कोंबडी वडे (शाकाहारी)
लागणारे साहित्य:
१ किलो जाडे तांदुळ
पाव वाटी उडीद डाळ
१ चमचा धणे
१ चमचा मेथी
चविपुरते मिठ
तेल
पिठ तयार करण्यासाठी:
तांदुळ धुवुन वाळवावेत. त्यात उडीदडाळ, धणे, मेथी कोरडी भाजून घालावी व पिठ दळून आणावे.
कृती:
लागेल तेवढे पिठ ताटात किंवा परातीत घेउन त्यावर गरम पाणी (साधारण पिठाएवढेच पाणी लागते) टाकुन झाकण देउन ठेवावे. मग थोड्यावेळाने थंड झाले की त्यावर मिठ टाकुन मळून घ्यावे.
हे मळलेले पिठ अश्या प्रकारे एका स्वच्छ फडक्यात बांधून गुंडाळून ठेवायचे.
प्लास्टीकची जाडसर पिशवी घेउन त्यावर त्यावर छोटा गोळा घ्यावा. एकीकडे तेल तापत ठेवायचे आधी. मला जास्त घाई असते म्हणून मी एका वेळी दोन दोन गोळे करुन एकदाच प्लॅस्टिकच्या पिशवीवर ठेवते.
आता हे गोळे चपटे करायचे.
पाहीजे असल्यास मध्ये भोक द्यायचे. मी देते कारण मला अश्या डिझाईनचे वडे आवडतात.
आता तेलात सोडा. जरा जपुन अलगद टाका नाहीतर तेल उडेल अंगावर.
आता पिवळ्या रंगावर तळून बाहेर काढून पेपरवर ठेवा व ताव मारा. नुसते खायलाही चविष्ट लागतात. माझ्या मुलीने झाल्या झाल्या ३ खाल्ले. एरवी ती खाण्याच्या बाबतीत कंटाळा करते.
अधिक टिपा:
शाकाहारी मुद्दाम म्हटल आहे. कारण ह्या वड्यात कोंबडीचा उल्लेख असला तरी त्यात सगळे शाकाहारी जिन्नस आहेत. हे वडे कोंबडी, मटणाच्या रस्स्याबरोबर खातात म्हणून ह्याचे नाव कोंबडी वडे आहे. हा मालवणातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. ह्याला मी भोक पाडते मध्ये पण बरीच जण पाडत नाहीत. नाही पाडल तरी काही फरक पडत नाही.
वाचन
17746
प्रतिक्रिया
0