भाग 1 इथे वाचा पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 1
======================================================================
भाग २ – उदयपुर
दिवस पहिला : उदयपुर शहर – तलाव अन बगोर की हवेली.
तर ... आम्ही एकंदरीत एक Adventure पार पाडून शेवटी एकदाचे उदयपुरला पोचलो. उदयपुर एयरपोर्टला २ नावं आहेत. एक दबोक (किंवा डबोक) आणि महाराणा प्रताप एयरपोर्ट . पैकी डबोक हे नाव - हे विमानतळ डबोक गावाला वसलेले आहे म्हणून . विमानतळ तसं साधंच आहे. फार बडेजाव नाही की महागाई नाही.
आम्ही आमचे सामानाचे सोपस्कार आवरून लाउंज मध्ये आलो. तिकडे मी म्हंटल जरा गावात काय आहे काय नाही याची माहिती मिळवावी. समोर “आरटीडीसी” चं कौंटर दिसलं , म्हणून त्यात शिरून खुर्ची वर जाऊन बसलो. समोर “Incredible India” वगैरे ची ब्रोशर्स पडलेली होती ती चाळत अधिकारी येण्याची वाट पाहत बसलो. मधल्या ५-१० मिनटात ३-४ लोक मला Taxi कुठे मिळेल , हॉटेल कोणतं चांगलंय वगैरे विचारून गेले. मी आपलं खांदे उडवून मला माहित नाही म्हणायचो. थोड्या वेळात अधिकारी आला आणि मला समोरच्या खुर्चीकडे हात दाखवून नम्रतेने म्हणाला . “ भाईसाब आप यहां बैठेंगे प्लीज ?” , मी आपलं संकोचून उठलो अन समोर जाऊन बसलो. (इतक्या वेळ मी अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून निवांत.. “माहित नाही” असं उत्तर देत बसलो होतो याचा गिल्ट अजून ही गेला नाहीये. देव करो अन त्याला ७व्या वेतन आयोगात चांगली पगारवाढ मिळो.)
असो , तर त्याच्याशी जुजबी बोलून हे कळलं की काय पहायचं काय नाही हे सगळं एका छापील पुस्तकात लिहिलेलं आहे आणि ते पुस्तक फुकट आहे. आणि इतर प्रश्नाची उत्तरे मी दिली होती त्या प्रमाणेच “ मालूम नही , आप बाहर कौंटर पे पुछे !!” असं मिळालं. त्यामुळे गिल्ट थोडा कमी झाला खरा.
इंटरनेट वर सांगितल्या प्रमाणे एक्सकर्शन बस ची चौकशी केल्यावर कळलं की ती मागील वर्षीच बंद झालीये. असो. आम्ही आपलं बाहेर पडलो प्रीपेड Taxi केली अन हॉटेल वर जाण्याची सोय झाली.
एव्हाना आम्ही मेन हाय-वेला लागलो. आणि पाहतो तर चक्क भ्रमनिरास न राव.... सगळीकडे फुल हिरवळ , दाट झाडी , हवेत बऱ्यापैकी थंड पणा. मी शेवटी ड्रायवर- रफिकला विचारलं , की “रेगीस्तान किधर है ? कहां दिखेगा ?” कारण राजस्थान म्हंटल की रुदाली पासून बॉर्डर पर्यंत आपल्या मनावर उंट , रेती , बियाबां रेगीस्तान हेच बिंबवल गेलंय . त्यावर तो म्हणाला , “साब ये सब गलती ये सनिमा वालों की है. हमारा राजस्थान याने सिर्फ रेत थोडेही है ? हमारा राजस्थान है “अरावली पर्बत वाला राजस्थान,मगरीयो वाला राजस्थान,महाराणाओ का राजस्थान,वीरो का राजस्थान, रेगीस्तानो वाला राजस्थान, उंटवाला राजस्थान , बनाओ का राजस्थान,तालाबो का राजस्थान !!” प्रत्येक विशेषण उच्चारताना त्याच्या चेहऱ्यावर खूप अभिमान दिसत होता. उदयपुर ला फिरत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे लोकांच्या वागण्यातली आपुलकी आणि गोड पणा. जयपूर मध्ये मात्र उलट अनुभव आला .(त्याबाबत पुढच्या एखाद्या भागात लिहीन.)
आम्ही पुढे पुढे जात असताना दोन्ही बाजूंनी मोठ्मोठे बाहू पसरून उभा असलेला , पाचू सारखा हिरवा कंच अरावली . पावसाळा नुकताच सुरु झालेला असल्याने हवेत गारवा सुद्धा आला होता.
अजस्त्र अरावली
थोडं आणखी पुढे गेल्यावर आम्हाला एक जुनी वास्तू दिसली. चौकशी केल्यावर कळलं की ते एक पुरातन शिव-मंदिर होतं. आणि ते उदयपूरच्या वेशीवरचं मंदिर असून , जुन्या काळी युद्धावर निघताना अथवा गावाबाहेर पडताना याच मंदिरात पूजा आणि निरोप घेऊन तेव्हाचे महाराणा निघत असत. बाजूलाच दुसऱ्या फोटो मध्ये दिसत आहे ती त्या काळातली तटबंदी. आता रस्ता अपुरा पडल्याने त्या तटबंदी चा काही भाग पाडून सरकारने तिथे रस्ता बांधला आहे.
पुरातन मंदिर
तटबंदी
पुढे जाता जाता ड्रायवर सांगत होता , उदयपुरचं वैशिष्ट्य म्हणजे संगमरवर , झिंक आणि कपड्यावरची कलाकारी. आणि मला जाणवलेल वैशिष्ट्य म्हणजे तेथील घरे , बंगले आणि कोठ्या – अत्यंत Grand , सौंदर्यपूर्ण आणि तबियत से बनाई हुई ... वाह क्या बात. तेव्हाच मी ठरवून टाकलं , की परत कधीतरी एकदा इथे यायचं आणि एका अश्याच कोठी मध्ये राहायचं .आणखी एक सांगायचं तर साधारणत: पूर्ण राजस्थान ट्रीप मध्ये मला “खराब रस्ते” काही दिसले नाहीत. मग ते शहरातले असोत किंवा २ शहरे जोडणारे असोत. (कोणाला कशाचं तर बोड्खीला केसांचं” म्हणतात तसंय आपलं रस्त्याच्या बाबतीत)
आम्ही आणखी जसे जसे शहरा जवळ जात होतो तसे आम्हाला तलाव दिसायला लागले. उदयपुर ही एक “लेक सिटी” म्हणून ओळखली जाते.. तुम्ही उदयपुर मध्ये कुठेही असा , किमान एक तरी तलाव तुमच्या अगदी एक किमी इतक्या जवळ असेल. आणि गम्मत अशी की हे सगळे तलाव मानव निर्मीत आहेत. त्यात फतेह्सागर बद्दल ड्रायवर ने वेगळीच माहिती दिली. हा तलाव सुद्धा मानवनिर्मित आहेच अन तो भारताच्या आकाराचा बनवलेला आहे. तर असे पिचोला , फतेह्सागर , दुध तलाई (तलाई म्हणजे छोटा तलाव) , बडा तालाब असे अत्यंत सुरेख तलाव , त्याच्या काठावर असलेल्या कोठ्या , महाल सगळंच अत्यंत जादुई , ते म्हणतात न Mesmerizing, अगदी तसंच. जयपूर पिंक सिटी तशी ही व्हाईट सिटी ... व्हाईट सिटी कारण भव्य संगमरवराच्या कोठ्या , महाल इत्यादी.
पिचोला लेक
लेकच्या मधोमध दिसतंय ते “ताज लेक पेलेस” – रु. ८३,००० प्रतिदिन फक्त. (मायला ५ दिवसाच्या खर्चात आमच्या इथं १०० स्क्वे फु ची एक खोली येतेय ‘ इति एक मराठवाडी ). हे आधी जग निवास म्हणून पण ओळखलं जायचं. पण नंतर कोर्ट लवादात ते ताज ग्रुप ने जिंकलं. आता ते त्यांच्याच मालकीत अन ताब्यात आहे. इथे जायला फक्त एकच मार्ग – बोट अन हॉटेल च्या फेरीज .
पिचोला – सिटी पेलेस मधून घेतलेला फोटो
यात जी संगमरवराची वास्तू आहे ते आहे ताज लेक पेलेस. आणि मागे दिसतंय ते उदयविलास पेलेस आणि ओबेरॉय ट्रायडेंट (उर्फ बडा महल जे आता हॉटेल म्हणून ओबेरॉय ग्रुप चालवतो.).
लेक फतेह्सागर (बोटिंग करताना घेतलेला फोटो)
हा तलाव महाराजा फतेहसिंग यांनी बांधलेला तलाव. यात संध्याकाळच्या वेळेस बोटिंग करण्याची मजा घेण्यासारखी आहे.संध्याकाळी इथे लाईट शो व फौंटन शो वगैरे होतात.
दुध तलेई
हा तलाव – नव्हे तलेई – म्हणजेच छोटा तलाव. हा लेक पिचोलाला लागुनच आहे. शिव-विलास पेलेस ला लागून असलेला एक छोटा तलाव. गेले काही वर्षे हा तलाव धोबी तलाव म्हणून पण वापरला जायचा. मात्र सध्या आता हा संरक्षित असून , संध्याकाळच्या वेळेस यात बोटिंग करणे म्हणजे एक पर्वणी आहे.
या सगळ्या तलावांची विशेषता म्हणजे की हे सगळे तलाव वेगवेगळ्या दृश्य-अदृश्य कालव्यांनी एकमेकांना जोडलेले आहेत. त्यामुळे अतिवर्षा झाल्यास कोणताही तलाव भरून वाहिल्याने कोणत्याही प्रकारची हानी होण्याची शक्यता राहत नाही. इतकेच नाही तर सगळे तलाव कोणत्याही वेळी समस्तरच राहतात. यातील काही छोट्या तलावांवर तर त्याकाळच्या राजांनी बंधाऱ्याची व्यवस्था केलेलीही दिसून येते.
एकाच फोटोत – लेक पिचोला – फतेह्सागर – दुध तलेई
तर .. अश्या रीतीने सगळीकडची सैर झाल्यावर आता पोटात कावळे कोकलायला लागल्याने आम्ही आता गाडी हॉटेल कडे वळवायला सांगितली. आणि आम्ही आमच्या ईच्छित स्थळी पोचलो.
तुम्ही जर कधी उदयपुर ला जाणार असाल तर मुद्दाम म्हणून एखाद्या “हेरीटेज हॉटेल” मधेच राहा. खिशाला जरा जड पडेल , पण It’s a “must have” Experience in one’s lifetime. If you want to feel what Royalty is, you should BE AT ROYALTY. याच कारणासाठी आम्ही ट्रायडेंट मध्ये राहायचं ठरवलं. अत्यंत सुरेख , देखणं आणि शांत हॉटेल. (हे आम्हाला अत्यंत स्वस्तात मिळालं. ते कसं ? हे नंतर एखाद्या लेखात).
राजस्थान मधली जवळपास सगळी हेरीटेज हॉटेल्स ही सगळी एकतर राजे-राजवाड्यांनी दिलेल्या जागेत मोठे हॉटेल ग्रुप भाड्याने चालवतात किंवा “रॉयल हेरीटेज हॉटेल्स ग्रुप” म्हणून सध्याचे उदयपुर महाराणा अजितसिंग यांच्या मालकीची आहेत. त्यामुळे खरा राजस्थानी फील , मग तो अन्न , राहणीमान , निवास कशाचाही असो , घ्यायचा असल्यास “जीवनात एकदातरी करू ” केटेगिरी मध्ये या अश्या हॉटेल मध्ये रहाच. याव्यतिरिक्त लेक पिचोला-फतेह्सागर यांच्या आजूबाजूला जुन्या सरदार-वतनदारांच्या हवेली-कोठी सुद्धा उपलब्ध असतात.यातील सगळी हॉटेल्स आणि कोठ्या कोणत्यानकोणत्या लेक ला लागून आहेत . याची मजा और आहे.
चुन्डा पेलेस :
हा पेलेस सुद्धा एक मोठी (फक्त मोठी ?) कोठी होती. आता ते हॉटेल म्हणून प्रसिद्ध आहे.
संध्याकाळी हॉटेल वर जाता-जाता “बगोर की हवेली” ला जाण्याचा प्रस्ताव ड्रायवर ने मांडला. या ठिकाणी राजस्थानी लोक कला आणि हस्तकला याचं प्रदर्शन रोज रात्री ७ ते ८ च्या दरम्यान असतं. ते पाहून आम्ही हॉटेल वर पोचलो.
बगोर की हवेली : लोककला व हस्तकला दालन
फोटो : आंतरजालावरून साभार.
आमच्या हॉटेल चे काही फोटो :
ग्रांड एन्ट्रन्स
हॉटेल ची बाग
बडा महल कडे जाणारा रस्ता.
बडा महल म्हणजे तेव्हाचे राजा फतेहसिंग आणि जगसिंग यांची “हंटिंग सेन्क्चुरी” होती. राजाला शिकारीला जास्त दूर जायला लागू नये म्हणून इथे वाघ ,रानडुक्कर , हरणं , काही पक्षी अन ईतर छोटे मोठे प्राणी आणून ठेवले जात. आणि राजे सवडी प्रमाणे इथे येऊन रहात आणि प्राण्यांची शिकार करत. हा भाग साधारणत: ४४ एकर चा आहे. आता इथे उदयविलास पेलेस अन ट्रायडेंट हा भाग सांभाळतात. इथे रोज संध्याकाळी ५ ते ६ प्राणी येतात , त्यांना तुम्ही खायला घालू शकता. हे “Animal Feeding” मोफत असून आजही राजांच्या नोकरीत असणारे फोरेस्ट ऑफिसरांच्या निगराणीत हा कार्यक्रम पार पडतो.
प्राण्यांची जमा व्हायची जागा.
या बडा महलच्या हिरव्या कंच बागेत आम्ही फिरत असतानाच अचानक जोरदार केकारवाने मी दचकलो. थोडं इकडे तिकडे पाहिल्यावर कळलं की तिथे झाडांवर विपुल प्रमाणात मोर , लांडोर अन इतर पक्षी बसलेले होते. मोर इतक्या जवळून पाहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. त्याचा तो डौलदार पणा. आपल्या सौंदर्याचा गर्व जो चालताना प्रत्येक पावलागणिक जाणवत होता. रंग ... सगळच भारी. आणि मुख्य म्हणजे हे मोर या भागात मोकळे असतात. पाळलेले नाहीत वा बंदिस्त ही नाहीत. तिथल्या केयर टेकर ला विचारल्यावर कळलं की हॉटेल च्या भागात साधारण ३००-४०० मोर राहतात. मोरावर इतकी काव्यं रचायचा मोह कविना का झाला असावा हे मोर इतक्या जवळून पाहिल्यावर कळलं.
बडा महल अन आजू बाजूच्या परिसरात फेरफटका अन बडा महल ची माहिती देणारा फलक :
एव्हाना बरंच फिरून झाल्याने अन सकाळची “अनफर्गेटेबल मुंबई ट्रीप” यामुळे आता हात पाय बोलायला लागले होते. सबब उद्या कुठे कुठे जायचं काय काय पहायचं याचं प्लानिंग करून We should Call of the Day , यावर एकमत होऊन आम्ही रूम वर परतलो.
रूम वर गरमागरम कॉफी अन भुजिया ... यांचा आस्वाद लुटला. आता एक्साईटमेंट होती उद्याच्या “Incredible Udaipur” टूर ची.
इतक्या उशीरा “रूम सर्विस” ला बोलवायचा “संकोच” (मध्यमवर्गीय गुण) झाल्याने भुजिया ग्लासमधेच खाल्ली. (त्यामुळे कदाचित वारुणी रुसली असावी).
दिवस दुसरा : उदयपुर – एकलिंगजी – नाथद्वारा – हलदीघाटी – रक्त तलाई - चेतक स्मारक – महाराणा म्युझियम
उदयपुर मधला दुसरा दिवस. आज आम्ही उदयपुर न फिरता आजूबाजूची ठिकाणे पहायचे ठरवले. हॉटेल डेस्क वर कालच चौकशी करून घेतली होती. त्या प्रमाणे आज एकलिंगजी , नाथद्वारा , हलदीघाटी पहायचे ठरलं.
आमचा गाडीवान बोलल्याप्रमाणे ९ ला हजर झाला. नमस्कार-चमत्कार झाल्यावर आम्ही एकलिंगजी च्या मार्गाने रवाना झालो. वाटेमध्ये परत अजस्त्रबाहू अरावली सोबतीला होताच. त्याशिवाय अत्यंत साफ सुंदर रस्ते अन आजूबाजूला “रसिकतेने” बांधलेले बंगले,घरं, कोठ्या ही होत्याच. ड्रायवर- नरेश आम्हाला गाडी चालवतानाच एकंदरीत राजस्थान , उदयपुर , सध्याचे राजे , तेथील राजकारण इत्यादी बद्दल छान माहिती देत होता.
एक गम्मत म्हणजे “मोस्ट इंफ्लूएन्शीयल” असून सुद्धा तेथील राणा व परिवार राजकारणात सहभागी नाहीत. मात्र समाजकारण आणि धार्मिक कार्यात आजही त्यांचा सहभाग असतो. बाकी हे लोक “हॉस्पिटलिटी” मध्ये अग्रेसर नाव आहेत. आपल्या येथील गडकिल्ले , जिथे राजकारण आणि धर्मकारणाचा विषय होतात तिथे राजस्थान मधील किल्ले अन महाल हे बऱ्याच लोकांच्या रोजगाराचे साधन आणि राज्याच्या रेवेन्यु मध्ये मोठी भर टाकणारे ठरत आहेत. हा फरक फक्त इतकाच नाही. महाल व किल्ले आजही राजे-राजवाड्यांच्या ताब्यात असल्याने स्वच्छता आणि ईतर सोई वाखाणण्यासारख्या आहेत.
हा झाला एक भाग ,पण अगदी अलीकडे पर्यंत महाराष्ट्राइतकी युद्धे राजस्थान च्या धरती वर लढली गेली नाहीत त्यामुळेसुद्धा तेथील गड-किल्ले मुलत: संरक्षित राहिले ही या फरकाची दुसरी बाजूही विसरून चालणार नाही.
अश्या आणि अनेक गप्पा चालू असताना आम्ही बरेचसे अंतर पार पाडून आम्ही एव्हाना एकलिंगजी येथे येऊन पोचलो होतो. एकलिंगजी उदयपुर पासून साधारणत: ७०-८० किमी दूर आहे. पण रस्ता अत्यंत सुंदर असल्याने तिथे पोचायला फार वेळ लागत नाही.
एकलिंगजी हे एक महादेवाचे मंदिर आहे. एकलिंगजी हे प्राचीन काळापासून ते आजतागायत येथील महाराणांचे दैवत आहे. मेवार प्रांताचे कुलदैवत म्हणून सुद्धा एकलिंगजी ओळखले जातात. संगमरवराची अत्यंत सुंदर वास्तू आणि शिल्पकलेचा अवर्णनीय मिलाप म्हणजे हे मंदिर. या मंदिरात चित्रीकरण अलाऊड नसल्याने येथे फारसे फोटो वगैरे काढता आले नाही. हे मंदिर म्हणजे खरं तर एक मंदिर नसून १०८ मंदिरांचा समूह आणि त्यात २ मोठी मंदिरं. एक एकलिंगजी मंदिर अन दुसरं संत मीराबाई ने बांधलेलं कृष्ण मंदिर. याच कृष्ण मंदिरात संत मीराबाई यांनी भक्तीची परीक्षा म्हणून विष प्राशन केले होते असं ऐकण्यात आलं . हे पूर्ण मंदिर काळ्या कातळाने वेढलेले आहे. आजूबाजूची छोटी छोटी मंदिरं गणपती , विष्णू , कृष्ण अश्या देवतांची आहेत. हे मंदिर आजही येथील विद्यमान राणा यांच्या देखरेखी खाली असून येथील सुरक्षा , भाविकांची सोय , त्यासाठी लागणाऱ्या सुविधा जसेकी लॉकर ईत्यादी विनामुल्य पुरवले जाते. दुसरी लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे येथील स्वच्छता. कुठेही निर्माल्य किंवा ईतर कचरा दिसून आला नाही.
इथे दर्शन झाल्यावर आम्ही पुढे नाथद्वाराला निघालो. नाथद्वारा हे कृष्ण मंदिर असून हे सुद्धा पुरातन मंदिर आहे. इथे नेहमीच भक्तांची प्रचंड गर्दी असते. देशाच्या विविध भागातून लोक रोज हजारोंच्या संख्येने इथे दर्शनाला येत असतात. राजसमंद मध्ये स्थित असलेले हे मंदिर साधारण १७व्या शतकात इथे बांधले गेले असं म्हणतात. तत्कालीन मुघल राजवटीत मंदिरांची चाललेली नासधूस पाहून खुद्द वृंदावन मधून ही मूर्ती तत्कालीन वैष्णवानी इथे आणून प्रस्थापित केली. “श्रीनाथजी” म्हणून पूजन होत असलेली श्रीकृष्ण मूर्ती ही अत्यंत लोभस , मोठ्या डोळ्यांची आणि टिपिकल वृन्दावनी शैलीतील अशी आहे. श्रीनाथजी म्हणजे श्रीकृष्णाचे बालरूप म्हणून मानले जाते. मंदिर सुद्धा सुस्थितीत असून दर्शन व्यवस्था सुद्धा फार सुलभ आहे. ईतर कोणत्याही मंदिरांप्रमाणे इथेही भाट-बडवे यांचा त्रास आहेच. मात्र आम्हाला आमच्या ड्रायवरने आधीच याबाबत सांगून ठेवल्याने कोणत्याही फसवेगिरीला बळी न पडता आमचे दर्शन फार छान झाले. या मंदिरात दर्शन हे टप्प्या टप्प्याने होत असल्याने इथे दर्शन घेण्यासाठी पूर्वनियोजन करून जाणेच योग्य आहे. कारण इथे इतर मंदिरांप्रमाणे मंदिर दिवसभर उघडे राहत नाही. सकाळचा पाळणा , महाप्रसाद , दुपारचा आराम , संध्याकाळचा प्रसाद , शेजारती अश्या अनेक टप्प्यात मंदिर दर्शनासाठी खुले अथवा बंद केले जाते. इतर वेळेस मंदिराची कपाटे (दरवाजे) बंद ठेवले जातात. इथेही फोटोग्राफी ला सक्त बंदी असल्याने फोटो काढता आले नाहीत. दर्शन झाल्यावर आम्ही प्रसाद घेऊन बाहेर पडलो. इथे प्रसाद म्हणून मिळणारा लड्डू म्हणजे तिरुपती देवस्थानमच्या प्रसादाची आठवण करून देतो.
बिसलेरी बाटली शेजारी लाडू ठेऊन काढलेला फोटो. हाताच्या पंज्या एवढा हा लड्डू मोठा होता.
इथून पुढे आमचा प्रवास होणार होता तो राजस्थानच्या एका अत्यंत तेजस्वी इतिहासाच्या दिशेने. रक्त तलाई – हलदीघाटी – आणि चेतक स्मारक.
क्रमश:
---
ज्याक ऑफ ऑल .
प्रतिक्रिया
10 Oct 2016 - 12:46 am | पद्मावति
वाचतेय. पु.भा. प्र.
10 Oct 2016 - 12:51 am | मोदक
झकास, खुसखुशीत लेखमाला सुरू आहे
10 Oct 2016 - 12:59 am | महामाया
पु.भा.प्र.
10 Oct 2016 - 7:55 am | रातराणी
मस्त ! आवडली तुमची ट्रिप! पुभाप्र.
10 Oct 2016 - 11:29 am | सिरुसेरि
छान प्रवास वर्णन . ऐकलेल्या माहितीप्रमाणे , राजस्थानचे मेवाड आणी मारवाड असे दोन भाग आहेत . मेवाड हा भाग हिरवळ , दाट झाडी असणारा आहे . मारवाड हा भाग वाळवंटी आहे . उदयपुर , अरवली , माउंट अबु हि ठिकाणे मेवाडमध्ये येतात . जयपुर , जोधपुर , बिकानेर , अजमेर हे भाग मारवाडमध्ये येतात .
10 Oct 2016 - 12:16 pm | रसप
माझ्या नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम असेल कदाचित, पण फोटो नीट दिसत नाहीयत.
मस्त लिहितो आहेस..
पुढील भागाच्या प्रतीक्षेत !
10 Oct 2016 - 1:29 pm | अनन्न्या
अजून हा भाग न पाहिल्याने माहितीचा उपयोग होईल.
10 Oct 2016 - 2:11 pm | ज्याक ऑफ ऑल
काही आणखी माहिती हवी असल्यास मला व्यक्तीगत संदेश पाठवा. सांगेन ...
10 Oct 2016 - 1:33 pm | अभ्या..
लेखन सुंदर आहे पण आंतरजालावरचा एकमेव फोटो वगळता बाकी प्रचंड गचाळ आणि धुरकट मोबाईलचे फोटो आहेत. टाकले नसते तरी चालले असते.
10 Oct 2016 - 2:10 pm | ज्याक ऑफ ऑल
मी जेथून लिंक देऊन हे फोटो डकवले आहेत तिथे हे फोटो उत्तम क्वालिटी मध्ये दिसतायत.
येथे काय इश्यू आहे ते कळत नाही. तुमच्याच प्रमाणे ईतरही २-४ लोकांनी हीच उणीव लक्षात आणून दिल्यावर मी हे पाहिलं !!
(मी स्वत: ठीकठाक फोटो काढत असल्याने जर "हे गचाळ" फोटो आहेत हे कळलं असतं तर मीच अपलोड केले नसते याचा विश्वास बाळगा)
असो - तुम्हास झालेल्या तसदी बद्दल फारफार दिलगिरी !!
Admin शी बोलून या तांत्रिक चुकीचा माग काढायचा प्रयत्न नक्कीच करेन.
तोवर ..तुमची ईच्छा झालीच तर वरील सगळे फोटो इथे पाहता येतील.
आपलाच - ज्याक
10 Oct 2016 - 11:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
मूळ फोटो उत्तम रिझॉल्युशनचे आहेत. तुम्ही बहुदा पूर्णपणे डिस्प्ले केलेल्या फोटोंच्या लिंक्सऐवजी त्यांच्या थंबनेल्सच्या लिंक्स वापरल्या आहेत. थंबनेल्स खूप कमी रिझॉल्युशनमध्ये असतात व त्यांचा मोठा आकार केल्यावर चित्रे धूसर होतात.
उदाहरणादाखल हे पुरातन मंदिराचे मूळ फोटोची लिंक वापरून टाकलेले तुमचे चित्र पहा...
11 Oct 2016 - 9:52 am | कंजूस
डॅक्टरांनी एक लिंक दिली त्यावरून सर्वच फोटोलिंका दुरुस्त केल्या.
अजस्त्र अरावली

तटबंदी
>पिचोला लेक
पिचोला – सिटी पेलेस मधून घेतलेला फोटो
लेक फतेह्सागर (बोटिंग करताना घेतलेला फोटो)
दुध तलेई
एकाच फोटोत – लेक पिचोला – फतेह्सागर – दुध तलेई
चुन्डा पेलेस :
ग्रांड एन्ट्रन्स


हॉटेल ची बाग
बडा महल कडे जाणारा रस्ता.
प्राण्यांची जमा व्हायची जागा.
मोर इतक्या जवळून पाहिल्यावर कळलं.




बडा महल ची माहिती देणारा फलक :



लड्डू मोठा होता.
10 Oct 2016 - 3:17 pm | अनन्न्या
असो पण मोबाईलचे फोटो गचाळ येत नाहीत. साईज देणे वगैरे कळायला थोडा वेळ लागत असावा.
10 Oct 2016 - 4:10 pm | ज्याक ऑफ ऑल
अनन्या :
कृ . काही सुधारणा योग्य वाटत असल्यास मदत करावी.
६५०-४८० वर मागील लेखात फोटो बरोबर आले होते. आणि फोटो तर एसेलार ने काढलेले आहेत. (१-२ वगळता)
तांत्रिक प्रतिसादासाठी __/\__
10 Oct 2016 - 2:42 pm | सूड
फोटो ब्लर झालेत पण लिहीताय सुंदर, लिहीत राहा!!
10 Oct 2016 - 4:21 pm | असंका
सुरेख!!
धन्यवाद!
10 Oct 2016 - 4:58 pm | रेवती
राजाला शिकारीला जास्त दूर जायला लागू नये म्हणून इथे वाघ ,रानडुक्कर , हरणं , काही पक्षी अन ईतर छोटे मोठे प्राणी आणून ठेवले जात. आणि राजे सवडी प्रमाणे इथे येऊन रहात आणि प्राण्यांची शिकार करत.
मजेशीर माहिती आहे.
माझी राजस्थानी मैत्रिण असंच भरभरून त्यांच्या राज्याबद्दल बोलत असते ते सगळं आठवलं.
10 Oct 2016 - 5:07 pm | एस
फारच छान. फोटो बहुतेक थंबनेल व्ह्यू चे आले आहेत.
10 Oct 2016 - 11:20 pm | palambar
छान माहिती. महाराष्र्ट सोडून सगळीकडे चांगले रस्ते आहेत, कर्नाटक ,केरळ, गुजरात .
11 Oct 2016 - 7:55 am | कंजूस
डॉ सुहास म्हात्रे, इथे फोटोचा सोर्स कोड ,उदा०
हॉटेल ची बाग--- एचटीटीपीएस farm6.staticflickr.com/5030/30181961506_523cde8150_m.jpg"
असा दिसतोय तर मूळ फोटो कसा मिळवता?
कारण हा छोटाच येतोय
लेख आवडत आहेत.राजस्थान बरेच बघतात आणि प्रत्येकाचे निरीक्षण मजेदार ,वेगळं असतं.
11 Oct 2016 - 1:02 pm | केडी
मस्त लिहिलाय, संपादक मंडळ फोटोच्या लिंक दुरुस्त करून देतील अशी आशा/विनंती आहे।
पुढचा भाग लवकर टाका।
19 Oct 2016 - 3:43 pm | रॉजरमूर
छान झालाय हा पण भाग .
लिहीत राहा
पुढचा भाग येऊ द्यात.
19 Oct 2016 - 7:21 pm | कैलासवासी सोन्याबापु
छानच जमते आहे लेखमाला, राजस्थान आमची सासुरवाडी आहे, तिथल्या आदरातिथ्याचा आम्हांस घरगुती अनुभव आहेच, फक्त तेच एक त्रयस्थ दृष्टीकोनातून वाचणे आम्हाला अगदी मजेशीर वाटते आहे, पुढील भाग लवकर येऊ देत.
20 Oct 2016 - 9:49 am | सपे-पुणे-३०
उदयपूर बघायचं राहिलं आहे, त्यामुळे ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.
राजस्थानचे रस्ते खरंच चांगले आहेत. ३ वर्षांपूर्वी बिकानेर-जोधपूर-जेसलमेर भागात जाऊन आलो. अतिशय सुबत्ता आणि स्वस्ताई जाणवली तिथे. तसंच रस्त्याच्या दुतर्फा मैलोनमैल ठिबक सिंचन वापरुन केलेली शेती दिसली.
20 Oct 2016 - 10:07 am | हृषीकेश पालोदकर
भारी लिहिलंय.
त्वरित जाण्याचा मोह होतोय.
फोटो मुळे जास्त मजा आली.
20 Oct 2016 - 3:03 pm | टर्मीनेटर
छान लिहिताय... पण उदयपूर आणि जयपूर मध्ये मला एकदम तुमच्या उलटा अनुभव आला. उदयपुर ची लोकं खूप कंझरवेटीव वाटली आणि जयपूरची त्यामानानी आदरातिथ्यात खूप उजवी वाटली. नाथद्वाराचा अनुभव मात्र खूपच घाणेरडा होता, दर्शन चालू कमी वेळ आणि बंदच जास्ती वेळ असते. त्यामुळे तिथे जाणाऱ्यांकडे एकतर भरपूर वेळ तरी असायला हवा किंवा फार उच्च दर्जाची श्रद्धा तरी असायला हवी. जर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या कडे नसतील तर मी म्हणीन कि त्यापेक्षा तेवढ्या वेळात तिथून जवळच असलेल्या कुम्भलगढ किल्ल्याला जरूर भेट द्यावी. (ज्याच्या तटबंदी ची भिंत ३६ ते ३८ किलोमीटर लांबीची असून ग्रेट वॉल ऑफ चायना नंतर जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे असे म्हणतात.) भरपूर मंदिरे असलेल्या आणि अतिशय उत्तमरीत्या देखभाल केलेला हा किल्ला खरोखर पाहण्यासारखा आहे.






24 Oct 2016 - 9:26 pm | ज्याक ऑफ ऑल
कुम्भलगड ला याच वेळेस जायचे होते पण तब्बेतीच्या कारणाने कार्यक्रम जरा चेंज करावा लागला ऐन वेळेस.
बाकी नाथद्वारा आणि एकलिंगजी च्या वेळा माहित असतील तर तुम्ही म्हणता तसा वेळेचा अपव्यय बिलकुलच होत नाही . माझाही झाला नाही.
24 Oct 2016 - 10:21 pm | कंजूस
कुंभालगडला कसे गेलात,राहिलात का हे लिहिणार का टर्मिनेटर? हा गड आणि राणकपूर फलना ते उदयपूर जाणाय्रा दोन वेगळ्या रस्त्यांवर आहे. राणकपूरमार्गे गेल्याने गड राहिला.