दक्षिणेकडची खव्वयेगिरी – १
केरळ ट्रीपवर गेलात तर सकाळी ६-७ च्या सुमारास केरळातल्या कुठल्यातरी स्टेशनात गाडी शिरते आणि प्लॅटफॉर्मवर “अप्पम-मुट्टै ऽऽ” अशा आरोळ्या ऐकू येतात. आपण धडपडून उठतो आणि खिडकीतून हात बाहेर काढून ते पुडकं हातात घेतो.
पुडक्यातले केळीच्या हिरव्यागार पानात गुंडाळलेले वाफाळते जाळीदार अप्पम आणि सोबत खमंग गरमा-गरम मुट्टै हा एक न्याहारीचा स्वर्गीय प्रकार आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तसंही केरळला “गॉडस् ओन कंट्री” असंच म्हणतात म्हणा ( आता तिकडच्या लोकांना “डेव्हिलस् ओन पिपल” म्हणतात ते जाउद्या ). मल्याळी कट्टर ब्राम्हणी (नंबियार वगैरे) घरात मुट्टैला( म्हणजे अंडाकरी) स्ट्यु हा एक उत्तम पर्याय असतो.
असो. आठवणींत अधिक न रमता लुसलुशीत आणि नाजूक जाळीदार अप्पम् बनविणे किती सोपं आहे ते बघूया.
साहित्य:
दोन वाट्या तांदुळ
पाव वाटी शिजवलेला भात (पाण्यात भिजवून उबदार जागी ठेवावा)/ पोहे
१/२ वाटी खोवलेले खोबरे. चिमुटभर यीस्ट सिद्ध करून(मूळ पाकृ.त ताडी (हो, ताडीच! )वापरतात).
२ टे. स्पू. साखर.
कृती:
तांदूळ प्रथम आठ-दहा तास पाण्यात भिजत घालावेत. नंतर ते तांदूळ, खोबरं, आणि भात किंवा पोहे असं सगळं अगदी गंध वाटून घ्यावेत. वाटताना पाणी अगदी कमी घालावे(वाटले जाईल इतपतच). नंतर यीस्ट आणि साखर वाटणात घालून नीट हलवून घ्यावे. उबदार जागी मोठ्या भांड्यात ८-१० तास झाकून ठेवावे (मिश्रण खूप फुगते त्यामुळे भांडे छोटे घेतले तर नक्की उतू जाईल).
अप्पम करायच्या आधी फुगलेल्या पीठात चवीनुसार मीठ आणि गरजे नुसार पाणी/दूध घालून ते पातळ करून, नीट हलवून घ्यावे. पीठ इडलीच्या पीठाएव्हढे घट्ट/पातळ असावे.
तेलाचा हात फिरवून अप्पम पॅन (मी लोखंडाची कढई वापरली) मधे पळीभर पीठ घालावे आणी चटकन कढईचे कान धरून ४५अंशाच्या कोनातून फिरवावे म्हणजे पीठ नीट पसरेल (पीठ पसरवायला पळी वापरू नये). आवडत असल्यास अप्पमच्या खळग्यात थोडे दूध घालावे. बशीच्या आकारातले अप्पम शिजल्यावर कडा सुटून यायला पाहिजेत. गरमा गरम अप्पम व्हेजिटेबल स्ट्यु सोबत वाढावे.
व्हेजिटेबल स्ट्यु साहित्य :
१ मोठा कांदा, पातळ चिरून
२-३ हिरव्या मिरच्या तुकडे करून
१/२ टेस्पू. आलं-लसूण पेस्ट
एखादी काडी कढिलिंब
१ बटाटा चौकोनी तुकडे करून
१ गाजर तुकडे करून
थोडेसे मटार
अननस (ऐच्छिक)
नारळाचे घट्ट दूध – १/४ वाटी
नारळाचे पातळ दूध – १ वाटी
२-३ टेस्पू. तेल
खडा मसाला – २ इंच दालचिनी, ५-६ लवंगा, ४-५ काळे मिरे , एखादं चक्री फूल, १-२ वेलदोडे
चवी प्रमाणे मीठ
कृती:
तेल गरम करून खडा मसाला थोडा परतून घ्यावा. नंतर कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कढीलिंब टाकून कांदा गुलाबी होईपर्यंत परतावा. त्यात भाज्या, असल्यास अननस घालून मिनिटभर परतून घ्याव्यात. नारळाचे पातळ दूध घालून भाज्या शिजू द्याव्यात (१०-१२ मि.)
शेवटी शिजताना नारळाचे घट्ट दूध धालून २-४ मिनीटे उकळी आणावी.. अप्पम बरोबर स्ट्यु तयार आहे.
प्रतिक्रिया
17 Apr 2010 - 7:17 pm | मदनबाण
मस्तच... :)
आता हा वरचा फोटो पाहुन माझ्या टाळक्यात यक प्रश्न आला हाय्....च्यामारी हे हाटीलवाले लोग त्यांचा डोसा,अप्पम इतका पेपर सारखा पातळ कसं बनवतात? मी खाल्लेले काही डोसे मायक्रॉन थिकनेसचे आहेत असचं वाटायच... जरा तोडुन सांबारमधे बुडवण्या आधिच त्याचा चुरा चुरा व्हायचा... नक्की हे इतके पातळ डोसे ,उत्तापा,अप्पम कसे बनवतात ?
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
18 Apr 2010 - 8:27 am | नंदू
विंजिनेरजी,
छान पाकृ.
मध्यभागी किंचित जाडसर पण कडांकडे एकदम पेपर सारखा हा पदार्थ कसा बनवतात या बद्दल कुतुहल होतं. रेसिपी ट्राय करावी म्हणतो.
बाकी वाचताना आमच्या डोंबिवलीच्या अन्नपूर्णा रेस्तराँची (हेमंत सुगंधी भांडार जवळ, चंदू जवळच्या गल्लीत) आठवण झाली. इथे पूर्वी रविवारी सकाळी अप्पम मिळायचे आणि १० वा. पर्यंत संपायचे देखील. आज पण रविवार वाचताना त्या अप्पमची चव तोंडावर रेंगाळली आणि अंमळ हळवा झालो.
जाता जाता: फोटोत तोंडी लावायला ते दुसरं काय आहे? चिकनचं लोणचं का?
नंदू
18 Apr 2010 - 11:26 am | स्वाती दिनेश
मस्त पाकृ आणि फोटोही..
स्वाती
18 Apr 2010 - 5:13 pm | चित्रा
छान पाककृती.
केरळमध्ये ह्या स्ट्युला काही वेगळे नाव आहे का?
19 Apr 2010 - 5:48 am | प्रभो
लै भारी....सीप्झ कँटीनची आठवण झाली.
19 Apr 2010 - 11:30 am | विंजिनेर
धन्यवाद लोक्स. :)
@नंदू: दुसरे तोंडीलावणे चिकन विंदालू आहे. त्याची रेशिपी टाकीन कधीतरी.
@चित्रा: ठाउक नाही. मला वाटते स्ट्यु हाच प्रचलित शब्द असावा.
19 Apr 2010 - 11:45 am | Nile
अरे वा, जोरात चालु आहे की. ;)
स्ट्यु ला 'कुरमा' किंवा 'कोरमा' म्हणतात का? असा पदार्थ चेन्नई हॉटेलात खाल्ल्यासारखा वाटतोय.
20 Apr 2010 - 12:41 am | प्रभाकर पेठकर
अप्पम मला खुपच आवडते. ते कशाबरोबरही चांगले लागते पण मला ते चिकन करी बरोबर विशेष आवडते.
स्ट्यु ला 'कुरमा' किंवा 'कोरमा' म्हणतात का? असा पदार्थ चेन्नई हॉटेलात खाल्ल्यासारखा वाटतोय.
'स्ट्यू' आणि 'कोर्मा' मध्ये फरक आहे.
मुळात 'स्ट्यू' हा नॉन्व्हेज मधील मुख्य अवयव (तंगडी, छाती, किडणी, कलेजी इ.) मुख्य पाककृतीत वापरल्यावर जे 'स्पेअर पार्टस' (हृदय, जठर, मान) इत्यादी उरतात ते वापरून (अपवाद म्हणून काही मुख्य अवयवही वापरले जातात) पातळसर रस्सा करून बनविला जातो. मुळातल्या ह्या काँटीनेंटल सौम्य पदार्थाला भारतिय/पाकिस्तानी मसाले वापरून झणझणीत, चरबीयुक्त रस्सा बनविला जातो.
'कोर्मा' हा मोघलाई नॉनव्हेज प्रकार आहे. मोघलाई कालवणांची मुख्येत्वे दोन प्रकारात वर्गवारी केली जाते. 'कलीया' आणि 'कोर्मा'. 'कलिया' म्हणजे कुठलेही नॉन्व्हेज कालवण ज्यात ग्रेव्हीत पाण्याची बर्यापैकी मात्रा असते. 'कोर्मा' बनविताना गरज भासली तरच पाणी वापरतात. शक्यतो अत्यंत मंद आंचेवर पाणी न वापरता मांस शिजविले जाते. जरी मांस शिजविण्याच्या प्रक्रियेत पाणी वापरले तरीही प्रक्रियेच्या शेवटी मंद आंचेवर पाणी पुर्णपणे आटविले जाते आणि पदार्थावर जवळ जवळ १ सेंटीचा तेलाचा/तुपाचा तवंग उरतो. तो 'कोर्मा'. पण भारतात 'कोर्मा' हा शब्द फार सढळपणे वापरला जातो. पण आपल्याकडे 'कलिया' हा शब्द वापरात नाही आणि 'कोर्मा' हाच शब्द सर्व कालवणांना वापरला जातो.
------------------------------------------------------
विवाहित पुरुषाने कितीही नोकर्या बदलल्या तरी त्याचा बॉस एकच असतो.
20 Apr 2010 - 1:18 pm | दिपाली पाटिल
मस्तच दिसतंय अप्पम आणि स्ट्यू पण तो अप्पम तवा भारतातून आणलेला आहे कां?...
दिपाली :)
20 Apr 2010 - 3:05 pm | विंजिनेर
दस्तूर खुद्द पेठकर काका आणि दिपालीबैकडूंन प्रतिक्रिया!! - आम्ही धन्य झालो! :D
बाकी तवा म्हणजे मी चक्क लोखंडाची कढई वापरली. मस्त लुसलुशीत झाले होते अप्पम.
20 Apr 2010 - 11:39 pm | भानस
तोंडाला पाणी सुटलेयं अगदी फोटू पाहूनच.... आता नक्की करतेच. :)