बेख्डेल चाचणी

यशोधरा's picture
यशोधरा in लेखमाला
24 Jan 2017 - 7:10 pm

*/

तुमच्या-आमच्यापैकी अनेक जण सिनेमाप्रेमी आहेत. आपल्यापैकी अनेक जण पहिल्या दिवशीचा पहिला शो न चुकवणारेही असतील. हल्ली तर पहिला शो बघून आल्यावर अनेक जण आपले फेसबुक स्टेटसही तसे अपडेट करतात! फॅशनच आहे ना तशी! किती तरी जण तर अगदी दावा करू शकतील की 'दे कॅन टॉक सिनेमा, दे कॅन वॉक सिनेमा, दे कॅन लाफ सिनेमा..' मान्य, अगदी मान्य. पण बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होणार्‍या सिनेमांची नावे सांगू शकतील का ते? आँ? टेल, टेल!

नै? बरं, आम्ही सांगतो. अगदी बैजवार सांगतो, निदान प्रयत्न करतो.

तर, पेश आहे चित्रपट रसिकांहो, ही एक छोटीशी गोष्ट.

कोणे एके काळी, म्हणजे १९८३ ते २००८ ह्या कालावधीमध्ये अ‍ॅलिसन बेख्डेल ही अमेरिकन व्यंगचित्रकार, फनी टाइम्स आणि गे आणि लेस्बियन समूहांसाठी चालवल्या गेलेल्या इतरही काही वर्तमानपत्रांमधून Dykes to Watch Out For ही हास्यचित्र कथामाला वा सदर चालवत असे. त्या काळी आंतर्जालावरही ह्या सदराचे पुन:प्रकाशन होत असे. अ‍ॅलिसन ह्या सदरामधून साधारणतः अमेरिकेतील एखाद्या सर्वसाधारण शहरामधून वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीमध्ये राहणार्‍या समाजाच्या रोजच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांचे राग-लोभ, त्यांना रोजच्या आयुष्यात येणार्‍या अडचणी, पडणारे प्रश्न ह्याचे चित्रीकरण आणि वार्तांकन करत असे. सहसा ह्या कथामालेमध्ये लेस्बियन व्यक्तिमत्त्वे चितारलेली असत.

a

त्या काळी आजूबाजूला घडणार्‍या राजकीय राजकीय घटना, झालेच तर गे प्राईड परेड्स, विरोधी मोर्चे, लेस्बियन जगातील घडामोडी ह्यांविषयी ही पात्रे आपली मते व्यक्त करत. त्या काळी, एक हटके हास्यचित्र कथामाला म्हणून ह्या सदराला भरपूर लोकप्रियता प्राप्त झाली, आणि ह्याच हास्यचित्र कथामालेस अनुसरून पुढे, 'बेख्डेल-वॉलेस टेस्ट' ह्या चाचणीचा उदय झाला. अ‍ॅलिसनच्या नावावरून ह्या चाचणीचे नाव 'बेख्डेल टेस्ट' ठेवले गेले. अर्थात, आपली मैत्रीण लिझ वॉलेस आणि व्हर्जिनिया वूल्फ यांच्या लिखाणालाही अ‍ॅलिसन ह्या कल्पनेचे श्रेय देती झाली.

a

फोटो क्रेडीट - एलेना सीबर्ट

किंचित अवांतर म्हणून व्हर्जिनियाने काय लिहिले होते, हेही थोडक्यात बघू या.

'अ रूम ऑफ वन्स ओन' हे व्हर्जिनियाचे न्यनहम आणि गर्टन ह्या केंब्रिज विद्यापीठांतर्गत येणार्‍या मुलींच्या विद्यालयांमधून १९२८मध्ये दिलेल्या व्याख्यानमालेवर आधारित असे लिखाण, २४ ऑक्टोबर १९२९ रोजी प्रथम प्रकाशित झाले. स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून लिखाण करण्याची आवश्यकता व्हर्जिनियाने प्रतिपादली होती. असे लिखाण करण्यासाठी स्त्रियांपाशी पुरेसे आर्थिक बळ असायला हवे, तेव्हाच त्यांना लिखाणाचे स्वातंत्र्यही मिळू शकेल असे तिचे मत होते.

व्हर्जिनियाचे स्वतःचे वडील पुराणमतवादी होते. फक्त घरातील मुलांनीच शाळेत जावे, मुलींना औपचारिक शिक्षणाची गरज नाही, ह्या मताचे असल्याने, व्हर्जिनिया शा़ळेत पूर्ण वेळ औपचारिक शिक्षण घेऊ शकली नव्हती. मात्र ग्रीक व जर्मन भाषेचे शिक्षण तिला मिळाले.* (* अलीकडील काळात लंडनमधील किंग्ज कॉलेजमधील दस्तावेज तपासले असता, व्हर्जिनिया व तिची बहीण वनेसा ह्यांनी ह्या कॉलेजातील स्त्रियांसाठी असलेल्या विभागातून ग्रीक आणि जर्मन भाषेचे शिक्षण घेतले होते, हे समजते.)

मात्र ह्या अनुभवांमुळे स्त्रियांनाही पूर्ण शिक्षण मिळायला हवे, त्यांच्या विचार क्षमतेचा विकास होण्यासाठी स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी ते आवश्यक आहे, आणि आर्थिक व वैचारिक स्वातंत्र्य असल्याशिवाय त्या उत्तम लेखन करू शकणार नाहीत हे मत तिने ह्या लिखाणाद्वारे मांडले. शिक्षण व आर्थिक स्वातंत्र्य असल्यास स्त्रियाही समकालीन पुरुष लेखकांसारखे लेखन करू शकतील का, ह्याचा ऊहापोहही ह्या लिखाणात आहे.

तर, ह्या बेख्डेल चाचणीवर २०००च्या सुमारास व्यापक प्रमाणात चर्चा-प्रतिचर्चा घडत गेल्या आणि त्यातून ह्या चाचणीची आणखी एक variant अस्तित्वात आला.

ही बेख्डेल चाचणी आहे तरी काय? मो मूव्ही मेझर ह्या नावानेही ओळखली जाणारी ही चाचणी तीन साध्या सोप्या निकषांवर आधारलेली आहे -

१. (चित्रपटामध्ये) दोन तरी स्त्री व्यक्तिरेखा हव्यात.
२. त्या व्यक्तिरेखांमध्ये आपापसात सशक्त संवाद असायला हवा.
३. 'पुरुष वा त्याच्याशी संबंधित वा त्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्याभोवती फिरणारा' हा त्या संवादाचा विषय नसावा.

'द रूल' नावाच्या आपल्या एका हास्य चित्रकथेत, मो आणि जिंजर ह्या दोन स्त्रियांमध्ये जो संवाद अ‍ॅलिसनने चितारलेला आहे, तो संवाद म्हणजेच ह्या चाचणीचे नियम.

पण ह्या बेख्डेल चाचणीची गरज तरी काय?

हे मान्यच आहे की, सगळे चित्रपट तर काही ह्या चाचणीसाठी पात्र ठरू शकत नाहीत, त्याला चित्रपटाची पटकथा, थीम, मांडणी, विषयाची गरज अशी अनेक कारणे असू शकतात. पण हेही तितकेच रोचक आहे की बरेचसे चित्रपट ह्या चाचणीच्या मूलभूत नियमाचीही पूर्तता करत नाहीत वा पटकथेमध्ये वाव असतानाही करू शकत नाहीत वा कदाचित करू इच्छित नाहीत आणि ती म्हणजे चित्रपटात दोन तरी (सशक्त) स्त्री व्यक्तिरेखा असण्याची. बरे, तशा व्यक्तिरेखा असल्याच, तरीही चित्रपटाचा सहसा सर्वेसर्वा 'नायक' ह्याच्या संबंधित वा अनुषंगानेच ह्या स्त्री व्यक्तिरेखांचे संवाद वा वावर मर्यादित असतो, अशा व्यक्तिरेखांना स्वतःचे असे काही अस्तित्वच नसते.

आठवा - होनहार बेटेको गाजर का हलवा बनाके खिलानेवाली आणि त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आणि दुसरे काहीच काम नसलेली अतिप्रेमळ आई! नायक दिसताच डोळे पिटपिटत आणि लाजून वगैरे चूर होत त्याच्या वाटेवर नजरे बिछाये वगैरे बसलेली आणि अर्थात दुसरे काहीच काम नसलेली नायिका, राखी के बंधन को जनम जनम वगैरे निभावणारी आणि भावाच्या प्रेमाने सतत गदगदणारी प्यारी बहना किंवा अगदी आख्ख्या जगाला दुष्टपणाचे डोस देऊ शकणारी, इतरांना मनीसारखे ओरखडे काढणारी पण नायकासमोर म्यांव माऊ होणारी खलनायिका! कालपरत्वे आई, बहीण आणि नायिका, खलनायिका जुना मोड त्यागून चकचकीत झालेल्या असल्या, तरी सहसा त्यांच्या भूमिकांची व्याप्ती तितकीच राहिलेली आहे. भूमिका जरा इतके तिकडे आधुनिक झाल्यात इतकेच.

विनोदाचा भाग सोडला, तरी असे का व्हावे बरे?

सहसा वा बर्‍याचदा, अजूनही,

१. चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा 'मुख्य' भूमिका साकारत नाहीत, तर साहाय्यक भूमिकांमधून दिसतात. थोडक्यात, चित्रपट स्त्री व्यक्तिरेखेभोवती फिरत नाही. असे चित्रपट मोजकेच असतात.

२. जरी दोन वा अधिक स्त्री व्यक्तिरेखा असल्या, तरीही त्यांचे संवाद, त्यांच्या भूमिका, त्यांचा वावर हा चित्रपटातील पुरुषाच्या - नायकाच्या/ खलनायकाच्या भूमिकांच्या आधाराने आणि अनुषंगाने ठरवला जातो/ बेतलेला असतो. ह्या अर्थाने पाहिलं असता, चित्रपटातील नायिकाही खरे पाहिले असता साहायक भूमिकेमध्येच असते.

चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा स्वतंत्र वृत्तीच्या, स्वतः काही विचार करू शकणार्‍या आणि ते मांडू शकणार्‍या, स्वतःच्या भल्या-बुर्‍याचा विचार करू शकणार्‍या, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकणार्‍या, चुका करणार्‍या आणि त्या सुधारणार्‍या आणि 'पुरुष' हा विषय वगळता आपापसात इतर काही संवाद साधणार्‍या असू शकत नाहीत का? मग तशा व्यक्तिरेखा दाखवण्यात काय अडचण असते, वा तशा का दाखवल्या जात नाहीत, हा एक अभ्यासाचा विषय ठरू शकतो.

आजही चित्रपटांमधून स्त्री कलाकारांना सहसा सशक्त व्यक्तिरेखा रंगवायला मिळत नाहीत किंवा अशा व्यक्तिरेखा चित्रपटांमधून सहसा दाखवल्या जात नाहीत, ह्या एका कटू सत्यावर बेख्डेल चाचणी नेमके बोट ठेवते. मोजके चित्रपट बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होतात.

अशी ही एक साधी सोपी चाचणी. कोणत्याही चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखा कितपत सशक्तरीत्या बेतल्या आहेत, ह्याचा प्राथमिक ऊहापोह ह्या चाचणीद्वारे होऊ शकतो. हॉलीवूडमधील चित्रपटांसाठी ही चाचणी प्रथम तयार केली गेली.

ह्या चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊ शकतील अशा काही भारतीय चित्रपटांची यादी आम्ही देतोय.

कुंकू
- मनाविरुद्ध म्हातार्‍याशी लग्न करून दिलेली निर्मला (शांता आपटे). जरी आपल्या खाष्ट सासू आणि नवर्‍याबद्दल मनात चीड आणि राग असला, तरी त्याच नवर्‍याच्या आधीच्या लग्नापासून झालेल्या मुलीवर तो राग न काढण्याइतकी ती समंजस आहे. त्या मुलीलाही आपल्या आजीचा दुष्टपणा आवडत नाही. आपल्या परीने ती निर्मलेला आनंद देऊ पाहते आणि दोघींमध्ये त्यांचा स्वतःचा असा एक मैत्रीचा धागा फुलतो आहे, त्याची ही कथा.

मिर्चमसाला - इंग्रजांच्या काळातील १९४०च्या सुमारातील एक कथा. गर्विष्ठ, स्त्रीलोलुप अशा सुभेदाराची (नासिरुद्दीन शाह) नजर सोनबाईवर (स्मिता पाटील) पडली आहे आणि त्याच्या लाळघोटेपणाची चीड येऊन, सोनबाईने त्याला कानफटीत ठेवून दिली आहे. त्याचा सूड म्हणून सुभेदाराने आख्खे गाव वेठीला धरले आहे आणि गाववाल्यांनीही सोयीस्करपणे सोनबाईलाच दोषी ठरवले आहे. सोनबाईचा शेवटचा आधार आहे स्त्रियांनी चालवलेल्या मिरची कारखान्याची जागा - जिथे ती सुभेदाराच्या शिपायांपासून जीव वाचवून पळाली होती. सोनबाईला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या सुभेदाराला आडव्या येतात त्या कारखान्यातील स्त्रिया. सोनबाईचा आणि त्यांचा एकमेकींशी बंध जुळला आहे. एकमेकींची साथ देण्यातला अर्थ त्यांना उमगला आहे. आपल्या सर्व सामर्थ्यानिशी, त्यांच्यासारख्याच एकीसाठी त्या लढा देतात.

उंबरठा - सुलभा महाजन (स्मिता पाटील). समाजातील परित्यक्ता स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी मनात बाळगून कामाला हात घातलेली स्त्री. आश्रमातील स्त्रियांमध्ये आयुष्याबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांच्यासाठी आंतरिक ऊर्मीने काही भले करू पाहणारी, त्यांना सोबत घेऊन चालू पाहणारी, त्यांच्याशी माणुसकीचे नाते जोडू पाहणारी संवेदनाशील स्त्री आणि तिचे झगडे आणि इतर स्त्रियांसोबतचे भावबंध पडद्यावर आणणारी गोष्ट.

डोर - मीरा (आयेशा टकिया) आणि झीनत (गुल पनांग) ह्यां दोन अतिशय वेगळ्या सामाजिक स्तरांवरल्या स्रियांची, त्यांच्या परिस्थितीची आणि मैत्रीची गोष्ट. उत्तरा बावकर ह्यांनी साकारलेली मीराच्या आजेसासूची भूमिकाही अत्यंत सुरेख. आयुष्याचे अनेक अनुभव घेऊन आजेसासू शहाणी झाली आहे. मीराची मैत्रीण आणि तिचा आधार. कुठेही भडक न होता अतिशय संयतपणे ह्या बायकांमधील नाती उलगडतो.

गुलाब गँग - राजो (माधुरी दीक्षित) आणि तिची गँग आणि सुमित्रा देवी (जुही चावला) ह्यांच्यातील डावपेचांची आणि कुरघोडींची कहाणी.

अँग्री इंडियन गॉडेसेस - फ्रेडा (सारा - जेन डायस) एक फॅशन फोटोग्राफर आहे आणि तिच्या लग्नाची बातमी देण्यासाठी आपल्या मैत्रिणींना घरी बोलावले आहे. त्यानंतर घडत जाणार्‍या घटना आणि त्यातून उलगडणारे आणि पुढे सरकणारी त्यांच्या मैत्रीच्या नात्याची वीण उलगडणारी कथा

तुम्हीही देऊ शकाल काही उदाहरणॅ?

उपसंहारः बेख्डेल चाचणीबद्दल लेख लिहायचा ठरवल्यानंतर ह्या चाचणीबद्दल टप्प्याटप्प्याने माहिती वाचत गेले. लेख, मतं, मतांतरं, आणि जे काही मिळेल ते.

अगदी सुरुवातीला जेव्हा ह्या चाचणीबद्दल वाचायला सुरुवात केली, तेव्हा चाचणी जरा स्त्रीप्रधानतेकडे झुकणारी आहे की काय, असंही वाटलं. या चाचणीवर त्यासाठी टीकाही झाली आहे, पण जसजसं अधिकाधिक माहिती वाचत गेले, तसं लक्षात यायला लागलं की स्त्रीप्रधानतेपेक्षाही या चाचणीचा भर आहे तो भूमिका आणि व्यक्तिरेखांच्या आशयघनतेवर आणि अशा आशयघन भूमिका वाट्याला येण्याच्या समान संधींवर.

चित्रपटांच्या उदाहरणांसहित उपलब्ध असणारी माहिती वाचत असता लक्षात आलं की अजूनही जगभरातून पुरुषप्रधान व्यक्तिरेखांभोवती फिरणारे सिनेमा बनतात. भले चित्रपटांमधून सुरुवातीपासून शेवटापर्यंत स्त्री व्यक्तिरेखा हजर असतील, तरीही पुरुष व्यक्तिरेखांना चित्रपटांत व्यक्त होण्यासाठी जितका वाव आणि मुभा असते तशी स्त्री व्यक्तिरेखांना असते का? की पुरुष व्यक्तिरेखांना पूरक म्हणून स्त्री व्यक्तिरेखाच वावर असतो?

चित्रपटांतील ह्या उणीवेवर बेख्डेल चाचणी बोट ठेवते. अर्थात, आता चित्रपटांच्या कथा, विषय बदलत आहेत व प्रेक्षक असे बदल स्वीकारतही आहेत.

बेख्डेल चाचणी हा चित्रपटासंदर्भातील चाचण्यांसंदर्भातील शेवटचा शब्द नक्कीच नव्हे पण चित्रपटांचा दर्जा सुधारण्यासाठी, चित्रपटांच्या कथा, विषय ह्यांमध्ये वैविध्य असावे, स्त्री व्यक्तिरेखांनाही न्याय आणि वाव मिळावा ह्यासाठीचे ह्या चाचणीचे योगदान नाकारता नक्कीच येणार नाही.

संदर्भसूची -

bechdeltest.com/
https://www.quora.com/
www.huffingtonpost.com
https://www.theguardian.com/
https://www.goodreads.com/

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 11:41 am | संदीप डांगे

चित्रपटात दोन बहिणींचा संवाद आहे. लग्नवधूचा दोन्ही बहिणींना समजवण्याचाही एक सीन आहे पण तो कितपत बसेल माहिती नाही कारण ती वधू बोलते तर मुलींच्या आयुष्यात सरसकट घडणार्‍या गोष्टींबद्दल, पण तीचं भाषण महावीर फोगटच्या वागणूकीचे विश्लेषण आहे.

दोन्ही बहिणी अ‍ॅकेडमीत असतांना लहान बहिण मोठीला ती ग्रेट आहे ह्याबद्दल पेपटॉक करते... तो सीन...

वरुण मोहिते's picture

25 Jan 2017 - 11:48 am | वरुण मोहिते

ज्या मूळ कादंबरी वर आधारित आहे त्या कादंबरीचा शांत शेळके यांनी मराठीत पण अनुवाद केला होता .एक हिंदी गिप्पी नावाचा चित्रप आहे २-४ वर्षांपुर्वीचाच तो पण हि टेस्ट पास करेल फार गाजला नाही पण कधीतरी पाहिलेला म्हणून आठवलं.अजून आठवेल तसे सांगतो

विशाखा राऊत's picture

25 Jan 2017 - 8:48 pm | विशाखा राऊत

पहिल्यांदाचे वाचले हे.. वेगळाच विषय. लेख आवडला :)

उल्का's picture

26 Jan 2017 - 12:35 am | उल्का

छान लेख!

नूतन सावंत's picture

26 Jan 2017 - 4:57 pm | नूतन सावंत

मस्त लेख.
मदर इंडिया,अरे संसार संसा,गॉडमदर ,मंडी, बसू शकतात का या चाचणीत?

यशोधरा's picture

26 Jan 2017 - 9:08 pm | यशोधरा

सुरंगीताई, मदर इंडिया आणि अरे संसार संसार ह्या चाचणीमध्ये उत्तीर्ण होईल असे वाटत नाही . माझ्या माहितीप्रमाणे त्यांत फक्त नर्गिसची आणि रंजनाची (अनुक्रमे) मध्यवर्ती भूमिका आहे ना? बेख्डेल चाचणी ही स्त्रीप्रधान भूमिकांसाठीची चाचणी नव्हे.

गॉडमदर - कल्पना नाही. मला हा सिनेमा माहित नाही. मंडी बहुतेक उत्तीर्ण व्हायला हवी. आता मला तो चित्रपट फारसा आठवत नाही.

बोका-ए-आझम's picture

26 Jan 2017 - 6:16 pm | बोका-ए-आझम

अरूणा राजेंचा ' रिहाई ' येऊ शकेल यात. पण त्यात पुरुषांविषयी बरीच संभाषणं आहेत. त्यामुळे जरी स्त्री व्यक्तिरेखा असल्या तरी एक निकष पूर्ण होत नाहीये.
रच्याकने जाॅन ग्रिशॅमच्या ग्रे माऊंटन या कादंबरीवर कुणी चित्रपट काढला तर तो या निकषांवर व्यवस्थित बसेल कारण कादंबरी नक्कीच बसते.
Good Morning Miss Dove पण बसतो या निकषांमध्ये.

पिलीयन रायडर's picture

26 Jan 2017 - 8:02 pm | पिलीयन रायडर

लेख आवडला. स्रुजाने सांगे पर्यंत अशी काही टेस्ट आहे हेच माहिती नव्हतं. लेखातुन बर्‍याच नव्या गोष्टी कळाल्या.

खरं तर अशी टेस्ट आहे ह्याचं जरा वाईटही वाटलं. आणि आपल्या हयातीत तरी ह्या टेस्टची गरज पडत रहाणारे हे जाणवुन अजुनच वाईट वाटलंय. अर्थात जास्तीत जास्त चित्रपट ही टेस्ट पास करत आहेत हीच काय ती आनंदाची बाब.

तसं पहायला गेलं तर आपल्या आजुबाजुला सुद्धा ही टेस्ट लावता येऊ शकते. घरात बायकांची सशक्त भुमिका, त्यांचा एकमेकींशी सुसंवाद आणि नवरा-घर-मुल ह्यातुन बाहेर पडुन इतर विषयांभोवती फिरणारे आयुष्य.. अवघड आहे सापडायला. गप्पांमध्येही बर्‍याचदा हेच विषय दिसतात. इतकंच काय तर आपल्या डेली सोपला ही चाचणी लावली तर एका झटक्यात सगळ्या मालिका फेल होतील. अर्थात डेली सोप ह्या असतातच कौटुंबिक विषयांवर. अवंतिका सारखी भुमिका असली ज्यात नायिका मुळुमुळु नव्हती, तरी विषय हा मुख्यतः संसार हाच होता. हरकत नाही. पण मग असं वाटतं की अगदी बेखडेल टेस्ट नाही पास झाली तरी "स्त्री व्यक्तीरेखांना किती प्रमाणात जुनाट/टिपीकल/आदर्श नारी टाईप दाखवलंय" ह्याची सुद्धा एक टेस्ट असावी.

तुम्ही बेखडेल पास करण्याच्या लायकीचे नसलात तरी किमान अमुक एका पातळी खाली तरी उतरु नकात हे सांगणारी टेस्ट हवी. म्हणजे मग अगदी दोन स्त्रीयांचा चुल मुल सोडुन संवाद नसला तरी किमान लग्न झालं की ड्रेस मधुन साडीत येणे, डोक्यावरुन पदर ओढुन फिरणे, आदर्श बहु बनण्याचा कमालीचा प्रयत्न करत बसणे, ह्या नादात नोकरी धंदा विसरणे.. असल्या तरी गोष्टी दिसणार नाहीत.

किंवा चित्रपटांच बोलाल तर अगदीच गुडी गुडी फिरणं एकवेळ ठिक.. पण मग किमान "मैं तो तंदुरी मुर्गी हुं यार.." गाणी तरी नसतील..

गामा पैलवान's picture

26 Jan 2017 - 8:15 pm | गामा पैलवान

लोकहो,

पौराणिक चित्रपट चालून जावेत. जय संतोषी मा वा तत्सम चित्रपटांत पुरुषी संदर्भ नसेल बहुतेक.

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही बघून कन्फर्म कराल का प्लीज?

गामा पैलवान's picture

26 Jan 2017 - 9:18 pm | गामा पैलवान

यशोधरा,

तुमचा सल्ला योग्य आहे. पण ही चाचणी फेमिनिस्ट आहे आणि मी फेमिनिस्ट नाही. त्यामुळे माझ्या मतास कितपत उठाव आहे याची शंकाच आहे.

आ.न.,
-गा.पै.

मताला उठाव नसला तरी लोकशाहीत मत मांडायची मुभा आहेच. तेव्हा हून जाऊदेत. तुमच्या मताची वाट बघातयत मिपाकर असं समजा.
मिपाकरांसाठी तुम्ही इतकंही नाही करणार? ( नाही म्हणू नका हां.)

गामा पैलवान's picture

26 Jan 2017 - 10:37 pm | गामा पैलवान

यशोधरा,

माझ्या मताची मिपाकर वाट पाहताहेत म्हणजे हा तर माझा बहुमानच झाला. सप्ताहांतास चित्रपट पाहेन म्हणतो. तोवर धीर धरा. वरवर पाहता जय संतोषी मा बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होईलसं वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

27 Jan 2017 - 11:49 am | पैसा

मी बघितलाय तो. आता कबूल करते कारण तेव्हा मी फारच लहान होते. त्यात संतोषी माता, हिरवीण, आणि तिला छळणार्‍या सासू, नणदा, जावा अशी अनेक महिला पात्रे आहेत. त्यांचे काही संवाद हे देवीच्या भक्तीबद्दल आहेत. तेव्हा ते पुरुष पात्रांबद्दल आहेत असे नक्कीच म्हणता येणार नाही.

या यादीत या सिनेमाचे नाव वाचून किती हसले ते सांगू शकत नाही. You made my day! =)) =))

यशोधरा's picture

27 Jan 2017 - 11:56 am | यशोधरा

थोडं श्रेय मलाही दे! हा लेख लिहिला, तेव्हा गामांनी असा झ्यांटॅक प्रतिसाद दिला आणि he made your day! आणिमग त्या न्यायाने संयोजकांनाही उरलं सुरलं श्रेय द्यायला हरकत नाही! ;))

गंम्मत म्हणजे सीता और गीता ही बसतो ह्या चाचणीत. चाचणीत बसणारा सिनेमा गंभीरच असायला हवा असे नाहीये. ह्या चाचणीबद्दलचे निरनिराळे दृष्टीकोन वाचायलाही रोचक वाटत आहे.

पैसा's picture

27 Jan 2017 - 12:41 pm | पैसा

मग सीता और गीताचा रिमेक चालबाझ ज्यात श्रीदेवीने काम केले होते तो, त्याशिवाय श्रीदेवी आणि ऊर्मिला मातोंडकरचा जुदाई, मग श्रीदेवी आणि जयाप्रदा यांचे अगणित कवायती असलेले जितेंद्रसोबतचे सिनेमे, त्यात त्या बहुतेक वेळा सवती असत. तेही चालून जातील. भारी चालू आहे कलेक्शन! =))

यशोधरा's picture

27 Jan 2017 - 9:44 pm | यशोधरा

नाही. :)

साहेब..'s picture

27 Jan 2017 - 10:13 am | साहेब..

चाचणी फेमिनिस्ट आहे आणि मी फेमिनिस्ट नाही

निल बटे सन्नाटा हा स्वरा भास्कर हिचा चित्रपट या चाचणीत शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होईल. सुंदर चित्रपट आहे.

हा केव्हाचा शोधत आहे मी.. सापड्ला नाही पण.

आपटेबाईंचा पर्चड का काय तरी नावाचा १ सिनेमा बसेल का नेमात?

पण बसायला हवा बहुतेक.

शेवरी, मुक्ता, सरीवर सरी हे तीनही मराठी चित्रपट या टेस्टमध्ये पास होतील असे वाटते. असे हिंदी चित्रपट खुप कमी असावेत.

सपे-पुणे-३०'s picture

27 Jan 2017 - 9:34 pm | सपे-पुणे-३०

छान लेख ! नवीन माहिती समजली.
'प्रेम म्हणजे प्रेम असतं' हा मृणाल कुलकर्णीचा चित्रपट ही टेस्ट पास करेल का? चित्रपटातील मृणाल देव आणि नेहा जोशी ह्या दोन बहिणीमधील दृष्य, तसंच मृणाल देव व सुहास जोशी ह्या सासू-सुनेमधील दृष्य वरील कसोटीवर उतरतात असं वाटतं.

ह्याच चित्रपटात मॄणालला एक मुलगी असते आणि ज्या माणसाशी मृणाल पुनर्विवाह करायचं ठरवते, त्याच्या मुलाबद्दल मृणालच्या मुलीला ओढ वाटू लागते असं आहे का? मृणाल व मुलीच्या मनातील एकमेकींबाबतची आणि एकूण परिस्थितीबाबतची द्वंद्व सुरेख रंगवली आहेत त्या चित्रपटात, म्हणजे तोच असेल तर.

गामा पैलवान's picture

28 Jan 2017 - 2:01 pm | गामा पैलवान

यशोधरा,

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की जय संतोषी मा हा चित्रपट बेखडेल चाचणीत उत्तीर्ण झाला आहे. :-) आज शनिवारी बघणार होतो, तो काल रात्रीच बघितला. म्हंटलं की अनायसे संतोषीमातेचा शुक्रवार आहेच, तर सत्कारणी लावूया!

ही चाचणी आणि तदनुषंगिक चर्चेतून बनलेलं माझं मत सांगतो. पाश्चात्य देशांत कुटुंबव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. मुली वयात येतात तेव्हा घराबाहेर प्रेम शोधायला जातात. त्यांच्यासमोर बाप ही प्रेमळ पुरुषाची प्रतिमा नसते. त्यामुळे त्यांची आपसांत पुरुषांविषयी अतिरिक्त प्रमाणावर संभाषणं होतात. बेखडेल चाचणीचं मूळ या अतिरिक्त संभाषणांत आहे. सुदैवाने भारतात कुटुंबव्यवस्था आजूनही सुदृढ आहे. त्यामुळे बेखडेल चाचणी भारतीय चित्रपटांस कितपत प्रमाणावर लागू करावी हा प्रश्नंच आहे. सरसकट लागू केल्याने जय संतोषी मा हा चित्रपट देखील ही चाचणी अनपेक्षितरीत्या उत्तीर्ण झाल्याचं आढळून येतं.

आ.न.,
गा.पै.

मी हा चित्रपट पाहिलेला नाही पण हा लेख वाचून तुमची जिज्ञासा जागरुक होऊन तुम्ही हा चित्रपट पाहिलात आणि ह्या चाचणीबाबतचेआणि पाश्चात्य देशांतील कुटुंबव्यवस्थेबद्दलचे तुमचे आकलन आणि त्यानुसार बनलेली मते ह्या जोरावर आपले मत नोंदवलेत, ह्यासाठी आभार.

अजून भरपूर चित्रपट पाहण्यासाठी तुम्हांला अनेक शुभेच्छा!

गामा पैलवान's picture

28 Jan 2017 - 11:21 pm | गामा पैलवान

धन्यवाद यशोधरा. माझं चित्रपट आणि एकंदरीत ललित कलाकृतींविषयी समज आणि ज्ञान यथातथाच आहे. तुम्ही म्हणता तसे चित्रपट पहाणं माझ्याकडून होण्याची जरा शंकाच आहे. तरीपण तुम्हाला शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तुम्ही चेन्नाई एक्स्प्रेस पहिला असेल. तो या चाचणीच्या निकषांत बसेल काय?

आ.न.,
-गा.पै.

यशोधरा's picture

29 Jan 2017 - 8:35 am | यशोधरा

माझ्या मते, नाही.
बेख्डेल चाचणीत उत्तीर्ण होऊ शकणारा चित्रपट म्हणून तुम्हांला नील बटे सन्नाटा ह्या चित्रपटाचं नाव सुचवते. आंतर्जालावर उपलब्ध आहे.

अनुप ढेरे's picture

28 Jan 2017 - 10:09 pm | अनुप ढेरे

पल्याड झालेली याच विषयावरची चर्चा
http://www.aisiakshare.com/node/2677

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 11:14 am | अभिजीत अवलिया

वेगळीच माहिती मिळाली.

शब्दबम्बाळ's picture

8 Feb 2017 - 11:06 am | शब्दबम्बाळ

काही महिन्यांपूर्वी या चाचणीबाबत ऑफिस मध्ये चर्चा झाली होती...
मुळात एका व्यंगचित्रातून काहीश्या मिश्किल प्रकारे 'पुरुषी' चित्रपटांवर केलेल्या टिप्पणीला कितपत महत्व द्यायचे हा ज्याचा त्याचा मुद्दा!
या धाग्यावर जरा जास्तच कडकपणे या चाचणी कडे पहिले गेले आहे असे वाटते.

चाचणी कुठेही म्हणत नाही कि स्त्री पात्रांना किती सशक्त भूमिका असावी. एका वाक्यात सांगायचं तर "दोन स्त्रिया एकमेकींशी पुरुष सोडून कुठल्याही दुसऱ्या विषयावर बोलल्या कि झालं!"

मग ते वाक्य असेही असू शकत,
रीमा: "अग सीमा, आजकालच्या मुली किती नखरे करतात. आपल्या वेळी असे नव्हते ना!"
सीमा : "हो ना "
गम्मत म्हणून असे उदाहरण घेतलाय ह.घ्या.

थोडक्यात काय तर स्त्रियांच्या तोंडून स्त्रियांची माप काढणारा एखादा डायलॉग जरी टाकला तरी सिनेमा हि चाचणी पास करतो! ;)

स्त्री प्रधान भूमिका असणारे किंवा स्त्रियांना सशक्त भूमिका असणारे चित्रपट झाले पाहिजेत याबाबत सहमत पण त्यासाठी अशा चाचण्यांची गरज वाटत नाही! भारतात आता स्त्रीप्रधान चित्रपटदेखील मेनस्ट्रीम मध्ये हिट होऊ लागले आहेत हे हि नसे थोडके!(ते पण अशा चाचणी बद्दल लोकांना माहिती नसताना)

ग्रॅव्हिटी सारखा चित्रपट हि चाचणी उत्तीर्ण होत नसेल तर काय बोलणार!

आणि हो, अनुक्रमणिकेत या लेखासाठी असणारे चित्र पटले नाही. :)

पिलीयन रायडर's picture

23 Jul 2017 - 9:58 pm | पिलीयन रायडर

वंडर वुमन हा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत असणारा आणि प्रचंड कलेक्शन करत असणारा चित्रपट. हा चित्रपट बेखडेल टेस्ट पास करतो का ह्यावर भरपुर चर्चा झालेली आहे. चेत्रपट पहायच आअहेच, पण अजुन वेळ होत नाहीये. कुणी पाहिला असेल तर ह्यावर नक्कीच इथे उत्तम चर्चा होऊ शकते.

ह्या विषयावर मी अजुनही वाचतेय. काही लिंक्स -

http://www.slate.com/blogs/xx_factor/2017/06/02/i_wish_wonder_woman_were...

https://www.thequint.com/women/2017/06/09/wonder-woman-is-the-feminist-m...

http://www.denofgeek.com/us/movies/wonder-woman/265297/how-wonder-woman-...