पार्टी रे पार्टी

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in पाककृती
10 Apr 2010 - 5:08 pm

माणूस अगदी विवाहित, कुटुंबवत्सल वगैरे असला म्हणून काय झाले, कधीतरी तो कनवाळू, दयाळू वगैरे जगन्नियंता त्यावर प्रसन्न होतो. कधीतरी अती होते आणि 'साल्यो, काही लाजाबिजा आहेत की नाही? किती दिवस झाले एकत्र बसून. तुमच्या साल्यांच्या रविवार -गुरुवारच्या सुट्ट्या, पोरांच्या परीक्षा आणि बायकांच्या कटकटीतून सवड अशी कधी मिळणार? असं ठरवून काही बसायला मिळणार नाही. बसायचं का आजचं? कुणाचं घर रिकामं आहे? तुझं? मग ठरलं तर! दोन तीन पेग हाणू, हा ठोंब्या चिकन करेल. व्हिस्कीचं माझ्याकडं लागलं. सोडापण आणतो मी. शिग्रेटी आपापल्या. साडेसातला बसायचं, अकरा वाजता आपापल्या घरी. पुढे ज्याच्या त्याच्या वकूबानुसार. हाये का तयारी?' असं म्हणून पुढाकार घेणारा कुणी मर्द निघतो. हो-नाही म्हणत शेवटी बरेच तयार होतात. 'स्टॅग पार्टी' ची आठवण व्हावी अशी एखादी पार्टी चक्क आठवड्याच्या मध्यावर घडते. तीनाचे चार होतात, भरपूर नॉनव्हेज विनोदांची देवाणघेवाण होते, 'ये कैसी अजब दासतां हो गयी है' , 'मुहब्बत तर्क की मैने' किंवा ' कुछ और जमाना कहता है' असल्या अनवट गाण्यांवर नव्या सिग्रेटी पेटवल्या जातात. काहीजण काही जुन्या आठवणींनी माफक गहिवरतातही. 'अरे, परवा दिल्ली एअरपोर्टवर ती तुझी ही दिसली होती. काय सुटलीय बाप रे!' 'हं आपण बोलू नये राजर्षी, आपण जिच्यासाठी बायोकेमिस्ट्रीचा पेपर बुडवायला निघाला होतात, तिचं काय माकड झालंय ते बघा एकदा...' असले भेदक संवादही घडतात. दुसर्‍या दिवशी मंडळी माफक हँगओव्हर एखादं पदक मिरवावं तसा मिरवत हापिसात जातात. किंचित दुखणारं डोकं दाबत 'मजा आली राव...' चे फोन होतात. अशा ऐनवेळेच्या स्त्रीवर्गविरहित पार्टीचा हा मेनू:
साहित्य आणि कृती: (सगळेच पदार्थ अदमासे. 'झणझणीतपणा' हा एकमेव हेतू डोळ्यांसमोर ठेवून पदार्थांची रचना केलेली आहे. यात मनाला येईल तसे बदल करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य वाचकांना आहे.)
चिकन मॅरिनेट करुन घेणे अत्यावश्यक. चिकन शक्यतो रियल गुडचे असावे. दही अमूलचे. आले लसूण पेस्ट कुठलीही. थोडे मीठ, थोडी हळद. बास. चार तास तरी मॅरिनेट करावे.

.

एकीकडे अंडी उकडायला ठेवावीत

.

कांदा-टोमॅटो बारीक कापून घ्यावेत. ते कापणे गणपाइतके प्रोफेशनल झाले नाही तरी काही बिघडत नाही आणि टोमॅटोचा रस कांद्यात शिरला तर अजिबात न्यूनगंड वगैरे वाटू देऊ नये.

.

खडा मसाला म्हणजे काय हे आता आपल्याला माहिती आहेच. ऐनवेळी त्यातले काही विसरु नये म्हणून तो एकत्र करुन घ्यावा

.

दरम्यान मंडळी येतात. 'मी काय करु?' असे विचारणार्‍याना 'पेग भर' असे उत्तर द्यावे. ते सांगण्याची गरज नसतेच! ही पायरी अर्थातच ऐच्छिक आहे!

.

प्रेशर कुकरमध्ये चार मोठे चमचे तूप घ्यावे. अजिबात घाबरु नये. 'सी एच ओ एल ई एस टी ई आर ओ एल' अशा स्पेलिंगचा कोणताही शब्द जगात नाही. कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी आले लसूण पेस्ट, थोडा चिकन करी मसाला (हा बाजारात मिळतो. हापिसातून घरी येताना आणायला विसरु नये. स्वतः आणावा, इतरांना सांगू नये. मंडळी विसरतात, आणि त्यावरुन शिविगाळ होते!) आणि लाल तिखट हे सगळे चांगले परतून घ्यावे. खमंग वास सुटला पाहिजे. आता त्यात मॅरिनेट केलेले चिकन घालावे. चांगले हलवून घ्यावे. चिकन थोडेसे परतले की त्यात चिरलेला टोमॅटो घालावा. परत हलवून घ्यावे. आवश्यक तितके पाणी आणि मीठ घालावे. कुकरचे झाकण लावावे आणि मंद आचेवर वीस मिनिटे शिजवावे.

.

अंडी सोलून घ्यावीत, कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी आणि दहीकांदा करावा. पोळ्या ज्याला सांगितलेल्या असतात त्याने आणलेल्या असतातच. (त्या शक्यतो कुणी विसरत नाही!). हवा असेल तर भात टाकावा. थोडे अधिक कौतुक हवे असेल तर खिचडीही.

.

झालं. आता पुढच्या प्रकाराचं वर्णन करण्यात काही अर्थ नाही. पावणेबारा वाजत आले की ( या उशीराला 'अकरा म्हणजे अकराला निघायचं हां. आपल्याला उद्या ऑफिस आहे साल्यानो ..' असं सतरा वेळा म्हणणाराच प्रामुख्याने कारणीभूत असतो. त्याला एस.वाय. ला फिजिक्स लॅबच्या मागं झालेलं काहीतरी आठवत असतं आणि तो ते बर्‍याच विस्तारानं सांगत बसलेला असतो!) 'बंभोले..' म्हणून आपापले ग्लास संपवावेत आणि आपापली पानं वाढून घ्यावीत...

.

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

10 Apr 2010 - 5:10 pm | सन्जोप राव

फोटो का दिसत नाहीत हे कुणीतरी सांगेल का?
सन्जोप राव

विंजिनेर's picture

10 Apr 2010 - 6:01 pm | विंजिनेर

फोटो का दिसत नाहीत हे कुणीतरी सांगेल का?

पापं वाढलीयेत तुमची दुसरं काय? एकाच संकेत स्थळाप्रती निष्ठा ठेवली तर असे होऊ नये. असो. (ह.च घेणे बर्रका ;)) हे घ्या फटू

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Apr 2010 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते

बघतो...

... झाले !!!

अवांतरः नुसते फोटो बघूनच इनो घ्यायची प्रबळ इच्छा झाल्याने प्रतिसाद देऊ शकत नाही. ;)

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

10 Apr 2010 - 9:44 pm | टारझन

व्वा व्वा व्वा संजोप राव .. तुफानी लेख एकदम ..
तो पेय प्रकार सोडला तर खाद्यप्रकारही एकदम आवडुन गेला :)

श्रावण मोडक's picture

10 Apr 2010 - 6:40 pm | श्रावण मोडक

फटू दिसू लागले. आता त्यावरच समाधान मानतो.
अवांतर प्रश्न: बाय द वे, एबी? आयबी, बीपी ते एबी? हिच्यातही बीपी आणि शुगरसाठी पूरक असं काही आहे का?

मिसळभोक्ता's picture

13 Apr 2010 - 1:31 am | मिसळभोक्ता

नक्कीच !!!

'सही' कडून 'पुरातनतेकडे' वाटचाल, हा जीवनाचा नियम आहे.

(हल्ल्लीचाच कन्व्हर्ट)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सन्जोप राव's picture

13 Apr 2010 - 8:40 am | सन्जोप राव

मोडकांना अपेक्षित आहे ती 'बादशाही निळी' ते 'मिश्रणकर्त्याचा अभिमान' ते ' प्राचीन निळी' अशी वाटचाल.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

मिसळभोक्ता's picture

13 Apr 2010 - 9:25 pm | मिसळभोक्ता

पण अति पुरातन कालात, माझ्या आठवणीप्रमाणे, आपण 'शिक्षकांची', आणि 'बादशाही आव्हान' प्रेमी होतात ? की माझ्या आठवणीत काही घोळ आहे ? कदाचित आमच्या एका अतिपुरातन मित्राच्या आवडीशी घोळ होतो आहे.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सन्जोप राव's picture

14 Apr 2010 - 2:27 pm | सन्जोप राव

अर्थात. आपल्या स्मरणशक्तीविषयी निश्चिंत राहावे. 'शिक्षकांची' त्या काळात भारतात सर्रास मिळत नसे. 'बादशाही आव्हान' फक्त कंपनीच्या पैशाने पेलायला जमे. एक दीर्घ काळ त्या 'म्हातार्‍या धर्मगुरु'च्या आदेशानुसार वागलेलो आहे.बाकी प्रगती त्या मानाने अलीकडील...
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

मुक्तसुनीत's picture

10 Apr 2010 - 6:38 pm | मुक्तसुनीत

संजोप राव ! स्टॅग पार्टी लई भारी !!
काही गोष्टी पाह्यजेत अजून :
हे सगळं मनसोक्त एन्जॉय करणार्‍या मंडळींच्या कमेंट्स (व्हेज, नॉनव्हेज दोन्ही !)

अतिअवांतर : काही विविक्षित स्टॅगपार्टीजमधे काही अन्य घटकही मागवले जातात असे ऐकले आहे ! ;-)

शुचि's picture

10 Apr 2010 - 7:27 pm | शुचि

सगळं नाही तर निदान आता एस वाय ला फिजिक्स लॅब च्या मागे काय झालं ते तरी सांगाच :)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

शुचि's picture

10 Apr 2010 - 7:06 pm | शुचि

भेदक संवादामधे टिपलेलं अजूनही "पहील्या प्रेमाशी" राखलेलं हजरजबाबी लोकांचं इमान आवडलं.
लेख मस्त.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

शानबा५१२'s picture

10 Apr 2010 - 7:10 pm | शानबा५१२

छान

-----------------------------------------------------------------------
I'll never compromise
No F***ing way!

ऋषिकेश's picture

10 Apr 2010 - 9:53 pm | ऋषिकेश

व्वा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

व्वा रे व्वा :)

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

गणपा's picture

11 Apr 2010 - 3:02 am | गणपा

आयला सन्जोप राव तुम्ही या क्षेत्रात पण उडी मारलीत.
नाही खाण्या पिण्यातील लेखनात तुमचा हात धरणार पैदा व्हायचाय कबुल आहे पण चक्क फक्कड चीकन रस्सा आणी चमचमीत खिचडी करुन आम्हाला कांपीटीशन ;)

मालकांना सांगुन काही क्षेत्रांमध्ये आरक्षण चालु करावे लागेलसे वाटतेय.

सुचेल तसं's picture

11 Apr 2010 - 4:48 am | सुचेल तसं

व्हेजिटेरिअन लोकांचा चकणा वेगळा असतो... आलू भुजिया, खारवलेले काजू, मसाला शेंगदाणे, पोह्याचा/मुरमुर्‍याचा/मक्याचा चिवडा, मीठ/तिखट लावून काकडी, चकल्या, फरसाण, बाकरवडी, मीठ टाकून भाजलेल्या/उकडलेल्या शेंगा, इत्यादि...

राजेश घासकडवी's picture

11 Apr 2010 - 4:57 am | राजेश घासकडवी

मुळात हा चुकीच्या क्याटेगरीत पडला असं आमचं स्पष्ट मत आहे. त्याच नाव पार्टी पार्टी असण्याऐवजी स्टॅग पार्टी असं असायला हवं होतं. लेखातला संदेश (साल्यो, पाककृती वगैरे कसले करत बसलाय, मुक्काट गप्पा हाणा आणि चमचमीत गिळा काहीतरी) हा फारच तरलपणे आल्यामुळे तो लेख पाककृतीविषयीच आहे की काय असा लोकांचा समज होण्याची शक्यता आहे. हे तारल्य लेखवस्तूतल्या व्हेज नॉनव्हेज जोक्स, दारू, सिगरेटी, त्यांबरोबर येणाऱ्या नोस्टाल्जिक आठवणी, काही नशीबवानांच्या करंट कथा आणि कोलेस्टरॉल घातलेले चिकन या झणझणीत मसाल्याबरोबर नीट जात नाही. मालवणी मसाला घेऊन तो मटणात घालण्याऐवजी शहाळ्याच्या मलाईवर घालून खाल्ल्यासारखं वाटलं. त्यात ती चित्रं आणि कृतीचं (की न-कृतीचं) वर्णन अनाठायीच.

सन्जोप राव's picture

11 Apr 2010 - 5:27 am | सन्जोप राव

स्टॅग पार्टी ही बहुदा ब्रह्मचार्‍यांची असते.
प्रतिक्रियेच्या उर्वरित भागावर मौन.
सन्जोप राव
वो जिनको प्यार है चांदीसे इश्क सोनेसे
वही कहेंगे कभी हमने खुदखुशी कर ली

राजेश घासकडवी's picture

11 Apr 2010 - 6:26 pm | राजेश घासकडवी

बहुतेक वेळा स्टॅग पार्टीचा अर्थ लग्न व्हायच्या आधीची शेवटची पार्टी या संदर्भात वापरला जातो हे खरं आहे. पण तो विशेष वापर आहे. स्टॅगचा ब्रह्मचारी हा कोता अर्थ झाला. या दुव्यावर जास्त सर्वसाधारण अर्थ आहे.... :)

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Apr 2010 - 5:29 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री राव, लेख आणि पाकृ दोन्ही आवडले.

संवादांच्या चखण्याने अजून रंगत आली असती! ;)

(खुद के साथ बातां : रंगा, एकूण सगळीकडेच लॅबपेक्षा लॅबच्यामागेच खरे 'एक्सपेरिमेंट्स' होतात असे दिसते! ;) )

(लॅब असिस्टंट)चतुरंग

टुकुल's picture

12 Apr 2010 - 3:35 pm | टुकुल

लै भारी...
मजा आली वाचुन,

>>'बंभोले..' म्हणून आपापले ग्लास संपवावेत आणि आपापली पानं वाढून घ्यावीत..
सर्वात महत्वाच्या गोष्टी या दोन्हीच्या मधे होतात, त्यांच्या बद्द्ल जरा अजुन लिहिल असत तर.....

--टुकुल

संदीप चित्रे's picture

14 Apr 2010 - 1:43 am | संदीप चित्रे

हा लेख आणि फोटू न पाहिल्याचा पश्चाताप होतोय, संजोपराव !
अशा पार्टीत लोकांच्या जीभा ज्या मोकाट सुटतात त्याला तोडच नसते.
चिकन एकदम झणझणीत दिसतंय !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

अर्धवटराव's picture

20 Dec 2011 - 11:15 am | अर्धवटराव

आज परत एकदा हा लेख वाचला. एव्हाना ५०+ पारायणं झाली असतील :) ... आणखी कितीतरी होतील.

(पार्टीवाला) अर्धवटराव

दिपक's picture

20 Dec 2011 - 11:50 am | दिपक

पर्फ़ेक्ट टायमिंग वर पर्फेक्ट लेख वर काढला राव....थर्टी फस्ट कमिंग सुन:-)

शाहिर's picture

20 Dec 2011 - 6:29 pm | शाहिर

काय प्रॉब्लेम असेल ?

महासंग्राम's picture

24 Oct 2015 - 2:24 pm | महासंग्राम

काय प्रॉब्लेम असेल ? काहीतरी करा राव या साठी शिंच्यानी वैताग आणलाय

सर्वसाक्षी's picture

24 Oct 2015 - 3:08 pm | सर्वसाक्षी

मोठ्या आशेने धागा उघडला. वाटलं होतं रावसाहेब पार्टी जाहिर करत असावेत.
रावसाहेब, मनावर घ्या. तपन कुमार ची बांग्ला तबकडी वाट पाहते आहे.