सुकेत्सु - १
नेहमी सुकेत्सुला घरातून निघून कार्मेल मार्केटमधल्या ऑफिसमध्ये पोहोचायला तसा वेळ लागत नसे. कंपनीने दिलेल्या कारमधून अगदी आरामात ड्राइव्ह करत गेला, तरी सहाव्या मिनिटाला तो ऑफिसमध्ये त्याच्या डेस्कवर पोहोचत असे. होलोन हे शहर तसं लहानच, आपल्या पुण्यातल्या कोथरूडपेक्षा थोडं मोठं, जेमतेम दोन लाख लोकसंख्या. पण आज सकाळपासून सगळं बिनसतच गेलं होत. काल रात्री जोसेफबरोबर ड्रिंक्स घेत मारलेल्या गप्पा आणि डिनरमुळे घरी यायला बराच उशीर झाला. त्यामुळे सकाळच वेळापत्रकच गडगडलं, सकाळच्या व्यायामाला डच्चू देत, आवरून ऑफिसमध्ये पोहोचायला तब्बल दहा मिनिटं उशीर झाला होता. तसं त्याला विचारणारं कोणी नव्हतं, पण त्याला स्वतःलाच उगीच अपराधी वाटे. लॅपटॉप उघडणार, तेवढ्यात मोबाइल स्क्रीनवर युरीचा मेसेज झळकला. "Hi Ketu, I have booked room at Hotel PoliHosts Old Jaffa for this week Sabbath. Be ready at 1630. Will pick you from office." मेसेज बघून त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलं. साडेचारला ती येणार, म्हणजे चारपर्यंत आवरायला हवं. मेलबॉक्समध्ये सगळ्यातवर यीगलची मेल होती. आजच्या मंथली रिव्ह्यू मीटिंगबद्दल. नेमकं आजच त्यालाही यायचं होतं! यीगल एलॉन - ‘एफेस सोलवानुत’ कंपनीचा प्रेसिडेंट. तसा तो नेहमी नसायचा ऑफिसमध्ये. पण बऱ्याच वेळा मंथली मीटिंगला हमखास हजेरी लावत असे. इस्रायलभर पसरलेल्या त्याच्या मोठ्या उद्योगविश्वातून आमच्या छोट्याश्या कंपनीकडे द्यायला त्याच्याकडे वेळ नसे बहुधा, पण ही कंपनी आणि यातले प्रोजेक्ट ही त्याची पॅशन असावी.
पँट्रीमध्ये कुणीतरी कॉफी मशीन चालू केलं, त्याचा वास सर्व ऑफिसभर पसरला. त्याला चहाची आठवण झाली. ऑफिसमध्ये पर्शियन हर्बल चहा मिळे. चव भारतातल्या चहाच्या जवळपास जाणारी. चहाचा कप भरून आणून त्याने स्वतःला कामात बुडवून घेतलं.
बरोबर दहाच्या ठोक्याला यीगल ऑफिसमध्ये आला. बरोबर कोणीतरी होतं, त्यामुळे केबिनमध्ये न जाता तो सरळ मीटिंग हॉलकडे वळला - म्हणजे आजची आपली साडेदहाची मीटिंग पुढे जाणार बहुतेक. एवढ्यात त्याच्या सेक्रेटरीचा मेसेज आला - मीटिंग बारा वाजता पुढे ढकलल्याचा. म्हणजे आज लंच बोबलणार तर. तो सरळ कॅन्टीनकडे वळला. थोडं खाऊन घेतलेलं बरं.
मीटिंग अपेक्षेप्रमाणे संपली नाही. यीगलने मीटिंग हॉलमध्येच वर्किंग लंच मागवलं आणि ती मीटिंग तब्बल दोन वाजता संपली. आधी ठरलेली रिव्ह्यू मीटिंग यीगलने पुढे ढकलली, याचा अर्थ आलेला माणूस खूप महत्त्वाचा असणार. मीटिंगच्या सुरुवातीला खुद्द यीगलने त्याचा खुलासा केला. तो होता सीक्रेट सर्व्हिसेसचा माणूस. आणि सुकेत्सु सध्या करत असलेल्या प्रोजेक्टसंदर्भातच ती मीटिंग होती. सुरुवातीची ओपनिंग करून देऊन यीगलने सगळी सूत्रं सुकेत्सुच्या हवाली केली. प्रोजेक्टची माइलस्टोन, आतापर्यंतची प्रोग्रेस, बजेटिंग, मॅनपॉवर इत्यादी आकडेवारी प्रेझेंट करताना सुकेत्सु त्यात पूर्ण बुडून गेला. समारोपाच्या वेळेस, "तू बजेट आणि मॅनपॉवरची चिंता करू नको, पण प्रोजेक्ट सहा महिने लवकर संपायला हवा, त्या दृष्टीने तू प्लॅनिंग परत कर आणि हे तू करू शकतोस" असं सांगून मीटिंग आटोपती घेतली. घड्याळात काटे साडेपाचच्यावर पोहोचले होते. मीटिंग संपल्यावर सगळ्यात आधी सुकेत्सुला आठवण झाली ती युरीची आणि तिने दिलेल्या साडेचारच्या वेळेची. त्याच्या सायलेंट केलेल्या फोनवर चार मिस कॉल्स आणि तेवढेच मेसेजेस. शेवटचा मेसेज वाचतच तो धावत रिसेप्शनमध्ये पोहोचला. डोळे मिटून कोचवर बसलेल्या युरीला बघून त्याच्या जीव भांड्यात पडला.
सुकेत्सु - २
युरी समोरच्या कोचावर विसावली होती. डोळे मिटलेले, मान किंचित एका बाजूला कललेली, उजव्या हाताने हनुवटीला दिलेला आधार, गोरा तांबूस वर्ण, कोरलेल्या भुवयांतून सणसणीत पुढे येणारं अपरं नाक, मागे बांधलेल्या पोनीतून सुटून गालावरच्या खळीशी सलगी करणारी खट्याळ बट, काळ्या पॅंटमध्ये इन केलेला फिकट गुलाबी लिननचा फुल शर्ट,वरती घातलेलं करड्या रंगाचं जॅकेट. जॅकेट किंचित बाजूला सरकल्यामुळे, खांद्यांच्या होल्स्टरमध्ये अडकवलेलं ग्लोक-१७ पिस्तूल. पावलांचा आवाज न करता पुढे जाऊन त्याने हळुवारपणे तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. "ओह्ह केतू डिअर" डोळे बंद ठेवूनच युरी चित्कारली. कोणतीही घाई न करता तिने त्याच्या गळ्यात हात टाकतवर सरकून त्याचा मिठीत शिरली. "चल, निघू या, आधीच उशीर झालाय" तिचे हात सोडवत तो म्हणाला.
'केतू," हे त्यांच्या पहिल्या भेटीतच युरीने त्याच्या नावाचं - सुकेत्सुच केलेलं लघुरूप. इस्रायली वडील अवराहम आणि डेन्मार्कची इमा यांची सर्वात धाकटी मुलगी युरी. अवराहमचे आजोबा पूर्वी कधीतरी डेन्मार्कमध्ये येऊन स्थायिक झालेले.
अवराहमचं बालपण सगळं कोपेनहेगेनमध्ये गेलेलं. पण घरच्या संस्कारात इस्रायलची मुळं रुजलेली. इमाशी लग्न झाल्यावर त्यांना आपल्या मातीची ओढ स्वस्थ बसू देईना, म्हणून इस्रायलला परत आले, तेव्हा युरीचा सगळ्यात मोठा भाऊ जेमतेम वर्षाचा होता.मध्ये एक भाऊ आणि बहीण, युरी हे शेंडेफळ.
केतूची आणि तिची पहिली भेट झाली ती हैफाच्या कल्चरल सेंटरमध्ये. तीन-एक वर्षांपूर्वी. केतू नुकताच इस्रायलमध्ये आला होता. सुरुवातीचे काही दिवस सेटल होण्यात गेले. एके दिवशी यीगल एलॉनने त्याला हैफा इंटरनॅशनल स्कूलच्या प्रोग्रॅमचे पासेस दिले आणि कार्यक्रमाला आवर्जून जाण्यास सांगितलं. उरी त्याच संस्थेत शिकलेली. इंटरनॅशनल जर्नलिझममध्ये ग्रॅज्युएशन केल्यावर दोन वर्ष अनिवार्य असलेली मिलिटरी सर्व्हिस जॉइन करण्याच्या आधी याच संस्थेत काही काळ ती काम करत होती. त्या वेळी असलेल्या इतर शिक्षकांबरोबर तिची चांगली गट्टी जमली होती. त्यामुळेच ती या कार्यक्रमात सहभागी झाली होती. आणि परदेशी पाहुण्यांची खास सरबराई करण्याची जबाबदारी तिने अगदी आनंदाने स्वतःवर घेतली होती. केतू त्याच कार्यक्रमात पाहुणा म्हणून आलेला. दोघांची ओळख झाली आणि नंतर मैत्री.
केतुची कार ऑफिसमध्येच सोडून ते युरीच्या कारमधून तासाभरात पॉलिहोस्ट रिसॉर्टला पोहोचले. चेक-इन करून दहा मिनिटांत ते बीचवरच्या रेस्टॉरंटमध्ये आले. आधीच बुक केलेल्या टेबलावर आल्यावर दोघांनी आपापल्या ड्रिंक ऑर्डर केल्या. ड्रिंक येईपर्यंत, पश्चिमेच्या आकाशात चालू असलेली लाल केशरी रंगांची उधळण अनिमिष नेत्रांनी न्याहाळणाऱ्या युरीच्या डोळ्यातलं प्रतिबिंब पाहण्यात केतू गढून गेला. वाइन आणि बिअरचा आस्वाद घेत त्याची संध्याकाळ त्या फेसाळणार्या समुद्रासारखी उत्तरोत्तर उधाणत गेली.
सुकेत्सू - ३
केतूला रात्री कशाने तरी जाग आली. बेडशेजारच्या डेबलवर असलेल्या आपला फोन घ्यायला हात लांब केला, तर युरीने काढून ठेवलेल्या होल्स्टरवर हात पडला. त्याने चपापून हात मागे घेतला. सुरुवातीला त्याला खूप आश्चर्य वाटे. एका मुलीने सतत जवळ पिस्तूल बाळगणं, हे त्याच्या पचनी पडायला बराच वेळ लागला. पण युरीचा जॉबच तसा होता. सिक्रेट सर्व्हिस एजंटचा. सुरुवातीला ओळख झाल्यावर तिने स्वतःच्या जॉबबद्दल सांगणं अगदी हेतुपुरस्सर टाळलं. पण नंतर त्यांच्या भेटी वाढल्या. सुरुवातीला तीदेखील केतूबद्दल थोडी साशंक होती. पण नंतर तिच्या सोर्सेसकडून तिने पूर्ण माहिती काढली आणि स्वतःची खातरी पटल्यावर मग ती अगदी मोकळी झाली. सुरुवातीच्या दिवसात युरीच वागणं केतूला थोडं विचित्र वाटायचं, गप्पा मारत असताना तिचा दुसरा (ऑफिशिअल) फोन वाजला की ती हिब्रूमध्ये जरा लांब जाऊन बोलायची, ऑफिसचं काम आहे असं सांगूनमध्येच एकदम चार-पाच दिवस गायब व्हायची, स्वतःचा देश, ज्यू लोक यांच्याबद्दल बोलताना मोजूनमापून बोलायची. पण त्या वेळेस तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक असायची.
होल्स्टर आणि त्यातल्या ग्लोक-१७ पिस्तूलमुळे त्याला एक जुनी घटना आठवली.
ओळख झाल्यानंतर साधारण सहा महिन्यांनंतरची गोष्ट असेल,
आजारी असल्यामुळे गेले दोन दिवस तो घरीच होता. संध्याकाळची वेळ, नुकताच झोपेतून उठलेला. क्रोसिन घेतल्यामुळे तापाची ग्लानी थोडी उतरली होती. बाहेर पावसाची भुरभुर चालू होती. नुसतंच लोटलेलं दार उघडून युरी आत येत म्हणाली, "हे, यंग मॅन, अशा रोमँटिक संध्याकाळी घरी काय बसलायस? चल बाहेर, मस्त हवा आहे" हॉलमधून बेडरूममध्ये येताच ती थबकली. दोन दिवस घराबाहेर पडलेलाच नसल्यामुळे खोलीचा अगदी अवतार झाला होता. “अरे, काय झाल तुला?” बेडवर उठून बसलेल्या केतूकडे सरळ येऊन कपाळावर हात ठेवत तिने विचारलं, "अरे, ताप आहे तुला! कधीपासून? कळवलं का नाहीस मला? औषध घेतलंस का? सकाळपासून काही खाल्लंस तरी का?"
"अग, हो हो! बस तरी आधी.."
बेडशेजारी पडलेल्या औषधांवर आणि दुपारी मागवलेल्या पण न उघडलेल्या डब्यावरून नजर फिरवीत, तिने सगळ्याचाच ताबा घेतला.
"तू उठू नकोस, पडून रहा अगदी. मी आधी पाणी गरम करून आणते, स्पंजिंग करून घेऊ, मग सूप करते गरम गरम. त्याने एकदम फ्रेश वाटेल तुला."
तिने आधी गिझर ऑन केला, सूपची तयारी केली आणि गरम पाण्याने स्पंजिंग करायला लागली.
स्पंजिंगने त्याला खूप बरं वाटलं. तिच्या त्या मायेच्या स्पर्शाने त्याला आईची खूप प्रकर्षाने आठवण आली. डोळ्यात नकळत पाणी तरळलं.
युरीच्या ते लक्षात आलंच. काहीच न बोलता तिने शांतपणे त्याच्या डोक्यावर थोपटलं.
स्पंजिंग झाल्यावर कपडे बदलून सूप आणि टोस्ट पोटात गेल्यावर दोन दिवसाचा शीण निघून गेला.
कॉफीचा मग घेऊन ती बेडच्या शेजारी असलेल्या खुर्चीवर बसत हसत हसत म्हणाली. "अरे मित्रा, तुला आजारी पडण्याची नपेक्षा होमसिक होण्याची परवानगी दिली कुणी? सोलापूरची, मिनीची आठवण येते का? की तुझ्या अनायाची?"
"अरे, तुला कसं माहीत? सोलापूर, मिनी, अनाया? आपलं तर कधीच या विषयावर बोलणं झालं नाही." केतूला आश्चर्य लपवता आलं नाही.
"ओ, माय डिअर, आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्याची एवढी साधी खबर आम्हाला नसती, तर या देशातून आमच्या शत्रूंनी आम्हाला केव्हाच हुसकावून लावलं असतं."
"पण मी तुझा पाहुणा म्हणून येणार, हे तुला कुठे ठाऊक होतं? मग ही माहिती कधी काढलीस आणि कशी?" तिला जवळ ओढत केतू म्हणाला.
"तुला सगळंच सविस्तर सांगावं लागणार. आजपर्यंत आपण या विषयावर कधी बोललो नाही."
पायातले शूज काढून, कमरेचं होल्स्टर मोकळं करत ते केतूच्या उशाशी ठेवून, बेडवर त्याच्या शेजारी बसत युरीने पुढे सांगायला सुरुवात केली, "यीगल एलॉन - एफेस सोलवानुत कंपनीचा प्रेसिडेंट तुझा बॉस, त्याच्याकडून तुझा भूतकाळच नाही, तर अगदी आत्ताच्या वर्तमानापर्यंत सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात. माझ्या जॉबबद्दलहि आपण कधी डिटेलमध्ये बोललो नाही. मी इस्रायल गव्हर्नमेन्टच्या सीक्रेट सर्व्हिसचा भाग आहे. सिक्रेट सर्व्हिसेसमध्ये बऱ्याच डिपार्टमेंट्सचा समावेश आहे. ही सगळी मंडळी स्वतंत्रपणे काम करत असली, तरी त्यांच्यात एकमेकात को-ऑर्डिनेशन असतं. प्रोजेक्टनुसार प्रत्येकाची गरज असेल तशी मदत घेतली जाते. ह्या पूर्ण नेटवर्क साखळीत यीगल एलॉनसुद्धा कुठेतरी जोडला गेलेला आहे. त्यांना ज्या वेळी तुझ्यासारख्या इंजीनिअरची गरज निर्माण झाली, त्या वेळी जगभर शोध चालू होता. तुझं प्रोफाइल आणि कदाचित माझं नशीब तगडं होतं, म्हणून तू शॉर्टलिस्ट झालास. तुझ्या बालपणापासूनची कुंडली तयार करण्यात आली. एफेस सोलवानुतची जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली. तू त्याला अप्लाय केल्यावर पुढच्या गोष्टी या फक्त फॉर्मॅलिटीज होत्या." शेजारच्या ग्लासमधल्या पाण्याचा घोट घेण्यासाठी थोडा वेळ पॉज घेतला.
“तू इकडे आल्यावर तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या युनिटवर टाकण्यात आली. सुरुवातीच्या ब्रीफींगमध्येच तुझी सगळी माहिती माझ्याकडे आली. त्यात तुझी राहण्याची व्यवस्था, तुझ्या दररोजच्या दिनक्रमापासून तू सुट्टीच्या दिवशी काय करणं अपेक्षित आहे ते सर्व तपशील होते. तुझ्या संपर्कात कोण कोण येणार हेदेखील त्यांनी ठरवलं होतं."
"थोडक्यात तू माझ्यावर सोडलेला हेर आहेस तर!" केतू बसलेल्या धक्यातून सावरत म्हणाला
"हो, सुरुवात तर तशीच झाली होती. अगदी हेर म्हणता येणार नाही, पण तुझ्या सुरक्षेसाठी हे आवश्यकच होतं.” सहमतीच्या सुरात युरी म्हणाली. “पण त्याच्यामुळेच तर मला तुझ्यासारखा एक चांगला मित्र मिळाला."
"अग, पण माझ्यापासून तुम्हाला काय धोका होता? मी तर एक मध्यममार्गी पापभीरू, नोकरीच्या शोधात आलेला एक सडाफटिंग माणूस. फक्त आवडीच्या आणि आव्हानात्मक क्षेत्रात काम करायला मिळावं म्हणून आपला देश सोडून आलेला." केतूचा सूर थोडासा तक्रारीचा आणि किंचित रागाचा लागलेला युरीला जाणवला.
थोड्याशा नरमाईंने आणि समजुतीच्या स्वरात युरी पुढे म्हणाली, "तुझ्यापासून नाहीच रे, तर उलट तुझी काळजी घेण्यासाठीच हे सगळं. तू ज्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करतो आहेस, त्याची गोपनीयता आणि तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची."
"गोपनीयता मी समजू शकतो, त्यासाठी ऑफिसात जागोजागी असलेले बायो-सेन्सर्स, सर्व्हर आणि सिस्टिमची पाच लेअरवर असणारी सिक्युरिटी, हे सगळं आहेच की! पण आमच्या जिवाला का धोका असेल? आणि या सगळ्यावर तुम्ही इतका प्रचंड पैसा का खर्च करताय?"
"डिअर, आमच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई असते. सतत असं टोकावर असणं, सावध असणं हे आता अंगवळणी पडलंय. दोन हजार वर्षांपूर्वी जसं रोमन लोकांनी आमच्यावर आक्रमण करून या देवभूमीतून आम्हाला खदेडून बाहेर काढलं, तशी पाळी पुन्हा येऊ नये म्हणून सदैव सज्ज राहावं लागतं. जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांत आमचे पूर्वज त्या वेळेस विखुरले, पण सगळीकडे त्याच्या भाळी अन्वनित अत्याचार आणि हालअपेष्टाच वाट्याला आल्या. तुला माहीती नसेल, पण तुझा देश हा त्याला एकच अपवाद होता, जिथे आमच्या पूर्वजांवर कोणी अत्याचार केला नाहीच, उलट त्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेतलं. शेकड्याने तुझ्या देशाकडे निघालेली आमची माणसं ज्या जहाजात होती, ते किनाऱ्याला लागायच्या आतच खडकावर आपटून फुटलं. त्या अपघातातून नशिबाने वाचले, त्यात होत्या फक्त सात बायका आणि सात पुरुष. ते कसेबसे किनाऱ्याला लागले. ते तुमच्या कोकणातील नवगावला. जिवंत लोकांबरोबर बरेच मृतदेह किनाऱ्याला लागले. त्या सात जोडप्यांनी गावकऱ्यांकडून जमीन विकत घेऊन त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. आजदेखील तुला तिथे त्या कबरी पाहायला मिळतील. बाकी सगळ्या देशांमध्ये आमच्या वाट्याला दुःख, अवहेलनाच आली. युरोपात तर अत्याचाराची परिसीमा गाठली गेली, लाखो लोकांना वेगवेगळ्या प्रकारे जीवे मारण्यात आलं, त्याचा इतिहास तर तुला माहीतच असेल."
"हुं" केतू नुसताच हुंकारला. युरीचं त्याच्या हुंकाराकडे लक्षच गेलं नाही. "जगभर विखुरले असले, त्या लोकल वातावरणात समावण्याचा केला. पण त्या परिस्थितीतदेखील त्यांनी आपली संस्कृती, भाषा, संस्कार जपण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्या ठिकाणी ते उपरेच ठरत गेले. कोणताच देश त्यांना आपला वाटला नाही. या सगळ्यातून बाहेर पडायचे असेल, तर आपल्याला आपली स्वतःची भूमी असली पाहिजे, ही कल्पना मूळ धरू लागली. गरज होती ती त्यांना एकत्र बांधण्याची. पोलंडमध्ये राहत असलेल्या डॉ. वाईझमन आणि डेव्हिड बेन गुरियन या धुरिणांनी त्याला एक चळवळीचं स्वरूप दिलं. झायोनिस्ट चळवळ पाहता पाहता जगभर पसरली. हळूहळू वेगवेगळ्या बहात्तर देशांतून लोक इथे यायला सुरुवात झाली. इथल्या जमिनी अरबांकडून विकत घेतल्या. इंग्रजांनी नेहमीच्या कूटनीतीप्रमाणे, अरब आणि ज्यू दोघांनाही आश्वासन दिलं की, आम्ही तुमची होमलँड तुम्हाला देऊ. पॅलेस्टाइन. एकच प्रदेश दोघांनाही द्यायचं वचन दिलं, एकच घर दोघांना विकण्याचा प्रकार होता. मग त्या घरात राहणार कोण? ज्याच्या हातात शस्त्र, तोच ते ठरवणार हे अपरिहार्यच होतं. बळी तो कान पिळी. युद्धाशिवाय आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता."
"हो, पण पॅलेस्टाइन का?"
"कारण ही आमची भूमी, आमच्या धर्माचा आद्य प्रेषित अब्राहमपासून अगदी आयझॅक आणि मोझेसपर्यंत सगळ्यांनीच पावन केलेली ही भूमी. जिचं वर्णन टेन कमांडमेंट आणि ओल्ड टेस्टामेंटमध्ये 'लँड ऑफ मिल्क अँड हनी' असं केले आहे. जेरुसलेम आणि भवतीचा भूभाग ही आमच्यासाठी देवभूमी. जुडाइझम हा सर्वात प्राचीन धर्म. मानवाची उत्पत्ती, मानवाच्या जगण्याचं रहस्य, जगण्याचे नियम हे सगळं तुला त्या धर्माच्या शिकवणीत मिळेल. ख्रिश्चन लोकांचा जिझस हादेखील जन्माने ज्यू, त्याचा जन्म याच भूमीतला, पण नंतरचा. त्याच्या विचारातून ख्रिश्चानिटीचा जन्म झाला. ओल्ड टेस्टामेंटमध्ये भर घालून नवीन टेस्टामेन्ट तयार झाला. मोहमद पैगंबर आणि इस्लाम त्याच्याही नंतरचे. पण सगळ्यांनाच जेरुसलेम हवंय. आमच्या वाट्याला जी जमीन आली, नव्हे, जी आम्ही तीन युद्धं करून मिळवली, ती टिकवायला आणि आमचं स्वातंत्र अबाधित राखायला आम्ही कोणतीही किंमत द्यायला तयार असतो.
आम्ही स्वतःचं आणि देशाचं रक्षण हे आमचं आद्य कर्तव्य समजतो. म्हणूनच आमच्याकडे कॉलेजमधून बाहेर पडल्यावर प्रत्येकाला - मुलगा असो व मुलगी - मिलिटरी ट्रेनिंग अनिवार्य असतं. ट्रेनिंगनंतर मुलांना कमीत कमी तीन वर्षं आणि मुलींना दीड वर्ष मिलिटरी सर्व्हिस करावीच लागते. नंतरदेखील दर वर्षी चाळीस दिवस रिफ्रेशर कोर्स करावाच लागतो.
माझे वडील ज्या वेळेस डेन्मार्कहून इथे आले, त्या वेळी ते वीस वर्षाचे होते. त्यांनादेखील यातून जावं लागलं. गोलान टेकडीच्या युद्धात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. मी जर्नालिझम केलं असलं, तरी मिलिटरी ट्रेनिंगनंतर मला सीक्रेट सर्व्हिसेस जॉइन करण्याची संधी मिळाली आणि मी ती एन्जॉय करतेय."
औषधांमुळे असेल, पण केतूला थोडीशी ग्लानी आली होती. डोळे जड झाले. युरीच्या ते लक्षात आल्यावर पटकन उठत ती म्हणाली, "अरे, मी काय बडबडत बसले.. तुला विश्रांतीची गरज आहे. झोप तू आता, मी येते उद्या सकाळी परत, गुड नाइट." त्याच्या अंगावर चादर घालून त्याच्या कपाळाचं हलकेच चुंबन घेऊन ती निघाली.
केतू कुशीवर वळाला आणि त्याचा हात त्या होल्स्टरवर पडला. त्यातल्या ग्लोक-१७ पिस्तुलाच्या थंड स्पर्शाने तो शहारला. थोडासा आश्वस्तदेखील झाला.
‘ही वेडी मुलगी हे विसरली वाटतं. विसरली की मुद्दाम सोडून गेली?
पुरतं ओळखलंच नाही का तिला अजून आपण? कुठल्या मातीचे बनले असतील हे लोक? यांचा डी-एनएच वेगळा असणार’. कितीतरी वेळ तो विचारात गढून गेला होता.
आजही केतूचा हात तसाच त्या होल्स्टरवर होता. तो तसाच ठेवून तो परत झोपेच्या अधीन झाला.
सुकेत्सु - ४
दुसऱ्या दिवशी सकाळी केतूला लवकरच जाग आली. शेजारी एखादं लहान मूल झोपावं, तसं पाय पोटाशी दुमडून युरी शांत झोपली होती. आवाज न करता तो एकटाच बाहेर पडला. वाळूतून किनाऱ्याला समांतर चालत राहिला. समुद्रावरून येणाऱ्या थंड पण किंचित उबदार वाऱ्यामुळे अंगावर शिरशिरी आली. लहानपणी सुट्टीत आजोळी पहाटे नदीवर पोहायला जाताना आली होती, तशी. त्या आठवणींची प्रकर्षाने जाणवणारी लाट त्याच्या मनावर आदळून गेली. मग सगळ्याच आठवणी अंगावर आल्या. आजोळ, त्याचं गाव, आई, बाबा आणि मिनी (मीनल)! सोलापूर, तिथलं घर, पुण्यात होस्टेलवर काढलेली वर्षं, नोकरीनिमित्त मुंबई आणि नंतर हैदराबाद. 'कुठून कुठे येऊन पोहोचलो? पुढच्या महिन्यात इस्रायलला येऊन तीन वर्षं होतील. काय करत असेल मिनी आत्ता? जगाच्या दुसऱ्या टोकाला, कॅनडाच्या कुठल्याशा शहरात मिनी - मीनल - केतूची धाकटी बहीण. दोनच वर्षांचं तर अंतर होतं दोघांत. आई-बाबा दोघंही कोविडमध्ये लागोपाठ गेल्यावर मिनीशिवाय त्याला दुसरं, जिवाभावाचं असं कोणीच उरलं नव्हतं. म्हणूनच तर त्याने भारतातून इकडे यायचा निर्णय घेतला होता. पुण्यात इंजीनिअरिंगला असताना बऱ्याच नवीन मित्रांची ओळख झाली, पण गाठ पक्की बसली ती फक्त दोघांशीच. E&TCचा के. रुस्तुम आणि मेकॅनिकलची अनाया रॉय. धमाल मस्तीचे दिवस होते ते. फायनल इयरनंतर लगेचच अनाया अमेरिकेला मास्टर्स करण्यासाठी गेली आणि रुस्तुम त्याच्या वडलांच्या कंपनीतच जॉइन झाला. रुस्तुममुळेच तर केतूला स्वतःची मेकॅनिकल स्ट्रीम असूनदेखील कॉम्पुटर, प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर यात गोडी निर्माण झाली. केतूचा फायनल इयरचा प्रोजेक्ट, 'पंप कॅव्हिटेशन प्रेडिकशन सिम्युलेशन' बराचसा त्याच्याच मदतीने पूर्ण करता आला. केतूला त्याने त्यांची कंपनी जॉइन करण्याची ऑफरदेखील दिली होती. पण कॅम्पस इंटरव्ह्यूमध्येच दोन कंपन्यांमध्ये त्याची निवड झाली. त्यातून त्याने मुंबईच्या सॉफ्टवेअर कंपनीची ऑफर स्वीकारली. त्यानंतर थोड्याच दिवसात AI आणि नॅनो टेकनॉलॉजिमध्ये कार्यरत असलेल्या एका अमेरिकन कंपनीने त्याला ऑफर दिली. त्या वेळी तो द्विधा मन:स्थितीत होता. ऑफर स्वीकारून जावं का अमेरिकेला, नाहीतरी अनाया बोलवत होती. पण त्या वेळी आई आणि बाबांना इकडे सोडून जायला त्याचं मन तयार होईना. त्यातून मिनी नुकतीच कॅनडाला गेलेली. पण त्याची अडचण ओळखून कंपनीने त्याला हैदराबादला पोस्टिंग दिलं. थोडंसं तिखट जेवण आणि न समजणारी तेलगू भाषा या दोन गोष्टी सोडल्या, तर तो हैदराबादला चांगला रमला होता. कदाचित तिथेच कायमचा राहिलादेखील असता. पण कोविडच्या लाटेने सगळंच उलटंपालटं केलं. सुरुवातीला बाबा गेले म्हणून तो सोलापूरला आला आणि नंतर महिन्याभरातच आईदेखील गेली. स्वतःला सावरण्यात आणि व्यावहारिक गोष्टींची व्यवस्था लावण्यात पुढचे सहा महिने निघून गेले.
मन कशातच लागेना. हैदराबादला परतायचं होतं, तेवढ्यात या इस्रायलच्या कंपनीची जाहिरात वाचनात आली.
दोन ऑनलाइन मुलाखती पार पडल्या पाठोपाठ, शेवटच्या मुलाखतीसाठी बोलावणं आलं. सोबत विमानाचं तिकीट. जागा, वेळ, विषय सगळ्यातच त्याला चेंज हवा होता. मिनीशी फोनवर बोलणं झालं आणि त्याने सोल्वनुतमधला जॉब स्वीकारला. महिन्याभरात घराची व्यवस्था लावून तो निघाला, या अनोळखी देशात नव्या आयुष्याची सुरुवात करायला. सुरवातीला खूप जड गेलं त्याला. पण रुळला हळूहळू. युरीची ओळख झाल्यावर मात्र चांगलाच जम बसला.
आतापावतो उठली असेल युरी. शेजारी मी नाही बघून गडबडून जाईल. तिला एक मेसेज करून टाकला त्याने.
ऊन चांगलंच वर आलं होतं. तो चालत बरंच लांब आला होता. परतीचं अंतर झपाझप कापत तो हॉटेलवर पोहोचला, त्या वेळी युरी नुकतीच स्नान करून बाथरोब घालून, केस पुसत बाहेर आली. तिचं लोभसवाणं रूप डोळ्यात साठवत तो धापा टाकत समोर खुर्चीवर बसला. "कुठे गेला होतास?" या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत खुर्चीतून उठत त्याने दोन्ही हात पसरले तिला कवेत घेण्यासाठी. मासोळीसारखी सुळकन निसटत, पलीकडून हसत हसत ती म्हणाली, "तू आवरून ये लवकर, मी ब्रेकफस्ट मागवून ठेवलाय.'
सुकेत्सु - ५
"कसा गेला तुझा आठवडा? तुझं प्रोजेक्ट कुठपर्यंत आलंय?" पिटा ब्रेडचा एक तुकडा हम्मसमध्ये बुडवत युरीने विचारलं. केतूने एक मोठा निश्वास सोडला, "हं, नेहमीप्रमाणेच. तू नव्हतीस पूर्ण आठवडाभर, मग मी पूर्ण कामात बुडवून घेतलं होतं. कालच यीगलबरोबर मीटिंग झाली, त्याआधीच तो सीक्रेट सर्व्हिसेसचा एजंट येऊन गेला होता. त्याने बहुतेक यीगलला जोर लावलेला दिसतोय." सलाडची डिश पुढे ओढत त्याने खायला सुरुवात केली.
"पुढच्याच आठवड्यात बीटा व्हर्जन रिलीज करून, डॅनियलला टेस्टिंगक्डे सुपुर्द करायची आहे. तो प्रोजेक्टच्या हार्डवेअर डीव्हिजनचा हेड आहे. पुढच्या सहा महिन्यांत संपेल कदाचित हे प्रोजेक्ट, संपवावंच लागेल बहुतेक.
त्यानंतर आपण आपली स्कॅंडिनेव्हियन ट्रिप प्लॅन करू शकू."
"अरे पण, एवढं काय आहे त्या प्रोजेक्टमध्ये? गेल्या सहा महिन्यात तू एकही दिवस रजा घेतली नाहीस आणि पुढचे सहा महिने घेशील असं वाटत नाही." त्याच्या कामाच्या गुप्ततेबद्दल तिला कल्पना असूनदेखील तिने लटक्या रागाने विचारलं. तसं दोघांनाही एकमेकांच्या कामाबद्दल थोडीफार जुजबी माहिती होती आणि दोघेही आपापली गुप्ततेची लक्ष्मणरेषा सांभाळत. केतूची कंपनी आणि तिची एजन्सी दोघेही इस्रायलच्या सरकारी कामाशीच निगडित होते. आणि गुप्तता हा त्यांच्यातला अलिखित नियम होता. केतूचा बॉस, यिगलनेच हेतुपुरस्सर दोघांची ओळख होईल अशी संधी निर्माण करून दिली होती. गेले काही दिवस कामात झोकून दिलेलं असलं, तरी केतू काहीसा अस्वस्थ असायचा. त्याला आतून काही तरी बोचत असावं, असं युरीला हल्ली जाणवत होतं. त्याचाशी निवांत बोलायची संधी युरी केव्हाची शोधत होती, जी आज आयती चालून आली होती. तिच्या प्रश्नावर किती सविस्तर उत्तर द्यायचं, याचा त्याला सुरुवातीला संभ्रम पडला होता. तिला सर्व गोष्टी सांगणं तसं फार जोखमीचं नव्हतं. पण आपण सार्वजनिक ठिकाणी आहोत आणि हि जागा किती सेफ आहे, याची त्याला खातरी नव्हती. पण युरीने या ठिकाणाची निवड केली आहे, म्हणजे ती पूर्ण सुरक्षित असणार ही जाणीव झाल्यावर तो तसा निर्धास्त झाला.
सलाड संपवून, जूसचा एक घोट घेत टोस्ट आणि स्क्रॅम्बल्ड एगची प्लेट पुढे ओढून केतूने सुरुवात केली.
"प्रोजेक्ट चिमेरा' या नावाने हा प्रोजेक्ट सुरू होऊन साधारण चार वर्षं झाली. मी तसा थोडा उशिरा जॉईन झालो. माझ्या पोझिशनला आधी काम करत असलेल्या ओमरची आणि माझी गाठभेट झालीच नाही. मी यायच्या आत तो गेला होता. अर्थात त्याने का सोडलं, तो कोठे गेला याची आमच्या कराराप्रमाणे मी कधी चौकशी केली नाही. पण बऱ्याच वेळेस आमच्या स्टाफमध्ये त्याबद्दल कुजबुज चालू असते. असो!"
"आपल्या NSOने डेव्हलप केलेल्या पेगाससबद्दल तुला माहीतच असेल, चिमेरा हे त्याच पुढचं पाऊल असेल." मध्येच त्याला तोडत युरी म्हणाली, "त्याची काय गरज पडली? ते कोणासाठी डेव्हलप करताहात तुम्ही?"
"सध्या तुझे हे प्रश्न बाजूला ठेवू या आणि प्रोजेक्ट काय आहे ते समजून घेऊ या.
ही कल्पना समजून घ्यायला आपण साधं उदाहरण घेऊ या. आपण जेव्हा मायक्रोफोनसमोर बोलतो, त्या वेळी ध्वनीचं रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होतं. ते सिग्नल अॅम्प्लिफाय होतात आणि सिग्नल परत स्पीकरकडे पाठवले जातात आणि स्पीकर त्या विद्युत लहरींचं परत आवाजात रूपांतर करतो. ही क्रिया रिव्हर्स पद्धतीनेसुद्धा होऊ शकते - म्हणजे स्पीकरचा उपयोग मायक्रोफोन म्हणूनही करू शकतो.
जेव्हा आपण एखादी वस्तू पाहतो, म्हणजेच त्या वस्तूवर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्याच्या रेटिनावर पडतो, तेव्हा तिथे पडलेली प्रतिमा विद्युत सिग्नलद्वारे मज्जातंतूंकडून मेंदूकडे पाठवली जाते आणि मेंदू त्याचं विश्लेषण करतो. आता याच्याउलट ज्या वेळेस आपण विचार करतो, त्या वेळेस आपल्या मेंदूतून विद्युत चुंबकीय लाटा निर्माण होतात. त्या डोळ्यातून प्रक्षेपित होत असतात. आपण विचार करतो, त्याचं नकळत प्रतिबिंब आपल्या डोळ्यात उमटतं. यालाच गमतीने काही वेळेस आपण 'डोळ्यातून बोलणं' म्हणतो.
डोळ्यातून होणारं हे विद्युत चुंबकीय उत्सर्जन जर आपण एखाद्या उपकरणाने पकडू शकलो, तर एखाद्याच्या मनातले विचार आपल्याला नक्कीच समजून घेता येतील.”
युरीचं लक्ष आता खाण्यातून पूर्ण उडालं आणि ती हातावर हनुवटी टेकवून त्याचं बोलणं ऐकू लागली.
"आता हे उपकरण अगदी आपला फोनसुद्धा असू शकेल. फोनद्वारे त्या लहरी कॅच केल्या आणि त्याचं टेक्स्टमध्ये रूपांतर केलं, तर त्या व्यक्तीच्या नकळत तिचे विचार कोणालाही समजून घेता येतील.
यात मुख्यतः तीन भाग येतात - पहिला भाग फोनमधील कॅमेरा आणि सेन्सर असणे, जो हे विद्युत चुंबकीय उत्सर्जन ग्रहण करेल, दुसरा सेन्सरने ग्रहण केलेल्या लहरींचे डिकोडिंग आणि भाषांतर करेल, आणि तिसरा भाग, हा सगळा डेटा वापरकर्त्याच्या इच्छित स्थळी पोहोचवेल.
यातला पहिला भाग जो आहे, तो सर्व डॅनिअलच्या अखत्यारीतला आहे. त्यासाठी तो वर्षभर सिलिकॉन व्हॅलीत काम करत होता आणि तिथल्या एका कंपनीशी कॉलॅबोरेशनमध्येच हे काम सध्या चालू आहे."
"अरे, पण हे तर हॉर्डवेअरचं काम आहे, मग एखाद्याच्या नकळत त्याच्या फोन मधल्या हार्डवेअरमध्ये आपण कसा बदल करणार? सेन्सर बसवणार कसा?" युरीला आता बराच इंटरेस्ट आला होता.
"ती सगळी नॅनो टेक्नॉलॉजीची कमाल आहे. हल्ली स्मार्टफोनच्या बॅटरीज ह्या सिलिकॉन अॅनोड टेक्नॉलॉजीच्या असतात, पूर्वी लिथियम आयनच्या आणि नंतर लिथियम पॉलीमरच्या बॅटरीज वापरात आल्या. त्यामुळे आकारमान कमी करुन अधिक क्षमता वाढवण्यात आली, त्याचीच पुढची पायरी म्हणजे सिलिकॉन अॅनोडच्या बॅटरीज. अॅनोडमध्ये सिलिकॉन वापरल्यामुळे ऊर्जेची घनता खूप वाढते, थोडक्यात कमी जागेत जास्त वेळ चालणारी बॅटरी सामावू शकते. पण सिलिकॉन शुद्ध स्वरूपात वापरण्यात एक धोका असतो - चार्जिंगच्या वेळी आकारमानाने ते खूपच प्रसारण पावतं आणि डिस्चार्जच्या वेळी परत त्याचं आकुंचन होतं आणि हे लिथियमच्या मानाने जवळजवळ तीनशे टक्के असतं. याच्यावर मात करायला म्हणून सिलिकॉन आणि कार्बन याचं संमिश्र (कॉम्पोझिट) वापरतात. यासाठी सिलिकॉनचा पातळ पापुद्रा आणि कार्बनचे नॅनो सिलिंडर्स वापरले जातात."
ब्रेकफस्ट संपवून कॉफी घेण्यासाठी केतू उठला, मशीनमधल्या गरम कॉफीचा मग भरून घेऊन तो परत जागेवर आला.
"या नॅनो सिलिंडर्समधूनच नॅनो रोबोट्सची निर्मिती होते. एका ठरावीक तापमानाला कार्बनचं विघटन होऊन अतिसूक्ष्म नॅनो रोबोट्स तयार होतात. डायोडकडून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आयन बीममुळे कार्बन सिलिंडरमधून एक नॅनो रोबोट्सचा जथा तयार होतो. अर्थात ही प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. DNA ओरिगामीसारखीच ही कलाकुसर असते. आणि यातला एखादा रोबो काम करेनासा झाला तरी पूर्ण जथा त्याची कामगिरी वाटून घेतो. अनेक कामं एकाच वेळेस समांतर पद्धतीने पार पाडली जातात. त्यामुळे साहजिकच कामाचा वेग प्रचंड वाढतो.
फोनवर मिस कॉल देऊन अटॅक करायची टेक्नॉलॉजी (zero click attack) तर पेगॅससमध्ये वापरलीच होती, त्याच टेक्नॉलॉजीने हा नॅनो रोबोटचा जथा (sworm) अॅक्टिव्हेट करू शकतो."
"तू काही खात का नाहीस? नुसतीच बसून आहेस" केतूच्या म्हणण्यावर नुसतीच मान हलवत उठून युरीनेदेखील कॉफीचा मग भरून आणला आणि नुसताच हुंकार भरला.
"यातल्या दुसऱ्या भागावर मी आणि माझी टीम काम करतोय. सेन्सरने ग्रहण केलेल्या उत्सर्जनावर पुढची प्रक्रिया करण्यासाठीचं सॉफ्टवेअर बनवणं. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेले अत्याधुनिक अल्गोरिथम आणि त्याला दिलेली मशीन लर्निंगची जोड याचा समावेश आहे. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे अॅडॅपटिव्ह फिल्टर, वेव्हेलेट यासारख्या अल्गोरिथमचा वापर करून सिग्नलमधला नॉइज काढून टाकणं, कमकुवत सिग्नलचं अॅम्प्लिफिकेशन करणं. आणि सगळ्यात कसोटी लागते ती, त्या सिग्नलमध्ये दडलेल्या विचाराचं भाषेत रूपांतर करणं. यासाठी आम्हाला बऱ्याच ग्रूप्सबरोबर, जे ऑलरेडी या क्षेत्रात काम करताहेत, त्यांच्याबरोबर काम करावं लागतं. सध्या आमचं काम बऱ्यापैकी या टप्यावर आहे." "ठरावीक भाषेत रूपांतरित झालेला हा डेटा एन्क्रिप्ट करून वापरतकर्त्याच्या सर्व्हरपर्यंत पोहोचवणं ही शेवटची पायरी, जी पुढील काही दिवसांतच पूर्ण होईल.
आपला मेंदू एकाच वेळेस बरीच काम समांतर पद्धतीने करत असतो - उदा,. आपण एखादा मेसेज टाईप करतोय त्या वेळी पुढच्या मीटिंगची तयारी मनात करत असतो, अशा वेळेस प्रक्षेपित लहरी डिकोड करताना कसोटी लागते. खूप वेळा त्याचे चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात. पण एआएचं सेल्फ लर्निंग मॉडेल हे स्वतःच शिकत त्यात सुधारणा करत जातं."
"तुला हे सगळं काम आवडतं? तू काम खरंच एन्जॉय करतोस?" त्याला मध्येच तोडत युरीने विचारलं.
'हो, अर्थातच! ती क्लिष्ट अल्गोरिदम सोडवणं म्हणजे एकाद्या मोठ्या जिग सॉचे तुकडे जोडत ते पझल पूर्ण करण असतं ना, तसं हे काम. मनासारखं चित्र कागदावर उठल्यावर चित्रकाराला जसं समाधान मिळतं, तसंच काहीस."मध्येच आलेल्या युरीच्या प्रश्नाचं त्याला क्षणभर थोडं आश्चर्य वाटलं.
युरीच समाधान झालं असावं, असं वाटून त्याने पुढे सांगायला सुरुवात केली. "आता तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ या, अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज ही अर्थातच सुरक्षा यंत्रणाचीच असते. हेरगिरीसाठी. या कामासाठी जेव्हा एखादा फोन किंवा इतर साधनं हॅक केली जातात, त्या वेळी लिखित स्वरूपात असलेली माहितीच त्यातून मिळवली जाते. पण एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय याचा पत्ता अगदी त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलादेखील लागत नाही. तीच त्रुटी भरून काढायचा प्रयत्न या प्रोजेक्टमधून होतो आहे. या तंत्रज्ञानाने त्याच्या उपकरणातून त्याच्या विचारांपर्यंत पोहोचता येऊ शकतं. त्याच्या भविष्यातल्या प्लॅनिंगविषयी समजून घेता येत."
"हे म्हणजे बुद्धीबळातल्या प्रतिस्पर्ध्याच्या मनातल्या चाली आधीच जाणून घेतल्यासारखं आहे" युरी डोळे विस्फारून म्हणाली.
"हो, अगदी तसंच. बुद्धीबळ असो, व्यापार असो, स्पर्धा असो किंवा युद्ध.. मला जिंकायचंच आहे हीच आदिम प्रेरणा आपल्यात ठसवली गेलीय. अगदी लहानपणापासून. छोटं मूल जेवत नसेल, तर त्याची आईच नाही का त्याची खोटी स्पर्धा लावते, बघू बरं बाबाचं आधी होतंय का तुझं? शाळेत, कॉलेजात तेच, पहिला आला तर हे मिळेल नाही तर नाही. नुसतंच तुला पुढे जायचं आहे असं नाही, तर समोरच्याला हरवायचंय. नंतर नंतर क्षेत्र आणि परीघ वाढत जातो, आधी तुमचा ग्रूप, नंतर वर्ग, कंपनी, देश, आता तर पूर्ण जग. पण मूळ संकल्पना तीच. मला कळत नाही की या सगळ्या जीवघेण्या स्पर्धेचा शेवट काय होणार? आपण केलेलं काम पूर्ण झाल्यावर आनंद तर होतोच, पण नंतर होणाऱ्या त्याच्या परिणामांपासून पासून स्वतःला वेगळं ठेवणं हे भलतंच अवघड असतं"
त्याच्या खुर्चीच्या मागे येत, त्याचे कुरळे केस हळुवारपणे कुरवाळत युरी मनात म्हणाली, "अच्छा, माझ्या सख्याच्या मनात हे खुपतंय तर!"
काही सेकंदांनी मागून त्याच्या गळ्यात हात टाकत त्याला म्हणाली, "चल आपण बाहेर फेरफटका मारून येऊ या."
तिच्या हाताच हलकेच चुंबन घेत केतू उठला.
सुकेत्सु - ६
चार दिवस सुट्टी टाकून केतू युरीबरोबर तिच्या गावी आला. 'नहारिया' भूमध्य समुद्राला लागून असलेलं इस्रायलच्या उत्तरेचं एक सुंदर शहर. युरी जन्मली, वाढली ते हेच गाव. तिचे आई-वडील भाऊ आणि त्याचं कुटुंब इथेच राहणारे. ती गेले दोन दिवस केतूला तिच्या प्रत्येक जिव्हाळ्याचा ठिकाणी घेऊन जातेय. त्या प्रत्येक ठिकाणांबरोबर तिच्या बालपणीच्या आठवणी, शाळेच्या, कॉलेजच्या जोडल्या गेलेल्या, त्या सगळ्या तिला केतूबरोबर शेअर करायच्या होत्या. प्रत्येक जागेवर जाऊन.
दिवसभर तिच्याबरोबर भटकून झल्यावर केतू संध्याकाळी तिच्या वडिलांबरोबर - आवराहमबरोबर बिअरचे घुटके घेत गप्पा मारत बसला होता. सुरुवातीला शिष्ठ वाटणारा म्हातारा बराच बोलघेवडा निघाला.
डेन्मार्कमध्ये गेलेलं त्याचं बालपण, तिथलं घर, आई-वडील, कॉलेजमध्ये गाठ पडलेली एल्मा यांच्याबद्दल भरभरून बोलत होता. 'आहे मनोहर तरी'च्या धर्तीवर सगळं असूनदेखील इस्रायलची ओढ कशी होती, ते कसे नहारियाला स्थलांतरित झाले, हे सगळं सांगण्यात संध्याकाळ उलटून गेली. "जेवायला उशीर होतोय, चला जेवायला" असं सांगत एल्माने सगळ्यांना जेवायला उठवलं.
जेवणानंतर वाइनचे ग्लास घेऊन गप्पांमध्ये सामील एल्मा म्हणाली, ”लेबेनॉनची सीमा इथून फक्त दहा किलोमीटरवर आहे. इस्रायलची स्थापना होण्यापूर्वीच ज्यू जर्मनांनी ही टुमदार वसाहत वसवलेली होती.” नंतर बराच वेळ ती युरोपमधून स्थलांतरित झालेल्या ज्यू मंडळींचं हे कसं आवडतं शहर आहे, बहुतेक सगळे इंग्लिश बोलतात, या सगळ्यांना अँग्लो-ओलीम म्हणून ओळखतात, इस्रायल स्थापनेनंतर मिश्र वस्ती वाढत गेली, अगदी कॅनडा, मेक्सिकोमधून येऊन यांच्यात सामावली असं सगळं बोलत राहिली. नहारिया शहर, इथली माणसं यांच्याबद्दल एल्माकडून बरीच माहिती कळली. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांना भारताबद्दल बरंच कुतूहल होतं. एवढा मोठा देश असून त्यातली विविधता, वेगळ्या भाषा, संस्कृती आणि सगळ्यात महत्त्वाचं भारतीय तत्त्वज्ञान. केतू किती तरी वेळ त्यांना समजावून सांगत होता, तरी त्यांचे प्रश्न संपत नव्हते.
युरीला जेवण आणि वाइन चांगलीच चढली होती. डोळ्यावरची झोप आवरत केतूचा हात धरून बळेच त्याला उठवत युरी म्हणाली, "चल आता झोपायला. उद्याचा इथला शेवटचा दिवस. लवकर उठून आपण केशेत केव्हज् बघायला जाणार आहोत. संध्याकाळी परतायचंय आपल्याला." त्या दोघांना गुड नाइट करून केतू तिच्यापाठोपाठ वरती गेस्ट रूमकडे निघाला.
सकाळी निरोप घेऊन निघताना एल्माने तिच्याजवळची व्हर्जिन मेरीची एक छोटी मूर्ती केतूला भेट म्हणून दिली. तिला आलिंगन देऊन बाहेर येताना केतूने महत्प्रयासाने आवंढा गिळला. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहणाऱ्या युरीच्या मात्र ते लक्षात आलं.
आपली ऑब्सिडिअन ब्लॅक मर्सिडिस सफाईदारपणे बाहेर काढताना तिने शेजारी बसलेल्या केतूच्या पाठीवर हलकेच थोपटलं. त्याच्या केसातून आपला उजवा हात फिरवत हसत, त्याला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली, "अरे, तिच्या मुलीला तू पळवून नेऊ नये, म्हणून लाच म्हणून दिली तिने तुला ती मूर्ती. तू का एवढा सेंटी झालायस?"
"मला तर तिच्यासकट तिच्या मुलीला पळवायला आवडेल" हसत हसत केतूने टोला पलटवला. आता तो बराच नॉर्मल झाला.
कितीतरी वेळ तो खिडकीतून बाहेर बघत होता.
"काल मी तुला थांबवलं, पण मला तुझ्या देशाबद्दल आणखी जास्त ऐकायला आवडेल. तुमची हिंदू संस्कृती जगातल्या प्राचीन संस्कृतीपैकी एक, पण आज काय स्थिती आहे? एवढा प्रचंड देश एकत्र बांधून ठेवायला तुमचा धर्म कसा मदत करतो?"
भारत देश, इथली प्रांतिक विविधता, वेगवेगळ्या भाषा, धर्म-पंथ, जातीची उतरंड, त्याभोवती बांधलेलं राजकारण असं सगळं तिला समजावून सांगताना ती अगदी मन लावून ऐकत होती.
टेकड्यांमधून जाणाऱ्या नागमोडी रस्त्याने ते अर्ध्या तासातच आदमीट पार्कमधल्या मेन पार्किंगला तासाभरात पोहोचले. गाडी पार्क करून चालत ते त्या केव्ह्जच्या दिशेने निघाले.
"नाव जरी केव्ह्ज असलं, तरी आता तिथे गुहा नाहीय. वर्षानुवर्षाच्या वातावरणाने गुहेचा मागचा भाग कोसळला आणि आता फक्त एक लाइम स्टोनची एक कमान शिल्लक आहे. ती जागा थोडी उंचावर असल्यामुळे तिथून खालच्या दरीच दृश्य खूप लुभावणारं असत. बरीच लोक तिथे रॅपलिंग करून खाली उतरतात. वर येताना मात्र जोऱ्याच्या वाऱ्यामुळे अगदी कसोटी लागते."
"तू कधी केलं आहेस का रॅपलिंग?"
"हो अरे, कॉलेजमध्ये असताना आमचा एक ग्रूप होता. तेव्हा बऱ्याच वेळा यायचो आम्ही."
नुकताच वसंत ऋतू सुरू झाला असला, तरी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. पण विस्तीर्ण पसरलेल्या माळावर रानफुलांच्या पसरलेल्या गालिच्याने थंड केलेल्या वाऱ्यामुळे उन्ह सुसह्य होत होतं. अॅनिमोन्स, सायक्लेमेन्स, पॉपीज, नार्सिसस अशा वेगवेगळ्या फुलांमुळे त्या परिसरात पसरलेला एक वेगळाच सुगंध केतूला उत्साहित करून गेला.
निसर्गाच्या त्या प्रसन्न लँडस्केपच्या बॅकग्राउंडवर डौलदारपणे पावलं टाकत जाणारी युरी त्याला वेगळीच वाटत होती. तिच्या चालीत एक नजाकत असली, तरी एक जबरदस्त आत्मविश्वास आणि लष्करी शिस्त जाणवत होती .
त्याची नजर जाणवून थोडं पुढं चालत निघालेली युरी थांबली. त्याच्याकडे वळून तिने हात पुढे केला. एक-दोन पावलं पुढे टाकून केतूने तो हात अलगद पकडला. तो घामट उबदार हात हातात आल्यावर त्याला खूपच आश्वासक वाटलं. त्याने हात तसाच उचलून हाताचं हलकेच चुंबन घेतलं. युरीच्या चेहऱ्यावर मंद स्मित पसरलं. त्याचे विस्कटलेले केस हाताने सरळ करत ती म्हणाली, "डिअर, कसला विचार करतोयस?"
"अशा प्रसंगी आमच्याकडच्या हिंदी सिनेमात हिरो तिच्या हिरोइनला उचलून घेतो आणि दोघे चक्क गाणं गातात."
"मग, तू वाट कशाची पाहतोस?" युरीने त्यावर खट्याळ उत्तर दिलं.
हसत हसत दोघेही त्या कमानीपाशी पोहोचले.
वरून दिसणारा नजारा अगदी विलोभनीय होता. दूरवर पसरलेली पश्चिम गॅलिली, हैफा बे, डावीकडचा भूमध्य आणि पलीकडे दिसणारा माउंट मेरोन नजर खिळवून ठेवत होता.
पाठीवरच्या हॅवरसॅकमधून पाण्याची बाटली काढून एक घोट घेऊन ती बाटली केतूपुढे धरली. "या कमानीला वळसा घेऊन पुढे गेलं की ट्रेकिंगसाठी रेड आणि ब्लू असे दोन लूप आहेत. थोडासा चढणीचा रस्ता आहे, पण हा ट्रेक करायला तुला आवडेल! तासाभरात परत येऊ, चालेल ना?"
"ऑफकोर्स! चल" पाण्याचा घोट घेऊन त्याने बाटली परत केली.
तासाभरात ट्रेक संपवून ते परत आले, तेव्हा ऊन चांगलंच तापलं होतं. गाडीच्या डिकीतल्या कोल्ड बॉक्समधून बिअरचा कॅन घेऊन एका घोटात अर्धाअधिक संपवल्यावर त्याची काहिली थोडी कमी झाली. पार्कमध्ये असलेल्या छोट्याशा रेस्टारंटमध्ये जेवण घेऊन निघेपर्यंत सूर्य अगदी माथ्यावर आला. एसी फुल्ल करून तिने गाडी बाहेर काढली. पहिल्या वळणावरून डावीकडचा परतीचा रस्ता टाळून गाडी उजवीकडे वळवली.
"आता तुला शेवटचं एक ठिकाण दाखवते, तिथे आपल्याला निवांत बसता येईल आणि ऊन उतरल्यावर पुढे जाऊ या."
दहा मिनिटाच्या ड्राइव्हनंतर ते दोघे एका निर्जन तळ्याकाठी पोहोचले. तळ्याच्या या काठावर बरीच उंच आणि गर्द झाडी होती. विस्तीर्ण पसरलेल्या तळ्याच्या पलीकडे छोटीशी टेकडी, त्यावर खुरटी झुडपं. तळ्याच्या पलीकडे लेबेनॉनची हद्द.
गाडी पार्क करून, दहा फुटावर असलेल्या एका झाडाच्या बुंध्याशेजारी मॅट पसरून झाडाला टेकून केतूने पाय पसरले. त्याच्या शेजारी बसत युरीने तिच्या मोबाइलवर हिब्रू भाषेतली गाणी लावली. अर्थ कळत नसला, तरी आर्त स्वर मनाला भिडत होते. त्याने पसरलेल्या पायावर डोकं ठेऊन युरीनेही अंग टाकलं.
अधोन्मुख युरीचं वेगळच रूप केतू निरखत होता. झाडांमधून पडणारे कवडसे तिच्या अंगावर दागिन्यांसारखे लकाकत होते. केसांच्या बटांमघ्ये घुसलेला एखादा चुकार सोनेरी किरण चांदणचुर्याचा आभास पसरवत होता. फिकट निळी जीन्स, मस्टर्ड कलरचा लिननचा सैलसर, इन केलेला शर्ट, आणि वरती करडं जॅकेट. तिच्या गळ्यातल्या चेनमध्ये गुंफलेला निळ्या टरक्वाईजच्या पेंडेंटवर कवडसा पडला की तो सहस्र किरणांनी परावर्तित होऊन आसमंत उजळून टाकत होता. केतूची नजर त्या ऊनसावलीच्या गारुडावर खिळली. प्रत्येक श्वासागणिक खाली-वर होणारं ते पेंडेंट, आदिम सूर्याचा स्यमंतक वाटत होतं. भोवतालची निवळशंख शांतता, मांडीवर पहुडलेली सखी, गाण्याचे स्वर्गीय सूर, त्याला हे कधीच संपू नये असं वाटत होतं. 'खरंच हे क्षण, हा काळाचा तुकडा असाच धरून ठेवता आला तर!'
तेवढ्यात फटाक्यासारखा आवाज आला. तळ्याच्या त्या काठावर असलेल्या वॉच टॉवरवरून एकापाठोपाठ दोन गोळ्या सणसणत त्याच्या दिशेने आल्या आणि त्याच्या डोक्याच्यावर पाच-सहा इंच पाठीमागच्या झाडाच्या बुंध्यात लाकूड जाळत घुसल्या. उलटी कोलांटी उडी घेत क्षणार्धात तिने केतूच्या डोक्याला धरून त्याला झाडाच्या मागे खेचलं. तो झाडाच्या मागे जमिनीवर पूर्ण आडवा झाला आणि ती त्याच्यावर ओणवी होऊन त्याला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत होती. "ब्लडी बास्टर्ड" नकळत तिच्या ओठांवर उमटलं. दुसऱ्या क्षणी तिच्या हातात जॅकेटमधलं पिस्तूल होतं. हात बाहेर काढत गोळी आली त्या दिशेनी तिने एक राउंड फायर केली. दुसऱ्या हाताने गाडीची किल्ली त्याच्या अंगावर टाकून, त्याच्या अंगावरून बाजूला होत, त्याच्या कानात ओरडली "रन फ़ास्ट, गेट इन टु कार, कीप डोअर ओपन, विल कॅच यू."
या अनपेक्षित हल्ल्याने तो पुरता गांगरून गेला. पण भानावर येत, त्याने कमरेत वाकून दहा फुटावर असणारी कार गाठली. ड्रायव्हरसाइडचा दरवाजा तिच्यासाठी उघडा टाकला. पुढच्याच क्षणी आत शिरत गाडी स्टार्ट करून विद्युतवेगाने वळण घेत तिने गाडी पुढे दामटली. पुढच्या काही सेकंदात ते मुख्य रस्त्याला लागले. आपण सुरक्षित टप्प्यावर आलोय, याची खातरी झाल्यावर तिने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली.
केतू अजूनही त्या धक्क्यातून सावरला नव्हता. लहानपणी घडलेला प्रसंग त्याच्या आठवणीच्या खंदकातून उसळी मारूनवर आला. ‘तो साधारण दहा-बारा वर्षाचा होता, सोलापुरात वडिलांबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक पाहायला बाहेर पडला होता. दत्त चौकात बंद दुकानाच्या पायऱ्यांवर बसलेलं असताना एकदम पळापळ सुरू झाली. हिंदू-मुस्लीम दंग्याचे दिवस होते. जवळच असलेल्या मशिदीसमोर वाद्य वाजवण्यावरून वाद सुरू झाला. जोरात दगडफेक आणि सोडा-वॉटर बाटल्यांच्या वर्षाव याची दोन्ही बाजूंकडून सुरुवात झाली. त्याच्या वडलांनी त्याला जवळ उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनच्या खाली खेचलं. वडलांनी त्याला असंच पोटाशी धरलं होतं. समोरच्या ट्रकवर बसलेला एक भक्ताच्या डोक्यात बाटली आदळली. रक्तबंबाळ अवस्थेत ट्रकवरून तो खाली पडला, गणपतीचा तुटलेला हात त्याच्या हातात तसाच होता. पोलिसांनी त्यांना गल्लीच्या दुसऱ्या बाजूने बाहेर काढलं.
त्याच्या खांद्याला धरून त्याच्याकडे काळजीने बघत तिने विचारलं, "ओह डिअर, आर यू ओके?" काही मिनिटांपूर्वी चवताळलेली वाघिणीची आता एकदम प्रेमळ मैत्रीण झाली होती. केतूला अगदी गलबलून आलं. "नाऊ आय अॅम फाइन." डोळे बंद करून तो क्षण आठवत तो म्हणाला.
"माझचं चुकलं, मी तुला धोक्यात घालायला नको होतं.
नको चिंता करूस, इस्रायलच्या कसलेल्या कमांडोच्या हातात हा इंडियन बंदा अगदी सेफ आहे."
केतूचं डोकं आपल्याकडे खेचत त्याच्या ओठांवर तिने आपले ओठ घट्ट रोवले. युरीने लावलेल्या गुस्सी ब्लूमचा सुगंध त्याच्या अंगात आतपर्यंत भिनला. त्याचे हात स्थळ-काळापलीकडून आल्यासारखे तिच्या पाठीला वाट पुसायला लागले. जॅकेट कधीच गळून पडलं. गळ्यातला तो टॉर्क्वाइझ केंव्हाचा केतूला आव्हान देत होता. बिचारा तो आपसूकच बाजूला झाला. उधाणलेली दुपार जेव्हा शांत झाली, तेव्हा उन्हं उतरणीला लागलेली होती. एका वेगळ्याच धुंदीत ड्राइव्ह करत ती परतीच्या वाटेला लागली.
पुढच्याच आठवड्यात एक बातमी आली - इस्रायलच्या उत्तर सीमेवर असलेल्या लेबेनॉनच्या दहा चौक्या कमांडोजनी उद्ध्वस्त केल्या.
सुकेत्सु -७
तेल अवीवच्या बेन गुरियन एयरपोर्टवरून विमान निघालं, त्याला आता तब्बल बावीस तास उलटून गेलेत. न्यूयॉर्कचा लेओव्हर तसा फार नव्हता. तासाभरात पोहोचू आपण सॅन फ्रॅन्सिस्कोला. तिथून टॅक्सीने सिलिकॉन व्हॅलीतल्या मॅरिएटवर पोहोचायला पुढचा पाऊण तास. कधी एकदा हॉटेलवर पोहोचतोय आणि वॉश घेऊन ताणून देतोय, असं झालंय. खरं तर मुळातून विमानप्रवासच मला स्वतःला अजिबात आवडत नाही, अगदी बिझनेस क्लास असला, तरीही. पण ही कॉन्फरन्स तशी महत्त्वाची. मी जावं असाच यीगलचासुद्धा आग्रह होता. त्याने फ़ोर्स केल्यामुळेच आपण तो पेपर लिहिला होता. आपल्याला ऑर्गनायझरकडून आमंत्रण मिळालं, ते मेरिटवर की तेदेखील यीगलने मॅनेज केलं होतं? ही माणसं काहीही करू शकतात. त्यांच्या अफाट शक्तीचा अंदाज लावणं अशक्यच. यायच्या आदल्या रात्री युरी आली होती ते इथल्या एजंटची माहिती देण्यासाठी. एयरपोर्टवर उतरल्यापासून ते अगदी इथला तीन दिवसाचा प्रोग्राम संपवून लॉस एंजेलिस वरून परतीच्या विमानात बसेपर्यंत तो माझ्या दिमतीला असणार होता.. माझ्या सुरक्षेची काळजी माझ्यापेक्षा तिलाच जास्त होती. गुड बाय हग करताना, तुझ्या त्या अनायाला भेटायला विसरू नको असं म्हणून चिडवायला विसरली नाही. खरं तर कॉन्फरन्स संपल्यावर मी मुद्दाम लॉस एंजेलेसला अनायाला भेटायला जाणार आहे, हे ती नक्की जाणून होती. असो, दाय नेम इज़ जेलसी!
लॅपटॉप काढून कॉन्फरन्सच्या शेड्यूलवर एक नजर टाकू या.
सुरक्षेच्या कारणावरून आयटीवाल्यांनी आपल्या नेहमीच्या लॅपटॉपऐवजी नवीनच लॅपटॉप दिलाय. आपला फोनही बदललेला. काढून बघू या. नवीन साधनांशी जुळवून घायला नाही म्हटलं तरी वेळ लागतोच.
तीन दिवस सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत, पेपर प्रेझेंटेशन, की-नोट स्पीचेस, पॅनेल डिस्कशन आणि संध्याकाळी कॉकटेल नेटवर्किंग अशा भरगच्च कार्यक्रमातून आपल्याला काय काय अटेंड करायला जमेल त्याच्यावर खुणा करून टाकल्या. कंप्यूटरमधल्या शेड्यूलरला तीन दिवसाचं कॅलेंडर जनरेट करायला सांगून, रिमाइंडर सेट करून टाकलं.
एवढ्यात फ्लाइट डिसेंडिंगची अनाउन्समेंट झाली. लँडिंगनंतर इमिग्रेशनचे सोपस्कार उरकून बाहेर यायला तास लागला.
बाहेर मध्यम उंचीचा, किरकोळ शरीरयष्टीचा गोरापान रफाएल त्याची वाट पाहत उभा होता. साधारण तिशीचा असेल. त्याच्या बाह्य रूपावरून तर तो अंगरक्षक असेल असं वाटत नव्हतं. पण आपल्या आधीच्या अनुभवावरून कोणालाही कमी लेखायची चूक आपण करता काम नये. विशिष्ट प्रसंगी यांच्यात लपलेलं वेगळंच रूप बघायला मिळतं. रफायल तसा बडबड्या निघाला. पण आपण दिलेल्या दोन जांभयांनी त्याला गप्प राहायला भाग पडलं. वीस मिनिटांत हॉटेलवर पोहोचल्यावर "उद्या सकाळी भेटू" म्हणून तो निघून गेला.
आजचा दिवस तसा धावपळीचा गेला. सेकंड सेशनला आपला पेपर प्रेझेंट झाल्यावर पुढची सेशन अटेंड करायच्या आत जेमतेम चार घास खायला वेळ मिळाला. चार वाजता एक्झिबिशन एरियात चक्कर मारताना मायकल नुग्येन भेटला. नॅशनल लॅबमधल्या क्वांटम मेकॅनिक्स डिपार्टमेंटचा हेड. यीगलने त्याला आवर्जून भेटायला सांगितलं होत. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ओव्हर ड्रिंक भेटायचं ठरलं.
दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी केतू नेटवर्किंग एरियात आला. कालच नेटवर्किंग एरियातली मीटिंग रूम बुक केली, ते बरं झालं. आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये वापरत असलेल्या एआय मॉडेल प्रशिक्षणासाठी क्वांटम कम्प्युटिंगचा वापर कसा करता येईल, याबद्दल त्याच्याकडून समजून घेता येणार होतं, मीटिंग संपल्यावर बाहेर जरा फेरफटका मारून यावा. पण त्याच्यासाठी रफाएलला फोन करायला पाहिजे. थिंक ऑफ डेव्हिल आणि हा समोरच हजर.
"संध्याकाळी बाहेर जायला आवडेल तुला?"
"त्याचसाठी मी आत्ता तुलाच फोन करणार होतो. माझी एक तासभर मीटिंग आहे संपली की जाऊ या आपण."
"मी त्या मीटिंगला असलो, तर चालेल का?"
"टेक्निकल डिस्कशनने तू कंटाळणार नसशील, तर माझी काहीच हरकत नाही, उलट तू जॉइन झालास तर माझ्याकडून तुला शँपेन मिळेल." मी हसतच म्हणालो.
शॅम्पेनचे तीन ग्लास घेऊन आम्ही दोघे मीटिंग रूममध्ये आलो. मायकल वाटच पाहत होता. मी दोघांची परस्परांशी ओळख करून दिली. रफाएलला माझ्या क्षेत्रातली चांगलीच माहिती होती. आणि क्वांटमबद्दल उत्सुकता.
"क्वांटमबद्दल थोडक्यात सांगशील का?" त्यानेच सुरुवातीचे बेसिक प्रश्न विचारले.
शॅम्पेनचा एक घोट घेऊन मायकलने सुरुवात केली,
"क्वांटम भौतिकशास्त्र हे पदार्थाच्या अणू आणि त्यात अंतर्भूत इतर कण यांचाशी निगडित शास्त्र आहे. आपल्याला परिचित भौतिकशास्त्राच्या नियमांपेक्षा यांच्या वर्तनाचे नियम वेगळे असतात. उदा., द्वैत (duality) क्वांटम सिस्टिम एकाच वेळी अनेक अवस्थांमध्ये अस्तित्वात असू शकते. हवेत नाणे फिरत असल्याची कल्पना करा, ते ज्या वेळेस हवेत असतं, त्या वेळी तो छापाही नसतो आणि काटाही नसतो. क्वांटम कंप्युटिंगसाठी हे मूलभूत आहे, कारण क्यूबिट्स (क्वांटम बिट्स) वेगळ्या क्वांटम स्थितींमध्ये अस्तित्वात असू शकतात. जसा प्रकाश हा लाटाच्या स्वरूपात आहे आणि कणांच्या रूपातदेखील आहे. त्याची स्थिती ही निरीक्षकावर अवलंबून आहे.
दुसरा नियम आहे त्यांची ऊर्जा किंवा गती ही सलग नसून क्वांटा नावाच्या पॅकेटमध्ये अस्तित्वात असते. जसे आपण एखाद्या जिन्यावर असताना, कोणत्यातरी पायरीवर असतो. दोन्ही पायऱ्यांच्या मध्ये असू शकत नाही.
तिसरा नियम, दोन किंवा जास्त क्वांटम सिस्टिम्स एकमेकाशी जोडता येतात, त्यानंतर त्यांना कितीही अंतरावर अलग केलं, तरी त्या दोन्ही सिस्टिम्स कुठल्याही माध्यमांशिवाय जोडलेल्याच राहतात. दोन्हीचं भागधेय एकच असतं. एकाच्या स्थितीवरून दुसऱ्याबद्दल अचूक अनुमान काढता येतं. याला म्हणतात एन्टॅंगलमेंट. त्यातली पुढची कल्पना आहे क्वांटम सुरंग (क्वांटम टनेलिंग): क्वांटम कण एका संभाव्य ऊर्जेच्या अडथळ्यातून जाऊ शकतो, जरी त्याच्याकडे शास्त्रीय पद्धतीने त्यावर मात करण्यासाठी पुरेशी ऊर्जा नसली, तरी."
आणि कम्प्युटिंग स्पीड वाढवण्यासाठी या सगळ्याचा कसा उपयोग करता येईल याची नंतर त्याने बरीचशी उदाहरणं देऊन, ही जटिल संज्ञा सोपी करून सांगायचा प्रयत्न केला. रफाएलला किती समजली कोणास ठाऊक. पण त्याने मध्ये मध्ये बरेच प्रश्न विचारून मायकेलचा उत्साह जागा ठेवला.
त्यांच्या बेसिक चर्चेनंतर मला त्याला आमच्या प्रोजेक्टसंबंधी बरीच चर्चा करायची होती, पण वेळ कमी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत सकाळीच भेटायचं ठरलं. आणि आजच्यासाठी आम्ही त्याचा निरोप घेतला. तुम्ही जर आध्यात्मिक नसाल, तर तुम्हाला क्वांटम फिज़िक्स समजणं, त्याचा अर्थ लावणं जड जाईल, हे खुद्द ज्यांनी याचा शोध लावला, त्यांचंच तर म्हणणं आहे. आपल्याकडच्या पूर्वीच्या ग्रंथांमध्ये या कन्सेप्टचे उल्लेख आहेत. त्या वेळेस हे सिद्ध करण्यासाठी आजच्यासारखी साधनं उपलब्ध नसल्यामुळे ते विज्ञान पुढ जाऊ शकलं नाही कदाचित, पण आपल्या पूर्वी कोणीतरी हा विचार केला आहे हेच किती आकर्षक आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी मायकलबरोबर परत मीटिंग झाली. चिमेरामध्ये कंप्युटिंगचा स्पीड वाढवायला क्वांटमचा उपयोग कश्या प्रकारे करता येईल, याची चांगलीच चर्चा पार पडली
आज कॉन्फरन्सचा शेवटचा दिवस. संध्याकाळची फ्लाइट पकडून लॉस एंजेलीसला पोहोचायला रात्रीचे बारा तरी वाजतील. या तीन दिवसांत हाती काय पडलं? अशा कॉन्फरन्समधून पाच-दहा टक्केच नवीन असतं. ते बरोबर आपल्याला शोधून काढायला लागतं.
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर जेन स्मिथ यांनी केलेली एथिकल एआय, त्याचे होणारे सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर संभाव्य परिणाम याची मांडणी दखल घेण्यासारखी होती. त्यांनी सुचवल्याप्रमाणे इंटरनॅशनल पातळीवर रेग्युलेटरी बोर्ड स्थापन कधी होणार, त्याचे कायदे कधी बनणार? टेक्नॉलॉजी ज्या स्पीडने डेव्हलप होते, त्या स्पीडनेच हे प्रश्न सुटायला हवेत. पण याला प्राधान्य कोण देणार? इस्रायलने पेगॅसस आणलं, त्या वेळीसुद्धा जगभर केवढी खळबळ माजली होती. अनेक ग्रूप त्याच्याविरुद्ध संघटित झाले होते. पण म्हणावा तसा फरक पडला नाहीच. डॉक्टर लिसा ट्रॅनने दिलेली डार्क वेब, क्रिप्टो करन्सी याची सध्याची आकडेवारी तर खूपच भयावह होती. आपण सामान्य माणसं वापरतो ते इंटरनेट हे टोटल ट्रॅफिकच्या फक्त ३ ते ४ टक्के आहे, अगदी आपली बँकिंग, सरकारी कारभार, प्रायव्हेट सेक्टर सगळ्यांची मिळून ही गोळाबेरीज. मग उरलेलं सगळं डार्क वेब? आणि त्याचा वापर पूर्णतः अवैध कामासाठी. माणसाला एकदा अनामिकता (Anonomity) मिळाली की त्याच्यातला सैतान जागा होतो, हेच खरं. कोट्यवधींचा ड्रग्सचा व्यापार या डार्क वेबमधूनच चालतो. आपण इंजीनियर्स, सायंटिस्ट नवीन नवीन तंत्रज्ञान शोधून काढतो ते मानवाच्या कल्याणासाठी. पण त्याचा उपयोग ही मंडळीच जास्त करणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अॅलेक्स वाँग म्हणाला तसं या प्रवासात आपण एकटे असणार नाही आहोत. आपल्यालाही त्या दृष्टीने पुढची पावलं टाकायला हवीत. आपण सध्या ज्या प्रोजेक्टवर - 'चिमेरा'वर काम करतोय, ते कितपत योग्य आहे? पण समजा, आपण थांबवलं, तर दुसरा कोणीतरी ते करणार, जसे आपण त्या ओमरच्या जागी आलो. आपण आलो की नियती आपल्याला घेऊन आली? आपल्या हातात काहीच नव्हतं का? नियतीच्या हातचं बाहुल आहोत का आपण? को अहम्? या प्रश्नाचं उत्तर अध्यात्मात तरी मिळेल का आपल्याला? की 'क्वांटम फिज़िक्स'मध्ये?
विचाराच्या गर्तेत असतानाच तो एअरपोर्टसाठी आलेल्या टॅक्सीत बसला.
लॉस एंजेलिसला रफायलचा ससेमिरा तरी नव्हता. काल मी त्याला एलएलान येण्याची विनंती केली, आणि कशी कोणास ठाऊक आज त्याने ती मान्य केली. पण आमच्या माणसाची नजर तुझ्यावर असेल, हे सांगायला तो विसरला नाही.
सुकेत्सु -८
लॉस एंजेलिस विमानतळावरून थेट टॅक्सी घेऊन केतू अनायाच्या अपार्टमेंटवर पोहोचला. तो तिला भेटायला फार उत्सुक होता. दार उघडलं आणि त्याला हसत सामोरा आला एक मेक्सिकन तरुण. गोरा तांबूस वर्ण, साडेसहा फूट उंची. पीळदार शरीर, चिरूट ओढून काळे पडलेले ओठ. टी शर्ट आणि खाली बर्मुडा. एका अनोळख्या तरुणाला बघून केतू एकदम गडबडून गेला. एवढ्यात त्याच्या बाजूने मागून त्याला बाजूला सारत अनाया पुढे आली.
“सुकेत्सु!” अनायाचा आनंदी आवाज ऐकून त्याने हसत तिला मिठी मारली.
'तुमची ओळख करून देते" हसत बाजूला होत ती म्हणाली, “हा दिएगो, माझा मित्र. काही आठवड्यांपूर्वी इथे राहायला आला आहे.”
नंतर तिने दिएगोला ओळख करून दिली: “हा माझा भारतातील खूप जवळचा मित्र, सुकेत्सु.” "यू कॅन कॉल हिम केतू."
दिएगोने हात पुढे केला, "तुला भेटून छान वाटलं, हर्मनो"
केतूने नम्रपणे हात पुढे केला. अनायाने त्याला रूम दाखवली. फ्रेश होउन तो परत हॉलमध्ये आला.
भिंतीला टेकून उभारलेलं गिटार, शेल्फवर विखुरलेली स्पॅनिश इंग्लिश पुस्तकं, टेबल लॅम्पवर खोचलेला मेक्सिकन फ्लॅग, कोचवरचे भडक रंगाचे कपडे या सगळ्यातून दिएगो घरभर पसरलेला होता.
रात्री जेवताना गप्पा रंगल्या.
“तर, दिएगो,” केतूने संभाषण सुरू केलं, “तू काय करतोस इथे?”
“मी फ्रीलान्स रिपोर्टर आहे, वेब पोर्टलसाठी लेख लिहितो.” दिएगो म्हणाला. “समाजातील स्थलांतरितांचे प्रश्न, सांस्कृतिक कार्यक्रम, आंदोलनं, अशा गोष्टींवर लिहितो.”
अनाया मध्येच म्हणाली, “आणि त्याचे फोटो जबरदस्त असतात. गेल्या आठवड्यात त्याने काढलेले मेक्सिकन फेस्टिव्हलचे फोटो तू पाहायला हवेत.”
मेक्सिकोतलं त्याचं बालपण, चार भाऊ आणि तीन बहिणींसकट असणारं त्याचं कुटुंब, गरिबीत गेलेलं बालपण, शिक्षणासाठी घरच्यांच्या विरोधाला झुगारून इकडे आल्यावरच खडतर जगणं, इथले त्याचे देशी-विदेशी मित्र, मेक्सिकन संस्कृतीबद्दलही तो रंगून बोलत होता. केतूला वाटलं आपल्याकडे उत्तरेकडच्या राज्यातून गरिबीमुळे महानगरीत स्थलांतर केलेल्या युवकासारखीच याचीही कथा आणि व्यथा सारखीच. नावं, देश, माणसं वेगळी, पण प्रश्न तेच.
अनाया मध्ये मध्ये त्याचे मित्र, त्याची स्पॅनिश ढंगाने उच्चारलेलं इंग्लिश, सॉकरविषयी आत्यंतिक प्रेम यांची हसत हसत चेष्टा करत होती.
दुसरा दिवस शनिवार, सकाळची सुरुवात, मेक्सिकन मसाले घातलेल्या 'कॅफे दी ओला'ने झाली. दिएगोला थोडा आग्रह केल्यावर त्यांच्या बरोबर यायला तोही तयार झाला. तिघे बाहेर पडले. गाडीत बसून प्रवास सुरू झाला.
"आधी आपण हॉलीवूड वॉक ऑफ फेमला जाऊ या, मग ग्रिफिथ वेधशाळा, आणि सांतामोनिका बीच."अनायाने सगळं ठरवलं होतं.
"आता तू सांग तुझ्याबद्दल, तू सध्या इस्रायलला असतोस, एवढंच सांगितलं अनायाने." दिएगोने सुरुवात केली. भारताबद्दल त्याला बरीच माहिती झाली होती, पण अनाया आणि केतूची भाषा, संस्कृती वेगळी कशी, याचं त्याला खूप आश्चर्य वाटत होतं. इस्रायलबद्दलचे त्याचे प्रश्न संपत नव्हते. त्याला जगभर हिंडायचं होतं, त्यासाठी तो रॉकफेलरची स्कॉलरशिप ट्राय करत होता. जगभरचे भटके, जिप्सी हा त्याचा अभ्यासाचा, आवडीचा विषय.
दुपारच्या जेवणासाठी ओल्वेरा स्ट्रीटवरच्या स्पॅनिश रेस्टॉरंटला आग्रहाने घेऊन गेला.
"तुला आवडते ती 'अगुवा फ्रेस्का' (आमंन्ड आणि राईस यांच्यापासून बनवलेलं पेय) इथे चांगली मिळेल." अनायाकडे पाहत तो म्हणाला. अनायाने हसून मान डोलावली. खरं तर अनायाला बियर खूप आवडायची. पण हाच का तिच्यातर्फे स्वतः ठरवतोय?
"केतू, तुझ्या साठी खास मेक्सिकन ड्रिंक 'मिचेलादास' (spicy beer-based cocktail) . खरं तर टकिला हे आमचं खास मेक्सिकन ड्रिंक. पण दुपारी बियरच बरी."
त्याचा आग्रही स्वभाव, दुसऱ्याला आपल्या पंखाखाली घेणं हेच बहुधा अनायाला आवडत असावं. जेवणासाठी स्पॅनिश डिश 'तपास'ची ऑर्डरदेखील त्यानेच दिली. केतूला तपास प्रकार आवडलाच. एकच एक अशी मोठी डिश ऑर्डर करण्यापेक्षा छोट्या छोट्या वेगवेगळ्या डिशेस छानच. आपल्याकडच्या राइस प्लेटमध्ये असलेल्या वाट्यांची आठवण करून देणाऱ्या.
जेवण झाल्यावर, दिएगोनी विंडो शॉपिंग करत, एक हाताने विणलेलं वॉल हँगिंग केतूसाठी घेऊन दिलं.
आपण त्याच्यासाठी काहीच आणलं नाही, याचं केतूला वाईट वाटलं.
"गाइज, आय हॅव कम्युनिटी मीटिंग, सो एक्स्यूज मी अँड एंजॉय युअर इव्हनिंग" असं सांगत संध्याकाळी सांता मोनिका बीचवर त्या दोघांना सोडून दिएगो गेला.
सांता मोनिकाच्या वाळूवर उन्हं आता उतरणीला लागली होती. कारच्या थंडगार हवेतून बाहेर आल्यावर उष्णता चांगलीच जाणवत होती. वाळूत ठिकठिकाणी छत्र्या लावून खुर्च्यांवर लोक पहुडले होते. गर्दीपासून थोड्याशा लांब अंतरावर मोकळी जागा बघून दोघे बसले.
"कशी आहेस तू?" केतूच्या प्रश्नाकडे तिचं लक्षच नव्हतं.
'किती दिवसांनी आले मी आज अशा शांत ठिकाणी" अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे पाहत अनाया म्हणाली.
केतूने नुसतच प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं.
"अरे, हल्ली जमतच नाही असा निवांत वेळ काढायला."
"अमेरिकेला मी आले, ते सुरुवातीचे दिवस खूप वेगळे होते, जवळजवळ वर्षभर सेटल होण्यातच गेलं. भाषा, संस्कृती, कॉलेज सगळंच वेगळं. त्यात मजाही होती. नवीन मित्र, नवीन वातावरण सुरुवातीला सगळंच भारावून टाकणारं. पण मग नंतर आला तो जीवघेणा कोव्हिडचा अनुभव. मुळापासून हादरवून टाकणारा. रोज काही ना काही वाईट बातम्या कानावर पडायच्या. पप्पा-मम्मीदेखील त्या विळख्यात आले. नशिबाने वाचले. एवढ्या लांब असल्याने मी काहीच करू शकत नाही, ही अगतिकता, भोवतालच खायला उठणारं एकटेपण यांनी मी पुरती ढासळून गेले. एक सेमिस्टर हातातून गेली. पप्पा आजारातून बरे झाले, पण त्यांचा बिझनेस काही परत उभारी धरू शकला नाही. आपला आर्थिक भार त्याच्यावर पडू नये, म्हणून त्यांच्याकडचे पैसे घेणं मी बंद केलं. इथे मिळेल तो जॉब केला. बाहेर चिटपाखरू नसताना मैलोनमैल सायकल दामटत डिलिव्हरीची कामं केली. त्याचा व्हायचा तो परिणाम शरीरावर झालाच. मीच आजारी पडले. अंगात ताप असताना पोटात काही ढकलण्यासाठी बाहेर पडून तास तास एका ब्रेडसाठी रांगेत थांबायचे. वर्ष असंच निघून गेल, कॅपस इंटरव्ह्यूला कोणी आलचं नाही. भविष्याचा प्रश्न आ वासून उभा होता."
आता चांगलाच अंधारून आलं होत. लांबवर असलेल्या निऑन दिव्याचा हलकासा उजेड अनायाच्या चेहऱ्यावर पडला होता. दोन्ही गुडघ्यां भोवती हाताची मिठी घालून शून्यात नजर लावून बोलत बसलेल्या तिला हलकेच थोपटावं, कुशीत घ्यावं अशी त्याला तीव्र उमळ आली. पण तसं काहीही न करता त्याने तिला पुढं बोलू दिलं.
"तेव्हा रहात होते त्या गरीब वस्तीतल्या शेजाऱ्यांशी काही ओळखी झाल्या. ओळखीने एका छोट्या सॉफ्टवेअर कंपनीत काम मिळालं. पण कसं कोणास ठाऊक, मी दारू खूप प्यायला लागले. पैसे बऱ्यापैकी मिळत होते, पण पुरत नव्हते. घरची आठवण होऊन अधिकच अपराधी वाटायचं. त्या काळी मला एक स्वप्न वारंवार पडायचं. मी पप्पा-मम्मीबरोबर कुठल्यातरी समुद्रावर गेले आहे. पप्पाना मी विचारलं की मी जाऊ का पाण्यात? त्यांनी आनंदाने परवानगी दिली. मी पाण्यात शिरताना मला त्या दोघांची खातरी होती. समजा, मी बुडू लागले, तर नक्कीच मला वाचवतील. पाण्यात हातपाय मारत बरीच आतपर्यंत गेले. हातापायातल त्राण गेलं. पाणी नाकातोंडात शिरायला लागलं. जिवाच्या आकांताने मी हाक मारली. पण तोंडातून आवाजच उमटत नव्हता. मी पाठी वळून पाहिलं, तर ते दोघ तिथेच होते. फक्त त्यांचे डोळे मिटलेले होते. त्याच क्षणी जाग यायची."
त्या स्वप्नाच्या नुसत्या आठवणीने तिच्या अंगावर काटा आला.. डोळ्यात हलकेच पाणी दाटून आलं. केतूने हलकेच त्याचा हात तिच्या हातावर ठेवला.
"अशाच एका संध्याकाळी पबमध्ये मी झिंगलेल्या अवस्थेत असताना दिएगो भेटला. सुरुवातीला मी त्याला झिडकारून लावलं. त्या काळात कोणाचाच भरवसा वाटत नव्हता. पण दिएगोने हार न मानता माझा पिच्छा पुरवला. माझं व्यसन हळूहळू कमी केलं. आता मी काम करतेय त्या मल्टीनॅशनल कंपनीत अर्ज करायला लावला. नशिबाने मला जॉब मिळाला. पैसा हातात आल्यावर घर बदललं, गाडी घेतली. आयुष्य आता परत रुळावर आलंय."
अनाया आता बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती. "आज मी जी दिसतेय, ती फक्त दिएगोमुळे."
बराच वेळ शांततेत गेला. दोघेही लाटांचा आवाज ऐकत बसून राहिले.
"पुढचा काय प्लान आहे? कोलकत्याला परत जाणार आहेस का?"
"छे रे, आता हीच आपली कर्मभूमी. जीना यहां मरना यहां " हसत हसत उठत म्हणाली, "चल, निघू या आपण, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून."
परत येताना वाटेत ती दिएगोबद्दल भरभरून बोलत होती. केतू गाडीच्या खिडकीतून बाहेर पहात नुसता हुंकारत होता. तिच्या चेहऱ्यावरची अतीव तृप्ती बघून त्याला एकीकडे खूप समाधान वाटत होतं, पण दुसरीकडे हातातून काही तरी निसटतंय असं वाटून पोटातून तुटल्यासारखं होत होतं.
सुकेत्सु - ९
लॉस एंजेलिसहून तेल अविवकडे जाणाऱ्या विमानाने उड्डाण करून तासभर झाला होता. बिझनेस क्लासमध्ये तशी तुरळकच माणसं होती. बऱ्याच सीट्स रिकाम्या होत्या. केतूच्या शेजारच्या सीटवर पन्नाशीचा ब्रिटिश इसम, लॅपटॉपवर काम करत बसला होता.
केतू स्क्रीनवर कुठलातरी मूव्ही पहात होता. पण थोड्याच वेळात तो कंटाळला. स्क्रीन बंद करून तो आजूबाजूला पहात असताना, जणू त्या संधीची वाट पहात असल्यासारखा शेजारचा माणूस हात पुढे करत म्हणाला, "मी जेम्स! जेम्स अँडरसन. ब्रिटनमध्ये पत्रकार आहे, फ्रीलान्स, जागतिक राजकारणावर लिहितो."
केतूने स्वतःची अगदी जुजबी ओळख करून दिली.
"तू बोअर होणार नसशील, तर आपण गप्पा मारू शकतो?" लॅपटॉप बंद करत जेम्स म्हणाला. आवाजात मार्दव असलं, तरी एक सुप्त ब्रिटिश माज होता.
"ओह, येस, ऑफ कोर्स!" केतू अगत्याने म्हणाला. गप्पा मारायला कोणीतरी हवंच होतं.
ड्रिंकची ट्रॉली फिरवतमध्येच एयर होस्टेस आली. जेम्सने डबल स्कॉच विथ आइसची ऑर्डर दिली. केतूने बियर घेतली.
सुरुवातीच्या कोण, कुठला, काय करतो या ओळखीच्या संभाषणानंतर गाडी हळूहळू राजकारणाकडे वळली.
माणूस गप्पिष्ट होता आणि जात्याच पत्रकार असल्यामुळे राजकारणाची चांगलीच जाण होती
"तू आता इस्रायलमध्ये बराच स्थिरावला आहेस, सध्याच्या नेत्यांनी केलेल्या कायद्यातल्या सुधारणा, त्याची जनमानसात उमटलेली प्रतिक्रिया, विरोध, मोर्चे या सगळ्याकडे कसा पाहतोस तू?" स्कॉचचा एक मोठा घोट घेत जेम्स म्हणाला.
"मी भारतातून आलोय, तिथेही लोकशाहीची ताकद आणि मर्यादा दोन्ही पाहिल्या आहेत. इस्रायलमध्ये लोकशाही अजून तरुण आहे, पण संघर्ष खूप जुना आहे. हा ताण स्फोटक होऊ शकतो.” केतू अगदी सावध पवित्रा घेत म्हणाला.
“ब्रिटनमध्ये आम्ही म्हणतो - लोकशाही ही प्रयोगशाळा आहे. पण इस्रायलमध्ये ती प्रयोगशाळा रणांगणासारखी वाटते.”
केतू हसत म्हणाला, “बरोबर. आम्ही अभियंते प्रयोगशाळेत स्थिरता शोधतो. पण इथे प्रयोगशाळेतील बीकर नेहमी फुटायला तयार असतो.”
"पण काही अंशी अमेरिका याला कारणीभूत आहे असं वाटतं. व्हाइट हाउस सतत दबाव टाकतं - डेमोक्रॅट्सना मानवी हक्क महत्त्वाचे वाटतात, पण त्यांना मध्यपूर्वेतील रणनीतीसाठी इस्रायल हवाच आहे."
“हो, अमेरिकेचा दबाव हा द्विमुखी असतो. एका बाजूला मदत - शस्त्रास्त्रं, गुप्तचर तंत्रज्ञान - तर दुसऱ्या बाजूला न थांबणारी हस्तक्षेपाची प्रवृत्ती. माझ्या दृष्टीने इस्रायलचा खरा कस आहे तो म्हणजे स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता टिकवणं.”
“अब्राहम करारानंतर इस्रायलचे यूएई, बहरीन आणि मोरोक्को सोबत संबंध सुधारले. पण पॅलेस्टाइनचा प्रश्न अजूनही जिवंत आहे. अरब स्ट्रीट मात्र मान्य करत नाही. तणाव कधीही भडकू शकतो.”
“भारताने पॅलेस्टाइनलाही मान्यता दिली आणि इस्रायलशी संबंधही ठेवले. संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. पण जमिनीवर हे जाणवत राहतं की या दोन्ही देशात संवाद कमी आणि अजूनही भिंतीच जास्त आहेत.” केतूला संभाषण वेगळ्या दिशेला न्यायचं नव्हतं.
“कदाचित ब्रिटनच्या नकाशा आखणाऱ्या राजकारण्यांनीच हा डोंगर कायमचा डोक्यावर तरंगता ठेवला.” जेम्स आपल्याच लोकांची चूक मान्य करतोय, याचं केतूला आश्चर्य वाटलं.
“हो. इतिहासाने आखलेल्या सीमा काही लोकांना कायम भटकंतीला लावतात. नकाशा काढणाऱ्यांचं काम शाई वाळली की संपतं, पण लोकांच्या जगण्याचा प्रश्न सुरू होतो.”
जेम्सने मान डोलवत ग्लास संपवला आणि दुसरा असाच पेग ग्लासात एयर होस्टेसकडून भरून घेतला.
मग एक सिप घेत, सीट थोडी रिलॅक्स करत, मधल्या ब्लाइंडला टेकत एखादं गुपित विचारावं तसं जेम्सने विचारलं, “मोसादबद्दल जगभरात उत्सुकता असते. कधी यशस्वी ऑपरेशन, कधी हत्या, कधी शत्रुराष्ट्रांतील गुप्त कारवाया… तुम्ही संशोधन संस्थेतून जवळून अनुभवत असाल ना ते सगळं? कसं वाटतं?”
“तपशील सांगणं माझ्या भूमिकेतून शक्य नाही. पण एवढं नक्की - मोसाद ही फक्त गुप्तचर यंत्रणा नाही, ती मानसिकतेचाच भाग आहे. ‘Survival at any cost’ हा विचार खोलवर रुजलेला आहे त्यांच्यात.”
एक दीर्घ सुस्कार सोडत जेम्स नुसताच हुंकारला. केतूच्या उत्तरांनी अर्थातच त्याचं समाधान झालं नव्हतं.
नंतर बराच वेळ तो सिरिया, त्याला असलेला रशियाचा पाठिंबा, इराणमधली स्फोटक परिस्थिती, तेलाचं राजकारण, मध्य आखातातलं जिओ पॉलिटिक्स याबद्दल बरंच बोलत होता, केतूची मतं आजमावून पहात होता.
केतूला थोडी शंका आली, का विचारतोय आपल्याला हा एव्हढे प्रश्न? तो इस्रायलला का चालला आहे या केतू च्या प्रश्नाला मात्र त्यांने अत्यंत शिताफीने बगल दिली होती. आणि सभ्यता पाळून केतूने पाठपुरावा केला नाही.
बरीच स्कॉच पोटात गेल्यामुळे जेम्स चांगलाच पेंगुळला. मान मागे टेकत थोड्याच वेळात गाढ झोपी गेला.
केतुचा मोबाइल सायलेंट मोडवर असल्यामुळे ब्लिंक झाला. फोन उघडून त्याने मेसेज बघितला. यूरीचा मेसेज होता. ती त्याला एयरपोर्टवर रिसीव्ह करायला येणार होती. पुढचा बराच वेळ तिच्या आठवणीत केतू गढून गेला.
सुकेत्सु - १०
केतूला आज नेहमीच्या कार्मेल मार्केटमधल्या ऑफिसऐवजी होलोन सिटीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सेंट्रल ऑफिसला जायचं असल्यामुळे तो थोडा लवकरच निघाला. काही विशेष कारण असल्याशिवाय यीगल सहसा सेंट्रल ऑफिसला बोलवत नसे.
गेल्या आठवड्यातील यूएस ट्रिप आणि त्याच्या तयारीसाठीचे तीन-चार दिवस, केतूचं कामाकडे तसं विशेष लक्ष नव्हतं. पण काल आल्यापासून त्याला ऑफिस वातावरणात एक विचित्र तणाव जाणवत होता. काहीतरी राहून गेल्याची हुरहूर जाणवत होती. जाण्याच्या अगोदरच प्रोजेक्ट बहुतांशी पूर्ण झालं होतं. हँडओव्हर करण्याची फॉरमॅलिटी फक्त बाकी होती. पण काल आल्यावर त्याच्या असिस्टंटकडून कळलेल्या माहितीनुसार, डॅनियलच्या सिस्टिमशी इंटिग्रेशन पार पडलं होतं. आणि बीटा टेस्टिंग ऑलरेडी सुरू झालं होतं. हा त्याला बसलेला पहिला धक्का होता, प्रोजेक्टचं अल्फा टेस्टिंग न करताच डायरेक्ट बीटा टेस्टिंग?
त्याला त्याच्या आणि त्याच्या टीमच्या कामाची कितीही खातरी असली, तरी सुरुवातीला काही त्रुटी राहून गेल्या असण्याची शक्यता नक्कीच होती.
सुरुवातीचे काही बग्ज त्याच्या टीमने ऑलरेडी फिक्स केले होते.आणि त्याविषयी आज डॅनियलशी चर्चा करायची, असं त्याने ठरवलेलं. पण त्याआधीच काल संध्याकाळीच यीगलकडून आजच्या मीटिंगबद्दल मेल आलेली.
नेहमीप्रमाणे केतू यीगलच्या केबिनकडे न जाता, सरळ कॉन्फरन्स रूमकडे गेला. त्याला अपेक्षा होती की तो गेल्यावर मीटिंग सुरू होईल. तो तसा वेळेच्या आधीच पोहोचला होता.
दार उघडून आत जाताच त्याला दुसरा धक्का बसला. मीटिंग ऑलरेडी सुरू झाली होती.
यीगलने त्याला हातानेच बसायची खूण केली. डॅनियलचं प्रेझेंटेशन चालू होतं. केतूला बघून त्याने आवरतं घेतलं.
यीगलने सेक्रेटरीला खुण केली आणि पडद्यावर नवीन प्रेझेंटेशन सुरू झालं
आपण ज्या मोबाइल फ़ोनवर हे अॅप ट्रायल म्हणून इंस्टॉल केलं होतं, त्याचे हे रिझल्ट्स. यीगलने स्क्रीनकडे बघत सुरुवात केली.
सुरुवातीच्या काही स्लाइड्स झाल्यानंतर स्क्रीनवर जे दिसायला लागलं, त्याने त्या थंडगार रूममध्येसुद्धा केतूला दरदरून घाम सुटला. तो अगदी मुळापासून हादरून गेला. गेल्या दहा दिवसात तो कुठे कुठे गेला होता, तो कोणाला भेटला, काय संभाषण झालं याचा पूर्ण गोषवारा पडद्यावर दिसत होता. पुढच्या काही स्लाईड्समध्ये त्या प्रत्येक इव्हेंटचे सेकंड लेव्हल डिटेल्स (संभाषण) होतं. आणि तिसऱ्या लेव्हलला त्याच्या मनात आलेल्या विचारांचं शब्दात रूपांतरण!.
'प्रोजेक्ट चिमेरा'.. त्याचंच अपत्य. आपल्याच विचारांचं आपल्या नकळत झालेल प्रक्षेपण, त्याचं शब्दांकन.
यूएसला जाण्याआधी त्याला देण्यात आलेल्या फोनमध्ये आणि लॅपटॉपमध्ये त्याच्याही नकळत इन्स्टॉल झालेल (की केलेलं ?) त्याचंच प्रॉडक्ट.
एकाच वेळी आपल्या कामाचं चीज झालं याचा अभिमान आणि दुसरीकडे भर रस्त्यावर आपल्याच अंगावरचे कपडे कोणीतरी काढून घेतल्यावर येणारी लाज. केतूला या क्षणी समजत नव्हतं की त्याला काय वाटतंय. अंगावरच्या कपड्यांचं एक वेळ ठीकाय, जर सगळेच नागडे असतील तर थोड्या वेळाने आपल्याला आपल्या अंगावर कपडे नाहीत हे सवयीचं होऊन जाईल. पण जर आपलं मन समोरच्याला वाचता आलं, तर आपण अंतर्बाह्य नागडे होणार. माणसाला 'जाणीव' म्हणून जे काही वेगळं वरदान निसर्गाने दिलेलं आहे, ते जर असं सार्वजनिक झालं, तर माणूस स्वत्वच गमावून बसेल. केतूला हे फारच भयंकर वाटायला लागलं. विचारांमध्ये गढून गेल्यामुळे समोरच्या पडद्यावर काय चालू आहे हेदेखील त्याला कळेना.
कॉन्फरन्समधलं संभाषण, तिथे आलेले विचार इथपर्यंत ठीक आहे, पण नंतर अनायाबरोबर घालवलेले क्षण, त्या वेळचे आपले विचार प्रत्यक्ष समोर पडद्यावर वाचताना आपली भावना एवढी सार्वजनिक व्हावी याचं त्याला खूप वैषम्य वाटलं. या क्षणी ओरडून यीगलला जाब विचारावा, असा प्रबळ विचार त्याच्या मनात आला. दुसऱ्याच क्षणी आपला मोबाइल समोरच टेबलावर आपले विचार टिपतोय याची जाणीव झाली आणि त्याने झटकन मोबाइल पालथा घातला. आणि समोरच्या लॅपटॉपचं झाकण बंद केलं.
"रिलॅक्स माय बॉय," त्याची अवस्था ओळखून यीगल म्हणाला, "बी अशुर्ड, या खोलीच्या बाहेर या गोष्टी जाणार नाहीत."
"पण तुम्ही माझी परवानगी न घेता.." केतू अत्यंत विषादाने टेबलावर हात आपटून म्हणत असताना त्याला अर्धवट तोडून यीगल म्हणाला,
"तू आपल सर्व्हिस अॅग्रीमेंट नीट वाचलं नसणार, किंवा आता या क्षणी भावनेच्या भरात तुला ते पूर्ण आठवत नसेल."
"थोडक्यात, आपण सध्यातरी कुठलंही बेकायदेशीर कृत्य करत नाही आहोत.
इन फॅक्ट, या प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशनची सुरुवात खूपच आशादायक पद्धतीने झाली आहे." केतू गप्प आहे हे बघून एक मोठा पॉज़ घेऊन यीगल म्हणाला, "तूला विमानात भेटलेला जेम्स अँडरसन हा कोणी पत्रकार नसून तो ब्रिटिश सर्व्हिसेसचा सीक्रेट एजंट आहे. तू त्याला आपल्याबद्दल फार माहिती दिली नाहीस हे बरं केलंस.
आपले लोक त्याचा पुढचा बंदोबस्त करतीलच."
यीगल काय म्हणतोय याचा अर्थ लागायला केतूला थोडा वेळ लागला. पण पुढच्याच क्षणी हे लोक किती पोहोचलेले आहेत आणि आपल्याला किती जपून पावलं टाकली पाहिजेत, याची जाणीव झाली.
आपण तयार केलेलं हे प्रॉडक्ट किती इफेक्टिव आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम काय काय होणार आहेत, याची चिंता त्याला आता जास्तच वाटायला लागली.
"काळजी करू नकोस. हे प्रॉडक्ट आपण आपल्या म्हणजेच इस्रायलच्या संरक्षणासाठीच वापरणार आहोत, आणि सध्या तरी तू इस्रायलचाच एक भाग आहेस"
"पण हे इस्रायलच्या बाहेरदेखील जाऊ शकतं ना?"
"जाऊ शकतं नाही, तर आम्हीच ते विकणार, ज्याला कोणाला दहशतवाद्यांशी लढण्यासाठी हे हवं आहे, त्यांना."
"गुन्हेगारदेखील हे विकत घेतील आणि समाजावर त्याचा किती विपरीत परिणाम होईल.." केतूला हे सगळं पचवणं खूप जड जात होतं.
"हो, खरं तर गुन्हेगार आणि राजकारणी हेच याचे मुख्य ग्राहक आहेत, सामान्य लोकांना ह्याची गरजच नाही, आणि मुळात त्यांना हे परवडणारदेखील नाही."
"टेक्नॉलॉजीचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी... "
त्याचं वाक्य यीगलनेमध्येच तोडलं, "आजपर्यंत कुठलीच नवीन टेक्नॉलॉजी ही मानवाच्या भल्यासाठी शोधली गेली नाही, अगदी इंटरनेट असो किंवा अॅटोमिक एनर्जी. सगळे शोध मिलिटरीसाठीच लावले गेलेत. पण त्यातून मानवाचं कल्याण झालंच की. आपल्या चिमेराचा उपयोगदेखील चांगल्या कामासाठी येणाऱ्या काळात नक्कीच होईल." यीगलचा हा युक्तिवाद केतूला फारसा पटला नाही. पण याचे होणारे परिणाम आणि आपली त्यात नक्की काय भूमिका असली पाहिजे? यावर अँटिडोट काय असायला पाहिजे? त्यात आपल्याला काय करता येईल? या विचारात तो पूर्ण गढून गेला.
"आत्ता तुझ्या डोक्यात काय विचार चालू आहेत याचं ग्रहण करून त्याचं स्क्रिप्टमध्ये रूपांतर करायला आपल्या चिमेराला वेळ लागतोय. स्पीच ते स्क्रिप्ट हे जसं रियल टाइममध्ये होतं, तसं आपल्याला साध्य करता आलं पाहिजे. बॉइज, आपल्या हातात वेळ खूप कमी आहे आणि शक्यतो लवकर आपल्याला ही स्टेज गाठायची आहे. केतू, तू कॉन्फरसमध्ये मायकल न्यूगेनशी चर्चा केल्या प्रमाणे पुढची तयारी करा." यीगलने समारोप केला.
बाकी सगळे गेले, तरी केतू अजूनही दिग्मूढ होऊन बसून होता. "तुझा मोबाइल पाहिजे असेल तर बदलून घे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला." यीगल केतूच्या खांद्यावर थोपटून बाहेर पडला.
सुकेत्सू - ११
केतू सकाळी लवकरच होलोनवरून गाडी घेऊन निघाला. गरमी वाढायच्या आत त्याला कफर अझा गाठायचं होतं. तसा प्रवास तास-दीड तासाचाच. पण वाटेतली एक-दोन ठिकाण पहात जाण्याचा प्लान होता.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच झालेली यीगलबरोबरची मीटिंग आणि त्यानंतर घडलेल्या घटना याने तो खूप अस्वस्थ होता. कामाकडे जेमतेम लक्ष होतं.
'सुरक्षेच्या नावाखाली हे लोक कोणाचाही बळी देऊ शकतात, या विचाराने त्याची झोप उडाली होती. भारतात परत जावं का, हे सगळं सोडून? तिथे तरी आपलं असं कोण उरलंय? युरी हा देश सोडून थोडीच येणार आहे आपल्याबरोबर? आणि तिकडे काय वेगळं असणार आहे? राजकारणी, त्यांनी टेक्नॉलॉजीचा केलेला दुरुपयोग तिथेही असणारच. माणसं मुळात समाजात राहून एवढी असुरक्षित का असतात? हातात सत्ता आली की माणूस भ्रष्ट होतो. हे हुकूमशहाच्या बाबतीत सत्य असेलही, पण लोकशाहीतसुद्धा तेच तर अनुभवतोय. भारतात आणि इथेसुद्धा. सत्ता गाजवायला आणि टिकवायला पैसा, आणि पैसे कमवायला परत सत्ता. पैसा हेच माणसाच अंतिम ध्येय आहे का? पण पैसा तरी निर्माण करून प्रश्न सुटत नाहीतच. पैसा निर्माण होणार तो निसर्गात असलेली साधनसंपत्ती वापरून आणि त्याच्यावर कोणाची मालकी आहे त्यावर अवलंबून असणार. पण ही निसर्गातली संपत्ती ओरबाडून घेण्यामागे लागलीय सगळी मनुष्यजात. ती संपली की मानवही संपला. पण हे शहाणपण म्हणजे कळतंयं पण वळत नाही या प्रकारातलं.'
विचाराच्या तंद्रीत उजवीकडचं वळण चुकलं. गूगल मॅप आता परत री-रूट करून दाखवतंय. तरी दोन किलोमीटरचा जास्तीचा वळसा बसणार आता.
वाटेत एका छोट्या ढाब्यावर केतू नाष्ट्यासाठी थांबला, मालावाच (अंड आणि टोमॅटो घालून केलेला एक प्रकारचा पॅनकेक) आणि कॉफी घेतली.
कफर अझाला यायचं सॅालोमनचं आमंत्रण का बरं स्वीकारलं आपण? इस्रायलच्या दक्षिणेला गाझा पट्टीला लागून असलेलं कफर अझा नावाच किबुत्झ. सॉलोमन झिरादकर हा तिथला बेनें इस्रायल - म्हणजेच भारतातून स्थलांतरित झालेला ज्यू. आपल्या वयाच्या तिशीत भारतातून इस्रायलला आलेला आणि आता जवळजवळ वयाची सत्तरी गाठलेला. सहा महिन्यांपूर्वी तेलअवीवमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्याच्याशी ओळख झालेली. त्याने अगदी अगत्याने किबुत्झला भेट द्यायचं दिलेलं आमंत्रण आपण पूर्ण विसरूनदेखील गेलो होतोत. पण दोन दिवसांपूर्वी त्याची मेल आली. त्यात उद्यापासून सुरू होणाऱ्या सिमचॅट तोराह उत्सवात केतूने सहभागी व्हावं, असा प्रेमळ आग्रह होता.
आपल्यालादेखील थोडा चेंज हवाच होता. त्यातून मराठी लोकांबरोबर वीकेंड घालवायला मिळणार, ही तर एक पर्वणीच होती.
त्याने युरीबरोबर चर्चा केली. तिनेदेखील ही कल्पना उचलून धरली. ती मात्र त्याच्या बरोबर येऊ शकत नव्हती. तिला पुढच्याच आठवड्यात ती जाणार असलेल्या एका वेगळ्या मोहिमेची तयारी करायची होती.
तो पोहोचला, तेव्हा सॉलोमन त्याची वाटच पहात होता. त्याच्या पूर्ण कुटुंबाने केतूचं स्वागत केलं. साराह, सॉलोमनची बायको. तिने त्याला कोकम सरबत देऊन त्याच्याशी कोंकणी बोलायला सुरुवात केली. केतूला कोंकणी बोलता येत नसलं, तरी समजत होतं. तो मराठीत उत्तर देत होता.
दुपारच्या जेवणानंतर सॉलोमन त्याला घेऊन गाव दाखवायला बाहेर पडला. पन्नास-साठ उंबऱ्यांच टुमदार गाव होतं. हवा अगदी आपल्या कोकणात असते तशी. मुख्य व्यवसाय शेती आणि त्याला असलेले जोडधंदे. शेती मात्र अगदी आधुनिक पद्धतीने केलेली. पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि आधुनिक कंप्यूटर सिस्टिम वापरून केलेला. सॉलोमन अगदी उत्साहाने सगळं दाखवत होता. त्यांची छोटीशी लायब्ररी. त्यात असलेली हिब्रू, इंग्लिश आणि मराठी पुस्तकं.
"आम्ही इथे आलो ,त्या वेळीही आम्हाला इथल्या सरकारने खूपच मदत केली, जमिनी बाजारभावापेक्षा निम्म्या किमतीत दिल्या." सॉलोमन सांगत होता, "सुरुवातीच्या काळात आम्हाला लोकल टॅक्स माफी होती. सरकार आमच्यासाठी बरेच वेलफेअरचे कार्यक्रम राबवत असे. पण सरकारचा कारभार सगळा हिब्रू भाषेत चालायचा आणि आमच्याबरोबर आलेल्या बऱ्याच जणांना ती भाषा समजत नसे. त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे ‘मायबोली' नावाचं मराठी त्रैमासिक काढलं. त्याच्यातून आम्ही सगळ्या योजनांची माहिती देत होतो. आता त्यात वेगवेगळे आंतरराष्ट्रीय विषयांवरचे लेख, कथा, कविता याचा समावेश असतो."
उन्हं उतरणीला लागली, तेव्हा ते जवळ असलेल्या सिनेगॉगपाशी आले. सिनेगॉगमध्ये दुसऱ्या दिवसाच्या उत्सवाची तयारी जोरात सुरू होती. पूर्ण परिसर दिव्यांच्या रोशणाईने भरून गेला होता. बाहेर मांडव उभारला होता. बाजूला छोटे छोटे स्टॉल उभारणं चालू होतं. एका बाजूला नृत्यासाठी जमीन समतल करून कारपेट पसरण चालू होतं.
"तुम्ही तिकडून आलात, त्यामुळे तुम्हाला मराठी चांगलं येतं. पण पुढच्या पिढ्यांचं काय?"
"आम्ही त्यांच्यासाठी मराठीचे वर्ग चालवतो. मराठी नाटक, वाचन यांच्या स्पर्धा आयोजित करतो. हे काम सगळ्या इस्रायलभर पसरलं आहे. कारण बेने इस्रायल हे विखुरलेले आहेत. पुढच्या पिढीकडून हा वारसा जपला जावा, असाच आमचा प्रयत्न असतो."
इस्रायल ही त्याच्या पूर्वजांची भूमी, त्या ओढीने सगळे परत एकत्र आलेले, पण आपल्या जन्मभूमीले विसरले नाहीत. ती मुळं अगदी घट्ट धरून आहेत अजूनही. विचार करताना केतूला सोलापूरची आठवण हळवी करून गेली.
"सिमचॅट तोराह हा यहुदी लोकांचा आनंदाचा सण." सॉलोमन माहिती देत पुढे म्हणाला, "तोराह नावच्या मोझेसनी लिहिलेल्या पाच ग्रंथाचं (फाइव्ह ओल्ड टेस्टामेंट्स) वाचन वर्षभर चाललेलं असतं. त्या वाचनचक्राचा शेवट या आठवड्यात होतो आणि नवीन वाचनचक्राला पुन्हा सुरुवात होते. हा आठवडा सुक्कोत सण म्हणून साजरा होतो. उद्या सगळे सिनेगॉगमध्ये जमा होतील. नाचगाणी असतात, मिठाई, गिफ्ट यांची देवाणघेवाण असते. उद्या तू पाहशीलच. आपल्याला सकाळी लवकर जायचं आहे सिनेगॉगमध्ये."
संध्याकाळी जेवायला त्याचं सगळं कुटुंब उपस्थित होतं. मुलगी लिवा, जावई जोसेफ. त्यांची पाच वर्षांची गोड झेन. दुसऱ्या शहरातून आलेले मुलगा इलीहावू आणि सून रिबेका. पहिल्या मजल्यावरच्या रुंद अशा डायनिंग टेबलवर सगळे जमले. तोराहमधल्या ड्यूटुरॉनमीचं (हिब्रू बायबल) वाचन झालं. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आपापल्या आवडीप्रमाणे निवडलेल्या ‘अरक’, ‘टुबी-६०’ किंवा ‘लिमोनान’ने भरलेले ग्लास उंचावले गेले. साहित्य, राजकारण, संस्कृती अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा अगदी रंगात आल्या.
येताना युरीने सगळ्यांना देण्यासाठी भेटवस्तू दिल्या होत्या. केतूने त्या सगळ्यांना दिल्या. खासकरून छोट्या झेनला एक गुलाबी हॅट आणि गुलाबी टेडीचं सॉफ्ट टॉय. तिचे डोळे अगदी लकाकत होते. खूश होऊन तिने सगळ्यांना एक पोएम म्हणून दाखवली.
नंतर आलेलं जेवण म्हणजे भारतीय आणि इस्रायलच्या खाद्यसंस्कृतीचं उत्कृष्ट मिश्रण होत. खूप दिवसानी मिळालेल्या महाराष्ट्री पदार्थांमुळे केतूने जेवणावर आडवा हात मारला.
दुसरा दिवस उजाडला तोच मुळी आनंद आणि उत्साह याचं लेणं घेऊन. गावातली सगळी मंडळी तयार होऊन सिनेगॉगमध्ये हळूहळू जमली. सगळ्यांनी मिळून तोराहचं पहिलं पान 'ग्रूम'चं वाचन केलं.
तोराहचं एक आवर्तन संपून दुसरं चालू झालं. याचाच अर्थ त्याचं वाचन ही एक अखंड प्रक्रिया आहे. "यहुदी लोकांनी जीवन कसं जगावं याचंच मार्गदर्शन या पुस्तकात आहे." सॉलोमन केतूला समजावून सांगत होता.
डान्स फ्लोअरवर तरुण मंडळी जमा झाली. बाजूला असलेल्या वाद्यवृंदात, गिटार आणि व्हायोलिनवर गाण्याचे सूर छेडले गेले. पावलांनी आपोआप ताल धरला. मुलं हातात झेंडे नाचवत गोल फिरत होती. काही अगदी लहान मुलं त्यांच्या पालकांच्या खांद्यावर बसून फिरत होती. गुलाबी फ्रॉक घालून तिच्या बाबांच्या खांद्यावर बसलेली झेन हातात असलेला टेडी मोठ्याने नाचवत होती. बाकीच्या मंडळींनी हातात सुंदर सजवलेलं तोरा स्क्रोल घेऊन मोठं रिंगण करून सात फेरे घ्यायला सुरुवात केली.
"याला आमच्या भाषेत हकाफा म्हणतात." प्रत्येक कृती आणि त्याचा अर्थ सॉलोमन केतूला समजावत होता.
"हे रिंगण म्हणजे शाश्वत जगाचं प्रतीक. न आदि न अंत असं. सुख समृद्धीने भरलेलं."
केतू लक्ष देऊन ऐकत होता. त्याच विचारचक्र सुरू झालं. प्रत्येक धर्मातलं तत्त्वज्ञान हे मानवाच्या कल्याणासाठीच आहे, तर मग माणसांनी त्यात भेद का केला? तुझा धर्म श्रेष्ठ की माझा याच्या भिंती का उभ्या केल्या? ही सृष्टी ज्याने निर्माण केली, त्याने त्यात कुठे भेद केला? सृष्टी सगळ्यांसाठी एकच असेल तर तो निर्माण करणारा कोणी प्रत्येकासाठी वेगळा कसा असेल?
"साराह कशी आली नाही अजून?" मागे राहिलेल्या त्याच्या पत्नीच्या वाटेकडे पाहत सॉलोमनने विचारलेल्या प्रश्नांने केतूला एकदम तिची अनुपस्थिती जाणवली.
"मी बघून येतो चटकन, माझा कॅमेराहि घेऊन येतो घरी राहिलेला" असं म्हणत केतू घराच्या दिशेने निघाला.
घर तसं फार लांब नव्हतं, जेमतेम चारशे मीटर.
घर जेमतेम शंभर मीटरवर आलं, तेवढ्यात स्फोटाचे जोरदार आवाज झाले. सुरुवातीला केतूला वाटलं की सण असल्यामुळे फटाके उडवताहेत. पण समोरचं दृश बघून तो जागेवरच गोठून गेला. आकाशातून येणारं एक रॉकेट सरळ समोरच्या घरावर आदळलं. आगीचा डोंब उसळला. डोळ्यांपुढे अंधारी आल्यामुळे केतू जागेवरच कोसळला. थोड्या वेळापूर्वी ज्या घरातून आपण निघालो, कालपासून आपण ज्या घरात राहिलो, आपल नुसत सामानच नव्हे, तर सॉलोमनचा अख्खा संसार असेललं घर, साराहसकट सगळं सामावलेलं घर, होतं.. आता तिथे काहीच शिल्लक नाहीये.
पाठोपाठ आजूबाजूच्या घरांवरदेखील रॉकेटचा वर्षाव सुरू झाला.
काही क्षणात त्याला वास्तवाचं भान आलं. घश्याला कोरड पडली होती, पायातलं त्राण नाहीसं झालं होतं. सगळी शक्ती एकवटून त्याने सिनेगॉगकडे धाव घेतली.
वाटेत बहुतेक घर उद्ध्वस्त झालेली, रस्त्यावरच्या गाड्या पेटलेल्या.
माणसं रस्त्यावर सैरावैरा पळताहेत. कोणालाच समजत नाहीये काय झालंय ते.
पाय ओढत तो सिनेगॉगच्या आवारात पोहोचला. संगीत थांबलं होतं. हातात एके ४७ घेतलेले दोन अतिरेकी अंदाधुंद गोळीबार करत होते. ज्यांच्या लक्षात आलं, त्यांनी आडोसा घ्यायचा प्रयत्न केला. पण अनेकांना तेवढीही संधी मिळाली नाही. गोळ्यांना बळी पडलेल्यांचा खच पडलेला. काही मिनिटांपूर्वी आनंदाने, उत्साहाने फसफसणारी ती जागा रक्तमासांच्या सड्यांनी न्हाऊन निघाली होती.
सगळ्या संवेदना बधीर झालेल्या केतूने टेबलाचा आडोसा घ्यायचा प्रयत्न केला. टेबलावरचा रक्ताने लाल झालेला टेडी त्याच्या हाताला लागला. गुलाबी फ्रॉकचं एक टोक त्या प्रेताच्या ढिग्यार्यातून वाऱ्यावर भिरभिरत होतं.
केतूला क्षणभरच टेबलाच्या मागे सुरक्षित वाटलं.
दुसऱ्या क्षणी मागच्या बाजूने आलेल्या गोळ्यांच्या फैरींनी त्याचा वेध घेतला. पाठीकडून घुसलेली वेदना आतपर्यंत भिनत गेली. हळूहळू त्याची शुद्ध हरपत गेली. काय होतंय आपल्याला? आपण हलके हलके तरंगतोय, त्या वेदनेच्या ढगात. त्याही परिस्थितीत त्याने आपला मोबाइल काढला. पण हातात तेवढीही शक्ती राहिली नव्हती. मोबाइल गळून समोरच्या टेबलावर पडला. त्याच्यावर टेबलाच्या काठाला धरून केतू ओणवा झाला.
“युरी! युरी तू हवी होतीस आत्ता इथे, माझ्या जवळ.” काय करत असेल ती? ती येईल, नक्की येईल. आपल्याला थांबलं पाहिजे तोपर्यंत.
आता इस्रायलचे सैनिक येतील. ज्यांनी हे कृत्य केलं, त्यांचा समाचार घेतील. त्यांच्या घरांवर रॉकेट्स सोडतील. त्यांची माणसं मारतील. हे सूडाचं चक्र कोणीतरी थांबवायला हवं. युरी, तू करशील हे काम माझ्यासाठी? ‘चिमेराSSS, हे सगळं पोहोचव तिच्यापर्यंत! पोहोचवशील ना?
नाही थांबता येणार मला ती येईपर्यंत!
आधार घ्यायला टेबलाला धरलेला हात निसटला. निष्प्राण देह खाली निखळला.
तासाभरात युरीच्या मोबाइलवर बातमी धडकली, “High alert, Hamas militants stormed the Kfar Aza kibbutz: at least 117 people were killed in the attack”
केतूच्या मनातलं यीगलच्या स्क्रीनवर चिमेराने पोहोचवलं असेल कदाचित!
पूर्ण नाव - सुरेंद्र पांडुरंग पाटील
ईमेल - suren.lalita@gmail.com
पत्ता :- ८०१, ऑरेलिया, रुस्तोमजी अर्बनिया, माजीवाडा ठाणे ४००६०१
फ़ोन :- ९९२०६२०३९४
प्रतिक्रिया
22 Oct 2025 - 6:40 pm | कर्नलतपस्वी
असेल तर खुपच प्रवाही आणी प्रभावशाली आहे.
आपला पहिलाच लेख आहे. आणखीन लिहा. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.
लेख आवडलाच.
22 Oct 2025 - 8:39 pm | श्वेता२४
वाचताना मजा आली.
29 Oct 2025 - 8:08 pm | योगी९००
थोडी मोठी कथा पण वाचताना मजा आली.
29 Oct 2025 - 11:47 pm | सुक्या
मोठी कथा. टप्प्या टप्प्याने वाचली. मजा आली.
पुलेशु.
एक (फुकटचा) सल्ला: नाव व ईमेल चा पत्ता सार्वजनीक करणे ईतपत ठीक आहे. परंतु आपला घराचा पत्ता असा सार्वजणीक करणे हे जरा धोकादायक आहे. आजकालच्या जगात याचा कोण कुठे कसा वापर करेल याचा कुणीच अंदाज घेउ शकत नाही.
3 Nov 2025 - 7:45 am | बिपीन सुरेश सांगळे
कथा आवडली
4 Nov 2025 - 12:36 pm | राजेंद्र मेहेंदळे
ज्या बारकाईने प्रदेशाचे, मानसिकतेचे वर्णन केले आहे त्यानुसार लेखक स्व्तः ईस्त्राएलमध्ये राहुन आला असावा असे वाटले. टेक्नॉलॉजीचे वर्णनही चपखल आहे. पेगासस वगैरे रिअल टाईम गोष्टींचा उल्लेख रोचक आहे. पण एकुणच ज्या वेगाने आपण टेक्नॉलॉजीच्या आहारी जात आहोत त्यानुसार ही पण एक प्रकारची डिजिटल गुलामगिरीच आहे असे वाटु लागले आहे. आणि आपण स्वखुशीने त्यात अडकत चाललो आहोत. एकदा फुकटची अॅप वापरायला सुरुवात केली आणि त्यासाठी मोबाईलला अनेक प्रकारचे अॅक्सेस दिले की तुम्ही जणू काही तुमच्यावर नजर ठेवणार्या शत्रुलाच खिशात घेउन फिरताय. तुम्ही कुठे जाता, कधी जाता येता, काय खातापिता, कुठे सुट्टीवर जाता, तुमच्या खात्यात किती पैसे, तुमचे मित्र, नातेवाईक कोण, तुमचे रोग कोणते, आउषधे कोणती या पलीकडे जाउन जर मनातले विचार ओळखणारे काही अॅप किवा गॅजेट आले तर --हा विचारच अंगावर काटा आणतोय.