विज्ञान लेखमाला : ०९ : किस्से वैज्ञानिकांचे..

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in लेखमाला
3 Feb 2016 - 12:04 am

|| श्री गुरवे नम: ||

किस्से वैज्ञानिकांचे..

वैज्ञानिक, संशोधक म्हटला तो वेंधळा, विसरभोळा, विक्षिप्त, absent minded अशा काही प्रतिमा आपल्या मनात तयार झालेल्या असतात. त्यांच्या वेंधळेपणाचे, विसरभोळेपणाचे – आणि हजरजबाबीपणाचेही - किस्सेही प्रचलित असतात. मात्र त्यांच्याबद्दलचे काही किस्से सांगोवांगीचे, कल्पित - त्यांच्या नावाने ‘पावती फाडलेले’ही – असू शकतात.. म्हणजे काही विनोद जसे आचार्य अत्रे, पु.ल. यांच्या नावावर खपवले जातात, तसंच. विज्ञान विशेषांकानिमित्त, विज्ञानाची हलकीफुलकी बाजू म्हणून वैज्ञानिकांचे असेच काही किस्से.

युक्लिड (ख्रि.पू. ३६५- ख्रि.पू. ३००)
गणितज्ञ, ग्रीस.

अलेक्झांड्रियाच्या प्रचंड पिरॅमिडची अचूक उंची मोजताच येणार नाही, यावर तिथल्या तमाम विद्वानांचं एकमत होत. युक्लिडने मात्र एक अगदी सोपी पद्धत वापरून हे काम करून दाखवलं. दिवसाच्या ज्या एका विशिष्ट वेळेला त्याच्या स्वत:च्या सावलीची लांबी त्याच्या स्वत:च्या उंचीएवढी भरली, त्याच वेळेला त्याने पिरॅमिडच्याही सावलीची उंची मोजली आणि सांगितलं, “सदगृहस्थहो, ही आहे पिरॅमिडची अचूक उंची.”

युक्लिड एकदा अलेक्झांड्रियाच्या राजाला - टोलेमीला - भूमितीतलं एक प्रमेय सविस्तर पद्धतीने सोडवून दाखवत होता. उतावीळ झालेल्या टोलेमीने युक्लिडला विचारलं, “भूमिती शिकण्याचा यापेक्षा एखादा सोपा मार्ग नाहीये का?” निर्भय युक्लिड उद्गारला, “महाराज, आपल्या राज्यात दोन प्रकारचे मार्ग आहेत – सर्वसामान्य नागरिकांसाठी खडतर, अवघड मार्ग आणि शाही परिवारासाठी सोपा सुखकर मार्ग. पण भूमितीमध्ये मात्र सर्वाना एकच मार्ग - खडतर मार्ग - अवलंबावा लागतो, इथे राजमार्ग नाही.”
***

जीन लुईस अगासीझ (१८०७-१८७३)
निसर्गशास्त्रज्ञ, भूगर्भशास्त्रज्ञ, मत्स्यशास्त्राचे (Ichthyologyचे) जनक. स्वित्झर्लंड.

अगासीझ यांनी ‘ब्राझीलमधील मासे’ या विषयावर वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ग्रंथ लिहिला. त्यानंतर १०००पेक्षा जास्त मस्त्यजीवाश्मांवर मूलभूत संशोधन करून तीन-चार वर्षांतच ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांच्या ग्रंथाला मिळालेलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी ते लंडनला गेले, तेव्हा त्यांच्या संशोधनाबद्दल साशंक असलेल्या काही तथाकथित ‘विद्वानां’शी त्यांचा सामना झडला. या विद्वानांनी अशा एका माशाचा जीवाश्म मिळवला होता, जो अगासीझ यांनी अभ्यासला नव्हता (त्यामुळे त्यांच्या पुस्तकातही त्याचा उल्लेख नव्हता.) अगासीझच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी या लोकांनी त्यांना “एका विशिष्ट भूप्रदेशात कशा प्रकारचा मासा आढळेल?” याचं विश्लेषण करायला सांगितलं. काही जुजबी मूलभूत मुद्दे विशद करून अगासीझ यांनी फळ्यावर त्या माशाचं एक ‘कल्पनाचित्र’ (hypothetical चित्र) रेखाटलं. त्याच्याशी तुलना करण्यासाठी जेव्हा तो खरा मस्त्यजीवाश्म आणला, तेव्हा त्या रेखाटनाशी त्याचं आश्चर्यकारक साम्य जुळत होतं.

अगासीझ यांनी एक जाहीर व्याख्यान द्यावं, यासाठी एक सद्गृहस्थ आटोकाट प्रयत्न करत होते. व्याख्यानाबद्दल त्याने भरपूर बिदागी देण्याचीही तयारी दाखवली, तेव्हा मात्र वैतागलेले अगासीझ उद्गारले, “या असल्या प्रलोभनांना मी भुलणार नाही. पैसा कमावण्यात वेळ वाया घालवणं मला परवडण्यासारखं नाही.”
***

आर्किमिडीज (इ.स.पू. २८७ - इ.स.पू. २१२).
गणितज्ञ, भौतिकशास्त्र संशोधक. ग्रीस.

आंघोळ करत असताना अचानक “युरेका, युरेका” असं ओरडत ‘तसाच’ धावत राजदरबारात गेला, एवढंच आपल्याला आर्किमिडीजबद्दल माहीत असतं. त्याने गणित, भूमिती, यंत्रशास्त्र, भौतिकशास्त्र अशा अनेक विषयांत शोध लावले. स्क्रू, तरफ, पुली अशा अगदी साध्या गोष्टींचा वापर करून रोजच्या जीवनात लागणार्‍या अनेक वस्तू बनवल्या. उदा. स्क्रूचा वापर करून त्याने नाईल नदीतून शेतीसाठी पाणी मिळवलं.

“मला अवकाशात एक जागा द्या, मी (तरफेच्या साहाय्याने) पृथ्वीला अंतराळात दूर ढकलून देईन” असं आर्किमिडीज म्हणत असे. पुलीच्या अत्यंत साध्या-सोप्या यंत्रणेचा वापर करून अतिशय जड वस्तू सहज उचलता, हलवता येईल, या आर्किमिडीजच्या म्हणण्याबद्दल सिराक्यूजचा राजा हइरोनला शंका होती. आपला दावा सिद्ध करण्यासाठी आर्किमिडीजने अनेक पुलींची गुंतागुंतीची रचना बनवली. त्यावरून फिरवलेल्या दोरखंडाचं एक टोक एका मोठ्या जहाजाला बांधलं. दुसरं टोक राजाच्या हातात देऊन ते हळूहळू ओढायला सांगितलं, आणि काय आश्चर्य.. ते अवजड जहाज पुढे सरकलं.

शत्रूची जहाजं आक्रमण करायला पुढे पुढे सरकत आहेत, अशी बातमी समजल्यावर राजा हइरोन चिंतित झाला. आर्किमिडीजने आत्मविश्वासाने सांगितलं, “मी शत्रूची जहाज जाळून हे आक्रमण थोपवू शकतो.” “कसं?” “आरश्यांच्या साहाय्याने.” हे उत्तर ऐकल्यावर, आधीच हतबल झालेल्या राजाने निराशेने मान हलवली. आर्किमिडीजने मोठ्या अंतर्वक्र आरशांच्या विशिष्ट रचना करून शत्रूच्या जहाजांना खरोखरच आगी लावून शत्रूला परतवून लावलं.
***

मॅक्स प्लँक (१८५८-१९४७).
भौतिकशास्त्रज्ञ. जर्मनी.

“मला भौतिकशास्त्रात संशोधन करायचंय” असं जेव्हा शाळकरी मॅक्स प्लँक म्हणायचा, तेव्हा तेव्हा “भौतिकशास्त्रात सगळं काही संशोधन करून झालंय. तू दुसर्‍या कशाचा तरी विचार करावास, हे उत्तम” असं म्हणून त्याचे शिक्षक त्याला परावृत्त करायचे. भौतिकशास्त्र आता परिपूर्ण शास्त्र झालंय, आणखी संशोधन करण्यासारखं काही शिल्लक उरलं नाही, आता त्यात आणखी संशोधन करायची काही गरज नाही, असा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही जणांचा समज होता.

भौतिकशास्त्राच्या (आणि आपल्या) सुदैवाने मॅक्स प्लँकने हा सल्ला मनावर न घेता त्याकडे दुर्लक्ष केलं, वयाच्या एकविसाव्या वर्षी भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आणि त्यानंतर ‘प्लँक स्थिरांक’, थर्मोडायनामिक्सचे नियम सिद्ध करून, ‘ऊर्जा ही पुंजाच्या (packets called ‘qunta’च्या) स्वरूपात असते’ ही क्रांतिकारक संकल्पना मांडली, जिच्या पायावर आधुनिक पुंजभौतिकीची (Quantum Physicsची) इमारत उभी राहिली आहे.
***

चंद्रशेखर वेंकटरमण (रामन) (१८८८-१९७०)
भौतिकशास्त्रज्ञ, भारत
भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार (१९३०) – प्रकाशाचं विकिरण (Scattering of Light).

युरोपमध्ये एका पार्टीमध्ये त्यांना मद्य घ्यायचा आग्रह झाला. दारूला स्पर्शही न करणारे रामन उद्गारले, “तुम्ही ‘अल्कोहोल’वर ‘रामन परिणाम’ पाहू शकता, पण ‘रामन’वर ‘अल्कोहोल’ परिणाम.. कदापि नाही.” रामन परिणाम हा शोध त्यांनी फक्त २०० रुपयांची साधनसामग्री वापरून सिद्ध केला होता.

त्यांची काही परखड मतं :

क्रमिक पुस्तकं : क्रमिक पुस्तकांबद्दल मला प्रकर्षाने असं वाटतं की ती वाचण्यापेक्षाही गंभीर गुन्हा कोणता असेल तर तो म्हणजे ती लिहिणं.

स्वतंत्र भारतातले मुर्दाड राजकारणी : आजकाल भारतात यशस्वी व्हायचं असेल तर एकच गोष्ट आवश्यक आहे – गांधी टोपी आणि तिच्याखाली रिकामं (डोकं).

स्वतंत्र भारत आणि वैज्ञानिक संशोधन : माझं सगळं जीवन व्यर्थ गेलंय; मला वाटायचं की आपल्या देशात मूलभूत विज्ञान संशोधनाची उभारणी करावी, पण प्रत्यक्षात मात्र पाशात्त्यांचं अंधानुकरण करणार्‍यांचा गोतावळा वाढत गेलाय.
***

निकोला टेस्ला (१८५६-१९४३)
विद्युत आणि चुंबक याविषयी संशोधन. एसी मोटर, टेस्ला कॉईल, विद्युत पारेषण यांचा जनक. अमेरिका.

अठ्ठावीस वर्षीय टेस्ला १८८४मध्ये न्यूयॉर्कला आला, तेव्हा त्याला ना नोकरी होती, ना खिशात पैसा. स्वाभिमानी असल्यामुळे परिचितांकडून कधी मदत मागितली नाही. अशा अवस्थेत फिरत असताना त्याला रस्त्यावर लोकांची लांबच लांब रांग दिसली. “कशासाठी आहे ही रांग?” “नोकरी.” “कसलं काम?” “इथून खूप लांबवर खड्डा खणायचा आहे. विजेच्या तारा की काहीतरी टाकणार आहेत म्हणे. तगड्या लोकांसाठी जाहिरात होती.” “मजुरी?” “दिवसाला दोन डॉलर.” “तसं असेल तर मी पुरेसा तगडा आहे असं म्हणायला हरकत नाही” असं म्हणून टेस्ला रांगेत उभा राहिला.

तीन-चार वर्षांतच त्याने स्वत:ची प्रयोगशाळा उभारून फिरत्या चुंबकीय क्षेत्राचा शोध लावला, ज्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर विद्युतनिर्मिती आणि पारेषण (Electricity Transmission) शक्य झालं. पूर्वी त्याने खणलेल्या खड्ड्यांतूनच विजेच्या तारा टाकल्या गेल्या.
***

लुई पाश्चर (१८२२-१८९५)
रसायनशास्त्रज्ञ, फ्रान्स.
सूक्ष्मजीवशास्त्राचा जन्मदाता, रोगप्रतिकारशास्त्राचा जनक, रोगाच्या उपचारासाठी ’लस’ शोधून काढणारा संशोधक.

पाश्चरच्या लग्नाचा दिवस. चर्चमध्ये सर्व वर्‍हाडी नवर्‍या मुलाची – पाश्चरची – वाट पाहत होते, पण पाश्चरचा पत्ताच नव्हता. तो प्रयोगशाळेत नाही तर आणखी कुठे सापडणार? असा विचार करून त्याचा मित्र प्रयोगशाळेत पोहोचला. तिथे पाश्चर एका प्रयोगात बुडून गेले होते. मित्राने विचारलं, “आज तुझं लग्न आहे हे तू विसरलास का?” पाश्चर उत्तरले, “छे, छे, अजिबात विसरलो नाहीये. पण त्यासाठी माझा प्रयोग अर्ध्यावरच सोडून येऊ की काय?”

रेबीजची लस तयार करण्यासाठी रेबीजग्रस्त कुत्र्यांची लाळ गोळा करणं आवश्यक होत. एक मोठा कुत्रा खूप आक्रमक झाला होता. शेवटी पाश्चरनी आपला जीव धोक्यात घालून त्याची लाळ गोळा करायचं काम केलं. त्यांच्या साहाय्यकांनी कुत्र्याला जखडून बांधल्यावर पाश्चर महाशयांनी काचेची शोषणनळी (पिपेट) कुत्र्याच्या जबड्याजवळ नेऊन लाळ शोषून घेतली. कुत्र्याच्या लाळेचा एक बारीकसा थेंबही आपल्या लाळेत मिसळला तर तो आपला जीव घ्यायला पुरेसा आहे, हे माहीत असूनही अत्यंत शांतपणे त्यांनी पुरेसा द्रव नळीत शोषून घेतला आणि साहाय्यकांना म्हणाले, “चला, आता आपला प्रयोग पुढे सुरू करू.”
***

जे. रॉबर्ट ओपेनहायमर (१९०४-१९६७),
भौतिकशास्त्रज्ञ, अमेरिका.
अणुबाँब प्रकल्पाचा जनक

ओपेनहायमर एकदा मेल्बा फिलिप्स या आपल्या साहाय्यिकेला फिरायला घेऊन गेले. एका ठिकाणी गाडी उभी करून ते मेल्बाला म्हणाले, “मी एक छोटीशी चक्कर मारून येतो. तू इथेच थांब.” काही मिनिटं गेली, आणखी थोडा वेळ गेला, दोन-तीन तास झाले तरी ओपेनहायमरचा पत्ताच नाही. शेवटी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले, तेव्हा ते गाढ झोपलेले आढळले. पोलिसाला पाहताच ते उद्गारले, “अरे बापरे, मेल्बा! तिला मी विसरूनच गेलो. चालता चालता घराजवळ आलो, तसा घरात शिरलो आणि झोपून गेलो.”
***

सर आयझॅक न्यूटन (१६४२-१७२७),
भौतिकशास्त्रज्ञ, ग्रेट ब्रिटन.
गतीविषयक तीन नियम, गुरुत्वाकर्षण इ. शोध, प्रकाश आणि त्यातील रंग याविषयी संशोधन. गणितज्ञ, कॅल्क्युलसचा जनक.

आपल्या प्रेयसीचा हात हातात घेऊन, तिच्या नजरेत नजर मिळवून न्यूटन महाशय हरवून गेले होते. त्याचं मन मात्र गणितातलं एक द्विपदी प्रमेय (Binomial Theorem) सोडवण्यात गढलं होतं. अशा विचारमग्न अवस्थेतच, आपला तंबाखू ओढण्याचा पाईप साफ करण्यासाठी प्रेयसीच्या हाताची करंगळी पाईपमध्ये जोरात खुपसली. ती वेदनेने कळवळली, तेव्हा कुठे न्यूटन महाशय भानावर आले आणि तिची क्षमा मागून उद्गारले, “नेहमी असंच काहीतरी घडतं माझ्या हातून.. आणि त्यामुळेच मी जन्मभर अविवाहित राहणार बहुतेक..”

न्यूटन केंब्रिजला शिकत असताना त्याच्या हाउसकीपरने एकदा विचारलं, “मी जेवणासाठी सात मासे खरेदी केलेत, तीन पेन्सला एक या भावाने. त्या विक्रेत्याला मी किती पैसे देऊ?” न्यूटनने लागलीच आपलं लॉग टेबल काढून आकडेमोड केली आणि तिला सांगितलं, “वीस आणि बावीस पेन्स यांच्या मधली रक्कम होते.” “तो माणूस एकवीस पेन्स मागतोय..” यावर न्यूटन आश्चर्याने उद्गरला, “अरेच्चा! त्याने इतक्या पटकन उत्तर शोधलं..? तो नक्कीच एक थोर गणितज्ञ असला पाहिजे!”

न्यूटनच्या मांजरींची गोष्ट तर सर्वश्रुत आहे. मांजरीला घराच्या आत-बाहेर येण्याजाण्यासाठी आपल्याला सारखं दर उघडावं लागू नये, म्हणून त्याने भिंतीत तळाशी एक भोक पाडलं. मांजरीला पिल्लं झाल्यावर, त्यांच्या सोयीसाठी मोठ्या भोकाशेजारीच आणखी एक छोटं भोक पाडलं. (खरं-खोटं न्यूटनला आणि त्या मांजरांनाच ठाऊक!)
***

अल्बर्ट आईनस्टाईन (१८७९-१९५५)
भौतिकशास्त्रज्ञ, अमेरिका. प्रकाश-विद्युतीय परिणाम, सापेक्षतावादाचा सिद्धान्त.
भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार (१९२१) – प्रकाश-विद्युतीय परिणाम (Photo Electric Effect).

विसाव्या शतकातला बहुतेक सर्वात प्रसिद्ध, ‘वलयांकित’ आणि बहुचर्चित - आणि तरीही, त्यांनी मांडलेला सापेक्षतावादाचा सिद्धान्त सर्वांना समजायला कठीण म्हणून थोडेसा गूढही - वैज्ञानिक. अत्यंत मंद विद्यार्थी म्हणून शाळेत ओळखला जायचा.

सापेक्षता म्हणजे काय, ते आईनस्टाईनने सोप्या शब्दात सांगितलंय - “एखादा माणूस सुंदर तरुणीबरोबर तासभर बसला, तरी त्याला तो एक तास म्हणजे एक मिनिटासारखा भासेल. पण तो एक मिनिटभरही तापलेल्या शेगडीवर बसला, तर ते एक मिनिटही त्याला एक तासासारखं वाटेल... हीच सापेक्षता.”

प्रकाशाचे किरणसुद्धा (काही परिस्थितीमध्ये) वाकू शकतात हे सापेक्षतावादाच्या सिद्धान्तामध्ये मांडलेलं गृहीतक १९१९ सालच्या ग्रहणाच्या निरीक्षणातून अचूक सिद्ध झालं. यावर आईनस्टाईनची बोलकी प्रतिक्रिया - “आता हा सिद्धान्त पुराव्यानिशी सिद्ध झालाय, तर जर्मनी म्हणेल की मी जर्मन आहे आणि फ्रान्स जाहीर करेल की मी जगाचा नागरिक आहे. हा सिद्धान्त चूक ठरला असता, तर फ्रान्सने मला जर्मन ठरवलं असत आणि जर्मनीने जाहीर केलं असतं की मी ज्यू आहे..”

असं म्हणतात की एकदा प्रिन्स्टन विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या ऑफिसमधला फोन खणखणला. पलीकडून विचारणा झाली, “डॉ. आईनस्टाईनच्या निवासाकडे कसं जायचं ते कृपया सांगाल का?” याला अतिशय नम्रपणे नकार देण्यात आला, कारण आईनस्टाईनना असल्या भोचक उपद्रवी लोकांकडून त्रास होऊ नये, म्हणून त्यांच्या घराचा पत्ता कुणालाही सांगायचा नाही, असं ठरलं होतं. मग पलीकडून अतिशय दबक्या आवाजात पुन्हा विनंती झाली, “कृपया कुणाला सांगू नका हं, पण मी घरी जायला निघालोय आणि घराचा रस्ताच विसरलोय.”

एका छोटुकल्या मुलीला अंकगणितात काही अडचणी होत्या. आपल्या घराजवळच एक खूप मोठे प्रसिद्ध गणितज्ञ आजोबा राहतात हे तिला कळलं. ती त्या आजोबांकडे गेली, त्या आजोबांनी तिला ती गणित सोडवायला मदत केली. घरी येऊन ती मुलगी आईला म्हणाली, “आमच्या शाळेतल्या शिक्षकांपेक्षा त्या आजोबांनी किती छान समजावून सांगितलं.” दुसरी-तिसरीतलं गणित सोडवायला आपल्या मुलीने थेट आईनस्टाईनची मदत घेतली, हे कळल्यावर त्यांची क्षमा मागायला आई आईनस्टाईनच्या घरी धावली. आईनस्टाईन तिला म्हणाले, “अहो, क्षमा कशाला मागताय? तुमची छोटुकली माझ्याकडून जेवढं शिकली असेल, त्याच्यापेक्षाही कितीतरी जास्त मी तिच्याकडून शिकलो.”
***

थॉमस अल्वा एडिसन (१८४७-१९३१)
संशोधक, अमेरिका.
१०००पेक्षा जास्त अमेरिकन पेटंट्स, अनेक शोधांचा जनक – विजेचा दिवा, चलतचित्र कॅमेरा असे अनेक शोध लावले.

भौतिकशास्त्रातली साधी सोपी मूलभूत तत्त्वं वापरून, एडिसनच्या बंगल्यामध्ये कमीत कमी श्रम-ऊर्जेवर चालणार्‍या अनेक यंत्रणा आणि सोयीसुविधा बसवल्या होत्या. पण अंगणातून घरात येताना एक फिरता दरवाजा ढकलण्यासाठी मात्र चांगलीच ताकद लावावी लागायची. एकदा एका पाहुण्यांना या सर्व सोयी दाखवताना पाहुण्यांनी उपहासाने प्रश्न विचारला, “इतक्या सगळ्या आधुनिक सुविधा, आणि हा दरवाजा मात्र अगदी जुनाट.. ढकलायला फार कष्ट पडतात..” एडिसनने उत्तर दिलं, “हा दरवाजा ढकलल्यावर प्रत्येक वेळी आमच्या गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीमध्ये आठ गॅलन पाणी चढतं.”
***

विल्हेम कॉनरॅड राँटजेन (१८४५-१९२३)
भौतिकशास्त्रज्ञ, जर्मनी.
भौतिकशास्त्रातला (पहिला) नोबेल पुरस्कार (१९०१) – क्ष-किरणांचा शोध.

राँटजेन १८९५मध्ये कॅथोड किरणांवर संशोधन करत होते. एका निर्वात नळीतून हे किरण पलीकडे जाताना त्यांना अचानक एका अनोळखी किरणाचं अस्तित्व जाणवलं. हे किरण अनेक वस्तूंच्या आरपार जाऊ शकत होते. त्यांनी त्याला नाव दिलं ‘क्ष-किरण’. ‘सेरेंडिपिटी’चं (करायला गेलो एक आणि झालं वेगळंच काहीतरी, असं) हे एक उदाहरण.

राँटजेन यांनी क्ष-किरणांचा शोध लावल्यावर त्याच्यावर आणखी प्रयोग करायला सुरुवात केली. एके दिवशी, जेवायची वेळ टळून गेली तरी ते आले नाहीत, म्हणून त्यांना बोलवायला त्यांची पत्नी प्रयोगशाळेत आली. तिने अगदी सहज – अनवधानाने – टेबलवरच्या एका फोटोग्राफिक प्लेटवर आपला हात ठेवला.. आणि नंतर राँटजेन यांना त्या प्लेटवर हाताचा (हाताच्या हाडांचा) ‘फोटो’ उमटलेला आढळला. हा जगातला पहिला एक्सरे. वैद्यकीय निदानासाठी क्ष-किरणांचा वापर करण्याच्या शोधाचं थोडंस तरी श्रेय सौ. राँटजेननाही द्यायला हवं, नाही का?
***

एनरिको फर्मी (१९०१-१९५४)
भौतिकशास्त्रज्ञ, इटली/अमेरिका
भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार (१९३८) – किरणोत्सर्ग आणि किरणोत्सारी समस्थानिकं.

१९३०मध्ये इटलीच्या राजपुत्राच्या विवाह सोहळ्याला एनरिको फर्मींना आग्रहाचं निमंत्रण होतं. मात्र फर्मींना आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करण्यात जास्त रस होता. पण एक अडचण होती – विवाहाच्या मिरवणुकीसाठी सर्व मुख्य रस्त्यांवरची वाहतूक बंद केली होती, त्यामुळे घरापासून प्रयोगशाळेपर्यंत जायचं कसं? फर्मी नेहमीप्रमाणे साध्या, मळकट, (खरं तर बेंगरूळ) कपड्यांमध्ये आपल्या छोट्या जुनाट गाडीतून निघाले. मुख्य रस्त्यावर पोलिसांनी गाडी अडवली, तेव्हा फर्मी त्यांना म्हणाले, “महाशय, मी आदरणीय फर्मीं साहेबांचा ड्रायव्हर आहे. ते प्रयोगशाळेत आहेत आणि या शाही विवाह सोहळ्यासाठी त्यांना घेऊन जायचं आहे. त्यांना घेण्यासाठी मला हा रस्ता ओलांडून पलीकडे जावं लागणार आहे, मला जाऊ देता का?” पोलिसांनी गाडीला ताबडतोब वाट करून दिली आणि फर्मी प्रयोगशाळेत पोहोचले.. उरलेला सगळा दिवस प्रयोगात गढून जाण्यासाठी.
***

श्रीनिवास रामानुजम (१८८७-१९२०)
गणितज्ञ, भारत.

अलौकिक गणिती प्रतिभेचा, पण दुर्दैवाने अत्यंत अल्पायुषी (फक्त ३३ वर्षं आयुष्य लाभलेला) असा आकड्यांचा जादूगार.

गणिताच्या शिक्षकांनी तिसरी-चौथीच्या मुलांना ‘शून्य’ शिकवताना सांगितलं, “कोणत्याही संख्येने शून्याला भागलं, तरी उत्तर शून्यच येतं.” छोट्या श्रीनिवास रामानुजमने प्रश्न विचारला, ”गुरुजी, ही कोणतीही संख्या म्हणजे शून्य असेल, तर? (शून्यानेच शून्याला भागलं, तर उत्तर शून्य येईल का?”) शिक्षकांकडे या प्रश्नाला उत्तरच नव्हतं.

आजारी असलेल्या श्रीनिवासना भेटायला प्रा. हार्डी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी सहजच म्हटलं, “श्रीनिवास, आता इथे येताना मी टॅक्सीतून आलो, तिचा क्रमांक होता १७२९. किती निरस आणि वैशिष्ट्यहीन वाटतो ना हा अंक? जणू अपशकुन करणारा..” श्रीनिवास उद्गारले, “उलट, हा अंक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. दोन घनांची दोन प्रकारे बेरीज करून मांडता येणारा हा सर्वात लहान अंक आहे –
(१ x १ x १) + (१२ x १२ x १२) = १ + १७२८ = १७२९ आणि
(९ x ९ x ९) + (१० x १० x १०) = ७२९ + १००० = १७२९.”

श्रीनिवास रामानुजम यांनी अनेक गणिती कोडी बनवली आहेत, त्यापैकी एक जादूचा चौरस सोडवू या.

*




२२
१२
१८
८७


८८
१७

२५


१०
२४
८९
१६


१९
८६
३२
११

चारही उभे स्तंभ, चारही आडव्या ओळी आणि दोन्ही कर्ण यातील अंकांची बेरीज १३९ येते. याव्यतिरिक्त, मधले चार छोटे चौरस (रख+रग+लख+लग), चारही टोकांचे चौरस (यक+यघ+वक+वघ) आणि मोठ्या चौरसाचे एक चतुर्थांश (चार छोट्या चौरसांनी बनलेले) चौरस (१. यक+यख+रक+रख, २. लक+लख+वक+वख, ३. यग+यघ+रग+रघ, ४. यग+लघ+वग+वघ) यातीलही अंकांची बेरीज १३९ येते.
आणि शेवटी – सर्वात पहिल्या ओळीतले अंक – २२-१२-१८८७ म्हणजे २२ डिसेंबर १८८७ ही त्यांची जन्मतारीख!

संदर्भ : अनेक संकेतस्थळं
Of Science and Scientists, National Book Trust, India.

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

3 Feb 2016 - 12:04 am | उगा काहितरीच

छान लेख. रच्याकने श्री भालबा केळकर यांचे "सापडले रे सापडले" हे अगदी छोटे पुस्तक लहानपणी कुणीतरी भेट म्हणून दिले होते त्यात अगदी सुटसुटीतपणे अशा बऱ्याचशा शास्त्रज्ञांविषयी माहीती होती.

लालगरूड's picture

3 Feb 2016 - 12:08 am | लालगरूड

रोचक माहिती

संदीप डांगे's picture

3 Feb 2016 - 12:11 am | संदीप डांगे

रंजक... :-)

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2016 - 12:23 am | डॉ सुहास म्हात्रे

खूप रंजक माहिती !

आदूबाळ's picture

3 Feb 2016 - 3:04 am | आदूबाळ

भारी!

चाणक्य's picture

3 Feb 2016 - 8:07 am | चाणक्य

+१

नाखु's picture

3 Feb 2016 - 8:28 am | नाखु

अदभुत माहीती.

प्रचेतस's picture

3 Feb 2016 - 9:06 am | प्रचेतस

मस्त किस्से.

यशोधरा's picture

3 Feb 2016 - 10:16 am | यशोधरा

आवडले किस्से!

श्रीरंग_जोशी's picture

3 Feb 2016 - 10:20 am | श्रीरंग_जोशी

सर्वच किस्से एकाहून एक आहेत.

गवि's picture

3 Feb 2016 - 10:54 am | गवि

मस्त आहेत किस्से.

मन१'s picture

3 Feb 2016 - 11:06 am | मन१

मस्तय.
.
.
आइनस्टाइअन्चे माझे काही आवडते किस्से :-

One day during a speaking tour, Albert Einstein’s driver, who often sat at the back of the hall during his lectures, remarked that he could probably give the lecture himself, having heard it so many times. Sure enough, at the next stop on the tour, Einstein and the driver switched places, with Einstein sitting at the back in his driver’s uniform.

Having delivered a flawless lecture, the driver was asked a difficult question by a member of the audience. “Well, the answer to that question is quite simple,” he casually replied. “I bet my driver, sitting up at the back there, could answer it!”
.
.
Albert Einstein’s wife often suggested that he dress more professionally when he headed off to work. “Why should I?” he would invariably argue. “Everyone knows me there.” When the time came for Einstein to attend his first major conference, she begged him to dress up a bit “Why should I?” said Einstein. “No one knows me there!”
.
.
.
Einstein was once traveling from Princeton on a train when the conductor came down the aisle, punching the tickets of every passenger. When he came to Einstein, Einstein reached in his vest pocket. He couldn’t find his ticket, so he reached in his trouser pockets. It wasn’t there, so he looked in his briefcase but couldn’t find it. Then he looked in the seat beside him. He still couldn’t find it.

The conductor said, ‘Dr. Einstein, I know who you are. We all know who you are. I’m sure you bought a ticket. Don’t worry about it.’

Einstein nodded appreciatively. The conductor continued down the aisle punching tickets. As he was ready to move to the next car, he turned around and saw the great physicist down on his hands and knees looking under his seat for his ticket.

The conductor rushed back and said, ‘Dr. Einstein, Dr. Einstein, don’t worry, I know who you are. No problem. You don’t need a ticket. I’m sure you bought one.’

Einstein looked at him and said, ‘Young man, I too, know who I am. What I don’t know is where I’m going.’
.
.
.
हे किस्से http://artoflivingsblog.com/albert-einstein-real-life-stories/ ह्या सायटीवरुन उचललेत.

सुधांशुनूलकर's picture

3 Feb 2016 - 12:37 pm | सुधांशुनूलकर

तुम्ही दुवा दिलेली ही वेबसाइट यापूर्वी माहीत नव्हती, पहिल्यांदाच समजते आहे. त्यासाठी धन्यवाद.

शान्तिप्रिय's picture

3 Feb 2016 - 11:15 am | शान्तिप्रिय

आवडले किश्शांचे संकलन.
मस्त माहिति बद्दल धन्यवाद.

सुहास झेले's picture

3 Feb 2016 - 11:58 am | सुहास झेले

वाह मस्तच... आवडले किस्से :)

पैसा's picture

3 Feb 2016 - 12:06 pm | पैसा

एकापेक्षा एक झकास किस्से! यातून या मोठमोठ्या वैज्ञानिकांची साधी माणसे म्हणून बाजू दिसते ते फार आवडले!

Maharani's picture

3 Feb 2016 - 11:20 pm | Maharani

+१

पद्मावति's picture

3 Feb 2016 - 2:35 pm | पद्मावति

:) छान किस्से. आवडले.

अजया's picture

3 Feb 2016 - 3:50 pm | अजया

मस्तच किस्से.

एस's picture

4 Feb 2016 - 12:49 am | एस

आपल्या डॉ. जयंतराव नारळीकरांचेही काही किस्से छान आहेत. ते पदवीच्या अभ्यासक्रमात ४०० पैकी ३९९ गुण मिळवून पहिले आले होते. केंब्रिज विद्यापीठाबद्दल त्यांची आत्मीयता त्यांच्या लेखनातून बर्‍याचदा व्यक्त होत असते.

एकदा त्यांना त्यांच्या पत्नीने आव्हान दिले की तुम्हांला स्वयंपाकातले काय कळते. जयंतरावांनी पुढच्या रविवारी फक्कडपैकी बिर्याणी बनवून घरच्यांना थक्क केले! :-)

(वरील किश्श्यावरूनच आम्हांलाही असेच च्यालेंज दिले गेले होते. पण अस्मादिकांनी बनवलेली कोशिंबिर पाहून 'च्यक्क्! च्यक्क्!' असे उद्गार तेव्हढे निघाले! ते एक असो. ;-) )

एक एकटा एकटाच's picture

4 Feb 2016 - 8:51 am | एक एकटा एकटाच

ह्या ह्या ह्या

एक एकटा एकटाच's picture

4 Feb 2016 - 8:51 am | एक एकटा एकटाच

लेख एकदम मस्त होता.

vikramaditya's picture

4 Feb 2016 - 11:29 am | vikramaditya

Great fun to read...

नया है वह's picture

5 Feb 2016 - 12:33 pm | नया है वह

लेख एकदम मस्त

जव्हेरगंज's picture

5 Feb 2016 - 9:54 pm | जव्हेरगंज

मस्त

हेमंत लाटकर's picture

6 Feb 2016 - 9:19 pm | हेमंत लाटकर

सर्व किस्से छान.