मुद्देवंचितांसाठी खुषखबर! काही हुकमी उपाय

Primary tabs

फारएन्ड's picture
फारएन्ड in काथ्याकूट
25 Aug 2014 - 9:30 am
गाभा: 

खुषखबर! सध्या सोशल नेटवर्क्स मधे अनेक लोकांना भेडसावणार्‍या एका समस्येवर हा दिलासा आहे. केवळ मुद्दे शिल्लक नाहीत म्हणून अशा नेटवर्क्स वर होणार्‍या वादांमधे अनेकांचे डिस्क्रिमिनेशन होते. त्यांना मग एकतर वैयक्तिक पातळीवर तरी यावे लागते किंवा वाद सोडून जावे लागते, व पुन्हा "पळून गेले" वगैरे ऐकावे लागते.

पूर्वी हे नव्हते. एखाद्याने प्राचीन काळी एखाद्या विषयावर जे लिहीले होते तेच त्याचे/तिचे सार्वकालिक मत आहे असे गृहीत धरून चालत असे. त्यामुळे त्याच्या/तिच्या इतर विषयांवरच्या इतर मुद्द्यांना प्रतिक्रिया म्हणून ते पूर्वग्रह पुढे आणता येत असत. पण आता असे करणे अवघड होऊ लागले आहे. तर अशा मुद्देवंचितांकरिता येथे काही उपाय सांगितलेले आहेत. हे संक्षिप्त आहे. पूर्ण मुद्दे माझ्या आगामी पुस्तकात मिळतील. तुम्हाला अजून माहीत असतील. ते ही लिहा (म्हणजे ते मी माझेच मुद्दे म्हणून त्या पुस्तकात घालेन. त्यारून वाद निर्माण झालाच तर खालच्या एखाद्या उपायाचा वापर होईलच).

तर अशा सिच्युएशन मधे जर कधी अडकला असाल - की समोरच्याला जोरदार विरोध तर करायचा आहे, प्रत्यक्ष बोलताना जसे केवळ जोरात ओरडण्याने आपण बरोबर आहोत असा समज निर्माण करता येतो तसे काहीतरी लेखी करायचे आहे, पण त्याकरता योग्य मुद्दा सापडत नाहीये, किंवा आपण एकदा व्यक्त केलेला मुद्दा हेच एक सार्वत्रिक सत्य आहे, त्यापेक्षा वेगळे काही असूच शकत नाही असे तुम्हाला (कायमच) वाटते, त्यामुळे अजून काय लिहीणार असा प्रश्न पडतो - तर अशा वेळी केवळ मुद्दा योग्य वाटतो म्हणून दुसर्‍याचे म्हणणे मान्य करण्याची किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याची नामुष्की येण्याची गरज नाही. खालीलपैकी कोणतेही उपाय वापरा. आपली फुल परवानगी आहे.

१. स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट
हा सर्वात लोकप्रिय व जास्त वापरला जाणारा उपाय आहे. म्हणजे कोणी "खेड्यांत ग्रामीण निसर्गसौंदर्य टिकवले पाहिजे" असे म्हंटले की आपण त्यावर "म्हणजे खेड्यातील लोकांनी असेच राहावे?" असे विचारावे, किंवा त्याहीपुढे जाउन "म्हणजे खेड्यातील लोकांनी कायम उपाशीच मरावे काय?" असा गुगली टाकावा. आणि मग त्यानंतर तुमचा गुगली हाच मूळच्या व्यक्तीने लिहीलेला मुद्दा आहे असे धरून वाद घालावा. म्हणजे "खेड्यातील लोकांनी उपाशी मरावे" हे किती निरर्थक मत आहे यावर बरेच काही लिहावे. तुमचा प्रश्न निरर्थक असल्याने तुम्हाला तो सहज खोडता येतो. त्यामुळे मूळचा मुद्दा आपण खोडून काढला अशा थाटात वागावे. पाहिजे तर इतर एक दोन ठिकाणी जाउन ते जाहीर करावे.

- त्यावर मग तो पोस्टकर्ता मवाळ पक्षातील असेल तर "मला असे म्हणायचे नव्हते" वगैरे पडता पवित्रा घेतो. आता ऑलरेडी आपल्यावर फोकस आला आहे. एक हेतू सफल. त्यानंतर तुमच्यात व त्याच्यात पुरानी दुश्मनी किती आहे त्याप्रमाणे पुढचे पवित्रे ठरतील. 'अपना आदमी' असेल तर मग "कल्पना आहे, पण त्यातून असा अर्थ निघू नये..." वगैरेच्या दिशेने जावे. नाहीतर "प्रत्यक्ष लिहीले नसले तरी तुम्हाला तेच म्हणायचे आहे" अशा आक्रमक दिशेने.
- याउलट तो जहाल पक्षातील असेल तर डायरेक्ट तुमच्या बुद्धीवर शंका घेतो, मग तुम्ही त्याच्या बुद्धीवर किंवा आणखी कशाकशावर घ्यावी आणि मांजा काटलेल्या पतंगाप्रमाणे वाद जाईल तिकडे जाऊ द्यावा.

अशा वेळेस काही चतुर लोक किंवा कंपूवाले पोस्टकर्त्याला +१, अनुमोदन वगैरे द्यायला पुढे होतात, किंवा मूळ विषयावर काहीतरी मुद्दा लिहीतात (रिकामटेकडे कुठले!). वाद योग्य दिशेने जाण्याची भीती निर्माण होते. अशा वेळेस त्या लोकांच्या पोस्टमधला एखादा धागा पकडून तेथून हे पुन्हा चालू करावे. एखादा तरी बकरा मिळतोच.

येथे लक्षात घ्या की दोन्ही केस मधे वाद भरकटवण्याचे व तेथे स्वत:वर अटेन्शन ठेवण्याचे उद्दिष्ट सफल होते.

२. "हेच लोक" थिअरी
आपला समाजशास्त्रीय अभ्यास एवढा अचूक आहे की विविध मते असलेले लोक आपण मॉनिटर करत असतो, कोणत्या प्रसंगात कोणता गट कसा वागतो, त्या गटांत नक्की लोक कोणकोण आहेत याचे शास्त्रीय ज्ञान आपल्याकडे आहे व आपण ते वेळोवेळी नोंद करून ठेवत असतो, असा आभास निर्माण करणे. किंवा काही आयडींच्या गटाचा आपण गेली कित्येक वर्षे गट म्हणून अभ्यास व पाठपुरावा करत आहोत, व मधल्या काळात ते आयडी एक गट म्हणून तसेच राहिलेले आहेत अशा थाटात बोलणे.

उदा: "आत्ता 'अ' पक्षाच्या हिंसक आंदोलनाला विरोध करणारे हेच लोक त्यावेळी जेव्हा 'ब' पक्षाने हिंसक आंदोलन उभे केले तेव्हा त्याला सपोर्ट करत होते", किंवा "रेल्वेच्या भाववाढीला विरोध करतात. पण हेच लोक ३०० चा पिझा ३३० चा झाला तर अजिबात तक्रार करत नाहीत". यात एका बाबतीत विरोध करणारे व दुसर्‍या बाबतीत न करणारे - या "दोन्ही" गटांत तेच लोक होते हे आपल्याला अभ्यासावरून पक्के माहीत असल्याच्या थाटात बोलावे.

कवितांमधे जसे "धुंद धुंद आसमंत" वगैरे लिहीले तरी ४-५ लोक वा वा करायला सहज सापडतात. तसे अशा ढोबळ वाक्यांशी ताबडतोब सहमत होणारे ४-५ लगेच मिळतात. मिळाले नाहीतरी "अचानक सहज उभे करता येतात". त्यामुळे काहीतरी अ‍ॅनेलिटिकल मत लिहील्याचा आभास बरेच दिवस टिकतो.

३. पुडी सोडून देणे
राजकारणात एखादी जरा बर्‍यापैकी लोकप्रिय व्यक्ती असेल, नवखी असल्याने फारशी स्कॅण्डल्स त्यांच्या नावावर नसतील व त्यामुळे त्यांच्याबद्दल जरा काही लोक चांगले लिहीत असतील, तर काही दिवस सर्वांचे तसे चांगले मत होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्याला तर कोणाबद्दल कोणी चांगले बोलणे मान्य नसल्याने वैताग येतो. काळजी नसावी. यावरही उपाय आहे.

"XXX काय? ठीक आहे ठीक आहे. एवढे कौतुक करताय, दापोली प्रकरण तुम्हाला माहीत नसेलच, किंवा तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष केलेले दिसते".
असे काहीतरी सोडून द्यावे. अर्ध्या लोकांना उगाचच मग हे जे कोणी XXX आहेत त्यांचे काहीतरी दापोली प्रकरण आहे असे वाटते. आपला उद्देश साध्य. इतर कोणी मग 'दापोली' प्रकरण काय विचारले तर तेथून गायब व्हावे, किंवा पूर्ण दुर्लक्ष करून विषय भलतीकडे न्यावा.

४. "आत्ता वेळ नाही, नाहीतर तुम्हाला गप्प केले असते"
चालू चर्चेच्या विषयातील (किंबहुना कोणत्याही विषयातील) सर्व उपलब्ध ज्ञान आपल्याकडे आहे, त्यामानाने इतर अगदीच कालची पोरे आहेत. पण केवळ व्यापातून वेळ नसल्याने ते आपण सध्या लिहू शकत नाही. असे सांगावे, पण यासाठी टोन महत्त्वाचा आहे. नुसत्या टोन वरून लोकांना हे खरेच आहे असे वाटायला हवे. अशा वेळी "थांबा जरा वेळाने तुमचा याविषयावर क्लास घेतो", किंवा "मी त्याबद्दल लिहीले तर तुमची बोलती बंद होईल" असे म्हणावे, किंवा आपण इतरत्र कोठेतरी तुम्हाला पूर्ण गप्प केले होते असे ठोकून द्यावे. वाचणार्‍यांपैकी अर्ध्यांचा तरी तुम्ही या विषयातील तज्ञ आहात असा समज होईल.

- अशा वेळी ती दुसरी व्यक्ती पेचात पडते. सज्जन माणूस असेल तर "मला ती चर्चा लक्षात नाही. जरा लिन्क देऊ शकाल काय?" वगैरे सावध व नम्र पवित्रा घेते. त्यावर "बरोबर आहे, ते लक्षात नसेलच..." वगैरे अजून आक्रमक व्हावे किंवा सरळ गायब व्हावे. एक दोन दिवस त्या व्यक्तीला "हा आयडी काहीतरी भारी लिहून आपल्याला निरूत्तर करणार आहे" असे वाटत राह्ते.

- मात्र दुसरी व्यक्तीही पेटली असेल तर येथून सहसा व्यक्तिगत डिवचाडिवचीवर येते. आपल्याला काय फरक पडतो. नाहीतर फॉर अ चेंज संपादकांकडे तक्रार करावी. पाहिजे तर तेथेही खवचट टोन तसाच ठेवावा. "यावर कारवाई करणार नसालच, पण ऑन द रेकॉर्ड राहावे म्ह्णून लिहीतोय" वगैरे.

- नाहीतर अत्यंत वाईट शब्दांत, अंसंसदीय भाषेत समोरच्याला हिणवावे. यथावकाश ती पोस्ट उडवली जाईल. मग त्या विषयांवर आपली मते त्या साईटच्या मतांच्या विरोधी असल्याने आपल्या पोस्ट्स उडवल्या जातात असा कांगावा करावा. एकूणच आपल्या उडवलेल्या पोस्ट्स या त्यातील भाषेमुळे नसून त्यातील मतांमुळे उडवल्या जातात असा कांगावा कोठेही करायला सोयीचा आहे.

५. "तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म"
एखाद्याने व्यक्त केलेले विरोधी किंवा किमान चिकित्सक मत जर आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल, पक्षा बद्दल असेल (किंवा नसेलही, पण तुम्हाला भांडणाची खुमखुमी असेल) तर येथे हे उपयोगी पडते. अशा वेळेस लगेच तशी इतर उदाहरणे घेऊन "त्यावेळेस तुम्हाला असे मत द्यावेसे वाटले नाही का?" हे विचारावे. त्या व्यक्तीला ती घटना माहीत असेल्/नसेल, त्या वेळेस ती व्यक्ती सोशल नेटवर्क वर असेल/नसेल, त्याने काही फरक पडत नाही. किंबहुना त्या व्यक्तीने तसे मत तेव्हाही व्यक्त केले असेल, तरीही काही फरक पडत नाही. फार थोडे लोक स्वतःच्या लिंका ("पिंक लिंक") सेव्ह करून लागेल तेव्हा लगेच वापरू शकतात. तेव्हा चपखल जबाब मिळण्याची शक्यता एकदम कमी आहे. चिंता नसावी.

विरोधी/चिकित्सक मते व्यक्त करणार्‍यांनी एखादे क्षेत्र कायम "मॉनिटर" करत राहून अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीने त्यातील घटनांवर पक्ष वा व्यक्तिविरहीत मते व्यक्त करावीत असा आपला आग्रह आहे असा आभास निर्माण करावा.
मात्र आपण आपल्या नावडत्या गोष्टींवर तशीच मते देताना त्याचा स्वतःला विसर पडू द्यावा. लोकांना आयडी व त्यांची इतरत्र लिहीलेली मते यांचा ताळमेळ लावण्याएवढा इंटरेस्ट नसतो (ज्यांना इंटरेस्ट वा वेळ असतो त्यांच्याशी ऑलरेडी तुमचे भांडण चालू असतेच), त्यामुळे कोणाच्याही लक्षात येत नाही. बिन्धास्त लिहावे.

असो. तर सध्या हे पाच उपाय सुचवले आहेत. अजूनही आहेत. पण ते वापरले गेलेले दिसले तर या यादीत अ‍ॅड होतील याची खात्री बाळगा.

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2014 - 9:34 am | टवाळ कार्टा

मी पयला :) \m/

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2014 - 9:38 am | टवाळ कार्टा

यातले काही नमुने सध्ध्या मिपावर पडीक असतात ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Aug 2014 - 10:05 am | ज्ञानोबाचे पैजार

आपण एकटेच शहाणे आणि बाकीचे सगळे मुर्ख असा एकंदर सूर मला या लेखा मधून दिसत आहे.

अशा प्रकारचे एकांगी विचार असलेला धागा संं. मं. नी अजून मुख्य पानावर कसा ठेवला आहे?

याच प्रकारचे लेखन जर दुसर्‍या कोणत्या आयडी ने केले असते तर धागा राहिला असता का?

पैजारबुवा,

मृत्युन्जय's picture

25 Aug 2014 - 11:08 am | मृत्युन्जय

हाहाहा. श्री श्री फारएण्डबुवांना पहिला शिष्य देखील मिळालेला दिसतोय.

प्रभाकर पेठकर's picture

25 Aug 2014 - 10:06 am | प्रभाकर पेठकर

वादग्रस्त मुद्दे किंवा 'वादग्रस्त करण्यात आलेले' मुद्दे, मतभेद, जाणूनबुजून केलेला विरोध किंवा समर्थन आणि धागे शतकी, पंच शतकी करण्याचा सोस ह्या गहन विषयातील आपला सखोल अभ्यास कौतुकास्पद आहे. अचूक निरिक्षणांमधून मिळविलेले हे ज्ञान नक्कीच अमुल्य आहे. ह्यातले कांही इथेच असतात तर कांही 'परग्रहावरून' येऊन-जाऊन असतात.
लेख आवडला आणि पटला ही.

मंदार दिलीप जोशी's picture

25 Aug 2014 - 10:30 am | मंदार दिलीप जोशी

अप्रतीम :D

अन्या दातार's picture

25 Aug 2014 - 10:37 am | अन्या दातार

मुळात मीच जे काही बोलतो ते सत्य असताना अश्या धाग्यांची गरजच काय? निरर्थक प्रयत्नांचा उत्तम नमुना म्हणून या धाग्याकडे बघावे लागेल असे (मीच) म्हणतो. ;)

अजया's picture

25 Aug 2014 - 10:41 am | अजया

:-))

इनिगोय's picture

25 Aug 2014 - 10:52 am | इनिगोय

थोडक्यात मिपा हे असल्याच निरर्थक वादविवादांसाठी गाजत राहावं आणि ओळखलं जावं असं म्हणायचं आहे काय? या अशा पवित्र्यामुळेच मिपावर दर्जेदार लेखन मागे ढकललं जाऊन, निष्फळ काकु गाजत राहतात. अशाने मिपाचा दर्जा उंचावणार कधी?

(पहिलाच प्रयत्न आहे हो.. जमलंय काय? ;-) बाकी प्रिंटौट घेऊन अभ्यास सुरू केला आहेच. :-p)

जमतंय का? फक्कड जमलंय... आता फारएंडच नीट मूल्यमापन करू शकतील.

मृत्युन्जय's picture

25 Aug 2014 - 11:07 am | मृत्युन्जय

हाहाहा, लै भारी. आवडेश

यशोधरा's picture

25 Aug 2014 - 11:08 am | यशोधरा

कोणत्याही संस्थळाला चपखल लागू पडणारा लेख! काय अभ्यास केलाय! झकास! :D

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Aug 2014 - 1:58 pm | माम्लेदारचा पन्खा

उपरोक्त विचार प्रचंड मेहनत घेऊन "प्रसवलेले" आहेत ……पंच शतकी धाग्याची तयारी स्पष्ट दिसते आहे …शुभेच्छा !!

कपिलमुनी's picture

25 Aug 2014 - 2:15 pm | कपिलमुनी

विदा आहे का ?
मग विदा फालतू आहे ई ई ..

पैसा's picture

25 Aug 2014 - 4:14 pm | पैसा

हेच लोक मिपा कसे सुधारेल म्हणून गफ्फा मारत होते ना पर्वा!

(जमलं, जमलं!! =)) )

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 5:21 pm | प्यारे१

एक मुद्दा पटतोय, बाकी मुद्द्यांसाठीचा नेमका विदा पहावा लागेल.

१८४२ च्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणातच येत्या काळात जेव्हा लोकांना काही काम नसेल तेव्हा ते संगणकाच्या माध्यमातनं आंतरजाल वापरुन काही उपटसुंभ मतं मांडतील असं भाकीतच म्हणता येईल असं मत व्यक्त केलं गेलं होतं.

पण फारएण्ड सारख्या अ भ्यासू (विविध पडेल चित्रपटांचा व्या सं ग हा अभ्यासच) व्यक्तीकडून ही अपेक्षा नव्हती.

श्रीरंग_जोशी's picture

25 Aug 2014 - 5:52 pm | श्रीरंग_जोशी

साष्टांग दंडवत घ्या भौ!!

जालिय सत्य उमगलेला माणूस - फारएन्ड!!

भारतीय's picture

25 Aug 2014 - 6:29 pm | भारतीय

असाच एक नमुना सध्या एका अबप नावाच्या दुरचित्रवाहिनीवरील प्राइम टाइमला ज्वलन्त चर्चेच सुत्रसन्चालन करत असतो..

मुक्त विहारि's picture

25 Aug 2014 - 9:31 pm | मुक्त विहारि

हहपुवा...

रामपुरी's picture

25 Aug 2014 - 11:03 pm | रामपुरी

हि सगळीच्या सगळी लक्षणे इथल्या एका आयडीला अचूक लागू पडतात. त्यावरूनच हा लेख लिहिला आहे काय? असे एकालाच लक्ष्य करून चिखलफेक करणे योग्य आहे काय? संपादक मंडळ इकडे लक्ष देणार काय?

प्यारे१'s picture

25 Aug 2014 - 11:10 pm | प्यारे१

+१११.
एकाच काय अनेक अनेक.
बाकी संमं लक्ष देणार नाही.
हल्ली संपादक मंडळाचा पक्षपातीपणा वाढलेला आहे ह्याबद्दल आमच्या मनात अजिबात दुमत नाही.
असो!

धाग्याला अनुसरुन प्रतिसाद देण्याचा प्रयत्न आहे असं वाटल्यास योगायोग सम..... (मुळे-मुठेच्या पाण्यात गेली अक्षरं वाहून)

सुहास..'s picture

26 Aug 2014 - 1:44 am | सुहास..

फार्‍या , आवडलं, अचानक या फंद्यात कसा काय रे ;)

खटपट्या's picture

26 Aug 2014 - 4:27 am | खटपट्या

ढिशक्लेमर :

कोणा मिपाकराला असे वाटले कि, आपण स्वत:, वर्णन केलेल्या ५ प्रकारातील एका प्रकारात मोडतो. किंवा वरील ५ हि प्रकार स्वत:ला लागू होतात, तर तो अजिबात योगायोग समजू नये. हे सर्व आपल्यालाच नजरेसमोर ठेवून लिहिले आहे असे खुशाल समजावे.

पुतळाचैतन्याचा's picture

26 Aug 2014 - 1:33 pm | पुतळाचैतन्याचा

रोख-ठोक मारण्या एवढी विचारांची स्पष्टता नसेल तर हे उद्योग करावे लागतात...ज्याचा-त्याचा प्रश्न...!!!

वेल्लाभट's picture

26 Aug 2014 - 2:23 pm | वेल्लाभट

जबर अभ्यास !

हिलेरियस !

काळा पहाड's picture

26 Aug 2014 - 11:46 pm | काळा पहाड

म्हणजे लोकांनी आपली मते स्पष्टपणे सांगू नये असा आपला आविर्भाव दिसतो. लेखन स्वातंत्र्यावर अशी जळजळीत व निरर्थक टीका मी प्रथमच ऐकतो आहे. पुलं स्टाईल विनोद करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना आपण हे ही विसरून गेलात की लेखन स्वातंत्र्याचा संकोच हे हुकुमशाहीच्या दिशेचं पहिलं पाऊल असतं. किंबहुना, लेखन स्वातंत्र्याची मुंडी मुरगाळली की आपल्यावर होणार्‍या टीकेची धार बर्‍याच प्रमाणात बोथट करता येते. विनोद करण्याचा प्रयत्न करण्याच्या भरात हे तुमच्या लक्षात येवू नये हे दुर्दैव. ज्या इंटर्नेट ची सुरवात एक मुक्त माध्यम म्हणून झाली तिथेच तुम्ही मते (भले जहाल का असेनात!) व्यक्त करणार्‍यांचे विडंबन करता आणि सर्वजनांचे मत अशांबद्दल कलुषित करता, या बद्दल तुमचा निषेध.

बॅटमॅन's picture

27 Aug 2014 - 12:58 pm | बॅटमॅन

जमलंय!!! =))

होकाका's picture

28 Aug 2014 - 6:01 pm | होकाका

मस्त!

कवितानागेश's picture

28 Aug 2014 - 11:29 pm | कवितानागेश

हा सगळा आचरट कारभार फार पूर्वीपासून वाचत आलेय. कधी सुधारणार लोक? संकेतस्थळ असल्या टवाळखोरीसाठी चालवले जात नाही याची जाग आपल्या मराठी समाजाला कधी येणार?

चिगो's picture

29 Aug 2014 - 2:33 pm | चिगो

आयला ! जबराट अभ्यासपुर्ण आहे की हे प्रकरण.. झक्कास, फारएन्डराव..

मदनबाण's picture

30 Aug 2014 - 7:54 am | मदनबाण

जबराट ! काय तो अभ्यास ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- टिम टिम टिंबाली... {बाप्पाचे कोळी गीत}

उत्खनक's picture

5 Jun 2015 - 9:54 pm | उत्खनक

जालीय अभ्यासाचा इरसाल नमुना!..
__/\__

गणेशा's picture

6 Jun 2015 - 12:43 am | गणेशा

भारीच

सागरकदम's picture

24 Nov 2015 - 11:43 pm | सागरकदम

लई भारी

नाखु's picture

25 Nov 2015 - 10:19 am | नाखु
जाहीर अवांतर: "हे असलं वाचायला मी मिपावर येतो का? हे असं धोरण विरोधी चालवून घेतलं जात याच जाम वैषम्य वाटत आणि मिपाची चिंता वाटते म्हणून लिहिले अन्यथा मला इतके टंकायला वेळ कुठे आहे"

स्वगत अवांतरः "हा लेकाचा वाचतो कधी,वाचते ते वाचतो लक्ष्यात ठेवतो आणि लक्ष्यात ठेऊन वर लिहितोही , अजब अतर्क्य आहे सारं ! मोठ विलक्षण आहे हे"

अंतर्मन अवांतर :"अभ्यास असा पाहिजे, नाहीतर तू गेली ७ वर्ष मिपावर नुस्ती वाचनगिरी करण्यात घालवली रे, निव्वळ कालाप्व्यय रे, कधी सुधारणार तू !!!! जाऊ दे अता सांगून काय उपयोग, च्छ्या वैताग आहे नुस्ता"

पुंबा's picture

29 Jun 2017 - 5:22 pm | पुंबा

जब्रा..

धर्मराजमुटके's picture

29 Jun 2017 - 5:28 pm | धर्मराजमुटके

हा लेख अपरिवर्तनीय वर्तणूकीचे उत्तम उदाहरण तसेच १००% अचुक असल्यामुळे त्याला धर्मग्रंथाचे किंवा गेला बाजार भारतीय राज्यघटनेतील एखाद्या परिच्छेदाच्या तोडीचे स्थान मिळावे अशी मी मागणी करत आहे.

वामन देशमुख's picture

16 Jan 2020 - 5:01 pm | वामन देशमुख

येकदम खतरा!

तर सध्या हे पाच उपाय सुचवले आहेत

पाच वर्ष उलटून गेली, आता पुढचे पाच उपाय सुचवा की राव!