मुक्ता

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in दिवाळी अंक
25 Oct 2015 - 11:23 am

.
.
मी मुक्ता चित्रे. सर्वसाधारण मुली असतात, तशीच मीसुद्धा एक. शाळेत बर्‍यापैकी हुशार होते. आमचे आई-वडील दोघेही तालुक्याच्या गावी शाळेत शिक्षक होते. वडील मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले आणि आई पर्यवेक्षिका म्हणून. आम्ही श्रीमंत नसलो, तरीही कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. स्वतःचे तीन खोल्यांचे घर आहे. आईवडिलांनी कधी फाजील लाड केले नाहीत, परंतु काही कमीही पडू दिले नाही. वडिलांचे म्हणणे शिस्तीच्या वेळी शिस्त पाहिजे आणि अभ्यास वेळच्या वेळी झालाच पाहिजे. पण खेळायला जातानाही त्यांनी कधी आडकाठी केली नाही. मुली म्हणून जास्त बंधनेही नव्हती. एकूण काय, बालपण सुखातच गेले.

आम्ही दोघी बहिणी. माझी ताई जरा जास्त जिद्दी होती. पहिला-दुसरा नंबर कधी सोडला नाही तिने. स्वतःच्या गुणवत्तेवर इंजीनियरिंगला प्रवेश मिळवला. त्यानंतर शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेत पुढे शिकायला गेली. तिथेच तिने प्रेमविवाह केला. मुलगासुद्धा चांगला मराठीच आणि इंजीनियरच होता. आम्ही प्रभू (म्हणजे सी.के.पी.) आणि मुलगा ९६ कुळी मराठा. पण आमच्या आईवडिलांनी अजिबात खळखळ न करता संमती दिली.

तिच्या मानाने मी सुखवस्तू (आळशीच म्हणा ना). शेंडेफळ म्हणून थोडी लाडकीच. अगदी पहिला-दुसरा नसला, तरीही पहिल्या दहाच्या आत नंबर असायचा. आई बाबांना म्हणत असे की धाकटी म्हणून तुम्ही तिला जरा लाडावून ठेवले आहे. नीट अभ्यास केला तर ती पहिलीसुद्धा येईल. पण इतके कष्ट करावे हे मुळी माझ्या स्वभावातच नाही. तशी मी ताईच्या मानाने रूपाने उजवी. म्हणजे ताई सुंदरच आहे, चांगली गोरीपान, उंच इ. पण मी तसूभर जास्त सुंदर. बाबा म्हणत, "मुक्ता, बाळ, सुंदर असल्याने नवरा चांगला मिळेलच. परंतु स्वतःची एक ओळख तयार करणं आवश्यक आहे. केवळ कुणाची बायको म्हणून किती दिवस राहणार?" मी काही फार मनावर घेत नसे.

मी आपली आमच्याच शहरात बी.ए. झाले. त्यानंतर मात्र आपण काही तरी करावे असे वाटू लागले. कारण वर्गातील बर्‍याचशा मुलींचे विचार नट्टापट्टा, फॅशन, नवरा, लग्न या पलीकडे जातच नसत. त्या मुली मलासुद्धा म्हणत, "मुक्ते, तुझं काय, बरं आहे. कोणीतरी राजबिंडा तरुण येईल आणि तुला घेऊन जाईल." कुठेतरी मला ते आवडत होते पण खटकतही होते. केवळ कुणाची तरी बायको होऊन राहणे ही मला आयुष्याची इतिकर्तव्यता वाटत नव्हती. मग मी जरा जोर लावला आणि CAT दिली. पुण्यात येऊन एका प्रथितयश संस्थेत एम.बी.ए. केले आणि कॅम्पसमध्येच एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. वर्षभराने तिथेच एक गृहप्रकल्प होत होता, त्यात घर बुक करा असा ताईच्या सासरच्या एका नातेवाइकाने मला आग्रह केला. एकंदर चार लोकांचा सल्ला घेतला. बाबांनाही विचारले. त्यांनी संमती दिली आणि म्हणाले, "हे बघ, तुझं लग्न करून देणं ही माझी जबाबदारी आहे. तेव्हा लग्नासाठी पैसे साठवायची गरज नाही. ती तरतूद मी केलेली आहे. माणसं चांगली आहेत, तेव्हा नि:शंकपणे पैसे गुंतव. पुढे-मागे संसारात कामाला येतील." अशा रीतीने छोटेसे का होईना, पण एक घर माझ्या नावावर बुक झाले. कंपनीच्या पगारपत्रकामुळे कर्ज मिळून मासिक हप्ताही सुरू झाला.

मोठी मुलगी लग्न होऊन अमेरिकेत, धाकटीला चांगल्या पगाराची नोकरी, तिचे घरही होण्याच्या मार्गावर होते. ते सर्व पाहून आईबाबांना कृतकृत्य वाटत होते. आईची भुणभुण चालू झाली. "अहो, आता मुक्तेचंही बघायला हवंय. किती दिवस अशी दुसर्‍या शहरात एकटी ठेवणार तिला?" बाबांनी मला विचारले, "काय मुक्ते, आता तुझंही बघायचं का?" मी "नाही" म्हणाले. तेव्हा त्यांनी जवळ घेऊन विचारले की "तू कुणी बघितला आहेस का?" मी "नाही" म्हणाले, तेव्हा ते परत म्हणाले, "मग नक्की कारण काय?" मी गुळमुळीत उत्तर देऊ लागले, तेव्हा ते म्हणाले, "हे बघ मुक्ता, तुला लग्नच करायचं नसेल, तर गोष्ट वेगळी आहे. पण जर करायचं असेल, तर वेळेत कर. कारण आज रूप आहे, उद्या ते उताराला लागलं तर तुला जास्त तडजोड करावी लागेल." मग काय, वरसंशोधन मोहीम जोरात सुरू झाली आणि दोन महिन्यातच सुजीत कर्णिकबरोबर लग्न ठरलेसुद्धा. तोही एका मोठ्या कंपनीत अधिकार्‍याच्या हुद्द्यावर होता. आईवडिलांचा एकुलता एक. दोन बेडरूमचा फ्लॅट होता. गावाला वडिलांचे मोठे घर होते. आईवडील आणि तो एकत्रच राहत होते. महत्त्वाचे म्हणजे माझ्या नोकरीच्या शहरातच त्याचे घर आणि नोकरी होती. शिवाय माझ्या नोकरी करण्याबाबत त्याच्या आईवडिलांची कोणतीच आडकाठी नव्हती. म्हणजे मला नोकरीसुद्धा चालू ठेवता येणार होती आणि त्याच्या आई घरीच होत्या, त्यामुळे मागचे-पुढचे सगळेच माझ्या गळ्यात येणार नव्हते.

लग्न ठरले, साखरपुडा झाला आणि आमची फिरायची मोकळीक झाली. लग्नाला तीन महिने होते. आमच्या घरी जरी दुसरे लग्न होते, तरीही त्यांचे पहिलेच (आणि शेवटचे) कार्य होते. त्यामुळे त्याचे आईवडील अतिशय हौसेने सगळ्या गोष्टी करीत होते. त्याच्या आई साड्या, दागिने सर्व काही माझ्या मनाप्रमाणे निवडत होत्या. लग्न अगदी थाटात साजरे झाले. आईबाबांनीसुद्धा हौसेने खर्च केला.

लग्नानंतर मी सासरी राहायला आले. स्वतःच्या हक्काच्या घरी. सासूबाईंनाही फार कौतुक होते. सकाळचा स्वयंपाक त्या करत आणि संध्याकाळचा मी करत होते. बाकी पुढचे-मागचे सर्व त्याच बघत असत. सासरेसुद्धा निवृत्त होते. त्यामुळे घरचे फारसे सुजीतलासुद्धा पाहायला लागत नसे. आम्ही दोघे भरपूर बाहेर भटकत असू. घराचा हप्ता आणि मी केलेली काही SIP गुंतवणूक सोडली, तर येणारा बाकीचा सर्व पगार माझ्या बँकेत पडत असे. दुसर्‍याच महिन्यात मी सासूबाईंना माझ्या पगाराचा चेक हातात दिला. त्याही मोठेपणाने म्हणाल्या, "मुक्ता, आम्हाला पैशाची कमतरता नाही. सुजीत भरपूर पैसे मिळवतो आहे, तर तू आपला पगार पूर्वीसारखा बँकेत टाक."

असे दिवस आनंदाचे चालले होते, तोच मला पोटात गडबड जाणवायला लागली. अर्थात ही आनंदाचीच बातमी होती. मला कडक डोहाळे लागले. पण दोन्हीकडे एकदम उत्साहाचे वातावरण पसरले. सुजीतला तर काय, मला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते.

यथावकाश माझी प्रसूती होऊन मला एक कन्यारत्न झाले. आमच्या कुटुंबात आनंदाला पारावर राहिला नाही. कारण ताईला मुलगा होता, त्यामुळे मला मुलगी हवी असे बाबांना वाटत होते. आणि कर्णिकांना तर काय, मुलगी झाल्यामुळे अस्मान ठेंगणेच वाटू लागले. तिचे नाव 'सानिका' ठेवले. सानिकाच्या बाललीलांनी घर म्हणजे स्वर्गच झाला होता. पाहता पाहता ती दोन वर्षांची झाली.

आताशा सुजीतला अधूनमधून पाठदुखीचा त्रास व्हायला लागला होता. पाठीचा एक्स रे काढला, हाडाच्या डॉक्टरला दाखवून झाले. पण मधूनमधून पाठदुखी परत उद्भवू लागली. एके दिवशी सकाळी सुजीत उठला आणि मला म्हणाला, "मुक्ता, मला पायच हलवता येत नाहीये." मी अगोदर थट्टेवारी नेले, परंतु त्याला उठताच येईना. आता मात्र मी घाबरले. घरचे सगळे काळजीत पडले. आमच्या डॉक्टरांना घरी बोलावले. ते म्हणाले, "सुजीतला रुग्णालयात हलवू." रुग्णालयात नेले, तेथील डॉक्टरांनी तपासून पाहिले आणि एम.आर.आय. काढायला सांगितला. त्याचा अहवाल संध्याकाळी आला, तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. सुजीतच्या मज्जारज्जू (SPINAL CORD)मध्ये एक ट्युमर होता आणि तो पूर्ण मज्जारज्जूला वेढून टाकत होता. आम्ही ताबडतोब मेंदूविकारतज्ज्ञांना दाखवायचे ठरवले. त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, "हा तुरळक प्रमाणात आढळणारा ट्युमर आहे आणि याची लवकरात लवकर शल्यक्रिया करणं आवश्यक आहे. अशी शल्यक्रिया मुंबई-पुण्यातच होऊ शकेल."

आम्ही अर्थात वेळ न घालवता मुंबईच्या प्रथितयश रुग्णालयात त्याला दाखल केले. तेथे त्याची शल्यक्रिया झाली आणि तो ट्युमर बराचसा काढण्यात डॉक्टरांना यशही आले. परंतु सुजीतच्या पायातील शक्ती काही परत आली नाही. मधल्या काळात मी त्याचे सर्व अहवाल ताईकडे अमेरिकेत पाठवले होते. तेथे तिने ते मणक्याच्या विकाराच्या एका प्रख्यात तज्ज्ञांना दाखवले आणि त्यांचे मत घेतले. त्यांनी नेमके असे काही सांगितले नाही, परंतु रुग्ण पाहिल्यावर काय ते नक्की सांगता येईल असे सांगितले. दोन महिने फिजियोथेरपी घेऊनही फारसा फरक पडला नाही. सुजीतच्या कंपनीने उपचाराचा सर्व खर्च दिला, परंतु आता तुम्हाला मार्केटिंगचा जॉब करता येणार नाही, तेव्हा तुम्ही स्वतःहून राजीनामा द्या असे सुजीतला सांगितले. सुजीतला अतिशय संताप आला. तो म्हणाला, "मी कंपनीसाठी एवढी मरमर करून तिला ऊर्जितावस्थेत आणलं आणि आता माझी परिस्थिती जरा नाजूक आहे, तर त्यांना काही घेणंदेणं नाही. मी उपचार करून परत आपल्या पायावर उभा राहून आलो असतो आणि सगळं नुकसान भरून दिलं असतं." पण कंपनी काहीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. तिरीमिरीत सुजीतने आपला राजीनामा पाठवून दिला. तो त्यांनी लगेच मंजूरही करून टाकला.

आमच्या इतक्या गोजिरवाण्या संसाराला कुणाची दृष्ट लागली, तेच मला कळत नव्हते. मी काय कुणाचे वाईट केलं होते? सुटी घेऊन मलाही दोन महिने झाले होते, तेव्हा कामावर जाणे आवश्यक होते. मी कामावर रुजू झाले होते. पण माझ्या लाडक्या सुजीतला पायावर उभे करायचेच, यासाठी मी कंबर कसली होती. म्हणून मी सुजीत आणि सासू-सासर्‍यांना अमेरिकेत जाण्याविषयी सुचवले. तू काय करशील त्याला आमची संमती आहे असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे मी माझ्या कंपनीच्या मुख्य अधिकार्‍यांना भेटले आणि त्यांना माझी अडचण सांगितली आणि त्यांच्याजवळ दोन महिने बिनपगारी रजा मागितली. त्यांनीही अतिशय उदार मनाने मला ती मंजूर केली. मधल्या काळात मी व्हिसाच्या आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्या. अमेरिकेत जायचे आमच्या तिघांचे तिकीट काढले. आम्ही ताईकडेच राहत होतो. त्या डॉक्टरांनी सुजीतला तपासले. तेथे परत त्याचा एम.आर.आय. काढला, त्यात त्या ट्युमरचा काही भाग राहून गेल्याचे आढळले. त्या डॉक्टरांनी परत शल्यक्रिया करण्यासाठी सुचवले. फक्त त्यांनी यामध्ये यशाची फक्त ५०% खात्री आहे असे सांगितले. आम्ही १ टक्का जरी शक्यता असेल तरी तसे करण्याची तयारी दाखवली.

सुजीतची शल्यक्रिया झाली. परंतु त्या डॉक्टरांनी आम्हाला धक्का दिला. ते म्हणाले, "प्रत्यक्ष शल्यक्रिया करीत असताना तो उरलेला ट्युमर काढणं शक्य नाही असं आढळलं. मुंबईच्या डॉक्टरांनी केलेल्या शल्यक्रियेत आम्ही फारशी सुधारणा करू शकलो नाही" अशी त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. चार दिवसांनी सुजीतला रुग्णालयातून सुटी मिळाल्यावर आम्हाला त्याच्या परिस्थितीत फारशी सुधारणा आढळली नाही.

आता काय? तेथे राहणे काहीच उपयोगाचे नव्हते. खर्च तर अफाट झाला होता. ६०-७० हजार डॉलर्स इतका प्रचंड खर्च करून वाईट म्हणजे काहीही फायदा झाला नव्हता. असलेली सर्व शिल्लक संपून गेली होती. अत्यंत निराश मनाने आम्ही भारतात परत आलो.

इथे घरी आलो. आता मला माझ्या नोकरीवर परत रुजू होणे भाग होते. त्यामुळे मी कामावर जायला सुरुवात केली. त्याबरोबर कुणी काय कुणी काय उपाय सांगितले ते सर्व चालू होते. आयुर्वेदिक, होमियोपाथी, सिद्ध, तिबेटी औषधे सर्व करून झाले. सासूबाईंनी अंगारे धुपारेसुद्धा करून पाहिले. कशाचाही काहीही उपयोग झाला नाही.

सुजीत अतिशय चिडचिडा झाला होता. आपल्याला परत उठून चालता येईल ही आशा जशी जशी मावळत चालली, तसतसा तो अधिकच अस्वस्थ होत होता. त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. दिवसभर काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे येत होता. मला तर नोकरी करणे आवश्यकच होते. मी अशा नैराश्याच्या क्षणातसुद्धा कितीही झाले तरी चेहरा प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न ठेवत होते. त्याचे मित्र मध्येमध्ये येत, गप्पा मारून जात असत. पण सुजीतच्या चिडचिड्या स्वभावामुळे त्यांचेही घरी येणे कमी झाले होते. एक दिवस जहाजावरील त्याचा एक मित्र आला होता. तो तीन महिने सुटीवर आला होता. त्यालाही करायला काहीच नव्हते. तो आपल्या एका मित्राला घेऊन ब्रिज खेळायला आला. ते तिघे आणि आमचे सासरे चौथे, असे चौघे पत्ते खेळत बसले. कामावर जाताना सुजीतचा चेहरा बर्‍याच दिवसांनी असा हसरा पाहून मलाही छान वाटले. पुढचे तीन-चार दिवस मी निघण्याच्या वेळेस ते मित्र रोज घरी येत असत. सुजीतचे मन रमेल असे काहीतरी होत आहे, याचे मला समाधान वाटले.

त्याच्यासाठी मी एक चांगली व्हील चेअर आणली, त्या दिवशी त्याने आकांडतांडव केले. "मी काय कायमचा पांगळा झालो आहे का? मी बरा व्हावा अशी तुझी इछाच नाही." मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी रात्री त्याचे डोके कुशीत घेऊन त्याला समजावले की "अरे, तू बरा होतोच आहेस, पण तोवर तुझे काम अडू नये म्हणून ही आणली आहे. पायात प्लास्टर घातलेला माणूस जसा थोड्या काळासाठी काठी किंवा वॉकर घेतो, तसेच हे आहे." काही वेळेस मोठी माणसेसुद्धा लहान माणसांसारखी हट्टीपणे वागतात

मी मधल्या काळात त्याच्यासाठी घरूनच काही काम करण्यासारखे आहे का याचा शोध चालू केला. परंतु छोट्या शहरात असे फारसे काही काम मिळत नव्हते. माझा शोध चालूच होता.

साधारण एक आठवड्याने मी कामावरून लवकर घरी आले, तेव्हा ते सर्व मित्र खेळत होते आणि खोलीत धूर भरलेला होता. समोर बियरचे ग्लास भरलेले होते. सुजीत सिगारेट ओढत असे ते मला माहीत नव्हते. बियर पीत असे ते माहीत होते. मी याबद्दल त्याला रात्री विचारले, तेव्हा तो म्हणाला, "लग्नाआधी कधीतरी ओढत असे." मी नंतर काहीच बोलले नाही. काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की हे टोळभैरव रोजच तिथे अड्डा जमवू लागले होते. मी सुजीतला विचारले की हे रोज रोज काय चालवले आहे? त्यावर तो खेकसला की माझा जर तरी वेळ जातो आहे, त्यावरही तुझा डोळा आहे का?

काही दिवसांनी मी त्याला फोनवरून सल्ला देण्याचे काम घेऊन आले, तर त्यावर त्याने आवाज चढवला आणि म्हणाला, "मी काय आता कॉल सेंटरचे हलके काम करू काय?" मी त्याला म्हणाले, "हे काय लोकांना फोन करायचे काम नसून व्यवस्थापनाचे काम आहे." नंतर मी त्याच्यासाठी व्यवस्थापन विषयाच्या पुस्तकांच्या लेखनाचे (content writingचे) काम आणले, त्यावर तो परत खेकसला की मी आता काय नवनीतसारखे गाईड लिहू म्हणतेस काय?

मी एकीकडे त्याला स्वतःच्या पायावर उभे करायचा प्रयत्न करीत होते, तर त्याचे उलटे कांगावे सुरू झाले होते. दोन दिवसांनी मी बँकेत गेले, तेव्हा माझ्या खात्यावरील १० हजार रुपये काढलेले आढळले. मी बँकेत विचारले, तेव्हा त्या कर्मचार्‍याने सांगितले की साहेबांचा माणूस चेक घेऊन आला होता, मी त्याला पैसे दिले. मी काही न बोलता घरी आले आणि सुजीतला विचारले. त्याने परत मलाच उलटे विचारले की "पैसे काढले तर काय झाले? आपला जॉइंट अकाउंट आहे ना?" मी त्याला विचारले, "पैसे काढल्याबद्दल माझे म्हणणे नाही. निदान मला सांगायचे तरी.." त्याचा आरडाओरडा चालू झाला की आता मी अपंग झालो आहे, म्हणून मला प्रत्येक गोष्ट तुला विचारून करावी लागेल का? माझा काहीच अधिकार नाही का? मी परत गप्प बसले. मी सासू-सासर्‍यांना विचारले की सुजीत असा काय वागतो आहे? त्यावर त्यांनी "तो असा परावलंबी झाला आहे म्हणून चिडचिडा झाला आहे, तू त्याला समजून घे" असा मला सल्ला दिला. असाच प्रकार आणखी दोनदा झाला, तेव्हा मी त्याला विचारले की तुला पैसे कशासाठी लागतात? त्यावर त्याचा आरडाओरडा सुरू झाला. "तू गृहिणी असतीस आणि पैसे घेतले असतेस, तर तो तुझा अधिकार झाला असता आणि आता मी काम करीत नाही म्हणून तू मला घालून पाडून बोलते आहेस." मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत होते की पैसे आपल्या सानिकाच्या भविष्यासाठी जमा करणे आवश्यक आहेत. मी काही चैनीसाठी वापरत नाही. त्यावर त्याचा आक्रस्ताळेपण चालू झाला. मी परत गप्प बसले. घरात बसून बियर पिणे आणि सिगारेट पिणेही वाढले होते. मी सासू-सासर्‍यांना विचारले, तर ते म्हणाले, "त्याचा वेळ आनंदात जातो आहे, तर तू त्यात मिठाचा खडा का टाकते आहेस?" त्याचा चिडचिडेपणा वाढला होता. तेही ठीक होते, पण सासू-सासरे प्रत्येक वेळेस त्याचीच बाजू घेत का होते, हे मला समजत नव्हते. काळ हे कित्येक रोगांवर औषध आहे या उक्तीप्रमाणे मी गप्प बसायचे ठरवले.

सुजीतसाठी काही काम आणायचे आणि त्याने त्यात काहीतरी खोडी काढून ते नाकारायचे, हेही चालू होतेच. मुळात घरी बसून काय करता येईल तेही मला माहीत नव्हते. पण चार ठिकाणी बोलले की काहीतरी मार्ग निघतो या विचाराने मी ते करत होते.

स्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली होती. एके दिवशी आमच्या ऑफिसमध्ये परदेशी तंत्रज्ञ आणि व्यवस्थापनाची मोठी माणसे येणार होती, म्हणून मी चांगली साडी नेसून तयार झाले, तर सुजितने विचारले, "आज काय विशेष?" मी त्याला सर्व सांगितले, तर तो म्हणाला, "कुणीतरी बाहेरचे येतात, तर तुला एवढे नटण्यामुरडण्याची गरज काय आहे?" मी चमकून त्याच्याकडे पाहिले. तो पाठ फिरवून व्हील चेअर घेऊन गेला. जरी माझे काम मी चोखपणे केलेले होते, तरी पूर्ण समारंभात माझे लक्ष लागले नव्हते. संध्याकाळी परत आल्यावर सुजीतने माझ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, काय झाले आहे? त्याने माझ्याकडे दुर्लक्षच केले. मी आपली सानिकाशी सर्व बोलत होते. तिला आई फक्त संध्याकाळी भेटे. त्यामुळे तिला वेळ देणेही आवश्यक होते.

चार दिवसांनी कंपनीत पगारवाढ देण्याचा समारंभ होता. मी चांगली साडी नेसून मॅचिंग टिकली, लिपस्टिक वगैरे लावून तयार झाले. तुमची अशी तयारी झाली की तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटत असते, तसे मला उत्साही वाटत होते. मला थोडा वेळ होता, म्हणून मी सुजीतला म्हणाले, "आपण छानपैकी कॉफी पिऊ या" तर तो छद्मीपणाने म्हणाला, "आज कुणाला इम्प्रेस करायला चालली आहेस?" मी त्याला विचारले, "कुणाला इम्प्रेस करणार? ज्यांना पगारवाढ आणि बढती द्यायची आहे, त्यांचे प्रसन्न मनाने अभिनंदन करणे यात कुणाला इम्प्रेस करायची काय गरज आहे?"

त्यावर तो म्हणाला, "ज्याला इम्प्रेस करायचे, तो म्हणजे मी तर घरीच आहे. मग एवढे नटून थटून जायची काय गरज आहे?" मी त्याला म्हणाले, "मी जरा नीटनेटके राहिले तर त्यात काय वाईट आहे?" तो त्यावर काहीही बोलला नाही. मी त्याला म्हणाले की मी आता जाते. परत आल्यावर आपण बोलू.

समारंभ ठीक झाला. रात्री मी घरी परत आले, तर त्याचे तोंड फुगलेले होते. मी त्याच्याजवळ येउन समारंभ कसा झाला ते सांगू लागले, त्याकडे त्याचे लक्षच नव्हते. तो मध्येच एकदम म्हणाला, "कोणी देखणं दिसलं की नाही?" मी चपापून म्हणाले, "म्हणजे काय?" त्यावर तो म्हणाला की "आता मी तुझ्या काही कामाचा राहिलो नाही, मग तू दुसरा शोधणारच." मला एक मिनिट काही समजलेच नाही. आणि दुसर्‍या क्षणी मला संतापाने रडूच आले. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की कमरेखाली लुळा पडलो म्हणजे मी तुला आता शारीरिक सुख द्यायला असमर्थ आहे. तेव्हा तू दुसरीकडे ते शोधते आहेस. माझा रडण्याचा उमाळा आवरला, तेव्हा मी त्याला म्हणाले, "तू मला काय छिनाल समजतोस का? आपल्या एवढ्या वर्षाचा संसार असून तू मला ओळखलेसच नाहीस." मी संतापाने खोलीच्या बाहेर निघून गेले.

मी व्यवस्थित तयार होऊन कामावर जाते याचा असा घृणास्पद अर्थ त्याने काढावा याचा मला संताप आला होता. अरे, माझ्यावर इतका अविश्वास दाखवतोस, माझी हीच किंमत केलीस तू? प्रत्यक्षात नव्हेच, पण स्वप्नातही मी परपुरुषाचा विचारही केला नव्हता. शरीरसुख ही एकच गोष्ट असते का स्त्रीच्या आयुष्यात? आपल्या इतक्या वर्षांच्या सहवासाचा, विश्वासाचा असा नायनाट केलास तू? मी जर अशी लुळी पडले असते, तर तू बाहेर गेला असतास का? विचार करून करून माझे डोके बधिर झाले. माझ्या डोक्यात घणाचे घाव पडू लागले. रात्रभर मी बाहेर सोफ्यावर बसून होते. केव्हातरी झोप लागली. सकाळ झाली ती भकासच होती. तोडदेखल्या तो मला सॉरी म्हणाला. पण ते माझ्या डोक्यापर्यंत पोहोचलेच नाही. मी यांत्रिकपणे घरातील कामे उरकली आणि कामावर गेले. संध्याकाळी परत आले, तर सुजीतला काही खंत-खेद वाटत नव्हता. कालच्या त्याच्या एका वक्तव्यामुळे आमचा संसार आता मला फोल वाटू लागला.

असेच काही दिवस गेले. मी आपली सानिकासाठी हसून खेळून राहण्याचे नाटक करत होते. सासूबाईंनी विचारले, "काय झाले?" त्यावर मी ही हकीकत सांगितली. त्यावर त्या म्हणाल्या, "अगं, त्याला पसंत नसेल तर तू आपली साधीच राहात जा." मी अवाकच झाले. मी त्यांना सरळ विचारले की "तुम्ही आता तुमच्यात तसं काही नसूनही नटून थटून समारंभाला कशा जाता?" त्यावर त्यांचे म्हणणे - आमच्या ह्यांना चालते. म्हणजे मी एक व्यक्ती म्हणून त्यांच्या लेखी कुणी नव्हतेच. मी फक्त सुजीतची बायको होते आणि तो म्हणेल तसे राहायचे आणि तो म्हणेल तसे वागायचे. मला शिसारी आली की एक स्त्री म्हणून त्या माझ्या बाजूला असतील. मग एक मनात विचार आला की सुजीत आणि सासू-सासरे दिवसभर घरी असतात. त्यांनी काय यांचे कान भरले असतील कुणास ठाऊक? पुढे काही दिवस आमच्यात बराच वाद झाला. आश्चर्य म्हणजे सासू काय, सासरेसुद्धा सुजीतचीच बाजू घेऊन बोलत होते. शक्य असेल तेव्हा, सानिका नसेल तेव्हा किंवा ती झोपली आहे हे पाहून मी हा विषय काढत असे.

एका मोठ्या आस्थापनात मी मोठ्या पदावर काम करीत होते, हे सगळे मला विफल वाटू लागले. एकदा-दोनदा माझ्या मनात आत्महत्येचा विचारही आला. परंतु सानिकाचा विचार मनात आला, तेव्हा मला फार लाज वाटली. बाप शरीरापेक्षा मनाने पांगळा झालेला आणि आईने आत्महत्या केली, तर तिच्या आयुष्याची वाताहतच होईल. त्यामुळे ते विचार मी पूर्ण झटकून टाकले. प्राप्त परिस्थितीला टक्कर द्यायलाच पाहिजे, या विचाराने पेटून उठले.

जसे जसे दिवस जाऊ लागले, तसे तसे सुजीतचे टोमणे वाढू लागले. एकदा-दोनदा त्याने ऑफिसात फोन केला आणि माझ्या साहाय्यकाला सहज विचारतो असे दाखवून, पण खोदून विचारले की माझ्या केबिनमध्ये कोण येते, काय करते. काही दिवसांनी तसा फोन आलेला असताना मी साहाय्यकाला विचारले, कोणाचा फोन आहे? तेव्हा मला ही माहिती कळली. आता मात्र माझे मन संतापाने पेटून उठले. घरी जाऊन मी त्याला तोंडावर विचारले की तू माझ्यामागे माझ्यावर पाळत ठेवतोस का? मला हवे असेल आणि मी कोणाचाही हात धरून पळून गेले तर तू काय करशील? तो त्यावर काहीच बोलला नाही. आम्ही एका खोलीत एका पलंगावर झोपत होतो, पण मनाने मात्र दोन ध्रुवांवर होतो. आताशा सानिकाला जवळ घेऊन मी झोपत असे.

खोटे कशाला बोला! त्याच्या आजाराच्या सुरुवातीला मी त्याच्या कुशीत झोपत असे. शरीरसंबंध नसला, तरीही नुसती जवळीकही किती आश्वासक असते. त्याने आम्हा दोघांना मानसिक आधार आणि काही करण्याचे बळ मिळत असे.
पण आताशा मला त्याचा चुकून झालेला स्पर्शही नकोसा वाटत असे. असा काय गुन्हा झाला होता की त्याने माझ्यावर संशय घेण्याची वेळ आली? मी कित्येक वेळेस सानिकाची शपथ घेऊन स्पष्टपणे सांगितले की माझ्या मनात कोणीही दुसरा नाही आणि तुला स्वतःच्या पायावर उभे राहण्यास कितीही दिवस लागले तरी चालतील, पण मी तुझी साथ सोडणार नाही. पण दोन दिवसात येरे माझ्या मागल्या. मी त्याला समुपदेशकाला घरी बोलवू या म्हणूनही सांगितले. त्यावर त्याने मी समुपदेशकाला भेटणार नाही असे निक्षून सांगितले. सगळे उपाय हरत चाललेले होते. बाबा एकदा-दोनदा आले होते, तेव्हा मी त्यांना सुजीतच्या विक्षिप्त वागण्याबद्दल बोलले होते. पण त्यांना आता उतारवयात आपले ताणतणाव सांगून त्रास कशाला द्या, म्हणून मी नंतर काही सांगितले नाही. परंतु बाबांना कुणकुण लागली होतीच. त्यांनी काय चालले आहे याची माहिती काढली होतीच.

मधूनमधून सुजीतचे माझ्या राहण्याबद्दल टोमणे मारणे चालूच होते. भांडणही होत होते. मी त्याला किती वेळा स्पष्टपणे विचारले की "मी कोणते कपडे वेगळे घातले आहेत जे मी लग्नापूर्वी / लग्नानंतर घालत होते आणि आता घालत आहे ज्याबद्दल तुला एवढी हरकत आहे?" त्यावर त्याचे तिरकस टोमणेच फक्त येत होते. माझ्या सहनशक्तीचा तो अगदी अंत पाहत होता. मी मुक्त विचारांच्या एका सी.के.पी. कुटुंबात जन्माला आलेली आणि वाढलेली होते आणि व्यवस्थित राहणे दिसणे आणि वागणे ही आमच्या रक्तातच असलेली बाब होती. सुजीतने त्याचा इतका विपरीत अर्थ काढावा याचा मला संताप येत होता.

एकदा-दोनदा बाबांनी येऊन तेथे राहून सुजीतला समजावण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्याशी तो इतर बाबतीत व्यवस्थितपणे वागत होता, पण माझा विषय निघाला की तो बिथरत असे. वाद वाढवायचा नाही म्हणून बाबा जास्त बोलले नव्हते.

एके दिवशी सानिका मला म्हणाली, "आई, तू हे घर सोडून जाणार आहेस?" मी चमकले, पण शांतपणे तिला विचारले की "मी घर सोडून कुठे जाणार?" तर ती म्हणाली, "तू दुसर्‍या बाबांबरोबर जाणार आहेस का?" आता माझा पारा चढला आणि मी तिला विचारले, "कोण म्हणाले असे?" त्यावर ती म्हणाली, "बाबा म्हणत होते की आता तू आणि मीच राहणार आणि आई आपल्याला सोडून जाणार." हा मात्र कळस झाला होता आणि आता हे माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जात होते. आता त्यांनी माझ्या सानिकाचे मन माझ्याविरुद्ध कलुषित करायचा अश्लाघ्य प्रयत्न केला होता. मी पेटून उठले. सुजीत आणि सासू-सासर्‍यांना नाही नाही ते बोलले आणि सानिकाचे आणि माझे चार कपडे एका बॅगेत टाकले आणि सरळ उठून बाबांच्या घरी आले.

बाबांकडे आल्यावर मी त्यांना सर्व काही सांगितले. त्यांना धक्काच बसला. इतके दिवस मी त्यांना काही सांगितले नाही, याबद्दल ते मला रागावलेसुद्धा.

यानंतर ते उठून सुजीतच्या घरी गेले. तेथून परत आल्यावर ते मला शांतपणे म्हणाले की "तुझा नवरा मनोरुग्ण आहे. त्याच्याशी वाद घालणे हे फोल आहे. त्याचे म्हणणे असे आहे की काहीही झाले तरी आज ना उद्या तू त्याला सोडून कुणाचातरी हात धरून पळून जाणार आहेस."

आता याला उपाय काय? हा आमच्यात विचार चालू होता. माझी नोकरी तर सुजीतच्याच शहरात होती. बाबा म्हणाले, "मुक्ता, तुझा फ्लॅट नाहीतरी तयार झाला आहेच, तर तेथे तू राहायला सुरुवात कर. कारण त्या घरी परत गेलीस, तर तुझी घुसमट होईल." मूळ प्रश्न सानिकाचा होता. कारण मी दिवसभर बाहेर जाणार, तर तिच्याकडे कोण बघेल? बाबा स्वच्छपणे म्हणाले, "बाळ, तुला चालणार असेल, तर आम्ही दोघे तेथे येऊन राहतो. नाहीतरी म्हातारपणी आम्हालाही तुझाच आधार लागेल. ताई तर अमेरिकेत आहे, ती परत येणार नाही आणि या वयात आम्हाला अमेरिकेत जाणे झेपणार नाही."

आम्ही लगेच तयारी केली आणि काही दिवसात आई-बाबांचा बाडबिस्तरा माझ्या हक्काच्या फ्लॅटमध्ये हलवला. आम्ही आमच्या नव्या जागेत राहायला लागलो. सानिकाच्या शाळेच्या बसपासून मोलकरणीपर्यंत सगळे सुरळीत झाले. इतक्या कालावधीत सुजीतने मला एकदाही फोन करायचा प्रयत्न केला नव्हता. मी मात्र तीन वेळेस घरी फोन केला, तेव्हा सासरे फोनवर जुजबी बोलले. सुजीत तिन्ही वेळेस 'बाथरूमला' गेलेला होता. आश्चर्य म्हणजे दोन महिन्यांनी आम्हाला वकिलाची नोटीस आली. त्यात सुजीत अपंग झाल्यामुळे मला त्याच्याबरोबर राहायचे नाही आणि त्याची जबाबदारी घ्यायची नाही म्हणून मी घर सोडून गेले आहे, असे आरोप होते. शिवाय सुजीत मला विवाहसुख देऊ शकत नसल्याने मी बाहेरख्याली झाले आहे अशा तर्‍हेचे अत्यंत हलक्या दर्जाचे आरोप केलेले होते. आणि अशा स्त्रीबरोबर मी अपंग असलो तरीही संसार करणे शक्य नाही, माझाही काही स्वाभिमान आहे, त्यामुळे मला घटस्फोट मिळावा, असा कुटुंब न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

ते आरोप वाचून माझे डोके फुटायची पाळी आली. मी सुजीतला फोन केला, तो त्याने उचलला नाही. बाहेरून फोन केला, तर माझा आवाज ऐकून त्याने तो बंद केला. मी संतापाने त्याच्या घरी जायची तयारी केली, तेव्हा बाबांनी मला थांबवले. ते म्हणाले, "बाळ, डोक्यात राख घालून तू तेथे काही दुर्व्यवहार केलास, तर त्यांच्या आरोपाला खतपाणीच मिळेल. तुला जे काही करयचे आहे, ते शांत डोक्याने करणे आवश्यक आहे." यानंतर बाबांनी कुठूनतरी या शहरातील चांगल्या वकिलाचा पत्ता शोधला. आम्ही त्यांना भेटायला गेलो, तर सुदैवाने तो आमच्या आई-बाबांचा विद्यार्थीच निघाला. त्यामुळे निदान नवीन शहरात असून आम्हाला एक आधार सापडल्यासारखा झाला.

वकीलसाहेबानी मला त्यांच्या डावपेचांची कल्पना दिली. सुजीत अपंग झाला आहे आणि तू मात्र धडधाकट आहेस याचा त्याला हेवा वाटत होता आणि त्याचे मन संशयाने पोखरून निघालेले होते. त्यामुळे तुझ्यापासून घटस्फोट घेतला की त्याला भक्कम पोटगी मिळेल. पगाराच्या १/३ किंवा जास्त, कारण तो अपंग झाला आहे आणि त्याच्या आईवडिलांची जबाबदारी घेण्यास असमर्थ आहे. शिवाय घटस्फोटानंतर तू दुसरे लग्न केलेस की त्याच्या आरोपांना पुष्टी मिळेल आणि त्याचा 'मर्दपणा' सिद्ध होईल. मी विचारले, "यात त्याचा मर्दपणा काय?" ते म्हणाले, "अपंग असूनही बाहेरख्याली बायकोला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला, म्हणजे खरा मर्द नाही का?"

मी म्हणाले, "पण मला दुसरे लग्नही करायचे नाही की घटस्फोटही नको आहे." ते म्हणाले, "ते त्यांना माहीत आहे. पण रोज रोज तू चांगले कपडे घालून बाहेर जातेस, ते त्याला बघवत नाही. शिवाय तो तुझ्यावर अवलंबून आहे हे त्याला लोकांना दाखवायचे नाही." मी त्यांना विचारले, "मग सासू-सासरे तरी असे का वागतात?" ते म्हणाले, "पुत्रप्रेम माणसाला आंधळे करते. तुझ्याबद्दल त्याने आपल्या आईवडिलांना काय सांगितले आहे ते आपल्याला माहीत नाही."

त्यांनी विचारले, "तुला आता काय करायचे आहे?" मी वकीलसाहेबांना म्हणाले, "मला आता पुन्हा संसार थाटायची इच्छा बिलकुल नाही आणि मला घटस्फोटही नको आहे. शेवटी नवरा अपंग झाला म्हणून या बाईने घटस्फोट घेतला, असले आरोप मलाही ऐकायचे नाहीत. सुजीतची पूर्ण जबाबदारी माझीच आहे आणि ती मी घेणारच आहे. परंतु सानिकाच्या बालमनावर परिणाम होऊ नये, म्हणून मला त्या घरात परत जायचे नाही."

यावर वकीलसाहेब म्हणाले, "ही गोष्ट कोर्टात सहज सिद्ध होईल, कारण गेले कित्येक दिवस तुमच्या खात्यातून सुजीत पैसे काढत होताच, तसे त्याला पैसे काढायची मुभा देत येईल. आणि त्या खात्यात किती पैसे ठेवायचे हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे."

सध्या कौटुंबिक न्यायालयातून सुजीतची केस सबळ पुराव्या- आणि कारणाअभावी निकालात काढलेली आहे. आणि मी आईवडिलांबरोबर माझ्या लहान कळीच्या भवितव्यासाठी वेगळे राहत आहे.

आजही मी केवळ सानिकाचे भविष्य म्हणून बाहेर पडले असेच नव्हे, तर माझे स्वतःचे आयुष्यही (काही प्रमाणात) अर्थपूर्ण असावे म्हणून बाहेर पडले. (ते उघडपणे बोलण्याचे आजही मी धारिष्ट्य करीत नाही.) स्त्रीने त्यागाची मूर्ती असावे असेच समाज आजही मानतो आहे.

मनुष्यजन्माला आलात तर समाजासाठी काहीतरी भरीव करून जा, अन्यथा 'काकेनापी स्वोदरम पूर्यते' (कावळासुद्धा स्वतःचे पोट भरीतच असतो) ही माझ्या बाबांची शिकवण आहे. त्या उक्तीप्रमाणे काहीतरी भरीव समाजसेवा माझ्या परीने मी करीत आहे, ज्याची वाच्यता मी करू इच्छित नाही.

गेल्या काही दिवसांत, वर्षांत जे अनुभवले आहे, त्यामुळे अनेक प्रश्नांच्या भोवर्‍यात सापडले आहे..

स्त्रीचे सौंदर्य हे फक्त नवर्‍याचे मन रिझवण्यासाठीच आहे का?
तिच्या स्वतःच्या इच्छा-आकांक्षा नवर्‍याच्या मर्जीवरच अवलंबून असाव्यात का?
सासू एक स्त्री असूनही ती माझ्याऐवजी नवर्‍याचीच बाजू का घेते? म्हणजे स्त्रीच्या स्वतःच्या इच्छा नवर्‍याच्या मर्जीप्रमाणे असाव्यात असेच तिलाही वाटते का?
जर शरीरसुख नवर्‍याकडून मिळत नसेल, तर स्त्री ते बाहेर शोधेलच असे गृहीत का धरले जाते? शरीरसुखाच्या पलीकडेही नीटनेटके राहण्यात व्यक्तिमत्त्वाचा काही भाग असतो, हे लोकांना समजत नाही का?
माझ्या आईवडिलांनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहण्याची तयारी दाखवली, म्हनून मी माझे स्वतंत्र आयुष्य जगत आहे. पण त्यांनी ती दाखवली नसती, तर मी असे धाडस करू शकले असते का?

आजही मी या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात आहे.
1
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

10 Nov 2015 - 9:14 pm | मी-सौरभ

:(

पैसा's picture

10 Nov 2015 - 11:14 pm | पैसा

एक स्त्री म्हणून तिने मोकळा श्वास घेऊच नये का? स्वतःला बरं वाटतं म्हणून नीटनेटकं राहिलं तर त्यावर एवढे महाभारत? अर्थात आश्चर्य वाटलं असं म्हणणार नाही. इतके टोकाचे नाही, पण याची हिंट म्हणावे असे अनुभव आले आहेत.

त्या मुक्ताला तिचा स्वतःचा खरा रस्ता सापडू दे, ही शुभेच्छा.

सस्नेह's picture

11 Nov 2015 - 10:13 pm | सस्नेह

सत्य बोचरे असते आणि सरळ लोकांसाठी अधिकच.

हम्म. खरे आहे अगदी. लिहिलेय अगदी परफेक्ट.
.
.
कथाचित्र पण आवडले. छान वाटते.

टवाळ कार्टा's picture

11 Nov 2015 - 10:21 pm | टवाळ कार्टा

सत्यकथा???

सुबोध खरे's picture

13 Nov 2015 - 1:01 pm | सुबोध खरे

होय.
हि सत्यकथाच आहे आणि माझ्या लांबच्या नात्यात प्रत्यक्ष घडलेली आहे.
एवढेच आहे कि त्यात हवा भरून मी ती फुल(ग)वलेली आहे. नवे अर्थातच काल्पनिक आहेत.

भाऊंचे भाऊ's picture

12 Nov 2015 - 5:20 pm | भाऊंचे भाऊ

त्याला मानसोपचार तज्ञांची गरज आहे. नुसते कुटुंब सोबत असून उपयोगी पड़तेच असे नाही देव करो अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होउन आपल्या चुका कबूल करायची क्षमता निर्माण होवो.

मला कुठेही स्त्री पुरुष असमानतेची किनार घटनाक्रमात जाणवत नाही

सुबोध खरे's picture

13 Nov 2015 - 1:05 pm | सुबोध खरे

दुर्दैवाने विक्षिप्त पणे वागणाऱ्या व्यक्ती स्वभावदोष म्हणून समाज स्वीकार करतो आणि मनोविकार तज्ञाकडे जात नाही.
व्यवस्थित आणि अव्यवस्थित यांच्या सीमारेषेवर उभे असलेल्या कित्येक व्यक्ती संशयाचा फायदा मिळून सुटतात किंवा विक्षिप्त म्हणून मदतिची गरज असूनही त्यापासून वंचित राहतात.
मनोविकार आणि त्याचा इलाज करणारे तज्ञ हे अजूनही प्रतिष्ठेच्या वर्तुळाच्या बाहेरच असतात. कोणताही मनोरुग्ण आपल्या डॉक्टरला समाजात सहज ओळख दाखवत नाही किंवा त्यापासून तोंड लपवतो हि वस्तुस्थिती आहे.

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 1:44 pm | भाऊंचे भाऊ

नेमके हेच आज सर्वत्र दिसुन येते. अन दुर्दैवाने अशात जर लिंगभेदाची किनार लागली तर गोश्टी भयानक दिशाभुल करणार्‍या बनतात ज्याला सर्वसामान्य हमखास फसतात हे तर आता कोणीही सांगु शकेल.

कथा (वा सत्यकथा) मुक्ताच्या संयमी पण ठाम वागण्यामुळे आवडली!

एक एकटा एकटाच's picture

13 Nov 2015 - 1:48 pm | एक एकटा एकटाच

कथा आवडली

अस नाही म्हणणार.

कारण असाच एक संशयाचा बळी फार जवळून पाहिलाय

मित्रहो's picture

15 Nov 2015 - 7:23 pm | मित्रहो

शारीरीक दुबळेपणा मुळे सुजीत मधे आलेला मानसिक दुबळेपणाच या साऱ्याला जबाबदार असावा असे वाटते. त्याच्या आईवडीलांचे आंधळे पुत्रप्रेम. असेही वाटते त्यांनी सांगितले असते तरी त्याने कितपत ऐकले असते.
त्या मुक्ताल तिचा योग्य तो मार्ग सापडू दे हीच इच्छा.

प्रभाकर पेठकर's picture

16 Nov 2015 - 12:00 pm | प्रभाकर पेठकर

प्राक्तन अटळ असतं. मुक्ताच्या प्राक्तनात ती सर्वस्वी नॉर्मल असूनही नवर्‍याच्या स्वभावाच्या रुपाने दुर्दैवाने प्रवेश केला आणि उभ्या आयुष्यातील स्वप्न, प्रेम, आश्वस्त आधार वगैरे गोष्टींना सुरुंग लागला. पण एव्हढ्यात विषय संपत नाही. प्रेम करणे आणि प्रेम करवून घेणे ह्या मुलभूत गरजेचाच पार चोळामोळा झाल्याने मुक्ताचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. एकत्रही राहू शकत नाही आणि वेगळे राहण्यानेही मनाच्या जखमा भरून येत नाही. शिवाय, सर्व अपमान आपल्यापाशीच ठेवून मुलीच्या भवितव्याचा विचार सतत मनाला भेडसावतो आणि आई-वडिलांच्या दुरावलेल्या नात्याने मुलीचे नुकतेच सुरु झालेले आयुष्यही कमकुवत भावनिक पायावर डळमळीत होते आहे. ह्याला दूरान्वये आपणच जबाबदार आहोत ही अपराधीक बोचणी मुक्ताचे व्यक्तिमत्व ढासळवणारी आहे. एका घटनेचे अनंत दुष्परीणाम. एकतर्फी आरोप आणि चर्चेला वाव नाही. आपण एकच बाजू ऐकली आहे. ती खरी मानली तर दोष सरळ सरळ नवर्‍याच्या असहकार आणि अहंकारी वृत्तीत दडलेला जाणवतो आहे. कथा विचारांना प्रवृत्त करणारी आहे. अगदी हाच प्रसंग नसला तरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशा भावनांभोवती फिरणार्‍या घटना घडत असतात तेंव्हा सामंजस्य आणि वैचारीक परिपक्वता प्रत्येकाने अंगीकारणे आवश्यक ठरते.

कथेतील जातींचे संदर्भ मनाला खटकले. त्या शिवायही कथा परिणामकारक आहेच.

चांदणे संदीप's picture

16 Nov 2015 - 1:54 pm | चांदणे संदीप

सत्यकथा असल्यामुळे वाइट वाटले...त्यात वाइट वाटत असूनही काहीच करू शकत नाही याची जाणीव होऊन मन जास्त विषण्ण झाले.

योगायोगाने असेच एक अपघाताने उध्वस्त झालेले कुटुंब पाहिले आहे. नैराश्य येऊन माणूस खचून जातो व इतरांनाही (कळत नकळत) जीवनाविषयी कटुता निर्माण होईल असे वागू लागतो. चीड येते अशा माणसांची पण कीवही तितकीच येते.

मुक्ताला आणि तिच्या मुलीला हे जीवन जगण्यासाठी धैर्य लाभो हीच सदिच्छा!
Sandy

स्वाती दिनेश's picture

17 Nov 2015 - 3:34 pm | स्वाती दिनेश

सत्यकथा आहे हे समजल्यावर त्या कथेला एक वेगळे परिमाण आले आहे. खंबीर मुक्ता आवडली असं तरी कसं म्हणू?
स्वाती

बॅटमॅन's picture

18 Nov 2015 - 1:55 pm | बॅटमॅन

.......

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 2:00 pm | मांत्रिक

दुर्दैवी मुक्ता!
कथानक लिहिलंय मात्र अगदी सशक्तपणे!

नाखु's picture

18 Nov 2015 - 4:50 pm | नाखु

मुक्ताच्या खंबीरपणाला सलाम..
नातेवाईकांचे ऐकून स्वतःचे आणि कन्येचे मातेरे करण्यापेक्षा स्वावलंबी राहण्याचा पर्याय सगळ्यात चांगला.

नाव आडनाव's picture

18 Nov 2015 - 5:12 pm | नाव आडनाव

+१

सुबोध खरे's picture

18 Nov 2015 - 6:26 pm | सुबोध खरे

सर्वाना धन्यवाद
मला एकच गोष्ट म्हणायची आहे कि एखादी मुलगी स्वतः च्या (किंवा स्वतःच्या मुलीच्या) भवितव्यासाठी नवर्यापासून वेगळी होऊ पाहत असेल तर समाजात किती लोक तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतील. इतर प्रश्न मुक्ताच्या मनातले लेखाच्या शेवटी आहेतच.
पेठकर साहेब -- स्त्री म्हणजे चुलीतील लाकडं. चुलीतच जळायचं हे तिच्या प्राक्तनात लिहिलेलं आहे असे बरयाच जातींमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी समजले जाते यासाठी जातीचा उल्लेख केला. अन्यथा तो अनावश्यक होता.

प्रभाकर पेठकर's picture

19 Nov 2015 - 3:40 pm | प्रभाकर पेठकर

स्त्री म्हणजे चुलीतील लाकडं. चुलीतच जळायचं हे तिच्या प्राक्तनात लिहिलेलं आहे

डॉक्टरसाहेब,

असंस्कृत वागण्याला - विचारांना जात-धर्माचे बंधन नाही. हे मी अगदी ब्राह्मणांमध्येही पाहिले आहे. असो. विषय जातीव्यवस्थेवर पुन्हा जाऊ नये म्हणून इथेच रजा घेतो.

सुबोध खरे's picture

19 Nov 2015 - 6:15 pm | सुबोध खरे

असंस्कृत वागण्याला - विचारांना जात-धर्माचे बंधन नाही.
+१००

सुबोध खरे's picture

19 Nov 2015 - 6:17 pm | सुबोध खरे

त्याच बरोबर मुक्ताचे वडील खंबीरपणे आपल्या मुलीच्या मागे उभे राहिले. हे काही जातीत दिसत नाही यास्तव तो उल्लेख होता.
असो

अभिजीत अवलिया's picture

21 Nov 2015 - 10:24 pm | अभिजीत अवलिया

कथा आवडली असे देखील म्हणता येत नाही. भयानक असतात काही लोकांचे स्वभाव.

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2015 - 10:01 am | चौथा कोनाडा

अगदी खरेय ! आयुष्यभर पिचतrराहण्या पेक्षा एक घाव दोन तुकडे या तत्वाने मुक्ताने घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.

कथा आवडली. मथळा अक्षरे ही सुरेख आहेत kकथाचित्रासाठी चित्रकाराचे विशेष अभिननंदन ! खुपच मस्त जमलेय.

सुबोध खरे साहेब आम्ही आपल्या लिखाणाचे पंखे आहोतच.
ही कथा खुप आवडली हेवेसानलगे.

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 10:10 am | सुबोध खरे

चित्र पैसा ताईंनी काढलेले आहे.
ते श्रेय त्यांचे आहे
त्यांना माझ्यातर्फे सुद्धा धन्यवाद.
आमची चित्रकला "वाखाणण्यासारखी" आहे

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2015 - 10:48 am | चौथा कोनाडा

धन्यु सुखसाहेब, माहिती साठी !

लेखन कौशल्या बरोबरच पैसातै चित्रकौशल्य ही बाळगुन आहेत तर ! भारीयत पैसातै
(मुविaआयोजित [ व नाखु संचलित, मितानतै अध्यक्षित, वल्लीप्रचेतस मार्गदर्शित, आत्मुस हॉयजॅकित वै. वै. वै. :-) ] आकुर्डी प्राधिकरण कट्ट्याला सुरुवातीसच आमचा ताबा फोनवरच मिपाचित्रमहर्षी अभ्यादादा ने घेतल्या मुळे पैतैंशी बोलायचेच राहिले :-( अर्थातच याची कसर आगामी वर्षात भरुन काढली सॉरी काढल्या जाईल)

सुखसाहेब, तुमची ही " वाखाणण्याजोगी " येव द्या मिपावर !

पैसा's picture

23 Nov 2015 - 11:23 am | पैसा

अभ्या, डॉक्टर खरे आणि चौथा कोनाडा कौतुकासाठी धन्यवाद!

चित्राखाली मुद्दामच नाव दिले नव्हते. =)) अभ्यासारख्या चित्रकाराकडून मिळालेल्या कौतुकाचे मोल माझ्यासाठी खूपच आहे!

परवा फोनवर बोलायचे राहिले, मात्र पुन्हा कधीतरी नक्की भेटू आणि बोलू. कधीही वाटेल तेव्हा संपर्क साधा!

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 12:07 pm | सुबोध खरे

अर्र र्र
अभ्या शेट चा प्रतिसाद वाचलाच नव्हता. त्यामुळे चित्राचे श्रेय द्यायचे राहून गेले. मुळात सुरुवातीलाच ते श्रेय पैसा तैना द्यायला हवे होते.
पैसा ताई क्षमस्व आणि चित्राबद्दल धन्यवाद.

पैसा's picture

23 Nov 2015 - 12:12 pm | पैसा

क्षमस्व काय त्यात! मी बर्‍याच वर्षांनी काही काढले त्यामुळे नाव द्यायला घाबरत होते, खरंच लेखाला योग्य झालंय का नाही म्हणून.

पण मुक्ताची कथा इतकी हलवून सोडणारी आहे की आपोआप चित्र तयार झाले ते.

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2015 - 5:47 pm | चौथा कोनाडा

येस्स, अभ्यादादाचे सर्टिफिकेट म्हंजे आय एस ओ सर्टिफिकेटच मिळाल्यासारखे आहे. :-) या यशासाठी अभिनंदन पैसाते ! आणी फोन वर तर नक्कीच बोलुयात.

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 6:22 pm | सुबोध खरे

कोनाडा साहेब
"आय एस ओ" ऐवजी "आय एस आय" असे मी सुचवेन कारण मुलुंड किंवा दहिसरच्या जकात नाक्यालाही "आय एस ओ" चे प्रमाणपत्र आहे.
तेंव्हा आय एस ओ च्या दर्जाबद्दल जरा शंकाच आहे.

चौथा कोनाडा's picture

23 Nov 2015 - 10:13 pm | चौथा कोनाडा

अगदी पर्फेक्ट !

आय एस आय !
सुखसाहेब ! एकदम पर्फेक्ट सुचवलेत !

गामा पैलवान's picture

23 Nov 2015 - 10:48 pm | गामा पैलवान

डॉक्टर साहेब,

आयेसो दर्जा प्रमाणित करंत नाही. आयेसो प्रमाणपत्र केवळ प्रक्रिया प्रमाणित करते. दर्जाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रत्येक आस्थापानास त्याच्या त्याच्या उत्पादनानुसार यथोचित संस्थेस पाचारण करावं लागतं. त्यामुळे अभ्याच्या प्रमाणपत्रास आयेसो न म्हणता दर्जादर्शक धरावं. :-)

आ.न.,
-गा.पै.

टीप : कथा शोकात्म आहे. चांगली तरी कशी म्हणावी ! :-( नायिकेला योग्य मार्ग सापडो.

सुबोध खरे's picture

23 Nov 2015 - 11:14 am | सुबोध खरे

हा हा हा
साहेब, उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला करायचे ?

चौथा कोनाडा's picture

24 Nov 2015 - 8:41 am | चौथा कोनाडा

सुखसाहेब, बिंधास दाखवा तुमचा हात इथे. आपले दयाळु मिपाकर लगेच पाय दाखवणार नाहीत तुम्हाला. :-) :-)

( अन तुम्हाला बोनस म्हणुन आणखी एक धागाही काढता येइल . . . . . . हात दाखवणे : शुभलक्षण की अवलक्षण का श्रद्धा , अंधश्रद्धा की महाअंधश्रद्धा? dधाग्यात भविष्य, ज्योतिषी, मोदी, पत्रिका वापसी, दोन चार खरे वाटतील असे खोटे अनुभव, नाड्या, पट्टे, सतरंज्या वै. ठासुन भारायचे, बगा या धाग्याचा शिणुमा सहस्त्रकी सुपरहिट्ट होतो की नाही ते ! ) :-))))

आतिवास's picture

23 Nov 2015 - 11:19 am | आतिवास

मुक्ताचा खंबीरपणा आवडला.
तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाय

तुम्ही कथन उत्तम केले आहे.

पियुशा's picture

25 Nov 2015 - 4:33 pm | पियुशा

योग्य वेळी योग्य निर्णय घेणार्या मुक्ताला शुभेछा :)