पुन्हा आल्प्सच्या वळणांवर - भाग ४ (अंतिम)

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in भटकंती
27 Jul 2015 - 3:43 am

भाग १, भाग २, भाग ३

शामोनिहून परत निघायचे असल्याने सकाळी लवकरच आवरले आणि गाडी पुन्हा परतीच्या रस्त्याला लागली. रस्त्यात जागा दिसेल तिथे थांबायचे आणि फोटो काढायचे हा उद्योग सुरु होता.

.

.

.

.

काही वेळातच दुरूनच जिनेव्हा लेकने दर्शन दिले. आणि आम्ही पहिल्या नियोजित स्थळी पोहोचलो ते म्हणजे Le château de Chillon अर्थात Chillon Castle ला. जिनेव्हा लेकच्या काठावरच असलेल्या एका बेटावर वसलेला हा किल्ला.

.

.

तिकीटा सोबत मिळालेल्या माहितीपत्रकाप्रमाणे एकेक दालन बघत निघालो. या किल्ल्याच्या अस्तित्वाबाबत ११व्या शतकापासूनच्या नोंदी सापडल्या आहेत. स्वित्झर्लंडमधील वेगवेगळ्या साम्राज्यांच्या काळात हा किल्ला उत्तर आणि दक्षिण युरोपात होणाऱ्या वाहतूक, व्यापार आणि राजकीय घडामोडी अशा अनेक कारणांसाठी महत्वाचा होता. ही जागा लष्करी तळ आणि तुरुंग म्हणूनही वापरली गेली.

.

प्रत्येक काळातल्या राजांनी आपल्या आवडीप्रमाणे किल्ल्यात बदल केले. त्यांच्या राजकीय बैठकीच्या खोल्या, नोकरदारांच्या खोल्या, तिथे वापरण्यात आलेल्या वस्तू, विशेषतः लाकडी कपाटे, त्यावर केलेले कोरीवकाम, असे एकेक बघत, त्याबद्दलची माहिती वाचत फिरत होतो.
स्विस घड्याळे जगप्रसिद्ध आहेतच. त्याची एक झलक इथे बघायला मिळाली. १८९७ सालचे हे घड्याळ अजूनही सुस्थितीत आहे.

.

हे वाईनचे कोठारघर.

.

जेव्हा तुरुंगात प्रवेश केला तेव्हा खरंतर ती मोठ्ठी खोली बघताना इथे तुरुंग म्हणण्यासारखे असे काही दिसले नाही. थोडे पुढे चालत गेलो आणि ठिकाणी एकदम थबकलो. फाशीच्या शिक्षा ऐकलेल्या, वाचलेल्या असतात, सिनेमांमध्ये बघितल्याही असतात, पण ही अशी प्रत्यक्ष शेजारी ती फाशीची जागा आणि दोरी बघून मात्र एक विचित्र, अस्वस्थ फिलिंग आलं.

.

सगळा किल्ला बघून झाला आणि बाहेर आलो. ९७५ स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असलेला जिनेव्हा लेक स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या दोन देशात विभागला आहे. ऱ्होन ग्लेशियर मधून उगम पावणाऱ्या ऱ्होन नदीच्या स्वित्झर्लंड ते फ्रान्स मार्गात हा लेक तयार झाला आहे.

.

ऱ्होन नदी आणि लेक जिनेव्हा याचे हे एक चित्र विकीवरून साभार.

जालावर मिळालेल्या माहितीनुसार याच तळ्याच्या काठाने पुढे Montreux या गावापर्यंत एक रस्ता आहे, ज्यावर दुतर्फा फुलं असतात, आणि तीही फक्त मे महिन्यात असे वाचले होते. हा रस्ता शोधत आम्ही निघालो आणि काही दिसेचना. कुठे जायचे हे नीट न कळल्याने तिथेच उभ्या असणाऱ्या एका स्विस पर्यटनाच्या मदतनीसाला विचारले. विशेष असे की इथे मदत केंद्र उभारता आले नाही तरीही त्यांचा एक मदतनीस मात्र उभा होता. तो म्हणाला हे काय, या बाजूने जा, हाच तो रस्ता. त्याप्रमाणे आम्ही निघालो पण जे काही वाचले होते तसे दिसेना. म्हणजे रस्त्यात फुले होतीच, पण इथे सहसा सगळीकडे दिसतात तेवढीच होती. पण कुठल्याही तळ्याच्या शेजारून जाणारा रस्ता सुंदर वाटला नाही तरच नवल. शिवाय अधून मधून या तळ्याचे दर्शन घडवत याच वाटेने धावणारी ट्रेनही दिसते.

.

.

.

सूर्य तळपत होता त्यामुळे बरेच लोक खास उन खाण्यासाठी बसले होते. बरेच लोक जॉगिंग करत होते. इतका सुंदर तळ्याकाठचा रस्ता असेल तर मीही आनंदाने, अजिबात कंटाळा न करता व्यायाम करेन असे मनात आले. नोकरी वगैरे सोडून देऊन आपण इथेच येउन राहुयात, अशी नवीन अजून काही ठिकाणं शोधून काढू, आपलेच एक पर्यटन केंद्र उभारू आणि इथेच राहू असे स्वप्नरंजन पण करून झाले.

.

.

.

.

नजर जाईल तिकडे दिसणारे निळे पाणी, त्यात दिसणाऱ्या लहान होड्या, काही अजस्त्र बोटी, सभोवताल वसलेली गावं, हिरव्या रंगाच्या विविध छटा मिरवणारी झाडे, विविधरंगी फुलं आणि शिखरांवर बर्फ मिरवणारा आल्प्स हे सगळंच अप्रतिम दृश्य असतं. अगदी दोनच दिवसांपूर्वी याच जिनेव्हा लेकवर फ्रान्समध्ये होतो, इथेही पुन्हा तेच सगळं, पण कुठेही कंटाळा येत नाही.

नाईलाजाने परतलो आणि याच रस्त्याने फक्त आता गाडीतून प्रवास सुरु झाला. दहाच मिनिटात आम्ही पोहोचलो Vevey ला. जिनेव्हा लेकच्या काठावर असलेले एक गाव यापेक्षाही अजून बऱ्याच कारणांसाठी हे गाव प्रसिद्ध आहे. इथे नेस्ले या कंपनीचे मुख्यालय आहे. होहो, तेच आपले मॅगीचे. मिल्क चॉकलेटचा शोधही या गावात लागला आणि नंतर कॉफी, नानाविध प्रकारचे चॉकलेट्स, डेअरी प्रोडक्ट्स पासून तर नुडल्स, सुप्स सारख्या अनंत खाद्यपदार्थांसाठी नेस्ले जगप्रसिद्ध आहे. लिटील वुमन या पुस्तकात देखील वेवेचा उल्लेख आला आहे. अजूनही काही वैशिष्ट्ये आहेत जी पुढे येतीलच. इथे पोहोचलो तेव्हा पोटात कावळे ओरडत होते म्हणून आधी खायला शोधले आणि मग तळ्याच्या काठाने चालायला सुरुवात केली. या गावातील अनेक इमारतीदेखील अतिशय सुरेख आहेत.

.

.

.

.

.

.

लोकांच्या बसण्यासाठी विशेष सोय केलेली आहे.

.

.

स्विसची भुरळ सामान्य माणसालाच एवढी पडते, त्यात अनेक सेलिब्रेटी तर अग्रेसर आहेत. या गावावर आपले खास नाव कोरले आहे ते जगाला हसवणाऱ्या चार्ली चाप्लीन याने. त्याच्या आयुष्याची २५ वर्षे तो या गावात राहिला. याबद्दलचे एक संग्रहालय २०१६ मध्ये चालू होणार आहे. त्यामुळे त्यानंतर आलात तर तेही बघता येईल.

.

या पुतळ्याच्या मागे जे दिसते आहे ते आहे वेवेतील खाद्य संग्रहालय (Alimentarium). नेस्ले आणि Anglo-Swiss Condensed Milk Company यांचे ऑफिस म्हणून सुरुवातीला बांधली गेलेली ही इमारत आता जगातील पहिले खाद्य संग्रहालय म्हणून प्रसिद्ध आहे. आवारात विविध प्रकारची झाडे लावली होती आणि त्याबद्दलची माहिती दिलेली होती. पण सोमवारी हे बंद असल्याने फक्त बाहेरून फक्त बघता आले. या खाद्य संग्रहालयाची ओळख म्हणून हा काटा चमचा या तळ्यात इथे रुतून बसलाय.

.

.

.

चार्ली चाप्लीनचे गाव म्हणून इथे कॅफेचे नावही चार्लीज. इथे बसून मस्तपैकी आइसक्रीम खाल्ले आणि शेवटी जेव्हा घड्याळाचे काटे आता उठा, घरी जायचंय म्हणू लागले तेव्हा परत कधीतरी फक्त स्विस बघायला येऊ असे म्हणत नाईलाजाने उठलो.

.

आता सलग ४-५ तासांचा प्रवास होता. पुन्हा स्विस रस्ते, स्वच्छता, सुंदर घरं, तळी, आल्प्स हे सगळे बघून, अनुभवून मन तृप्त झाले होते. आता एखादा कॉफी ब्रेक घेऊ असा विचार मनात असतानाच दुरून एका लहानशा तळ्याने दर्शन दिले. सगळीकडेच दिसतात अशी तळी इथे, किती ते फोटो काढणार असे म्हणत असतानाच त्याच ठिकाणी थांबा दिसला. लगेच गाडी थांबवली आणि या अप्रतिम दृश्याचा आस्वाद घेत कॉफी घेतली.

.

आजवर केलेल्या स्विस पर्यटन मंडळाने अगदी शेवटच्या क्षणी देखील त्यांची कल्पकता दाखवून दिली. या विश्रांतीसाठी असणाऱ्या ठिकाणी देखील त्यांचे पर्यटन मदत केंद्र होते. स्वित्झर्लंडची अनेक ठळक वैशिष्ट्ये म्हणून ओळख असलेल्या वस्तूंची इथे एक कोलाजरुपी प्रतिकृती तयार केली होती. बाहेर खऱ्या गायी नव्हत्या म्हणून गायींचे मॉडेल्स होते.

.

.

आमच्या देशात या, या सगळ्याचा मनसोक्त आस्वाद घ्या, गरज पडली तर कुठेही मदत केंद्रावर संपर्क साधा, असे जेव्हा या देशाच्या प्रत्येक सहलीत जाणवते तेव्हा कौतुक करायला खरेच शब्द कमी पडतात. मागच्या लेखमालेत जे काही लिहिले होते त्याच भावना परत या सहलीताही होत्या, किंबहुना ती मतं अजून पक्की झाली होती. आता मात्र निघणे अपरिहार्य होते. स्वित्झर्लंड आणि फ्रान्स मधील या चार दिवसांच्या सहलीने मस्त फ्रेश वाटत होते. काही नेहमीची प्रसिद्ध ठिकाणे बघायची राहिली पण तेवढ्याच अनवट जागा नव्याने कळल्या होत्या. नेहमीप्रमाणेच वेळ कमी पडला ही भावनाही होतीच आणि त्यासोबतीला पुन्हा येऊ निवांत ही देखील. तेव्हा तोपर्यंत, बिस बाल्ड म्हणजेच पुन्हा भेटूया पुढच्या सहलीत.
समाप्त

प्रतिक्रिया

लेख व फोटू आवडले. सुरेखच आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

27 Jul 2015 - 7:44 am | श्रीरंग_जोशी

एकाहून एक सुंदर फोटोज अन जोडीला ओघवते वर्णन.

आणखी एक पर्वणी इथे संपल्याने जरा वाईटच वाटत आहे.

सुंदर वर्णन.तो अप्रतिम निसर्ग दाखवणारे देखणे फोटो!
समुद्री घोड्यावर स्वार होऊन निघालेल्या तरुणीचा पुतळा खूपच आवडला.

प्रचेतस's picture

27 Jul 2015 - 9:23 am | प्रचेतस

सुरेख लेख.
फोटो अतिशय उच्च दर्जाचे आलेत.

प्रीत-मोहर's picture

27 Jul 2015 - 9:55 am | प्रीत-मोहर

मस्त होती मालिका. :) सुरेख वर्णन आणि फोटो.

अमृत's picture

27 Jul 2015 - 10:25 am | अमृत

छायाचित्रे व प्रवासवर्णन दोन्ही मस्त.

चौकटराजा's picture

27 Jul 2015 - 11:00 am | चौकटराजा

ही सगळी मालिकाच मधुरा स्टॅनडर्ड ला इमान राखणारी होती. सहजिकच वर्णन व छायाचित्रे सुरेख. आता यापुढचा दौरा बरनिना पास चा ठेवा ही शुभेव्छा !

वेल्लाभट's picture

27 Jul 2015 - 12:59 pm | वेल्लाभट

शेवटचा फोटो कातिल. वर्णन अप्रतिम.

त्या तलावाकाठच्या खुर्चीवर दिवस दिवस बसण्यासाठी फक्त मी तिथे येईन. इतकी आवडलीय मला ती. बास. ठरलं. वेवे ला किमान २-३ दिवस मुक्काम जेंव्हा केंव्हा ट्रिप ठरेल तेंव्हा.

क्या बात है मधुरा तुमची मागची लेखमाला आणि ही लेखमाला दोनही इतक्या नेत्रसुखद आहेत की तोड नाही त्याला.
सुपर्ब.

लिखते रहो. पुढच्या प्रवासवर्णनाच्या प्रतिक्षेत

सूड's picture

27 Jul 2015 - 3:41 pm | सूड

+१

दिपक.कुवेत's picture

29 Jul 2015 - 2:49 pm | दिपक.कुवेत

छोटेखानी केलेली परत स्वीस सफर आवडली. फोटो पाहूनच खुप फ्रेश वाटतय. पुढील सफरीच्या प्रतीक्षेत.

अविनाश पांढरकर's picture

27 Jul 2015 - 4:59 pm | अविनाश पांढरकर

छायाचित्रे व प्रवासवर्णन दोन्ही मस्त.

सविता००१'s picture

27 Jul 2015 - 5:37 pm | सविता००१

अप्रतिम मालिका.
हे सगळे फोटो मी ढापलेत अस समज. परवानगी मागणारच नाहीये. कसले आहेत एकेक फोटो.

लेखमाला अज्जिच्बात आवडली नाही, फोटो तर अगदीच बाद आहेत.
-जळजळग्रस्त प्यारे

पैसा's picture

27 Jul 2015 - 6:01 pm | पैसा

किती सुरेख लिहिलंय अन फोटो तर एकापेक्षा एकेक देखणे!

पद्मावति's picture

27 Jul 2015 - 6:08 pm | पद्मावति

इतकी सुंदर तळ्याकाठचा रस्ता असेल तर मीही आनंदाने, अजिबात कंटाळा न करता व्यायाम करेन असे मनात आले. नोकरी वगैरे सोडून देऊन आपण इथेच येउन राहुयात, अशी नवीन अजून काही ठिकाणं शोधून काढू, आपलेच एक पर्यटन केंद्र उभारू आणि इथेच राहू असे स्वप्नरंजन पण करून झाले.....काय सुंदर तळी, डोंगर, पायवाटा, सुबक सुंदर आणि मुख्य म्हणजे स्वच्छ अशी गावं, फुलझाडे अशा वातावरणातुन परत फिरणं कोणालाही जिवावरच येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jul 2015 - 6:09 pm | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम वर्णने आणि फोटोगिरी असलेल्या अप्रतिम लेखमालेचा अप्रतिम वळणावर शेवट !

जिनिवा सरोवराच्या स्विस काठावरच्या कोणत्याही ठिकाणी (खास करून Vevey ला) पर्यटन केंद्र काढणार असलात तर त्यातली एक जागा माझ्यासाठी राखून ठेवा !

जुइ's picture

27 Jul 2015 - 11:24 pm | जुइ

अप्रतिम फोटो आणि वर्णन. मालिका इथेच संपल्याने हळहळ वाटत आहे. पुढील पर्यटनास शुभेच्छा!

सस्नेह's picture

28 Jul 2015 - 12:08 pm | सस्नेह

जमिनीवरच्या स्वर्गाचे स्वर्गीय फोटो !
फाशीवाला फोटो मात्र कातर करून गेला ...!

सुधीर कांदळकर's picture

28 Jul 2015 - 12:56 pm | सुधीर कांदळकर

चित्रे, लेखन सारेच सुंदर. जालावरची चित्रे देखील योग्य ठिकाणी दिलीत ते आवडले.

धन्यवाद.

आम्ही जेव्हा स्विस सहल केली होती तेव्हा त्यांच्या मदत केंद्राचा खूपच छान अनुभव आला होता. खराब हवामानामुळे मोउंत तितलीस हुकणार असे वाटले पण केंद्राच्या सहकार्याने दोन दिवसांनी ते पाहायला मिळाले. ते सुद्धा काही विनवणी न करता .

लेखमाला खूप आवडली .परत जावेसे वाटते :)

पिलीयन रायडर's picture

29 Jul 2015 - 1:14 am | पिलीयन रायडर

अप्रतिम!!!!

खुप सुंदर लेखमाला आणि खुप सुंदर फोटो..

मधुरा देशपांडे's picture

29 Jul 2015 - 3:19 am | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे खूप खूप आभार!!

एक एकटा एकटाच's picture

17 Aug 2015 - 9:11 am | एक एकटा एकटाच

बऱ्याच दिवसापासून हि लेखमाला वाचायची होती.
आज वाचली, आणि स्वत:लाच दूषण दिली.
इतके दिवस का वाचायची ठेवली..

अतिशय सुरेख आणि मस्त , निव्वळ अप्रतिम

सुंदर लेखमाला आणि त्याहून सुंदर फोटो!!