"मधल्यांचं काय?"

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
5 Oct 2017 - 11:05 am
गाभा: 

बर्‍याचदा आपण पाहतो की एखादा माणूस खुप हुशार असतो,एखादा अगदीच ढ असतो.
हुशार,दुर्मिळ प्रतिभा असणार्‍या माणसाला प्रगतीची दारं लगेच खुली होतात.त्यांची कुशाग्र बुध्दी हीच त्यांच्याकडची सर्वात मोठी जमेची बाजू असते.या बौध्दिक हुशारीवर बर्‍याचशा क्षेत्रांत हे लोक सहज यशस्वी होतात.शारिरीक कष्टापेक्षा बौध्दिक कष्टावर यांचा भर असतो.
दुसरा गट हा तथाकथित अभ्यासात बर्‍यापैकी मागे असणार्‍या ढ लोकांचा.जिथे अभ्यासातली हुशारी लागते त्या क्षेत्रांशी यांचं वाकडं असतं.मग पोट भरण्यासाठी हे लोक पडेल काम करतात.चहाची टपरी चालवणे,हॉटेलात फडका मारणे,कारखान्यात हेल्पर म्हणून काम करणे,हमाल,अॉफिसबॉय ते रस्त्यावरचा फिरता विक्रेता कोणत्याही कामाची लाज न बाळगता हे पटकन काम स्विकारतात.पडतील तेवढे कष्ट सोसतात,त्यातूनच आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात.
पण या दोन्हींव्यतिरिक्त एक तिसरा गट असतो.हे लोक मात्र ना खुप हुशार ना अगदी ढ अशा गटात मोडतात.Jack of all trades and master of none असे असतात.
शिक्षणात अगदी ढ नसल्याने पडेल ती खुप शारिरीक कष्टाची किंवा तथाकथित हलकी कामे यांना नको असतात.ती करणे यांना रुचत नाही.पण खुप बुध्दीमत्ता गरजेची आहे,खुप डोकं चालवावं लागतं अशी बौध्दिक किचकट कामेही यांना जमत नाहीत.
मार्कांच्याच भाषेत सांगायचं तर नापासापासून ते ६०% आणि ७५% ते १००% असे मार्कस मिळवणार्‍यांना कामं सहज मिळतात किंवा हे लोक मिळवतात,स्विकारतात.
पण हे मधले ६०% ते ७५% या गटातले लोक मात्र अडखळत राहतात.
मग या मधल्या फळीतल्या लोकांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करावं तरी काय?

प्रतिक्रिया

मग या मधल्या फळीतल्या लोकांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी करावं तरी काय?

"यशस्वी होणे" ह्याची तुमची व्याख्या काय? त्यावर अवलंबुन आहे.

उपयोजक's picture

5 Oct 2017 - 11:59 am | उपयोजक

ते धाग्यात दिलं आहेच तरीही पुन्हा देतो.या धाग्यात दिलेल्या परिस्थितीचा विचार करता बर्‍यापैकी पैसे कमवण्यात यशस्वी होण्यासाठी या मधल्या फळीतल्यांनी काय करावं?

कपिलमुनी's picture

5 Oct 2017 - 12:30 pm | कपिलमुनी

अशा लोकांनी हुशार मुलीशी लग्न करावे, स्वतः घरकाम करून तिच्या नोकरी करण्याला मदत करावी

उपयोजक's picture

5 Oct 2017 - 4:10 pm | उपयोजक

सध्याच्या काळात हुशार मुलगी अशा ठोंब्याला करुन घेईल?

मास्टरमाईन्ड's picture

5 Oct 2017 - 7:20 pm | मास्टरमाईन्ड

सध्याच्या काळात हुशार मुलगी अशा ठोंब्याला करुन घेईल?

पटलं आपल्याला

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Oct 2017 - 7:37 pm | अमरेंद्र बाहुबली

त्या साठी प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या. मी तुला कध्धी कध्धीच सोडून जाणार नाही. असं तीला सांगायचं. हुशार मुली देखील फसतात.

मराठी कथालेखक's picture

5 Oct 2017 - 1:23 pm | मराठी कथालेखक

७५% ते १००% असे मार्कस मिळवणार्‍यांकडे दुर्मिळ प्रतिभा वगैरे असतेच असे काही नाही (या गटातील अगदी थोड्याच लोकांकडे ही दुर्मिळ प्रतिभा असते)
झालंच तर करिअरमध्ये यशस्वी (म्हणजे बर्‍यापैकी पैसे मिळवणे) याकरिता दुर्मिळ प्रतिभा , उच्च बुद्धिमत्ता लागत नाही. अगदी वेगळ्या वाटेवरुन चालयचे असेल , अभिनव असा व्यवसाय करायचा असेल तर कदाचित लागत असेल अशी प्रतिभा एरव्ही नाही.
एकाग्र होवून काम करणे, मेहनत घेणे, माणसं नीट जोडणे, समोरच्याला योग्य तो आदर देणे, संवाद साधणे, गरजेप्रमाणे थोडेफार धाडस दाखवणे , शिकत राहण्याचा प्रयत्न करणे ई गुण असल्यास अगदी सामान्य वकूब असणारेसुद्धा बर्‍यापैकी यशस्वी होतात. अशी अनेक उदाहरणे आहेत माझ्या पाहण्यात, तुमच्याही पाहण्यात असतीलच म्हणून माझी उदाहरणे सांगत बसत नाही (थोडं आठवून बघा शाळेत ६०-७० टक्के तर कॉलेजात सेकंड क्लास वगैरे मिळवणारे , बाकी कुठलीही असामान्य प्रतिभा नसणारे अनेक जण असे सापडतील की जे पुढे नोकरीत यशस्वी झाले आहेत)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2017 - 1:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

मार्कांच्याच भाषेत सांगायचं तर नापासापासून ते ६०% आणि ७५% ते १००% असे मार्कस मिळवणार्‍यांना कामं सहज मिळतात किंवा हे लोक मिळवतात,स्विकारतात.
पण हे मधले ६०% ते ७५% या गटातले लोक मात्र अडखळत राहतात.

याला काही पुरावा ? मुख्य म्हणजे, सद्याच्या व्यवस्थेत, मागिल शिक्षणांच्या परिक्षेतील टक्क्यांचा पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवायला उपयोग होतो... इतपत ठीक आहे. पण, जीवनात यशस्वी होण्याचा आणि शैक्षणिक परिक्षेतील मार्कांचा तडक (डायरेक्टली प्रपोर्शनल) संबंध नाही.

व्यावहारीक यश = {आवश्यक औपचारिक (शिक्षणसंस्थांमधून घेतलेले) किंवा अनौपचारिक शिक्षण}
X {करत असलेल्या कामाचा अनुभव}
X {करत असलेल्या कामाची आवड}
X {आजूबाजूची सद्य परिस्थिती}
X {शिक्षण आणि अनुभव व्यवहारात वापरून अपेक्षित परिणाम साधण्याची पात्रता व धडाडी}

यामुळेच, औपचारिक शिक्षण असलेले/नसलेले उद्योगपती/राजकारणी अनेक उच्चविद्याविभूषित (आयआयटी/आयआयएम व इतर मान्यवर शिक्षणसंस्थांतून बीई/बीटेक/एमबीए/पीएचडी/इत्यादी केलेल्या डझनवार लोकांचे बॉस असू शकतात / असलेले दिसतात !

उपयोजक's picture

5 Oct 2017 - 4:12 pm | उपयोजक

खुप छान मांडलंत!

उपयोजक's picture

5 Oct 2017 - 4:19 pm | उपयोजक

मुळातच प्रश्न या मधल्यांच्या मनोवृत्तीचा आहे.ठिक अाहे अापण असं समजू की शिक्षणामुळे थोडीफार वैचारिक दर्जात वाढ झाली त्यामुळे हे लोक नाही करणार हलकी,अगदी ठोकळेबाज कामे!
पण समजा यांना वरच्या गटात जायचं असेल तर किंवा सोप्या भाषेत जॅक न राहता "मास्टर" व्हायचं असेल तर कोणत्या दिशेने प्रयत्न करावेत? काय बदल करावेत? कारण तशी कुशाग्र बुध्दी यांच्याकडे नाही हे विसरुन चालणार नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2017 - 11:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुळातच प्रश्न या मधल्यांच्या मनोवृत्तीचा आहे. तुम्हीच तुमच्या प्रश्नाचे हे उत्तर दिले आहे ! :)

कोणत्याही प्रगल्भ वित्तव्यवस्थेच्या (इकॉनॉमी) जीडिपीमध्ये पगारी नोकरांपेक्षा (ज्यात अकुशल कामगारांपासून ते कंपनी सिईओ पर्यंत सगळे येतात) छोट्यामोठ्या स्वतंत्र व्यावसायिकांचा (एसएमई, म्हणजेच ढकलगाडीवर भाजी विकणार्‍या किंवा कोपर्‍यावरच्या टपरी/दुकान टाकून बसलेल्या व्यावसायिकापासून स्वतःची छोटी/मध्यम आकाराची वस्तू/सेवा विकणारी कंपनी असलेल्यापर्यंतचे सर्व स्वतंत्र व्यावसायिक यांचा) वाटा अनेक पटींनी मोठा असतो.

अर्थातच, व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या समकक्ष नोकरदारांपेक्षा (उदा : लोअर क्लर्क आणि टपरीवाला ते सिईओ आणि मध्य आकाराच्या उद्योगाचा मालक) निश्चितच अधिक चांगली असते... हे भारतातही खरे आहे.

भारतातील लोकांची मनोवृत्ती अशी आहे : दिवाणखान्यात आणि भाषणांत तोंड फाटेपर्यंत श्रमाच्या महत्वाची तारीफ करणार्‍याच्या मनात व्यावहारीक जीवनात श्रमाला मान देण्याची वृत्ती/दानत नसते... कमी उत्पन्नाची क्लर्कची नोकरीसुद्धा कांकणभर जास्त उत्पन्नाच्या समकक्ष व्यवसायापेक्षा जास्त मानाची समजली जाते ! म्हणजे, मुळातच प्रश्न या मधल्यांच्या वैचारीक आणि मनोवृत्तीच्या दारिद्र्याचा आहे, नाही का ? :)

=====================

हे विशेषतः मराठी मनात रुजलेले वैचारिक दारिद्र्य इथेच थांबत नाही, ते त्यापेक्षा खोलवर रुजलेले आहे. हा मुद्दा लेखाच्या शीर्षकापेक्षा जरासा पुढे नेण्यासाठी अजून थोडेसे.

हे करण्यासाठी काही उदाहरणे :

१. हे उदाहरण जुने आहे पण मराठी मनःस्थिती प्रकर्षाने अधोरेखित करते यामुळे देत आहे. टेल्कोच्या (आताची टाटा मोटर्स) सुरुवातीच्या काळात (१९६०च्या दशकात) त्या कंपनीचे सर्वेसर्वा (Architect of Tata Motors) सुमंत मुळगावकर कंपनीला हजारोंनी लागणार्‍या कामगारांची भरती पुणे आणि सलग जिल्ह्यांमध्ये गावोगाव जाऊन करत असत. (परराज्यातून येणार्‍या लोकांच्या ऐवजी) मराठी तरुणांना नोकर्‍या मिळाल्या तर जास्त चांगले असा (म्हटले तर) मराठीचा अभिमानी विचारही त्यामागे होता. त्यावेळेस, नवीन भरती कामगारांना कोणतेही कौशल्य आवश्यक नव्हते. निवड झाल्यावर, "टेल्कोच्या स्वत:च्या ट्रेनिंग डिव्हिजनमध्ये फुकट राहण्याजेवणाची व्यवस्था + पहिले काही आठवडे सर्व ट्रेड्समध्ये रोटेशन आणि त्या अनुभवावरून कोणते काम करायला आवडेल त्याचा भरती कामगाराचा निर्णय + त्या ट्रेडचे सरकारमान्य डिप्लोमा मिळेल असे शिक्षण + हे सर्व करताना स्टायपेंड" असा साधारण कार्यक्रम होता. आता विश्वास बसणार नाही, पण त्याकाळी, मराठी तरूण आणि त्यांचे कुटुंब यांनी हा पर्याय स्विकारावा अशी समजूत घालणे फार कठीण होते. का ? तर "असे कामगार (मराठीतला एक शेरा : टरकचा किलिंडर उर्फ ट्रकचा क्लिनर) बनण्यापेक्षा कमी पगार असलेला का होईना पण सरकारी कार्यालयातला छोट्यामोठा कारकून बनणे जास्त मानाचे असते." ही झाली सर्वसाधारण मराठी मानसिकता.

२. माझ्याबरोबर वैद्यकिय शिक्षण घेणारा सिंधी मित्र, जसजसे आमचे शिक्षण शेवटाला पोहोचू लागले तसे जरासा नाराज दिसू लागला. कारण विचारल्यावर म्हणाला, "आजकाल जेव्हा कुठल्या लग्नाला जातो तेव्हा लोक काय करतोस असे विचारतात. "लवकरच डॉक्टर होईन" असे अभिमानाने सांगितल्यावर एकच म्हणणे सतत ऐकू येते... "इतके का शिकलास ? काय काही कामधंदा जमला नाही की काय ?!" ही झाली सर्वसाधारण सिंधी मानसिकता.

३. सन १९८२ मध्ये मी प्रथम खाडी देशात नोकरी मिळवली तेव्हा, एक चांगली कायम सरकारी नोकरी (तेव्हा मी क्लास २ गॅझेटेड ऑफिसर स्तरावर होतो व क्लास १ गॅझेटेड ऑफिसर स्तरासाठी आवश्यक एमपीएससी परिक्षा पास केली होती व त्या पदनियुक्तीची वाट पहात होतो) सोडतोय म्हणून, सहाध्यायांनी प्रेमाने पण मनापासून दिलेल्या शिव्या आणि इतरांची कुचेष्टा सहन करावी लागली होती. सन १९८२ मध्ये मी तेथे पोचलो तेव्हा माझ्या संस्थेत (ओमानच्या संरक्षण खात्यात) केरळ-तमिळनाडू-आंध्रप्रदेशातील १०-१२ आणि गोव्यातला १ डॉक्टर, ५-१० वर्षांपूर्वीपासून कार्यरत होते. वैद्यकिय विभागात मी पहिला मराठी माणूस... दुसरा तेथे यायला अजून एक वर्ष जावे लागले... तोही मी दिलेल्या प्रोत्साहनाने आणि माहितीमुळे आला ! तोपर्यंत, केरळ-तमिळनाडू-आंध्रप्रदेशातील डॉक्टर्सची संख्या दुप्पट झाली होती.

मुख्य म्हणजे हे सर्व झाले त्या काळी, सर्व खाडी देशांतील सर्व प्रकारातली जवळ जवळ ८०-९०% नोकर्‍यांची भरती मुंबईहून होत होती आणि तेथे भारतभरचे लोक निवडी/मुलाखतीसाठी येत होते. मात्र, पेपरमधल्या जाहिराती डोळ्यासमोर असल्या तरी चालत किंवा फारतर बस-लोकलने जाऊन आपला अर्ज द्यावा असे (उर्वरित महाराष्ट्रातल्या सोडाच पण) मुंबईतल्या मराठी माणसांना वाटत नव्हते !

परराज्यांतील लोकांनी अश्या बहुतेक संधी पटकावल्यानंतरच (यात केवळ खाडी देश नव्हे तर अमेरिकेचाही समावेश आहे*) अश्या गोष्टींची अक्कल मराठी मनात जन्म घेते, हे, दुर्दैवाने, सतत दिसते !

आमच्या पूर्वजांनी मराठी झेंडा अटकेपार लावला असे सांगताना छाती फुलवणारा "सर्वसाधारण मराठी माणूस" आजही (देश, राज्य सोडा पण) शहर सोडून जायला तितकासा उत्सुक नसतो. या मानसिकतेमध्ये आयटी क्रांतीमुळे बराच फरक पडला आहे, पण, आजही परदेशात नोकरीसाठी जाणार्‍यांचा कुचेष्टेने (उ प्रदेश व बिहारमधून महाराष्ट्रात आलेल्या लोकांवरून) "भय्या" असा उल्लेख केला जाताना आपण पाहत आहोतच ! यावेळेस आपण सोईस्करपणे हे विसरतो की अनेक भय्यांनी महाराष्ट्रात येऊन आपल्या छाताडावर टिच्चून केवळ खाजगी व्यवसायात प्रगती केली असेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये महत्वाची मंत्रीपदे पटकावली आहेत आणि राष्ट्रिय पक्षसंघटनांत मानाची पदे भूषविली/भूषवित आहेत... एक मराठी म्हणून मला हे काहीसे कसेसे वाटले तरी एक व्यवस्थापन व्यावसायिक म्हणून मला त्यांचे कौतूकच आहे यात वाद नाही. तेच कौतूक, किंवा अधिक जास्त कौतूक, मला परदेशात झेंडा फडकावणार्‍या भारतिय/भारतिय वंशाच्या (उदा : पोर्तुगाल आणि आयर्लंडचे पंतप्रधान) व्यक्तींच्या धडाडीबद्दल वाटते. त्या व्यक्तींना भारताबद्दल ममत्व वाटते किंवा नाही हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे, पण, त्याने त्यांचे कर्तृत्व कमी होत नाही. कारण, विषय त्यांच्या "कर्तृत्वाचा" आहे, "माझ्या देश/राज्य/व्यक्तीबद्दलच्या आवडींशी त्यांच्या आवडी जुळतात की नाही" याबद्दल नाही... हा फरक ओळखण्याची मानसिकता जेव्हा आपल्यात येईल आणि त्या माहितीचा उपयोग आपण आपल्यातील कमतरता कमी करण्यास करू शकू, तेव्हा इतरांना मागे टाकण्यासाठी आपण पहिले पाऊल टाकलेले असेल.

व्यवस्थापनशास्त्र असे म्हणते की, जोपर्यंत तुम्ही तुमची सुरक्षिततेची मानसिकता (कंफर्ट झोन)** (याला शुद्ध मराठीत कुपमंडूक मानसिकता म्हणतात) सोडून तिच्या पलिकडे जायची तयारी ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या सद्याच्या परिस्थिती फारसा बदल करू शकत नाही. पूर्ण विराम. शिक्षणाने तुमचा माहितीसंग्रह (नॉलेजबेस) वाढतो, पण त्याचा आणि मानसिकता बदलाचा अर्थाअर्थी संबंध असेलच असे नाही. पहिली गोष्ट बाहेरून येते, दुसरी आंतरिक आहे.

असो. एक मराठी म्हणून मला मनापासून वैषम्य वाटणारा विषय असल्याने प्रतिसाद जरा मोठा झाला.

==============================

* : (अ) १९८२ मध्ये ओमानमध्ये नोकरीला गेलो तेव्हा सलालाह या लोकसंख्येने दुसर्‍या क्रमांकाच्या शहरामध्ये बाजारपेठेतिल व्यवहारांत मल्याळी प्रथम क्रमांकाची भाषा होती. झाडूवाल्यापासून मोठ्या कंपनीच्या सिईओपर्यंत मल्याळी मंडळींचा लक्षणिय शिरकाव झालेला होता. गमतीने नव्हे तर खरोखरच... मल्याळी येत असल्यास दुकानांत सर्वात जास्त डिस्काऊंट, हिंदीत बोलल्यास त्याखालोखाल डिसकाऊंट आणि अरबी बोलल्यास नो डिस्काऊंट, अशी वस्तूस्थिती होती ! :)
(आ) दुबई दुसर्‍या देशात (युएई) असली तरी तेथेही १९८२ ते १९९६ मध्ये बर्‍याच फेर्‍या झाल्या. तेथे बाजारात हिंदी सर्वसामान्य भाषा होती, परदेशी ८५% आणि दुबई-अरब १५% असे लोकसंख्याप्रमाण होते. रस्त्यावर चालणारा अरबी माणूस विरळा होता ! एकदा एक अरब भेटला. त्याच्याशी हलो हलो बोलणे झाले. त्याला म्हणालो "ही माझी तिसरी फेरी. पण दुबईतल्या अरबी माणसाशी प्रथच बोलतो आहे." तर तो म्हणाला, "मी कुवेती आहे. इथे बिझनेस मिटिंगला आलो आहे !" तेथिल (युएई) चलन 'दिरहाम'. त्याकाळात त्याला सर्वसामान्य लोक रुपया असेच संबोधायचे. आपण "कितना रुपया दाम ?" असे विचारले तर "इथलाच माणूस दिसतोय" असे समजून दुकानात योग्य किंमत सांगितली जायची. "कितना दिरहाम दाम ?" असे विचारले तर, "नया पंछी / प्रवासी दिसतोय" असे समजून वाढीव किंमत सांगितली जायची !
(ई) १९८९ ला अमेरिकेला भेट दिली तेव्हा दिसून आले की, अमेरिकन पूर्व किनार्‍यावरचा मोटेल व्यवसाय पटेल मंडळींनी काबीज केला होता आणि पश्चिम किनार्‍यांवरच्या हॉटेल व रेस्तराँ बिझनेसमध्ये दक्षिण भारतिय (प्रामुख्याने तेलगु) लोकांचा लक्षणिय भरणा झालेला होता.

** : ही मानसिकता केवळ भौगोलिक (देश/राज्य/शहर/गाव) नसून कामाच्या स्वरूपाबद्दल (नोकरी/स्वतंत्र व्यवसाय/व्यवसायाचे स्वरूप/इ) अथवा इतर अनेक प्रकारची असू शकते... असे करण्यालाच बर्‍याचदा "मळलेली वाट सोडून चालणे", "आऊट ऑफ बॉक्स विचार करणे", इत्यादी म्हटले जाते आणि ते यश मिळवण्याचे महत्वाचे कारण असते.

अभिजीत अवलिया's picture

6 Oct 2017 - 6:06 am | अभिजीत अवलिया

उत्तम प्रतिसाद.

पिलीयन रायडर's picture

6 Oct 2017 - 7:06 am | पिलीयन रायडर

उत्तम प्रतिसाद!!

व्यवस्थापनशास्त्र असे म्हणते की, जोपर्यंत तुम्ही तुमचा सुरक्षिततेची मानसिकता (कंफर्ट झोन)** सोडून (याला शुद्ध मराठीत कुपमंडूक मानसिकता म्हणतात) सोडून तिच्या पलिकडे जायची तयारी ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या सद्याच्या परिस्थिती फारसा बदल करू शकत नाही. पूर्ण विराम. शिक्षणाने तुमचा माहितीसंग्रह (नॉलेजबेस) वाढतो, पण त्याचा आणि मानसिकता बदलाचा अर्थाअर्थी संबंध असेलच असे नाही. पहिली गोष्ट बाहेरून येते, दुसरी आंतरिक आहे.

खास करून हे.

ह्या खेरीज मला तरी मराठी लोकांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याचीही मानसिकता पुष्कळ दिसते. दुसर्‍याचं भलं झालं तर आपल्या खिशाला चाट बसल्यासारखे लोक नाराज असतात. माझी बहीण उच्च शिक्षणासाठी एकटीच परदेशी गेली तर "भारतात मिळत नव्हते का हे शिक्षण?" असा कुत्सित प्रश्न एका नातेवाईकांनी विचारला होता. आता तिथे जायला तिने काय कष्ट घेतले आहेत त्याची १% कल्पनाही ह्यांना नसते. पण तिचं काही हुकलं किंवा तिने भारतातच परतण्याचा निर्णय घेतला तर अतिशय आनंद होतील असेही लोक माहिती आहेत! मिपावरही कुणी तरी ट्र्म्प अमेरिकेतल्या लोकांना हकलून देणारे, मग बघू.. अशा अर्थाचा प्रतिसाद दिल्याचे आठवते. अशा लोकांच्या अज्ञानाची कीव येते... =))

पण हेच तेलगु तमिळ लोक आपल्या लोकांना इथे परदेशात बोलवून घेतात. प्रचंड मदत करतात. मराठी लोक बोलत सुद्धा नाहीत. मी पहिल्यांसा अमेरिकेत आले होते तर अर्धे पार्क भरून मराठी बायका होत्या. (जिथे आपला कट्टा झाला होता.) अबीर एका खेळण्यावर जाऊन घाबरून रडायला लागला, मलाही कळेना आपण वर जाऊ शकतो की त्यालाच खाली यायला सांगावं.. बायका आम्च्या दोघांचे बोलणे ऐकून "मराठी आहे वाटतं.. नवीन आहे का?" अशा चर्चा करत राहिल्या, पण माझ्याशी येऊन कुणीही बोलले नाही!

उपयोजक's picture

6 Oct 2017 - 10:04 am | उपयोजक

उत्तम आणि विस्तृत प्रतिसाद डॉ.साहेब!

पगला गजोधर's picture

5 Oct 2017 - 1:45 pm | पगला गजोधर

अलीबाबाचा संस्थापक जॅक मा काय म्हणतो

"'For what Alibaba has today, I must first thank the internet industry. Without this industry, we would not have been thinking about disruption, and the fast development speed of the industry has made us successful, Additionally, I want to thank China’s economy for its fast growth. I especially thank my team that worked for five years, continually trusting me and following me. It’s not that I’m very smart or capable; other people say I’m capable but actually I think it’s my team that’s capable.

I told my son: you don’t need to be in the top three in your class, being in the middle is fine, so long as your grades aren’t too bad. Only this kind of person [a middle-of-the-road student] has enough free time to learn other skills. I think, if China’s economy wants to develop, it needs a lot of SMEs and individually-run companies, and that requires a lot of entrepreneurs with values and drive."

आंतरजालावरून साभार

उपयोजक's picture

5 Oct 2017 - 4:08 pm | उपयोजक

मस्त!

उपयोजक's picture

5 Oct 2017 - 4:25 pm | उपयोजक

प.ग.
जॅक मा म्हणतो की हे सगळं इंटरनेटमुळे आणि माझ्या चांगक्या टीममुळे शक्य झालं
पण असलेल्या सुविधांचा खुबीने वापर करणं आणि योग्य असेच उमेदवार कर्मचारी म्हणून निवडणं यातच जॅक मा ची बुध्दिमत्ता दिसत नाही का? अगदी तो स्वत:ला सामान्य समजत असला तरीही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Oct 2017 - 11:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमचे अनुमान बरोबर आहे पण कार्यकारण भाव नाही.

शिक्षण = बुद्धिमत्ता किंवा विचारक्षमता; हे समिकरण तडक संबधाचे (डायरेक्टली प्रपोर्शनल) नसते.

धिरुभाई अंबानी यांचे उदाहरण फार जुने नाही.

फारसे शिक्षित नसलेल्या वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रासारख्या राज्याचा भार समर्थपणे सांभाळला. त्यांनी भल्या भल्या आयएएस अधिकार्‍यांची भंबेरी उडविल्याच्या गोष्टी आहेत.

पुंबा's picture

6 Oct 2017 - 11:43 am | पुंबा

टीम सांभाळणं, व्यवसायात येणार्‍या विविध संकटांना, आव्हानांना सामोरं जाणं, आणी मुख्यत्वे पब्लिक रिलेशन्स सांभाळणं यासाठी बुद्ध्यांकापेक्षा भावनांकाची गरज असते. उत्तम ईक्यु असणारी माणसं या सार्‍यात उत्तम आय्क्यु असणार्‍यांना पछाडतात. जॅकचा भावनांक अविश्वसनियरित्या जास्त असावा असे म्हणावे लागेल.

इरसाल's picture

5 Oct 2017 - 4:49 pm | इरसाल

मधल्यांनी खालच्यांच्यावर सुपरव्हिजन आणी वरच्यांच्या खाली सबऑर्डिनेट्ची कामं करावीत.

पुंबा's picture

5 Oct 2017 - 5:26 pm | पुंबा

व्यावहारिक यशात बुद्ध्यांकापेक्षा जास्त वाटा भावनांकाचा असतो हे सिद्ध झाले आहे. उत्तम भावनांकाच्या आधारे यशस्वी होणारे पण शैक्षणीक वर्तुळात म्हणावे असे यश न मिळवू शकलेले लोक पाहण्यात येतात.

सिरुसेरि's picture

5 Oct 2017 - 5:55 pm | सिरुसेरि

स्मार्ट अ‍ॅप डेव्हलप करावे .

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Oct 2017 - 7:41 pm | अमरेंद्र बाहुबली

वरच्यांना इंजीनियरिंग करू द्यावे. मधल्यांनी स्पर्धा परीक्षा द्याव्या.

पगला गजोधर's picture

5 Oct 2017 - 8:02 pm | पगला गजोधर

आणि खालच्यांनी राजकारणात करिअर करावे... निदान गेलाबाजार एखादा बाबा/बुआ तरी होऊन आश्रम स्थापावा..

जेम्स वांड's picture

6 Oct 2017 - 7:47 am | जेम्स वांड

अबक शहाणे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, अमूकवाडी, तमुक फाट्याजवळ, नेमका जिल्हा असल्या तत्सम कॉलेज मधून , स्थानिक आमदारांच्या कॉलेज मधून इंजिनीरिंग (ते ही लायकी नसताना कॅपिटेशन भरून, किंवा इंजिनीरिंगच करायचं ह्या अट्टाहासातुन ) करणाऱ्या लोकांना मधले समजावे का वरचे का खालचे का उरफाटे का सुरफाटे?

उपयोजक's picture

6 Oct 2017 - 10:05 am | उपयोजक

या गोष्टीमुळेच धागा काढला.आमच्याच कंपनीत ही अशी 'ट' दर्जाच्या कॉलेजातून 'ढ' दर्जाची इंजिनिअरींगची डिग्री मिळवलेले बरेचजण आहेत.
डिग्री आहे म्हणून हे लोक शॉप फ्लोअरला काम करायला तयार होत नाहीत.पगार जेमतेम द्या पण काम हात काळे करणारं नको.मग यांना काम काय मिळतं तर डॉक्युमेंटस भरण्याचं,किंवा रॉ मटेरिअलचं व्हिज्युअल इन्स्पेक्शन करण्याचं(फक्त एक प्रोसिजर म्हणून.बाकी यांच्यावर भरवसा न ठेवता परत शॉपफ्लोअरला मटेरियल व्यवस्थित चेकवलं जातं ही गोष्ट वेगळी!)
मग ही जी कामं असतात त्यात ना शारिरीक श्रम फार असतात ना फार डोकं चालवावं अशीही नसतात.पगार नावापुरता मिळाला तरी चालतो.
मग कधी डिझाइन विभागात जावं लागलं तर पडक्या चेहर्‍याने तिथे काम आटपून येतात.कारण यांच्याएवढंच(काही वेळा तर त्याहून कमी.डिप्लोमासुध्दा घेतात डिझाइनसाठी) शिक्षण असूनही तो बाबा 'डोक्याचं काम करत असतो.'
गंमत अशी की काही वेळा एच आर हेड यांना सावध करतात, की फार काळ इथे राहू नका.दुसरीकडे शोधत रहा.तुमच्या शिक्षणाच्या मानानं ही कामं फारचं सोपी आहेत.तेवढ्यापुरतं "हो सर" म्हणून तिथून कटण्यात यशस्वी होतात.मग हायर अॉथॉरिटीकडून आदेश आला की या मुलांना 'उडवावं लागतं.'
यातून काहीजण सावरतात.कुठे चुकतंय हे शोधण्याचा प्रयत्न करतात.एक्स्ट्रा कोर्सेस करतात.बाजारातल्या मागणीलायक होतात.पण त्यांची संख्या कमी.उरलेले बरेचजण मग हेच 'सोप्पं काम' दुसर्‍या कंपनीत करत बसतात.वर्षानुवर्षे एकाच आसाभोवती फिरत राहतात.मग काही वर्षांनी यांना जाणीव होते की 'नाही यार त्यावेळी जरा धडपडायला पाहिजे होतं' पण तोपर्यंत बर्‍यापैकी वेळ निघून गेलेला असतो.
दुसर्‍या राज्यात जायलाही यांचा नकार 'झारखंड? एवढ्या लांब कोण जाणार? इथेच नाही का मिळणार?महाराष्ट्रात कुठेही चालेल' हे एका जॉब एजन्सीमधे ऐकलेलं वाक्य! उमेदवार २५ वर्षांचा!
मधल्या फळीतल्या मुलींचीही फार वेगळी कथा नाही.शिफ्टमधल्या कामाला यांचा तितकासा उपयोग होत नाही.मग 'जाऊ दे सरळ लग्नच करुन टाकते.आईबाबांच्या डोक्यावरचा भार तरी कमी होईल' म्हणून 'सोडवणूक करुन टाकतात'.(एखादीचं तिथल्याच एखाद्या मुलाशी सुध्दा सूत जुळतं!)

हे इंजिनिअरींग मधलं.बाकी ठिकाणीही असंच काहीसं.दहावीनंतर 'सायन्स झेपणारं नाही आणि आर्टसला 'फालतु'समजून कॉमर्स घेणारेही नवीन नाहीत आपल्याला.
मग यांना साधा पानपट्टीचा हिशोब जरी ठेवताना धांदल उडाली किंवा टॅलीवर काम करताना ढीगभर चुका झाल्या तरीही यांना चालणारं असतं.

या मनोवृत्तीत फरक केव्हा पडणार किंवा त्या दृष्टीनं विचार का होत नसावा हाच खरा प्रश्न आहे.वेळीच केलेला बदल एखाद्याला कायमचं नैराश्याच्या गर्तेत अडकण्यापासून वाचवू शकतो पण सुरुवात मात्र कुठूनतरी व्हायला हवी.कळतंय पण वळत नाही अशी ही अवस्था असते.

श्रीगुरुजी's picture

5 Oct 2017 - 10:49 pm | श्रीगुरुजी

स्वत:कडे काय आहे यापेक्षा स्वत:कडे काय नाही आणि स्वत:ला काय हवे यापेक्षा स्वत:ला काय नको हे ज्याला समजते व ज्याच्याकडे पुरेसे व्यावहारिक शहाणपण आहे, तो जगात कोठेही यशस्वी होतो.

सौन्दर्य's picture

6 Oct 2017 - 12:28 am | सौन्दर्य

मधल्यांनी राजकारणात प्रवेश करावा, यश हमखास. (हलकेच घ्या)

चिकाटी, प्रामाणिकपणा आणि कष्ट करायची तयारी असल्यास कोणत्याही कॅलिबरचा मनुष्य प्रगती करू शकतो.

चौकटराजा's picture

7 Oct 2017 - 11:06 am | चौकटराजा

यश म्हणजे माझ्या मते एकच .. तुमचे कौशल्य पुरेसे वापरले जाणे. बस्स ! पैसा मानमरातब हे यशाचे दृश्य परिणाम फक्त. मी ज्या व्यवस्थापकांच्या हाताखाली काम केले त्यापैकी एकालाही माझ्या पेक्षा व्यवस्थापन जास्त कळत होते असे आजही मला वाटत नाही. आदराने नाव घ्यावे , याचा सहवास अधिक मिळाला असता तर मी अधिक उन्नत झालो असतो असे कधीच वाटले नाही म्हणून मी एक " अपयशी" माणूस आहे असे समजतो. कारण मला माहीत असलेली उत्तम व्यवस्थापन व्यवस्था त्यांच्या मधे मला दिसत नव्हती. अर्थात मी त्यामुळे दु: खी आहे असे मात्र नाही.

बाकी कंफर्ट झोन सोडल्याखेरीज फार काही मोठे करता येत नाही हे एक व्यवस्थापकीयच नाही तर सार्वत्रिक सत्य आहे.

सुंदर धागा काढल्याबद्दल धन्यवाद, लोकसंख्येत भर टाकण्याचे काम मात्र जवाबदारीने पार पाडतात. उत्पन्न कमी का असेना पोट्टे भरपूर पैदा करतात ही लोकं.