितीत आहे." हे सत्य परिस्थितीच्या खूप जवळ जातं.

- १९७५ ते २००९ दरम्यान यु एन डि पी ने ह्युमन डेव्हेलपमेंट इंडेक्स मोजलेला आहे. देशातल्या लोकांचं आरोग्य, शिक्षण, व उत्पन्न या तिन्हीचा मिळून हा निदर्शक आहे. भारताच्या बाबतीत तो ०.३९ वरून ०.६१ वर तो गेलेला आहे - दर वर्षी सतत वाढत. याचा अर्थ सुमारे पस्तीस वर्षांपेक्षा आताचा भारतीय समाज अधिक सुधृढ, अधिक श्रीमंत व अधिक सुशिक्षित आहे.
- या निदर्शकाच्या निमित्ताने इतर आकडेवारीही गोळा केली जाते - पाण्याची उपलब्धता, सांडपाण्याची सोय, स्त्री-पुरुष समानता - या सर्व बाबतीत सातत्याने प्रगतीच दिसून आलेली आहे. १९४७ ते १९७५ पर्यंतची आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध नाही, पण माझा कयास आहे की त्या दरम्यानही थोडीबहुत प्रगतीच सर्व आघाड्यांवर झाली.
-बालमृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर घटलेली आहे.
-कार, टीव्ही, फोन, फ्रिज यासारख्या एकेकाळी चैनीच्या समजल्या गेलेल्या गोष्टी (~५ ते १० टक्के घरांत असलेल्या) आता तितक्या चैनीच्या मानल्या जात नाहीत (~२० ते ६० टक्के घरांत)
-मोबाईल व कंप्युटर्स या एके काळी नसलेल्या सुविधा आता आहेत. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात त्यांनी प्रचंड फरक पडलेला आहे.
-लोकशाही अधिक सुधृढ आहे - सत्तर, ऐशीच्या दशकांत बूथ कॅप्चर सर्रास असे आता ते अतिशय तुरळक किंवा जवळपास नाहीच
-माध्यमं अधिक प्रभावी आहेत - साक्षरतेची वाढ, तंत्रज्ञानाचा विकास, याबरोबर माध्यमं अधिक घरी पोचतात. इंटरनेटसारखी, मोबाईलसारखी नवीन माध्यमं उपलब्ध झाली आहेत.
-दळणवळण व्यवस्था सुधारलेली आहे - नवीन रस्तेबांधणी, फोनच्या सुविधा, मोबाईल यामुळे संपर्क व दळणवळण यात वाढ झालेली आहे.
-दुष्काळ आटोक्यात आलेले आहेत. १९४३ सालच्या बंगालच्या दुष्काळात ३० लाख लोक मेले. आता त्याच्या सहस्रांशांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर गदारोळ उठतो.

इतर अनेक उदाहरणं देता येतील. पण एवढं पुरेसं आहे असं वाटतं.

वेताळ's picture

13 Aug 2010 - 8:14 pm | वेताळ

समस्या असल्यातरी आपण खुपच प्रगती केली आहे. हे १५ ऑगष्टला सगळी कडे दिसते.लोक त्या दिवशी किलो किलोने जिलेब्या खात असतात. किती तरी महागाई असली तरी जिलेब्या स्टॉलची संख्या वर्षाला वाढत आहे हे सांपत्तिक परीस्थिती सुधारल्या चेच लक्षण आहे.

सुनील's picture

13 Aug 2010 - 8:44 pm | सुनील

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात! सुरुवातीची जडणघडणीची वर्षे माणसाच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवतात.

मनुष्यजातीचे उदाहरण घेतले तर, नंतरच्या काळात अक्षरशः अगणित शोध लावणार्‍या मानवाने, आपल्या सुरुवातीच्या काळात लावलेले नियंत्रित अग्नी, शेती आणि चाक हे शोध फार फार महत्त्वाचे होते. मानवाच्या पुढील पिढ्यांच्या प्रगतीचा पाया ह्या तीन शोधांनीच भरला होता, असे म्हणायला हरकत नाही.

आता स्वतंत्र भारत हे एक बालकच आहे असे समजले तर, सुरुवातीच्या जडणघडणीच्या काळात त्याने केलेले कार्य आपण पाहिले, तर काय दिसते?

काही आंबट काही गोड!

सुरुवातीच्या काळात बांधली मोठमोठी धरणे. ह्याने हरितक्रांतीचा पाया घातला. धान्याचा कटोरा घेऊन जन्मलेल्या भारताच्या हातात नंतरच्या काळात हा कटोरा फेकून देण्याची क्षमता आली. त्याचा पाया ह्या धरणांनीच घातला होता.

आता मोठ्या धरणांची आवश्यकता आहे काय, असा प्रश्न जगभरच विचारला जातोय. तो अगदीच अनाठायी नाही.

नवजात स्वतंत्र भारताने टाकलेले दुसरे पाऊल म्हणजे, राष्ट्रीकृत अवजड उद्योगांची उभारणी. कारखानदारी वाढवायची तर, उर्जा, पोलाद इ. उद्योगात स्वयंपूर्णता हवी. ह्या उद्देशाने सरकारी पुरस्काराने असे अनेक उद्योग उभारले गेले. त्या काळात फारच थोड्या खाजगी उद्योगांना प्रचंड गुतवणूक करणे शक्य होते, तेव्हा सरकारने हे उद्योग चालवणे क्रमप्राप्तच होते. त्याने भारतात कारखानदारीचा पाया घातला हे म्हणणे अनाठायी ठरू नये.

आज हे उद्योग पांढरा हती बनून राहिले आहेत. त्यापैकी काहींचे खासगीकरण करणे भाग पडते आहे.

तिसरे, जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था. आयआयटी, आयाआयएम सारख्या संस्थांची उभारणी हे देशाला अभिमानास्पदच. परंतु, प्राथमिक शिक्षणाकडेही तितकेच लक्ष देणे जरूरीचे होते, नाही काय?

असो, तूर्तास इतकेच!

पण अजुन चांगलं होऊ शकत होतं....इस्राएलसुद्धा आपल्याच वयाचा आहे तरीसुद्धा पहा कुठे पोहोचला आहे. सतत होणारया नेत्रुत्व आणि विचारसरणी बदलाचा आपल्याला चांगलाच फटका बसला आहे.

नितिन थत्ते's picture

13 Aug 2010 - 10:12 pm | नितिन थत्ते

१-इस्रायलमध्ये कितीवेळा [नेतृत्वबदल] होत असतात याची कल्पना कोणास आहे का?

२- १९९१ नंतर भारताची प्रगती वेगाने झाली असे म्हटले तर तेव्हापासून सगळीच सरकारे आघाड्यांची होती.

शरभ's picture

14 Aug 2010 - 1:16 pm | शरभ

तुम्ही दिलेली यादी वाचली. पण त्या सर्वांच उद्दीष्ट आणि विचारसरणी एकच....आणि ते म्हणजे इस्राएलची प्रगति....
आपल्याबद्दल काय बोलणार्...एक कॉमनवेल्थ गेम्सचंच उदाहरण घ्या ना....अजुन काय...बाहेरच्या देशात लोकं हसतात...प्रगति होतेय म्हणणार्यानी आपल्या घरासमोरील रस्त्याची हालत बघावी (अनासाये पावसाळा पण चालुच आहे)...किंवा कुठल्याही शहरातील झोपडपट्टी बघावी...(ही कधीही बघु शकता....इथे season पाळण्याची गरज नाही...)

नितिन थत्ते's picture

14 Aug 2010 - 1:37 pm | नितिन थत्ते

>>तुम्ही दिलेली यादी वाचली. पण त्या सर्वांच उद्दीष्ट आणि विचारसरणी एकच....आणि ते म्हणजे इस्राएलची प्रगति....

भारताच्या पंतप्रधानांपैकी कोणत्या पंतप्रधानांचे उद्दिष्ट भारताची प्रगति हे नव्हते हे सांगू शकाल का?

समंजस's picture

14 Aug 2010 - 3:56 pm | समंजस

चला आता थोडं वेगळं बोलू या :)
अंमलबजावणी बद्दल काय? त्यात सुद्धा आपली सर्व सरकारे/प्रधानमंत्री हे इस्राएलच्या तोडीस तोड आहेत का??

[अवांतर: भारताच्या प्रगति चं उद्दीष्ट ठेवणार्‍या आपल्या सर्वच प्रधानमंत्र्यांपैकी एक म्हणजे राजीव गांधी ह्यानींच कुठेतरी कबूली दिली होती की सरकारी योजनांमधे टाकल्या जाणार्‍या १०० पैंशा पैकी फक्त १५ पैसे च लोकांपर्यंत पोहोचतात. इस्राएलमधे किती पोहोचत असतील?? १५ की १० ?? ]

नितिन थत्ते's picture

14 Aug 2010 - 4:14 pm | नितिन थत्ते

कल्पना नाही. ते इस्रायलच्या पंतप्रधानांना विचारावे लागेल.

शरभ's picture

15 Aug 2010 - 12:04 am | शरभ

उद्दिष्ट असणं आणि ते साध्य करणं यात फरक असणारच....आता दोन्ही देशांमधील फरक तर दिसतो आहे...
साहजिकच आपलं काही तरी चुकलय...

वेताळ's picture

13 Aug 2010 - 10:28 pm | वेताळ

इस्त्राइलने खुप प्रगती केली आहे. ह्या वयात त्याना भारतापेक्षा जास्त शत्रु आहेत अन तिथे १८ वयाच्या सर्वाना सक्तीने सैन्यात लढायला जायला लागते.

चिरोटा's picture

14 Aug 2010 - 5:19 pm | चिरोटा

भारत इस्रायलपेक्षा १४५ पट आकाराने मोठा आणि एस्रायलची लोकसंख्या मुंबईपेक्षाही कमी. दोन्ही देशांपुढची आव्हाने,गरिबी,आरोग्य,शिक्षण ह्या समस्याची अर्थातच तुलना होवू शकत नाही. इस्रायलने नेत्रदिपक कामगिरी केली आहे ह्यात वाद नाही. अर्थात भारताला सद्य परिस्थितीपेक्षा बरेच काही चांगले करता आले असते हे ही मान्य आहे.

चिरोटा's picture

13 Aug 2010 - 10:50 pm | चिरोटा

बर्‍याच गोष्टींपासुन स्वतंत्र झालो .अर्थात त्यामागे जागतिक किंवा इतर काहीही कारणे असु शकतील.
१) अंधश्रद्धा-पूर्णपणे गेली नसली तरी एकंदरीत बर्‍याच अंशी अंधश्रद्धा कमी झाली आहे असे म्हणता येइल.
२) अंतर- देश सोडा, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात नोकरी धंद्याला जाताना जीवावर येई.वाहतुकीच्या साधनांमुळे ते सुलभ झाले.
३) परमीट राज- वर उल्लेख आला आहेच्.टेलिफोन्,स्कूटर्,रेल्वे/बस आरक्षणची उपल्ब्धता.
४)सेठजी मानसिकता- परमीट राज गेल्याने लोकांमध्ये असलेली सेठजी मानसिकता बर्‍याच अंशी गेली.शि़क्षण्/बुद्धी/कष्टाच्या जोरावर हुजरेगिरी न करता नोकरी धंदा करुन चांगले जीवन जगता येते हे सिद्ध झाले.
५)अज्ञान- सर्वच सरकारांनी शि़क्षणाच्या प्रसाराला पाठिंबा दिला.मोबाइल्,इंटरनेट्,संगणक ह्या बाबतीत चांगले धोरण स्वीकारल्याने सर्वाना बराच फायदा झाला.
६) रोग-देवी वगैरे अनेक रोगांचे पूर्ण उच्चाटन झाले. ह्या क्षेत्रात अर्थात बरेच काही करायचे बाकी आहे.

वर उल्लेखलेल्या सर्व मुद्द्यांत खूप कौतुकास्पद नसली तरी २/३/४/५ पासुन आपण बर्‍यापैकी स्वतंत्र झालो असे म्हणता येईल.

--

१. आउटसोर्सिंगमुळे देशाची, समाजाची आर्थिक परिस्थिती व राहणीमान बदलले असले तरीही हा उद्योग मूलतः सेवाक्षेत्रात (आय टी सर्विसेस) फोफावला असल्याने आणि परदेशांतून येणार्‍या गरजांवर, ऑर्डर्सवर अवलंबून असल्याने स्वतंत्र म्हणवत नाही. भारतात आय टी मधील प्रचंड गुणवत्ता असताना तेथील कोणत्याही आय टी कंपन्यांचे स्वतःचे जागतिक गुणवत्तेचे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट नसावे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे (इन्फोसिस चे फिनॅकल किंवा युनिट ट्रस्ट ऑफ इन्डिया, स्टेट बँक ऑफ इन्डिया यांसारख्यांसाठी टीसीएस ने तयार केलेल्या प्रणाली या एखाद-दोन अपवाद समजता येतील. पण भारतातून मायक्रोसॉफ्ट विन्डोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा तत्सम प्रॉडक्ट तयार झालेले नाही (नि होत नाही) ही गोष्ट दुर्लक्षित करून चालायची नाही)
२. जी गोष्ट आउटसोर्सिंग ची तीच मॅन्युफॅक्च्युअरिंग ची आहे, असे वाटते. चीन, तैवान, मलेशिया, सिंगापूर इ. पूर्व व आग्नेय आशियांत फोफावलेला उत्पादनाचा धंदा भारतात रुजलेला नाही, समाधानकारकरित्या भरभराटीस आलेला नाही.
त्यामुळे सॉफ्टवेअर डेवलप्मेन्ट, मॅन्युफॅक्च्युअरिंग या आघाड्यांवर भारत अजूनही स्वतंत्र नाही, असे (मला) वाटते. चू. भू. द्या. घ्या.

चिरोटा's picture

14 Aug 2010 - 8:11 am | चिरोटा

पण भारतातून मायक्रोसॉफ्ट विन्डोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा तत्सम प्रॉडक्ट तयार झालेले नाही (नि होत नाही) ही गोष्ट दुर्लक्षित करून चालायची नाही

सहमत आहे. पण तसे रशिया/इंग्लंड/कॅनडा मधुनही नाही(ब्लॅक बेरी सारखे काही अपवाद असतील).कुठल्याही उद्योगधंद्यात आघाडी घ्यायची असेल तर right time right place महत्वाचे असते. शिवाय मानसिकता वगैरेही कारणे असतात. भरभराट झालेल्या अमेरिकन सॉफ्टवेयर कंपन्यांची सुरुवातच ७०च्या दशकात वा ८०च्या मध्यापर्यंत झालेली दिसेल.आपल्याला संगणक म्हणजे काय हे कळायला ८५-८६ साल उजाडले. तो पर्यंत वेळ निघुन गेली होती. सुदैवाने नंतर बर्‍यापैकी प्रसार झाल्याने आउटसोर्सिंगचे प्रमाण वाढले.
---

अमेरिकेच्या तुलनेत भारताची सुरुवात उशीरा झाली हे मान्य. इंग्लंड, रशिया, कॅनडा यांच्याकडे स्वतःचे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट नाही, हेही मान्य. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्या ब्लॅकबेरीचे, वोडाफोनचे जसे भारतात ग्राहक आहेत, तसे भारती एअरटेलचे परदेशात ग्राहक नाहीत, हे विसरता यायचे नाही. तसेच या देशांकडे भारताच्या तुलनेत आय टी किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रातले कुशल मजूर कमी असावेत. असे असताना मी इंग्लंड, रशिया, कॅनडापेक्षा सॉफ्टवेअर प्रॉडक्ट ची अपेक्षा भारत (झालंच तर चीन; पण ते भाषेत जरा मार खातात) देशाकडूनच ठेवेन :)
(आशावादी)बेसनलाडू

हल्ली बर्‍याच (अमेरिकन व इतर परदेशी) कंपन्या इमर्जिंग मार्केट्स म्हणून आफ्रिकेतील आणि मध्यपूर्व आशियातील व्यापारावर लक्ष केंद्रित करू पाहत आहेत. भारतीय कंपन्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट्स बनवणे ही पहिली पायरी, ते देशी आणि मग विदेशी बाजारपेठांमध्ये नेणे, ही दुसरी पायरी. सांगायचा मुद्दा हा की भारतीय कंपन्यांना (अमेरिकन आणि इतर परदेशी कंपन्यांच्या तुलनेत) सतत उशीरानेच जाग येत राहिली, तर काही फायदा नाही.
(दूरदर्शी)बेसनलाडू

या स्थितीला मूलभूत संशोधनाचा अभाव किंवा त्याला आलेली मरगळ, हेही कारण असू शकेलसे वाटते. पाचव्या-सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतन आणि निवृत्तीवेतन मिळते की नाही, याचीच काळजी असणार्‍या प्राध्यापकांचा वर्ग किती मोठा आहे, हा आकडा पाहणे रोचक ठरावे. त्या तुलनेत जगातील विविध संशोधनाभिमुख कॉन्फरन्सेसमध्ये पेपर्स सादर करणार्‍या, चांगले संशोधन प्रस्ताव भारतातील खाजगी कंपन्यांकडे घेऊन जाऊन त्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करणार्‍या संशोधनाभिमुख प्राध्यापकांचा भारतातील आकडा किती आहे, हे जाणून घेणेही तितकेच रोचक ठरेल.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

या बाबतीत प्रा. कृती रामामृतम यांचा भारतातील संगणाकशास्त्रातील संशोधन या विषयावरचा संक्षिप्त अहवाल येथे वाचता येईल. सविस्तर अहवाल येथे वाचता येईल. या अहवालातील क्र. ५ आणि ६ च्या मुद्द्यात संशोधनासाठी लागणार्‍या प्रयोगशाळा आणि साधनसामग्रीतील (प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाच्या) अडचणी आणि पेपर्स पब्लिश आणि प्रेजेन्ट करण्यातील उदासीनता यांविषयीचे निष्कर्ष वाचता येतील.
(दुवादार)बेसनलाडू

हे वाचनात आले.
(सावध)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

14 Aug 2010 - 12:48 am | भाग्यश्री

चर्चा वाचत आहे..

मला भर घालता येणार नाही, परंतू चर्चेची/लेखाची मांडणी खूप आवडली हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद!
प्रतिसादांतील माहितीही उपयुक्त..

आपली प्रगती निश्चितच चांगली आहे. १०० कोटींच्या वर असलेल्या लोकसंख्येला पोसायच म्हणजे चेष्टा नव्हे.

पण काही गोष्टी मात्र लवकरच सुधारल्या पहिजेत.
१. जातिय राजकारण.
२. कोटा पध्द्त. गरीब लोकांना, अदिवासींना शि़क्षणात नक्कीच सवलत पाहिजे पण केवळ आज एक अमुक जातीचा आहे म्हणुन त्याला नोकरीत, शिक्षणात सवलत मिळते हे लगेच थांबवायला पहिजे.
३.राजकारणात मंत्रीपद पाहिजे असेल तर शै़क्षणिक पात्रता कमित कमी ग्रॅज्युएट तरी पाहिजे.
४.लवकरात लवकर न्याय. न्यायव्यवस्था सुधारणेची खुप मोठी गरज आहे.
५.सर्व क्षेत्रात संशोधनावर भर

तिमा's picture

14 Aug 2010 - 1:15 pm | तिमा

पूर्वीच्या तुलनेने प्रगती तर नेत्रदीपक झाली आहे. पण ती सर्वांपर्यंत सारखी पोचली नाही. आदिवासी नक्षलवादात ओढले जाणे हे त्याचेच लक्षण आहे.
मूलभूत संशोधन जगाच्या तुलनेने कमी होते. काँप्युटर क्षेत्रांत सॉफ्ट्वेअर मधे जेवढी प्रगती आहे तेवढी हार्डवेअर उत्पादनात झाली का नाही याची कल्पना नाही, पण झाली नसावी असे वाटते.
वाढती लोकसंख्या ही मोठी समस्या आहे. पण सरकार या विषयाकडे दुर्लक्ष करत आहे असे वाटते.

शानबा५१२'s picture

14 Aug 2010 - 5:10 pm | शानबा५१२

बैलगाडीपासुन

ऋषिकेश's picture

14 Aug 2010 - 5:25 pm | ऋषिकेश

काहि मुख्य क्षेत्रांत मिळालेले यश बघुया
शिक्षण
सर्व शिक्षा अभियान
राईट टु एज्युकेशन
एआयसीटीईची स्थापना
मुक्त विद्यापिठे आणि नीओस
आय.आय.टी / आय.आय.एम्/आय.आय.एस.सी/आर.ई.सी
प्रौढ साक्षरता वर्ग

संस्कृती
निरोगी उत्सवप्रियता
बेटीव्यवहार सोडल्यास सर्वधर्मसमभाव व त्यापेक्षा जातीभेदाची कमी
समाजाने स्वपरिक्षणाने केलेला अनिष्ट प्रथांचा त्याग
सर्व स्थानिक भाषांच्या संगोपनाचा प्रयत्न
स्वतंत्र सशक्त बॉलिवूड
सहकारी ब्यांका, ग्रामिण ब्यांका, राष्ट्रीय बचत योजना वगैरे

अर्थ
(मानवी चेहरा सांभाळत बाळगलेली) मुक्त अर्थव्यवस्था
आऊटसोर्सिंगचा उदय व विस्तार
नव्या तेलसाठ्यांचा शोध
अनेक नव्या खाणींचा शोध
हरीतक्रांती - अन्न स्वयंपूर्णता
दुग्धक्रांती - दूध स्वयंपूर्णता
टेलिकॉम क्रांती - स्वस्त संवाद स्वयंपूर्णता
भारतीय रेल्वे व सुधारलेले रस्ते (दळणवळाचे स्वातंत्र्य)

राजकारण / प्रशासन
लोकशाहीचा विस्तार व सदृढता
पंचायत समित्यांची स्थापना व अंमलबजावणी
ग्राम स्वच्छता अभियानाची व सर्वशिक्षा अभियानाची अंमलबजावणी
सुवर्ण चतुष्कोण योजना
निवडणूक आयोगाचे सशक्तीकरण व आधुनिकता
आर्थिक स्वावलंबित्त्व
आंतरराष्ट्रीय राजकारणातील स्थानात वृद्धी
माहीती चा अधिकार व त्याची अंमलबजावणी

संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान
आण्विक सुसज्जता व आत्मनिर्भरता
सैन्या व संरक्षण यंत्रणेतील आधुनिकता
अवकाशात घेतलेली झेप व उपग्रहाची स्वायत्तता व स्वातंत्र्य
भारतीय आयुर्वेद, योग वगैरेचा प्रसार व प्रचारातील प्रगती

अजून फार मोठी लिस्ट आहे... तुर्तास एवढंच

अवांतरः इस्त्रायलमधील भयाण परिस्थिती माहित नसताना/असतान भारताच इस्त्रायलबरोबर उगाच केली जाणारी तुलना खटकली

शरभ's picture

15 Aug 2010 - 12:13 am | शरभ

कोणी सांगितलं तुम्हाला की ईस्राएल मधे भयानक परिस्थिती आहे ते ? ( ती आहे गाझामधे ....)
भले त्यांनी ६ युद्धे खेळली असतील ....पण आता सुखी आहेत....स्वतःच्या बळावर त्यांनी अंतर्गत शांतता प्रस्थापित केली आहे....Ofcourse त्यात त्यांच्या मिलिट्रीचा वाटा मोलाचा...पण सार् या देशात एक शिस्त आहे....

विकास's picture

15 Aug 2010 - 8:18 am | विकास

शुक्रवारी (१३ ऑगस्टला) पहाटे पहाटे बाहेर गावी जाण्या आधी असेच सुचले म्हणून तात्काळ लिहीले खरे, पण नंतर प्रतिसाद देण्यास आत्तापर्यंत वेळ मिळाला नाही, नंतर काही तासांपुर्वी लिहीले आणि अचानक डिलीट झाले त्यामुळे अजूनच वेळ लागला, म्हणून क्षमस्व!

सर्वप्रथम सर्व प्रतिसादक आणि वाचकांचा आभारी आहे, तसेच भारतीय स्वातंत्र्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा!.

खाली काही उत्तरे/प्रतिक्रीया देण्याचा प्रयत्न करत आहे. नजरचुकीने कोणी राहीले असल्यास क्षमस्व..त्यात केवळ लेखात म्हणल्याप्रमाणे सकारात्मकच भागाबद्दल लिहीत आहे. त्याचा अर्थ नकारात्मक नाही असा नाही. त्यावर भरपूर लिहीता येईल. पण भारत आणि भारतीय म्हणून एकत्रित बलस्थाने जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे, दुर्बलता नव्हे. या संदर्भात जगाच्या पाठीवर कुठेही रहात असलो तरी भारतीय / भारतीय वंशाचे म्हणून भारताच्या विकासात आपल्या सगळ्यांचाच स्वार्थ आहे असे वाटते. असो.

नगरीनीरंजन आणि शुची यांनी मांडलेला परमिटराज पासून स्वातंत्र्य मिळाले हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्याचा परीणाम उद्योग वाढायला आणि बर्‍याच अंशी साधने तर काही अंशी संपत्ती पसरायला मदत झाली असे वाटते.

नितिन यांच्या, "आपण साधी राहणी उच्च विचारसरणी", या विधानाशी आणि त्या संदर्भातील अनुमानाशी सहमत. रामजन्मभूमी प्रकरणाचा उल्लेख मी ९० व्या दशकात केला कारण मी ज्या घटनेमुळे, "भारताचे काही खरे नाही" अशी अनेकांची भावना झाली त्या संदर्भात मी ९० व्या दशकात म्हणले. ८० व्या दशकात अजून एक गोष्ट विसरलो म्हणजे "पंजाबमधील उद्रेक" ज्याच्या दहशतवादाचे परीणाम देशभर भोगावे लागत होते आणि त्यासंदर्भात देखील "देशाचे कसे होणार? (फाळणी होणार का?)", असे वाटू लागले होते.

सहज यांचा हरीत क्रांतीचा मुद्दा महत्वाचा आहे. कधीकाळी अमेरिकेच्या कमी प्रतीचा गहू घेण्याची आलेली वेळ आणि नंतरचा भारत यातील फरक खूप अभिमानास्पद आहे. माध्यमांचे स्वातंत्र्य देखील असेच आहे... आज माध्यमे वाढली नसती तर अनेक कलाकार, लेखक, कवी, वगैरे कधी कळलेच नसते. तसेच विश्लेषण करताना एकाच विचारांच्या माध्यमांवर अवलंबून रहावे लागत नाही हा अजून एक मुद्दा...

वेताळ यांनी सांगितलेले उदाहरण प्रातिनिधिक आहे. भारतात नक्कीच जनतेकडे "खेळते" भांडवल येऊ लागले आहे. (आमच्यासारखे जेंव्हा बाहेरून येतात आणि जेंव्हा भारत सोडला त्या १५-२० वर्षांपुर्वीच्या वेळच्या भारतातील परीस्थितीशी तुलना करतो, तेंव्हा अक्षरशः सद् मा मधील कमला हसन होतो!)

सुनील म्हणतात तसे खरेच खट्टामिठा आहे. पण आपण एकूणच प्रगतीच्या संदर्भात जे सुरवातीस जडत्वाने बांधलेले होतो (असे केले तरच होणार) त्यातून स्वातंत्र्य मिळवून लवचिक होऊ लागलो आहोत, हे परमिटराज समाप्ती, खुली अर्थव्यवस्था वगैरे मधून दिसत आहे...

विदुषक म्हणतात तसे अनेकांना आश्चर्य वाटते. भारताला गंमतीत, "functioning anarchy" असे देखील म्हणल्याचे आठवते.

धनंजय यांचे, "मात्र पूर्वीच्या काही समस्या सुटल्याच्या अनुभवामुळे ही स्फूर्ती घ्यावी, की आज-उद्याच्या काही समस्या प्रयत्नांती सुटू शकतील." , हे विधान या चर्चेसंदर्भात चपखल आहे. "इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा, करा पदस्थल त्यावर आणिक, चढून त्यावर भविष्य वाचा" ही विंदांची चारोळी त्या संदर्भात आठवली.

राजेश आणि ऋषिकेश यांनी अनेक चांगले मुद्दे समोर आणले त्या बद्दल दोघांचा आभारी. राजेश यांच्या बंगालचा दुष्काळ आणि शेतकर्‍यांची आत्महत्या यांच्या तुलने संदर्भात इतकेच म्हणावेसे वाटते की आता होणारी ओरड हे स्वातंत्र्याचे द्योतक आहे. ज्यावेळेस भारतीयांना स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची मनापासून काळजी वाटायला लागेल तेंव्हा अनेक प्रश्नांसंदर्भात योग्य दृषीकोन मिळेल असे वाटते..

शरभ तसेच इतरांनी देखील भारताची इस्त्रायलशी केलेली तुलना तितकीशी योग्य वाटत नाही. इस्त्रायल कडून घेण्यासारखे बरेच काही आहे या बाबत मी सहमत आहे, मात्र ते एखाद्या कुकी कटर प्रमाणे आपल्या प्रश्नांना पण उत्तर ठरू शकेल असे वाटत नाही. आपली उत्तरे शोधायला आपलीच बलस्थाने काय याचा विचार महत्वाचा आहे, इतरांना कशा मुळे जमले हे समाजाचे प्रश्न सोडवताना उपयोगी नाही, ते देखील ज्या समाजाच्या सवयी हजारो वर्षांच्या आहेत... त्यात भेंडी बाजार यांनी मांडलेला, आकार, लोकसंख्येचा मुद्दा पण आहेच.

भेंडी बाजार यांच्या जात-धर्म-शिक्षणाच्या निरीक्षणाशी देखील सहमतच.

सरते शेवटी बेसनलाडू यांनी मांडलेल्या मुद्यांशी सहमत. असे नक्की वाटते की आजही आपली अवस्था, "संशोधक, निर्माते सारे तिर्‍हाईत, आम्ही मात्र राहीलो फक्त गिर्‍हाईक" या सोपानदेव चौधरींच्या कवितेसारखी आहे खरी. मात्र त्यासाठी जरा वेळ द्यावा लागतो.... एकच उदाहरण या संदर्भात देतो, केवळ आशावाद म्हणून नाही, तर समाजात घडणारे बदल हे दिसायला वेळ लागतात हे सांगायला - अर्थातच हे देखील सकारात्मकच उदाहरण आहे:

८०च्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, स्वतः केवळ चौथी पास, पण जेंव्हा लक्षात आले की काळ बदलत आहे, तेंव्हा खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालये उघडण्याचे धोरण जाहीर केले. जेंव्हा टिका झाली की यातून कोणीही काही काढेल, तेंव्हा म्हणाले, पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या येतात तसे होईलही आणि होऊंदेत, पण त्यातील चांगले टिकेल आणि त्यांच्यातील स्पर्धांमुळे नवीन शैक्षणीक केंद्रे तयार होतील. आजही सर्व आदर्श आहे असे कोणीच म्हणू शकणार नाही. पण विचार करा जिथे काही जणांनाचा आय आय टी आणि नऊ सरकारी अभियांत्रीकी महाविद्यालयात जागा मिळू शकत होत्या, ते सर्व बदलले. त्यातील अनेक जण बाहेर देखील शिकायला गेले (म्हणजे त्यांचे शिक्षण मान्य झाले) तसेच त्यातून सॉफ्टवेअरला लागणारे अनेक अभियंते मिळाले, ज्याने अनेकांचे व्यक्तिगत तसेच, राज्याचे आणि देशाचे भले झाले. ही एक पायरी आहे. आज परदेशात जाणे नवीन नाही अशी चांगली अवस्था आहे. याचा कधी कोणी विचार केला होता का? बॅक टू द फ्यूचर मधील १९५५ सालातल्या शास्त्रज्ञाला जेंव्हा अमेरिकेत जपानी माल खपतो हे समजले तेंव्हा जसा अविश्वास वाटला तसेच काहीसे हे आहे... जगात काय चालले आहे हे या देशाटन/मैत्री/सभेत संचार करून अनेकांना समजू लागले आहे... समाजाच्या बर्‍याच भागाचा आता पोटोबा भरू लागला आहे, त्यामुळे विठोबाकडे लक्ष जाईलच अशी खात्री आहे.

मात्र हे सगळे होत आहे कारण जनता तितकी लवचीक आहे आणि महत्वाकांक्षी आहे म्हणून. हे लक्षात ठेवावे. केवळ नेता चांगला असून चालत नाही आणि नेत्याच्या नुसते मागे लागून चालत नाही. मार्क टलींनी म्हणल्याप्रमाणे, वडाच्या झाडाखाली काही उगवत नाही, हे भारतीय जनता शिकत आहे. ते जितके जास्त लक्षात येईल तितके आपण जास्त वैभवशाली तर होऊच पण त्याला साजेसे नेतृत्व देखील तयार होऊ लागेल असे वाटते...

मदनबाण's picture

15 Aug 2010 - 6:52 pm | मदनबाण

१२ ऑक्‍टोबर २००५ पासून माहितीचा अधिकार देशभर लागू झाला.
http://alturl.com/errux
देशातील नागरिकांनी, मिडीयांनी या अधिकाराचा मोठ्या प्रमाणात वापर करुन भ्रष्टाचारी नेत्यांना आता नागवण्यास सुरुवात केली पाहिजे.
आज स्वातंत्र्य मिळुन ६३ वर्ष झाली तरी आपल्या देशात धड रस्ते नाहीत !!! सरकार दुनियेला हिंदुस्थानाचा जीडीपी ग्रोथ (http://www.indexmundi.com/india/gdp_real_growth_rate.html)
सांगत बसतेय पण देशात साधे रस्ते नाही याची लाज कोणालाच वाटत नाही,ना राजकारण्यांना ना लोकांना!!!
कोणी प्रश्न विचारायचे कष्ट घेत नाही,कोणी जाब विचारत नाही. आपल्या देशात रस्ते बनवणे या सारखे पैसे छापण्याचे दुसरे साधन नाही. जिवो जिवस्य जिवनम याचा खरा अर्थ शोधुन काढायचा असेल तर हिंदुस्थानातले रस्त्यांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल...डांबर,सिंमेंट आणि आता पेव्हर ब्लॉक अशी हिंदुस्थानी रस्त्यांनी प्रगती केली आहे...(प्रत्येक कॉट्रॅक्टरला खोर्‍याने पैसा मिळवता येतो...त्यांनी बांधलेल्या रस्त्यांचा दर्जा कोण बघायला येतोय ?) खड्यांन मधल्या रस्त्यातुन करोडो हिंदुस्थानी रोज प्रवास करतात...अशा रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होउन करोडो रुपयांचे इंधन रोज फुकले जाते.
सध्या सर्वत्र पेव्हर ब्लॉक कसेही रचुन रस्ते भरण्याचे (बनवणे नाही) पेव फुटले आहे, आणि हा कमाईचा मोठा पर्याय उपलब्ध झाला आहे. मला आत्ता पर्यंत कुठेच पेव्हर ब्लॉकने बांधलेला रस्ता सुस्थितीत आहे असे दिसले नाही; पण पेव्हर ब्लॉकने बांधलेले रस्ते खचलेलेच पाहिले आहेत.हे रस्ते इतके भयानक आहेत की कोणाचाही मॄत्यु ओढवु शकतो इतकी वाईट अवस्था असते या रस्त्यांची...


हे फोटो ठाण्यातल्या हायवेचे (माजिवडा येथील) आहेत ज्यावर असे पेव्हर ब्लॉकचे बांधकाम करण्यात आले आहे; तुम्हाला दिसेल की अनेक ठिकाणचे पेव्हर ब्लॉक निघाले आहेत किंवा रस्त्याला कुठलीही लेव्हल नाही... आणि ही अशी अवस्था असताना याच रस्त्यावर पेव्हर ब्लॉकने रस्ता बनवण्याचे काम अविरतपणे चालु आहे...म्हणजे जो भाग खचला आहे,तुटला आहे तिथे काहीही भराव न टाकता पुढच्या ट्प्प्यात पेव्हर ब्लॉक्स बसवण्याचे काम जोमाने चालु आहे जर महामार्गाची ही अवस्था आहे तर इतर साध्या रस्त्यांच्या अवस्थेची कल्पना करु नये...
-
-
-
आज स्वातंत्र्य मिळुन ६३ वर्ष पूर्ण आणि महाराष्ट्र राज्य सुवर्ण मोहत्सव साजरा करत आहेत !!! सगळीकडे आज देशभक्तीपर गीत लागली आहेत तर कुठे ध्वजारोहण सुरु आहे...खरचं मेरा देश महान आहे ?
अशीच प्रगती करु आणि आपण सार्‍या दुनियेच्या मागे कसे आहोत हे आख्या जगाला दाखवुन देवु.
जय हिंद, जय महाराष्ट्र... :(

आत्ताच लोकसत्ता मधली ठाणे वॄत्तात ही पुरवणी पाहिली :---
http://alturl.com/9e7id

विकास's picture

15 Aug 2010 - 8:08 pm | विकास

१२ ऑक्‍टोबर २००५ पासून माहितीचा अधिकार देशभर लागू झाला.

खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. हे एक खर्‍या अर्थाने मिळालेले स्वातंत्र्य आहे.

बाकी तुमच्या त्राग्याशी असहमत असायचा प्रश्नच नाही. याबाबतीत थोड्या वेगळ्या भाषेत पण तेच म्हणेनः आपल्याला दोन प्रकारांची स्वातंत्र्ये मिळाली आहेत. एक परकीय सत्तेपासून आणि दुसरे आहे ते हक्कांचे स्वातंत्र्य. त्यातील पहीले स्वातंत्र्य हे आता मिळाले आहे, तो आता इतिहास आहे (त्याचे परत मागच्या दाराने - कॉर्पोरेट्स, तथाकथीत बाहेरील विचारसरणींचा प्रभाव, वगैरे मुळे पारतंत्र्यात रुपांतर होत आहे का, हा वेगळ्या चर्चेचा पण महत्वाचा मुद्दा आहे).

दुसरे स्वातंत्र्य हे विविध हक्कांचे आहे... ते सातत्याने आणि जबाबदारीने आपण कसे वापरू यावर त्याची धार कशी राहील अथवा गंज कसा चढेल हे ठरणार आहे. हे काम एका दिवसातले नाही. तसे ते आज ज्यांना आपण प्रगत राष्ट्रे म्हणतो त्यांच्याकडे देखील झालेले नाही. मात्र सातत्याने होते, इतकेच तुर्तास म्हणतो.

अविनाशकुलकर्णी's picture

15 Aug 2010 - 2:33 pm | अविनाशकुलकर्णी

एवढ्या हजारो-लाखो छोट्या मोठ्या समस्या असताना भारताचा हा गाडा पुढे कसा चालला आहे .. ?
कोणी हि मोठा/प्रभावकारी नेता नाही ,जनते मध्ये म्हणावे तेवढे देशप्रेम स्वयाशिस्त नाही .. विचार करू न हि ह्या प्रगती चे गमक सापडत नाही
....................................................................
टुथपेस्त कपडे ..क्म्प्युतर..गाड्या..फोन..इंटरनेट..शांपु ...साबण..ब्लेड..फर्निचर.. टेकनोलोजी..सारे विदेशी आहे..तुमचे काय आहे?

गांधीवादी's picture

15 Aug 2010 - 6:11 pm | गांधीवादी

पूर्वजांचे पुण्य,
पवित्र ऋषी मुनींनी केलेले होम हवन, ह्यामुळे हि पवित्र भूमी आहे.
त्यामुळे सगळं कसंतरी तग धरून आहे, जेव्हा तिची क्षमता संपली कि मग काही मिनिटांत सगळं संपेल.