‘भारताचा नेपोलियन’ अर्थात हेमू

सारथी's picture
सारथी in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 10:34 am

हेमू ऊर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य भारताच्या इस्लामकालीन कालखंडातील एक हिंदू राजा. ज्याला ‘भारताचा नेपोलियन’ या नावानेदेखील ओळखले जाते. याने तब्बल २२ लढाया जिंकूनसुद्धा, पानिपतच्या दुसर्‍यान युद्धात दुर्दैवी पराभव पत्करावा लागल्यामुळे हेमूचे सामर्थ्य झाकोळले गेले. कष्ट करून आणि स्वतःच्या अंगीभूत कौशल्याने राजेपदापर्यंत पोहोचलेले इतिहासामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक आहेत, त्यातीलच हेमू एक.
१६व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये सत्ता गाजवलेला हा एकमेव हिंदू राजा. १६व्या शतकामधला भारत हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर होता, विशेषतः उत्तर भारतामध्ये मुघल आणि अफगाण यांमध्ये सत्तासंघर्ष सुरू होता. त्यामानाने दक्षिण भाग हा विजयदेवरायाच्या हिंदू राजवटीखाली स्थिर होता. १५२६ची पानिपतची पहिली लढाई जिंकून जेव्हा बाबर गादीवर आला, तेव्हा त्याने भारतातील बहुतांश हिंदू मंदिरे फोडली. त्यामुळे मुघलांना कोणीतरी लगाम घालणे ही त्या काळाची गरज होती आणि हेमू ती जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत होता.

हेमूचा जन्म १५०१मधला. पौरोहित्य करणार्‍या एका गरीब ब्राह्मण कुटुंबामधला. राजस्थानच्या पूर्वेस असणार्‍या अल्वर जिल्ह्याच्या मच्चेरी नामक गावामध्ये हा ‘भारताचा नेपोलियन’ जन्माला आला. हेमूचे वडील राय पूरनदास, हे पौरोहित्य करून कुटुंबाची गुजराण करत असत. पण जसे मुघलांचे वर्चस्व वाढू लागले, तसे पौरोहित्य करणार्‍या ब्राह्मणांना मुघलांच्या जाचास सामोरे जावे लागू लागले. त्यामुळे हेमूच्या वडिलांनी पौरोहित्याचा व्यवसाय बंद करून कुटुंबासह रेवाडीच्या कुतुबपूरमध्ये (सध्याच्या हेमूनगरमध्ये) राहण्यास गेले. हे ठिकाण पूर्वी मेवातमध्ये येत असे, सध्या हे हरियाणात येते. रेवाडी हे पूर्वीच्या काळातील इराक, इराणला जोडणार्‍या दिल्लीच्या रस्त्यावरील मध्यवर्ती ठिकाण होते. सर्वात प्रथम हेमू शेरशाह सुरीला खाद्यपदार्थ पुरवत असे. पुढे हेमू आणि हेमूचे वडील शेरशाह सुरीला शोरा (Potassium Nitrate) पुरवू लागले. शोरा (Potassium Nitrate)चा उपयोग दारूगोळा बनवण्यासाठी केला जात असे. या वेळेस हेमूचे वय १५ वर्षे होते. पुढे धर्मांतर करण्यास विरोध केल्याच्या कारणास्तव वयाच्या ८२व्या वर्षी हेमूच्या वडिलांचा शिरच्छेद करण्यात आला. या ठिकाणी राहून तो हिंदी, संस्कृत या भाषांबरोबरच पर्शियन, अरेबिक भाषांवर त्याने पकड मिळवली. लहानपनासूनच त्याला व्यायामाची आणि कुस्तीची आवड होती. ‘इमाम दस्ता’ (हे एक लोखंडाचे मोठे भांडे असते आणि मोठ्या हातोड्याच्या साहाय्याने यामध्ये मिठाचे चूर्ण केले जाते)मध्ये मीठ चिरडून त्याने स्वतःची ताकद आजमवण्यास सुरुवात केली. मोठे झाल्यावर हेमूनेदेखील व्यवसायात आपल्या वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच मित्र असलेल्या सहदेवच्या गावी हेमू घोडेस्वारीमध्ये निपुण झाला. सहदेव हा जातीने रजपूत होता आणि हेमूने लढलेल्या प्रत्येक युद्धात याचा सक्रिय सहभाग होता. (अपवाद पानिपतचे दुसरे युद्ध). हेमू हा धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील वृंदावनच्या वल्लभ संप्रदायाचे सदस्य होते, याचबरोबर त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या होत्या. एकदा असाच हेमू शोरा घेऊन गेला असता, शेरशाह सुरीच्या नजरेत आला. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभावित होऊन शेरशाह सुरीने त्याला स्वतःच्या सैन्यात उच्च पदावर घेतले आणि येथूनच हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

शोरा विकण्यास सुरुवात केल्यानंतर थोड्याच दिवसानंतर हेमूने तोफांसाठी लागणार्‍या तांबे आणि पितळाचे पत्रे पाडण्याचा कारखाना सुरू केला. यासाठी त्याने गोव्याच्या पोर्तुगीजांची मदत घेतली. या सुमारास इ.स. १५४०मध्ये शेरशाह सुरीने मुघल शासक बाबरचा मुलगा हुमायून याला भारतामधून हद्दपार करण्यात यश मिळवले होते. इ.स. १५४५मध्ये शेरशाह सुरीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इस्लाम शाहने राजधानी दिल्लीवरून ग्वाल्हेरला हलवली. पश्चिमेकडून वारंवार होणार्‍याच हल्ल्यांपासून ग्वाल्हेर हे ठाणे सुरक्षित होते. इस्लाम शाह सुरीने हेमूमधील व्यवस्थापकीय कौशल्ये आणि इतर गुण ओळखून त्याला स्वतःचा वैयक्तिक सल्लागार बनवले. हेमूने इस्लाम शाह सुरीला फक्त व्यापार आणि उदीमामध्येच मदत केली असे नाही, तर त्या वेळच्या उत्तर भारतातील राजकारणामध्येदेखील हेमूचा सक्रिय सहभाग होता. हेमूमधील हे गुण हेरून इस्लाम शाह सुरीने हेमूला ‘शंगाही बाजार’ अर्थात दिल्लीचा ‘बाजार अधीक्षक’ या पदावर नेमणूक केली. या पदानंतर थोड्याच दिवसात हेमूला या पदाबरोबरच अंतर्गत सुरक्षेचा मुख्य अधिकारी म्हणून नेमण्यात आले आणि त्याच्या पदाला वजीरपदाबरोबरची मान्यता देण्यात आली. इ.स. १५५३मध्ये हेमूच्या आयुष्यात ‘शिशिर’ आला. इ.स. १५५३मध्ये शेरशाह सुरी मरण पावला आणि आदिलशाह सुरी गादीवर आला. आदिलशाह सुरी हा एक अतिशय विलासी, दारूच्या आहारी गेलेला, स्त्रीलंपट शासक होता. त्यामुळे प्रजेमध्ये आणि सैनिकांत त्याच्याविरुद्ध असंतोष वाढत गेला आणि हे सर्व थांबवण्यासाठी त्यला हेमूसारख्या कुशल प्रशासकाची आवश्यकता होती. आदिलशाह सुरीने हिंदू योद्धा हेमू उर्फ हेमचंद्र विक्रमादित्याला साम्राज्याचा पंतप्रधान आणि भूदल प्रमुख बनवले. आदिलशाह सुरी स्वतः चुनारला गेला, ही जागा त्याला जास्त सुरक्षित वाटत होती. सेनाध्यक्ष झाल्यानंतर हेमूच्या हाताखाली अफगाणांची फौज आली. अशा प्रकारे राज्याचे सर्व प्रशासन हेमूच्या हाताखाली आले होते. शासन हातात आल्यावर हेमूने कर न भरणार्‍या छोट्या-मोठ्या प्रदेशांना ताळ्यावर आणले. कमकुवत आदिलशाह सुरीविरुद्ध झालेले उत्तर भारतामधले अनेक छोटे-मोठे उठाव हेमूने या किल्ल्यांच्या आश्रयाने चिरडले. इ.स. १५५३ ते १५५६मध्ये किल्ला फार मोठ्या प्रमाणात सक्रिय राहिला. याच सुमारास इब्राहिम खान, सुल्तान मुहम्मद खान, ताज कर्रानी, रख खान नूरानी यांसारख्या मातब्बरांचा हेमूने पराभव केला आणि एकामागून एक करत सार्‍यांना यमसदनास धाडले. जुलै, १५५५च्या छप्परघटाच्या युद्धामध्ये हेमूने बंगालचा सुभेदार मोहम्मद शाह याला पाणी पाजले आणि युद्धामध्ये मोहम्मद शाहचा मृत्यू झाला. अशा प्रकारे बंगालच्या प्रचंड सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी हेमूने सेनापती शाहबाज खानला नेमले. याच दरम्यान आदिलशाह सुरीचे मानसिक संतुलन ढळले आणि हेमू व्यावहारिकदृष्ट्या राजा मानला जाऊ लागला. हेमूला हिंदू तसेच अफगाणी सेनापतींचे मोठ्या प्रमाणवर समर्थन होते. जेव्हा हेमू जुलै, १५५५च्या छप्परघटाच्या युद्धामध्ये व्यस्त होता, त्याच सुमारास हुमायूनने या संधीचा फायदा घेत पंजाब, दिल्ली आणि आग्रा यावर परत कब्जा केला.
यानंतर साधारण ६ महिन्याच्या आसपास हुमायूनचा मृत्यू झाला आणि त्याचा १३ वर्षाचा मुलगा अकबर नाममात्र बादशहा झाला आणि बैरम खान राज्यकारभार सांभाळू लागला. युद्धास अनुकूल परिस्थिती प्राप्त झालेली बघताच दिल्लीवर स्वतःचा एकछत्री अंमल कायम करण्यासाठी आणि मुघलांना कायमचे हुसकावून लावण्यासाठी, भल्या मोठ्या सेनेचा विशाल सागर घेऊन बंगालवरून, सध्याच्या झारखंड, पूर्वेचा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या मार्गाने हेमूने दिल्लीकडे कूच केले. हेमूच्या युद्धनीतीमुळे आणि रणांगणातील कौशल्यामुळे मुघल सैनिकांमध्ये गोंधळ माजला. आग्र्याचा त्या वेळेचा सुभेदार इस्कंदर खान उझबेक न लढताच आग्रा सोडून पळाला. हेमूने इटावा, काल्पी, बयाना यासारख्या सुभ्यांवर मोठ्या कौशल्याने आणि सफाईदारपणे विजय मिळवत, सध्याच्या उत्तर प्रदेशच्या मध्य आणि पूर्व भागावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. ६ ऑक्टोबर १९५६ रोजी दिल्लीजवळ तुघलकाबादजवळ झालेल्या एका दिवसाच्या लढाईमध्ये हेमूने अकबरच्या फौजेला पाणी पाजले आणि दिल्ली परत हस्तगत केली. हेमूने सलग २२ लढाया लढल्या आणि जिंकल्या.
हिंदू राज्य :
हेमूने शतकानुशतके परकीय राजवटीत, परकीय शासकांच्या गुलामीमध्ये जखडलेल्या भारताला मुक्त करून दक्षिण भारतामधील विजयनगर साम्राज्याच्या बरोबरीने भारतामध्ये ‘विक्रमादित्य या नावाने ‘हिंदू राज्य’ सुरू केले. ७ ऑक्टोबर १५५६ रोजी दिल्लीमधील जुन्या किल्ल्यामध्ये हेमूचा राज्याभिषेक झाला आणि हेमू ‘सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य’ या नावाने ओळखला जाऊ लागला. रजपूत आणि अफगान सेनानायकांच्या उपस्थितीत आणि धार्मिक पद्धतीने राज्याभिषेक पार पडला. या घटनेच्या निमित्ताने त्याने स्वतःची छबी असलेली नाणी वापरात आणली. राजधानी परत एकदा दिल्लीला हलवण्यात आली आणि जुन्या किल्ल्यामधून सर्व राज्यकारभार बघितला जाऊ लागला.
हेमूने परत एकदा मोठ्या फौजांची जमवाजमव केली. कोणत्याही अफगाण सेनानायकाला त्याच्या पदावरून न हटवता सैन्यामध्ये हिंदू अधिकार्‍यांची नेमणूक केली. केवळ कौशल्य, साहस आणि पराक्रम यांच्या जोरावर हेमू, ‘सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य’ या नावाने देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ होता. इतिहासकार अब्दुल फजलच्या मतानुसार हेमू दिल्लीनंतर काबूलवर आक्रमण करण्याची योजना आखत होता.
हेमूची ऐतिहासिक हवेली :
एक साधा व्यापारी, नंतर सेनेचा पंतप्रधान आणि शेवटी थेट सेनानायकापर्यंत पोहोचलेल्या हेमूच्या ऐतिहासिक कारकिर्दीच्या अनेक गोड-कडू आठवणी या हवेलीबरोबर जुळलेल्या आहेत. महाभारतकालीन रेवाडीच्या कुतुबपूरमध्ये असलेली दोन मजली हवेली आजही प्राचीन कलात्मक कारागिरीची साक्ष देते. कलात्मक प्रवेशद्वार, तसेच दुर्मीळ दगडांवर केलेली कलाकुसर आजही आपल्याला प्रभावित करते. चारही बाजूंना असलेले नक्षीकाम आपले लक्ष वेधून घेते. सज्जे आणि खोल्या बघून कधीकाळी असणार्‍या या हवेलीच्या भव्यतेची आपणास सहज प्रचिती येते. तळमजल्यावर छोटे-मोठे मिळून बारा कक्ष आहेत, तर चार मोठी सभागृहे आहेत. एक कक्ष खास स्वयंपाकासाठी राखीव असल्याचे आढळून येते. येथे तीन तळघरे असून सध्या ती बंद अवस्थेत आहेत. विशेष गोष्ट अशी की या ठिकाणी कोठेही खिडक्या नजरेस येत नाहीत. याच्या मागे-पुढे त्या काळी अंगण, बाग-बगिचे देखील होते. कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने असे बांधकाम करण्यात आले असावे. या तीस फूट हवेलीचा पहिला मजला ९०० ते १००० वर्ष जुना असल्याचे सांगितले जाते. या हवेलीचा दुसरा मजला एका विशिष्ट प्रकारच्या विटांनी बनवला गेला आहे. या विटांना ‘लखौरी विटा’ म्हणतात. पाच इंच लांब, साडे तीन इंच रुंद आणि दीड इंच जाड असलेल्या या विटांच्या बांधकामामध्ये पोर्तुगाली शैलीचे दर्शन होते. १५४०मध्ये या हवेलीचा जीर्णोद्धार करण्यात आला. तळामध्ये असलेली दोन सभागृहे आजही शाबूत आहेत. त्यामधील एकाचे छत पडले आहे.
अर्थात सरकार या हवेलीच्या डागडुजीबाबतदेखील उदासीनच आहे.
‘तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं’ हे हेमूच्या बाबतीत तंतोतंत खरे होते म्हणण्यापेक्षा त्याने ते खरे करून दाखवले हे जास्त योग्य होईल.
हेमू, सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य आणि हेमचंद्र भार्गव अशा विविध नावांनी हेमू ओळखला जातो. पण सर्वात जास्त लोकप्रिय हेमूच.

एक साधा शोरा विक्रेता म्हणून जीवन जगणारा हेमू, आदिलशाह सुरीचा सेनापती, नंतर पंतप्रधान आणि शेवटी विक्रमादित्य बनतो तेव्हा खरेच या अलौकिक राजाला आणि त्याच्या अलौकिक कर्तृत्वाला सलाम केल्याशिवाय राहवत नाही.
राज्याभिषेकानंतर लगोलग झालेल्या पानिपतच्या दुसर्‍या युद्धात हेमूला केवळ आणि केवळ दुर्दैवाने पराभवाचा सामना करावा लागला. हेमूने त्याच्या संपूर्ण आयुष्यात अनुभवलेला पहिला आणि शेवटचा पराभव. अकबराकडून हेमूच्या सैन्याची आणि हजारो हिंदूंची कत्तल करण्यात आली.

ज्याप्रमाणे नेपोलियनने त्याच्या सैनिकांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची हमी दिली होती, त्याचप्रमाणे हेमूनेदेखील अनेक सैनिकांना जमिनी आणि जडजवाहीर बक्षीस म्हणून दिले होते आणि त्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची हमी दिली होती.

हेमूच्या आयुष्यातील अखेरचे युद्ध - पानिपतचे दुसरे युद्ध :
पानिपतचे दुसरे युद्ध हे ५ नोव्हेंबर १५५६ रोजी सम्राट हेमचंद्र विक्रमादित्त्य उर्फ हेमू आणि अकबर यांच्यामध्ये झाले. खरे पाहता, हे युद्ध हेमू आणि अकबराचे सेनापती बैरम खान यांमध्ये झाले असे म्हणणे उचित ठरेल. युद्धाच्या वेळी अकबराचे वय अवघे १४ वर्षे होते.
हेमूने दिल्ली जिंकल्याच कळताच दिल्ली परत मिळवण्याच्या हेतूने बैरम खान दिल्लीवर चालून येण्यास निघाला. हेमूला याची कुणकुण अगोदरच लागली असल्याने हेमूने आपल्या सैन्यासह पानिपतच्या दिशेने कूच केले होते आणि ५ नोव्हेंबर १५५६ रोजी या दोन्ही सेना एकमेकांना भिडल्या. ज्येष्ठ इतिहासकार कीन यांच्या मतानुसार, भय आणि सुरक्षेच्या कारणास्तव अकबर आणि त्याचा रक्षणकर्ता बैरम खान याने युद्धात प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते ८ मैल अंतरावर उभे होते. अकबरबरोबर ५००० अतिविश्वासू आणि तयारीचे सैन्य होते, युद्धात पराभव होत असल्याचे दिसून येताच काबुलकडे पळून जावे, असा बैरम खानचा सैन्याला आदेश होता.
हेमू स्वतः सैन्याचे नेतृत्व करत होता, हेमूच्या सैन्यात सुरुवातीला १५०० हत्ती आणि तोफखाना होता. हेमूने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ३०,०००च्या घोडदळाला घेऊन कूच केले होते. या घोडदळामध्ये रजपूतांचा आणि अफगाणांचा भरणा होता. सैन्याचा आणि अफगाणांचा उत्साह वाढवण्यासाठी हेमूने त्यांना जहागिरी म्हणून जमिनी दिल्या होत्या आणि त्याच्या खजिन्याची द्वारे उघडली होती. अशा प्रकारे त्याने अतिशय कर्तबगार असे सैन्य एकत्र केले होते.
अकबराचे सैन्य :
नाममात्र प्रमुख : अकबर
प्रत्यक्ष प्रमुख : बैरम खान. याचा मुलगा अब्दुल रहीम खान हा अकबराच्या दरबारातील ‘नऊ’ रत्नांपैकी एक होता.
तिरंदाज असलेले घोडदळ प्रमुख : मोहम्मद कासिम
मुघलांच्या केंद्रस्थानी असलेल्या पायदळ, घोडदळ यांच्यामध्ये उस्ताद अली कुली खान (तोफखान्याचा प्रमुख) हा पानिपतचे पहिले युद्ध लढला होता. अकबराच्या आजोबांबरोबर
हुसेन कुली खान, मोहम्मद साजिद खान पूर्वांची, शाह कुली खान महरूम, मीर मोहम्मद बरका, कासिम खान नियास्पोरी व सईद मोहम्मद बरका असे महारथी होते.
सर्वात पुढे असलेल्या सैन्यामध्ये मेहमूद खान बुडूस्की, कक्साल खान, हुसेन कुली बेग, शाह कुली बेग महराम आणि समाजी खान होता.
मुघलांची उजवी फळी सिकंदर खान उझबेग सांभाळत होता तर डावी फळी अब्दुल्ला खान सांभाळत होता.
हेमूचे सैन्य :
प्रमुख अर्थात हेमू, ‘हवाई’ नावाच्या त्याच्या हत्तीवर.
तोफखाना प्रमुख : मुबारक खान आणि बहादूर खान
हत्तीदल : हसन खान फौजदार, मैकल खान, इखतीयार खान, संगरम खान आणि कपन. उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. केंद्रस्थानी जातीने हेमू आणि भगवान दास होते.
आता सैन्याची रचना पाहू,
जसे आपण बघितले, तशी डावी, उजवी आणि मधली आघाडी अशी ही दोन्ही सैन्ये विभागली गेली. अकबरातर्फे हुसेन कुली बेग, शाह कुली खान महरूम सर्वात पुढची फळी सांभाळत होते, तर शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान हे मधली फळी सांभाळत होते. कोणत्याही युद्धात (अगदी क्रिकेटमध्येसुद्धा) मधली फळी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. मधल्या फळीचे हे काम असते की जसे प्रमुखाला शत्रुपक्षाची बाजू कमकुवत झाल्याचे निदर्शनास येते, तशी मधली फळी पुढच्या फळीला बाजूला करत वार्‍याच्या वेगाने शत्रुपक्षात घुसते आणि शत्रुपक्षाची मधली फळी एकमेकांपासून विभक्त करते. दुसरे काम असे की, जर पुढची फळी पडली तर येणार्‍या मधली फळी शत्रुपक्षाला स्वतःच्या अंगावर घेते.
शाह बदाग खान आणि शाह अब्दुल माली हे राखीव तुकडी सांभाळत होते.
हेमूतर्फे हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत होते, तर उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत होता. हेमूने या लढाईच्या अगोदर २२ युद्धे जिंकली होती, त्याच्या आघाडीच्या फळीत सुमारे १००० हत्ती होते. हेमूचे सैन्य अनुभवी होते, तसेच हत्तींनी आणि शस्त्रांनी सुसज्ज होते. हत्तीच्या सुळ्यांना जंबिये लावले गेले होते.
हेमूचे सैन्य मुघालांपेक्षा काकणभर सरसच होते. पण मुघलांचे सैन्य धोकादायक बनले होते ते त्यांच्या घोडदळामध्ये असणार्‍या तिरंदाजांमुळे. घोडदळ तिरंदाज हे अतिशय धोकादायक मानले जातात, ते शत्रुपक्षावर एका ठरावीक अंतरावरून बाणांचा वर्षाव करत राहतात. यामुळे शत्रुपक्ष गोंधळतो आणि या दलाच्या मागे लागतो आणि त्यांना तेच हवे असते. अशा प्रकारे शत्रुपक्ष विखरला की त्यांना हरवणे सोपे जाते.
आता प्रत्यक्ष काय घडले पाहू :
यात अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही सैन्याच्या मधोमध एक खंदक होता, जो हत्ती ओलांडून जाऊ शकत नव्हते.
सर्वात प्रथम हेमूने हत्तींच्या साहाय्याने हल्ला चढवला तो मुघलांच्या डाव्या आणि उजव्या फळीवर जी अब्दुल्ला आणि सिकंदर खान सांभाळत होते. मुघलांच्या पायदळाला हत्ती आवरेनासे झालेले बघताच मोहम्मद कासिम त्याचे तिरंदाज असलेले घोडदळ घेऊन अब्दुल्ला खानच्या मदतीला जातो. तिरंदाज बाण मारून हत्तींना जायबंदी करायचा प्रयत्न करत असतानाच वार्‍याच्या वेगाने उजवी बाजू शादी खान कक्कर तर डावी बाजू रामया सांभाळत, मुघलांच्या डाव्या आणि उजव्या फळीवर तुटून पडतात.
अजून हेमू आणि भगवान दास मुख्य आघाडी सांभाळत आहेत. आत्ता फक्त हत्तीदलच पुढे आहे.
या दरम्यान वेगवेगळी झालेली हत्तीदलं युद्धाच्या केंद्रस्थानी सरकू लागतात. हे बघताच मुघलांची मधली फळी खंदकाकडे सरकू लागते. हीच संधी आहे हे बघून हेमू वेगाने आक्रमण करतो. आता दोन्ही दले खंदकापुढे येऊन थांबतात. हेमूच्या सैनिकांनी जरी खंदक पार केला तरी आता त्यांना हत्ती साथ देऊ शकणार नाहीत. हे कळताच मुघलांची मधली फळी खंदकाच्या विरुद्ध बाजूला चिकटून राहते, तर हेमूचे हत्तिदल परत एकदा वेगवेगळे होऊन डाव्या आणि उजव्या बाजूला सरकू लागतात. भगवान दास आणि हिंदू-अफगाणी सैन्य हेमूच्या मागे येऊन उभे आहे.
इकडे अब्दुल्ला खान (मुघल डावी फळी) शादी खान कक्करला (हेमू उजवी फळी) मागच्या बाजूने केंद्रस्थानी ढकलतोय तर दुसर्‍या बाजूला रामयाला (हेमू डावी फळी) सिकंदर खान उझबेगने (मुघल उजवी फळी) केंद्रस्थानी ढकललेय. याच वेळेस मुघलांची शाह कुली बेग महराम, हुसेन कुली खान, अली कुली खान असलेली मधली फळी विभागून वार्‍याच्या वेगाने बाहेर पडते आणि खंदकाच्या दोन्ही टोकांना असलेल्या हत्तिदलाला जाऊन भिडते. आता हेमूचे सैन्य सर्व बाजूंनी घेरले गेले आहे.
आणि जे घडू नये ते घडते, भगवान दास आणि हेमूचे भरवशाचे वीर शादी खान कक्कर, रामया पडतात.
हेमू हत्तीच्या अंबारीत बसून सैन्याला लढाईला अजूनही प्रवृत्त करतोय. त्याचं वेळेस एक बाण हेमूच्या डोळ्यात जातो आणि हेमू बेशुद्ध होऊन अंबारीत कोसळतो. शाह कुली खान जो हेमूच्या हत्तीच्या जवळचं असतो, त्याच्या काहीतरी अतर्क्य घडल्याचे लक्षात येतं. सैन्याच्या साहाय्याने तो हत्तीच्या माहुताला पकडतो आणि हत्तीवर असलेल्याचे नाव विचारतो. माहूत नाव सांगतो, हेमू पडल्याचे कळताच हेमूचे सैन्य विखरते. हेमूला बेशुद्धावस्थेत मुघलांच्या छावणीमध्ये घेऊन जाण्यात येते. अकबर हेमूला मारायचे नाकारतो पण बैरम खान हेमूचे शीर कापून काबूलला तर धड दिल्लीला रवाना करतो.
अबुल फझल (अकबरनामाचा लेखक) म्हणतो, जर अकबराने हेमूला जीवनदान देऊन स्वतःच्या सैन्यात घेतले असते तर अकबरची दृष्टी आणि हेमूचे सामर्थ्य वापरून काय जिंकता आले नसते?
हेमूच्या पळणार्‍या सैन्याला इस्कंदर खानने पाठलाग करून पकडले. त्याच्या हातात सुमारे १००० हत्ती आणि अनेक सैनिक लागले. युद्धानंतर हाताला येतील तेवढे दिल्लीमधील जडजवाहीर घेऊन हेमूची बायको निसटली, इस्कंदर खानाने तिला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
(हेमू युद्धभूमीवरच मरण पावल्याचा काही ठिकाणी उल्लेख आहे.)
दुर्लक्षिलेला हेमू :
हरियाणाचा हा इतका महान योद्धा, भारताच्याच नाही तर हरियाणाच्या इतिहासाच्या पानांमधूनदेखील गायब आहे. इतिहासाने ज्याच्यासाठी कितीतरी पाने राखली, त्याच्यासाठी हरियाणा सरकार, त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये साधे एक पान राखू शकले नाही, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. हरियाणा सरकारने हेमूसाठी ना कुठले स्मारक उभारले आहे, ना त्याचा राज्याभिषेक दिवस साजरा केला जातो, ना तो शहीद झालेला दिवस कोणाच्या लक्षात असतो.
इतका महान योद्धा हा भारताच्या इतिहासात तसा दुर्लक्षिलेलाच राहिला. त्याच्या कुटुंबाचे पुढे काय झाले? हे फारसे कोणास माहीत नाही. लढण्यात आणि स्वराज्य उभारण्यातच हेमूचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडले. हेमूला आयुष्यात सुखाचे असे फारच थोडे क्षण मिळाले. राज्याभिषेक झाल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्येच मृत्यूने हेमूला गाठले. न त्याच्याकडे परंपरेनुसार चालत आलेली राजगादी होती न संपत्ती. पण हे सर्व नसतानाही मुघलांना पळता भुई थोडी करून सोडणार्‍या आणि अल्पकाळ का होईना हिंदू राज्य प्रस्थपित करणार्‍या या दुर्लक्षित पण तितक्याच पराक्रमी ‘विक्रमादित्याला’ मानाचा मुजरा.

footer

प्रतिक्रिया

हेमू काही काळासाठी दिल्लीचा अधिपती झाला आणि अकबराबरोबरच्या युद्धात त्याचा वध झाला इतकेच माहित होते.

इतिहासाची तपशीलवार ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

शैलेन्द्र's picture

12 Nov 2012 - 11:05 pm | शैलेन्द्र

हेमु हे खरच एक दुर्लक्षीत रत्न आहे,, आपल्याच लोकांना कदर नसलेल..

तिमा's picture

14 Nov 2012 - 1:31 pm | तिमा

लेख माहितीपूर्ण आहे. पण पानिपतच्या युद्धाचे वर्णन करताना वाक्यांतील 'काळ' अचानक बदलला आहे ते खटकले.

मी-सौरभ's picture

14 Nov 2012 - 4:13 pm | मी-सौरभ

अजून थोडी सफाई हवी होती असे मात्र सुचवू ईच्छीतो...

श्रीरंग_जोशी's picture

21 Nov 2012 - 1:17 am | श्रीरंग_जोशी

एका दुर्लक्षित योद्ध्याची माहितीपूर्ण ओळख करून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!!

सुधीर कांदळकर's picture

26 Nov 2012 - 7:06 pm | सुधीर कांदळकर

लेख आवडला. धन्यवाद.

सागर's picture

28 Nov 2012 - 7:25 pm | सागर

सारथी,
एका असामान्य योद्ध्याची तितकीच छान ओळख तुम्ही या लेखाद्वारे करुन दिलेली आहे..
शेवट उरकल्यासारखा वाटला. पण त्यामुळे लेखाचा दर्जा अजिबात कमी होत नाही.
हेमूचा पराक्रम माहिती होताच पण संक्षिप्त स्वरुपात एवढे प्रभावीपणे सांगता येते याची साक्ष तुमच्या लेखामुळे पटली.
एका दुर्लक्षित विक्रमादित्याची ओळख मनापासून आवडली.