कोंबडी वडे (शाकाहारी)

Primary tabs

जागु's picture
जागु in पाककृती
9 Aug 2010 - 5:00 pm

लागणारे साहित्य:
१ किलो जाडे तांदुळ
पाव वाटी उडीद डाळ
१ चमचा धणे
१ चमचा मेथी
चविपुरते मिठ
तेल

पिठ तयार करण्यासाठी:
तांदुळ धुवुन वाळवावेत. त्यात उडीदडाळ, धणे, मेथी कोरडी भाजून घालावी व पिठ दळून आणावे.

कृती:
लागेल तेवढे पिठ ताटात किंवा परातीत घेउन त्यावर गरम पाणी (साधारण पिठाएवढेच पाणी लागते) टाकुन झाकण देउन ठेवावे. मग थोड्यावेळाने थंड झाले की त्यावर मिठ टाकुन मळून घ्यावे.

हे मळलेले पिठ अश्या प्रकारे एका स्वच्छ फडक्यात बांधून गुंडाळून ठेवायचे.

प्लास्टीकची जाडसर पिशवी घेउन त्यावर त्यावर छोटा गोळा घ्यावा. एकीकडे तेल तापत ठेवायचे आधी. मला जास्त घाई असते म्हणून मी एका वेळी दोन दोन गोळे करुन एकदाच प्लॅस्टिकच्या पिशवीवर ठेवते.

आता हे गोळे चपटे करायचे.

पाहीजे असल्यास मध्ये भोक द्यायचे. मी देते कारण मला अश्या डिझाईनचे वडे आवडतात.

आता तेलात सोडा. जरा जपुन अलगद टाका नाहीतर तेल उडेल अंगावर.

आता पिवळ्या रंगावर तळून बाहेर काढून पेपरवर ठेवा व ताव मारा. नुसते खायलाही चविष्ट लागतात. माझ्या मुलीने झाल्या झाल्या ३ खाल्ले. एरवी ती खाण्याच्या बाबतीत कंटाळा करते.

अधिक टिपा:
शाकाहारी मुद्दाम म्हटल आहे. कारण ह्या वड्यात कोंबडीचा उल्लेख असला तरी त्यात सगळे शाकाहारी जिन्नस आहेत. हे वडे कोंबडी, मटणाच्या रस्स्याबरोबर खातात म्हणून ह्याचे नाव कोंबडी वडे आहे. हा मालवणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. ह्याला मी भोक पाडते मध्ये पण बरीच जण पाडत नाहीत. नाही पाडल तरी काही फरक पडत नाही.

प्रतिक्रिया

अब् क's picture

9 Aug 2010 - 5:08 pm | अब् क

माझी आजी करायची असेच. तुम्ही कोकनतल्या का?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Aug 2010 - 5:09 pm | llपुण्याचे पेशवेll

कोकणात गौरींना असे वडे करतात. उडीद तांदूळाचे वडे.

स्वाती दिनेश's picture

9 Aug 2010 - 5:11 pm | स्वाती दिनेश

वडे फर्मास दिसत आहेत, कोकणात बारशापासून बाराव्यापर्यंत सगळ्यावेळी केले जातात, कधी भोकं पाडायची आणि कधी नाही याचाही काही नियम आहे..
आमच्याकडेही हे वडे आता श्रावणापासून पितृपक्षापर्यंत कारणाप्रसंगाने होत राहतीलच,
स्वाती

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Aug 2010 - 5:19 pm | llपुण्याचे पेशवेll

+१
पितृपक्षात तर उडीद तांदळाचे वडे आणि अमसूलाची चटणी अशी भयंकर उत्तम पण अनवट जोडीचा पानात चाखायला मिळते.

चित्रा's picture

9 Aug 2010 - 6:12 pm | चित्रा

हम्म.

खरे आहे. मला खरे तर आमसुलाची चटणी आवडत असे, पण असे म्हटले की आज्या चिडायच्या! (बहुदा एरवी ही चटणी खाल्ली जात नसावी!)

हे वड्यांना असलेल्या भोकांच्या नियमांचे काय नवीनच ऐकते? भाजणीच्या वड्यांना तरी मी नेहमीच मधोमध भोके पाहिली आहेत असे आठवते.

बाकी वडे मस्त दिसतायत.

रोचीन's picture

10 Aug 2010 - 10:02 am | रोचीन

श्राद्धासाठी केलेल्या वड्यांना भोके पाडत नाहीत. सणाच्या स्वयंपाकात केलेल्या वड्यांना भोके पाड्तात. श्राद्धासाठीचा स्वयंपाक एरवी करत नसत!! म्हण्जे आमसुलाची चटणी वगैरे!! म्हणूनच कदाचित तुमची आजी चिडत असेल.

चित्रा's picture

10 Aug 2010 - 6:51 pm | चित्रा

आमसुलाच्या चटणीबद्दल तीच शंका होती.. :) तसे दुसरे म्हणजे दिव्यांच्या अमावस्येला (गटारी) करण्याचे कणकेचे दिवे. (ते मी कालच केले - आणि गट्टम केले!) तेही एरवी करायचे म्हटले की आजी वैतागत असे, पण एखाद्या दिवसानंतर करायला म्हणून थोडी जास्त कणीक ठेवून देत असे (म्हणजे नंतर कणीक मळल्याचे पाप नको :)!)

भाजणीच्या वड्यांना पाडण्याच्या भोकांच्या माहितीसाठी धन्यवाद.

सोनेरी रंगावर तळलेले वडे छान दिसतायत.

गणपा's picture

9 Aug 2010 - 5:35 pm | गणपा

तांदळा उडदाचे वडे पहिल्यांदा पहातोय.
बाकी आमच्याकडे वड्याच पिठ (भाजणीच्या पिठा सारख) वेगळ असतं.
आणि आई त्यात मोठी गरवी काकडी पण किसुन (पाणी काढुन) टाकते.

वैदर्भिय's picture

9 Aug 2010 - 5:36 pm | वैदर्भिय

टोन्डा ला पाणी सुट्ले :)
:)

मेघवेडा's picture

9 Aug 2010 - 6:34 pm | मेघवेडा

=)) =))

आयला लै भारी प्रतिसाद!

बाकी वडे आपले फेव्हरीट. मग ते तांदळाचे असोत, भाजणीचे असोत भोपळ्याचे असोत का कसलेही.

तेराव्याच्या वड्यांचा आमचा पार्टनर 'प्रभो' याच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

प्रभो's picture

9 Aug 2010 - 6:37 pm | प्रभो

कुणाचा नंबर आहे रे??? ;)

वडे खायची इच्छा झालीय.....हे फोटो पाहून....

शुभ बोल नार्‍या, तर म्हणे मांडवाला आग लागली!

इंटरनेटस्नेही's picture

10 Aug 2010 - 2:33 am | इंटरनेटस्नेही

टोन्डा ला पाणी सुट्ले

जबर्दस्त!

पाहुणा's picture

10 Aug 2010 - 8:59 pm | पाहुणा

फक्त पाकक्रुति सान्गुन काय फायदा ?
खायला पण बोलवा कि.

मराठमोळा's picture

9 Aug 2010 - 5:40 pm | मराठमोळा

वाह.. मस्तच.
शेवटच्या फोटुमधले कुरकुरीत, खरपुस तळलेले वडे मोहक दिसताहेत. :)

इंटरनेटस्नेही's picture

9 Aug 2010 - 5:45 pm | इंटरनेटस्नेही

मस्तच

आशिष सुर्वे's picture

9 Aug 2010 - 5:46 pm | आशिष सुर्वे

जागु तै, एकदम परफेक्ट!
लहानपणी आमची आज्जी आम्हा लहानग्यांसाठी अस्सेच भोकं पाडलेले वडे तळून द्यायची..

प्रियाली's picture

9 Aug 2010 - 6:36 pm | प्रियाली

आमच्या घरात असेच वडे करतात.

इथे आल्यापासून पंचाईत झाली आहे. पीठ कसे बनवायचे याची. :( त्यामुळे, करून पाहिलेले नाही.

धनंजय's picture

10 Aug 2010 - 3:29 am | धनंजय

पीठ कसे दळायचे!

वडे तर छानच दिसत आहेत.

शहराजाद's picture

10 Aug 2010 - 8:26 am | शहराजाद

मी तयार तांदूळ पीठ, उडीद पीठ आणि दळलेले मसाले एकत्र करून वडे करते. (भिजवताना थोडंसं आंबट दही घातल्यास छान चव येते.) भाजणीच्या खालोखाल चवदार होतात.

भाजणी दळून मिळ्ण्याची सोय नसली तर वडे निदान असे तरी बनवून हादडता येतात. जागुतैंच्या इतर अनवट भाज्या आणि मासळीच्या खमंग पाकृ नुसत्याच पाहून मिटक्या माराव्या लागतात.

प्रियली, धनंजय मी वर पिठाची रेसिपी पण दिली आहे.

धनंजय's picture

10 Aug 2010 - 8:53 pm | धनंजय

तो प्रश्न नाही हो जागु

पिठाची रेसिपी छानच आहे. पण दळून आणायला येथे जवळपास चक्की नाही. घरी वापरण्यालायक चक्कीसुद्धा बाजारात मिळते. पण महाग किमतीच्या मानाने चक्कीचा वापर होत नाही.

वर शहराजाद यांनी सांगितल्याप्रमाणे मी कधीकधी तयार पिठे वापरतो. (तायार पिठे भाजून मिसळून थालिपीठाची भाजणी बनवतो.)
पण भिजवून-वाळवलेल्या धान्याच्या पिठाची चव त्यात नसते. (आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे भिजवताना थोडे आंबट दही घालून बघतो.

हे खर की विकतच्या पिठाला चव नसते. म्हणुनच मी वड्यांच, थालिपिठाच पिठ दळूनच आणते. आता बेसनही दळून आणणार आहे.

तुम्ही थोड्या प्रमाणात मिक्सरवर दळून बघा. नाहीतरी वड्यांना थोड चरटच पिठ चांगल असत.

शानबा५१२'s picture

9 Aug 2010 - 6:59 pm | शानबा५१२

अहो कोंबडी वडे शाकाहारीच असतात्,ते 'त्या' रस्स्याबरोबर खाल्ले की दुशित होतात.मग भाताला पण कोंबडीभात म्हणावा का?

असो,वडे एवढे सफेद कधीच बघितले नव्हते.

स्वाती२'s picture

9 Aug 2010 - 7:49 pm | स्वाती२

माझी आई असेच करते. पण इथे पीठ मिळत नाही त्यामुळे मी ज्वारीच्या पिठात थोडी उडीद आणि हरबर्‍याची भिजवून वाटलेली डाळ घालून वडे करते.

सुनील's picture

10 Aug 2010 - 6:03 am | सुनील

शीर्षक थोडे फसवे आहे! अर्थात पाकृ छानच. मालवणी हॉटेलात गेलो की रश्शाबरोबर खायला दोनच पर्याय, एक तांदळाची भाकरी नाहीतर वडे!

बहुगुणी's picture

10 Aug 2010 - 6:18 am | बहुगुणी

इथेच या वड्यांची पाककृती दिली होती, असेच वडे, फक्त त्या पीठात हरबरा डाळही होती.

सहज's picture

10 Aug 2010 - 9:49 am | सहज

मस्त! तिखटामिठाच्या पुर्‍या बरेच दिवसात खाल्या नाही आहेत हे आठवले.

सुहास..'s picture

10 Aug 2010 - 12:02 pm | सुहास..

स्सही !! एकदम जागुताई स्पेश्शल !!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

कुक's picture

10 Aug 2010 - 12:45 pm | कुक

छान

नंदन's picture

10 Aug 2010 - 12:50 pm | नंदन

पाकृ मस्तच. रस्स्याप्रमाणेच काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबतही झकास लागतात.

कुक's picture

10 Aug 2010 - 4:30 pm | कुक

आमच्या कदे लग्नाला असे वडे करतात. त्याना घारया म्हनतात. त्यात गहु टाकतात. उडिद टाकत नाहि. गहु मुळे त्या नरम होतात. व थोडि मेथी दाने टाकतात.

आमच्याकडे लग्नाच्या वड्यांना असे भोक पाडतात. सगळ्यांना ते आवडतात त्यामुळे मी ह्या वड्यांना भोक पाडले आहे. पण पुर्वापार परंपरेनुसार ह्याला भोक नसते. मी वर नमुद केले आहे. की ह्याला भोकाची गरज नसते. मी माझ्या आवडीप्रमाणे त्याला भोक पाडले आहे.

सगळ्यांचे मनापासुन खुप खुप धन्यवाद.

कोंबडी वडे हा माझा विक पॉईंट आहे. झकास पाककृती.

शंका : पाककृती ह्या विभागात बरेच जण आपापल्या पाककृती टाकतात , पण बहुतांशी असे निरिक्षण आहे की यातल्या पाककृती आपल्याला माहिती असतात किंवा त्या जनरल असतात, आपण "नविन" असं काही लिहीतोय का ? असा एक विचार व्हावा.

कोंबडी वडे आपल्याला खायला नेहमीच आवडतात, पण ते कसे बनवतात हे आपल्याला माहिती नसते. अशा पाककृती याव्यात. पण उगाच भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी किंवा तत्सम पदार्थांच्या पाककृतींमधे काही नाविन्य वाटत नाही.
मिसळपाव वरील जागु, स्वाती दिनेश आणि चकली ह्यांच्या सुद्धा पाककृत्यांमधे नाविन्य पहायला मिळतं.

-(आवाज आला क्का ?) फुस्स

जागु's picture

11 Aug 2010 - 11:11 am | जागु

फुस्स. धन्यवाद.

जागु ताई पाकृ पाहिली... हल्ली पाकृ पाहुनच समाधान करुन घेतो... ;)
शाकाहारी कोंबडी वडे असे नाव वाचुन, अचानक विचार केला की कोंबडी कधी पासुन श्रावण पाळायला लागली !!! ;)

जाता जाता :--- कोल्हापुरात इथे वडा कोंबडा मिळेल अशी पाटी वाचल्याचे आठवले.

जागु's picture

11 Aug 2010 - 12:10 pm | जागु

मदनबाण धन्स. आहो ह्या कोंबड्या, बोकड शाकाहारीच असतात. एकवेळ कोंबड्या किडे वगैरे गवतातले खात असतील. पण बोकड पालाच खातात ना?

मदनबाण's picture

11 Aug 2010 - 12:14 pm | मदनबाण

पण बोकड पालाच खातात ना?
बात पाले की है... सॉरी पते की हय... ;)

रश्मि दाते's picture

11 Aug 2010 - 4:00 pm | रश्मि दाते

म्स्तच दिसत आहेत वडे जागुताई,ती अम्सुलाची चटणीची recipe ही द्याकी

जागु's picture

11 Aug 2010 - 4:33 pm | जागु

आमसुलाची चटणी , त्याची रेसिपि उद्या देते.

खुपच छान गं! आवडेश.

आजच करुन पहावे का? :)

जागु's picture

12 Aug 2010 - 11:07 am | जागु

माया केलेस का वडे ?