परवा सहज जुनी वही चाळत होते. त्यात ही मसुर चिकन सापडली. दुकानात धानसाक मसालाही मिळाला. तेव्हा रविवारी यशस्वी प्रयोग केला.
साहित्यः
३/४ कप मसूर; अर्धा तास पाण्यात भिजवुन, निवडुन घ्यावेत.
२ स्कीन लेस बोन-इन चिकन ब्रेस्ट, लहान तुकडे करुन
३ कांदे, बारीक चिरुन
२ टोमॅटो, बारीक चिरुन
२ डहाळ्या कढिपत्ता
मुठभर कोथिंबिर
१/२ इंच आल्याचा तुकडा
४-५ लसूण पाकळ्या, सोलून
१ टी स्पून हळद
१ १/२ टी स्पून तिखट
२ टी स्पून धानसाक मसाला
१/२ चमचा गरम मसाला
१ टे. स्पून तेल
मीठ चविप्रमाणे
कृती
आलं,लसूण, कोथिंबिर एकत्र वाटुन पेस्ट करुन घ्यावी. चिकनच्या तुकड्यांना ही पेस्ट लाऊन मुरवत ठेवावे. प्रेशर पॅनमधे तेल तापत ठेवावे. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे. कांदा गुलाबी झाला की टोमॅटो आणि कढीपत्ता घालून ४-५ मिनिटे परतावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे म्हणजे खाली लागणार नाही. हळ्द, तिखट, गरम मसाला, धानसाक मसाला, मसूर घालून परतावे. गरम पाणी घालुन प्रेशर पॅनचे झाकण लावून मसूर शिजवून घ्यावेत. मसुर शिजले की त्यात मुरवत ठेवलेले चिकन मुरवण्यासह घालावे. ज्या प्रमाणात रस्सा हवा त्या प्रमाणत पाणी घालुन उकळी आणावी. चिकन शिजले की चवीप्रमाणे मीठ घालावे.
प्रतिक्रिया
8 Dec 2009 - 4:21 am | लवंगी
थोडासा धनसाक सारखा..
8 Dec 2009 - 11:58 am | वेताळ
फोटो पण एकदम झक्कास दिसतोय्,त्यामुळे ही डीश देखिल नक्कीच चवदार असणार . अख्खा मसुन व चिकन हे दोन्ही पण मला आवडतात .त्याचे हे फ्युजन करुन बघायला हरकत नाही. :))
वेताळ
8 Dec 2009 - 11:50 am | सहज
मसुराची उसळ फार आवडते पण हे फ्युजन आवडेल की नाही सांगता येणार नाही :-)
लेंटील्स, मीट अश्या युरोपियन डीश देखील तेवढ्या पसंत नाहीत.
असो अजुन येउ दे!
8 Dec 2009 - 3:14 pm | गणपा
अभिनव प्रकार दिसतो .
ना पहेले कभी देख्या ना चख्या.
-माझी खादाडी.
8 Dec 2009 - 3:51 pm | बाहुली
धानसाक मसाला म्हणजे ????
8 Dec 2009 - 6:47 pm | स्वाती२
पारसी लोकांचा धानसाक मसाला असतो. मला इथे बादशाह ब्रँडचा मिळाला.
8 Dec 2009 - 6:41 pm | स्वाती२
मी गेल्या भारतभेटीत आईच्या वहीतून बर्याच रेसिपी कॉपी केल्या त्यात ही रेसिपी होती. नंतर वाचल्यावर मलाही खास वाटली नव्हती कारण इथल्या लेंटीलसूपचा अनुभव होता. माझ्या साठी मसूर आमटी म्हणजे कायस्थी पद्धतीची-हिरवं वाटण, तळला मसालावाली. तोच प्रकार चिकनचा. त्या नंतर माबोवर टेस्टी बाइटच्या मद्रास लेंटील बद्दल वाचल. त्यात म्हणे मीट घालून चिली होईल. पण प्रयोग काही केला नाही. शनिवारी परत ही रेसिपी समोर आली तेव्हा परत ते मद्रास लेंटील आठवलं आणि ट्राय केला. मस्त चमचमीत आणि झटपट. मसुर भिजेपर्यंत बाकी तयारी केली. कुकिंग टाईम ४० मिनिटं. एरवी कडधान्य म्हटलं की कुरकुरणार्या लेकाने सुद्धा चाटून पुसुन खाल्लं.तेव्हा मंडळी एकदा करुन बघा.