बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू!)

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in दिवाळी अंक
18 Oct 2017 - 12:00 am

Header2

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.)

मागच्या एका कथेत आपण आमच्या मालोजीरावांबद्दल ऐकले. मालोजीरावांची जीवनगाथा म्हणजे एक अद्‌भुत कादंबरी सहज होईल. पण आज आपण त्यापेक्षाही अद्‌भुत अशा आमच्या मित्राबद्दल वाचणार आहोत. मालोजीराव काय आणि बाळासाहेब काय, अशी माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात असे कोणी मला आत्ता सांगितले, तर मी त्याला निश्चितच मूर्खात काढेन.

बाळासाहेब काही आमच्याबरोबर इंजीनिअरिंग कॉलेजला नव्हता. तो आमच्याबरोबर होता एफवायपर्यंत. त्याला आमच्याबरोबर इंजीनिअरिंगला प्रवेश मिळाला होता, पण त्याने तो नाकारला आणि परत बी ग्रूप घेऊन एफवायला बसला. बाळासाहेबांना हे असले सहज शक्य होते, कारण ते कमालीचे बुद्धिमान होते. मधून मधून बाळ्या आणि बाळासाहेब म्हटले की अहोजाओ हा घोळ तुम्ही कृपया चालवून घ्या, कारण तो घोळ केवळ त्याच्या नावामुळे आहे. पण त्याची आणि आमची मैत्री नसती, तर मला त्याला आदराने बाळासाहेब म्हणूनच संबोधायला आवडले असते. आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये साहेब मालोजीरावांचे रूम पार्टनर म्हणून राहत असत. हॉस्टेलवरील दोन खोल्या म्हणजे १०१ व १०२ म्हणजे आमचा अड्डाच झाला होता म्हणा ना. एकात बाळासाहेब व मालोजीराजे राहत, तर दुसऱ्यात कलीम व भट्या राहायचे.

माझ्यात आणि या मित्रांमध्ये एक जवळीक निर्माण झाली होती ती माझ्या आईवडिलांमुळे. माझे वडील होते भारतीय वायुदलाचे एक निवृत्त सैनिक. कुठल्याही धार्मिक अवडंबरावर त्यांचा काडीचाही विश्र्वास नव्हता. आई थोडेफार देवाचे करायची, पण ब्राह्मणाचे घर असून आमच्या घरात पार स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत सगळ्यांना मुक्त प्रवेश असायचा. यात हे माझे मित्रही आले. या गोष्टीचे त्यांना फार अप्रूप वाटायचे. त्या काळात आमच्या शहरात ही बाब तशी विशेष मानली पाहिजे. आमच्या काही नातेवाइकांनी तर आमचे नावही टाकले होते…पण आम्हाला काही फरक पडत नव्हता, कारण नव्या पिढीचा हळूहळू उदय होत होता व अर्थकारणाला देशात व व्यक्तिगत पातळीवर महत्त्व प्राप्त होऊ लागले होते. हे आमचे हॉस्टेलवरचे मित्र हॉस्टेलच्या जेवणाचा कंटाळा आला की हक्काने आमच्याकडे जेवायला येत. पोटभर जेवत. (हॉस्टेलवरच्या जेवणाबद्दल मी लिहीत नाही, कारण जे कुठल्याही हॉस्टेलवर राहिले आहेत, त्यांना त्यात नवीन काही नाही.) आम्हीही सुट्टीत बाळासाहेबांच्या शेतावर असलेल्या घरी जात असू…

बारामतीच्या पुढे एका आडगावात बाळासाहेबांची दहा-बारा एकर जमीन होती. घर चांगले सुखवस्तू होते, कारण बाळासाहेबांसकट त्याचे तीन भाऊ अत्यंत बुद्धिमान होते. सगळ्यात मोठा इंजीनियर झाला व सरकारी नोकरी करत होता. दुसरा इंजीनियर झाला आणि एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. तिसरा माझगाव डॉकवर कंटेनर हलवायचे काम करीत असे. त्याच्याकडे भले मोठे वीस ट्रक व ट्रेलर होते असे म्हणतात आणि बाळासाहेब आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कोणीतरी मोठे होण्याच्या मार्गावर होते. सगळी भावंडे हडकुळी, जणू काही दुष्काळातून आल्यासारखी दिसायची. त्यात सगळ्या हडकुळा म्हणजे आमचा बाळ्या. उंच मान, गालफाडे वर आलेली व सदानकदा केसांना लावलेल्या तेलाने केस चमकत. ओठ पातळ. दात पांढरेशुभ्र. बारीक तलवार कट मिशा. बाळ्याच्या हनुवटीवर एक तीळ होता, हे मला अजून आठवते आहे. वाचताना त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे आवळले जायचे व तो थोडासा चिडल्यासारखा दिसे. यावर त्याचे म्हणणे होते, "बरंय ना. कोणी त्रास द्यायला येत नाही." बाळ्या केसांचा भांग अगदी व्यवस्थित पाडायचा. त्याला एकही केस इकडे तिकडे झालेला चालायचा नाही. सकाळची कमीतकमी १० मिनिटे तरी भांग पाडण्यात घालवे स्वारी. बाळ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याने अंगाला कधीही साधा सदरा लावला नाही. स्ट्राईप्स म्हणजे बाळासाहेबांचा जीव का प्राण. मालोजीच्या बरोबर विरुद्ध. बाळासाहेब पायात कायम कोल्हापुरी पायताणे घालायचा. असा हा बाळासाहेब बाहेर निघाला की आम्हाला धनगरी कुत्र्याची आठवण यायची. आम्ही त्याला तसे चेष्टेने म्हणतही असू. त्यावर त्याचे उत्तर ठरलेले असे, ‘‘धनगरच आहोत आम्ही.’’ बाळ्याचे वाचन दांडगे. ज्याप्रमाणे नाव शेवटी बंदराला आसऱ्याला येते, त्याप्रमाणे आमचे बाळासाहेब शेवटी ग्रंथालयात हमखास सापडायचे. मला आठवते आहे, कचऱ्यात पडलेला कागदाचा चिठोराही तो वाचून काढायचा. वाचनामुळे बाळ्याचे इंग्लिश, मराठी उत्तम होते. एखाद्या इंग्ग्लिश पुस्तकाबद्दल ऐकावे तर त्याच्याकडूनच. त्याच्या तोंडून इंग्लिश सिनेमाच्या गोष्टी ऐकताना आम्ही गुंगून जायचो. हे सगळे वैभव असताना त्या घराचे पाय मात्र जमिनीवर होते. एकदा आम्ही त्याच्या वस्तीवर गेलो असताना मी स्वत: माझ्या डोळ्याने पाहिलेय, त्याचे म्हातारे वडील मुंडासे सांभाळत लटपटत गव्हाचे एक पोते ट्रकमध्ये चढवत होते. म्हातारा होता काटक, पण ते आता त्याला शक्य नव्हते. इतरांनी मदत केल्यावर ते पोते कसेबसे गाडीत चढले. गाडीही यांचीच. मी म्हटले, ‘‘ बाळासाहेब, आता म्हाताऱ्याला विश्रांती द्या की!’’
‘‘अरे, ते ऐकत नाहीत. पहिले पोते मीच चढवणार म्हणतो म्हातारा. जाऊ देत, एक दिवस थांबेल…’’ बाळासाहेब कौतुकाने म्हणाले.

बाळ्याच्या घरात गेल्यावर आमची चंगळ असायची. मटण खावे तर बाळ्याच्या आईच्या हातचेच. ताजे मटण व खास धनगरी पद्धत. जरी शहरात शिकायला असले, तरी बाळ्याला शेतीवाडीची पूर्ण कल्पना होती. वडलांचे मुंडासे बाळ्या सहजपणे बांधत असे आणि तेसुद्धा एकदाही न चुकता. धनगरी मुंडासे बांधण्यास किती अवघड असते हे मी तुम्हाला सांगायला नको. अर्थात आता कोणीच त्या पद्धतीने बांधत नाही म्हणा. आपण सध्या जे पाहतो ते सगळे उत्तरेच्या पद्धतीचे. बाळ्याची आई सडपातळ, अंगाने शेलाटी, हालचालीत चपळ. सगळी मुले तिच्यावरच गेली होती. कष्टाला त्या घरात कोणीही हार मानणारे नव्हते. कष्ट शारीरिक असोत किंवा बौद्धिक.

कॉलेजमध्ये बाळ्याचा दिवस कॉलेजच्या ग्रंथालयातच जायचा. अवांतर वाचन अफाट. अभ्यास केव्हा करायचा कोण जाणे, पण याचा नंबर कायम पहिल्या पाचात. एकदा रसायनशास्त्राच्या वर्गात बाळ्याने एक गणित सोडवले. त्याचे उत्तर काही सरांच्या उत्तराशी जुळत नव्हते. सरांनी जरा जास्त ताणल्यावर बाळासाहेबांनी भर वर्गात उत्तर दिले, ‘‘सर, इफ आय ॲम राँग, देन बॉईल्स लॉ इज राँग.’’ चिडून सरांनी बाळ्याला वर्गातून हाकलून दिले, पण नंतर त्याला बोलावून घेतले….
‘‘बाळासाहेब, तुमचे बरोबर आहे. पण लक्षात घ्या, माझे चुकले होते. तुम्हाला वर्गातून हाकलले ते तुम्ही बॉईल्सची अक्कल काढली म्हणून. तुम्ही पुढे मोठ्ठे व्हाल, पण कुठल्याही प्रकारचा माज हा वाईटच, हे चांगले लक्षात ठेवा…’’ बाळ्याने हे मात्र आयुष्यभर लक्षात ठेवले. पण बाळासाहेबांच्या नशिबाला हे मान्य नव्हते. त्याने माजल्यासारखे बाळ्याला छळायला सुरुवात केली. मधल्या काळत आम्ही इंजीनिअरिंगला गेलो व बाळ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधे बीएस्‌सी करायला गेला. त्या काळात संपर्काची सोय आजच्याएवढी नव्हती. संपर्क कमी होत गेला.

मध्ये एकदा भेटला, तेव्हा त्याने त्याच्या घराची कशी धुळधाण उडाली, ते सांगितले. अमानवी शक्ती - म्हणजे आजकालच्या भाषेत डार्क स्पिरिट्स - दुष्ट प्रवृत्ती जन्माला घालतात असे मानायचे काही कारण नाही. तोडीचा दुष्टपणा करण्यास माणूस पुरेसा आहे.... असे कोणी तरी म्हटले होते..

पहिल्या दोन भावांचा खून झाला, तिसरा जीव वाचविण्यासाठी पळून गेला. वडील वारले होते व आईने गाव सोडून माहेरी आसरा घेतला होता. (तीही नंतर खंगून वारली.) हे सगळे झाले भाऊबंदकीमुळे, असे त्याचे म्हणणे होते. दादागिरी करणारे, दडपशाही करणारे, किंवा इतरांचे हक्क हिंसेने पायदळी तुडविणारे हे गुन्हेगार आहेतच, पण त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की ज्यांच्यावर त्यांनी अत्याचार केले आहेत, त्यांना ते या नवीन मार्गाची ओळख करून देतात.... त्यामुळे तिसऱ्या भावाने दोन-चार मुडदे पाडले व तुरुंगात गेला. खरे खोटे त्यालाच माहीत. पण बाळासाहेबांनाही अवकळा आली होती, हे खरे.
‘‘काय रे! मग तुझ्या शिक्षणाचे काय?’’
‘‘चालू आहे मालोजीराजांच्या कृपेने.’’ बाळ्या म्हणाला.
‘‘मी केली असती मदत शक्य असते तर, पण ते म्हणजे ’उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीनं काकडून मेलं’ असं झालं..’’ मी म्हणालो.
‘‘मग आता काय विचार आहे?’’
‘‘मला अमेरिकेत जाऊन संशोधन करायचे आहे… आहेत डोक्यात काही कल्पना. जेनेटिक्समध्ये काम करायचंय मला. मला काजूचे गुणधर्म असणारे शेंगदाणे तयार करायचे आहेत….मालोजीनेही मदत करण्याचं वचन दिलं आहे… बघू या काय होतंय ते…. नाही, म्हणजे करायचंच आहे मला…’’ ते ऐकून आम्ही पडायचेच बाकी होतो. इतरांनी त्याची येथेच्छ टिंगलटवाळी उडवली. मी मात्र गप्प होतो. बाळासाहेब मृगजळाच्या मागे धावणाऱ्यांपैकी नाहीत, हे मला पक्के माहीत होते.
‘‘बुडाले म्हणायचे आमचे पैसे!’’ मालोजी.
‘‘बाळासाहेब, गंमत केली बरं का…नाहीतर बसाल गप्प…’’ मालोजी म्हणाला.

अनेक वर्षे गेली. मालोजी अमेरिकेत गेला आणि त्याने बाळ्यालाही तेथे जाण्यास मदत केली. आमच्यातील अंतर वाढले आणि घसटही कमी झाली. पण शाळा-कॉलेजातील मैत्रीत एक गुण असतो, तो म्हणजे त्या मैत्रीला काळ आणि अंतर याचे बंधन नसते. कितीही वर्षांनी भेटा, कुठेही भेटा, मधली वर्षे गाळून परत त्या भेटीपर्यंत आपण त्याच क्षणी परत येतोच. परिस्थितीशी भांडण्याचे सुरुवातीचे दिवस होते ते. यश-अपयश पचवत सगळ्यांचीच वाटचाल चालू होती. मधेच केव्हा तरी मालोजीचा फोन येई. आम्ही फोन करायचा प्रश्र्नच नव्हता. परवडणेच शक्य नव्हते. फोनवर आम्ही बाळासाहेबांचीही चौकशी करायचो.
‘‘त्याचे ठीक चालले आहे. एका गोऱ्या मुलीशी प्रकरण चालू आहे. बहुधा लग्न करतील ते. माझे सगळे पैसे व्याजासहित परत केले, बरं का त्याने! मी व्याज नको म्हणत होतो, पण धनगराने ऐकले नाही.’’ आम्ही आपापसात आमच्या जातीचा अगदी आरामात उल्लेख करायचो. कोणालाच त्याचे काही वाटत नसे, कारण एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाची व आदराची आम्हाला सगळ्यांनाच खातरी होती. मुख्य म्हणजे आम्ही जेव्हा (एकमेकांची) जात काढत असू, तेव्हा त्या जातीचे फक्त चांगले गुणच आमच्या मनात असत. हिणवण्याचा प्रश्र्नच नसे.
‘‘मग चांगलंय की. भेटतो की नाही कधी?’’
‘‘छे रे! तो दुसऱ्या टोकाला आणि मी दुसऱ्या. विमानानेच चार तास लागतात. बघू या, लग्नाला बोलवतोय का… त्याने बोलावले तर मात्र मी जाणार आहे.’’
‘‘तुमचे काय मालोजी? काही प्रकरण?’’ मी हसत विचारले.
‘‘आमचे झाले एकदाच प्रकरण… आता काही होईल असे वाटत नाही…’’ मालोजी.
‘‘पण त्याचे काय चालले आहे? ते काजू आणि शेंगदाणे… त्याचे पुढे काय झाले?"
‘‘चेष्टा करू नकोस. तो जेनेटिक्समधला बाप माणूस समजला जातो आता. मोन्सँटोमध्ये मोठा साहेब आहे आता तो. काहीतरी म्हणत होता तो की त्याचे संशोधन प्राथमिक अवस्थेत असले, तरी योग्य मार्गावर आहे…’’
‘‘येणार आहे का इकडे?’’
‘‘त्याचे संशोधन संपत आले की मग तिकडे त्याच्या फील्ड ट्रायलसाठी येणार आहे असे म्हणत होता…’’

त्यानंतर बरीच वर्षे त्या दोघांची काहीच खबरबात नव्हती. एक दिवस मीही ॲग्रिकल्चरल कॉलेजमधे जाऊन जेनेटिक्सची व त्याचा बियाणे तयार करण्यासाठी वापर यावर थोडीफार माहिती काढली. एक गोष्ट लक्षात आली म्हणजे ते अवघड होते पण कुठल्याच शास्त्रज्ञाने अशक्य आहे असे म्हटले नव्हते. मग मी तो विचार बाजूला सारला.

अशीच अनेक वर्षं सरली आणि अचानक माझ्या कंपनीत बाळासाहेबांचा फॅक्स आला. वाचून मी गारच झालो. बाळासाहेब, त्याची बायको व दोन मुले पुढच्या महिन्यात भारतात येणार होते. त्याला त्याच्या गावाकडे महत्त्वाचे काम असल्यामुळे तो गावीच मुक्काम टाकणार होता. आम्हाला सगळ्यांना त्याने तेथेच बोलावले होते. त्याची बायको व मुले मुंबईला त्याच्या नातेवाइकांच्या फ्लॅटवर माझ्याच गाडीने परतणार होती. बाळ्याने ड्रायव्हरची सोय केली होती. शेवटचे वाक्य खास माझ्यासाठी होते, ‘‘ कोणी आले नाही तरी तू मात्र जरूर येच. महत्त्वाचे बोलायचे आहे.’’

बघता बघता बाळासाहेब येण्याचा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी मी त्याच्या वस्तीवर जाणार होतो. त्या दिवशी उठलो तोच मनात हुरहुर घेऊन. कसा असेल बाळ्या? तसाच असेल का, साहेबासारखा बोलत असेल असे अनेक विचार मनात येत होते. त्याच्या त्या काजूच्या संशोधनाचे काय झाले असेल…? एक ना दोन.. पहाटे गाडी काढली आणि बारामतीला निघालो. दहाच्या सुमारास त्याच्या वस्तीवर पोहोचलो आणि मला ते घर ओळखुच येईना. एकच खोली कशीबशी तग धरून उभी होती. बाकी सगळे घर ढासळले होते, पण घराभोवती हिरवागार उस डोलत होता. मला काही उमजेना…. अर्थात त्याचे उत्तर मला नंतर मिळणार होते. गाडीचा आवाज ऐकून काहीही फरक न पडलेला बाळ्या बाहेर आला… मागे लुकलुकणाऱ्या डोळ्यांची दोन गोरी मुले त्याच्या आड लपून मला न्याहाळत होती. त्या सगळ्यांच्या मागे बाळ्याची गोरीपान, निळ्या डोळ्याची बायको आमच्याकडे पाहत उभी होती. बाळ्याने धावत येऊन मला मिठी मारली आणि आम्ही घराकडे वळलो…
‘‘तू फ्रेश हो! तोपर्यंत मीही आवरून घेतो. आपल्याला आमदाराला भेटायला जायचे आहे. तुझी गाडी आहे, तोपर्यंत दोन चार कामे उरकून टाकू. चालेल ना ?’’
‘‘ तू म्हणशील तसंऽऽ’’
‘‘पण आमदाराकडे काय काम काढलंस बाबा ?’’
‘‘ते सगळं तुला गाडीतच सांगतो.’’ बाळासाहेब म्हणाला.

थोड्याच वेळा चहापाणी करून आम्ही निघालो. वाटेत बाळासाहेबांनी जे काही सांगितले त्याचा गोषवारा असा… मला त्याने सांगितलेले विशेष काही कळले नाही, कारण त्यात मला समजणारी फक्त क्रियापदेच होती. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे काजूमधील गुणधर्म कुठल्या जीन्समुळे येतात, हे शोधून काढण्यासाठी त्याने एक लाखाच्या वर डीएनएच्या लाईन्सचा अभ्यास केला होता व शेवटी त्याचे म्युटेशन करण्यात त्याला यश आले होते.
‘‘अरे, मला यश मिळाले असे आपले म्हणायचे, पण जे झाले ते अपघाताने. तो अपघात माझ्या संशोधनात का झाला आणि तसा अपघात परत घडवून आणण्यास काय करावे लागेल, हे शोधण्यात माझी गेली आठ दहा वर्षे गेली. आता यापुढे निरोगी बियाणे तयार करण्यात माझी आणखी दहा वर्षे तरी जातील.’’
‘‘काय रे, पण तू म्हणतोस तसे शेंगदाणे जमिनीखाली आले आणि त्या दाण्यांना काजूची चव आली, असं तुला म्हणायचं आहे का?’’
‘‘तूच चव घेऊन बघ ना!’’ असे म्हणून त्याने बरोबर घेतलेल्या छोट्या पोत्यातून शेंगा काढून माझ्या डाव्या हातवर हातावर ठेवल्या. सामान्य शेंगांसारख्या दिसणाऱ्या त्या शेंगा..फक्त एकच फरक होता, तो म्हणजे त्याचा पृष्ठभाग खूपच गुळगुळीत होता.
‘‘अरे, फोडून दे ना!’’ मी म्हटले.
‘‘गरज नाही! बोटाने सहज तुटेल ती. भाजलेली आहे.’’ मी अधिर होत ती फोडली आणि त्यातील दाणे तोंडात टाकले. दाताखाली एक तोडला आणि खरेच सांगतो - मी पडायचाच काय तो बाकी होतो. मी गाडी बाजूला घेतली आणि बाळासाहेबाला मिठी मारली. मला काय बोलावे हे कळेना… मी बधिरच झालो होतो. माझ्या त्या अवताराकडे पहात बाळासहेब हसत होता.
‘‘अरे, माझीही अशीच अवस्था झाली होती…’’
थोड्या वेळाने सावरल्यावर मी विचारले, ‘‘मग आता आमदाराकडे काय काम काढले आहेस?’’
‘‘अरे, पुढचे प्रयोग करायला मला कमीतकमी तीन एकर जमीन पाहिजे आहे. कारण बियाणे तयार करायला एक लॅब उभारावी लागेल. आता ही जमीन ताब्यात घ्यायची म्हणजे आमदाराची मदत घ्यावी लागेल, असे आमचा भाऊ म्हणाला. म्हणून त्याला भेटायला जायचे आहे. ते काम झाल्यावर घर आणि लॅब उभी करण्यात मला तुझी मदत लागेल. नोकरी सोडलीस तरी चालेल. मी परत गेल्यावर तू हा प्लांट बघू शकतोस. त्याची कागदपत्रे कशी करायची इत्यादी… भानगडी नंतर बघू. अर्थात घाई नाही. वहिनींना विचारून निर्णय घे. पण मला वाटते यात मिळेल तेवढा पैसा तुला इतरत्र कुठेच मिळणार नाही.’’
‘‘अरे, पण तू मला सांगितलेस त्यातील एकही शब्द मला कळला नाही. माझा उपयोग तुला फक्त उभारणी करण्यातच होईल असं मला वाटतं.’’
‘‘त्याची काळजी नको. ती माणसे मी नेमेन. मला इथे एक विश्वासू माणूस पाहिजे आहे. बस्स…’’
‘‘बरं, पाहू या नंतर.’’ मी म्हणालो.
आमदाराच्या फार्महाउसमध्ये आमची गाडी शिरली. सिक्युरिटीचे सर्व सोपस्कार पार पाडून आम्ही आत पोहोचलो. आगतस्वागत झाल्यावर आमदारांनीच विषयाला हात घातला,
‘‘बाळासाहेब, तुम्हाला इथे जमीन मिळणे शक्य नाही. मान्य आहे तुमचे नाव आहे सातबाऱ्यावर. मी कुठे म्हणतोय नाही? पण परत इथे पाय टाकाल तर तोच तोडून हातात देऊ. काय समजलात? चालू लागा आता. किसन, साहेबांना सोडून ये त्यांच्या घरी. बाळासाहेब, आता घरी गेल्यावर लगेचच पुण्याला निघायचं. काय कळलं? नाहीतर इथेच मुडदा पडंल तुमचा. का, ते तुमच्या भावाला विचारा…’’
ते ऐकून आमच्या दोघांचे पाय थरथर कापू लागले. हा माणूस जे म्हणतोय ते सहज करू शकेल याची मला खातरी होती. बाळासाहेब काही बोलणार, तेवढ्यात मी त्याला थांबवले.

‘‘बाळासाहेब, उपयोग नाही. आम्हीच कपाळकरंटे… चल, जाऊ या…’’
एवढे बोलून आम्ही परत आलो तर आमदाराची माणसे अगोदरच येऊन थांबली होती. आम्हीही लगेच आवरायला घेतले व पुण्याला टाकोटाक परतलो. बाळासाहेबांनी मग एक शहाणपणाचा निर्णय घेतला, तो म्हणजे बायको-पोरांना लगेचच अमेरिकेला पाठवून दिले. नंतर काय घडले, ते मला फार उशिरा कळले. बाळासाहेबांनी मग कोकणातील खासदारास गाठले व काजूच्या उत्पादनवाढीचा प्रस्ताव ठेवला. पण त्या खासदाराने एकच प्रश्र्न विचारला, ‘‘बाळासाहेब, हे तुमचे काजू देशात कुठेही येतील ना? म्हणजे आमच्या कोकणातील काजूच्या बागा जाळून टाकल्या तरी चालतील. मला नाही वाटत हे शक्य आहे. मला वाटतं आता आम्ही तुम्हाला हा प्रयोग भारतात तरी करू देणार नाही. माझं ऐका, तुम्ही अमेरिकेला परत जा.’’ पण बाळासाहेब हटला नाही त्याने आता मंत्र्यांना गाठण्याची तयारी चालवली.

पण एक दिवस घडले ते विपरीतच. मला फोन आला एका इस्पितळातून. बाळासाहेबांवर कोणीतरी जीवघेणा हल्ला केला होता. मी घाईघाईने तेथे गेलो. माझ्याच्याने बाळासाहेबाकडे पहावेना.
आयसीयूमध्ये तो निपचित पडला होता. जगेल की नाही याचीच डॉक्टरांना शंका होती. पण काटक बाळासाहेब जगला. नुसता जगला नाही, तर हिंडू फिरू लागला. पाच -सहा वर्षे झाली, तो भारतातच राहिला. एक दिवस माझ्याकडे संध्याकाळी आला. येताना बाटली घेऊन आला होता. त्याच्या पिण्याच्या पद्धतीवरून त्याला दारूची सवय लागली असावी असे मला तरी वाटले.

‘‘मला आपल्या देशाने मातीत घातले. मीच केलेले संशोधन मी कंपनीला न सांगता येथे आणले होते. या प्रकारात पाच वर्षं मी येथे घालवली. कंपनी मला परत ये म्हणतेय पण मी हे संशोधन तेथे उघड करू शकत नाही. इतके दिवस ते उघड का केले नाही म्हणून माझी चौकशी होईल. कदाचित एफबीआयकडे प्रकरण जाऊ शकते. तसे झाले, तर मला तुरुंगात खितपत पडावे लागेल. हे संशोधन बासनात गुंडाळून ठेवलेलेच बरे.’’ मीही त्याला होकार दिला.

नंतर बरेच दिवस/महिने/वर्षं बाळासाहेबाचा पत्ता नव्हता. त्याने बायकोलाही काही पत्र लिहिले नव्हते. तिचा व मालोजीचा अनेक वेळा फोनही येऊन गेला. पोलिसात तक्रार झाली…सगळे प्रयत्न झाले. पेपरमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली, पण बाळासाहेबांचा पत्ता लागला नाही. त्याचे बरेच सामान माझ्याकडे पडले होते, ते मी एका कपाटात नीट ठेवून दिले. बाळासाहेब आत्महत्या करणार नाही याची मला शंभर टक्के खातरी आहे. तो अमेरिकेला परत गेला नाही.. हेही मला माहीत आहे..

मी शोध घेण्याचा बक्कळ प्रयत्न केला, अजूनही करतोय, पण आमचा हा शास्त्रज्ञ मित्र गायब झाला तो झालाच….

जयंत कुलकर्णी.
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

ता.क. : बाळासाहेबांचे एक चिरंजीव जेनेटिक्समध्येच काम करत आहेत आणि असे म्हणतात की त्यांनी काजू नाही, पण असलेच काहीतरी संशोधन अमेरिकेत यशस्वी केले आहे. माझ्याकडे एक ट्रंक भरून बाळासाहेबाचे जे बाड पडले आहे, (त्यात त्याचा अमेरिकन पासपोर्टही आहे) ते त्याला द्यावे की नाही, यावर मी अजून विचार करतोय.... कारण त्यावर कोकणातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे…

मला वाटते ते जाळूनच टाकावे. मलाच मोह पडला, तर?

व्यक्तिचित्र व कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

Footer

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

18 Oct 2017 - 12:25 am | राघवेंद्र

काका, भारीच जमलीय कथा !!!
जबरदस्त !!!

पिवळा डांबिस's picture

18 Oct 2017 - 1:17 am | पिवळा डांबिस

जयंतराव, व्यक्तिचित्र सुरेख उतरले आहे.
लांबलचक कालखंड व्यक्तिचित्रात बद्ध (कॅप्चर) करणं अतिशय कठीण. कथा त्यामाने सोपी यासाठी. पण तुम्ही इथे ते कौशल्याने केलं आहे.
हार्दिक अभिनंदन!!

रुपी's picture

18 Oct 2017 - 4:16 am | रुपी

मस्त! छान रंगवलंय व्यक्तिचित्र.

लाल टोपी's picture

18 Oct 2017 - 6:05 am | लाल टोपी

खूप दिवसांनी खास तुमचा टच असलेलं लिखाण आवडले..

सुखीमाणूस's picture

18 Oct 2017 - 6:21 am | सुखीमाणूस

दिवाळी पहाट तुमच्या लेखनाने मस्त साजरी झाली

गुल्लू दादा's picture

18 Oct 2017 - 9:15 am | गुल्लू दादा

खूप सुंदर लिहिलं आहे... काल्पनिक असूनही कुठेही आभासी वाटत नाही.

मोदक's picture

18 Oct 2017 - 10:21 am | मोदक

+१११

महेश हतोळकर's picture

18 Oct 2017 - 10:38 am | महेश हतोळकर

टिपीकल जयंतरावांची कथा. वाटतच नाही काल्पनीक आहे म्हणून._/\_

नाखु's picture

18 Oct 2017 - 10:38 am | नाखु

ओघवती शैली

खमंग दिवाळी

वाचकायनी नाखु

एकनाथ जाधव's picture

18 Oct 2017 - 11:40 am | एकनाथ जाधव

खमन्ग!!!

प्रभाकर पेठकर's picture

18 Oct 2017 - 11:57 am | प्रभाकर पेठकर

अगदी अस्सीम व्यक्तिमत्व. शब्दचित्र अतिशय प्रभावी आहे. फार आवडली कथा.

अत्रन्गि पाउस's picture

18 Oct 2017 - 11:58 am | अत्रन्गि पाउस

कथा
कि

व्यक्तिचित्र व कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

ही तळटीप

उपेक्षित's picture

18 Oct 2017 - 12:01 pm | उपेक्षित

जबर्दस्त

तिमा's picture

18 Oct 2017 - 12:13 pm | तिमा

कथा वाचताना अगदी, खमंग भाजलेले काजु खाल्यासारखा आनंद मिळाला. वा जयंतराव, मानलं तुम्हाला.

टवाळ कार्टा's picture

18 Oct 2017 - 12:46 pm | टवाळ कार्टा

जब्राट

अमरेंद्र बाहुबली's picture

18 Oct 2017 - 1:16 pm | अमरेंद्र बाहुबली

सर, कथा नंतर वाचतो. आधी "त्या" कुत्र्याचं काय झालं ते सांगा.

नँक्स's picture

18 Oct 2017 - 1:45 pm | नँक्स

खूप सुंदर लिहिलं आहे... काल्पनिक असूनही कुठेही आभासी वाटत नाही.

वकील साहेब's picture

18 Oct 2017 - 2:17 pm | वकील साहेब

ओघवत्या शैलीतील सहज भाषा असल्याने कथा जाम आवडली

दाह's picture

18 Oct 2017 - 5:52 pm | दाह

आवडली कथा!! मस्तच

सविता००१'s picture

19 Oct 2017 - 1:35 pm | सविता००१

मस्त आहे कथा. आवडली.

अभ्या..'s picture

19 Oct 2017 - 1:37 pm | अभ्या..

मस्त

मुक्त विहारि's picture

19 Oct 2017 - 4:36 pm | मुक्त विहारि

"तोडीचा दुष्टपणा करण्यास माणूस पुरेसा आहे.... "

हे वाक्य तर १ नंबर...

ह्या एका वाक्याच्या आधारे, रामायण पण घडले आणि महाभारत पण....

असो,

जुइ's picture

20 Oct 2017 - 12:17 am | जुइ

व्यक्तिचित्रण अगदी झक्कास रंगवले आहे काका!

चौकटराजा's picture

20 Oct 2017 - 8:51 am | चौकटराजा

काय सांगता लेख महाशय.... ? मुख्यतः हा माणूस अगदी आजुबाजूच्या दुनियेतला तरीही वेगळा ! फार सुरेख !

पैसा's picture

22 Oct 2017 - 8:45 pm | पैसा

_/\_ तुमचं लिखाण नेहमीच आपला वेगळा दर्जा राखून असतं.

स्वाती दिनेश's picture

22 Oct 2017 - 8:57 pm | स्वाती दिनेश

व्यक्तीचित्रण आवडले.
स्वाती

किसन शिंदे's picture

23 Oct 2017 - 2:14 pm | किसन शिंदे

जबरदस्त आहे ही कथा !!

पाटीलभाऊ's picture

23 Oct 2017 - 2:34 pm | पाटीलभाऊ

जयंतराव...मस्त कथा.

वाईट वाटले बाळासाहेबांबद्द्ल !!

पिशी अबोली's picture

18 Nov 2017 - 6:40 pm | पिशी अबोली

जबरदस्त!