श्रीगणेश लेखमाला- माझे खावे-खिलवावे छंद

जागु's picture
जागु in लेखमाला
13 Sep 2016 - 8:43 am

.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
-moz-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-webkit-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
-o-border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
border-image: url(https://lh3.googleusercontent.com/Ejo0qm9nwo9Gyq03Q59ESI18nSmxfyofkT7Noi...) 76 79 77 83 repeat;
}

भातुकली खेळता खेळता पाककलेची आवड अलगद कधी निर्माण झाली ते कळलेच नाही. भातुकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळूहळू आजीकडे, आईकडे खर्‍या भाज्या मागून छोटीशी चूल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले. भाज्या फुकट जातात म्हणून किंवा इतर गोष्टींमुळे दोघींनीही कधी मनाई केली नाही व घरातील सगळेच माझ्या भातुकलीतल्या जेवणाची (माझ्यासमोर) नाके न मुरडता, खोटी का होईना, वाहवा करत आले. त्यामुळे माझी आवड कलेकलेने वाढत गेली. शालेय जीवनातील आठवी-नववीपासून विविध पुस्तकांमध्ये लिहिलेल्या रेसिपी वाचून नवे नवे पदार्थ बनविणे हा माझा रोजच्या दिनक्रमातील रिकाम्या वेळातील आवडता छंद झाला. पदार्थ बनवताना वाचून ते मन लावून, प्रमाणशीर घटक घेऊन कृती केल्याने पदार्थ तंतोतंत जमू लागले व त्यामुळे पाकशास्त्राची आवड द्विगुणित होऊ लागली. सुरुवातीला जाणवणारे चटके, दाह, उडणारे तेल, भाजणे ह्या गोष्टींतून पाककला जोपासताना कशी सावधगिरी बाळगायला पाहिजे ह्याचे धडे मिळत गेले.

लग्न झाल्यावर तर स्वयंपाकाला जबाबदारीची जोड लागली आणि सासरीही होणार्‍या माझ्या पाककलेच्या कौतुकामुळे आत्मविश्वास बळावू लागला. होणार्‍या प्रत्येक सणांचे पारंपरिक पक्वान्न, नैवेद्य यांच्या पाकक्रिया करताना पारंपरिक पदार्थांबद्दल आदर आणि अभिमान वाटू लागला. शिवाय प्रत्येकाची आवड, पथ्य जोपासताना अधिकाधिक पदार्थ आणि त्यातील पोषणमूल्ये याबद्दलच्या ज्ञानात भर पडू लागली. मुली झाल्यानंतर त्यांच्यासाठी पोषक पदार्थांच्या शोधात असताना आणखी चविष्ट व पौष्टिक खाऊ, तसेच चटपटीत पदार्थांच्या रेसिपीत भर पडत गेली. ह्या रेसिपीज लक्षात राहाव्यात व वारंवार करता याव्यात, म्हणून लिहून ठेवू लागले.

हळूहळू माझ्या पाककलेला इंटरनेटचा मोठा आधार मिळू लागला. त्यामध्ये मायबोली डॉट कॉम, मिसळपाव डॉट कॉम ह्यावर मराठीत सुलभ रितीने लिहिलेल्या रेसिपीज मिळू लागल्या व त्या पाककृती करून माझ्या कलेत नावीन्याची भर पडत गेली. तिथे फोटोंसकट मिळणार्‍या वैविध्यपूर्ण रेसिपीज पाहून प्रतिसाद लिहिता लिहिता 'हम भी किसीसे कम नहीं' असा बडेजाव मारत आपणही आपल्याजवळच्या रेसिपीज सगळ्यांबरोबर शेअर करू शकतो, ह्या विचारांबरोबरच माझ्या पाककलेला जोडकला लाभली ती रेसिपीज लिहिण्याची.

सुरुवातीला काही कॉमन रेसिपीज टाकल्या, तेव्हा प्रतिसाद फारसे नसायचे. पण एक-दोन जरी आले, तरी खूप आनंद व्हायचा. काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की जे कॉमन नाही - म्हणजे इतरांना ज्या भाज्यांची किंवा माशांची माहिती नाही, अशा रेसिपीज टाकून आपण लोकांपर्यंत पोहोचवाव्यात व अशा रेसिपीजची ओळख करून देणे गरजेचे आहे. सुरुवातीला माझ्याकडे कॅमेरा नव्हता, तेव्हा अशाच (फोटोंशिवाय) रेसिपीज टाकायचे. पण उणीव वाटायची. बात कुछ जमी नहीं हा फील यायचा. मग खास रेसिपीजचे, भाज्यांचे फोटो काढण्यासाठी मी एक साधा कॅमेरा घेतला. अब बात बन गई. रेसिपी अधिक चविष्ट 'दिसू' लागल्या. तोपर्यंत मायबोली व मिसळपाववर मित्रपरिवार वाढत गेला. नवीन नवीन रानभाज्या व मासे यांचे फोटो पाहायला मिळाल्याने सगळ्यांना माझ्या रेसिपीजचे कुतूहल वाटू लागले. (बरोबर लिहितेय ना? की स्वतःचे लाड करून घेतेय? :हा हा:) काही जणांना ह्या भाज्या/मासे माहीत असायचे, ते त्यांच्यातिथले प्रचलित नाव व रेसिपी सांगून माझ्या ज्ञानात आणखी भर घालायचे व ज्यांना माहीत नसायचे, त्यांच्या कौतुकसुमनांचा सडा प्रतिसादात पडायचा. खूप जणांकडून प्रोत्साहन मिळाले. ह्या प्रोत्साहनामुळे माझ्या संशोधनाला गती मिळत गेली. पावसाळ्यात ऑफिस सुटले की मार्केट गाठायचे, ठाकरिणींना शोधून त्यांच्याकडे कुठल्या नवीन नवीन रानभाज्या आल्यात त्या बघायच्या. त्यांनाच त्यांची रेसिपी विचारली की त्या काय खूश व्हायच्या आणि गालातल्या गालात हसून (काय येडी बाई आहे. भाजी कशी करतात माहीत नाही. काय होत असेल हिच्या घरातल्यांचे, देवाला माहीत.. असे मनातल्या मनात बडबडत असाव्यात) त्यांना जेवढी माहीत असेल तेवढी रेसिपी सांगायच्या. ती बरोबर नाही वाटली, तर मी त्याच्यात आणखी काहीतरी बदल करून चविष्ट बनवायचा प्रयत्न करायचे. मग भाजीचा फोटो, इतर घटकांचा फोटो, कृतीचा स्टेप बाय स्टेप फोटो व शेवटी तयार रेसिपीचा फोटो काढताना खूपच कसरत व्हायची. आता मी फोटोंची क्वालिटी आणखी चांगली यावी म्हणून चांगला कॅमेराही घेतला.

माशांनी मला भरपूर साथ दिली. आता एक राज खोलतेय. खरे सांगायचे तर मलाच माहीत नव्हते इतके मासे असतात ते. फार तर ५-६ प्रकार असतील असेच मलाही वाटलेले. पण रोज मार्केटमध्ये जायचे आणि आता कुठला नवीन मासा घ्यायचा असा विचार करत असले की लगेच समोर टोपलीतला नवीन मासा मला खुणवायचा. मासा नवीन असला की कोळणीचेच डोके खायचे. "काय गं, कसा लागतो हा?", "काटे असतात का?", "तळून चांगला लागतो का कालवणात?", "बाधत नाही ना?" कधीतरी खुमखुमी किंवा शंका आली की मग शेवटचा माझा ठरलेला प्रश्न - "ताजा आहे ना?" असे म्हटले की कोळीण भडकलीच म्हणून समजा आणि आख्ख्या मार्केटला ऐकायला जाईल इतक्या मोठ्या आवाजात गदारोळ करणार. "मी काय खराब म्हावरा देतंय? रोजचा गिर्‍हाइकाला फसवीन काय मी?" आणि आणखी दोनतीन वाक्य तरी पैसे देऊन तिथून पळ काढेपर्यंत सुनवून ह्या कोळणी आपल्याला सळो की पळो करतात. आख्ख्या माशांचे फोटो टाकायचे म्हणून मी कोळणींकडून कापून घेत नाही मासे. घरी येऊन ते एक्स्ट्रा काम असते. सर्वप्रथम आख्ख्या माशाचा फोटो काढायचा, मग ते कापायचे. पुन्हा फोटो, तयारी, फोटो आणि ह्या दोघांच्या दरम्यान वारंवार हात धुणे हे जिकिरीचे काम. सुरुवातीला घरात कोणालातरी सांगायचे फोटो काढायला, पण ते माझ्या कल्पनेप्रमाणे यायचे नाहीत. मग मीच ती करती करविती. मला ह्या सगळ्याचा कधीच कंटाळा नाही आला, कारण डोळ्यासमोर असायचे रेसिपीचे लिखाण, तिचे प्रेझेंटेशन.

रेसिपी बनवून झाल्यावर ती दुसर्‍या दिवशी आंतरजालावर प्रकाशित केली आणि कौतुकवृष्टी झाली की सगळे कष्ट फळाला यायचे. 'आता पुढची भाजी वा मासे कोणते?' अशी विचारणा झाली की पुढच्या रेसिपीसाठी आपोआपच प्रोत्साहन मिळायचे. वाचकांकडून अनेक टिप्स मिळतात अजूनही. त्यात रंग, प्रेझेंटेशन, पौष्टिकता, भांडी ह्या सगळ्या गोष्टींच्या टिप्स मिळतात. त्यामुळे माझ्या कलेत मला आणखी सुधारणा करता येते.

गंमतीचा भाग म्हणजे आंतरजालावरील मित्रपरिवारांपैकी कोणाला रानभाजी दिसली, तळ्यात, हॉटेलमध्ये जरी मासे दिसले की लगेच दुसर्‍या दिवशी मला मेसेज यायचे - 'काल भाजी/मासे पाहिले आणि तुझीच आठवण आली.' रानभाज्या आणि मासे म्हणजे जागुच्या रेसिपी हे समीकरण ठरलेले. एखादी इतर व्हेज रेसिपी टाकली की लगेच कॉमेंट येतात - आम्हाला वाटले, माशाची रेसिपी असेल. माझ्या ह्या रेसिपीज वाचून, मासे न खाणार्‍या काही व्यक्तीही खास मासे आणून मला फोन करून रेसिपीज विचारून घरी करू लागले आहेत. :हाहा: चीनला सतत ये-जा करणारी माझी एक मैत्रीण आहे वर्षू नावाची. ती मासेप्रियच असल्याने माझ्या बहुतेक रेसिपीज तिने केल्या आहेत. "आमच्याकडे सध्या 'जागु सप्ताह' चालू आहे" अशी तिच्या नवर्‍याची विधाने ती मला ऐकवते, तेव्हा गंमत आणि समाधान वाटते.

मी लिहिलेल्या रेसिपीज सगळ्यांना इतक्या आवडतील आणि मी माशाचा पन्नासावा प्रकार गाठेन, हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यासाठी समस्त आंतरजालीय वाचकांचे मनापासून आभार. मी एकत्र कुटुंबात राहते. माझ्या नवनवीन पदार्थांच्या वाढत जाणार्‍या आकड्याला आणि कला विस्तारित व्हायला खरी साथ दिली ती माझ्या घरातल्या सदस्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाने. त्यांनीही नवीन मासे, भाज्या कोणतीही हरकत न घेता स्वीकारल्या. नाहीतर काही ठिकाणी "आमच्यात नाही हो करत ही भाजी" किंवा "आम्ही नाही बाई कधी खाल्ले हे मासे" असे परकेपणाचे डायलॉग ऐकायला मिळतात. काही भाज्या व मासे बेचव असायचे व ते मलाच नाही आवडायचे, तरीही तो बेचवीचा दोष मला न देता भाजी/माशालाच जायचा, ही माझ्या कलेची मोठी जीत होती. नेहमीच जेवणात परफेक्शन होते असे नाही. कधीतरी इकडे तिकडे होते, पण ते मला सांगून समजून घेतात घरची मंडळी. माझ्या मुली काही ठरावीक रानभाज्या खाताना कंटाळतात, पण मासे मात्र आवडीने खातात. मी प्रत्येक भाजी किंवा मासा पूर्ण चौकशी करूनच घेते. खातरी पटली तरच घेते. मी सगळ्यांना हेच सांगते की कोणतीही रानभाजी घेताना ती ओळखीच्या विक्रेत्याकडून विचारपूस करून खातरीपूर्वक घ्या. अजूनही मला वॉट्सअ‍ॅपवर किंवा आंतरजालावर रानभाज्यांबद्दल किंवा माशांबद्दल विचारणा करणारे मेसेज आले की मला खूप छान वाटते. आपल्याजवळ असलेली माहिती एखाद्याशी शेअर करण्यातला आनंदच काही वेगळा असतो.

तर असा हा माझा छंद. ह्या छंदाला मी कधी व्यायसायिक नजरेने पाहिले नाही. पण एक दिवस मला मेल आला माहेर मासिकाचे काम पाहणार्‍या चिन्मय दामले यांचा. त्यांनी विचारले की माहेर अन्नपूर्णा अंकासाठी तुमच्या रेसिपीज द्याल का? माय गॉड, काय आनंद झाला असेल मला! द्याल का काय, आधी मीच त्यांना धन्यवाद दिले माझ्या रेसिपीज मागितल्याबद्दल. माहेर अंकात रेसिपीज छापून आल्या आणि एक माहेर अंक आणि मानधनाचा एक चेक माझ्या घरी आला. ती ह्या लिखाणाची पहिली कमाई. रक्कम अगदी छोटी असली, तरी मानधन म्हणून खूप समाधानकारक होती माझ्यासाठी. माहेर मासिकाचे संपादक अजूनही माहेर अन्नपूर्णामध्ये माझे रेसिपीविषयक लेख किंवा रेसिपीज घेतात ह्याचा मला आनंद आहे. हळूहळू लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स या वर्तमानपत्रांमध्ये व इतर मासिकांमध्ये मी रेसिपीज देऊ लागले. सगळीकडून मानधन नसले मिळत, तरी जे मानधन मिळाले ते माझ्या कलेला मिळालेला सन्मान समजते मी. नोकरी करत असल्याने मला माझ्या कलेला व्यावसायिक रूप देण्यात अडचणी येतील, असे मला वाटते. मित्रपरिवाराच्या व नवर्‍याच्या आग्रहास्तव मी रानभाज्यांचे व माशांचे पुस्तक काढायला घेतले होते. पुस्तकाचा डेटा पूर्ण आहे, पण काही तांत्रिक अडचणी मध्ये आल्याने ते सध्या स्थगित केले आहे. तोपर्यंत एखादा ब्लॉग काढण्याचा विचार आहे. तुमच्या शुभेच्छा अशाच कायम असू द्या, ही मनापासून प्रार्थना.

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Sep 2016 - 8:58 am | पैसा

तुझे छंद घरच्यांच्या पथ्यावर पडले असणार अगदी! त्या छंदाला पूरक म्हणून तुझे फोटोही खूप छान असतात. थोडे नमुने इथेही येऊ देत!

उदय के'सागर's picture

13 Sep 2016 - 9:53 am | उदय के'सागर

एक झकास सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा 'बिहाइंड द सिन' पाहताना जो आनंद, कुतुहूल असतं तसं हा लेख वाचताना जाणवत होतं :)
आपण स्वयंपाक घरात भिंतीला टेकून पाय पसरून निवांत बसावं आणि आईने स्वयंपाक करता करता अगदी सहज एखादी पाककृती सांगावी त्याप्रमाणे तुमची शैली आहे पाककृती सांगायची, अगदी सहज आणि आपली वाटणारी पाककृती. शिवाय फोटोत दिसणारे भांडे, पदार्थ अगदी आपल्या नेहमीच्या वापरण्यातले दाखवल्याने अर्धा विश्वास तर तिथेच बळावतो की हे जमेल आपल्याला (मग भले तो पदार्थ करून पाहो ना पाहो ;) ) .
एकदा लोकसत्ता मध्ये तुमच्या 'बोरं' ह्या खाद्यपदार्थाची पाककृती छापून आली होती, दिवाळी स्पेशल कोकणातील रेसिपी होती (2011 मध्ये बहुतेक) तेव्हा मलाच आनंद झाला होता कि अरे वा आता मोठ्या मंचावरून पाककृती सादर होऊ लागल्यात तर :) तुमच्या पुस्तकाची वा ब्लॉग ची आतुरतेने वाट पाहणारा तुमचा फ्यान :)
तुमच्या ह्या छंदातल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Sep 2016 - 4:04 pm | माम्लेदारचा पन्खा

असेच म्हणतो....!

बोका-ए-आझम's picture

14 Sep 2016 - 8:30 am | बोका-ए-आझम

- (मासे आणि जागुताईंच्या पाकृ यांचा फॅन) बोका-ए-आझम!

सुबोध खरे's picture

13 Sep 2016 - 10:05 am | सुबोध खरे

जागुताई
तुम्ही तुमच्या अशा रानभाज्या किंवा नेहमीचे नसलेल्या माशांच्या पाककृतींचे पुस्तक काढा ( अगोदर काढले नसेल तर)
यामुळे एक गोष्ट होईल पुढच्या पिढीला या गोष्टींची ओळख होईल आणि एक मागच्या पिढीचा वारसा पुढे पाठवला जाईल.
जेंव्हा तुम्ही पुस्तक काढता तेंव्हा त्यासाठी इतस्ततः पसरलेले बरेच साहित्य एकत्र नीट जुळणी करून ठेवले जाते.
बाकी तुमच्या अशा दुर्मिळ रेसिपीचा एक कट्टा करू .म्हणजे आमच्या सारख्या माणसांना अनेक दुर्मिळ चवीचें पदार्थ खायला मिळतील.
जागा दिवस आणि वेळ तुमच्या सोयीने. कष्ट तुमचे आणि खर्च आमचा. पहा जमतंय का?

भ ट क्या खे ड वा ला's picture

13 Sep 2016 - 10:36 am | भ ट क्या खे ड वा ला

रानभाज्यांच्या रेसीपीज ही खरच काळाची गरज आहे विभक्त कुटुंब पद्धती व बदलत्या जीवनशैली मूळे एका फार मोठ्या ठेव्याला तरुण पिढी मुकते आहे पुस्तक येउ द्या .
माझा एक कारवारी मित्र काही विशिष्ट भाजा आणि त्यात विशीष्ट मासे अशा कालवणांबद्दल नेहमी सांगायचा . उदा. बांबुच्या कोंब आणि अमुक मासा वगैरे तस एखाद प्रकरण ही टाका त्या पुस्तकात .

पियुशा's picture

13 Sep 2016 - 10:32 am | पियुशा

खूप्च मस्त लिहिले आहेस जागुताइ :)

जागु ताई, तुमच्या सगळ्याच पाककृती मी वाचून काढलेल्या आहेत. पण हा लेख वाचून, खरंच "behind -the -scenes" चा अनुभव आला. तुम्ही नक्कीच काढा तुमचा पाकृ पुस्तक. तुम्हाला मनापासून शुभेच्छा!

अनन्न्या's picture

13 Sep 2016 - 10:59 am | अनन्न्या

मला तर बरेच वर्णन माझेच वाटले, अगदी तुमच्याइतक्या नाही झाल्यात लिहून पण करते मात्र खूप!
कधीकधी काहीच करू नये असं वाटतं पण लगेच मन नविन शोध घेतच!मिसळपावची सदस्य झाले ते इथल्या रेसिपीज वाचूनच!

शिव कन्या's picture

13 Sep 2016 - 12:22 pm | शिव कन्या

आवडला तुमचा लेख.
आवडीने रांधणे, आपुलकीने खिलवणे ही आपली सहज वाटावी अशी प्रवृत्ती आहे.

तुमचे पुस्तक लवकरात लवकर येवो.
पण ब्लॉग काढायला काहीच हरकत नाही. स्थळकाळाच्या मर्यादा यात फार कमी असतात.
शुभेच्छा.

पूर्वाविवेक's picture

13 Sep 2016 - 12:57 pm | पूर्वाविवेक

खूप छान लिहिलं आहेस. माझ्या खाद्यभ्रमंतीची सुरुवात पण तुझ्यासारखीच काहीशी. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

मुक्त विहारि's picture

13 Sep 2016 - 1:56 pm | मुक्त विहारि

"सर्वप्रथम आख्ख्या माशाचा फोटो काढायचा, मग ते कापायचे. पुन्हा फोटो, तयारी, फोटो आणि ह्या दोघांच्या दरम्यान वारंवार हात धुणे हे जिकिरीचे काम. सुरुवातीला घरात कोणालातरी सांगायचे फोटो काढायला, पण ते माझ्या कल्पनेप्रमाणे यायचे नाहीत. मग मीच ती करती करविती. मला ह्या सगळ्याचा कधीच कंटाळा नाही आला,"

एक नंबर...

आमची मात्र ह्या बाबतीत फारच कुचंबणा होते...

१. आमची फोटोग्राफी फारच दिव्य.

२. बायको-मुले फोटो काड्।आयला तयार नसतात.

३, एकदा स्वैपाकघरांत शिरलो, की मग मी इतर कुठल्याच कामाला हात लावत नाही. (फक्त एकीकडे पेयाचा आस्वाद घेणे सुरु असते.)

त्यामुळे,

फोटो सकट पा.कृ. देणार्‍यांचे खूप कौतूक वाटते.

स्वाती दिनेश's picture

13 Sep 2016 - 2:07 pm | स्वाती दिनेश

जागु, छान लिहिले आहेस.
स्वाती

रेवती's picture

13 Sep 2016 - 5:08 pm | रेवती

छान झालेय लेखन.

पिलीयन रायडर's picture

13 Sep 2016 - 6:29 pm | पिलीयन रायडर

रानभाज्या आणि मासे म्हणजे जागुच्या रेसिपी हे समीकरण ठरलेले

हे अगदी खरं आहे! तुला एवढी माहिती कशी असा प्रश्न पडला होताच, पण आता समजले की त्यामागे तू किती मेहनत घेतलेली आहेस.

शाकाहारी असले तरी तुझी प्रत्येक पाककृती उघडली जातेच. तू अशाच सुंदर पाकृ टाकत रहा.

आणि हो.. तुझे पुस्तक लवकरच प्रकाशित होवो!!

अभिजीत अवलिया's picture

13 Sep 2016 - 7:24 pm | अभिजीत अवलिया

एखादे पुस्तक काढा ना तुमच्या सगळ्या रेसीपीचे ...

कविता१९७८'s picture

13 Sep 2016 - 7:47 pm | कविता१९७८

मस्तच जागु

अभ्या..'s picture

13 Sep 2016 - 10:03 pm | अभ्या..

पुस्तक काढाच

सुरेख ! खरंच फार मेहनत घेतेस. मला वाटायचं की पारंपारिक भाज्या आणी मासे तुला आधीपासून च माहिती आहेत. पण या मागे एवढी मेहनत आहे हे समजल्यावर अजुन च कौतुक वाटायला लागलं तुझ्याबद्दल. तुझं पुस्तक लवकर प्रसिद्ध होवो आणि आम्हाला तुझ्या नवनवीन पाकृ मिळत राहोत...

प्रभास's picture

14 Sep 2016 - 12:32 pm | प्रभास

+१११

चंपाबाई's picture

13 Sep 2016 - 11:36 pm | चंपाबाई

छान

सपे-पुणे-३०'s picture

14 Sep 2016 - 10:45 am | सपे-पुणे-३०

अगदी सहज, सुंदर लिहिलंय.
हा छंद असाच जोपासा.... पुस्तकासाठी व ब्लॉग साठी शुभेच्छा !

सूड's picture

14 Sep 2016 - 3:17 pm | सूड

तुझ्या उकडीच्या टीपनंतर एकही मोदक आजवर थंड झाल्यावर चिवट झालेला नाही.

रुस्तम's picture

23 Sep 2016 - 8:59 pm | रुस्तम

हो टी टीप?

रुस्तम's picture

23 Sep 2016 - 8:59 pm | रुस्तम

हो टी टीप?

पिलीयन रायडर's picture

23 Sep 2016 - 9:04 pm | पिलीयन रायडर

सस्पेन्स ठेवु नका. आम्हालाही सांगा!

मी-सौरभ's picture

23 Sep 2016 - 7:04 pm | मी-सौरभ

तुमच्या पुढच्या पा कृ ला शुभेच्छा!!

संजय पाटिल's picture

24 Sep 2016 - 12:06 pm | संजय पाटिल

आता पुढचि पाक्रू कधी?

जागुताई, तुमच्या पुस्तकाचा पहिला खरेदीदार मी असेन हे निश्चित. लवकरात लवकर पुस्तक काढा आणि प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू झाली की मला कळवा.

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

प्रसाद_१९८२'s picture

24 Sep 2016 - 7:36 pm | प्रसाद_१९८२

अतिशय आवडला लेख, पुस्तकाच्या प्रतिक्षेत !

मस्तच... तुमचे लेख न विसरता वाचतो नेहमी

पुस्तकासाठी शुभेच्छा.

--टुकुल

वेदांत's picture

27 Sep 2016 - 4:44 pm | वेदांत

लेख आवड्ला. पुपाप्र.